हिंदी चित्रपटांतील जी गाणी मूळ शास्त्रीय बंदीश किंवा उपशास्त्रीय (ठुमरी, दादरा वगैरे) गाण्यांवर बेतलेली आहेत आणि ज्या गाण्यांचा मुखडादेखील मूळ बंदिशीशी साधर्म्य असलेलाच आहे त्या गाण्यांबद्दल लिहीत आहे; पण त्यापूर्वी काही मराठी गाण्यांबद्दलही लिहितो.
महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात नाट्यसंगीताने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक जुनी नाट्यपदे त्या काळी लोकप्रिय असलेल्या ठुमऱ्यांवर बेतलेली आहेत; पण यात एक गंमत अशी झाली आहे, की मूळ चीज हिंदी किंवा अन्य भाषांत; पण नाट्यपद मात्र मराठीत. हा चमत्कार घडवताना, शब्दरचना करताना खूपच प्रयास केले आहेत. हे जे भाषांतर (खरं तर हा योग्य शब्द नाही; पण पर्याय सुचत नाही) करताना मूळ चिजेचे फक्त मीटर लक्षात घेतले गेले. दोन काव्यांचा अर्थ खूपच भिन्न आहे; पण मराठी पद त्याच मीटरवर गाण्याचे अप्रतिम कौशल्य मात्र त्या काळातल्या ‘मास्तर’ लोकांकडे आणि अर्थातच गायक-गायिकांकडे होते. मी काही उदाहरणे देतो. कंसात मूळ शब्द देत आहे.
१) लपविला लाल दिनमणि (मोहे लिनो देख नजरीयाने जिया मोरा)
२) संशय का मनी आला (किस गये बावरी बनाये)
३) रुपबलि तो नरशार्दूल ( कौन तऱ्हा से तुम खेलत होरी हो)
४) प्रभू मजवरी कोपला (तन मन धन वारी जाऊ)
५) सुजन कसा मन चोरी (फुलन सेज सवारु)
६) वद जाऊ कुणाला शरण (मूळ लावणी (मराठीच), नेसली पितांबर जरी, जरी गं जरतारी लाल काठ)
वरची उदाहरणे बघता, तुम्हांला जाणवले असेल, की दोन ओळींचा अर्थ फारच वेगवेगळा आहे. हे जे भाषांतर केले ते नगाला नग – म्हणजे ओळीला ओळ असे केले गेले.
हे उदाहरण पहा.
दूती नसे ही माला, सवतची भासे मला
नच एकांती सोडी नाथा, भेटू न दे हृदयाला
याची मूळ चीज
मोरे सैंया किवडीया खोलो, रस की बूंद पडे
जोबन मेरा भिग पडे है, और तुम मोसे रुठ पडे हो
ठुमरीत जशी एकच ओळ जास्त आळवली जाते तसेच या दोन्हींमध्ये होते. त्या ओळी अनुक्रमे ‘सवतची भासे मला’ आणि ‘रस की बूंद पडे!’
कधी कधी तर फारच कसरत करावी लागली आहे. उदा.
पिया कर धर देखो, धरकत है, मोरी छतियॉं ओळ नाट्यपदात
मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला (पॅसिव्ह व्हॉईस) भोगी पुष्पमाला (लगेच ॲक्टीव्ह व्हॉईस) पण तरीही या नाट्यपदांनी महाराष्ट्राला शास्त्रीय संगीताची गोडी लावली, हे सत्य आहे.
राठी चित्रपटगीताचे फक्त एक उदाहरण देऊन मी हिंदी चित्रपटगीतांकडे वळतो.
‘आई मी कुठे जाऊ?’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्याला उषा मंगेशकरचे संगीत होते. त्यातले लताचे एक गाणे खूपच वेगळे होते. ‘बोल बोल ना का अबोला?’ गाणे ऐकल्यावर लक्षात येते की ही खूपच अवघड चाल आहे. (अवघड आपल्यासाठी, लतासाठी नाही.) बरेच दिवस हे गाणे डोक्यात होते आणि मग एकदा गिरिजादेवींची एक कजरी ऐकताना ओळख पटली. कजरीचे बोल
आहेत : ‘रुम झुम के बरस लागी बदरीया’
दोन्हीच्या लिंक्स देतोय. लागोपाठ जरूर ऐका!
बोल बोल ना साजणा का अबोला
(लता मंगेशकर)
रुम झुमके बरस लागी बदरीया (गिरिजादेवी)
आता हिंदी गाण्यांकडे वळतो; पण त्यापूर्वी एक सांगावेसे वाटते यामध्ये कुठल्याही तुलनेची अपेक्षा नाही. जितका आदर मला शास्त्रीय गायकांबद्दल आहे तितकाच आदर लता, मन्ना डेसारख्या गायकांविषयी आहे; फक्त फिल्मी गाणी ही बहुतांशी तीन साडेतीन मिनिटांची आहेत;
(त्या काळी ग्रामोफोन रेकॉर्डची ती मर्यादा होती.) तर मैफिलीतले शास्त्रीय गायन तबियतीत केलेले आहे; शिवाय चित्रपटातल्या प्रसंगाचाही विचार केलेला आहे. (शास्त्रीय चीज अनेक गायक-गायिकांच्या आवाजांत उपलब्ध आहे. मी दिलेल्या लिंक्स प्रातिनिधिक आहेत. ) पण एक मात्र नक्की, लताने या चिजा ज्या कुशलतेने पेलेलेल्या आहेत, ते ऐकून असे वाटते की तिने शुद्ध शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्ड्स पण काढायला हव्या होत्या. (हजारो गाणी गायली, त्यात ही शे-दोनशे जड होती का तिला?)
१) जागो मोहन प्यारे
‘जागते रहो’ चित्रपटातले हे शेवटचे गाणे. हा चित्रपट एका रात्रीत घडतो आणि उजाडता उजाडता, लताच्या आवाजात हे गाणे आहे. (पडद्यावर नर्गिस आणि राज कपूर) मूळ भजन ज्या ‘भैरव’ रागावर आधारित आहे, त्याच रागावर हे गीत बांधलेले आहे; फक्त लय वेगळी आहे. शिवाय चित्रपटात कोरसचा सुरेल वापर आहे. चित्रपटाच्या शेवटाच्या उत्कट प्रसंगाला अनुसरून या गीताचे स्वरदेखील शेवटी चढे लागलेले आहेत. पं. व्यंकटेश कुमारांनी गायलेली ही चीज अप्रतिम आहे. त्यांच्या नेहमीच्या जोरकस शैलीत ती जरूर ऐका. पं. अजय चक्रवर्तींनी ती भजनाच्या शैलीत सादर केली आहे.
जागो मोहन प्यारे , चित्रपट : जागते रहो, गायिका लता
जागो मोहन प्यारे , पं. व्यंकटेश कुमार
जागो मोहन प्यारे , पं. अजय चक्रवर्ती (आणि शिष्यगण)
२) झन झन झन पायल बाजे
‘झन झन झन पायल बाजे,’ या मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या नटबिहाग रागातील रचनेवर आधारित एक गीत, सचिनदेव बर्मन यांनी, ‘संगदिल’ या चित्रपटासाठी केले आहे. चिजेच्या शब्दाला अनुसरून चित्रपटात निम्मीचे गायन आणि कक्कूचे नृत्य आहे. या गीताची रेकॉर्ड मात्र तीन मिनिटांचीच होती; पण चित्रपटात थोडे विस्ताराने गायलेले आहे. खालच्याच लिंकवर एस. डी. बर्मन यांच्या आवाजात याच सुरावटीवर आधारित ‘झन झन झन मंजिरा बाजे’ ही बंगाली रचना आहे. एस. डींची हिंदी चित्रपटगीते खूप नंतर रेकॉर्ड झाली, त्या मानाने हे जुने रेकॉर्डिंग आहे आणि अर्थातच एस. डींचा तरुणपणीचा आवाज आहे. हेच गाणे (हिंदी) मन्ना डेने ‘गीत गोविंद’ या चित्रपटासाठी गायले होते. मन्ना डेचा १९४७ सालचा आवाजही थोडा वेगळाच आहे.
झन झन पायल बाजे, चित्रपट : संगदिल, गायिका लता सोबत झन झन मंजिरा बाजे, गायक , सचिनदेव बर्मन
झन झन पायल बाजे, चित्रपट : गीत गोविंद , गायक , मन्ना डे
https://www.youtube.com/watch?v=ZFtr82lYWMM
झन झन पायल बाजे, राग : नट बिहाग, गायक , पं. मल्लिकार्जुन मन्सूर
3) सुनियो जी अरज म्हारी (चित्रपट गीत) / कीजो जी मदद म्हारी (मूळ चीज)
विहंगिनी हा थोडासा कमी ऐकण्यातला राग. किराणा घराण्याचे पं. मणि प्रसाद यांनी हा राग प्रचारात आणला. (काही ठिकाणच्या संदर्भांनुसार तो त्यांनी निर्माण केला.)
त्यांची एक चीज ‘कीजो जी मदद म्हारी,’ ही हृदयनाथ मंगेशकर यांनी लेकिन चित्रपटात, ‘सुनियो जी अरज म्हारी’ या गाण्यासाठी वापरली. लताने ती अर्थातच तितक्याच तोलाने गायली आहे. पडद्यावर डिंपल आहे. प्रसंगसुद्धा गाण्याच्या बोलाला साजेसाच आहे. ही चीज मी रमेश जुळे यांच्या आवाजात ऐकली. (पं. मणि प्रसाद यांच्या आवाजातही उपलब्ध आहे; पण त्यातले शब्द नीट ऐकू येत नाहीत.) त्यात पखवाजाची उत्तम साथ आहे. तिच लिंक देत आहे.
सुनियो जी अरज म्हारी, चित्रपट : लेकिन, गायिका : लता
की जो जी मदद म्हारी, राग : विहंगिनी, गायक : रमेश जुळे
४) केसरिया बालमा
हे दोन शब्द असे रुक्षपणे उच्चारताच येत नाहीत, ते मांड रागाच्या सुरावटीला सोबत घेऊनच येतात. या आर्त हाकेने सुरू होणारी अनेक राजस्थानी लोकगीते आहेत. मांड रागदेखील राजस्थानी लोकगीतांमधूनच घेतलेला आहे. मुळात हा राग अनेक प्रकारे गायला जातो (असे पं.अजय चक्रवर्ती म्हणतात. ) त्यामुळे प्रत्येक लोकगीत हे वेगळेच भासते. त्यांपैकी एक जुने रेकॉर्डिंग इथे देत आहे. लेकिन चित्रपटातच लताच्या आवाजात हे गाणे आहे. ‘केसरिया बालमा, के तुम से लागे नैन’ असे बोल आहेत. याच चित्रपटासाठी लताच्याच आवाजात या गाण्याचे दुसरे व्हर्जन रेकॉर्ड झाले होते. त्याचे बोल आहेत, ‘केसरिया बालमा मोहे, बावरी बोले लोग, ना मैं जिवती ना मरीयो मैं, बिरहा म्हारो रोग’ चित्रपटात हे श्रेयनामावलीसाठी वापरले आहे. हे शब्द गुलजारचे आहेत; पण मूळ गीताचे शब्द, उदय मोहोले यांनी यू ट्यूबवर दिले आहेत.
केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस…
मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन, तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस…
केसर सू पग ला धोवती घरे पधारो जी..
पधारो म्हारे देस…
और बढ़ाई क्या करू पल पल वारूगी
पधारो म्हारे देस आओ म्हारे देस…
आंबा मीठी आमरी, चोसर मीठी छाछ.
नैना मीठी कामरी, रन मीठी तलवार
केसरिया बालमा, चित्रपट : लेकिन, गायिका : लता (बावरी बोले लोग )
(तुम से लागी नैन)
केसरिया बालमा, राग : मांड, गायिका : अल्ला जलाह बाई
५) बलमा अनाडी मन भाये (चित्रपटगीत) / याद पिया की आये (ठुमरी)
उस्ताद बडे गुलाम अली खान यांची ही ठुमरी, ‘याद पिया की आये’ खूपच लोकप्रिय आहे. (मी वाचल्याप्रमाणे) संगीतकार सी. रामचंद्र यांनी त्यांच्या परवानगीने ‘बलमा अनाडी मन भाये’ या बहुरानी चित्रपटातील लताच्या गाण्यासाठी ती सुरावट वापरली आहे. पडद्यावर माला सिन्हा आणि गुरुदत्त आहेत. दोघांचाही उत्कट अभिनय आहेच. लताने अर्थातच त्या सर्व जागा लीलया पेलल्या आहेत. उस्तादांच्याच चालीवर हेच शब्द असलेली ठुमरी, शोभा गुर्टू यांच्या आवाजात ‘प्रहार’ चित्रपटात वापरलेली आहे; पण ती फक्त बॅकग्राउंडला वाजते.
माझी अत्यंत आवडती गायिका, कौशिकी चक्रवर्ती या ठुमरीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. मूळ भिन्न षड्ज (बहुतेक) रागाला सोडून ती प्रत्येक ओळीसाठी वेगळा राग घेते आणि ‘बैरी कोयलिया कूक सुनावे’ ला जो ती कोकिळेचा आवाज लावते त्यासाठी जीव ओवाळून टाकावासा वाटतो मला. शास्त्रीय संगीताचे जाणकार या प्रकाराला तिचे ‘जिमिक’ म्हणून नाक मुरडतात; पण मी जाणकार नसल्याने, मी प्रत्येक वेळी हरखून जातो या जागेवर.
बलमा अनाडी मन भाये, चित्रपट : अर्धांगिनी, गायिका , लता
याद पिया की आये, उस्ताद बडे गुलाम अली खान
याद पिया की आये, चित्रपट : प्रहार, गायिका, शोभा गुर्टू
याद पिया की आये, कौशिकी चक्रवर्ती
६) का करूँ सजनी आये ना बालम
हीपण बडे गुलाम अली खानसाहेबांची ठुमरी. त्यांचे गायन उपलब्ध आहे ते रेकॉर्डवरचे. प्रत्यक्षात ते नक्कीच जास्त विस्ताराने गात असावेत. स्वामी चित्रपटात ती येसूदासच्या आवाजात आहे. चित्रपटात ती उपशास्त्रीय नव्हे तर थोडी सुगम संगीताच्या वळणाची वाटते. त्याने प्रामाणिक प्रयत्न केला आहे; पण मला अजूनही वाटते, तिथे रफी किंवा मन्ना डे हवा होता. गुलाम अलीनेपण ही गायली आहे.
का करूँ सजनी आये ना बालम, चित्रपट : स्वामी, गायक , येसूदास
का करूँ सजनी आये ना बालम , बडे गुलाम अली खान
का करूँ सजनी आये ना बालम , गुलाम अली
७) बाजूबंद खुल खुल जाय
हीपण एक प्रसिद्ध ठुमरी आहे. ‘बाजूबंद’ नावाच्याच एका चित्रपटात लताने गायली आहे. पडद्यावरील अभिनेत्रीचे नृत्य आणि अभिनय लाजबाब आहे. लताच्या गाण्यातल्या मुरक्या आणि हरकती तर तौबा तौबा! ही रचना तुम्हांला जगजित सिंग यांच्या आवाजात ऐकून थोडे नवल वाटेल. तुम्ही त्यांना गझल गायक म्हणून ओळखत असाल; पण हे गायन त्यापेक्षा वेगळे आहे. त्यांनी या चिजेला जोडून एक तराणाही गायला आहे.
बाजूबंद खुल खुल जाय, चित्रपट : बाजूबंद, गायिका, लता
बाजूबंद खुल खुल जाय, गायक जगजित सिंग
८) रस के भरे तोरे नैन
‘आजा रे सावरिया तोसे गरवा लगा लू, रस के भरे तोरे नैन…’ ही रचना गमन चित्रपटात, हिरादेवी मिश्र यांच्या आवाजात आहे. त्यांनी या चित्रपटात छोटीशी भूमिकाही केली आहे; पण हे गाणे बॅकग्राउंडला वाजते. ही ठुमरी पं. भीमसेन जोशी यांनी अतिशय तब्येतीने गायली आहे. इतर अनेक कलाकारांनी ही गायलेली आहे.
रस के भरे तोरे नैन, चित्रपट : गमन, गायिका, हिरादेवी मिश्र
रस के भरे तोरे नैन, गायक, पं. भीमसेन जोशी
९) नादीर दिम ताना देरे ना
तराण्यातले शब्द तसे अर्थहीन असतात. कधी कधी तबल्याचे बोल तर कधी काही अक्षरे वापरली जातात; पण या ‘परदेसी’ नावाच्या चित्रपटात हे जे लताचे गाणे आहे त्याला जोडून, ‘ना जा ना जा बलम, बलम देरे ना,’ असे शब्द योजलेले आहे. पडद्यावर पद्मिनीचे अप्रतिम नृत्य आहे. (भरतनाट्यम् शैलीतील तिल्लाना ) सोबत रशियन अभिनेता ओलेग स्ट्रीझेनोव्ह आहे. याच रागातले आणि याच चालीवरचेच आणि पद्मिनी (आणि राज कपूरवर) चित्रित झालेले एक गाणे, ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात आहे. त्याचे बोल आहेत, “काटे ना कटे रैना, मोरे उन से लागे पुरे नैना”
तराणा गातानाही वेगवेगळे शब्द योजले जातात पण साधारण असेच शब्द असलेला एक तराणा, कोल्हापूरच्या आझमबाई या गायिकेच्या आवाजात उपलब्ध आहे. अप्रतिम आहे तो!
काटे ना कटे रैना, चित्रपट : मेरा नाम जोकर, गायक, आशा आणि मन्ना डे
गौड सारंग तराणा, आझमबाई ऑफ कोल्हापूर
नादीर दिन ताना देरे ना, चित्रपट : परदेसी, गायिका, लता
१०) फूल गेंदवा ना मारो / फूल गेंदवा अब ना मारो
कदंबाची फुले चेंडूसारखीच दिसतात. यमुनेच्या काठावर कृष्ण ही फुले फेकून मारत असे. त्याला विनंती करताना गोपिका म्हणत असत; ‘फूल गेंदवा ना मारो.’ याच मुखड्याचे एक गाणे, ‘दूज का चॉंद’ या चित्रपटात आहे. मन्ना डेचे हे गाणे, आगावर चित्रित झालेय आणि ते पडद्यावर विनोदी गाणे म्हणून येते. चित्रपटात ग्रामोफोन रेकॉर्ड मध्ये मध्ये अडकते म्हणून, गाण्यातसुद्धा, ‘जत करे, जत करे, जत करे’ असे शब्द येतात. (चित्रपटात विनोद म्हणून ठीक आहे; पण निदान रेकॉर्ड तरी अशी असायला नको होती. मन्ना डेने गायलेली अनेक शास्त्रीय रागांवर आधारित गाणी, चित्रपटात विनोदी म्हणून आलेली आहेत.)
आता ही चीज मालिनी राजुरकर यांच्या आवाजात ऐका. शेजारच्या काकू असाव्यात इतक्या साध्यासुध्या दिसणाऱ्या आणि असणाऱ्याही मालिनीबाई जेव्हा आक्रमक शैलीत गातात तेव्हा आपलेच बाहू स्फुरण पावतात. तीस वर्षांपूर्वी त्यांच्यासमोर बसून मी त्यांचे गायन रात्री ५ तास आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ तास ऐकलेले आहे आणि तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे. (या लेखाचे शीर्षक, ‘बोल सुना जानी’ हे त्यांच्याच एका टप्प्याचे बोल आहेत. ) इथे त्यांनी या चिजेला जोडून जी स्वरावली (सा ध प ध म प ग म नि ध सा रे ग म ) गायली आहे, तिने मंत्रमुग्ध व्हायला होते. हे मैफ़िलीतले गायन असल्याने खूप विस्ताराने गायले आहे त्यांनी !
फूल गेंदवा ना मारो, चित्रपट : दूज का चॉंद, गायक, मन्ना डे
फूल गेंदवा अब ना मारो, विदुषी मालिनी राजुरकर
क्रमश:
