जेव्हा तुम्ही रेल्वेने बेंगलोरला उतरता तेव्हा तुम्ही क्रांतिवीर संगोळी रायण्णा स्थानकावर उतरता. आपण त्या नावाकडे फारसे लक्ष न देता बेंगलोर स्टेशन म्हणत ते नाव अगदी कानामागे टाकून पुढे जातो. मुळात आपल्याकडे स्टेशनला, विमानतळांना, गावांना दिली जाणारे नावं हा एक वेगळाच विषय आहे. अर्थात अनेकदा त्यामागे विशिष्ट स्मृती जागवणे हा हेतू असतोच; पण त्याचबरोबर त्या प्रदेशाची स्थानिक अस्मिता जोपासणे हे महत्त्वाचे कारणदेखील असते. विशिष्ट नाव दिल्याने इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल असे वाटते; कारण एखाद्या व्यक्तीने जरी त्या नावामागचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी ते नाव सार्थकी लागले असे म्हणता येईल. अगदी उदाहरणच घ्यायचे झाले तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे का आहे हे जेव्हा एखादी परदेशी व्यक्ती शोधते तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव होते. अगदी तसेच आहे आमच्या ksr म्हणजे क्रांतिवीर संगोळी रायण्णा स्थानकाचे.
आपल्याकडे फॅंसी ड्रेस स्पर्धेत जसे अजूनही शिवाजी, झाशीची राणी येतातच; तसे कर्नाटकात ते भाग्य मिळाले आहे कित्तूर राणी चेन्नम्मा आणि केंपे गौडा यांना. आता संगोळी रायण्णा यांच्याबद्दल सांगता सांगता मी एकदम चेन्नम्मा आणि केंपेगौडा यांच्याबद्दल का लिहीत आहे; तर राणी चेन्नम्मा नसत्या तर संगोळी रायण्णा नसते. कित्तूर या बेळगावजवळील एका संस्थानाची राणी होती चेन्नम्मा. राजा मल्लसर्जा यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. १८१६ मध्ये राजांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलांचेदेखील निधन झाले. त्यामुळे त्यांनी १८२४ मध्ये मूल दत्तक घेऊन राज्यकारभार पूर्वीसारखाच बघायला सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीने अर्थात त्यावर आक्षेप घेतला आणि त्यांचे संस्थान गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर १८२४ मध्ये झालेल्या लढाईत कित्तूरच्या लोकांनी पराक्रमाची शर्थ केली आणि विजय मिळवला. त्या लढाईत कंपनी सरकारची मोठी हानी झाली, धारवाड जिल्ह्याचा तत्कालीन कलेक्टर मरण पावला, अनेक लोकांना युद्धकैदी म्हणून संस्थानात ठेवले होते; मात्र तरीही कंपनी सरकारने काही काळानंतर परत हल्ले करायला सुरुवात केली. १८२९ पर्यंत संगोळी रायण्णा या आपल्या शूर प्रधानाच्या मदतीने राणीने आपला संघर्ष सुरूच ठेवला होता. १८२९ मध्ये राणीला पकडण्यात कंपनी सरकारला यश आले आणि त्यांनी तिला तुरुंगात ठेवले. तिथेच तिचे निधन झाले; मात्र रायण्णाने हार मानली नाही आणि संघर्ष सुरूच ठेवला. त्याला राणीने दत्तक घेतलेल्या शिवलिंगप्पाचा राज्याभिषेक करायचा होता; मात्र एप्रिल १८३० मध्ये त्याला पकडण्यात ईस्ट इंडिया कंपनीला यश आले. तब्बल सहा वर्षं त्याने कंपनी सरकारला झुलवले; मात्र जानेवारी १८३१ मध्ये वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्याला फाशी दिली गेली. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे आपल्याकडे पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते परंतु त्याआधी अनेक छोट्या-छोट्या संस्थांनांनी त्यांच्या परीने विरोध केलाच होता. राणी चेन्नम्मा आणि संगोळी रायण्णा हे याचेच ज्वलंत उदाहरण.
सामान्य घरात जन्मलेल्या संगोळी रायण्णा यांनी स्वतःच्या कर्तबगारीने फौजेत वरचे पद मिळवले होते. कंपनी सरकारने जुलमाने बळकावलेल्या जागा, भलेमोठे कर यांच्याविरुद्ध त्यांनी दिलेला लढा हा आजही प्रत्येक कन्नडिगाच्या मनात आहे. त्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात ईस्ट इंडिया कंपनीची बरीच हानी झाली होती आणि त्याचमुळे त्यांना नंदगडजवळच्या एका झाडावर फाशी दिली. नंतर त्यांचे दफन केल्यानंतर त्या जागेवर लावलेले वडाचे झाड आजही त्याच्या सावलीत बसलेल्यांना त्यांच्या कहाणीची जाणीव करून देत असते. बेंगलोरमधील तीन स्थानकांच्या नावांमध्ये बेंगलोर असल्याने अनेकदा घोळ होत होते. तेव्हा २०१५ मध्ये बेंगलोरच्या मुख्य स्थानकाचे नाव बदलून क्रांतिवीर संगोळी रायण्णा असे ठेवले तरीही त्याचा कोड जुना sbc असाच आहे. बेंगलोरमध्ये रेल्वेने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या माध्यमातून या वीराची आठवण तेवती ठेवण्यासाठीच हे नाव ठेवले असावे. मात्र बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा बस स्थानकाला ज्यांचे नाव आहे त्यांचा मात्र या शहाराशी थेट संबंध आहे – म्हणजे ते नसते तर हे शहरच नसते इतका हा घनिष्ट संबंध आहे. अर्थात मी बोलत आहे केंपेगौडा यांच्याबद्दल. १५१० मध्ये येलहंकामध्ये केंपनजे गौडा या येलहंकाच्या राजाच्या घरात जन्माला आलेल्या नाडप्रभू केंपे गौडा यांना त्यांच्या वडिलांकडून या संस्थानाची जहागिरी मिळाली. हे संस्थान विजयनगरच्या राजाच्या अधिपत्याखाली होते. आज बेंगलोरचे उपनगर म्हणून प्रसिद्ध असलेले येलहंका हे कोणे एकेकाळी बेंगलोरपेक्षा मोठे होते, प्रसिद्ध होते यावर आज विश्वास बसत नाही. सीमाविस्तारासाठी केंपे गौडा यांनी जंगलात असलेल्या डोमलूर या ठिकाणी ठाणे वसवले. (डोमलूर याच ठिकाणी बेंगलोरच्या इतिहासातला पहिला बहुराष्ट्रीय आयटी कंपनीचा प्रकल्प सुरू झाला होता. टेक्सस इन्स्ट्रुमेंट ही ती कंपनी होती). १५३७ मध्ये डोमलूर आणि येलहंकाच्या मध्ये एक छोटा किल्ला बांधून त्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या पेटे वसवून बेंगलोर वसवले. आता या नावाबद्दलची एक लोककथा प्रचलित आहे जी मी या लेख मालिकेच्या पहिल्या भागात सांगितली होती; मात्र बेगुर या ठिकाणी सापडलेल्या एका स्तंभावर बेंगळुरू अशी नोंद मिळते त्यामुळे बेंदीद काळू ऊरु ही लोककथा म्हणूनच ऐकायला छान वाटते असेही म्हणले जाते. विजयनगरचा तत्कालीन राजा अच्युतराय याच्या परवानगीने बेंगलोर किल्ला बांधायला सुरुवात झाली. आजचे चिक पेट आणि अव्हेन्यू रस्त्याच्या मध्ये हा बेंगलोरचा किल्ला होता. जरी मातीचा असला तरीही या किल्ल्यावर विजयनगर साम्राज्यातील इमारत शैलीचा प्रभाव होता. तिथे जो बाजार बसायचा त्याचे नाव त्या भागाला दिले होते – जसे अक्की पेटे – तांदुळाचा व्यापार करण्याची जागा, रागी पेटे – नाचणीचा व्यापार करण्याची जागा, बळे पेटे – बांगड्यांचा व्यापार करण्याची जागा, त्याच प्रमाणे विशिष्ट जातीच्या लोकांच्या राहण्याच्या जागा असणाऱ्या जागांना त्या त्या जातीचे नाव दिले गेले होते जसे – कुरुबार पेटे – कुंभार पेटे इत्यादी.
अच्युतरायाने या राजाला १२ गावे आणि प्रतिवर्षी ३०००० मोहरा, नवीन किल्ला आणि गाव वसवण्यासाठी दिले होते. अलसूर, बेगूर, वरथूर, केंगेरी, जिगणी, बाणवारा यांसारखी आज बेंगलोरचा भाग समजली जाणारी ही ती गावे होती. विजयनगरसारखे भव्य नियोजित शहर बांधण्याच्या ध्यासातून केंपे गौडा यांनी बेंगलोर किल्ला बांधला होता. या किल्ल्याला आठ दरवाजे होते. आजूबाजूच्या गावांमधील प्रशिक्षित, मान्यवर लोकांना या गावात राहण्याच्या सगळ्या सोई या राजाने दिल्या होत्या. हनुमान, गणपती यांची देवळे बांधली होती. गवी गंगाधरेश्वर हे प्रसिद्ध देऊळदेखील त्यानेच बांधले होते. त्याचबरोबर पाण्याची गरज भागवण्यासाठी अनेक तलावांची निर्मिती केली होती. असे म्हणतात की किल्ल्याची निर्मिती होत असताना एका बाजूची भिंत रोज ढळायची.अनेकांनी सांगितले होते तिथे नरबळी द्यायला हवा. राजाचा याला विरोध होता; मात्र त्याच्या एका सुनेने – लक्ष्मीम्माने – त्या बुरुजाच्या खाली स्वतःच तलवारीने शिर धडावेगळे केले आणि आश्चर्य म्हणजे त्या रात्री भिंत कोसळली नाही. राजाने मग तिच्या स्मरणार्थ एक मंदिर आणि स्मारक कोरमंगलामध्ये बांधले. आज तो मातीचा किल्लाही मातीत हरवला आणि तसेच लक्ष्मीम्मासाठी बांधलेले स्मारक एका बागेचा भाग झाले आहे.
विजयनगर साम्राज्याशी कायमचं प्रामाणिक राहूनदेखील केंपे गौडाला अच्युतरायानंतर राजा झालेल्या सदाशिव रायाच्या कोपाला सामोरे जावे लागले होते आणि त्यामुळे पाच वर्षं त्याने तुरुंगात काढली; मात्र त्यानंतर राजाने त्याला त्याची जहागिरी परत दिली आणि त्याने १५६९ पर्यंत मरेपर्यंत बेंगलोरवर राज्य केले. बेंगलोर किल्ला त्यांच्या घराण्यातच होता, १६३७-३८ मध्ये या किल्ल्याची मालकी विजापूर सलतनतीकडे गेली आणि ही कामगिरी फत्ते केली होती आपल्या शहाजी राजांनी. विजापूरपासून बरेच लांब असल्यामुळे विजापूर दरबारचा नाममात्र ताबा बेंगलोरवर होता. शहाजी राजे त्या अर्थाने बेंगलोरचे राजेच होते. याच किल्ल्यात शिवाजी राजांच्या सोयरा बाईसोबतच्या लग्नाचा जंगी सोहळा झाला होता. १६४८ पर्यन्त शहाजी राजे बेंगलोरमध्ये होते असे अनेक कागदपत्रांवरून समजते. त्यानंतर बेंगलोर किल्ल्याची मालकी अनेक हात बदलत राहिली आणि १७२८ मध्ये हैदर अलीकडे या किल्ल्याची मालकी आली. त्याने या किल्ल्याचा चेहरा-मोहरा बदलला. अर्थातच आज उभ्या असलेल्या काही भिंती, पडके बुरूज बघून कल्पना येणार नाही; कारण जितके उरले आहे त्याच्या कैक पट अधिक जमीनदोस्त झाले आहे, त्यावर नवीन इमारती उभारल्या गेल्या आहेत. इतिहास जमिनीत गाडून नवीन इतिहास रचला जात आहे.
हे गाव वसवून भरभराटीला आणल्याचे स्मरण कायम जागवत ठेवण्यासाठी बेंगलोरमध्ये केंपे गौडाचे नाव अनेक ठिकाणी दिलेले आहे. गमतीत आम्ही म्हणतोपण – काय नाव द्यायचे यावर एकमत झाले नाही की त्या वास्तूचे/ रस्त्याचे/ जागेचे नाव केंपे गौडावरून ठेवले जाते बहुदा. पाच-सहाशे वर्षांपूर्वी एक गाव वसवताना विजयनगरचा आदर्श ठेवलेले हे गाव आज जगभर कीर्ती गाजवत आहे.
तुमच्या गावातील किंवा तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या गावातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, वास्तू, रस्ता यांच्या नावामुळे तुम्हांला कधी अशी उत्सुकता वाटून तुम्ही त्या नावाचा इतिहास शोधायचा प्रयत्न केला आहे का?
केंपे गौडा
(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)
