चित्रकाराचे भूत

   पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे; पण आज जी पाचगणीची खरी प्रगती  दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा. : पाण्याची सोय. ब्रिटिशांनी ज्या वेळी येथे शाळा बांधल्या, विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा. गावात आणि खासगी बंगल्यांमध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात; पण त्या वेळी विहिरींना दुसरा पर्यायच नव्हता. लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वांना ते आवडायचे. वाईला धोम धरणाची निर्मिती झाली आणि नंतर धरणाचे पाणी पाचगणीला येऊ लागले. सिडने पॉइंटच्या तळमाळ्याजवळ पंपिंग स्टेशन बांधले होते. तेथून पाणी प्रथम गार्डनच्या शेजारी शुद्धीकरणासाठी येई व नंतर  टेबललॅंडच्या पायऱ्यांजवळच्या टाकीतून संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई; पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे. कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवडा व्हायचा व स्थानिक रहिवाशांना परत विहिरीवरून पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅंडचे तळे किंवा गावविहिरीवर जावे लागत असे. (आता मात्र पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमधून पाणी पुरवठा होतो.)

                माझ्या लहानपणी मोठे कुटुंब  असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहीणभाऊ गावविहिरीवर जायचो. तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा, अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाइमपास करत होतो.

            गावविहिरीच्या पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे. या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा उताराचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते आणि त्यामध्ये लोखंडी बिडाच्या बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते. 

          त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो. हे ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामुळे मला माहीतच नव्हते; कारण लहान असल्यामुळे मला तिथे कोणी नेले नव्हते. मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो; कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड, मांढरदेवीचा डोंगर व  कृष्णा व्हॅलीचे अफलातून विहंगम दृश्य दिसत होते. त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडची सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगरांच्या रांगा व त्यांवरील चढउतार, डोंगरांच्या सावल्या, घड्या, पाण्यात पडलेली प्रतिबिंबे, छोटी छोटी घरे, भाताची हिरवीगार शेती, त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे – ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो. हे दृश्य आपण कागदावर चितारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले. पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेवून त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकोनावर बसून  पेन्सिलीने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लीन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाही.

            माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यामुळे भंग पावली. मी पाचगणीत एस.टी.स्टॅंडसमोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे. त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा, इस्त्रीचा  ‘दीपक ड्रायक्लिनर्स’ नावाचा व्यावसाय होता. पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे. मला स्मशानभूमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकित झाले व घाबरलेदेखील!  त्यांच्या आरडाओरड्यामुळे मी तेथून पळ काढला व उशिरा घरी पोहचलो.   नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामुळे सगळे वातावरण तंग झाले. अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाज्यातून हळूच घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले. माझी आई अशिक्षित व अडाणी होती. ती मनातून खूप घाबरली होती. तिला पक्की खातरी झाली होती, की कोणत्या तरी चित्रकाराच्या भुताने मला धरले असणार. ते भूत माझ्या अंगात घुसल्यामुळेच मी सतत भटकत सारखी सारखी  चित्र काढत असतो; त्यामुळे आईने मला दरवाज्यातून प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्‍यावरून भाकरीचा तुकडा, मीठ,मोहरी,मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले, ‘इडा पीडा टळो आणि चित्रकार भुताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होओ.’ 

           पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही. या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली, पांडवगड, कमळगड, नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी  यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले. तासन् तास त्या प्रदेशाची चित्रे काढणे, त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे. एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भुताने मला अंतर्बाह्य पछाडलेले होते – झपाटले होते. मी एकदम वाया गेलो असे सर्वांना वाटायचे.

              एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली. ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय. पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता. त्या गॅलरीच्या जागा दरवर्षी बदलत असल्यामुळे  मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो. सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या  आयुष्याची वाताहत झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाइलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरिया  शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. तेथे शाळेतच राहत होतो.

 शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच. बिलिमोरिया स्कूलचे लोकेशन  टेबललॅंडच्या पायथ्याशी व सिडने पॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची, शाळेच्या परिसराची, शाळेच्या मुख्य इमारतीची, डायनिंग हॉलच्या इमारतीची, प्राचार्य – शाळेच्या मालकांच्या निवासस्थानाची, रस्त्यावरच्या वडाच्या झाडांची चित्रे – रेखाटने सतत करत असायचो. 

              एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते. त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता; त्या प्रकाशात इमारत, झाडे, माणसे खूपच छान दिसत होती. ते चित्र मला मनापासून आवडले; मग आपणही असे काहीतरी – ‘रात्री खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत,’ हा विषय घेऊन जबरदस्त ‘नाइटस्केप’ करायचेच हा  पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पाहणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो. त्या वेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो. अगदी कसून पाहणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलिमोरिया शाळेत प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा  म्युनिसिपालिटीचाच एक उंच खांब आहे. तेथून रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे झाडांच्या सावल्या छान पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे म्हणून मी त्याचा अभ्यास सुरू केला. रात्रीचे ११ वाजल्यानंतर थोडा उशिरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दीदेखील खूप कमी असते. निवांतपणे चित्र पूर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले.

             एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅंड ( ईझल), बसण्याची फोल्डिंगची छोटी खुर्ची, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर मोठी क्रिकेटची टोपी  व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्री ११ वाजता मेनरोडवर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली.  माझ्या डोक्यात फक्त ‘हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल?’ हाच विचार चालला होता व या विचारात मी चित्रकामात पूर्ण गुंग झालो होतो.

             पाचगणी हे मुख्य शहर आहे. त्याच्या आजूबाजूला दांडेघर, आंब्रळ, खिंगर, भिलार, राजपुरी, तायघाट अशी छोटी-मोठी खेडेगावं आहेत. त्या ठिकाणावरून दिवसभर दुकानात, हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे.  त्या दिवशीही काही कामगार दांडेघर गावाकडे उशिरा निघाले होते. त्यांतले काही कामगार थोडंफार नशापाणी करून जाणारेही असत.

              इकडे माझे  ११ वाजता सुरू झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते. मी  देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो आणि समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला…

‘भूत,भूत, चित्रकाराचे भूत…’

‘चित्रकाराचे भूत . . .’

‘पळा पळा’

असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले. हातांतल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यांना भान राहिले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी दोनचार जण घाबरून तेही पळू लागले . 

            त्यांना असे पळताना पाहून मीही घाबरलो; कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरीदेखील जाईल या विचाराने  पटापट सामान आवरून मी रस्त्याच्याजवळ एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो .

दांडेघरची ही माणसे आता,  ‘राम राम राम राम राम राम’ असे मोठ्यानेच म्हणत  म्हणत दबकत दबकत, हळूहळू, दमादमाने सावधपणे येत होती आणि बघतात तर तेथे कोणीच दिसे ना! त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकून आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता, 

“म्यां इथंच बघितला ते भूत, मोठ्ठी टोपी घातली होती.”

दुसरा त्यात भर घालून म्हणाला, 

“अरं इंग्रजाचे होतं ते भूत.”

“नाय, अरं बाबा, ही पारश्यांची शाळा होती, म्हंजी भूत पारशीच असणार नव्हं?” 

“अरं पारशी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम लेका, लई डेंजर असणार.”

“लई कटकटी असत्यात पारशी लोकं, म्हंजी भूतभी कटकटी आन् जालीम असलं तर सोडणार नाय, आपल्या मागंसुद्धा लई कटकट  लागंल.”

 एकाने असा अनुभव सांगितला, 

“अरं तुला सांगतो एकदा का धरलं ना, तर आजिबात सोडत नाहीत  ही भुतं व मानगुटीवर बसत्यात, नाचत्यात, लई हाल हाल करत्यात.”

मग एका सुरात  ‘राम राम राम राम राम राम राम राम राम’ असं मोठ्याने ओरडत एकमेकांचा हात पकडत त्यांनी जकात नाका पार केला. मीदेखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला. रात्रीचं चित्र काढणं एवढं काही सोपं काम नाही हे माझ्या लक्षात आलं व नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहिली नाही. सगळा मूडच गेला आणि मी चित्राचे सामान घेऊन गुपचूप  शाळेत परतलो. 

           दुसऱ्या दिवशी शाळेतला दांडेघरचा एक कामगार सर्व स्टाफला सांगू लागला, की रात्री शाळेच्या रस्त्यावर चित्रकाराचे भूत गावातल्या लोकांनी पाहिले. 

भूत असं छोट्या खुर्चीवर बसलं होतं, लई मोठी हातभर लांब टोपी घातली होती. त्याचे पाय व हात खूप लांबच्या लांब होते. ते पारशी भूत होतं. लई जालीम – लई डेंजर. थोडक्यात वाचली मंडळी नाही तर मानगुटीवर बसला असता. 

लई डेंजर भूत होते. यापुढे रात्रीचे सावध रहा,असा सल्लादेखील त्याने दिला. मीदेखील हो हो म्हणत  त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भारी गंमत वाटली. माणसे एखादी घटना अवाच्या सवा करून कसे सांगतात ते मी अनुभवले. 

       त्या दिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच. रात्री चित्र काढायला कधी बाहेर ऑन द स्पॉट जात नाही; पण एक नाइटस्केपचा चांगला विषय चित्रित करायचा राहिला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले.

            आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते. त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही. आजही डोंगररांगा , शेताची हिरवळ, समुद्र, बोटी, झाडे, इमारती, टेबललॅंडची पठारे, वाईची मंदिरे, घाट, महाबळेश्वरचे  सृष्टिसौंदर्य पाहिले, की  मनात परत परत चित्रे काढण्याची ऊर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते. या  चित्रकाराच्या भुताने आपल्याला पछाडल्यामुळे, झपाटल्यामुळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या, कितीतरी मोठी माणसे अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली, आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली. चित्रकाराच्या भुतामूळे आपले जीवनच पालटले. हे भूत तुमची ध्येये सतत आठवण करून देते व कामाला जुंपते. नवनव्या गोष्टी, संशोधन, साधना करण्यास भाग पाडते; त्यामुळे माणूस सतत उत्साही व कार्यमग्न राहतो.

आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे. 

           आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा. लेखन, चित्रकला, शिल्पकला, खेळ, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य, चित्रपट, शिक्षण, वकिली, इंजिनियरिंग, पत्रकारिता, वैद्यकीय, सरकारी किंवा खासगी नोकरी असो किंवा स्वतःच्या उद्योग-व्यापारक्षेत्रात असो; आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे अंतर्बाह्य झपाटलो, पछाडलो तर काम उत्तम होते. 

      हाती घेतलेले कार्य मनापासून, आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एंजॉय करायला शिकलो, त्यातून सर्वांना आनंद घ्यायला व द्यायला शिकलो तर कार्यात सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच. 

म्हणून सर्वांनाच ज्या त्या आवडत्या विषयातील भुताने पछाडलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. ज्या वेळी हे भूत आपल्याला पछाडते त्या वेळी आपली सर्व शक्ती वापरून खरोखर उत्तम कार्य करण्याची असामान्य प्रेरणा मिळते. स्वतःला विसरून दिवसरात्र आवडीच्या क्षेत्रात यश संपादनासाठी झोकून घ्यावेसे वाटते .

 त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

स्मशानभूमीतून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य

Author

One thought on “चित्रकाराचे भूत

  1. भूत जबर मोठे ग बाई . भूत वगैरे नसतेच . पण चित्रांचे भूत तुमच्या मानगुटीवरून कधीच न उतरो . बाकी लेख , नेहमी प्रमाणे दीर्घ , उत्तम दृश्य जाणीवा असलेला . व्वा !

Leave a Reply