१.१०.२०२४
ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात उद्यानात वन्यजीव सप्ताहाची धामधूम सुरू होती. पाऊस नुकताच थांबला होता परंतु सर्वत्र दमट हवामान होतं. ही हवा बुरशीच्या वाढीला एकदम योग्य. या वर्षी या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बुरशीची ओळख करून देणाऱ्या तज्ज्ञ उद्यानात आल्या होत्या. मलाही या विषयात रस असल्याने मी ‘बुरशीची ओळख’ या पदयात्रेत सामील झाले. उद्यानातील सिलोंडाच्या वाटेवर आम्ही चालू लागलो. वाटेच्या सुरुवातीलाच एक अतिशय वेगळी आणि सुंदर आकाराची अळंबी दिसली. ती साधारण दहा ते बारा सेंटीमीटर लांबीची होती. तिच्या डोक्यावर त्रिकोणी आकाराची तपकिरी टोपी, त्या टोपीच्या खाली जमिनीपर्यंत पांढरा जाळीदार बहिर्वक्र आकार दिसत होता. एखाद्या मुलीने लेसने विणलेला घेरदार स्कर्ट घातल्याप्रमाणे तो आकार वाटत होता. या बुरशीचे नाव Phallus indusiatus असे आहे. यातील indusiatus या शब्दाचा अर्थच मुळी बुरशीतील आतील बीजांडाना आवरण असणारी अळंबी. याचं इंग्रजीतील नाव Bridal veil म्हणजे ‘नववधूची ओढणी’ – हे नाव त्याच्या पांढऱ्या नाजूक जाळीदार आवरणाकडे बघूनच ठेवले असणार.
ही बुरशी बघून आम्ही लाल मातीच्या पायवाटेवरून पुढे निघालो. पायवाटेच्या दोन्ही बाजूंनी बांबूची बेटं होती. पळस, बहावा यांची झाडं होती. बांबूच्या बेटाखाली लाल रंगाच्या अळंबीने आमचं लक्ष वेधून घेतलं. अगदी पाच से. मी. लांबीच्या लालचुटूक अळंबीवर तीन से. मी. व्यासाची छत्री होती. मातकट रंगाच्या ओलसर पाचोळ्यातून बाहेर आलेली ती लालभडक नाजूक अळंबी मी भान हरपल्यासारखी बघत होते. उद्यानात अळंबीच्या कितीतरी प्रजाती दिसतात. सुकलेल्या लाकडावर अर्धवर्तुळाकार किंवा वर्तुळाकार आकाराची, चार ते पाच सेंटीमीटर व्यासाची व तपकिरी रंगाची ब्रॅकेट बुरशी दिसते. या बुरशीमध्ये मध्यभागापासून बाहेर गोलाकार दिसतात. कडेला गडद तपकिरी रंग असतो तर मध्यभागी रंग हळू हळू फिकट पिवळसर तपकिरी होत जातो.
एके ठिकाणी सुकलेल्या लाकडाच्या ओंडक्यातून काळ्या रंगाच्या, निमुळत्या, तीन ते चार सेंटीमीटर लांबीच्या काड्या बाहेर आल्या होत्या. यांना इंग्रजीत ‘डेड मॅन्स फिंगर’ म्हणतात. जमिनीतून खरोखर जणू कोणाची तरी काळी बोटं बाहेर आल्यासारखी वाटत होती.
नववधूची ओढणी ते मृत माणसाची बोटं एवढी बुरशीची विविधता उद्यानात आहे. बुरशीची विविधता ही उत्तम जंगलाची निदर्शक असते. केवळ बुरशीच नव्हे तर फुलांची ही विविधता ऑक्टोबर महिन्यात उद्यानात पाहायला मिळते. व्याघ्रविहाराच्या बाजूला रस्त्यावर असलेली कावरी या महिन्यात फुलून येते. कावरीची फुलं पाच पाकळ्यांची, साधारण पाच सेंटीमीटर व्यासाची पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. पाचही पाकळ्या एकमेकांपासून दूर असतात. मध्यभागातून गडद पिवळसर रंगाच्या पुंकेसरांचा जणू गुच्छच आलेला असतो. लहानपणी पाटीवर फुलांचं चित्र काढा असं कोणी सांगितलं, की आम्ही पाटीवर मध्यभागी छोटे वर्तुळ आणि त्या वर्तुळाच्या परिघावर एकमेकांपासून दूर असलेल्या पाच पाकळ्या काढायचो. कावरीचे फूल मला तंतोतंत तसेच दिसले. उद्यानात फुलांच्या मागे फिरताना एक दिवस मला सांबराची मादी आणि तिचे नुकतेच जन्माला आलेले पिल्लू दिसले. खरंतर ही मादी माझ्या ओळखीची होती. तिन्हीसांजेला ही नदीच्या काठाने चरताना बरेचदा दिसायची; परंतु त्या दिवशी ती एकटी नव्हती तर तिचं नवजात पिल्लू तिच्या सोबत होतं. मादीचा रंग काळसर चॉकलेटी होता; तर पिल्लाचा रंग पिवळसर चॉकलेटी होता. थांबून त्या दोघांचा फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही. मी मोबाईल काढला आणि त्यांचा एकत्रित फोटो काढू लागले. मादी चरण्याचं थांबवून माझ्याकडे पाहू लागली आणि नंतर आपले कान टवकारून आणि शेपटी वर करून ती पिल्लाकडे पाहू लागली. पिल्लानेही आईचा इशारा ओळखून हुश्शार स्थितीत राहून शेपटी वर केली. काही संकट आलंच तर दोघंही पळण्याच्या तयारीत होते. मीही तिथे जास्त वेळ थांबले नाही. त्यानंतर पुन्हा ती मायलेकरं निवांत चरू लागली.
३.१०.२०२४
जंगलातील असो की प्राणिसंग्रहालयातील – सगळ्याच आया पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष असतात. श्रीवल्ली वाघिणीची पिल्लं आता साडेचार महिन्यांची झाली. जन्माला आली तेव्हा जेमतेम १ किलोची असलेली ती पिल्लं साडेचार महिन्यात तीस किलोच्या पुढे गेली होती. आता त्यांना डेनमध्ये ठेवणं योग्य नव्हतं. वाघिणीला आणि पिल्लांना डेनमधून बाहेर काढून मोठ्या पिंजऱ्यात ठेवायचं होतं. मी डेनचा दरवाजा उघडायला सांगितला. श्रीवल्ली आणि तिन्ही पिल्लं डेनलगतच्या छोट्या जागेत आली. त्या जागेला जोडून मोठ्या पिंजऱ्याचा दरवाजा होता. दरवाज्याजवळ उभी राहून श्रीवल्ली आतील वातावरणाचा अंदाज घेत होती. मागील पाच महिने ती डेनमध्येच होती; त्यामुळे मोठ्या पिंजऱ्यात पिल्लांना काही धोका तर नाही ना हे तिला आजमावायचं होतं. तिन्ही पिल्लं तिच्या मागे उभी होती. अचानक त्यांतील एक खट्याळ पिल्लू उघड्या दरवाज्याकडे धावू लागलं. एखाद्या दक्ष आईप्रमाणे श्रीवल्ली झटक्यात पुढे आली. धावणाऱ्या पिल्लाला तिने रागाने तोंडाने मागे ढकललं. तोंडातून अस्फुट डरकाळी फोडली. जणू ती त्याला सांगत होती, “हे बघ, मी सांगितल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकायचं नाही.” पिल्लूही निमूटपणे मागे सरलं. त्यानंतर बऱ्याच वेळाने तिने व तिच्या मागून पिल्लांनी मोठ्या पिंजऱ्यात प्रवेश केला.
२३.१०.२०२४
प्राण्यांमधील आई व पिल्लांच्या नात्याचे विविध पैलू अनुभवले; परंतु दोन नर माकडांमध्ये एकमेकांशी असलेल्या मैत्रीच्या अतूट नात्याचं मला दर्शन झालं. आमच्याकडे दोन माकडं पिंजऱ्यात ठेवलेली आहेत. त्यांतील एक माकड बॉनेट जातीचं आहे. त्याचा एक हात तुटलेला आहे आणि बरंच म्हातारं आहे; त्यामुळे त्याला आम्ही पर्यटकांपासून दूर असलेल्या एका पिंजऱ्यात ठेवलेलं आहे. दुसरं एक तरुण शुभ्र पांढऱ्या रंगाचं माकड आहे. जेमतेम चार किलो वजनाचं ते माकड अतिशय चपळ आहे. पिंजऱ्यात सतत एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असतं. आमच्या पिंजऱ्यावर काम करणाऱ्या मुलांनी त्याचं नाव भुऱ्या ठेवलं आहे. कोणीही माणसं जवळ आली तर बॉनेट माकड त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं पण भुऱ्या मात्र लगेच आपले हात बाहेर काय काढेल! टाळ्या वाजवायचा अविर्भाव काय करेल! आणि तोंडातून आवाज काय काढेल! अशा माकडचेष्टा करत असल्याने तिथे जाणाऱ्यांचं सहज लक्ष वेधून घेतो. दोन्ही माकडं एका पिंजऱ्यात राहतात. रात्री झोपताना एकमेकांना बिलगून झोपतात. सकाळी त्यांना खायला घातलं की पहिला भुऱ्या खायला धावतो. त्याच खाणं होत आलं की मग सावकाश बॉनेट जातो. बॉनेटने जणू काही भुऱ्याला दत्तक घेतलं आहे. त्यांचं एकमेकांशी कधीच भांडण होत नाही. पण एकदा काय झालं कुणास ठाऊक! पिंजऱ्याला पडलेल्या एका छोट्या भगदाडातून बॉनेट माकड बाहेर पडलं. आजूबाजूला सगळं जंगल आहे; पण ते अपंग असल्याने त्याला जंगलात सोडणं योग्य नव्हतं. त्याला पकडण्यासाठी मजूर आणि वनरक्षक त्याच्या मागे पळाले पण ते एका उंच झाडावर जाऊन बसलं. आम्ही बेशुद्ध करण्याची बंदूक त्याच्यावर रोखली की आणखी उंच जायचं. मला आश्चर्य वाटलं, की एका हातानेही ते सरसर झाडावर चढत होतं आणि सहजगत्या एका झाडाच्या शेंड्यावरून दुसरीकडे उड्या मारत होतं. आता काय करावं ते आम्हांला कळेना. मग आम्ही ठरवलं त्याला पकडण्यासाठी सापळा पिंजरा लावायचा. भुऱ्याला दुसऱ्या पिंजऱ्यात जवळच ठेवलं. पिंजऱ्यात केळी ठेवली आणि एका मजुराला लक्ष ठेवायला सांगून आम्ही निघून गेलो. तिन्हीसांज झाल्यावर बॉनेट माकड उंच झाडावरून खाली उतरलं. त्याला आपल्या मित्राची – भुऱ्याची आठवण येत असावी. इकडे पिंजऱ्यात राहिलेला भुऱ्यासुद्धा केविलवाणा होऊन बाहेर इकडे तिकडे बघत बॉनेटला शोधत होता. नेहमीचा अवखळपण जणू विसरून गेला होता. बॉनेट झाडावरून उतरून पिंजऱ्याकडे येऊ लागला. त्याने नेहमीच्या पिंजऱ्यात भुऱ्याला शोधलं; पण त्यात तो नव्हता. त्याला सापळा पिंजऱ्याच्या जवळ भुऱ्या दिसला. भुऱ्याने हात पुढे केला. बॉनेटने त्याचा हात पकडला. तो पिंजऱ्याच्या भोवती फिरू लागला; पण आपल्याला त्या पिंजऱ्यात शिरता येणार नाही हे लक्षात येताच तो जवळ जाऊन उभा राहिला. रात्रभर तिथेच थांबला. सकाळी आम्हांला निरोप आला की बॉनेट जवळपास उभा आहे. वैभव पाटील बेशुद्धीची बंदूक घेऊन तिकडे गेला. पण आज बॉनेट पळण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो तिथे एका कठड्यावर स्तब्ध बसला होता. वैभवने त्याला लांबून डार्ट मारला. तो लगेचच पेंगायला लागला; तसा त्याला पकडून आम्ही पुन्हा पिंजऱ्यात टाकला. शुद्धीवर आल्यावर त्याने भुऱ्याकडे बघितले. कालपासून उदास असलेला भुऱ्या पिंजऱ्याच्या बाहेर हात काढून पुन्हा टाळ्या वाजवायला लागला होता.
निसर्गातील परोपजीवी असलेली बुरशी काय!, आईच्या मागे निमूटपणे फिरणारी पिल्लं काय किंवा अपंग माकडाचं सोबत्यावरचं प्रेम काय! या सगळ्या घटना जिवांचं जगण्यासाठी दुसऱ्यावर असलेलं अवलंबित्वच दर्शवतात. ही जीवनसाखळी बारकाईने अनुभवताना समग्र निसर्गाबद्दलची जाण अधिकाधिक विकसित होत जाते यात शंका नाही.
