प्रतिसाद – डिसेंबर २०२४

अंतर्नादच्या मागच्या अंकात जयवंत दळवी यांच्या साहित्यावर एक अभिनव शब्दकोडे छापले होते. त्यात रसिक वाचकांनी दळवी यांच्या अफाट साहित्य कर्तृत्वाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन होते. त्या आवाहनाला माझा प्रतिसाद !

‘जयवंत दळवींची महानंदा’

कथा,कादंबर्‍या,व्यक्तिचित्रण,नाटक,प्रवासवर्णन,विनोदी लेखन,पत्रकारिता अशा विविध साहित्यिक आघाड्यांवर आपल्या तरलतेचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत दळवी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! 

जयवंत दळवी व माझा परिचय माझ्या अकरावीतला! त्या वेळी वाचलेली त्यांची ‘चक्र’ व ‘माहिमची खाडी’ ही दोन पुस्तके माझ्या डोक्याला सतत भुंगा लावत असायची. अशा या सिद्धहस्त लेखकाने लिहिलेली ‘महानंदा’ ही वास्तववादी  कादंबरी जेथे प्रत्यक्षात घडली त्या ‘शिरोडा’ या निसर्गरम्य खेड्यात मी आठ दिवस मुक्काम ठोकलेला आहे. जेथे ही ‘महानंदा’ जन्मली व लहानाची मोठी झाली, जिथे तिची ‘बाबुलनाथा’बरोबरची प्रेमकथा फुलली ते प्रत्येक स्थळ मी नजरेखालून घातले आहे. ज्या खडकावर बसून जयवंत दळवी यांनी हे सत्य कथानक कागदावर उतरवले त्या खडकावर तासभर ध्यानस्थ अवस्थेत बसलो आहे. अशी काय आहे ही ‘होरपळलेल्या दोन जीवांची कहाणी’ वाचा. या निमित्ताने या सिद्धहस्त साहित्यिकाचं ‘अक्षरधन’ पुन्हा वेचू या!

मागे उभा मंगेश,पुढे उभा मंगेश,

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे 

जन्मजन्मांचा हा योगी, 

संसारी आनंद भोगी विरागी, 

की म्हणू भोगी?

शैलसुतासंगे गंगा मस्तकी वाहे

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे!

हे गाणं आठवतं ना? सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले व उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना पेठे  यांच्या सुरेल आवाजातले हे गाजलेले गीत. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या महानंदा या चित्रपटातील गीत. शब्द अर्थातच कवयित्री, गीतकार शांताबाई शेळके यांचे आणि त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवला आहे तो प्रतिभाशाली संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपटाची सुरुवातच या गीताने होते आणि आपण अलगद, तरंगत शिरोडा, गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात कधी जाऊन पोहोचतो ते समजतच नाही. 

हा चित्रपट पाहून मी वेडावून गेलो होतो. हा चित्रपट पाहण्यापूर्वी आमच्या तीर्थरूपांच्या बी.एड.कॉलेजच्या लायब्ररीत ती कादंबरी मी झपाटल्यासारखी वाचली होती. सिद्धहस्त लेखक, नाटककार,जयवंत दळवी (१९२५ ते १९९४) यांच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर साहित्यकृती. महानंदा… होय महानंदा !

ही कादंबरी वाचल्यामुळेच मी चित्रपटाचा मनमुराद आनंद घेऊ शकलो.ज्या मूळ कादंबरीवरून हा चित्रपट साकारला होता, ती महानंदा कादंबरी व जेथे हे कथानक प्रत्यक्षात घडले तो परिसर मला चित्रपटापेक्षा  जास्त भावला; कारण जयवंत दळवी यांच्या लेखनशैलीतून त्या काळाचे वातावरण, तो निसर्ग, त्या व्यक्तिरेखा, ती असोशी, नातेसंबंधांची फरफट इतकी सुरेख आणि नेमकी रेखाटली आहे की,कादंबरी वाचताना आपल्या नजरेसमोरच ते नाट्य घडते आहे, त्या व्यक्तिरेखा आपल्याशी संवाद करत आहेत, अशी विलक्षण अनुभूती मला मिळाली होती. दळवींनी उभ्या केलेल्या त्या ‘अद्भुत विश्वातून’ बाहेर पडण्यास मला खूप वेळ लागला हे नक्की.  बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना  टिळक आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असलेल्या डाॅ.प्रसाद प्रभुगावकर या माझ्या मित्राने माझी ही असोशी ओळखून माझी MD ची परीक्षा आटोपताच मला थेट या ‘महानंदा’च्या घरीच नेऊन सोडले.

‘महानंदा’ या एका सकस, अभिजात कादंबरीच्या नशिबी किती छान योग आला आहे ते पाहा! १९८४ मध्ये याच कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट, तर १९८७ मध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद लाभला. साहित्यिक, नाटककार शं.ना.नवरे यांनी तर या कादंबरीच्या प्रेमात पडून त्याचे नाट्यरूपांतर केले. त्यांनी रूपांतरित  केलेल्या नाटकाचे नाव होते ‘गुंतता हृदय हे!’ हे नाटक कादंबरीनंतर लगेच चार वर्षांनी म्हणजे १९७४ मध्ये प्रथम रंगमंचावर आले. त्यालाही रसिकांची पसंती मिळाली. प्रारंभीच्या काही प्रयोगांत डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांनी साकारलेली भूमिका अनेकांच्या स्मरणात असेल. मी ते MBBS च्या द्वितीय वर्षात बालगंधर्वला पाहिले होते व त्यामुळे ‘महानंदा’ माझ्या मनावर अधिकच कोरली गेली ती ‘फैयाज’च्या अप्रतिम भूमिकेमुळे!

सन २०१८ पर्यंत वेगवेगळ्या कलावंतांच्या संचांत ‘गुंतता हृदय हे’ चे प्रयोग होत होते. लेखक,नाटककार जयवंत दळवी यांच्या या लेखनाचा प्रवास प्रथम कथा, कादंबरी, नाटक आणि नंतर चित्रपट असा झाला आहे. इतर लेखकांच्या नशिबी हा योग दुर्मीळच. त्या मानाने जयवंत दळवी खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कधी ना कधी दळवींची ही अजरामर कलाकृती वाचण्याचा किंवा पाहण्याचा योग नक्कीच आला असेल; तरीही याची कहाणी अगदी थोडक्यात सांगतो. 

खरं म्हणजे मामांना (डाॅ.मोहन आगाशे) ओढ लावणारी कल्याणी (शशिकला) वाईट की, मामांना ओढ न लावू शकणारी मामी वाईट? सर्वांच्या दृष्टीनं कल्याणी वाईट! आणि मामी बरी! कारण, कल्याणी ‘भावीण!’ आणि मामी मामांची लग्नाची बायको! वास्तविक, स्वच्छ मनानं विचार केला तर कल्याणीबद्दल सर्वांना सहानुभूती वाटायला हवी. आपल्या समाजानं आपल्या सुखासाठी देवाचं निमित्त करून निर्माण केलेली ‘भाविणीची संस्था!’ त्यात बळी कल्याणीच! तिनं केवळ तिची आई भावीण म्हणून देवाला वाहून घ्यायचं, स्वत: लग्न करायचं नाही,  खोत जो पैसा देईल, सांभाळ करील, त्याच्या मनासारखं आणि लहरीसारखं वागायचं.

‘बाबुल(काशिनाथ घाणेकर)’ हा मुंबईमधील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय. बऱ्याच वर्षांनी अगदी सहजपणे गोव्याच्या(शिरोडा) निसर्गरम्य ठिकाणी राहणार्‍या मामा-मामींकडे सुटीमध्ये राहावयास येतो. गावातल्याच रवळनाथाच्या देवळात बाबुलची सहजपणे गाठ पडते कल्याणीशी. कल्याणी बाबुलला ओळखते. देवाची सेवा करणाऱ्या भावीण कल्याणीला सारा गाव ठाऊक आणि सारा गावदेखील या भाविणीला पुरता ओळखून असतो. 

हळूहळू बाबुलला सारे कळू लागते. आपल्या मामांचे आणि भाविणीचे संबंध काय आहेत हेही कळून चुकते. मामीला हे सारे माहीत असते, ती आतल्याआत फक्त जळत असते, रोज विझत असते. अशाच वेळी बाबुलची गाठ पडते कल्याणीच्या मुलीशी म्हणजेच मानूशी. मानू म्हणजेच महानंदा(फैयाज). मानूच्या सौंदर्यामुळे बाबुल पुरता घायाळ होतो. लग्न करीन तर फक्त महानंदाशीच असा निर्धार करीत असतानाच कल्याणीला हे लग्नबिग्न अजिबात मान्य नसते; कारण  भाविणीने फक्त देवाचीच सेवा करायची असते. लग्न वगैरे केल्यास देवाचा कोप होईल, मोठे अरिष्ट येईल, असे तिला वाटत असते. त्यामुळे तिची परवानगी मिळणार नसल्याने पळून जाऊन लग्न केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय बाबुलपाशी उरत नाही. 

मानूला विश्वासात घेऊन तसे तिला वचन देऊन बाबुल मुंबईला परततो. मुंबईहून बाबुल मानूला पत्रं पाठवतो की, अमुकतमुक दिवशी मी तुला नेण्यास येईल तेव्हा तू तयार राहा; मात्र ही सारी पत्रे गावातला लंपट पोस्टमास्तर (राजा मयेकर) मध्येच लंपास करून कल्याणीला दाखवतो. ती ताबडतोब मानूला परगावी पाठवून देते. इकडे बाबुल गावी मानूच्या घरी येतो. कल्याणी त्याला भलतेच काही सांगते. “तिला पाचवा महिना लागला आहे, आम्ही भाविणी, जो आसरा देतो त्यालाच  सेवा देतो. तेव्हा तू तिला विसर. मला भेटू नकोस, असे तिने स्पष्ट मला सांगितले आहे,” असे कल्याणीने सांगितल्यावर बाबुल पुरता कोसळतो.

मानूने आपल्याला फसवले, असे वाटून त्याचा जगण्यातला सारा रसच संपतो. मुंबईत लग्नासाठी आई बाबुलपाशी हट्ट करते; मात्र बाबुल लग्न करत नाही. पश्चात्तापाच्या आगीमध्ये तो जळत असतो. बरीच वर्षे जातात. इकडे गावातले मामा वारतात. मामीला भेटायला बाबुल गावी जातो आणि… एका अवचित वळणावर त्याची गाठ पडते महानंदाशी. एव्हाना कल्याणीला पुरते वेड लागलेले असते. थकलेली मानू सारे सत्य बाबुलला कथन करते. बाबुल निःशब्द होतो. दोघांच्या जीवाची फसवणूक, फरफट करणार्‍या कल्याणीला चांगलीच शिक्षा मिळालेली असते.

पुढे काय होते? मानूला झालेली मुलगी… ती कोणाची असते? महानंदा आणि बाबुलचे लग्न होते का? बाबुल कोणता निर्णय घेतो? याची सारी उत्तरे या कादंबरीच्या उत्तरार्धात मिळू शकतील. रूढी-परंपरेच्या जोखडात कोमेजलेल्या आणि पुढे सामाजिक बंधनात जखडून गेलेल्या, होरपळलेल्या दोन प्रेमी जीवांची विलक्षण हुरहूर लावणारी आणि वाचकाला अंतर्मुख करणारी कहाणी म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी लिखित अजरामर साहित्यकृती ‘महानंदा!’

१९७० मध्ये प्रकाशित या कादंबरीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गेल्या काही वर्षांत याच्या दहाहून अधिक आवृत्ती निघाल्या. अगदी आताआतापर्यंत कर्नाटक, गोवा आणि दक्षिण कोकणात गावातल्या काही देवळांभोवती देवदासींची प्रथा अस्तित्वात होती. देवदासी म्हणजे विशिष्ट देवाला वाहिलेल्या मुली. देवाच्या सेवेच्या नावाखाली या मुलींचे लैंगिक शोषण होत असे. त्यामध्ये गावातली अनेक प्रतिष्ठित मंडळी गुंतलेली असत. देवदासींना लग्न करण्यास परवानगी नसे. पुढे देवदासींचे दोन गट पडले. कलावंतिणी वा नायकिणी आणि भाविणी. ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी अनेक राज्यांनी विविध कायदे केले; तरीही देवदासी संस्था आज पूर्णपणे नामशेष झाली आहे, असे खातरीने म्हणता येणार नाही. दळवी यांनी त्या काळातला हा ज्वलंत विषय निवडून त्याभोवती कथा गुंफून ‘महानंदा’ ही साहित्यकृती निर्माण केली, त्यास खरोखरच तोड नाही.

दिलीप वाणी 

Leave a Reply