शनिवार, १३ जानेवारी २०२४.
चेन्नईच्या कामराज डोमेस्टिक विमानतळावर मी आणि माझा पंढरपूरचा मित्र डॉ. अनिल जोशी यांनी पाऊल ठेवले तेव्हा रात्रीचे दोन वाजत आले होते. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या चौदा जानेवारीची सुरुवात झाली होती. पुण्याहून निघालेली आमची फ्लाइट तशीही मध्यरात्रीच पोचणार होती आणि त्यातही पुन्हा त्या दिवशी ती तब्बल दोन तास लेट होती; तरीही अनिलचे व्याही (सुनेचे वडील) आशुतोष आपटे आम्हांला न्यायला आले होते. “खूप ताटकळत राहावं लागलं तुम्हांला,” ते भेटताच आम्ही दिलगिरी प्रदर्शित करत म्हटले. “छे हो! त्याच्यात काय एवढं? फ्लाइटचं येणं काही आपल्या हातात नसतं,” असे म्हणत त्यांनी आमचा संकोच झटक्यासरशी दूर केला आणि आम्ही पार्किंग लॉटकडे चालू लागलो. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची बारीकशीही छटा नव्हती. सगळे त्यांना ‘अण्णा’ म्हणतात असे अनिल म्हणाला त्यामुळे मीही त्यांना ‘अण्णा’ म्हणायला सुरुवात केली.
परक्या गावात आपण जातो तेव्हा कोणीतरी स्थानिक जाणकार न्यायला आला असला की सगळे किती सोपे जाते! त्यांच्याच घरी आमचा मुक्काम असणार होता. “अरे, आपण हॉटेलात राहू. तुझं-त्यांचं नातंतरी आहे; पण माझ्यासारख्या परक्या माणसाने त्यांच्याकडे असा दहा दिवस मुक्काम ठेवणं म्हणजे…” या प्रवासाचे नियोजन करतानाच अनिलला म्हणालो होतो; पण त्यावर, “त्यांच्याकडेच दोघांनीही राहावं असा त्यांचा आग्रह आहे. आपण हॉटेलात राहिलो तर त्यांना वाईट वाटेल,” असा खुलासा त्याने केला होता. त्यांचा तो आग्रह अगदी मनापासूनचा होता याची साक्ष पहिल्या पाच-दहा मिनिटांतच मला पटली.
तीन पिढ्या तिथेच स्थायिक असल्यामुळे साहजिकच अण्णांना चेन्नईची खडान् खडा माहिती होती. ड्राइव्ह करत असताना आजूबाजूचे रस्ते, इमारती यांच्याविषयी सांगत होते. आमच्या दहा दिवसांच्या शोधयात्रेतील थोडासाही वेळ वाया जाणार नाही याची ग्वाही जणू त्यातून मिळत होती.
१४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस. त्याला तिथे पोंगल म्हणतात. तेथील तो सर्वांत मोठा सण; खूप उत्साहाने व थाटात साजरा होणारा. रात्रीची वेळ असूनही सगळीकडे रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा चमचमत होत्या, रांगोळ्या काढल्या होत्या, फुलांची आरास केली होती. पोंगलच्याच दुसऱ्या दिवशी आपण ज्याला पोळा म्हणतो तो बैलांची पूजा करायचा सण साजरा होतो. त्या दिवशी तमिळनाडूमधे अनेक ठिकाणी जल्लिकट्टूचे आयोजन केले जाते. जल्लिकट्टू म्हणजे एखाद्या माजलेल्या धिप्पाड बैलाशी माणसाने झुंज देणे आणि त्याच्या पाठीवरच्या वशिंडाच्या आधारे त्याच्यावर स्वार होऊन त्याला बंदिस्त करणे. लोकांच्या गर्दीत असे बैल मोकाट सुटतात; त्या वेळी अनेकदा बैल जखमी होतात आणि माणसेही जखमी होतात. पूर्वापार चालत आलेला आणि प्रचंड लोकप्रिय असलेला हा एक साहसी क्रीडा प्रकार आहे – स्पेनमधील प्रसिद्ध बुलफाईटसारखा. अनेक प्राणिप्रेमी संघटनांचा या जल्लिकट्टूला विरोध असतो कारण त्यांच्या मते या प्रकारात बैलांचा छळ केला जातो. त्यांनी हे प्रकरण कोर्टात नेले आणि जल्लिकट्टूवर बंदी आली; पण ती लोकांनी अजिबात जुमानली नाही. कोर्टाच्या आदेशाला विरोध करण्यासाठी २०१७ साली चेन्नईच्या मरीना बीचवर प्रचंड निषेधसभा भरली होती – तिला दहा लाख लोक हजर होते. ‘तमिळनाडूच्या इतिहासातील सर्वांत मोठे आंदोलन’ असे या सभेचे वर्णन केले गेले आहे. तमिळ समाजात परंपरेचे सामर्थ्य किती प्रचंड आहे याचा अंदाज यावरून येतो. हा जल्लिकट्टू राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कसा साजरा झाला याची काही क्षणचित्रे आम्हीही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बघू शकलो.
आय आय टी चेन्नई येथे पोंगलनिमित्त काढलेली एक रांगोळी
या प्रवासाची सुरुवात मी चेन्नईपासून केली यालाही एक मोठे कारण आहे. अनेकांच्या मते भारताचा प्रचलित इतिहास उत्तर भारताला प्राधान्य देणारा आणि दक्षिण भारताकडे तुलनेने दुर्लक्ष करणारा आहे. उत्तरेतल्या चंद्रगुप्त, समुद्रगुप्त किंवा मुघल सलतनत यांच्या तुलनेत आपल्याला दक्षिणेतील पल्लव, पांडियन, चोला आणि चेर वंशांचे राजे माहिती नसतात. तुलसीदास आणि कबीर ठाऊक असतात, पण थिरुवल्लुवर आणि सर्वज्ञ यांची नावेही आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेली नसतात. झाशीच्या राणीइतकी कित्तूरची चेन्नम्मा ठाऊक नसते. प्लासीची लढाई ठाऊक असते; पण इतिहासाला तेवढीच कलाटणी देणारी अरकॉटची लढाई ठाऊक नसते. दिल्ली आणि बनारसइतकी विशाखापट्टणम किंवा कोची ही शहरे परिचित नसतात. टाटा आणि बिर्ला यांच्याइतकी मुरुगप्पन आणि मुथूट ही नावे कानावरून गेलेली नसतात. या तुलनेने कमी परिचित असलेल्या दक्षिण भारताचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चेन्नई; म्हणून सुरुवात इथूनच केली. केवळ मित्रप्रेमासाठी मला साथ द्यायला अनिल आपली मेडिकल प्रॅक्टिस दहा दिवस बंद ठेवून तयार झाला हा माझ्यासाठी एक मोठाच भाग्ययोग होता.
आपटेंचे घर के.के. नगर या उच्च मध्यमवर्गीय वस्तीत आहे. के.के. म्हणजे ज्यांचे नाव त्या परिसराला दिले आहे त्या कलइगनर करुणानिधी यांचे लघुरूप. करुणानिधी साधारण वीस वर्षे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांचेच चिरंजीव स्टॅलिन हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ‘कलइगनर’ म्हणजे कलाकार. आपली पहिली ओळख कलाकार हीच आहे असे करुणानिधी म्हणत. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपली पहिली कादंबरी लिहिली होती. पुढे एक लेखक म्हणून ते खूपच विख्यात झाले; म्हणूनच आपल्या नावामागे ‘कलइगनर’ हे विशेषण ते आवर्जून लावत.
आम्ही घरी पोचलो तेव्हा रात्रीचे अडीच-तीन वाजले होते; तरीही अण्णांच्या पत्नी स्वातीताई यांनी आमचे अगदी प्रेमाने स्वागत केले. आपटेंचे घर भपकेदार नाही, पण चांगले सजवलेले वाटले. उत्तरेत डोळ्यांत भरणारा राहणीतील भपका एकूणच दक्षिणेत जाणवत नाही. समोरच देवघर होते, भिंतींवर जुन्या तसबिरी, चित्रे आणि कलाकुसरीच्या वस्तू. उदबत्तीचा दरवळणारा सुगंध. चेन्नईमध्ये पुढच्या दहा दिवसांत काय काय करायचे याची थोडीफार आखणी झाली आणि थोड्याच वेळात अण्णा आम्हांला त्यांच्या गेस्ट बेडरूममध्ये घेऊन गेले. कधी एकदाचे झोपतो असे एव्हाना आम्हांलाही झाले होते.
इतर बहुतेकांप्रमाणे माझ्याही चेन्नई दर्शनाची सुरुवात जॉर्ज टाउनपासूनच झाली. अमेरिकेपासून मलेशियापर्यंत जिथे जिथे ब्रिटिशांचे राज्य होते तिथे तिथे या नावाचा शहराचा एखादा प्रमुख भाग असतो – इंग्लंडच्या राजाची स्मृती जागवणारा. चेन्नईमध्येही तसाच जॉर्ज टाउन नावाचा एक भाग आहे. ब्रिटिशांनी मद्रासमध्ये आपले बस्तान बसवायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात आधी हाच भाग त्यांनी विकसित केला.
विजयनगर साम्राज्याचा एक भाग असलेल्या नायक घराण्याच्या राजाने तीन मैल लांबीची समुद्रकिनाऱ्यावरची एक छोटीशी जागा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला २२ ऑगस्ट १६३९ रोजी कराराने व्यापारासाठी दिली. तो सगळा दलदलीचा भाग होता आणि अगदी मूठभर कोळी सोडले तर तिथे कोणाचीच वस्ती नव्हती. त्या जागेला मद्रासपट्टणम म्हणत. इंग्रजांनी तिला मद्रास म्हटले. तिथेच त्यांनी आपली भारतातली पहिली वसाहत उभारली. त्यापूर्वी इंग्रजांची सुरत येथे एक वखार होती, जिला ते फॅक्टरी म्हणत; पण तिथे पक्की वसाहत अशी नव्हती. मद्रासमधील उभारणी मात्र वसाहत याच स्वरूपात केली. कर्मचाऱ्यांसाठी घरे, कार्यालये, माल साठवण्यासाठी वखार बांधली. ‘फोर्ट सेंट जॉर्ज’ हा भारतातील आपला पहिला किल्ला उभारला. आवतीभोवतीच्या परिसराला जॉर्ज टाउन हे नाव दिले. आज जवळजवळ चारशे वर्षांनंतरही त्याच नावाने हा भाग ओळखला जातो. जसजसा व्यापार वाढत गेला तसतसा भोवतालचा थोडाथोडा भाग ते आपल्या ताब्यात घेऊ लागले. स्थानिकांशी संपर्क साधण्यासाठी इंग्रजांना दुभाषी अत्यावश्यक होते. या कामाचे चांगले पैसे दिले जात; कारण त्याशिवाय त्यांना तिथे व्यापार करताच आला नसता. साहजिकच आजूबाजूच्या गावांतील अनेक तरुण तिथे येऊ लागले, थोडेबहुत इंग्रजी शिकू लागले. मुंबईत शिवसेनेचा उदय झाला त्या काळात इंग्रजी अधिक चांगले येत असल्याने तमिळ लोक नोकऱ्या मिळवतात आणि आमच्या मराठी तरुणांना त्या मिळत नाहीत याबद्दल खूप संताप व्यक्त व्हायचा. तमिळ लोकांचे इंग्रजी तुलनेने अधिक चांगले व्हायला त्या चारशे वर्षांपूर्वीच्या परिस्थितीपासूनच सुरुवात झाली होती! भारतात आजही इंग्रजी भाषा टिकून राहिली याचे मोठे श्रेय तमिळनाडूला द्यावे लागेल. जागतिकीकरणाच्या काळात याचा मोठा फायदा आजच्या तरुण पिढीला होत आहे.
आजही या परिसरात फिरताना तो जुना इतिहास आपण डोळ्यांपुढे उभा करू शकतो. त्या दृष्टीने ब्रिटिशांनी तिथे उभारलेले दोन म्युझियम्स आवर्जून बघावेत असे आहेत; १७९५ साली उभारलेला फोर्ट म्युझियम आणि १८५१ साली उभारलेले मद्रास म्युझियम. तिथे अर्धा दिवस घालवणे हा माझ्यासाठी महत्त्वाचा अनुभव ठरला. आजच्या काळाच्या संदर्भातील एक विशेष म्हणजे पिंगली वेंकय्या यांनी तयार केलेला भारताचा पहिला तिरंगा ध्वज याच फोर्ट म्युझियममध्ये तिसऱ्या मजल्यावर ठेवलेला आहे. केवळ मद्रासचा नव्हे तर एकूणच भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी बरीच उपयुक्त माहिती तिथे मिळाली. कंपनी सरकारची नाणी, पत्रव्यवहार, कर्तबगार सेवकांना दिली जाणारी पदके, तत्कालीन चित्रकारांनी काढलेली उत्तम रंगीत चित्रे तिथे बघायला मिळतात. राजा रवि वर्मा यांची काही तैलचित्रेही इथे आहेत. त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन मद्रासमध्येच १८७३ साली झाले होते.
ज्याने १७९३ साली टिपू सुलतानाचा पराभव केला त्या लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा एक भव्य पुतळा तिथे आहे. टिपू सुलतानाने कराराचा भंग करू नये म्हणून कॉर्नवॉलिसने ओलीस म्हणून ठेवलेली टिपूची दोन लहान मुलेही त्या पुतळ्याचा एक भाग आहेत. आपल्याला या गोऱ्या सैनिकांनी का पकडले असेल हेही त्या बिचाऱ्यांना समजले नसेल. ती कोवळी मुले बघताना माझे डोळे काहीसे पाणावले. त्या काळी कंपनीचे सैनिक घालत असलेल्या गणवेषाचे तसेच वापरत असलेल्या हत्यारांचे नमुनेदेखील इथे बघायला मिळाले. सुरुवातीच्या काळात केवळ मूठभर इंग्रज व थोडे भारतीय सैनिक कंपनीच्या चाकरीत होते. पुढे वाढत्या व्यापाराबरोबर सैनिकांची संख्या वाढत गेली. कंपनीचे सैनिक म्हणजे ‘कवायती फौज’ होती; त्यांची कार्यपद्धती, त्यांचे गणवेष, त्यांची शिस्त, त्यांच्या परेड्स, वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचे तंतोतंत पालन, बंदुका आणि तोफांसारखी त्यांची हत्यारे या साऱ्याचे तत्कालीन भारतीय राजांना नावीन्य आणि आकर्षण होते; म्हणूनच वेगवेगळे भारतीय राजे भरपूर पैसे देऊन कंपनीची फौज ‘तैनाती फौज’ म्हणून आपल्या पदरी बाळगू लागले. एकमेकांशी सतत होणाऱ्या लढायांतही हे स्थानिक राजे इंग्रजांची मदत घेत. यातूनच खरेतर इंग्रजांना भारतीयांची आपापसांतील दुही कळून चुकली आणि त्यातूनच पुढेमागे इथे स्वतःचे राज्य स्थापण्याचे मनसुबे ते करू लागले. आपणच आपले वैरी ठरलो. इंग्रजांनी भारतात उभारलेली पहिली लष्करी पलटण मद्रास रेजिमेंट हीच होती. पंजाबी किंवा गुरखा समाजाप्रमाणे तमिळ समाजाचा उल्लेख आपण ‘मार्शल रेस’ म्हणून करत नाही; पण त्यांच्यामधूनच १७५० साली इंग्रजांनी आपली ही पहिली पलटण उभारली. याच फोर्ट सेंट जॉर्जमध्ये आज तमिळनाडू सरकारचे विधानभवन आहे; अनेक महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत. त्यामुळे आम्ही गेलो तेव्हाही इथे प्रचंड पोलीस बंदोबस्त होता.
इथेच १६७८ साली ब्रिटिशांनी भारतातील त्यांचे पहिले अँग्लिकन चर्च उभारले – सेंट मेरी चर्च. पुढे भारताचा पहिला गव्हर्नर म्हणून प्रसिद्ध झालेल्या रॉबर्ट क्लाइव्ह याचे, तसेच कंपनीचे एक उच्च अधिकारी एलिहू (Elihu) येल याचे लग्न याच चर्चमध्ये झाले. येल यानेच मद्रासमधील प्रत्येक रस्त्याला नाव द्यायला सुरुवात केली; त्यापूर्वी येथील रस्त्यांना नावे नसत. पण हा कर्तबगार येल भ्रष्टाचारीदेखील निघाला. त्यामुळेच त्याला पुढे काढून टाकले गेले. भारतात त्याने अनेक प्रकारचा व्यापार केला; त्यात थोड्या प्रमाणात गुलामांचा व्यापारदेखील होता. यातून मिळवलेल्या संपत्तीतून त्याने एका अमेरिकन विद्यापीठाला मोठी देणगी दिली आणि त्यामुळे ते विद्यापीठ ‘येल युनिव्हर्सिटी’ याच नावाने आज ओळखले जाते. अमेरिकेतील सर्वांत नामांकित विद्यापीठांतील ते एक मानले जाते. या सेंट मेरी चर्चमध्ये आजही अनेक स्थानिक ख्रिस्ती जात असतात. आम्ही तिथे असताना बघितलेले एक दृश्य मला लक्षवेधक वाटले. एक तरुण मुलगी बराच वेळ चर्चमध्ये गुडघे टेकून आणि मान खाली घालून प्रार्थना करत होती. नंतर ती उठली तेव्हा बघितले की तिचे दोन्ही हात, नमस्कार करताना आपण हिंदू जोडतो तसेच, जोडलेले होते. धर्म बदलल्यानंतरही मूळचे सांस्कृतिक संस्कार कायम राहत असावेत.
सेंट मेरी चर्चपेक्षा बरेच प्राचीन असे आणखी एक चर्च चेन्नईमध्ये सेंट थॉमस माऊंट नावाच्या एका टेकडीवर बांधलेले आहे; सेनथोम हे ख्रिश्चनांमधील कॅथॉलिक पंथाचे चर्च. हे नाव म्हणजे सेंट थॉमस या नावाचा अपभ्रंश असावा. ख्रिस्ताच्या मूळ बारा शिष्यांपैकी एक असलेला थॉमस (शंकेखोर स्वभावामुळे ज्याला ‘डाउटिंग थॉमस’ म्हणतात तो) इसवी सन ७२ मध्ये इथे आला होता, इथेच सर्पदंशाने इथेच १६७८ साली ब्रिटिशांनी भारतातील त्यांचे पहिले अँग्लिकन चर्च उभारले – सेंट मेरी चर्च. पुढे निधन झाले आणि इथेच त्याचे थडगे होते असे म्हणतात. आज त्याचे सर्व अवशेष इटली येथे असून केवळ हाडाचा एक तुकडा प्रतीकात्मक स्वरूपात इथे आहे. त्यावर एक क्रॉसही बांधलेला आहे. सोळाव्या शतकात बहुतांशी कॅथॉलिक असलेल्या पोर्तुगिजांनी याच जागी हे कॅथॉलिक चर्च उभारले.
सेंट थॉमस माऊंटवरची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एका झाडाखाली असलेला आणि पट्कन दृष्टीस न पडणारा विलियम लॅंबटन याचा अर्धपुतळा. ईस्ट इंडिया कंपनीत एक सर्व्हेअर म्हणून तो नोकरी करत होता आणि त्यानेच १८०२ साली भारताच्या पहिल्या भूमापनाची इथून सुरुवात केली. अक्षरशः पायी फिरतफिरत, एकएक इंच जमिनीचे त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोजमाप घेतले. जमिनीचे क्षेत्रफळ तसेच समुद्रसपाटीपासूनची उंची आणि खोली यांचा त्या मोजमापनात समावेश होता. त्यासाठी ट्रिगोनोमेट्री (त्रिकोणमिती) हे विज्ञान त्यांनी वापरले. तत्कालीन जगातील हे सर्वाधिक मोठे भूमापन होते. दक्षिणेला कन्याकुमारीपासून उत्तरेला पार हिमालयापर्यंत संपूर्ण भारतभूमीचे लॅंबटनने त्याच्या आठशे सहकाऱ्यांच्या मदतीने प्रथमच शास्त्रशुद्ध मापन केले. Great Trigonometrical Survey of India (GTSI) या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. याच कामात गर्क असताना १८२३ साली नागपूरजवळ हिंगणघाट येथे त्याचे निधन झाले आणि त्यानंतर त्याचा एक सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट याने १८७१ साली हे काम पूर्ण केले. त्याची आठवण म्हणून हिमालयाच्या सर्वोच्च शिखराला ‘माऊंट एव्हरेस्ट’ हे नाव दिले गेले. अर्थात या प्रकल्पाची सुरुवात विलियम लॅंबटन याने केली होती आणि त्याच्या या अभूतपूर्व कार्याचे स्मारक म्हणून २००३ साली भारत सरकारने हा अर्धपुतळा उभारला. या कामाच्या प्रारंभाला दोनशे वर्ष पूर्ण झाली याचे औचित्य साधून. एका इंग्रज अधिकाऱ्याची बूज स्वतंत्र भारतात अशी राखली गेली हे कौतुकास्पद आहे. १७ सप्टेंबर २००३ रोजी त्या वेळचे सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया पी. नाग यांनी या पुतळ्याचे अनावरण केले.
हळूहळू मद्रासची वस्ती वाढत गेली. सर्वांत आधी पोर्ट (बंदर), त्यानंतर फोर्ट (किल्ला), नंतर सरकारी इमारती आणि त्यानंतर मग लोकांची वस्ती याच अनुक्रमाने शहर विकसित होत गेले. कलकत्ता आणि मुंबईची तत्कालीन नगररचनाही साधारण याच अनुक्रमाने झाली आहे. आपण इथे प्रत्यक्ष कारभारदेखील चालवणार आहोत हे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी मद्रासमध्ये २९ सप्टेंबर १६८८ रोजी नगरपालिका सुरू केली. देशातील ही पहिली नगरपालिका. शिक्षण, साफसफाई, सुरक्षा, रस्तेबांधणी, आरोग्य वगैरे सुविधा देणाऱ्या आधुनिक नगरप्रशासनाची ती सुरुवात होती. कालांतराने ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक’ मानल्या गेलेल्या गव्हर्नर-जनरल लॉर्ड रिपन याचा भव्य संगमरवरी पुतळाही इथून जवळच आहे. त्याच्याच नावाने प्रसिद्ध असलेली ‘रिपन बिल्डिंग’ ही महानगरपालिकेची इंग्रज काळातली पांढरीशुभ्र लांबलचक इमारत खूपच सुंदर आहे. आजही तेच चेन्नई महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आहे. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या अनेक योजना कंपनीने अंमलात आणल्या. आधुनिक शिक्षणालाही प्राधान्य दिले. १७९४ साली ईस्ट इंडिया कंपनीने सर्व्हेअर्स तयार करण्यासाठी एक शाळा काढली होती. तिचेच पुढे गिंडी भागातील सुप्रसिद्ध कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बनले. तांत्रिक शिक्षण देणारी केवळ भारतातील नव्हे तर एकूणच युरोपबाहेरील ही पहिली संस्था होती.
भारतातील पहिले कोर्टदेखील इंग्रजांनी इथेच सुरू केले. आजही त्या कोर्टाची लाल रंगाची प्रचंड मोठी इमारत लांबूनही नजरेत भरते. लंडनचा अपवाद सोडला तर अन्य कुठल्याही शहरातील कोर्टाची इमारत एवढी मोठी नाही. आपल्या देशात एक व्यवसाय म्हणून वकिली याच शहरात प्रथम अस्तित्वात आली. पूर्वी दोन राज्यकर्त्यांमधील व्यावहारिक देवाणघेवाणीचे काम पाहणाऱ्या मुत्सद्द्यांना उद्देशून वकील ही संज्ञा वापरली जायची; आता मात्र वकील म्हणजे तुमच्याकडून फी घेऊन कोर्टात तुमची बाजू मांडणारी व्यक्ती हे लोकांना कळले. न्यायाधीश, वकील, त्यांचे काळे डगले, आपली केस लढताना वापरली जाणारी विशिष्ट भाषा, आरोपी, वकील व साक्षीदार यांच्या जागा, कोर्टाची रचना वगैरे बाबी इथेच सुरू झाल्या आणि त्या काळात त्या जशा होत्या तशाच त्या बहुतांशी आजही प्रचलित आहेत.
समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा प्रोमेनाड (बीच फ्रंट) विकसित करायला १८८१ साली सुरुवात झाली. राजाजी सलाई आणि अण्णा सलाई हे इथले मुख्य रस्ते. तमिळ भाषेत सलाई म्हणजे रस्ता. हे चेन्नईमधील सर्वांत महत्त्वाचे रस्ते. अनेक प्रमुख सरकारी इमारती तसेच चेपॉकचे क्रिकेट स्टेडियम बीचजवळच आहे. थॉमस पॅरी या बड्या ब्रिटिश उद्योगपतीच्या पॅरीज या अडीचशे वर्षे जुन्या कंपनीचे मुख्य कार्यालय इथेच आहे; त्यामुळे पॅरीज कॉर्नर या नावानेही हा परिसर ओळखला जातो. बिन्नी, स्पेन्सर्स, सिंपसन, लुकास, अशोक लेलंड अशा अनेक जुन्या इंग्लिश कंपन्या आजही चालू आहेत. विवेकानंद हाऊस नावाच्या एका मोठ्या इमारतीने माझे लक्ष वेधून घेतले. या नावाची एक गंमत आहे. पूर्वी याला आइस हाऊस म्हणत. येथील दमट हवेपासून थोडा आराम मिळावा म्हणून इंग्रज राज्यकर्ते स्वतःसाठी अमेरिकेहून बोटीने बर्फ मागवत आणि तो बर्फ या इमारतीत साठवून ठेवला जाई. पुढे चेन्नईमध्येच बर्फ तयार करायची सुविधा निर्माण झाल्यावर त्या जुन्या इमारतीची गरज राहिली नाही. स्वामी विवेकानंद १८९७ साली काही दिवस मद्रासला आले होते आणि त्या वेळी त्यांनी याच इमारतीत मुक्काम केला होता. त्यांची भाषणे तेव्हा खूप गाजली होती. त्यांच्या स्मरणार्थ या इमारतीला विवेकानंद हाऊस म्हणायला सुरुवात झाली! आज त्याची मालकी रामकृष्ण मठाकडे आहे आणि तिथे विवेकानंदांशी संबंधित अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत.
इंग्रज काळातील एक अतिशय निसर्गरम्य वास्तू म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीचे आवार. डॉक्टर ॲनी बेझंट यांचे स्मारक म्हणून उभारलेले उपवन इथे आहे. या मूळच्या आयरिश पण त्यांचे बरेचसे आयुष्य भारतात गेले. एके काळी त्या अध्यक्ष असलेल्या या नामांकित जागतिक पंथाचे मुख्यालय इथेच आहे. अड्यार नदी आणि समुद्र यांच्यामधल्या सुमारे २५० एकरांचा हा विस्तीर्ण परिसर अतिशय निवांत आहे. येथील एक साडेचारशे वर्ष जुना वटवृक्ष खूप प्रसिद्ध आहे. मागे एका वादळात तो मुख्य वृक्ष उन्मळून पडला; पण त्याच्या पारंब्या जमिनीत रुजून पुन्हा एकदा तो उभा राहिला आहे. खाली बसण्यासाठी गोलाकार कट्टा आहे. डॉ. बेझंट याच वृक्षाखाली बसून चिंतन करत असत. इथे येणारा प्रत्येक पाहुणा या वृक्षाखाली थोडा वेळ तरी विसावतो. इथली कंपने (व्हायब्रेशन्स) खूप पवित्र आणि प्रभावी आहेत असे मानले जाते. तेथील एका स्वयंसेविकेने सगळा परिसर फिरून दाखवला. आध्यात्मिक साधना करणाऱ्यांसाठी तिथे अधूनमधून शिबिरे आयोजित केली जातात.
पुढच्या दोन-अडीच तासांत भारतीय इतिहासाचे एक अपरिचित दर्शन मला घडले – ते होते ॲनी बेझंट यांच्याशी संबंधित. एके काळी त्या पूर्णतः नास्तिक व साम्यवादी होत्या; पण पुढे अध्यात्माकडे वळल्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, महात्मा गांधी, मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरू वगैरे सर्वच प्रमुख भारतीय नेत्यांना त्यांच्याविषयी खूप आदर होता.
त्या काळी भारताप्रमाणे आयर्लंडवरदेखील इंग्रजांचे राज्य होते. त्यामुळे इंग्रज हा बेझंट यांनी समान शत्रू मानला. आयर्लंडमध्ये मर्यादित स्वरूपाततरी ब्रिटिशांनी लोकशाही स्थापन करावी या मागणीसाठी तिथे सुरू झालेली होमरूल लीग नावाची चळवळ त्यांनी भारतातदेखील सुरू केली. त्यांनी दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली, अनेक नियतकालिके संपादित केली. त्यांचे वक्तृत्व श्रोत्यांना भारावून टाकत असे. बनारस येथील सेंट्रल हिंदू कॉलेज त्यांनीच १८९८ साली स्थापन केले – भारतात लोकशाही रुजावी यासाठी, नवे नेतृत्व निर्माण करण्यासाठी. पुढे त्यांची पंडित मदन मोहन मालवीय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याशी ओळख झाली. त्यातूनच पुढे पंडित मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन केले. त्या विद्यापीठाचे पहिले कॉलेज – सेंट्रल हिंदू कॉलेज हेच होते. राजकीय स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक सुधारणा व्हायला हव्यात, लोक आपले राज्य चालवण्यासाठी सक्षम व्हायला हवेत असे बेझंट म्हणत. १९१४ साली मंडालेहून सुटून आल्यावर याच चळवळीत लोकमान्य टिळक आपले सगळे बळ एकवटून सामील झाले. ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ असे लोकमान्य टिळकांनी होमरूल लीगचे नामकरण केले. या चळवळीच्या प्रसारासाठी टिळक आणि बेझंट यांनी जागोजागी एकत्र सभा घेतल्या, पुढल्या तीन-चार वर्षांत संपूर्ण देश ढवळून काढला. भारतीय स्वातंत्र्याचा लढा तोवर समाजाच्या एका मर्यादित वर्तुळापुरता सीमित होता. तो समाजात सर्वदूर पसरला तो ह्या होमरूल लीग चळवळीमुळेच. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा ‘होमरूल’ (म्हणजे लोकसहभाग असलेले आमचे राज्य) या अर्थाने टिळकांनी ‘स्वराज्य’ शब्द वापरला होता. १९१७ साली बेझंट इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या अध्यक्ष बनल्या. ते पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला. १९२० साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यानंतर ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ ही चळवळ जवळपास थांबली; पण ती चळवळ हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो व त्याच्या प्रणेत्या बेझंट होत्या. पुढे मात्र गांधीजींशी झालेल्या गंभीर मतभेदांमुळे राजकारण सोडून थिओसॉफी सोसायटीच्या कामासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी आपले मानसपुत्र मानले होते व आपल्यानंतर तेच थिओसॉफीचे जागतिक अध्यक्ष बनतील असे त्यांनी जाहीर केले होते. संस्थेच्या मुख्य जागतिक अधिवेशनात त्यांना त्या आसनावर बसण्याचे बेझंट यांनी आवाहन केले; पण पदग्रहण करायला कृष्णमूर्ती यांनी अखेरच्या क्षणी नकार दिला – ‘सत्याकडे जाण्याचा कोणताही एक विशिष्ट असा रस्ता नाही आणि त्यामुळे मी कोणाचाही गुरू बनू शकत नाही,’ असे म्हणत. एक फार मोठा सन्मान स्वतःच्या अंतर्नादाचा मान राखत कृष्णमूर्तींनी त्या क्षणी नम्रपणे नाकारला. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्थापन झालेल्या कृष्णमूर्ती फाउंडेशनतर्फे सध्या अनेक दर्जेदार शाळा देशविदेशांत चालवल्या जातात. बेझंट त्यानंतर अनेक वर्षे अड्यार इथे राहिल्या आणि १९३३ साली तिथेच त्यांचे निधन झाले.
मुंबईत वरळी येथे ॲनी बेझंट यांच्या नावाने एक मोठा रस्ता आहे. देशाच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांत त्यांचे काही ना काही स्मारक आहे. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या मागे एक थिओसॉफी लॉज आहे. त्यांचे काही समर्थक तिथे भेटत असतात. अड्यार येथील मुख्यालयाचे बरेचसे व्यवस्थापन आज सांभाळणारे गृहस्थ मूळचे पुण्याचेच होते. त्यांच्याशी मराठीत बोलताना त्या इंग्रजी वातावरणात खूप छान वाटत होते.
आम्ही तिथे होतो त्याच वेळी योगायोगाने थिओसॉफीचे जागतिक अध्यक्ष टॉम बाईड हे तिथे होते. ते मूळचे कॅनेडियन आहेत. त्यांच्याबरोबरदेखील थोडा वेळ आम्ही गप्पा मारू शकलो. त्या पंथाचे इतरही दोन पदाधिकारी गप्पांमध्ये सहभागी झाले होते. त्या वेळी ऐकलेले दोन-तीन मुद्दे मला खूप वेधक आणि विचारांना वेगळी चालना देणारे वाटले. त्यांतला एक मुद्दा म्हणजे गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीला बेझंट यांचा असलेला विरोध. असहकाराच्या धोरणामुळे हा देश पाचशे वर्षे मागे जाईल, असे त्या म्हणत. भारतासारख्या देशात लोकांना कायदे पाळण्याची शिकवण द्यायला हवी, कायदेभंगाची नव्हे आणि सरकारसारख्या यंत्रणेत सहभागी होऊन त्यामार्फत सुधारणा कशा घडवून आणायच्या हे त्यांना शिकवायला हवे असे त्यांचे ठाम मत होते. रवीन्द्रनाथ टागोरांसारख्या अनेकांना ते मान्य होते; पण त्याच सुमारास देशाचे राजकीय नेतृत्व गांधीजींच्या हाती गेल्याने बेझंट यांचे काही चालले नाही. बेझंट यांच्या म्हणण्यात बरेच तथ्य होते असे आज वाटते. त्या दिवशी गप्पांत आलेला दुसरा एक मुद्दा म्हणजे थिओसॉफी सोसायटीचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अगदी मूलभूत म्हणता येईल असे योगदान.
पुढे मी या दोन्ही मुद्द्यांबाबत अधिक वाचन केले तेव्हा थिओसॉफी सोसायटीबद्दल मिळालेली माहिती अतिशय वेधक होती. इंडियन नॅशनल काँग्रेसचे संस्थापक आणि सेवानिवृत्त ब्रिटिश आयसीएस अधिकारी ॲलन ऑक्टेव्हिअन ह्यूम हे थिओसॉफी सोसायटीचे सक्रिय सदस्य होते; शिवाय स्वतःबरोबर इतरही १७ थिओसॉफी सदस्यांना त्यांनी कॉंग्रेसच्या स्थापनेत सहभागी करून घेतले होते. पुढे ज्यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व केले ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचाही थिओसॉफी सोसायटीशी जवळचा संबंध होता. पंडित नेहरूंचा बालपणी ज्यांनी गव्हर्नेस म्हणून सांभाळ केला आणि ट्यूटर म्हणून शिकवण्याचे कामही केले त्या ब्रिटिश महिला स्वतः थिओसॉफिस्ट होत्या. त्याचप्रमाणे गांधीजींना ज्यांनी भगवद्गीतेची प्रत ते इंग्लंडमधे कायद्याचे शिक्षण घेत असताना भेट म्हणून दिली होती आणि गांधीजींच्या आत्मकथेनुसार त्यातूनच गांधीजींच्या गीतेच्या अभ्यासाला सुरुवात झाली होती, त्या मादाम हेलेना ब्लाव्हाट्स्की या तर थिओसॉफी सोसायटीच्या संस्थापकच होत्या. त्यातही एक अधिक रोचक भाग म्हणजे या मादाम ब्लाव्हाट्स्की स्वतः मूळच्या रशियन. त्यांनी १८७५ साली थिओसॉफी सोसायटीची स्थापना न्यूयॉर्कमध्ये केली. पुढे आपल्या आध्यात्मिक शोधाचा पुढचा टप्पा म्हणून त्या १८७८ साली मद्रासजवळच्या या अड्यार भागात आल्या आणि त्यांनी तिथे आपले मुख्य केंद्र स्थापन केले. पाश्चात्त्य जगातील विज्ञान आणि पौर्वात्य जगातील अध्यात्म यांची सांगड घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अन्य जगाप्रमाणे भारतातही त्या वेळी थिओसॉफी पंथाकडे विचारवंत मोठ्या प्रमाणावर आकृष्ट झाले होते. त्यांच्यात ॲलन ह्यूम आणि ॲनी बेझंट यांचाही समावेश होता. आज मागे वळून बघताना या सगळ्या शृंखलेचे विलक्षण आश्चर्य वाटते. एक रशियन व्यक्ती अमेरिकेत जाऊन एक आध्यात्मिक संप्रदाय स्थापन करते, पुढे ती भारतासारख्या देशात येते आणि त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असे मोलाचे योगदान देते! नियतीची गती किती विलक्षण असते! असे अनपेक्षित झालेले आकलन हा प्रवासाचा एक मोठाच फायदा म्हणता येईल.
त्या दिवशीची एक व्यक्तिगत आठवण. माझा मोबाइल हरवला. तो हरवला आहे हे त्या वास्तूतून अगदी बाहेर पडत असताना माझ्या लक्षात आले. हा खूपच गंभीर मामला होता कारण हल्ली मोबाइलमध्येच आपण बहुतेक महत्त्वाची माहिती साठवून ठेवत असतो. परगावात तर ती अधिकच आवश्यक असते. आता एवढ्या मोठ्या परिसरात तो शोधायचा तरी कसा? अनिलने त्याच्या मोबाइलवरून माझा नंबर दोन-तीनदा लावला. बेल वाजत होती; पण कोणीच फोन उचलला नाही. तो नेमका कुठे राहिला आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता; शिवाय त्यासाठी पोलीस तक्रार वगैरे करायला आमच्यापाशी वेळही नव्हता. “अजिबात काळजी करू नका. इथे कोणीही तो पळवणार नाही,” असे तिथले व्यवस्थापक म्हणाले; पण माझी खात्री नव्हती. सुदैवाने पुन्हा एकदा जेव्हा शेवटचा प्रयत्न म्हणून माझा नंबर अनिलने लावला तेव्हा मोबाइल उचलला गेला! त्या वटवृक्षाच्या खालील कट्ट्यावर तो मी विसरलो होतो आणि कोणातरी साधकाने बेल ऐकून तो उचलला. लगेचच तिथे परत जाऊन मी तो ताब्यात घेतला! एक मोठी अडचण दूर झाली. याचे श्रेय कदाचित त्या वृक्षामुळे निर्माण होणाऱ्या पवित्र कंपनांना देता येईल!
मरीना बीच किंवा स्थानिक लोकांच्या भाषेत नुसते मरीना म्हणजे चेन्नईचे सर्वांत मोठे आकर्षण. लवकरच तिथे जायचा योग आला. मरीनाची लांबी सलग चार-पाच किलोमीटर आहे आणि शहरापलीकडेही तो सात-आठ किलोमीटर पसरलेला आहे. भारतातील हा सर्वांत जास्त लांबीचा बीच – ज्याला कोरोमंडल म्हणतात त्या बंगालच्या उपसागरालगतचा. लांबीप्रमाणेच याची रुंदीही भरपूर आहे; हजार-बाराशे फूट तरी सहज असावी. मुंबईतील गिरगाव, शिवाजी पार्क किंवा जुहू येथील समुद्रकिनारे त्या तुलनेत अगदीच छोटे आहेत. बर्यापैकी स्वच्छ असलेला, पार क्षितिजापर्यंत पसरलेला प्रचंड निळसर समुद्र आणि लगतच पांढऱ्या वाळूचा लांब-रुंद पट्टा असलेल्या मरीनावरून चालायला खूप मजा येते आणि साहजिकच रोज हजारो लोक इथे फिरायला येतात – विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी. चेन्नईची हवा तशी दमट आणि गरम; पण हा जानेवारी महिना असल्याने तसा गारवा होता.
इथे अनिल आणि मी, अण्णा आणि स्वातीताई हे चौघे होतोच; पण शिवाय अण्णांचा मुलगा आदित्य, त्याची पत्नी अरुणिता आणि लहान मुलगी उत्तरा हेही वेगळ्या मोटरीने येऊन आम्हांला जॉइन झाले. तसे हे फॅमिली आउटिंगच होते. छोट्या उत्तराला बीच म्हणजे अगदी प्राणप्रिय. वाळूचा किल्ला करण्यात वगैरे ती चांगलीच रमली होती आणि आपापसांत गप्पा मारण्यात आम्ही रमलो होतो. आकाशात रंगपंचमी चालू होती आणि समोर लाटांचे जाणेयेणे. वाळूत आम्ही बसलेलो असताना अनेक फेरीवाले वेगवेगळे पदार्थ विकण्यासाठी येतच होते. खरवसासारखा लागणारा पाल खोवा, नारळाच्या कोंभापासून बनवलेले नारळफूल आणि केळ्याची पसरट भजी हे अगदी नवे स्थानिक पदार्थ मला इथे प्रथमच खायला मिळाले. अनेक मुस्लीम कुटुंबेही इथे फिरायला आलेली होती. आता येथील मुस्लीम बायका बुरखा घालतात त्यामुळे स्थानिकांपासून वेगळ्या उठून दिसतात; पण परवापरवापर्यंत त्यांचे कपडे इतर स्थानिक लोकांसारखेच असायचे. भाषाही त्यांची तीच; त्यामुळे त्यांच्यात इतर समाजापासूनचे वेगळेपण असे काही जाणवत नसे. आता मात्र त्या बायका आवर्जून बुरखा घालतात. तुर्कस्थानपासून मलेशियापर्यंत जगातील अनेक पुरोगामी मुस्लीमबहुल देशांतही हल्ली हा बदल दिसतो; पण एकूण तमिळनाडूमध्ये हिंदू-मुस्लीम संबंध चांगले स्नेहाचे आहेत असे माझे निरीक्षण होते. हा डीएमकेचा एक चांगला प्रभाव.
पाय मोकळे करण्यासाठी थोडा वेळ बीचवरून फेऱ्याही मारल्या. त्या वेळी पट्कन नजरेत भरले ते इथले अनेक पुतळे. अशा पुतळ्यांची इथे रांगच आहे. ते सुरेख आणि भव्य पुतळे पाहणे आणि ते पाहत असतानाच त्या-त्या महापुरुषाची माहिती मिळवणे म्हणजे तमिळनाडूचा (नाडू म्हणजे प्रदेश) सगळा इतिहासच डोळ्यांखालून घालण्यासारखे आहे. त्यांच्याविषयी थोडे विस्ताराने लिहायला हवे.
प्रथम उल्लेख करायला हवा तो थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचा. थिरुवल्लुवर हे तमिळनाडूमधील सर्वांत महत्त्वाचे प्राचीन संतकवी. ‘वल्लुवर’ हे त्यांचे प्रत्यक्ष नाव आणि ‘थिरु’ शब्द हा ‘श्री’ या आदरार्थाने. त्यांचे १३३० श्लोक किंवा ओव्या असलेले ‘कुरल’ हे महाकाव्य तेथे गेली २००० वर्षे नैतिक मूल्यांचे मार्गदर्शक मानले जाते. ‘कुरल’ शब्दाचा अर्थ श्लोक असा आहे. प्रत्येक श्लोक दोन-दोन ओळींचा आणि एकेका ओळीत सात शब्द. ‘कुरल’ एक काव्य म्हणूनही श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यात ईश्वरस्तुती किंवा धार्मिकता यांच्याऐवजी नीतिमत्तेवर भर दिलेला आहे. ‘तमिळ वेद’ असेही त्याला म्हणतात. कुरलचा जगातील ४५ भाषांत अनुवाद झाला असून मराठी अनुवाद साने गुरुजींनी केलेला आहे.
थिरुवल्लुवर यांच्याप्रमाणेच जॉर्ज पोप या ख्रिस्ती मिशनऱ्यांचाही इथे पुतळा आहे आणि त्याचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. कॅनडात जन्मलेले पोप वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तमिळनाडूत आले आणि पुढची बेचाळीस वर्षे त्यांनी इथे मिशनरी म्हणून काम केले. अनेक तमिळ पुस्तकांचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला – त्यात सर्वाधिक महत्त्वाचे काम म्हणजे १८८६ साली त्यांनी केलेला कुरल महाकाव्याचा अनुवाद. तमिळ संस्कृतीचे श्रेष्ठत्व जगापुढे प्रथम आणण्याचे श्रेय पोप यांना त्यामुळेच दिले जाते आणि विशेष म्हणजे तमिळ नेत्यांनीही ते कधीच नाकारलेले नाही. इंग्रज अमदानीच्या अनेक ऐतिहासिक खुणा येथील राज्यकर्त्यांनी पुसून टाकलेल्या नाहीत. एकूणच मला इथे कडवा इंग्रजविरोध दिसला नाही. पोप यांचा मरीना येथील पुतळा हे त्याचे द्योतक आहे.
थिरुवल्लूवर यांच्या संदर्भातली एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे कारण भिन्न भाषकांमध्ये आपलेपणाचे पूल बांधण्याचे, सेतुबंधनाचे कार्य करण्याचे साहित्य हे एक महत्त्वाचे साधन कसे बनू शकते ते त्यातून दिसते. भारतासारख्या चोवीस प्रमुख भाषा असलेल्या देशात हे विशेष महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वी कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून व होगेनक्कल येथील विद्युतप्रकल्पावरून कर्नाटक व तमिळनाडू ह्या दोन राज्यांमध्ये बरीच कटुता निर्माण झाली होती. त्याच सुमारास दोन घटना घडल्या, ज्यांमुळे दोन्ही प्रांतांमधील तणाव त्या वेळेपुरतातरी कमी झाला. ९ ऑगस्ट २००९ रोजी तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी बंगलोरमधील उल्सूर ह्या भागात थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले व त्या प्रसंगी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा आवर्जून हजर राहिले. त्यानंतर आठच दिवसांनी ज्येष्ठ कन्नड संतकवी सर्वज्ञ (मूळ नाव पुष्पदत्त) ह्यांच्या पुतळ्याचे चेन्नईमध्ये अयनावरम येथे अनावरण झाले व त्या कार्यक्रमालादेखील उपरोक्त दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित होते. तसे पाहिले तर दोन्ही राज्यांतील जनतेमध्ये ह्या दोन संतकवींना साहित्यिक म्हणून पूर्वीपासूनच आदराचे स्थान होते व त्यांचे पुतळेदेखील खूप पूर्वीपासून तयार होते; पण भाषिक अस्मितेच्या प्रश्नावरून वैर जोपासणाऱ्या काही राजकीय शक्तींमुळे त्यांचे अनावरण मात्र होऊ शकले नव्हते. ह्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी हा एक आगळा पुढाकार घेतला व त्यामुळे दोन्ही शहरांमधील भडकलेल्या लोकभावना त्या वेळेपुरत्या तरी बर्यापैकी शमल्या.
साहित्य हे केवळ उपयुक्ततावादी असावे असे अर्थातच नाही; पण साहित्याची जी पारंपरिक प्रयोजने सांगितली जातात त्यांपैकी मनोरंजन हे प्रयोजन आता टीव्हीमुळे तसे कालबाह्य ठरत आहे व माहिती पुरवणे हे साहित्याचे दुसरे प्रयोजन इंटरनेट अधिक प्रभावीरित्या पार पाडते. अशा परिस्थितीत ‘साहित्य नेमके कशासाठी?’ हा प्रश्न उद्या युवा पिढी नक्की विचारणार आहे; किंबहुना आजही विचारत आहे व त्याचे पटण्याजोगे, समयोचित उत्तर आपल्यासारख्या सर्व साहित्यप्रेमींना द्यावेच लागेल. त्या दृष्टीने विचार करता ‘सेतुबंधन’ हे साहित्याचे एकमेव नाही तरी एक महत्त्वाचे प्रयोजन नक्कीच आहे.
थिरुवल्लूवर यांच्याप्रमाणेच पेरियार उर्फ इ. व्ही. रामस्वामी नायकर यांचा पुतळाही महत्त्वाचा आहे; किंबहुना आजचा तमिळनाडू समजून घेण्यासाठी पेरियार समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिक काळात तमिळ अस्मिता जागवण्याचे सर्वाधिक श्रेय त्यांनाच आहे. ‘पेरियार’ शब्दाचा अर्थ ‘महामानव’ असा आहे आणि त्याच नावाने ते ओळखले जातात. आपली द्रविड संस्कृती ही आर्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांनीच तमिळ लोकांच्या मनावर ठसवले. ते स्वतः कन्नडिगा होते; पण कर्नाटक हाही ते द्रविड संस्कृतीचाच एक भाग मानत. त्यांची बहुजनहिताची तळमळ, साधी राहणी, प्रभावी वक्तृत्व यांमुळे ते खूप लोकप्रिय झाले. आपल्या पांढऱ्याशुभ्र, छातीपर्यंत लोंबणाऱ्या दाढीमुळे ऋषितुल्य वाटणारे पेरियार पूर्णतः नास्तिक होते. हिंदू देवदेवतांची आणि रामायणासारख्या ग्रंथांची ते यथेच्छ टिंगल करत. ‘अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमता जोपासणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही,’ असे त्यांचे मत होते. १९३८ साली ते जस्टीस पार्टी या काहीशा इंग्रजधार्जिण्या पक्षात सामील झाले. याच पक्षाच्या मुशीतून पुढे त्यांनी ‘द्रविड कळघम’ हा नवा पक्ष स्थापन केला. उत्तर भारतातील ती आर्यसंस्कृती आणि दक्षिण भारतातील ती द्रविड संस्कृती असे काहीसे ढोबळ विभाजन त्यांच्या मनात असावे. या पक्षाने स्वतंत्र द्रविडस्थानाची मागणी केली होती. दक्षिण भारतातील चारही राज्यांचा त्यात समावेश असावा असे त्यांचे मत होते; अर्थात त्याला फारसे समर्थन मिळाले नाही. याच पक्षातून पुढे डीएमके, अण्णा डीएमके वगैरे पक्ष निर्माण झाले. त्यांचे सर्व नेते हे स्वतःला पेरियार यांचेच पाईक म्हणवतात. त्यांचे सर्वांत ज्येष्ठ शिष्य अण्णादुराई. पेरियारांनी अगदी म्हातारपणी एका तरुण स्त्रीबरोबर केलेल्या लग्नाला विरोध हे निमित्त करून अण्णादुराईंनी पेरियारांपासून फारकत घेतली; पण वेगळे होण्यामागचे खरे कारण निवडणुका लढवून सत्ता काबीज करायचा मोह हेच असावे. पेरियारांची स्वतंत्र द्रविडस्थानाची मागणी रेटून धरली तर आपण देशद्रोहाच्या आरोपाखाली आयुष्यभर तुरुंगात सडत राहू आणि मग आपण कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही याची पुरती जाणीव अण्णादुराई आणि अन्य नेत्यांना होती. त्यांना कोणालाच हुतात्मा बनण्यात स्वारस्य नव्हते. या नेत्यांनी मग आपली भूमिका मवाळ केली. ‘ब्राह्मणांना विरोध नाही; पण ब्राह्मणवादाला विरोध’, ‘निरीश्वरवाद नाही; पण एकेश्वरवाद’, ‘वेगळे राष्ट्र नको; पण स्वायत्तता हवी’ – वगैरे बदल केले. तोंडाने मात्र ते सतत पेरियारांचा उद्घोष करत राहिले! अर्थात निवडणुकीच्या राजकारणात पडल्यानंतर इतरही अनेक संघटनांना आपल्या मूळ भूमिकेत असे बदल करावे लागले आहेत. स्वतः पेरियारांना सत्तेचा मोह अजिबात नव्हता व त्यामुळेच ते आपली जहाल भूमिका कायम ठेवू शकले. सप्टेंबर २००४ मध्ये पेरियार यांची सव्वाशेवी जन्मतिथी तमिळनाडूत थाटात साग्रसंगीत साजरी झाली. ज्यांनी आयुष्यभर देव नाकारला त्या पेरियारांचाच द्रविड चळवळीने देव बनवून टाकला हा एक मोठाच विरोधाभास. अर्थात गौतम बुद्धांपासून इतरही अनेक मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत असे घडले आहे. पेरियारांची राजकीय विचारधारा आज नाकारली गेली असली तरी त्यांचे माहात्म्य आजही तमिळनाडूमध्ये कायम आहे. पेरियारांना गुरुस्थानी मानणे हा जयललिता व करुणानिधी या दोन हाडवैऱ्यांना जोडणारा एकमेव दुवा होता!
पेरियार समजून घेतल्यावर तमिळनाडूबाबतच्या अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरण सापडू शकते. उदाहरणार्थ : त्यांचा हिंदीला असलेला विरोध. हिंदीला विरोध हा बंगालमध्येही होता; पण तमिळनाडूमध्ये त्याची तीव्रता खूपच अधिक होती. संस्कृतजन्य हिंदी हे त्यांना आर्यसंस्कृतीचे प्रतीक वाटते. हिंदीला उत्तर भारताची भाषा म्हणून कडाडून विरोध करताना पेरियारांनी इंग्रजीसारख्या पूर्णतः परक्या भाषेचा मात्र आनंदाने स्वीकार केला याचे आश्चर्य वाटते. डीएमके पक्षाचे नेते बोलतात त्या तमिळ भाषेचेही एक वैशिष्ट्य आहे. त्यात संस्कृतोद्भव शब्द आवर्जून टाळलेले असतात. स्वतःच्या संस्कृतपूर्व परंपरेतून चालत आलेली अशी त्यांची तमिळ भाषा असते. आपल्याकडच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धीप्रमाणेच द्रविड नेत्यांनीही भाषाशुद्धीची चळवळ राबवली होती. फरक एवढाच, की सावरकरांनी संस्कृतेतर शब्द शक्यतो वगळले तर द्रविड नेत्यांनी संस्कृत शब्द शक्यतो वगळले!
संस्कृत वा ब्राह्मणी परंपरा नाकारण्याचा हा आग्रह तमिळनाडूच्या कलाक्षेत्रातही होता. त्यातूनच तमिळ लोकसंगीताचे पुनरुज्जीवन झाले. उदाहरणार्थ : आजचे ए. आर. रेहमानचे रोझा, बॉम्बे, रंगीला, दिल से, ताल, लगान, रंग दे बसंती इत्यादी चित्रपटांतील संगीत. पारंपरिक शास्त्रीय संगीताच्या प्रभावातून नव्हे तर प्राचीन तमिळ लोकसंगीताच्या मुशीतून ते जन्माला आले आहे.
मुलांना देवादिकांची नावे ठेवायची परंपरा अन्य भारताप्रमाणे तमिळनाडूतही एके काळी रूढ होती. ती परंपरा नाकारण्याच्या आग्रहामुळेच बऱ्याच तमिळ नेत्यांची नावेही मुलखावेगळी असतात. उदाहरणार्थ : करुणानिधींचे चिरंजीव आणि सध्याचे मुख्यमंत्री यांचे स्टॅलिन हे नाव. या स्टॅलिन नावाचीही एक गंमत आहे. रशियन नेता जोसेफ स्टॅलिन याचे १ मार्च १९५३ रोजी मॉस्कोत निधन झाले आणि त्यानंतर फक्त चार दिवसांनी करुणानिधी यांना मुलगा झाला. त्याच दिवशी जोसेफ स्टॅलिनला श्रद्धांजली वाहण्यासाठी मद्रासमधे एक सभा आयोजित केली गेली होती व त्या वेळी साम्यवादाकडे झुकलेल्या करुणानिधी यांचे त्या सभेत भाषण झाले. त्या भाषणात ‘आपल्या आजच जन्मलेल्या मुलाचे नाव जोसेफ स्टॅलिन याची आठवण म्हणून आपण स्टॅलिन ठेवणार आहोत’ असे त्यांनी जाहीर केले होते व प्रत्यक्षात तसे केलेही. या नावाचा एखादा गुजराती, पंजाबी, बिहारी किंवा मराठी मुलगा असेल असे मलातरी वाटत नाही.
पेरियार यांचा ब्राह्मणविरोध तमिळनाडूमधे आज पूर्वीइतका नसला तरी थोडाफार टिकून आहे; पण त्याच वेळी एक विरोधाभास इथे नोंदवायला हवा; तो म्हणजे या ब्राह्मणविरोधावर मात करून जयललितांसारखी एक अय्यंगार ब्राह्मण महिला पेरियारांची परंपरा सांगू शकली, बहुजनसमाजात प्रचंड लोकप्रिय बनू शकली, राज्याची मुख्यमंत्रीही होऊ शकली. तिचे ब्राह्मण्य तिच्या राजकीय प्रगतीच्या आड कधीही आले नाही. द्रविड चळवळीचे ते एक यश मानावे लागेल.
आणि तमिळनाडूत आजही कायम असणारे गोर्या रंगाचे आकर्षण हे द्रविड चळवळीचे एक अपयश मानावे लागेल! खरेतर गोरा वर्ण हा आर्यांशी जोडला गेलेला आणि काळा वर्ण द्रविडांशी; पण तमिळ चित्रपटांतील बहुतेक नट आणि नट्या या गोऱ्याच असतात. गौर वर्णामुळेच अनेक उत्तर भारतीय नट्यांना तमिळ चित्रपटांत स्थान मिळते. तथाकथित गोरेपण वाढवण्याचा दावा करणाऱ्या क्रीम्सचा खप अन्य राज्यांप्रमाणेच तमिळनाडूतही भरपूर आहे!
पेरियार यांचे वारसदार आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष अण्णादुराई हे १९६७ साली तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्याच कारकिर्दीत १९६९ साली मद्रास प्रांताचे नाव तमिळनाडू झाले. त्यांच्या निधनानंतर करुणानिधी मुख्यमंत्री बनले. पुढे डीएमके पक्षात फूट पडली. करुणानिधींचे निकटचे सहकारी एम. जी. रामचंद्रन उर्फ एमजीआर यांनी स्वतःचा अण्णा डीएमके हा वेगळा पक्ष स्थापन केला. पुढे त्याचेच नामकरण ऑल इंडिया अण्णा डीएमके असे झाले. एमजीआर हे पुढे तमिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. एखादा अभिनेता राज्याचा मुख्यमंत्री बनण्याचे हे भारतातील पहिले उदाहरण. (पुढे एन. टी. रामा राव यांनीही आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद भूषवले.) एमजीआर दहा वर्षे मुख्यमंत्री होते. पुढे १९८७ साली भारतरत्न देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. तो बहुमान मिळवणारे हे तमिळनाडूचे तिसरे मुख्यमंत्री. त्यापूर्वी राजगोपालाचारी उर्फ राजाजी आणि कामराज यांनाही भारतरत्न मिळाले होते. महाराष्ट्राच्या मात्र एकाही मुख्यमंत्र्याच्या वाट्याला हा सन्मान आलेला नाही. एमजीआर यांच्यानंतर जयललिता आणि करुणानिधी यांनी आलटूनपालटून मुख्यमंत्रीपद भूषवले.
मरीना बीचवरचे अण्णादुराई, एमजीआर, जयललिता आणि करुणानिधी या चार माजी मुख्यमंत्र्यांचे पुतळे म्हणजे त्यांची भव्य स्मारकेच आहेत. हे चौघेही प्रमुख द्रविड पक्षांचे नेते होते. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना मात्र तमिळनाडूमध्ये कधीच फारसे स्थान मिळालेले नाही – अपवाद फक्त सुरुवातीच्या काळातील राजाजी आणि कामराज या दोन काँग्रेसनेत्यांचा. राजाजी हे मद्रास प्रेसिडेंसीचे पहिले मुख्यमंत्री. पुढे त्यांनी नेहरूंच्या समाजवादी धोरणाला विरोध म्हणून ‘स्वतंत्र पक्ष’ स्थापन केला तरी ते त्यापूर्वी काँग्रेस पक्षात होते. कामराज हे काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री. १९५४ ते १९६३ या काळात ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच कारकिर्दीत १९५६ साली इंग्रजकालीन मद्रास प्रेसिडेंसीचे विभाजन होऊन मद्रास हा एक स्वतंत्र प्रांत अस्तित्वात आला. त्यांचा जन्म नाडर या मागास समजल्या गेलेल्या जातीत झालेला होता आणि वंचित समाजाची दुःखे काय असतात याची त्यांना पूर्ण कल्पना होती म्हणूनच नेतेपद प्राप्त झाल्यावर गोरगरिबांच्या कल्याणाचा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यांना कर्मवीर म्हणत. गरिबीमुळे त्यांचे शालेय शिक्षण फारसे झाले नव्हते आणि तमिळ सोडून कुठलीच भाषा त्यांना येत नव्हती; पण तरीही देशाच्या राजकारणावर त्यांचा खूप प्रभाव होता. हिंदी किंवा इंग्रजीचा त्यांना गंधही नव्हता तरीही दिल्लीत त्यांचा खूप दबदबा होता. असे दुसरे उदाहरण शोधणे कठीण आहे. पंडित नेहरूंच्या अखेरच्या काळातील ‘कामराज योजना’ अनेकांना आजही आठवत असेल. अनेक महत्त्वाकांक्षी नेत्यांना सत्तेपासून दूर नेऊन निखळ पक्षकार्यासाठी जुंपणारी. कट्टर काँग्रेसविरोधी असलेल्या सर्वच डीएमके नेत्यांनाही त्यांच्याबद्दल आदर होता – कारण त्यांचे निष्कलंक चारित्र्य. त्यामुळे त्यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो. चेन्नईयेथील डोमेस्टिक विमानतळाला काँग्रेसनेते कामराज यांचेच नाव दिलेले आहे. शेजारीच असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मात्र डीएमके पक्षाचे नेते अण्णादुराई यांचे नाव दिलेले आहे.
करुणानिधी मुख्यमंत्री असताना १७ जुलै १९९६ रोजी मद्रास शहराचे नाव चेन्नई ठेवले गेले. मद्रासपट्टणमची जमीन ईस्ट इंडिया कंपनीला ज्यांनी दिली होती, त्याच नायक घराण्यातील चेन्नप्पा या एका पराक्रमी राजाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चेन्नई हे नाव शहराला दिले गेले; पण तशी ही दोन्ही नावे या परिसराच्या प्राचीन इतिहासातीलच आहेत.
१९८७ साली एमजीआर यांचे निधन झाले. त्यानंतर जयललिता यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली. १९९१ ते २०१६ या काळात त्या एकूण सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. तमिळनाडूच्या त्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री होत्या; एकेचाळिसाव्या वर्षी त्या प्रथम मुख्यमंत्री बनल्या. एकूण चौदा वर्षे त्या मुख्यमंत्री होत्या. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ सुपरस्टार एमजीआर यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे त्या मुख्यमंत्री बनल्या हे सर्वश्रुत आहे. दोघांनी एकूण २८ चित्रपटांत एकत्र काम केले. शिवाजी गणेशन यांच्याबरोबर सतरा तर पुढे आंध्रचे मुख्यमंत्री बनलेले एन. टी. रामा राव यांच्याबरोबर बारा सिनेमांत त्या नायिका होत्या. इज्जत या १९६४ सालच्या हिंदी चित्रपटात त्यांनी धर्मेंद्रची नायिका म्हणूनही काम केले होते. एकूण १४० सिनेमांत त्यांनी काम केले आणि मग मात्र पूर्ण वेळ राजकारणाला द्यायचे त्यांनी ठरवले. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा अनेकदा माध्यमांमधून चघळल्या गेल्या आहेत; पण त्यांनी अनेक चांगल्या गोष्टीही केल्या. ‘इथे पैसे द्यावे लागतात, पण एकदा पैसे दिले की काम हमखास चोख होते,’ असेही काही उद्योगपती खासगीत म्हणत. अनेक प्रकल्प त्यांनी धडाडीने अमलात आणले; शिवाय हे करत असतानाच त्यांनी अगदी तळागाळातल्या लोकांचे प्रेमही संपादन केले. जेवण, कपडे, गॅस, औषधोपचार, टीव्ही वगैरे इतरही अनेक गोष्टी त्यांनी अगदी स्वस्तात गरिबांसाठी पुरवल्या त्यामुळे तमिळनाडूमध्ये सगळे त्यांना ‘अम्मा’ म्हणत. पोस्टर्समध्ये किंवा जाहिरातींमध्ये त्यांचा उल्लेख ‘पुरत्ची थलैवी’ (Puratchi Thalaivi, क्रांतिकारक नेता) असा केला जायचा.
तमिळ समाज साहित्यप्रेमी आहे. राजगोपालाचारी, अण्णादुराई, करुणानिधी आणि इतर अनेक राजकीय नेते हे स्वतः उत्तम लेखकदेखील होते. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी लेखनाचा भरपूर वापर केला. करुणानिधी यांचे नातू कलानिधी मारन यांच्या मालकीच्या आणि राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय अशा सन टीव्ही चॅनेलवर अनेक साहित्यिक कार्यक्रम सादर होत असतात. साहजिकच मरीना बीचवर अनेक साहित्यिकांचे पुतळेही आहेत – त्यांतील एक महत्त्वाचा पुतळा आहे सुब्रमण्य भारती यांचा.
आपल्याला फारसे परिचित नसलेले पण तमिळनाडूमध्ये खूप महत्त्वाचे मानले गेलेले असे हे नाव. त्यांना आधुनिक तमिळ साहित्याचे जनक म्हटले जाते. १८८२ साली जन्मलेले भारती लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान आणि अष्टपैलू होते. तरुणवयातच ते स्वातंत्र्ययुद्धात पडले. अनेक वृत्तपत्रांतून ते देशभक्तीला उत्तेजन देणारे लेखन करीत. त्यांना चौदा भाषा अवगत होत्या. अनेकदा त्यांनी तुरुंगवास भोगला. सुरत काँग्रेसच्या काळात लोकमान्य टिळकांबरोबर त्यांनी काम केले होते. काही वर्षे त्यांनी वाराणशी येथे घालवली होती व तिथे हिंदी भाषेतही पत्रकारिता केली होती. त्यांच्या राष्ट्रप्रेमामुळे ‘भारतीयार’ म्हणूनही त्यांचा उल्लेख होतो. दिल्लीच्या लोकसभेतही त्यांचे तैलचित्र लावलेले आहे. त्यांच्या नावाने दिल्लीत एक रस्तादेखील आहे. सन २००० मध्ये त्यांचेच नाव असलेला एक तमिळ चित्रपट बनवला गेला होता व त्याला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचे राष्ट्रीय परितोषिकही मिळाले होते. तमिळ चित्रपटांत त्यांची असंख्य गाणी वापरली गेली आहेत. हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीला केंद्र सरकारतर्फे त्यांच्या नावाने १९८७ सालापासून दरवर्षी एक पुरस्कारही दिला जातो. १९८२ साली त्यांच्या नावाने तमिळनाडूमध्ये एक विद्यापीठ स्थापन केले गेले. त्यांचे निधन खूप दुर्दैवी परिस्थितीत झाले. चेन्नई येथील एका देवळात ते अधूनमधून जात व तेथील लावण्य नावाच्या एका हत्तीला प्रेमाने खायलाही देत. एकदा तसे करत असताना एकाएकी तो हत्ती पिसाळला आणि त्यांच्यावर धावून गेला. त्यांनी खायला दिलेला नारळ कुजका निघाला व त्यामुळे तो हत्ती चिडला असेही म्हटले गेले आहे. त्या हल्ल्यातच त्यांचे निधन झाले. १९२१ सालची ही घटना. हत्तीच्या हल्ल्यामुळे मृत्यू आलेली ही बहुधा एकमेव प्रसिद्ध भारतीय व्यक्ती असावी. त्या वेळी त्यांचे वय अवघे ३८ होते.
तमिळ समाजात लेखक, पत्रकार, कलावंत यांना किती मान असतो याचे एक द्योतक म्हणजे ‘चो’ उर्फ रामस्वामी अय्यर (१९३४ ते २०१६) यांची लोकप्रियता. हे एक बहुआयामी व्यक्तित्त्व. चो हे त्यांच्या एका सुरुवातीच्या नाटकातील पात्राचे नाव. तेच त्यांनी पुढे स्वतःसाठी धारण केले. ते उत्तम वकील होते, त्यांनी १८० चित्रपटांत काम केले (त्यांतले १९ जयललिता यांच्याबरोबर होते), वीस नाटके लिहिली, सत्तावीस टीव्ही सिरियल्स लिहिल्या व त्यांच्यात कामही केले, ‘तुघलक’ हे साप्ताहिक आयुष्यभर चालवले, अनेक वृत्तपत्रांतून सातत्याने बड्या नेत्यांची खिल्ली उडवणारे उपहासगर्भ विनोदी लेखन केले. ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी आणीबाणीला जोरदार विरोध केला, डीएमके नेत्यांनाही विरोध केला; तरीही त्यांचे समाजातील स्थान असे होते की कोणी त्यांचे फारसे काही वाकडे करू शकला नाही. त्यांना पद्मभूषण पुरस्कारदेखील मिळाला होता. ‘तुघलक’च्या वार्षिक संमेलनाला पन्नास-पन्नास हजार वाचक जमत. त्यांच्याबरोबर तेव्हा होणारा जाहीर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता. त्यांच्या या वार्षिक संमेलनांना गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन वेळा नरेंद्र मोदीदेखील हजर राहिले होते. एखाद्या लेखकाला सार्वजनिक जीवनात इतके मानाचे स्थान मिळाल्याचे उदाहरण अन्य कुठल्या राज्यात सहसा आढळणार नाही.
मला विशेष आवडलेला मरीना बीचवरचा एक पुतळा म्हणजे ‘ट्रायम्फ ऑफ लेबर.’ तेथील महापुरुषांच्या इतर सर्व पुतळ्यांपेक्षा हा अगदी वेगळा आहे. या अप्रतिम शिल्पात चार सर्वसामान्य कामगार एक प्रचंड असा खडक हलवताना दिसतात. १९५९ साली उभारलेला हा पुतळा म्हणजे कामगारांचे आणि एकूणच श्रमशक्तीचे प्रतीक आहे. एकूणच डाव्या विचारसरणीचा येथील राजकारणावर असलेला प्रभावही या पुतळ्यातून जाणवतो.
असे अनेक सुंदर पुतळे मरीना बीचवर आहेत. खरेतर हे पुतळे म्हणजेच एखाद्या प्रदीर्घ लेखाचा विषय आहे; स्थलाअभावी केवळ काहींचा इथे उल्लेख केला. मरीना बीचवर फेरफटका मारणे म्हणजे तमिळनाडूचा इतिहास समजून घेण्यासारखे आहे असे म्हणूनच म्हणता येईल.
आम्ही बीचवर गप्पा मारत बसलो होतो तेव्हा आजूबाजूला अनेक फेरीवाले आपापले जिन्नस विकत होते. आपल्याकडे डोंबाऱ्याचा खेळ असतो तशा कसरती करणारी एक-दोन कुटुंबेही दिसली. अगदी आमच्यासमोरच एक पोपट घेऊन फिरणारा ज्योतिषी होता आणि एका कुटुंबाला त्यांच्यातील प्रत्येकाचे भविष्य सांगत होता. एक आश्चर्य म्हणजे ते कुटुंब मुस्लीम होते आणि त्यांचाही या प्रकारावर विश्वास होता असे दिसले!
पण याच जोडीने एक वेगळे यंत्रही मला तिथे प्रथमच बघायला मिळाले. एखाद्या मोठ्या ट्रॅक्टरसारखे ते वाहन होते आणि त्याच्यामागे नांगराच्या फाळासारखा खूप रुंद लोखंडी झाडू होता. यंत्र पुढे पुढे सरकत होते आणि त्याच वेळी बीचवरचा सगळा कचरा तो यांत्रिक झाडू वर शोषून घेत होता. चेन्नई बीचवर अशी काही यंत्रे महानगरपालिकेतर्फे सतत फिरत असतात. चेन्नईचा बीच इतकी गर्दी असूनही इतका स्वच्छ कसा याचे ते उत्तर होते. अंधश्रद्धा आणि शेजारीच आधुनिक तंत्रज्ञान. तमिळनाडूची दोन रूपे!

आदरणीय भानूजी काळे,
आपला ” मद्रास ते चेन्नई ” हा दीर्घ लेख रात्रीच्या निवांत समयी एका बैठकीत वाचून काढला. ( लेख वाचावयास चक्क दीड- दोन तास लागले)… कारणे दोन…त्यापैकी एक म्हणजे तमिळनाडू अंतर्गत चेन्नई जवळच असलेल्या चेंगलपट्टू येथे नोकरीनिमित्त केलेले बारा वर्षांचे वास्तव्य व या वास्तव्यात चेन्नई व आजूबाजूच्या ठिकाणी मारलेला फेरफटका आणि त्यातुन तमिळ संस्कृती विषयी थोडेफार जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. दुसरे कारण म्हणजे ” अंतर्नाद ” चे नियमित वाचन करत असताना आपणाविषयी निर्माण झालेला आदर..( सौजन्य..मित्रवर्य अनिल जोशी).
तमिळनाडूच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पैलूंचा आपण घेतलेला हा आढावा मनोवेधक आहे.
तमिळनाडू अन् तेथील जनतेविषयी ज्यांना थोडीबहुत कल्पनाआहे अशा माझ्यासारख्यांच्या मनाला तर तो खूपच भावला.
चेन्नेईच्या मरीना बीचवर फेरफटका मारता मारता तेथे असलेल्या विविध व्यक्तींच्या पुतळ्यांद्वारे तमिळ संस्कृती व तेथील राजकारण उलगडून दाखविण्याचे आपले कौशल्य…. वाह, क्या बात है! मरीना बीचवर अनेकदा फेरफटका मारलेला असल्याने मला ते समजणे जास्तच सोपे गेले. आपण चितारलेले फोर्ट म्युझियम, मद्रास म्युझियम व थिऑसाॅफिकल सोसायटीचे आवार मात्र पहायचे राहून गेले.
इंग्रजांनी आपणावर पारतंत्र्य लादले हे खरेच..तथापि त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी ही केल्या हे विसरता कामा नये…लेखापुरता विचार करायचा तर विलियम लॅबटन आणि जाॅर्ज एव्हरेस्ट यांचे ॠण आपण मानावयासच हवे( अर्थात हा विषय येथे अप्रस्तुत आहे).
थिऑसाॅफिकल सोसायटीचा आपण घेतलेला आढावा मनोवेधक!
“कायद्याचे पालन कि कायदेभंग? ” म.गांधी आणि ॲनी बेझंट यांच्यात ज्यामुळे वैचारिक मतभेद झाले त्या विषयास आपण केलेला स्पर्श माझ्यासारख्या वाचकांसाठी माहितीपूर्ण.
” हरवलेला मोबाईल “…किस्सा मनोरंजक.
एकूणात थिरूवल्लूवर, पेरियार, कामराज, करूणानिधी, जयललिता ते आजचे स्टॅलिन यांच्या तामिळनाडू चा आपण घेतलेला आढावा वाचकांसाठी अतिशय माहितीपूर्ण आणि मनोवेधक झालेला आहे.
(माझ्या अनुभवातून मी असे म्हणेन कि आताचे तामिळनाडू हे उत्तर भारतातील अनेक, किंबहुना सर्वच राज्यांपेक्षा सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. )
लेख अप्रतिम 👌👌👌👌
अनेक गोष्टींची उजळणी व नविन माहिती अशी पर्वणी !