चेन्नईला यायच्या आधीच तिथे असताना मम्मलापुरम आणि पुदूचेरी या दोन ठिकाणी जायचे नक्की केले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी अगदी लवकरच आम्ही घर सोडले – उन्हाचा त्रास टाळायचा म्हणून. कोरोमंडल किनाऱ्यालगतच्या समुद्राला समांतर असलेला इस्ट कोस्ट रोड घेतला. दोन्ही शहरे तशी याच रस्त्यावर आहेत. दुतर्फा छान दाट झाडी होती. अण्णांना (आशुतोष आपटे यांना) ड्रायव्हिंग खूप आवडते. सोबत गप्पा चालूच होत्या. एकूण मूड पिकनिकला चाललो आहोत असाच होता!
चेन्नई ते पुदूचेरी अंतर १६५ किलोमीटर आहे आणि तेवढे जायला साधारण साडेतीन तास लागतात. त्यामुळे आज फक्त मम्मलापूर करायचे, संध्याकाळी पुदूचेरीला पोचायचे, तिथेच मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी पुदूचेरी बघून उशिरा चेन्नईला परतायचे असे आम्ही ठरवले. त्याचा एक फायदा असा झाला की चेन्नईपासून २५ किलोमीटर अंतरावर, मम्मलापुरमच्या वाटेवरच लागणारे ‘दक्षिणचित्र’ नावाचे एक हेरिटेज म्युझियम आम्ही निवांतपणे बघू शकलो. त्याची आधी आम्हांला काहीच माहिती नव्हती. अगदी आयत्या वेळी आणि वाटेवरच असल्याने आम्ही तिथे थांबायचा निर्णय घेतला.
आंध्र आणि तेलंगणा मिळून पूर्वीसारखे एकच राज्य पकडले, तर आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ ही विंध्य पर्वताखालची चारही राज्ये द्रविड संस्कृतीची आहेत. त्यांच्या भाषाही द्रविड गटातील आहेत. (काही विचारवंतांनी महाराष्ट्राचा समावेशही पंचद्रविडांत केला होता. मराठी भाषा संस्कृतप्रमाणेच तमिळ भाषेशी जोडलेली आहे असेही विश्वनाथ खैरे यांच्यासारखे काही विद्वान मानतात.) संपूर्ण दक्षिण भारत कित्येक शतके आलटून पालटून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, पांडियन, पल्लव, चोला, चेर अशा वेगवेगळ्या राजघराण्यांच्या अमलाखाली होता. त्यांची मातृभाषा कधी तेलुगू असायची, कधी तमिळ, तर कधी कन्नड. त्या काळात त्याच भाषेत बहुतेक प्रशासन चालायचे. साहजिकच लोकांकडूनही ती भाषा अधिक प्रमाणात बोलली जायची; त्यामुळे त्या प्रदेशात राहणारे सर्व भाषक एकात एक मिसळत गेले. तमिळ अर्थातच सगळ्यात प्राचीन आणि समृद्ध; तिला २००४ सालीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण तमिळपाठोपाठ तेलुगू आणि कन्नड भाषांनाही २००८ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मल्याळमला तो २००९ साली मिळाला. चेन्नई हे केवळ तमिळनाडूचे नव्हे तर एकूणच द्रविडभूमीचे प्रवेशद्वार आहे. या चार राज्यांची वैभवशाली संस्कृती एकात एक कशी गुरफटलेली आहे याचेही उत्तम दर्शन दक्षिणचित्रमध्ये घडते.
इंग्रज काळात मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आंध्र, कर्नाटक आणि केरळ यांचाही समावेश होता. भाषावार प्रांतरचना खूप नंतरची; त्यामुळे इथला समाजही संमिश्र बनला आहे. उदाहरणार्थ : चेन्नई म्हणजे तमिळनाडूची राजधानी, पण तिथे तेलुगू वस्ती बरीच आहे. तसेच ‘लिटल इंग्लंड’ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या तमिळनाडूमधील होसूर या थंड हवेच्या शहरात कन्नड वस्ती बरीच आहे. याउलट कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये कन्नडइतकीच तेलुगू व तमिळ वस्तीही आहे. काहीजण कन्याकुमारी केरळमधेच आहे असे समजतात – प्रत्यक्षात ते तमिळनाडूमधेच आहे; पण केरळपासून अगदी जवळ असल्याने साहजिकच तिथे मल्ल्याळी वस्ती बरीच आहे. पेरियार आणि जयललिता हे दोघेही नेते कन्नडिगा होते तर ‘आधुनिक कर्नाटकाचे निर्माते’ विश्वेश्वरय्या अय्यर हे मुळातले तमिळ होते. अनेक वर्षे तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले एमजीआर मुळातले मल्याळी होते. या चार राज्यांत अशी सरमिसळ झालेली असल्यानेच बहुधा सगळ्या दक्षिण भारतीयांना सरसकट ‘मद्रासी’ म्हटले जाते!
मद्रास क्राफ्ट फाउंडेशन नावाच्या एका चेन्नईस्थित विश्वस्त निधीने दहा एकर जमिनीवर हे संग्रहालय उभारले आहे. दक्षिण भारताच्या प्रेमात पडलेल्या आणि पुरातत्त्वशास्त्र (अँथ्रोपोलॉजी) या विषयात अमेरिकन विद्यापीठातून पीएच.डी केलेल्या डेबोरा त्यागराजन नावाच्या एका मूळ अमेरिकन महिलेने दक्षिण भारताचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने हे फाउंडेशन १९८४ साली मुख्यतः स्वतःच्या निधीतून स्थापन केले आणि बारा वर्षे अथक परिश्रम घेऊन १९९६ मध्ये हे संग्रहालय लोकांसाठी खुले केले. अर्थात पुढे इतरही मदतीचे हात पुढे आले. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट लॉरी बेकर यांनी प्रत्यक्ष उभारणी केली आणि विशेष म्हणजे ते सर्व काम त्यांनी काहीही आर्थिक मोबदला न घेता केले. संग्रहालयात प्रवेश केल्यावर लगेच एक सतरा मिनिटांचा परिचयपट दाखवायची सोय आहे. त्यामुळे आत काय बघायला मिळेल याचे सम्यक चित्र अभ्यागतांपुढे सुरुवातीलाच उभे राहते. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रवासी आणि अभ्यासक इथे येत असतात.
चारही दक्षिणी राज्यांतील लोकसंस्कृतीचे इथे दर्शन घडते. त्यांच्या घरांचे वेगवेगळे नमुने इथे बघायला मिळतात. हे नमुने कृत्रिमरित्या उभारलेले नाहीत. त्या-त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षातील घरेच फाउंडेशनने संबंधित व्यक्तींकडून बाजारभावाने विकत घेतली, उचलून इथे आणली आणि लोकांना व्यवस्थित बघता येतील अशा प्रकारे मांडली. या सगळ्यासाठी बराच खर्च आला असेल हे उघड आहे. विणकर, शेतकरी, कुंभार, व्यापारी, कोळी, भटजी, सुतार, मिस्त्री वगैरे व्यावसायिक कसे राहतात, त्यांचे काम कसे करतात हे इथे प्रत्यक्ष बघता येते. हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान अशा वेगवेगळ्या धर्मांच्या, वेगवेगळ्या सामाजिक स्तरांवरच्या लोकांची राहणी कशी असते हेही इथे प्रत्यक्ष बघायला मिळते. त्यांची भांडी, घरातले सामानसुमान, कपडे हे सगळे जसेच्या तसे इथे प्रदर्शित केलेले आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही प्रकारच्या घरांचे नमुने इथे आहेत. बांबूपासून टोपल्या विणणाऱ्या बुरूड समाजातील एकाचे मातीचे घर चेंगलपट्टू जिल्ह्यातून आणले आहे, तसेच एका चेट्टीयार व्यापाऱ्याचे प्रशस्त दुमजली घर पुडूलकोट्टा जिल्ह्यातून आणले आहे. कोट्टायम जिल्ह्यातील सिरियन ख्रिश्चन शेतकऱ्याचे घर आहे, तसेच कर्नाटकमधील चिकमगलूरच्या मुसलमान दुकानदाराचेही घर आहे. धान्य साठवायचे कोठार, वाण्याचे दुकान, गुरांचा गोठा, देवळातील रथ, विणकराचे माग, ग्रामपंचायतीची चावडी हे सारे इथे दिसते.
या व्यतिरिक्त विविध व्यावसायिक कामांची प्रात्यक्षिकेही इथे दाखवली जातात. बाहुल्या बनवण्यापासून दगडावर कोरीव काम करण्यापर्यंत आणि पितळेची भांडी बनवण्यापासून वाद्ये तयार करण्यापर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यासाठी काही कारागीर इथे नोकरीवरदेखील ठेवलेले आहेत. अनेक कलाकार विशिष्ट कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जातात. त्यांच्या व येणाऱ्या अभ्यासकांच्या राहण्याची इथे सोय केलेली आहे. काही विशिष्ट माहिती हवी असेल तर ती पुरवणारे जाणकारही उपलब्ध आहेत. मी तिथे असताना एक पॉटरी वर्कशॉप तिथे सुरू होते आणि मडकी किंवा भांडी यांच्या वेगवेगळ्या घाटांवरून आणि दर्जावरून तत्कालीन संस्कृती कितपत प्रगत होती याचा अंदाज कसा बांधता येतो याची माहितीही तिथे लिहिलेली होती.
दक्षिण भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानता येईल अशा कर्नाटकी संगीताचे प्रयोगही इथे सतत होत असतात. यांतील हजारो गीते तेलुगू भाषेत आहेत, त्यांचे संवर्धन करण्यात तमिळनाडूतील तंजावरच्या भोसले घराण्याचा मोठा वाटा आहे आणि त्याला म्हणतात कर्नाटकी संगीत! आंध्र, तमिळनाडू आणि कर्नाटक इथे जोडले गेले आहेत. या कर्नाटक संगीताच्या संदर्भात मराठी माणसाचे आणखी एक मोठे योगदान आहे. या संगीतप्रेमींच्या जागोजागी ‘सभा’ असतात आणि त्या ‘सभे’समोर वेगवेगळे गायक आपले संगीत सादर करतात. अशी पहिली ‘सभा’ म्हणजे मद्रास ज्युबिली गायन समाज आणि तिची स्थापना १८८७ साली बळवंत त्रिम्बक सहस्रबुद्धे यांनी केली होती. त्यांच्या रेल्वेतील नोकरीमुळे ते काही वर्षे मद्रासमध्ये राहत होते आणि त्यापूर्वी पुण्यात असताना पुणे गायन समाज या संस्थेशी ते संबंधित होते. त्याच धर्तीवर त्यांनी मद्रास ज्युबिली गायन समाज स्थापन केला.
दक्षिणचित्रमधील खुल्या रंगमंचावर विविध गायक आपली कला सादर करण्यासाठी येतात. लांबलांबचे संगीतप्रेमी त्या वेळी श्रोते म्हणून इथे येतात. तमिळनाडूतील भरतनाट्यम, आंध्रमधील कुचिपुडी, तसेच केरळमधील कथकली आणि मोहिनीअट्टम या चार प्रमुख शास्त्रीय दक्षिणी नृत्यांचे सादरीकरणदेखील सतत चालूच असते. भारतात शास्त्रीय नृत्याच्या ज्या सात मुख्य परंपरा आहेत त्यांपैकी चार दक्षिण भारतातील आहेत हे विशेष आहे. (उर्वरित तीन म्हणजे मणिपुरी, ओडिसी आणि उत्तर प्रदेशातील कथक.) जगभरातून गोळा केलेले हजारो फोटो, पुरातन वस्तू आणि चित्रांची आर्ट गॅलरी, दक्षिणी संस्कृतिविषयक सुमारे चौदा हजार पुस्तके असलेले वाचनालय, कारागिरांच्या वस्तू विकत घ्यायची सोय हे सगळे इथे आहे. मेदूवडा, इडली, डोसा, उत्तप्पा, इडिअप्पम, पोंगल, सांबार, रस्सम, पायसम वगैरे पदार्थ सगळ्यांनाच ठाऊक असतात; पण प्रत्येक राज्यात त्यांचे विविध प्रकार बनवले जातात. इथल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांचा आस्वाद आपण घेऊ शकतो.
फाउंडेशनचे व्यवस्थापन एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेत असावे तसे अतिशय कार्यक्षम आहे. सगळा परिसर अगदी स्वच्छ आहे, जागोजागी मार्गदर्शक फलक आहेत, प्रशस्त प्रसाधनगृहे आहेत. अनेक संस्कृतीप्रेमी स्वयंसेवक इथे आपली सेवा देण्यासाठी येत असतात. तमिळनाडूला भेट देणाऱ्यांनी दक्षिण भारताच्या लोकजीवनाचे आकर्षक आणि खरेखुरे दर्शन घडवणाऱ्या या संग्रहालयात आवर्जून जावे.
ममल्लापुरम चेन्नईपासून ५० किलोमीटरवर आहे; पण दक्षिणचित्रपासून फक्त २५ किलोमीटरवर आहे. ममल्लापुरमला पूर्वी महाबलीपुरम म्हणत आणि आजही अनेकांच्या तोंडी ते जुने नावही असते. ज्या शिल्पांकरता ममल्लापुरम जगप्रसिद्ध आहे ती शिल्पे पल्लव राजांच्या काळात आणि मुख्यतः सातव्या आणि आठव्या शतकात निर्माण केली गेली. ही शिल्पे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये समाविष्ट आहेत. यांच्या निर्मितीचे सर्वाधिक श्रेय राजा नरसिंहवर्मन (पहिला) याला दिले जाते. त्याला ‘ममल्ला’ (म्हणजे शक्तिशाली मल्ल) म्हणत आणि त्यावरूनच या गावाला ममल्लापुरम नाव पडले असे म्हणतात.
ही बहुतेक शिल्पे समुद्रकिनाऱ्यालगत पण प्रचंड अशा दगडांतून कोरलेली आहेत. त्यांतले आम्ही सर्वांत आधी बघितले ते ‘अर्जुन पेनान्स’ (तपश्चर्या) या नावाचे शिल्प. ते बरेच मोठे आणि आडवे पसरलेले आहे. डाव्या पायावर उभे राहून अर्जुन तपश्चर्या करतो आहे आणि आजूबाजूला अनेक देव, काही शिकारी, काही प्राणी आणि काही ऋषी त्याच्याकडे बघत आहेत असे हे शिल्प आहे. शेजारीच शंकराचे शिल्प आहे. शंकराने आपल्या तपश्चर्येवर खूश होऊन आपल्याला त्याच्याकडचे पाशुपतास्त्र हे शस्त्र द्यावे यासाठी अर्जुनाची ही तपश्चर्या आहे.
नंतरचे शिल्प आहे ‘पंचरथ’ या नावाचे. धर्म, भीम, अर्जुन, नकुल-सहदेव आणि द्रौपदी यांचे पाच रथ इथे प्रचंड अशा खडकांतून घडवलेले आहेत. (नकुल व सहदेव यांच्या नावाने एकच रथ आहे.) रथांवर आणि त्यांच्या चाकांवर खूप सुंदर अशी देवादिकांची व प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत. प्रत्येक रथ म्हणजे एकाच दगडातून कोरलेले स्वतंत्र शिल्प आहे आणि ते सर्व वेगवेगळ्या प्रकारे सजवलेले आहेत. या पाच रथांच्या मध्यभागी एक अतिभव्य हत्ती आणि एक सिंह यांचीही शिल्पे आहेत. हे पाचही रथ पूर्वी वाळूखाली दडले गेले होते आणि साधारण दोनशे वर्षांपूर्वी इंग्रज अभ्यासकांनी ते हुडकून काढले.
नंतरचे आम्ही बघितलेले शिल्प म्हणजे चक्क दगडाचा भव्य असा गोलाकार आहे. कुठच्याही क्षणी तो गडगडून खाली जाईल असे वाटते पण प्रत्यक्षात तो अनेक शतके तसाच स्थिर आहे. तज्ज्ञांच्या मते त्याचे वजन साधारण २५० टन असावे; तरीही तो घरंगळत का जात नाही हे एक विलक्षण कोडेच आहे. त्याच्यावर कोरीव काम असे काहीच दिसत नाही. कदाचित काळाच्या ओघात ते नाहीसे झाले असेल. त्याला ‘कृष्णाचा लोण्याचा गोळा’ (‘कृष्णाज् बटर बॉल’) असे विचित्र नाव दिले आहे. त्याचेही कारण उलगडत नाही. श्रीकृष्ण इतके लोणी खात असेल असे वाटत नाही! पण तसे नाव बाजूच्या फलकावर लिहिले आहे खरे.
त्यानंतर आम्ही बघितले ते ‘शोअर टेंपल’ (‘किनाऱ्यावरचे मंदिर’). हा तीन मूर्तींचा समूह आहे : दोन शिवाच्या आणि एक विष्णूची. हे मंदिर इथले सर्वांत जुने म्हणजे साधारण इसवी सन ६३० ते ६७० या काळात एका खडकावर उभारले गेलेले आहे. आधीची शिल्पे इसवी सन ७०० ते ७२८ या काळात, म्हणजे पन्नास-साठ वर्षांनंतर उभारली गेली आहेत. असे म्हणतात की अशी आणखी पाच मंदिरे इथे होती; पण वेगवेगळ्या वेळी आलेल्या वादळांमध्ये ती लाटांबरोबर समुद्रात वाहून गेली. ती वाहून गेली आणि हे एक तेवढे शिल्लक राहिले याचे कारण म्हणजे; ती सर्व मंदिरे वाळूवर उभारलेली आणि म्हणून कमकुवत पायाची होती; तर हे मात्र खडकावर उभारलेले आणि म्हणून भक्कम पायाचे आहे.
इथे एक सांगायला हवे. २६ डिसेंबर २००४ रोजी तमिळनाडूच्या किनारपट्टीला प्रचंड अशा सुनामीचा तडाखा बसला होता. लांब इंडोनेशियात झालेल्या भूकंपातून ही सुनामी आली होती. जगभरात एकूण २,३०,००० माणसे त्यात दगावली आणि खुद्द तमिळनाडूमधे साधारण ८,००० जणांना जीव गमवावा लागला. जेव्हा त्या प्रचंड लाटा ओसरल्या तेव्हा ममल्लापुरमच्या किनाऱ्यावर सुट्टीसाठी आलेल्या प्रवाशांच्या मते किनाऱ्यावर काही नवीच शिल्पे त्यांना समुद्रातून वर आलेली दिसली होती; पण नंतर आलेल्या लाटांबरोबर ती पुन्हा समुद्रात दडली गेली. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंतर याची बरीच छाननी केली असताना त्या प्रवाशांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खरोखरच अनेक शिल्पे समुद्रात खोलवर दडलेली होती. त्यांचा बाह्य आकार तेवढा पाणबुड्यांतून दिसत होता पण ती वर आणणे अशक्य होते. अर्थात त्यामुळे अशी आणखी पाच मंदिरे एके काळी या किनाऱ्यावर होती या मताला नक्कीच दुजोरा मिळतो. कदाचित भविष्यात यावर अधिक संशोधन होऊन अधिक प्रकाश पडू शकेल.
या सर्व शिल्पांवर उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहे. अनेक शतके समुद्राच्या लाटा आणि वारा झेलूनही ते कसे टिकून राहिले आहे याचे नवल वाटते. त्या काळात कारागिरांनी कुठली अस्त्रे वापरली असतील, कुठले तंत्रज्ञान त्यासाठी त्यांनी अवगत केले होते, त्यांना कोणी प्रशिक्षण दिले होते हे सगळे एक कोडेच आहे. मुसलमान किंवा युरोपियन इथे यायच्या खूप पूर्वीच ही शिल्पे निर्माण केली गेली असल्याने त्यांचे श्रेय कुठल्याही परकीय प्रभावाला देता येणार नाही; ही अस्सल स्थानिक कारागिरी आहे. मला स्वतःला या पुरातन गोष्टींमधले फारसे काही कळत नाही; पण प्राचीन देवळे आणि शिल्पकला हा अनिलच्या व्यासंगाचा विषय आहे; शिवाय त्याची कविता कल्याण नावाची एक मैत्रीण या वेळी आमच्याबरोबर होती. ती ममल्लापुरमला पूर्वीही आली होती आणि तेथील बरीच माहिती तिला होती. केवळ आम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी ती पुन्हा आमच्यासोबत आली होती. तिचे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील.
ममल्लापुरम हे मुळात पल्लव साम्राज्यातले प्रमुख बंदर होते आणि इथून एके काळी खूप मोठा व्यापार चालायचा. मद्रासपट्टणम हे मात्र तेव्हा एक अगदी छोटे किरकोळ असे किनार्यावरचे खेडे होते. पल्लव राजे आणि त्यांचे सेनानी उत्तम दर्यावर्दी होते. भारतात समुद्रपर्यटन निषिद्ध मानले गेले त्याच्या खूप पूर्वीचा हा इतिहास आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा शेजारीच असल्याने समुद्र हा तेथील लोकांच्या जगण्याचाच एक महत्त्वाचा भाग होता. येथील व्यापाऱ्यांची जहाजे पार ब्रह्मदेश, इंडोचायना, मलाया, जावा, सुमात्रा, फिजीपर्यंत जायची. तेथील जहाजेही इथे येत. व्यापारातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण होत होती. भारतात फारसे सोने मिळत नव्हते; पण या व्यापारामुळे अन्य जगातून भारतात सोने येत होते; कारण खूपदा इथून जो माल विकत घेतला जाई त्याची किंमत सोन्याच्या रूपात दिली जाई. कारण स्थानिक लोकांना परदेशातून येऊ शकेल असे काहीच नको होते. त्यामुळे आपल्या मालाची किंमत परदेशी व्यापाऱ्यांनी सोन्याच्या रूपात द्यावी असा स्थानिक व्यापाऱ्यांचा आग्रह असायचा. त्यातूनच पल्लव राजांचे वैभव निर्माण झाले. भारतात ‘सोन्याचा धूर’ निघत असे असे म्हणतात ते यामुळेच. ‘मंदिरे उभारणारे’ (‘टेंपल बिल्डर्स’) ही आज तमिळ लोकांची जगभर ओळख आहे आणि ती किती सार्थ आहे याची साक्ष महाबलीपुरम येथील मंदिरे व शिल्पे देतात. ती बघताना तत्कालीन आर्थिक समृद्धीचीही कल्पना करता येते; त्याशिवाय इतकी भव्य मंदिरे उभारणे त्या राजांना शक्य झाले नसते.
ममल्लापुरमला अनेक परदेशी प्रवासीदेखील भेट देत असतात – विशेषतः ज्यांना प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यात रस आहे असे. ताज ग्रुपचा फिशरमन्स कोव्ह नावाचा एक आलिशान रिसॉर्टही इथे आहे. रुख्मिणी अरुंडेल यांच्या कलाक्षेत्र या विख्यात नृत्यसंस्थेच्या आणि इतरही काही संस्थांच्या वतीने इथे सांस्कृतिक कार्यक्रमही अधूनमधून सादर केले जातात.
ऑक्टोबर २०१९ मध्ये असाच एक परदेशी प्रवासी इथे आला होता आणि त्याच्या स्वागतासाठी खास भारताचे पंतप्रधानही इथे आले होते! ती परदेशी व्यक्ती म्हणजे चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग! या दोन राष्ट्रप्रमुखांची एक विशेष बैठक इथे त्या वेळी झाली होती. अशा प्रकारच्या बैठका नेहमी राजधानी दिल्ली इथेच होतात. परदेशी पाहुणे भेट देण्यासाठी जातात तेही आग्र्याच्या ताजमहालासारख्या ठिकाणी. सुरक्षा आणि इतरही अनेक कारणांमुळे ते सोयीचेही असते; पण या वेळी मात्र या बैठकीसाठी नरेंद्र मोदींनी ही अगदी आगळी अशी जागा निवडली होती. दोन्ही राष्ट्रप्रमुख दोन दिवस इथे ताजच्या रिसॉर्टमध्ये राहिले. सर्व परिसर मोदींनी स्वतः जिनपिंग यांना फिरून दाखवला आणि टीव्हीवर त्या साऱ्याचे विस्तृत चित्रणही बघण्यात आले होते. चेन्नई इथे न थांबता दोघेही राष्ट्रप्रमुख थेट इथेच विमानाने आले. ही जागा निवडण्यामागे कदाचित काही राजकीय विचारही असू शकतो; पण ती शक्यता विचारात घेऊनही ही घटना मला खूपच वेधक वाटली.
या जागेची एक वेगळी पार्श्वभूमीही या संदर्भात विचारात घेण्यासारखी आहे. काही अभ्यासकांच्या मते तिबेटप्रमाणेच इथूनही बौद्ध धर्म चीनमध्ये गेला. एका पल्लव राजपुत्राने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि त्यानेच नंतर ती शिकवण चीनमध्ये नेली असे म्हटले जाते. चीनमध्ये बोधिधर्मा या नावाने तो राजपुत्र ओळखला जातो आणि त्याचे एक स्मारकही चीनमध्ये आहे. शाओलिन मार्शल आर्ट नावाचा एक लढाईचा प्रकार चीनमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या काही जणांना बोधिधर्माने पल्लव राज्यात प्रचलित असलेले काही स्वरक्षणाचे प्रकार शिकवले असेही म्हटले जाते. चीनबरोबर अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या या गावात शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यात ही महत्त्वाची बैठक व्हावी हेही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
प्राचीन काळात अनेक तमिळ जगभर गेले. काही व्यापारासाठी गेले, काही मजूर म्हणून गेले. असाच संबंध शेजारीच असलेल्या श्रीलंकेशीदेखील अगदी रामायणापासून येत गेला. पूर्वी वापरला जाणारा पण आता समुद्रात दडलेला असा रस्ता रामेश्वरपासून थेट श्रीलंकेला भिडला होता. तेथील ब्रिटिश मालकीच्या चहा आणि कॉफीच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तमिळ मजूर नेले; त्यामुळे श्रीलंकेत तमिळ भाषकांची संख्या बरीच झाली – विशेषतः उत्तरेकडच्या जाफना भागात. तेथील तमिळ जनतेशी तमिळनाडूमधील जनतेचे निकटचे भावनिक नाते आहे. सिंहली मुख्यतः बौद्ध होते; तर तमिळ मुख्यतः हिंदू होते. त्यांच्या भाषाही वेगळ्या; तरीही पूर्वी अनेक वर्षे येथील बहुसंख्य सिंहली समाज आणि अल्पसंख्य तमिळ समाज यांचे नाते स्नेहाचे होते; पण मध्यांतरी जवळपास तीस वर्षे त्यांच्यात मोठाच वैरभाव निर्माण झाला. आपली गळचेपी होत आहे अशी स्थानिक तमिळ लोकांची भावना होती. त्यातून निर्माण झालेले तमिळ टायगर्स (LTTE), श्रीलंकेतील अंतर्गत लढाया, राजीव गांधी यांचा मानवी बॉंबचा स्फोट करून केला गेलेला खून वगैरेबद्दल सर्वांनाच माहिती असते; इथे त्याबद्दल लिहायची गरज नाही. दोन शेजारी राष्ट्रांच्या इतिहासातील तो एक दुर्दैवी कालखंड म्हणावा लागेल. सुदैवाने गेल्या दहा-बारा वर्षांत परिस्थिती बरीच सुधारली आहे आणि आजही अनेक तमिळ श्रीलंकेत सुरक्षित वास्तव्य करत आहेत. श्रीपेरूमबुदूर येथील राजीव गांधी स्मारक ममल्लापुरहून जेमतेम तासाभराच्या अंतरावर आहे; पण आम्ही काही तिथे गेलो नाही.
मलाया, फिजी, आफ्रिका, वेस्ट इंडिज अशा अनेक ठिकाणीही ब्रिटिशांचे रबर आणि ऊस यांचे मळे होते. मजूर म्हणून अनेक अल्पशिक्षित तमिळ तिथे गेले. त्यांची पुढची पिढी चांगली शिकली. सिंगापूर हे नावही तमिळ भाषेतून आलेले आहे असे काही तज्ज्ञ मानतात. तेथील समाजजीवनात तमिळ लोकांचा चांगला सहभाग असतो. सिंगापूरमध्येतर तमिळ ही तीन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे.
बरेच तमिळ लोक दक्षिण आफ्रिकेतही होते आणि त्यामुळेच गांधीजींचा तमिळनाडूशी खूप जुना आणि जवळचा संबंध होता. पुढे गांधीजींच्या देवदास या मुलाने राजाजींच्या लक्ष्मी या मुलीशी विवाह केला. त्यांचा मुलगा म्हणजे राजमोहन – राजाजीमधील राज आणि मोहनदासमधील मोहन एकत्र करून ठेवलेले. अर्थात गांधीजींचे तमिळनाडूशी असलेले नाते त्याच्या खूप पूर्वीपासूनचे आहे. १८९३ ते १९१५ अशी २१ वर्षे गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. तेथील मळ्यांमध्ये काम करणारे बहुसंख्य मजूर तमिळ होते. त्यांच्या सहवासात इतकी वर्षे राहिल्यामुळे गांधीजी थोडेफार तमिळ बोलूही शकत. ‘इंडियन ओपिनियन’ नावाचे जे नियतकालिक गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत चालवले ते इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांप्रमाणे तमिळ भाषेतही छापले जाई. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेत त्यांनी या साऱ्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे.
दक्षिण आफ्रिकेतले तमिळ लोक आपली मातृभाषा आणि संस्कृती जपण्याचे किती कसोशीने प्रयत्न करत असतात या बाबतचा माझा एक अनुभव इथे सांगावासा वाटतो. दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन शहरी एका संस्थेच्या कामासाठी जायचा योग आला होता. एका तमिळ शिक्षकाच्या घरी माझा मुक्काम होता आणि त्याच्याबरोबर तेथील एका देवळात एका संध्याकाळी मी गेलो होतो. तेथील मंडपात दीड-दोनशे माणसे दाटीवाटीने मांडी घालून बसली होती. तमिळ भजने म्हणत होती. त्यांच्यापैकी बहुतेकांना खरेतर ती भाषा येत नव्हती; पण चेन्नईहून मागवलेला एक पंडित समोर माइक घेऊन बसला होता. तो एकेक ओळ म्हणायचा आणि मग सगळे त्याच्या मागोमाग ती ओळ म्हणायचे. रोमन लिपीत ती भजने लिहिलेला एक छापील कागदही प्रत्येकाच्या हातात होता. मग कोणीतरी नारळाचा नैवेद्य वाटला. प्रत्येकाने खूप भाविकतेने तो घेतला. प्रत्येकाने ओळीने देवाचे दर्शन घेतले. घंटानाद केला आणि मग हळुवार पावलांनी बाहेर येत, बूट घालून मंडळी आपापल्या मोटारीतून घरी रवाना झाली. त्यांच्या चार-पाच तरी पिढ्या इथेच स्थायिक झाल्या होत्या, सगळ्यांचे शिक्षण इंग्रजीतच झाले होते, तमिळशी फारसा संपर्कच उरला नव्हता; पण तरीही ही सर्व भजने तमिळमध्येच म्हणण्याची त्यांची पद्धत कायम होती. दर गुरुवारी इतर सगळी कामे बाजूला सारून ही मंडळी इथे देवळात एकत्र जमायची, तासभर भजने म्हणायची – त्यासाठी लांबून लांबून यायची. आपली विशिष्ट संस्कृती जपायचा त्यांचा तो प्रयास असायचा आणि तमिळ भाषा हे त्यासाठीचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन होते.
त्याकाळात स्थलांतर केलेले तमिळ हे तसे अल्पशिक्षित होते. अलीकडच्या संगणक युगात मात्र मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित तमिळ तरुण परदेशी गेले आहेत. गुगलचे सुंदर पिचाई किंवा पेप्सिकोच्या इंद्रा नुई ही नावे तर आज जगप्रसिद्ध आहेत. वेंकटरामन रामकृष्णन आणि सुब्रमण्यन चंद्रशेखर या तमिळ अमेरिकनांनी तर नोबेल पुरस्कार मिळवलेला आहे. अमेरिकन सरकार जेवढ्या भारतीयांना व्हिसा देते त्यांमध्ये तमिळींची संख्या सर्वाधिक आहे असे म्हणतात. इतरही देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवलेल्यांची यादी बघितली तर त्यात अनेक तमिळ नावे आढळतील. त्या बहुतेकांना आपल्या भाषेचा अभिमान असतो.
या भाषेला अडीच हजार वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. तमिळ भाषेतील ‘संगम साहित्य’ हे ख्रिस्तपूर्व तिसरे शतक ते ख्रिस्तोत्तर तिसरे शतक या काळातील आहे. संपूर्ण दक्षिण भारतात विखुरलेले तमिळ साहित्यिक आणि विद्वान पांडियन आणि चोला राजवटींच्या काळात मदुराई शहरात एकत्र येत. त्यांच्या सभेला ‘संगम’ म्हटले जाई. त्या वेळच्या काही तमिळ रचना आजही उपलब्ध आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी तमिळ ही भारतातील पहिली भाषा. तिला २००४ साली केंद्र सरकारकडून हा दर्जा प्राप्त झाला, त्या वेळी देशभरात कोणीच फारसा विरोध केला नाही याचे एक मोठे कारण म्हणजे संगम साहित्य आणि कुरल हे महाकाव्य. तमिळ भाषा किती प्राचीन आहे आणि त्याच वेळी किती श्रेष्ठ आहे याचा तो निर्विवाद पुरावा मानला गेला. तमिळनाडू सरकारतर्फे दर दोन-चार वर्षांतून एकदा जागतिक अभिजात तमिळ परिषद (World Classical Tamil Conference) भरवली जाते. आजवर मलेशिया, मॉरिशस, युनायटेड स्टेट्स, फ्रांस, श्रीलंका अशा विविध देशांमध्ये ती भरवली गेली आहे. जगभरचे तमिळप्रेमी अशा परिषदेसाठी एकत्र जमतात. अशा एका, २०१० साली जून २३ ते २७ दरम्यान कोईंबतूर येथे भरलेल्या, परिषदेचा वृत्तान्त विकिपीडियावर मला वाचायला मिळाला. त्या परिषदेचे थीम सॉंग तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी रचले होते आणि विख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांनी ते स्वरबद्ध केले होते. त्या गीताच्या सादरीकरणात अनेक बड्या कलाकारांचा सहभाग होता. या परिषदेचा एकूण खर्च पाचशे कोटी रुपये (हो, हाच आकडा नमूद केलेला आहे) एवढा अवाढव्य झाला होता. अशा परिषदा इथे किती भव्य प्रमाणावर आयोजित केल्या जातात आणि मातृभाषेला किती महत्त्व दिले जाते याची कल्पना यावरून येऊ शकते. तमिळ भाषा हेही द्रविड भूमीचे एक मोठे वैभव आहे हे निःसंशय.
साधारण सहा वाजता कविताला तिच्या मोटरीपाशी सोडून आम्ही पुढचा रस्ता धरला. ममल्लापुरम ते पुदूचेरी सुमारे दोन तासांचा रस्ता आहे. तिथे सनवे मनोर नावाच्या एका हॉटेलात मुक्काम केला. पुदूचेरी म्हणजे पूर्वीचे पॉंडिचेरी. भारतातील फ्रेंचांची ही वसाहत. १६६४ साली त्यांनी ती व्यापारासाठी म्हणून स्थापन केली. या व्यतिरिक्त भारतात फ्रेंचांच्या इतरही चार वसाहती होत्या; पण त्या अगदी छोट्या होत्या आणि त्यांचे प्रशासन पुदूचेरीहूनच होत असे. १९४७ भारत स्वतंत्र झाल्यावरही इथली फ्रेंच सत्ता कायम राहिली. १९५४ मध्ये या वसाहती भारतात समाविष्ट झाल्या. आज पुदूचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे.
पुदूचेरीचे दोन भाग आहेत. समुद्राला लागून असलेल्या जुन्या भागाला फ्रेंच क्वार्टर म्हणतात. तो भाग बहुतांशी पूर्वी होता तसाच आजही आहे. स्वच्छ रस्ते, दुतर्फा झाडे आणि टुमदार बैठ्या इमारती. शहराचा दुसरा भाग मात्र नव्याने विकसित झालेला आणि बराचसा बकाल आहे. आम्ही मुख्यतः फ्रेंच भाग बघितला. त्यासाठी सायकल रिक्षेने फेरी मारायची चांगली सोय होती. रिक्षा चालवणाराच गाईड म्हणूनही काम करत होता. फ्रेंच पद्धतीची दुकाने, घरे, हॉटेल्स, कार्यालये आजही तिथे जतन करून ठेवली आहेत. नावांचे काही फलकही फ्रेंच भाषेत आहेत. पोस्ट ऑफिस, नगरपालिका, कोर्ट, हॉस्पिटल वगैरेंच्या जुन्या इमारती आजही खूप आकर्षक वाटतात. फ्रेंच बागेत (ब्रेड) इथे खूप ठिकाणी मिळतो. फ्रेंच पद्धतीचे जेवणही काही ठिकाणी मिळते. फ्रेंच फॅशनचे कपडे आणि इतर अनेक घरगुती गोष्टी विकणारी दुकानेही आहेत. त्यासाठीही अनेक जण तिथे येतात. ब्रिटिशांपेक्षा फ्रेंच अनेक बाबतींत किती वेगळे होते याचे प्रत्यंतर ते सारे बघताना येते. ज्यांचा जन्म १९५४ पूर्वी पुदूचेरीत झाला होता त्या सर्वांना फ्रांसचे नागरिकत्व मिळू शकते. हे थोडेसे गोव्यासारखे आहे. तिथेही १९६१ पूर्वी, म्हणजे गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी तिथे जन्मलेल्या सर्वांना पोर्तुगालचे नागरिकत्व मिळू शकते. फ्रेंच कॉंस्युलेटदेखील इथे आहे. ज्यांच्याकडे त्या वेळेपासूनचे फ्रेंच नागरिकत्व आहे असे येथील काही वृद्ध लोक फ्रांसमधील निवडणुकीत मतदानदेखील करतात. अर्थात एक नक्की – पुदूचेरीवरचा फ्रेंच ठसा आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. जो काही उरला आहे तो फ्रेंच क्वार्टरपुरता सीमित आहे.
पुदूचेरीमधील मोठे आकर्षण म्हणजे योगी अरविंद (बंगाली उच्चार ऑरोबिंदो) यांचा आश्रम आणि त्यांची समाधी. अरविंद घोष हे एक विलक्षण तेजस्वी बंगाली व्यक्तिमत्त्व होते. चौदा वर्षे ते इंग्लंडमध्ये राहिले होते, तिथेच त्यांचे शिक्षण झाले. तत्कालीन आयसीएस परीक्षा ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले; पण इंग्रजांची नोकरी नाकारून ते भारतात बरोडा येथे नोकरीला आले. तिथे ते नऊ वर्षे राहिले. त्या काळात त्यांचा सशस्त्र क्रांतिकारकांशी निकटचा संबंध आला. त्याच वेळी विष्णु शंकर लेले नावाच्या एका विद्वानाला गुरू मानून ते योगशास्त्राचा अभ्यास करू लागले. पुढे त्यांनी ऐहिक जीवनाचा पूर्ण त्याग करून आध्यात्मिक मार्ग पत्करला. ‘जीवन हाच योगमार्ग’ (Integral Yoga) ही त्यांची मुख्य शिकवण होती. पुढे ‘मदर’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या मिरा अल्फासा नावाच्या एका फ्रेंच महिलेसह त्यांनी पॉंडिचेरी इथे मोठा आश्रम उभारला. पुढली चाळीस वर्षे त्यांनी तिथेच वास्तव्य केले. त्यांची, तसेच मदर यांची समाधीही इथे आहे. मदरना स्वच्छता, सुगंध आणि शांतता या तीन गोष्टी खूप आवडायच्या व त्यांचे आश्रमात कटाक्षाने पालन केले जाते. स्वच्छता इतकी पाळली जाते की पादत्राणे काढायची जागादेखील बरीच लांब आहे. हातपाय धुवायची जागोजागी सोय आहे. वातावरणात फुलांचा सुगंध सतत दरवळत असतो. कोणीही आपापसांत बोलत नाहीत – समाधीचे दर्शन घेतात आणि जवळच्या एखाद्या कट्ट्यावर अगदी शांतपणे बसून राहतात. कोणी आपापसांत अगदी बारीकशी जरी कुजबूज केली तर आसपासचे स्वयंसेवक त्यांना गप्प राहायची सूचना करतात. या तिन्ही गोष्टी आध्यात्मिक साधनेसाठी खूप उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. इथे आल्यावर त्यांचे महत्त्व विशेषच जाणवते. योगी अरविंद आणि मदर यांचे दोन-तीन हजार भक्त इथे जवळ जवळ कायमचे किंवा निदान दीर्घ काळासाठी वास्तव्य करून आहेत. तेथील पुस्तकांच्या दुकानात आम्ही आवर्जून गेलो. आश्रमाची विविध भाषांमधील भरपूर प्रकाशने तिथे विक्रीसाठी ठेवलेली होती; पण त्यात एकही मराठी पुस्तक नव्हते याचे मात्र मला आश्चर्य वाटले; कारण इथे नियमित येणारे पुण्या-मुंबईचे काही साधक माझ्या माहितीचे होते.
पुदूचेरीमधील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे ‘ओरोव्हील’ (उगवतीचे शहर) या नावाने प्रसिद्ध असलेला इथला एक प्रकल्प. तो बघायलाही अनेक लोक इथे येतात. मुख्यतः फ्रेंच साधकांनी ‘मदर’च्या मार्गदर्शनाखाली त्याची १९६८ मध्ये सुरुवात केली. एक नवे, शांततामय, आदर्श जग निर्माण करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचे प्रोटोटाइप म्हणजे ओरोव्हील. हा एकूण वीस चौरस किलोमीटरचा परिसर असून इथे आजही ५९ देशांतील सुमारे दोन हजार साधक राहतात. त्यांत बरेच फ्रेंच आहेत. या सगळ्यांना राहण्यासाठी टुमदार घरे बांधलेली आहेत. अनेक साधक इथे सहकुटुंबही राहतात. शाळा चालवणे, संगणक प्रशिक्षण देणे, हस्तकला, विणकाम, वर्कशॉपमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी बनवणे, सेंद्रिय शेती, फ्रेंच खाद्यपदार्थ तयार करून विकणे वगैरे विविध कामे इथे साधकांमार्फत चालू असतात. सुमारे चार-साडेचार हजार स्थानिक लोकांना या कामांमधून रोजगारही मिळतो. ‘मातृमंदिर’ ही ओरोव्हीलमधील मुख्य वास्तू आहे. सोनेरी मुलामा दिलेली, भव्य, पूर्ण गोलाकार अशी ही वास्तू लांबूनही लक्ष वेधून घेते. आतून ती अतिशय सुंदर आहे असे ऐकले होते; पण आम्हांला आतून ती बघता आली नाही. आत मुख्यतः मेडिटेशन करायला साधक जातात; पण तिथे आयत्या वेळी प्रवेश मिळत नाही, त्यासाठी आधी नोंदणी करावी लागते. त्यामुळे बरेच जण बाहेर जागा घेऊन दोन-चार दिवस राहतात, आत प्रवेश मिळायची वाट बघतात. ओरोव्हीलकडे जायच्या रस्त्यावर जागोजागी ‘होम-स्टे’ लिहिलेली घरे आम्हांला दिसली ती बहुधा या प्रवाशांच्या सोयीसाठीच असावीत. स्थानिक लोकांचे आणि ओरोव्हीलमधील रहिवाशांचे अधूनमधून मतभेद होत असतात; पण लवकरच काही ना काही तोडगा निघतो. जेव्हा पॉंडिचेरीवर फ्रेंच सत्ता होती तेव्हा साहजिकच फ्रेंच संस्कृतीचा इथे खूप पगडा होता. त्यामुळे पॉंडिचेरीला खूपदा ‘पॅरिस ऑफ द इस्ट’ (‘पूर्वेचे पॅरिस’) असेही म्हणत.
पुदूचेरीच्या निमित्ताने एकूणच भारतात इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात जो संबंध आला त्या विषयी लिहावेसे वाटते. मागे लिहिल्याप्रमाणे मद्रास येथे १६३९ साली इंग्रजांनी पाय रोवले खरे; पण एक राजकीय सत्ता म्हणून इंग्रज भारतात स्थिरावले ते १७५१ साली अरकॉट येथे झालेल्या एका महत्त्वाच्या लढाईनंतर. तमिळनाडूमध्ये – आणि खरेतर एकूणच भारतात, ब्रिटिश सत्ता कशी प्रस्थापित झाली हे समजून घेण्यासाठी बॅटल ऑफ अरकॉट या नावाने ओळखली जाणारी ही लढाई समजून घेणे आवश्यक आहे. औरंगजेबाच्या १७०७ साली झालेल्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य एकाएकी पार खिळखिळे झाले. वेगवेगळे नबाब आपापसांत भांडू लागले. आपल्याला ही एक सुवर्णसंधी आहे हे युरोपियन सत्तांनी बरोबर हेरले होते.
भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणारे ब्रिटिश हे एकमेव युरोपियन नव्हते. पोर्तुगीज, डेन, डच व फ्रेंच यांनाही भारतातून होत असलेल्या अत्यंत फायदेशीर व्यापारात रस होता. या सर्वच देशांच्या स्वतःच्या व्यापारी कंपन्या होत्या आणि त्या-त्या देशाची इस्ट इंडिया कंपनी म्हणूनच त्या ओळखल्या जात. त्यांच्यापैकी केरळच्या किनार्यावर आलेले पोर्तुगीज इतर सर्वांच्या बर्याच आधीपासून होते. पश्चिम किनारपट्टीवर केरळ, गोवा, मुंबई, वसई आणि दीव-दमण इथे त्यांनी आपले बस्तान उत्तम बसवले होते आणि त्या छोट्या देशाला अन्य भारतात विस्तार करण्यात फारसे स्वारस्य नव्हते. डेन म्हणजे डेन्मार्कचे लोक फक्त बंगालमधील सेरामपूर आणि केरळमध्ये एक-दोन ठिकाणी होते; तिथूनही ते लवकरच बाहेर पडले कारण मुळात तो देश वसाहती स्थापायला फारसा उत्सुक कधीच नव्हता. डचदेखील लवकरच भारतातून बाहेर पडले. इंडोनेशियासारखा एक मोठा आणि संपन्न आशियाई देश त्यांचा हातात पडल्यावर त्यांना इतर वसाहतींमध्ये फारसा रस नव्हता. इंग्रजांबरोबरच्या स्पर्धेत आता फक्त फ्रेंच उरले. फ्रेंच व इंग्रज भारतात थेट एकमेकांशी लढत नसत; तर वेगवेगळ्या भारतीय सत्तांना पाठिंबा देत व त्या सत्तांना आपापसात झुंजवत ठेवून स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपत.
मद्रासपासून शंभरएक किलोमीटरवर असलेले अरकॉट हे शहर म्हणजे चंदा साहिब या कर्नाटकाच्या मुस्लिम नबाबाची राजधानी होती. त्या काळाच्या मानाने ते खूपच मोठे शहर होते. तेथील लोकवस्ती जवळजवळ एक लाख होती – तत्कालीन मद्रासच्या अनेक पट. या नबाबाला जोसेफ डुप्ले (Dupleix) ह्या भारतातील कर्तबगार फ्रेंच सेनाप्रमुखाचा पाठिंबा होता. या उलट ब्रिटिशांचा त्रिचनापल्ली येथील महंमद अली खान वालाजा याला ब्रिटिश सेनेचा पाठिंबा होता. वालाजाचा आणि ब्रिटिश सैन्याचा पाडाव करण्यासाठी चंदा साहिबने त्रिचनापल्ली येथे वेढा घातला. तो वेढा त्याने उठवावा म्हणून मद्रासवरून रॉबर्ट क्लाइव्ह याने अगदी थोड्या सैनिकांसह थेट अरकॉटवर धाडसी स्वारी केली आणि त्या शहराचा ताबा घेतला. त्याला अरकॉटमधून हटवण्यासाठी चंदा साहिब व त्याचे फ्रेंच मदतनीस अपेक्षेप्रमाणे घाईघाईने अरकॉटला परतले. त्या वेळी झालेल्या लढाईत क्लाइव्ह जिंकला. खरेतर त्याच्याकडे जेमतेम दोनशे सैनिक उरले होते – त्यातही एकशे वीस देशी आणि अवघे ऐंशी गोरे. दुर्दैवाने या देशी सैनिकांनी परक्या इंग्रजांना पुरती साथ दिली; स्वतः फक्त भाताची पेज खाऊन ते गोऱ्या सैनिकांना भात खायला देत असत! त्यांनी गोऱ्यांची म्हणजेच परक्यांची बाजू का घेतली, परक्यांना आपली निष्ठा का अर्पण केली हे सांगणे अवघड आहे. क्लाइव्हने तोफगोळ्यांचा वापर सुरू करताच काही गोळे नबाबाच्या सेनेतील हत्तींवर पडले. त्यामुळे ते हत्ती उधळले व उलटे फिरले. नबाबाची घाबरलेली दहा हजारांची सेना अवघ्या एका तासात इतस्ततः पांगली आणि शेवटी मोठ्या प्रमाणावर मारली गेली. इंग्रजांची जवळपास काहीच प्राणहानी झाली नाही. अगदी सहजगत्या त्यांना विजय मिळाला. ही लढाई झाली १४ नोव्हेंबर १७५१ रोजी – म्हणजे प्लासीच्या लढाईच्या सहा वर्षे आधी.
या बॅटल ऑफ अरकॉटमुळे भारतात इंग्रजांचा दबदबा प्रस्थापित झाला. आपली संख्या कितीही कमी असली तरी भारतातील मोठ्या फौजांना आपण हरवू शकतो आणि भारतात व्यापाराबरोबर आपले राज्यदेखील स्थापन करू शकतो, याची जाणीव त्यांना झाली. तोपर्यंत एक सामान्य अधिकारी असलेल्या क्लाइव्हचे महत्त्वही खूप वाढले. पुढे तो बंगालमध्ये गेला आणि इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर म्हणून त्याची नेमणूक झाली. भारतातील ब्रिटिश सत्तेची ही रुजवात होती. क्लाइव्हचे चरित्रकार मार्क बेन्स-जोन्स (Bence-Jones) यांनी लिहिले आहे, ‘आमचा अरकॉटमधील विजय म्हणजे कदाचित केवळ नशिबाचा भाग असेल, कदाचित शत्रुपक्षाने केलेल्या घोडचुकांमुळे तो मिळालेला असेल; पण कारण काहीही असले तरी या विजयामुळे इंग्लिश फौज किती धाडसी आहे, तिच्यावर मात करणे कसे अशक्य आहे याचा लौकिक भारतभर पसरला आणि त्यानंतर भारतात आम्हांला एकामागोमाग एक असे यशच मिळत गेले.’
इथे आणखी एक कायम दुर्लक्षित राहिलेला पण महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. त्या वेळी युरोपमध्ये ह्या सगळ्या राष्ट्रांमध्ये आपापसांत सतत लढाया चालू असत व त्यांचे परिणाम भारतातील त्यांच्या हालचालींवर होत असत. एका अर्थाने भारतातील राजकारणावर युरोपियन राजकारणाचा पडत असलेला हा मोठा प्रभाव होता. भारत सोडून जायचा निर्णय १९४७ साली ब्रिटिशांनी घेतला यामागेही अर्थातच युरोपातील दुसरे महायुद्ध हे एक महत्त्वाचे कारण होतेच.
पुढे १७६३ साली युरोपात ब्रिटन आणि फ्रांस यांच्यात ‘ट्रिटी ऑफ पॅरिस’ या नावाने एक करार झाला. त्या करारान्वये फ्रेंचांना भारतात दक्षिणेला मद्रासजवळ पॉंडिचेरी आणि इतर चार ठिकाणी स्वतःचा व्यापार करण्यासाठी वसाहती स्थापायला परवानगी दिली गेली; पण उर्वरित भारतात त्यांनी कुठेही ब्रिटिश सत्तेत ढवळाढवळ करायची नाही असे ठरले. अशा प्रकारे युरोपियनांच्या दृष्टीने भारत आता जवळजवळ पूर्णतः ब्रिटिश प्रभावाखाली आला. ब्रिटिशांनी अफगाणिस्थानपासून ब्रह्मदेशापर्यंत प्रचंड अशा भारतवर्षावर राज्य केले; परंतु अगदी टीचभर अशा या फ्रेंच वसाहती मात्र ताब्यात घेतल्या नाहीत, याचे कारण म्हणजे हाच करार. ब्रिटिशांनी गोवा अगदी सहज शक्य असूनही आपल्या ताब्यात कधीच घेतला नाही याचेही कारण असेच आहे – पोर्तुगालबरोबर युरोपात झालेला त्यांचा करार. भारतातील बऱ्याच घडामोडींवर स्थानिक कारणांपेक्षा युरोपातील घटनांचा अधिक प्रभाव पडत होता. याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे मद्रासवर हल्ला करून तेथील सत्ता फ्रेंचांनी १७४६ साली ताब्यात घेतली होती आणि इंग्रजांना हुसकावून लावले होते; पण पुढे युरोपात १७४९ साली ब्रिटन आणि फ्रांस यांच्यात एक करार झाला व त्यानुसार कॅनडातील क्वेबेक हा प्रांत इंग्रजांनी फ्रेंचांना दिला आणि त्या बदल्यात फ्रेंचांनी मद्रासचा ताबा पुन्हा इंग्रजांना दिला! समजा युरोपात त्या दोन राष्ट्रांत तसा करार झाला नसता आणि इंग्रजांऐवजी फ्रेंचांनी भारत घेतला असता, तर आपल्या देशात काय बदल घडले असते, हा विचार कधी कधी मनात येतो!
आणखी एक विचार माझ्या मनात आला. स्वामी विवेकानंद तपश्चर्या करण्यासाठी कलकत्त्याहून पार कन्याकुमारीला गेले; तर योगी अरविंद थेट पॉंडिचेरीला आले. आपला बंगाल प्रांत सोडून ते इतक्या लांब आले; पण आपण कुठेतरी परक्या भूमीत आलो आहोत असे काही त्यांनी वाटल्याचे जाणवत नाही. तशा प्रकारची एकता आज भारतात आहे याची खात्री देववत नाही. नोकरीसाठी लोक स्थलांतर करतात; पण एखादे आध्यात्मिक ध्येय समोर ठेवून कोणी दुसऱ्या प्रांतात वास्तव्य केल्याचे सहसा आढळत नाही. देशातील विविध प्रांतांत एकता निर्माण व्हावी यासाठी इंग्रजांसारखा कोणीतरी समान शत्रू असणे आवश्यक असते का?
पुदूचेरीवरून आम्ही परतीच्या वाटेला लागलो तेव्हा बरीच संध्याकाळ झाली होती. ममल्लापुरमपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर कल्पकम परमाणु ऊर्जा (न्यूक्लिअर पॉवर) प्रकल्प आहे. परतताना अण्णांनी आम्हांला ते कल्पकम लांबूनच दाखवले. “इथे निर्माण होणाऱ्या विजेचा फायदा आम्हांला चेन्नईमध्येही मिळतो, त्यामुळेच आमच्याकडे कधीच वीज जात नाही,” अण्णा सांगत होते. ममल्लापुरमचा प्राचीन वारसा आणि कल्पकमचा अत्याधुनिक प्रकल्प शेजारी शेजारी असणे हीदेखील एक गंमतच म्हणायची!

मागील पानावरून पुढे चालू असलेले ” तमिळनाडू (2)” हे प्रवासवर्णन अतिशय मनोवेधक आहे. या प्रवासवर्णनातील प्रदेश पाहिलेल्या व इतिहासाची आवड असलेल्या माझ्यासारख्या वाचकास तर ते आणखीनच भावले!