खजुराहोतील लोक असे मानतात की ज्यांनी खजुराहो पाहिले नाही त्यांचा जन्म झाला नाही; त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही ‘खजुराहो’ पाहता तो दिवस तुमचा जन्मदिवस म्हणून तुम्ही साजरा करू शकता!विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवू या; परंतु साधारण एक हजार वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने माणसाचे जगणे कसे होते ते शिल्पकारांनी दगडावर कोरलेले आहे हे प्रत्यक्ष पाहताना आपण अवाक होतो किंवा पहिल्यांदाच काहीतरी यातून शिकतो एवढे मात्र खरे!
ज्या काळी माणसे युद्धाला कंटाळली होती, माणसे मोठ्या प्रमाणात मरत होती, एकंदरीतच जगण्याचे आकर्षण कमी होत होते, पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मचर्याकडे वळत होते अशा वेळेस आपली पिढी वाढावी किंवा अनेक वर्षं पुढे टिकून राहावी या उद्देशाने तरुणाईला लैंगिकतेकडे (sex) वळवावे या दृष्टीने विचारपूर्वक मंदिराच्या बाहेर मैथुनशिल्पे निर्माण केली गेली, असे सांगितले जाते; तर कधी माणसाने सगळ्या लैंगिक भावनांचा निचरा करून देवाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने आत यावे, यासाठी ही मैथुनशिल्पे देवळाच्या बाह्यभागावर रेखाटलेली आहेत, असेही सांगितले जाते.
‘खजुराहो’ हे साधारण वीस ते चाळीस हजार वस्तीचे गाव आहे. या गावाजवळ बांधलेली मंदिरे जगातील सर्वोत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना ठरली आहेत. मंदिराच्या स्थापत्य कलेपेक्षाही त्यांच्या बाहेरच्या बाजूस कोरलेली मैथुनशिल्पे (Erotic Sculptures) पाहताना जगभरातील पर्यटकांचे डोळे विस्फारले जातात. मंदिरावरच्या एकूण शिल्पांपैकी केवळ पाच ते दहा टक्के शिल्पाकृती या कामशिल्पांच्या आहेत; तरीही खजुराहोची ओळख ‘काम-शिल्पकला’ हीच महत्त्वाची आहे.
‘खजुराहो’मध्ये मंदिराच्या अत्यंत खालच्या भागावर काही शिल्पं कोरली आहेत त्यावर युद्धाला जाण्याआधी किंवा युद्धावरून परतल्यावरची मैथुनशिल्पे आहेत. युद्धाला जाण्याआधी माहीत नसते की किती काळ युद्ध चालणार आहे आणि आपण जिवंत परतणार की नाही – यासाठी आयुष्याचा आनंद घ्यावा किंवा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपली पिढी वाढावी यासाठी आणि युद्धातून परतल्यावर आपण जिवंत परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी स्त्री-पुरुष एकत्र आलेले दाखवलेले आहेत. या कामशिल्पांच्या बाजूलाच एका भांड्यामध्ये काहीतरी कुटलं जातंय तर ते ‘व्हायग्रा’सारखे कोणतेतरी उत्तेजित करणारे औषध असावे, असा कयास आहे.
‘आमसूत्र’ नावाची जाहिरात कदाचित तुम्हांला आठवत असेल, कतरीना कैफ यांनी त्याच्यात काम केले होते आणि आंब्याची फोड तिच्या हातात दाखवली होती. आंब्याचा रंग, वास, चव पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटते किंवा आंबा आपल्याला एनर्जी देतो, ताकद देतो असा संदेश यातून आपल्याला दिला होतो. खजुराहोच्या मंदिरावर काही अप्सरा आहेत त्यांच्या हातांत आंबा दाखवलेला आहे. कदाचित याही तुम्हांला एनर्जी आणि आनंद देणार आहेत असे काही त्यातून सूचित केले असावे.
ज्या अप्सरांबरोबर बसलेला पोपट दाखवलेला आहे किंवा त्यांच्यासमोर पिंजरा दाखवलेला आहे त्या अप्सरा ‘नगरवधू’ आहेत. पोपट कामदेवाचे वाहन आहे. कामदेवाने जो फुलांचा बाण मारलेला आहे तो हृदयावर पडून आपल्यातील कामवासना जागृत झाली, असे काहीसे दाखवण्याचा प्रयत्न आहे. इथे वापरण्यात आलेले पक्षी, प्राणी, फळे, फुले यांमागे काहीतरी निश्चित अर्थ आहे.अभिनेत्री रेखा यांनी ‘कामसूत्र’ या चित्रपटामध्ये ‘नगरवधू’ची भूमिका केलेली आहे. ‘नगरवधूं’ना फार मान असायचा कारण त्या ‘Art of loving’ आणि ‘Art of living’ शिकवायच्या, असे मानले जाते. त्यांना खूप मान होता असे या शिल्पातून भासते. आता मात्र ‘नगरवधू’ या शब्दाऐवजी त्यांना ‘वेश्या’ संबोधतात आणि कमी दर्जा दिला जातो.
पुरुषांच्या इतकीच स्त्रीला कामवासना असते आणि ती शमवण्याची गरज असते हे या शिल्पांमधून आपल्याला दाखवून दिलेले आहे; म्हणूनच ‘वात्स्यायना’च्या कामशास्त्रातील विविध कामासनांचा अंतर्भाव या शिल्पांमध्ये केलेला आहे. अत्यंत उघडपणे हस्तमैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन, पशुमैथुन, स्त्रीमैथुन, समूहमैथुन यांचबरोबर समलिंगी मैथुनही या दगडांवर कोरलेले आहे. याचाच अर्थ त्या काळात माणसे हे सगळे प्रकार अनुभवत होती आणि जे ते अनुभवत होते तेच त्यांनी शिल्पांद्वारे दाखवलेले आहे. येथील शिल्पांवर ज्या स्त्रिया दाखवलेल्या आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव दिसतात. याचाच अर्थ लैंगिक संबंधाचा परमोच्चबिंदू (Orgasm) त्यांनी अनुभवलेला दिसत आहे.
आजचा काळ Hurry, Curry and Worry असा आहे; त्यामुळे हवा तसा निवांतपणा जोडप्यालाही मिळत नाही; शिवाय आपले खाणेपिणे बिघडलेले आहे त्यामुळे आपले शरीर तितकेसे सुदृढ नाही. त्यामुळे आपण वेगवेगळी आसने करून त्यांद्वारे शरीर सुखाची अनुभूती घेऊ शकत नाही; आणि इतक्या चिंतांनी आपण ग्रासलेले असतो की शरीरसंबंधानंतरही आपल्याला आनंद, अनुभूती वा तृप्ती मिळत नाही. यासाठी ही शिल्पे आजही पाहण्याची आणि त्या शिल्पांतून काहीतरी शिकण्याची गरज आहे!
या सर्व कामशिल्पांमध्ये जे पुरुष दाखवले आहेत ते सुदृढ वाटत आहेत आणि स्त्रिया अत्यंत कमनीय आहेत. त्या मैथुनशिल्पांकडे पाहताना अश्लीलता, बीभत्सपणा, किळसवाणे किंवा लाजिरवाणे काहीही वाटत नाही. शेवटी आपण कोणत्या नजरेने त्याकडे पाहतो हे महत्त्वाचे आहे. गंमत म्हणजे एका शिल्पात मैथुनक्रीडा चालू असताना बाजूला एक पुरुष दाखवलेला आहे जो त्या मैथुनक्रीडेकडे पाहत आहे; इतकेच नाही तर तो हस्तमैथुन करत आहे; तर बाजूला एक स्त्री दाखवलेली आहे ती मात्र त्या कृतीकडे पूर्णपणे पाठ करून उभी दाखवलेली आहे, याचाच अर्थ स्त्री-पुरुषांची मानसिकताही यातून दाखवलेली आहे.
एका शिल्पामध्येतर या मैथुन क्रियेकडे एक पुरुष पाठ करून अर्धवट मान वळवून उभा दाखवलेला आहे. मात्र त्याने त्याच्या तोंडावर असा हात ठेवलेला आहे की हातातील बोटांमध्ये ठेवलेल्या फटीतून तो या कृतीकडे पाहत आहे. याचाच अर्थ, आपणसुद्धा अशा क्रियांकडे जर सरळ पाहू शकलो नाही तरी तोंडावर हात ठेवून पाहू शकतो; पण हे पाहताना बोटांमध्ये अंतर असले पाहिजे जेणेकरून आपल्याला ती क्रिया स्पष्ट दिसेल! इथे परत विनोदाचा भाग आपण सोडून देऊ या!
यांतीलच एका शिल्पामध्ये एक दाढी असलेला माणूस दाखवलेला आहे आणि बाजूला मैथुनक्रिया दाखवलेली आहे. तो दाढी असलेला माणूस साधू असावा; पण साधू असला, ब्रह्मचर्य पाळत असला तरी त्याला या कृतीविषयी आकर्षण दिसते आणि तो मान वळवून त्याच्याकडे पाहताना दाखवलेला आहे तसेच तो उत्तेजित होतानाही दाखवलेला आहे.या शिल्पांमध्ये काही नागकन्या आहेत. त्यांच्या डोक्यावर नाग दाखवलेला आहे त्यामुळे त्या ओळखू येतात. या नागकन्यांचा उपयोग युद्धामध्ये शत्रुपक्षासाठी केला जायचा. त्या अतिशय सुंदर असल्यामुळे त्यांच्याकडे शत्रुपक्षातील पुरुष आकर्षित व्हायचे आणि त्यांच्याशी रत झाल्यावर मरून जायचे.
एक शिल्प असे दाखवले आहे की एक पुरुष एका माकडाला आपल्या सोबतच्या काठीने जवळ ओढायचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे त्याच्या बाजूला उभी असलेली स्त्रीही त्या माकडाला घाबरून त्याच्या अधिक जवळ येत आहे.
समूह मैथुनक्रीडेमध्ये यंत्र – मंत्र -तंत्र यांचाही विचार येतो.
समूह मैथुनक्रीडाशिल्पांतून क्वचित या समागम किंवा संभोग क्रियेसाठी साहाय्य करणाऱ्या स्त्री-पुरुष सेवक/ दासी दाखवलेल्या आहेत. मध्यावर असणारे युगुल, त्यांच्या अंगावर काही दागदागिने दाखवलेले आहेत ज्यामुळे ते राजा – राणी वा उच्चपदस्थ असावेत असे वाटते आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे स्त्री-पुरुष यांच्या अंगावर दागिने दाखवलेले नाहीत शिवाय ते उंचीने कमीही दाखवलेले आहेत; त्यामुळे ते सेवक व दासी असावेत असे लक्षात येते.
त्यामुळे समूहमैथुन क्रियांमध्ये खूप जण जरी दाखवले आहेत तरी ते कदाचित या युगुलाला अधिक आनंद देण्यासाठी मदत करणारे असू शकतात. काही शिल्पांमध्ये स्त्रिया नग्न अवस्थेत कामातुर आणि लाजलेल्या स्थितीत दाखवलेल्या आहेत.
एकपादासनात असलेली स्त्री-पुरुष शिल्पे खूप ठिकाणी कोरलेली आहेत. ते एकमेकांच्या इतके जवळ आहेत की त्यांतील कोणता कोणाचा पाय हे लक्षात येत नाही.
एक स्त्री समागमानंतर अंघोळीला जाताना दाखवलेली आहे आणि तिने वस्त्र काढल्यावर तिच्या खांद्यावरच्या लव्ह बाईटकडे ती लाजून वा कौतुकाने पाहत आहे. या सर्व स्त्रियांचे डोळे बदामाकृती दाखवलेले आहेत. एका स्त्रीच्या शरीरावर विंचू दाखवलेला आहे. तो कदाचित टॅटू असायची शक्यता आहे किंवा त्या शिल्पकाराला ती स्री कामातुर झालेली आहे असे दाखवायचे असू शकते!
एका कमनीय स्त्रीने पाय वर घेतला आहे. तिच्या पायावर एक मदतनीस आलता लावत आहे असे दिसत आहे; तर काहींच्या मते मदतनीस पायातला काटा काढत आहे. मदतनीस स्त्री आहे की पुरुष आहे हे कळत नाही पण खांद्यावर एक बॅग किंवा पर्स लटकवलेली आहे याचा अर्थ त्या काळी अशा पर्स होत्या असे दिसते!
या स्त्रियांच्या अंगावर झुळझुळीत पारदर्शक वस्त्रं असावीत असे वाटते व प्रणय क्रीडेत रममण होताना त्या पूर्णपणे नग्न अवस्थेत आहेत. अगदी मोबाईल धरल्यासारखी एक स्त्री हातामध्ये आरसा धरून शृंगार करत आहे. तिच्या चेहऱ्यावरील भाव मोहक आहेत. तिला ‘दर्पण सुंदरी’ असे नाव दिलेले आहे.
एका शिल्पात तरुण जोडप्याने आपला पार्श्वभाग एकमेकांना टेकवलेला आणि उंचावलेला दाखवलेला आहे याचाच अर्थ ते धुंद होऊन नाचत आहेत असे वाटते. नाचण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर शिल्पातूनही स्पष्ट दिसत आहे. त्या शिल्पातून त्यांची शरीर सौष्ठवता दिसत आहे; शिवाय एका शिल्पात काही संगीतकारही आपापली वाद्ये घेऊन ती वाजवताना, नाचताना दाखवलेले आहेत; तर एका शिल्पात राजासहित त्याची प्रजा नाचगाण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
एका शिल्पात एक स्त्री अर्धवट दडवून काहीतरी लिहिताना दाखवलेली आहे म्हणजे ते प्रेमपत्र असावे असा आपण विचार करू शकतो. इथे एक संस्कृत वचन उद्धृत केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही ते असे –
साहित्य-संगीत-कला-विहीनः
साक्षात् पशुः पुच्छ-विषाण-हीनः
साहित्य, संगीत आणि कलेपासून वंचित असलेला माणूस शेपूट नसलेल्या आणि शिंगे नसलेल्या जिवंत प्राण्यासारखा असतो ही गोष्ट त्या काळानेही स्वीकारलेली होती.
कामशिल्पांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा अशी शिल्पे भारतात अनेक ठिकाणी दिसून येतात. त्यांपैकी दोन ठिकाणी जिथे मला जाता आले त्यांचा फक्त उल्लेख करते –
गाव देवळाणे, ता. बागलाण, जिल्हा नाशिक येथील जोगेश्वर महादेव मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाहेरच्या बाजूस कामक्रीडा करत असलेली विविध आसन पद्धतीची शृंगारशिल्पे कोरलेली आहेत. त्यांतील नागमिथुनशिल्पे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील. ही दोन्ही शिल्पे सहज पाहणाऱ्यांना गणपतीची वाटतात; परंतु बारकाईने पाहिल्यास एका नागाला दोन नागिणींनी विळखा घातलेला आहे. मिथुनशिल्पांतील सौंदर्य आणि सौष्ठव खरोखर वाखाणण्याजोगे आहे.
‘कोळे’ गाव हे सांगोला तालुक्यातील, सोलापूर जिल्हातील ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण असून सांगोला या तालुका ठिकाणापासून साधारण पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरवर आहे. येथील महादेव मंदिरावर काही कामशिल्पे कोरलेली आहेत. त्यांपैकी फक्त एका शिल्पाचा उल्लेख करते –
कामुक भाव दर्शविलेली एक अर्धनग्न स्त्री – ती आपले वस्त्र उतरवत आहे. तिच्या चेहऱ्यावरील कामेच्छा शिल्पातूनही आपल्या सहज लक्षात येते. आलिंगन-चुंबनादी क्रियांमध्ये मनसोक्त गढलेली आणि धुंद झालेली प्रणययुगुलेही आसपास आहेत!
यावरून असे लक्षात येते की खजुराहोला जसे अनेक कलाकार आपली कला साकारत होते तेव्हा त्याच काळात इतरत्रही कलाकार आपापली कला त्यांच्या पद्धतीने साकारात होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरसुख, उपभोग या गोष्टींना ते महत्त्व देत होते.
खजुराहोच्या या मंदिराबाहेर राजा चंद्रवर्मन आणि सिंह हे एकमेकांशी खेळत आहेत असे शिल्प दिसले. याचाच अर्थ ते खूप पराक्रमी होते असे त्यातून दाखवायचे आहे. या विषयीची माहिती शोधली असता ती सोशल मीडियावर मिळाली –
असं म्हणतात, काशीच्या राजपंडितांची मुलगी हेमावती अपूर्व सौंदर्यवती होती. एका रात्री ती कमलपुष्पांनी भरलेल्या तळ्यामध्ये स्नान करत असताना तिच्या अनन्यसाधारण सौंदर्यावर चंद्रदेव मोहित झाले आणि मानवरूप धारण करून पृथ्वीवर उतरले. ती रात्र त्यांनी एकत्रित व्यतीत केली; परंतु पहाटे चंद्रदेव परत निघाले असता हेमवतीने त्यांना थांबण्याचे आर्जव केले आणि ती गर्भवती झाली असल्याचे संगितले. हे ऐकताच चंद्रदेवांनी हेमवतीला आशीर्वाद दिला की ती एका वीर पुत्राला जन्म देईल. त्याला हेमवतीने खजुरपुराला न्यावे. हा मुलगा पुढे एक महान राजा बनेल आणि उद्यान आणि तलावांनी घेरलेल्या अनेक मंदिरांचे निर्माण करेल. पुढे चंद्रदेव हेमवतीला म्हणाले की राजा झाल्यावर तुझा वीर पुत्र एका विशाल यज्ञाचे आयोजन करेल; ज्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट होतील. बदनामी होऊ नये म्हणून आपल्या पुत्राला जन्म देण्यासाठी हेमवतीने पित्याचे घर सोडले आणि ती एका लहान गावामध्ये जाऊन राहिली. यथावकाश तिला पुत्रप्राप्ती झाली. हेमवतीचा पुत्र चंद्रवर्मन आपल्या पित्याप्रमाणे तेजस्वी, शक्तिशाली आणि वीर होता. असे म्हणतात की तो सोळाव्या वर्षीच कोणतेही आयुध न घेता वाघाची शिकार करत असे. चंद्रवर्मनने अनेक युद्धे जिंकली. त्यानंतर हेमवतीच्या सांगण्यावरून त्याने सुंदर उद्याने आणि तलावयुक्त अशी एकूण पंचाऐंशी अद्वितीय मंदिरे निर्माण केली. त्यानंतर त्याने एक मोठा यज्ञ केला; ज्यायोगे हेमवतीचे सर्व पाप नष्ट झाले. पुढे चंद्रवर्मनच्याच नावाने निर्माण झालेल्या चंदेलवंशाच्या राजांनी खजुराहोमध्ये अनेक मंदिरे निर्माण केली.
आजही ही पौराणिक कथा या भागातील प्रत्येक व्यक्ती सांगते. कदाचित ही कथा अशीच पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगितली गेली आहे आणि म्हणूनच ती जिवंत राहिली आहे. खजुराहोचा इतिहासदेखील इतकाच रोचक आहे. ऐतिहासिक दाखल्यांप्रमाणे चंदेलवंशाच्या राजांनी दहा ते बाराव्या शतकांत मध्यभारतावर राज्य केले आहे. त्याच प्रमाणे याच ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की खजुराहो येथील मंदिरांचे निर्माण इ. स. ९५० ते इ. स. १०५० दरम्यान चंदेल राजांकरवी झालेले आहे; मात्र असे म्हणतात की ही मंदिरे निर्माण केल्यानंतर चंदेल राजांनी त्यांची राजधानी महोबा येथे स्थलांतरित केली; मात्र तरीही त्या काळातदेखील खजुराहोच्या मंदिरांचे महत्त्व अबाधित होते.
– या कथेतून एक लक्षात येते की त्या काळात कदाचित जात-धर्म- कुळ यांपलीकडे जाऊन स्त्री-पुरुष संबंध हे महत्त्वाचे मानले गेले असावेत. ते उघडपणे केले गेले असावेत. या सर्व क्रिया कदाचित नैसर्गिक आहेत असे मानले गेले असावे. पुढारलेली संस्कृती असावी; पण या हजार वर्षांनंतरही आजच्या काळात विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्याच्या विचाराला तितकीशी मान्यता नाही, हे दुर्दैवी आहे.
खजुराहो येथील या मंदिरांचा शोध साधारण इ.स. १८५२ ते इ.स.१८८५ या काळात इंग्रजांनी लावला. तोपर्यंत या प्रदेशामध्ये घनदाट जंगल होते आणि हिंस्र प्राण्यांचा प्रभाव खूप मोठा होता. आज या पंचाऐशी मंदिरांपैकी केवळ बावीस मंदिरे आपण बघू शकतो. कोणत्यातरी उत्खननात आपल्याला इतरही मंदिरे सापडतील आणि त्यांतून कदाचित त्या काळातील जगणे आपण अधिक जाणून घेऊ शकू!
कामशिल्पांच्या बाबतीत भारत हा जगातील सर्व देशांत अग्रगण्य देश म्हणावा लागेल. उत्तान कामशिल्पांसाठी खजुराहो किंवा इतर अनेक ठिकाणी आपण भेट देतो. यातून कामाभावना जागृत होणे स्वाभाविक आहे; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शिल्पांकडे कलाकारांच्या दृष्टिकोनातून पाहणेही महत्त्वाचे आहे, असा संदेश येथील गाईड आपल्याला देतात; पण मला असे वाटते की त्या काळातील संस्कृती, त्यांचे विचार, त्यांचे जगणे आणि त्यांनी केलेली आनंदनिर्मिती आपण या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या काळात हरवून बसलो आहोत. कोणत्याही सिनेमातून, नाटकातून किंवा वाचनातून जेवढा आनंद मिळणार नाही तेवढा आनंद ही शिल्पे देऊन जातात; त्यामुळे आनंद निर्मिती करणाऱ्या शिल्पकारांना दाद देण्यासाठी आणि आपल्यालाही आनंदनिर्मितीसाठी तरी परत परत या मैथुनशिल्पांना भेट देणे गरजेचे आहे!
प्रतिभा सराफ































