केंपे गौडा ते सिलिकॉन व्हॅली (१)  

    रविवार, १० मार्च २०२४. 

   बंगळुरूच्या भूमीवर पाऊल टाकल्यावर प्रथम माझ्या नजरेत भरला तो नजरेच्या टप्प्यात मावू न शकणारा इथला भव्य विमानतळ. केंपेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे या विमानतळाचे अधिकृत नाव. केंपे गौडा या विजयनगर साम्राज्यातील होयसळ वंशाच्या एका पराक्रमी सरदाराने १५३७ साली या शहराची मूळ स्वरूपात उभारणी केली व म्हणून त्याचेच नाव या विमानतळाला दिले गेले आहे. विमानतळाचा एकूण परिसर साधारण चार हजार एकर असून २००८ साली तो कार्यरत झाला. अर्थात काळाच्या ओघात त्यात वेळोवेळी सुधारणा होतच गेल्या आहेत. मी उतरलो होतो तो टर्मिनल १. सहा महिन्यांपूर्वी  ज्याचे उद्घाटन झाले तो टर्मिनल २ याच्यापेक्षाही  जास्त सुंदर आणि आधुनिक आहे; शिवाय तो इतका निसर्गस्नेही आहे की आपण विमानतळावर नसून एखाद्या उपवनात आहोत असेच प्रवाशाला वाटावे! आणि निसर्गस्नेही असतानाच तो तंत्रस्नेहीदेखील आहे. खूप उंच झुंबरांवरून लटकणाऱ्या वेलींना ठरावीक वेळी ठरावीक प्रमाणात पाणी घालण्यासाठी तिथे झुंबरांना लागूनच सेंसॉर-नियंत्रित सूक्ष्म नलिका आहेत! अर्थात हा टर्मिनल १ देखील काही कमी नाही. थेट विमानाच्या दरवाज्याशी जोडले गेलेले विमानतळाच्या मुख्य इमारतीचे रुंद कॉरिडॉर्स, गालिचे, शोभिवंत दिवे, सरकते जिने, दुतर्फा असलेल्या कल्पक जाहिराती – सगळे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे. सर्व विमानतळ पूर्णतः सोलार एनर्जीवर चालतो. उतरल्यावर अनेक प्रवाशांना पहिली गरज भासते ती टॉयलेटची. इथे ते जागोजागी आहेत आणि अगदी स्वच्छ व प्रशस्त. तेथून बाहेर पडले की लगेच तर्‍हेतर्‍हेचे खाद्यपदार्थ विकणारे असंख्य स्टॉल्स, शॉपिंग मॉल. आपल्या नजरेत लगेच भरणाऱ्या या गोष्टी; पण आपल्याला प्रत्यक्ष न दिसणाऱ्री  अशी खूप गुंतागुंतीची ट्रॅफिक कंट्रोल टॉवरसारखी तांत्रिक यंत्रणा पडद्यामागे काम करत असते आणि तीही खूप कार्यक्षम असावी लागते.

   आज आपल्या सरावलेल्या नजरेला ह्या सगळ्यात विशेष काही आहे असे वाटेनासे झाले आहे; हे सगळे असे असणारच हे आपण जणू गृहीतच धरले असते; पण अवघ्या काही वर्षांपूर्वीचे विमानतळावरचे चित्र आठवून पहा, म्हणजे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत भारतात झालेला हा केवढा मोठा बदल आहे हे लक्षात येईल. मुंबई, दिल्ली किंवा इतरही मोठ्या भारतीय शहरांतील विमानतळ असेच जागतिक दर्जाचे झाले आहेत; किंबहुना अगदी अमेरिकेतल्या अनेक विमानतळांपेक्षाही हे काकणभर अधिकच सरस असतील. विमानतळाची मालकी सध्या ७४ टक्के खासगी क्षेत्राकडे आणि २६ टक्के सरकारी क्षेत्राकडे आहे. जुन्या वास्तूत टप्प्याटप्प्याने सुधारणा घडवून आणण्यापेक्षा एखादी वास्तू पूर्णतः नव्याने उभारण्यातले फायदे, म्हणजेच टेलेस्कोपिक जंप (किंवा हनुमान उडी) घेण्यातले फायदे, इथे पाऊल ठेवताच लक्षात येतात. विकासपथावर भारताने काहीशी उशिरा सुरुवात केल्याचा हा एक अकल्पित फायदा म्हणता येईल. काळाच्या ओघात इतरांनी केलेल्या चुकांपासून आपण शिकू शकतो, जगात जे जे अधिकाधिक चांगले आहे ते अमलात आणू शकतो. जिथे लॅंडलाइन फोनदेखील फारसे कोणाच्या वापरात नव्हते अशा मागासलेल्या बांगलादेशात नोबेलविजेते ‘गरिबांचे बँकर’ मोहम्मद युनूस यांनी एके काळी आधुनिक मोबाइल फोन किती झपाट्याने आणले आणि त्याचा तेथील अशिक्षित बायकांनीदेखील आपल्या उपजीविकेसाठी किती उत्तम उपयोग करून घेतला हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल.

   केंपेगौडा विमानतळाबाहेरचे व्यवस्थापनदेखील  सुनियोजित आहे. विमानतळ शहरापासून ३२ किलोमीटर लांब असला तरी शहरात जाणाऱ्या बसेस कुठे मिळतील, टॅक्सीज कुठे मिळतील हे स्पष्ट शब्दांत लिहिलेले आहे. माहितीफलक व्यवस्थित, पट्कन दिसतील असे. कोणाला काही विचारायची गरजच उरलेली नाही आणि सगळीकडे व्यवस्थित रांगा. काही मदत हवी असल्यास उपलब्ध असलेले नम्र व प्रशिक्षित कर्मचारी. धक्काबुक्की कुठेही नाही – हाही मोठा चांगला बदल. बाहेरचा सगळाच परिसर सुशोभित. दुतर्फा हिरवळ आणि फुलझाडे, दिशादर्शक फलक, चौकाचौकांतील वर्तुळाकार उद्याने. विमानतळापासून शहराच्या जलहल्ली या भागात राहणाऱ्या राजन परुळेकर यांच्याकडे मला सर्वप्रथम जायचे होते आणि त्यासाठी टॅक्सी पुण्याहूनच ठरवली होती. मोबाइलमुळे ड्रायव्हरशी लगेचच संपर्क झाला. मुख्य इमारतीतून बाहेर पडल्यावर आपण नेमके कुठे उभे आहोत हे दाखवणारे क्रमांक बाहेरच्या प्रत्येक खांबावर ठळक दिसतील असे लिहिलेले आहेत; त्यामुळे ते ड्रायव्हरला सांगता येते व तो पार्किंग लॉटमधून तिथे अचूक येऊ शकतो. या तशा अगदी साध्या बाबी असतात; पण प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी उपयुक्त असतात. ड्रायव्हर कन्नड असला तरी चांगले हिंदी आणि इंग्रजी बोलत होता; वाटेत जे जे दिसत होते त्या विषयी थोडीफार माहितीही पुरवत होता. बंगळुरूला येणाऱ्या प्रवाशांना रिसिव्ह करायचा त्याला चांगला अनुभव असावा. बंगळुरूचा कुप्रसिद्ध ट्रॅफिक जॅम त्या दिवशी माझ्या वाट्याला तरी आला नाही; कदाचित तो रविवार असल्यामुळे तसे झाले असेल. रस्ताही उत्तम होता. आजूबाजूला दिसणारे बंगळुरू मीही नजरेत साठवत होतो, माझ्या मागच्या भेटीपेक्षा काय वेगळे दिसते आहे ते शोधत होतो. त्यामुळे परुळेकरांच्या तीसेक किलोमीटरवर असलेल्या घरी पोचेस्तोवर साधारण पाऊण-एक तास लागला तरी प्रवासाचा कंटाळा असा मुळीच आला नाही.

   साठीच्या उंबरठ्यावरचे राजन परुळेकर अंतर्नादचे एक जुने वर्गणीदार. मूळ मुंबईचे पण गेली अनेक वर्षे बंगळुरूमध्ये स्थायिक आहेत. शिक्षणाने इंजिनियर असलेले परुळेकर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग द्यायचे काम करतात. मला या प्रवासात सहकार्य द्यायचे त्यांनी आधीच कबूल केले होते आणि यानुसार मी प्रथम त्यांच्याच घरी गेलो. त्यांचे घर जिथे आहे तो सगळा परिसर एके काळी हिंदुस्थान मशीन टूल्स उर्फ एचएमटी या सार्वजनिक क्षेत्रातील (पब्लिक सेक्टरमधील) विख्यात कंपनीने व्यापलेला होता. या रस्त्याचे नावही ‘एचएमटी वॉच फॅक्टरी मेन रोड’ हेच आहे. एके काळी या कंपनीचे ट्रॅक्टर्स, प्रिंटिंग मशिनरी, मशीन टूल्स यांना देशभर प्रचंड मागणी होती; पण सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने कंपनीची खरी प्रसिद्धी होती ती त्यांच्या घडाळ्यांमुळे. मनगटी घड्याळ म्हणजे एचएमटीचेच असणार हे जणू गृहीत धरले जाई. त्या क्षेत्रात जवळपास त्यांची मक्तेदारीच होती. ‘टाइमकीपर टू द नेशन’ ही त्यांच्या जाहिरातीची टॅग-लाइन अगदी सार्थ होती. आज मात्र कंपनी बहुतांशी बंद असून सगळीकडे मोडक्यातोडक्या इमारती तेवढ्या दिसतात. कारखाना आणि कार्यालये यांच्या व्यतिरिक्त इथे कर्मचाऱ्यांच्या कॉलनीज  होत्या, स्वतःची बस सर्विस होती, शॉपिंग कॉंप्लेक्स होते, रुग्णालये होती, शाळा होत्या, बागा होत्या, क्रीडांगणे होती. आज त्यांतले जवळजवळ काहीच उरलेले नाही. परुळेकरांच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून ते सगळे भग्नावशेष दाखवत असताना परुळेकर म्हणाले, “हा सगळा परिसर एके काळी अगदी गजबजलेला होता. आज इथे स्मशानशांतता आहे. एखादी उत्तम कंपनी चुकीच्या धोरणांमुळे डब्यात कशी जाते याचे एचएमटी हे उत्तम उदाहरण आहे.”

    या कंपनीवर ही दुरवस्था का ओढवली याची नेमकी कारणे शोधणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे; पण समोरचे ते कंपनीचे भकास आवार बघताना वाईट मात्र नक्की वाटत होते. स्वातंत्र्यानंतरचे सुरुवातीचे दिवस हे खूप भारावलेले होते; भविष्याची सुवर्णस्वप्ने रंगवण्याचे होते. औद्योगिक विकास ही देशाची मोठी गरज होती. खासगी क्षेत्रात थोडेफार उद्योग होते; पण ज्याला पायाभूत उद्योग म्हणतात, ज्यांच्यावर इतर लहानमोठे उद्योग अवलंबून असतात, ते मात्र देशात जवळपास नव्हतेच. तेवढी आर्थिक गुंतवणूक त्या वेळी बाल्यावस्थेत असलेल्या खासगी क्षेत्राला झेपणारीही नव्हती. त्या काळात, म्हणजे साधारण पन्नासच्या दशकात सार्वजनिक क्षेत्रातील बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या भारतात केंद्र सरकारतर्फे स्थापन केल्या गेल्या. त्यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली गेली. त्यांच्या उभारणीसाठी त्या वेळी बंगळुरूला प्रथम पसंती दिली गेली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बंगळुरूला ‘द सिटी ऑफ इंडियाज फ्युचर’ म्हणत. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची शिखरे’ असे ज्यांना म्हटले जाई, त्या हिंदुस्तान मशीन टूल्स (HMT), इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज (ITI), भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील महाकाय कंपन्या इथेच स्थापन केल्या गेल्या. 

   या सगळ्या परिस्थितीबद्दल परुळेकरांबरोबर बरीच चर्चा केली आणि त्याच वेळी येथील वास्तव्यात काय काय बघावे याचा आढावा घेतला. तसा मी पूर्वी बंगळुरूला अनेक वेळा गेलो होतो त्यामुळे निव्वळ स्थळदर्शन म्हणतात त्यात मला फारशी रुची नव्हती; पण तरीही काही ठिकाणी प्रथमच आणि काही ठिकाणी पुन्हा एकदा जावेसे वाटत होते. त्यानंतर मी जिथे मुक्काम करणार होतो त्या फर्न रेसिडेंसी हॉटेलात त्यांनी मला सोडले.

   दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्थळदर्शनाला सुरुवात केली ती बंगळुरूमधील सर्वांत प्राचीन मानल्या गेलेल्या एका स्थळापासून – ते म्हणजे बसवणा गुडी या भागातील बुल टेंपल (नंदी मंदिर). दोड्डू बसवा टेंपल म्हणून ते इथे ओळखले जाते. ज्याने बंगळुरूची स्थापना केली त्याच केंपे गौडाने सोळाव्या शतकात हे मंदिर उभारले. मूळचे शंकराचे मंदिर काही आज त्या मूळ अवस्थेत नाही, त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. देऊळ आहे चांगले, दर्शनाला गर्दीही बरीच होती; पण खरे आकर्षण आहे ते येथील नंदीबैलाची प्रचंड मूर्ती किंवा त्याचा पुतळा. चौदा फूट उंच आणि वीस फूट लांब असलेला हा काळाकभिन्न नंदी ग्रॅनाईटच्या एकाच विशाल खडकातून कोरलेला आहे. जगातील हा सर्वांत मोठा बैलाचा पुतळा मानला जातो. नंदीच्या मागे शंकराची पिंडीही आहे; पण तिच्यापेक्षा नंदीलाच जास्त महत्त्व दिले जाते. प्रत्यक्ष देवापेक्षा देवाचे वाहन इथे अधिक पूजले जाते! हारफुलांनी तो मढवलेला होता, अनेक जण त्याची पूजा करत होते; पण तरीही त्याचे मूळ नितळ काळे सौंदर्य नजरेत भरणारे होते. याबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की या भागात मुख्य पीक हे पावटा किंवा वालाच्या शेंगांचे घेतले जाई आणि एक रानबैल तिथे येऊन पिकाची नासाडी करत असे. त्याला तृप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही नंदीची मूर्ती उभारली आणि मग शेजारीच केंपे गौडाने हे मंदिर उभारले. या नंदीला आजही वालाच्या शेंगांचाच नैवेद्य दाखवला जातो. वालाच्या शेंगा ही केवळ कर्नाटकातली नव्हे तर सगळ्याच दक्षिण भारतातील खूप लोकप्रिय भाजी आहे. 

   या शेंगांचा केवळ येथील नंदीशी नव्हे तर बंगळुरू या नावाशीही संबंध आहे! केंपे गौडा एकदा शिकारीला गेलेला असताना जंगलात वाट चुकला. उपाशीपोटीच रस्ता शोधत भटकत होता. भुकेलेल्या त्या सरदाराला तिथे राहणाऱ्या एका म्हातारीने मूठभर उकडलेल्या वालाच्या शेंगा मोठ्या प्रेमाने वाढल्या. त्या अनुभवाची आठवण म्हणून पुढे त्याच जागी केंपे गौडाने एक गाव वसवले – तेच बेंगळुरू. ‘बेंडा काळू उरू’ (म्हणजे ‘उकडलेल्या शेंगांचे गाव’) या कन्नड शब्दप्रयोगाचे अपभ्रष्ट रूप. अर्थात हीदेखील एक आख्यायिकाच असू शकेल.   

   केंपे गौडा धर्मपरायण होताच  तितकाच प्रजाहितदक्षही होता. बंगळुरू शहर त्याने वसवलेच पण आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास चारशे तलावही खणले. त्यांचे महत्त्व आज अधिकच लक्षात येते. बंगळुरू शहर समुद्रसपाटीपासून सुमारे अडीच-तीन हजार फूट उंचावर असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. मोठ्या नद्याही जवळपास नाहीत; त्यामुळे हे तलाव अत्यावश्यक होते आणि त्यांच्यामुळे बंगळुरूचे एकूण रूपच पालटून गेले. ‘गार्डन सिटी’ म्हणून या शहराला जी प्रसिद्धी मिळाली त्यामागेही पाण्याची मुबलकता होती. येलहंका, अलसूर, बेलंडूर हे काही विशेष मोठे तलाव. दुर्दैवाने गेल्या पन्नासएक वर्षांत शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या रेट्यात बरेचसे तलाव एकेक करत बुजवले गेले किंवा आटत गेले. साधारण दोनेकशे तलाव उरले. तेही खूप प्रदूषित आहेत. ते स्वच्छ करण्यासाठी सरकारी आणि खासगी स्तरावर खूप प्रयत्न सुरू आहेत; पण अजूनही त्यांना अपेक्षित ते यश मिळालेले नाही; किंबहुना पाणीटंचाई ही आज बंगळुरूमधील एक मोठीच समस्या आहे.

   नंदी मंदिरानंतर मी गेलो ते लालबाग बोटॅनिकल गार्डन या विस्तीर्ण उपवनात. मैसूर संस्थानावर ज्याची सत्ता होती त्या निजामाच्या एका पराक्रमी आणि कर्तबगार सरदाराने म्हणजेच हैदर अलीने १७६० साली ही बाग वसवायला सुरुवात केली; पण प्रत्यक्षात ते काम त्याचा मुलगा ‘बंगळुरूचा वाघ’ टिपू सुलतान याने पूर्ण केले. एकूण २४० एकरांच्या या उपवनात विषुववृत्तीय वनस्पतींचा जगातील सगळ्यात मोठा संग्रह आहे. त्याशिवाय जगाच्या विविध भागांतून असंख्य दुर्मीळ वृक्ष आणून टिपू सुलतानाने त्यांची इथे जोपासना केली. इथेच इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरचे मुख्यालय आहे. असंख्य रंगीबेरंगी सुंदर फुलांनी ही बाग सदैव बहरलेली असते. वर्षातून दोन वेळा इथे फ्लॉवर शो होतो आणि तो बघायला हजारो प्रवासी येत असतात. इथे एक ग्लास हाऊसदेखील आहे आणि लंडन येथील क्रिस्टल पार्कच्या धर्तीवर ते उभारलेले आहे. लालबाग रॉक नावाने प्रसिद्ध असलेला इथला एक प्रचंड मोठा खडक हेही इथले एक आकर्षण आहे. हा खडक लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे असे म्हणतात. इथे एका विशाल वृक्षाच्या सावलीत लाकडी बाकावर, काहीही न करता नुसते इकडेतिकडे बघत, झाडाफुलांचा वास हुंगत तासभर निवांत बसणे हा माझ्यासाठी खूप आनंददायी अनुभव होता!

   लालबागप्रमाणेच विशाल, सुंदर आणि आखीव-रेखीव असलेले आणि त्याच्याहून जरा मोठे, म्हणजे तीनशे एकरांचे, कबन पार्क हेही बंगळुरूचे मोठे आकर्षण आहे. लालबागनंतर जवळपास शंभर वर्षांनी म्हणजे १८७० साली तत्कालीन इंग्रज सरकारने हे वसवले. इथेही अनेक दुर्मीळ वृक्ष आहेत. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी सर मार्क कबन यांचे नाव या उद्यानाला दिले गेले. पुढे याचे नाव बदलून श्रीचामराजेंद्र पार्क असे ठेवले गेले – वाडियार ह्या मैसूरच्या राजघराण्यातील तत्कालीन राजाच्या स्मरणार्थ; पण लोकांच्या तोंडी आजही कबन पार्क हेच नाव रूढ आहे. कबन पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या आतून वाहने जाऊ-येऊ शकतात. 

   लालबाग आणि कबन पार्क ही दोन्ही विशाल उद्याने शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आहेत. अनेक महत्त्वाच्या सरकारी इमारती यांच्याच आजूबाजूला आहेत. एखाद्या मोठ्या शहराच्या अगदी मध्यावर अशा विस्तीर्ण बागा क्वचितच कुठे बघायला मिळतील. सुदैवाने नंतरच्या शासकांनी अतिक्रमणांपासून ही उद्याने आजवर तरी वाचवली आहेत.

   गार्डन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूमधीलच नव्हे तर एकूणच कन्नड महिलांना फुलांचे अतोनात वेड असते. डोक्यात फुले माळण्याचे प्रमाण इतर कुठल्याही प्रांतापेक्षा इथे अधिक असावे. येथील मलिगे (मोगर्‍याचा एक प्रकार) हे फूल अतिशय सुवासिक म्हणून प्रसिद्ध आहे. मलिगे, चमेली, जुई, झेंडू, गुलाब, शेवंती, अबोली ही येथील मुख्य फुले. बंगळुरूमधील फूल बाजार प्रसिद्ध आहे. लांबलांबच्या गावांमधून इथे फुले विक्रीसाठी आणली जातात. हे विक्रेते फुलांची खूप देखणी अशी आरासही करतात. दिवसभर – विशेषतः सकाळी – गिऱ्हाइकांनी बाजार ओसंडून वाहत असतो. येथील फुले महाराष्ट्रासह इतर अनेक प्रांतांमध्ये अगदी रोज जातात. करोडो रुपयांची उलाढाल या व्यवसायात होते; तसेच हजारो लोकांचे पोटही या व्यवसायावर अवलंबून आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी : सणासुदीला, लग्नसमारंभात, वाढदिवसाला किंवा एरवीही इतरांना भेट देण्यासाठी म्हणून होणारा फुलांचा वाढता वापर हे देशातील वाढत्या समृद्धीचे एक द्योतक आहे. अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागल्या आहेत आणि त्यामुळेच जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या इतर बाबींवर आता बरेच लोक खर्च करू शकतात हे त्यावरून दिसते. हॉलंडसारख्या समृद्ध आणि विकसित देशाची अर्थव्यवस्थाही काही प्रमाणात त्यांच्या ट्यूलिप्स फुलांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. इस्राएलमधेही फ्लोरीकल्चर हा व्यवसाय खूप मोठा आहे.

   फुलांप्रमाणेच बंगळुरूमध्ये उदबत्त्या बनवायचाही व्यवसाय कित्येक कोटींचा आहे. देशात सर्वांत जास्त उदबत्त्या इथेच तयार होतात. चार वर्षांपूर्वी सय्यदभाई या मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या नेत्यांना चतुरंग संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. त्या वेळी केलेल्या भाषणात आपण उदबत्त्यांच्या व्यवसायात आहोत हे सांगताना सय्यदभाई गमतीने म्हणाले होते, “माझा व्यवसाय खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे, कारण हिंदू-मुस्लीम-शीख-इसाई या सगळ्या धर्मांचे लोक उदबत्त्या वापरतात!” मैसुरूमध्ये चंदनाची झाडे बरीच आहेत; त्यामुळे येथील चंदनाच्या उदबत्त्यांना देशभर व परदेशांतूनही मोठी मागणी आहे. चंदनाचे लाकूड उगाळून त्याचा लेपही अंगावर लावता येतो आणि त्यात त्वचेचा दाह शांत करण्याव्यतिरिक्त अनेक औषधी गुणही आहेत. चंदनाचे लाकूड, तेल, पावडर आणि साबण ह्यांनादेखील मोठी मागणी असते. जगातील सर्वांत जास्त चंदनाची झाडे मैसुरू राज्यात आहेत. पूर्वी या झाडापासून तयार केलेले चंदनाचे बहुतेक सर्व तेल युरोपमध्ये निर्यात केले जाई; पण पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर ती निर्यात एकाएकी बंद पडली. चंदनाचा साठा पडून राहू लागला. त्यावर मार्ग काढायचा म्हणून तत्कालीन वाडियार राजाने १९१६ साली मैसूर सोप फॅक्टरी सुरू केली. शंभर टक्के शुद्ध चंदनतेलापासून तयार होणारा जगातील हा पहिला आणि आजही एकमेव साबण. चंदनाच्या साबणाचे संतूर किंवा मोती यांसारखे खासगी कंपन्यांनी निर्माण केलेले ब्रॅंड  प्रख्यात आहेत. पुढे मैसूर सोप फॅक्टरी सरकारी मालकीची झाली. दुर्दैवाने चंदनाच्या झाडांची बेसुमार तोड झाल्यामुळे आणि त्यांची तस्करी होत असल्याने (वीरप्पनची ख्याती मुख्यतः त्यासाठीच होती) आज त्या तेलाचा इथे तुटवडा आहे आणि त्यामुळे कारखान्याची केवळ २५ टक्के उत्पादनक्षमता वापरली जाते. चंदनाच्या लाकडाचा पडून राहणारा अतिरिक्त पुरवठा वापरला जावा म्हणून जो कारखाना मुळात सुरू झाला, त्याच्यावरच आज त्या लाकडाचा अपुरा पुरवठा होत असल्याने ही परिस्थिती ओढवावी हे दुर्दैव.

   बंगळुरूमध्ये अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत ज्यांच्याविषयी इथे बरेच लिहिता येईल : 

    उदाहरणार्थ, येथील विधानभवन – ज्याला ते विधानसौधा म्हणतात – ती भव्य इमारत. १९५१ ते १९५६ अशी पाच वर्षे ती बांधायला लागली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री मुख्यमंत्री के. हनुमंतय्या यांच्या काळात ती बांधली गेली. विशेष म्हणजे तिच्या बांधकामात दीड हजार कारागिरांव्यतिरिक्त पाच हजार कैद्यांचाही सहभाग होता. इमारत पूर्ण झाल्यावर त्या कैद्यांना मुक्त केले गेले. देशातील सर्वांत सुंदर असे हे विधानभवन आहे. 

   किंवा इंटरनॅशनल आयटी पार्कसाठी आणि वर्षातील चार महिने जिथे सत्य साईबाबा वास्तव्य करीत त्या त्यांच्या भव्य आश्रमासाठी प्रसिद्ध असलेले, उच्चभ्रू वस्तीचे, महागडे व्हाइटफिल्ड – जेथील एका लॉजमध्ये होणाऱ्या वीकएंड पार्ट्यांना सव्वाशे वर्षांपूर्वी बंगळुरूमधे राहणारा तरुण विन्स्टन चर्चिल जात असे! ज्या क्लबचे चर्चिल आजही चौदा रुपये देणे लागतो तो राजेशाही बंगलोर क्लब हादेखील एखादी संध्याकाळ मित्रांबरोबर निवांत गप्पा मारण्यात घालवावी असा आहे. 

   किंवा युबी सिटी हा विजय मल्ल्याने उभारलेला वीस-मजली प्रचंड मॉल. युबी हे युनायटेड ब्रूअरिज या मद्य बनवणाऱ्या कंपनीचे लघुनाम. उच्चभ्रू तरुणाईच्या विशेष आवडीचा आणि जगभरातले बहुतेक सगळे मोठे ब्रँड्स उपलब्ध असलेला हा मॉल देशातील सर्वांत पॉश मॉल मानला जातो.

   किंवा पद्मभूषण डॉक्टर देवी प्रसाद शेट्टी यांचे नारायण हृदयालय – ज्याच्या शाखा आज देशात एकवीस ठिकाणी आहेत आणि जिथे अल्प किमतीत उत्तम हृदयशस्त्रक्रिया केली जाते. स्वतः डॉक्टर शेट्टी यांनी एक लाखाहून अधिक हृदयशस्त्रक्रिया केल्या आहेत. या हॉस्पिटल चेनचा विस्तार डोळे दिपवणारा आहे.

   पण या साऱ्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे; शिवाय ‘बदलता भारत’ लिहिताना मीही थोडेफार लिहिले आहे; त्यामुळे त्याबद्दल इथे पुन्हा लिहिण्याऐवजी दोन अगदी वेगळ्या संग्रहालयांबद्दल लिहावेसे वाटते. लेखाच्या पुढच्या भागात ते लिहीनच. 

Author

One thought on “केंपे गौडा ते सिलिकॉन व्हॅली (१)  

  1. ” गार्डन सिटी” बंगळुरू चे अत्यंत सुंदर आणि होतकरू प्रवाशांसाठी उपयुक्त प्रवासवर्णन.

    ( बंगळुरू मध्ये जसे असंख्य तलाव ( जलकुंभ, waterbodies) तसेच असंख्य तलाव हैदराबाद येथेही आहेत. अर्थात जे रडगाणं बंगळुरू चं तेच हैदराबाद चं देखील. येथील अनेक तलावांचीही अतिक्रमणाच्या विळख्यामुळे दैना झाली आहे. आणि म्हणूनच तेलंगणातील काॅन्ग्रेस सरकारने HYDRA ( हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण एजन्सी), नावाची एक एजन्सी अस्तित्वात आणली आहे व या एजन्सी कडे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका किंवा राज्य सरकारच्या मालकीचे रस्ते, नाले, तलाव, जलकुंभ, उद्याने इत्यादींसह सर्व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याचे अधिकार दिले आहेत. कोर्टाच्या संरक्षणाखाली हि एजन्सी इथे चांगले काम करीत आहे.)

Leave a Reply