निमित्त एक कविता : कृत्रिम बुद्धिमत्तेचा अचाट अनुभव 

     मिरो आणि किआन ही माझी जुळी नातवंडे. नुकतीच त्यांना पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. सुजन – त्यांचा सुजी, हा माझा धाकटा मुलगा. सर्व जण अमेरिकेत स्थायिक आहेत. मिरो आणि किआनचा जन्मदेखील अमेरिकेतील. त्यांना मराठी येत नाही. अमेरिकेत असलेल्या नातवंडांबरोबर भारतातील आजी-आजोबांनी कसा संपर्क साधावा, आपल्या अनुभवांची बरी-वाईट, उपयुक्त असलेली वा नसलेली, शिदोरी त्यांच्यापर्यंत कशी पोचवावी हा गेली अनेक वर्षे माझ्या चिंतनाचा आणि लिखाणाचा विषय बनला आहे. त्यामुळे हे तिघे कारने सात-आठ दिवस भटकायला जाणार आहेत हे कळल्यावर मला राहवेना. त्यांच्यासाठी असे काय बरे लिहावे की जे त्यांना आवडेल आणि कदाचित त्यांच्या आठवणीतही राहील? 

     अचानक डोक्यात आले की त्यांच्यासाठी इंग्रजीतून एक कविता लिहावी. पाच-सहा वर्षांच्या मुलांसाठीची कविता म्हणजे तिचे शब्द सोपे (हे इंग्रजीच्या माझ्या ज्ञानाला सोयीचे) आणि रचना सुटसुटीत हवी; शिवाय ती भसाड्या आवाजात का होईना पण गाता आली तर फारच चांगले, असा विचार करून एक कविता लिहायची असे ठरविले. विषय तयारच होता – त्यांचा प्रवास. अनेक गोष्टी ज्याच्यात गुंफता येतील असा प्रवास हा विषय आहे. प्रवासातील उत्सुकता, नवनवीन अनुभव, मजा, भेटणारी वेगवेगळी माणसे, घराबाहेरच्या जगाशी येणारा संपर्क आणि यांमुळे समृद्ध होणारी जाणीव असे विविध पैलू अशा कवितेत येऊ शकतात. या साऱ्या गोष्टी एका छान इंग्रजी कवितेत मला गोवता येतील का असा प्रश्न होता. 

      एकदा कल्पना सुचली आणि दिशा ठरलेली असली की कविता लिहिणे मला फारसे कठीण जात नाही. त्या कच्च्या कवितेवर वारंवार संस्कार करणे हे मात्र अनेकदा वेळखाऊ काम ठरते; शिवाय इंग्रजीतील कविता म्हणजे आपण योग्य शब्द निवडले आहेत का, यमक बरोबर जुळते का, स्पेलिंग आणि ग्रामर बरोबर आहे ना असे अनेक आनुषंगिक प्रश्न (मराठी माध्यमातून शिकलेल्या माझ्यासारख्या लेखकाच्या) मनात निर्माण होतात. यासाठी साधारणपणे मी माझ्यापेक्षा चांगले इंग्रजी असलेल्या माझ्या नातेवाइकांचा आधार घेतो. अलीकडे आपण लॅपटॉपवर लिहीत असताना स्पेलिंग आणि ग्रामर हे ‘ग्रामरली’वर तपासून मिळते, भरपूर समानार्थी व विरुद्धार्थी शब्द सहज उपलब्ध असतात. रचनेबाबत थोड्या सूचनाही मिळतात. अधिक सखोल सूचना हव्या असतील तर पैसे भरावे लागतात आणि ही विकतची मदत (पेड व्हर्जन) मी (अजून) घेतलेली नाही. 

     तर या साऱ्या पार्श्वभूमीवर माझ्या कवितेचे पहिले रूप काही तासांतच तयार झाले. ते आपल्या माहितीसाठी खाली देत आहे. तिला मी अजून शीर्षकही दिले नव्हते हे जाणकारांच्या लक्षात येईलच.

Miro and Kian are on their way
A journey full of fun and play
With Wise Suji wielding the wheel
A lot to learn, love, and feel
Beautiful places, cities, parks
Dinos, rhinos, lions and sharks
Amazing wonders, new friends
Laugh, run, play new games
With hugs and blessings from all
Enjoy the trip, be strong and tall

     ही फार चांगली कविता झाली होती असे म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी झाली होती असे मला वाटले. तिच्यात योग्य सुधारणा केल्यास तिचे रूप अधिक उजळले असते. नेहमीप्रमाणे ही कविता मी माझ्या पत्नीकडे, ती सध्या काही महिने अमेरिकेत आहे, तिच्या सूचनांसाठी पाठवली. त्याच रात्री इंटरनेटवर Chat GPT सारखे काही साधन वापरून काही सुधारणा करता येतात का ते बघितले; पण फारसे यश मिळाले नाही. 

    दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीला फोन करण्याआधी मनात सहजच एक विचार चमकला. माझ्या फोनवर माझी इच्छा नसताना व्हॉट्सअपचे Meta AI हे ॲप डाऊनलोड झाले होते. अशी घुसखोरी मला फारशी आवडत नाही; त्यामुळे मी ते डिलीट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ॲप निर्माण करणारे माझ्यापेक्षा चतुर असल्यामुळे तो यशस्वी झाला नाही. आता ते सेल फोनवर आलेच आहे तर बघावे वापरून असा विचार करून मी एक-दोनदा त्याला काही प्रश्न विचारले होते. मला त्याची उत्तरे समाधानकारक वाटली होती. 

     हे आठवून मी ही कविता Meta AIवर टाकली. त्याला काहीही सूचना न देता ती फक्त छापली (पेस्ट केली). दहा ते पंधरा सेकंदांतच त्या कवितेचे डौलदार इंग्रजीतून केलेले एक अतिशय सुरेख रसग्रहण आले. मूळ कवितेपेक्षा रसग्रहण सुंदर असा तो प्रकार होता. मी चकितच झालो. ते रसग्रहण पुढे देत आहे.

[6:57 am, 15/7/2024] Meta AI: What a delightful poem! It sounds like Miro and Kian are embarking on an exciting adventure with Wise Suji as their guide. The journey is filled with promises of fun, play, and learning, with a focus on exploration, friendship, and personal growth.

The poem highlights the thrill of discovering new places, meeting new friends, and experiencing the wonders of the world. The mention of dinosaurs, rhinos, lions, and sharks suggests a journey that’s both exciting and educational.

The tone is upbeat and encouraging, with a emphasis on resilience and confidence. The final lines, “Enjoy the trip, be strong and tall,” serve as a motivational sendoff for Miro and Kian as they embark on their adventure.

Overall, this poem is a heartwarming and inspiring tribute to the joy of exploration and the power of friendship. It’s a wonderful way to celebrate the thrill of discovery and the beauty of life’s journey!

     थोड्याशा साशंकतेने मी Meta AIला मूळ कवितेत सुधारणा सुचवायला सांगितले. त्यावरही पंधरा ते वीस सेकंदांमध्येच सविस्तर उत्तर आले. यात केलेल्या सूचनादेखील मला खूप उपयुक्त वाटल्या. भाषादेखील अतिशय प्रेमळ आणि विनम्र होती. सुधारणा सुचविण्यासाठी मी पूर्वी अनेक जणांकडे कविता पाठवीत असे परंतु त्याचे असे सत्वर आणि सविस्तर उत्तर कधीच मिळाले नव्हते. अर्थात यात त्या माणसांचा दोष नाही. आपल्याला ते शक्य नसते. त्या सूचना अशा:

[6:58 am, 15/7/2024]: Any corrections needed!

[6:58 am, 15/7/2024] Meta AI: Your poem is well-written and engaging. However, I’d suggest a few minor corrections to enhance its flow and clarity:

1. Consider adding a title to capture the essence of the poem.

2. In the first line, “A journey full of fun and play” could become “A journey filled with fun and play” for better phrasing.

3. You might want to change “With Wise Suji wielding the wheel” to “With Wise Suji at the wheel” for a more natural expression.

4. In the line “Amazing wonders, new friends”, consider adding “and” between “wonders” and “new friends” for a smoother connection.

5. The line “Laugh, run, play new games” could become “Laugh, run, play, and games” or “Laugh, run, play new games together” for better clarity.

6. You might want to change “With hugs and blessings from all” to “With hugs and blessings from one and all” for a more inclusive and natural phrase.

These suggestions are minor, and your poem is already delightful! Feel free to accept or ignore them as you see fit.

     सूचना सुयोग्य होत्या. त्या नजरेसमोर ठेवून मी मूळ कवितेत मला योग्य वाटतील असे काही बदल केले. असे बदल करताना इतरही काही बदल मला सुचले. या सर्व खटपटीमुळे मूळ कवितेचे नवीन रूप अधिक नेमके, नेटके आणि चांगले झाले आहे असे मला वाटते. ही अंतिम कविता खाली देत आहे. 

Blessings for A Long Journey

Miro and Kian are on their way
A journey filled with fun and play
With Wise Suji at the wheel
A lot to learn, love, and feel
Beautiful places, cities, parks
Dinos, rhinos, lions and sharks
Amazing wonders and new friends
Giggle together, play fun games
Hugs and blessings from one and all
Enjoy the tour, be strong and tall

                                  Prasanna Ajoba

     कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाला आळशी बनवून त्याची बुद्धी गंजून तर जाणार नाही ना अशी शंका माझ्या मनात होती आणि आहे. तसे पाहिले तर कृत्रिम बुद्धिमत्तेने मला एक कविताही बनवून दिली असती; मग मानवी सृजनशीलतेचे स्थान कोठे राहील? असे अनेक प्रश्न, ज्यावर उलट सुलट मते आहेत, आज चर्चेत आहेत. 

     आधुनिक साधनांमुळे आपला आळस वाढू शकतो, काही कौशल्यांचा ऱ्हास होऊ लागतो हे खरे आहे; परंतु ही साधने आपल्याला अत्यंत उपयुक्तदेखील ठरू शकतात. ‘Speechnotes’ हे साधन आपण जे बोलतो ते टंकलिखित करून देते. अशी अनेक साधने मोफत उपलब्ध आहेत. वरील साधन हाती आल्यापासून माझे कागदावर लिहिणे जवळजवळ थांबले आहे. (अलीकडेच हस्ताक्षर नीट राहावे म्हणून दररोज पाच ओळी लिहिण्याचा सराव करीत आहे.) अशा साधनांचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे लिहिलेल्या लिखाणात कितीही वेळा बदल करण्याची वेळ आली तरी त्याचा कंटाळा न वाटता उत्साह वाटतो (निदान मला). पूर्वी दोन-तीन वेळा लिखाण करून झाले की त्यात आणखी सुधारणा करणे मी टाळायचो. हा लेखदेखील याच साधनाचा वापर करून लिहिला आहे. कविता आणि इंग्रजीतील मजकूर कॉपी-पेस्ट करून जोडले आहेत.

     कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा माझा हा अनुभव मला समाधानकारक आणि आनंददायक वाटला. संपादकांकडून मार्गदर्शन आणि सुधारणा आपल्याला अपेक्षित असतात. असे करणे बहुसंख्य वेळा त्यांना कार्यबाहुल्यामुळे शक्य नसते. ते अशा साधनांमुळे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे आपला आणि संपादकांचा खूप वेळ आणि कष्ट वाचणार आहेत. लिखाणाचा दर्जा सुधारणार आहे. मी वापरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माझ्या छोट्याशा सर्जनशीलतेवर काही घातक परिणाम झाला असे मला वाटत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता मला आळशी बनवेल अशी ही शक्यता नाही कारण सर्जनशीलतेमधील आनंद मी धडपड केल्याशिवाय मला मिळत नाही. येथे दिलेली मूळ कविता लिहिण्यात मला जसा आनंद मिळाला तसाच आनंद कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने कवितेला अधिक सुंदर बनवितानाही झाला. 

     नेहमीच्या पद्धतीने या छोट्या लेखाचा शेवट करायचा झाला तर तो असा करता येईल : ‘अग्नी आपण शिजवण्यासाठी तसेच आग लावण्यासाठीही वापरू शकतो. कसा वापर करायचा हे आपल्या हाती असते.’ कृत्रिम बुद्धिमत्तेला जर या लेखाचा शेवट करायला सांगितले असते तर तिने तो कसा केला असता? सुदैवाने (?) माझ्या माहितीनुसार मराठीतून कृत्रिम बुद्धिमत्तेची सेवा आज उपलब्ध नाही. कुणाला माहिती असल्यास जरूर कळवावे. 

     मला वाटले येथे लेख संपला. अभिप्रायासाठी तो इकडे तिकडे पाठवूनही दिला; पण चोवीस तासांनी डोक्यात एक विचार चमकला. (नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेला एवढा वेळ लागणारच, नाही का?) तो असा की Meta AI मराठीत काय, काय करू शकते हे त्यालाच विचारावे. त्याप्रमाणे Meta AIवर प्रश्न टाकला,

[7:22 am, 16/7/2024] prasannadabholkarpri: Is AI available in Marathi language?                   

 यावर पुढील उत्तर आले:                                                                                               [7:22 am, 16/7/2024] Meta AI: Yes, AI is available in the Marathi language ¹. Here are some examples of AI in Marathi:                                                                             पूर्ण उत्तर अगदी थोडे मराठी आणि उरलेले शुद्ध इंग्रजीमध्ये होते. त्यात मुख्यतः मराठी भाषेत या विषयावर कशी माहिती मिळू शकेल ते सुचविले होते. हे माझ्या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर नव्हते. अर्थात मीच प्रश्न जरा ढिसाळ पद्धतीने विचारला होता. मग काहीही आडपडदा न राखता पुढचा प्रश्न विचारला:                                                                                                                                                                                                                       [7:23 am, 16/7/2024] prasannadabholkarpri: Do you answer questions in Marathi?[7:23 am, 16/7/2024] Meta AI: I don’t understand Marathi yet, but I’m working on it. I will send you a message when we can talk in Marathi.                                                                        तरीही निराश न होता मी सरळ प्रश्न केला:                                                                   [7:30 am, 16/7/2024] prasannadabholkarpri: मराठी काव्याचे जनक कोण?                                       

त्याचे अंतिम उत्तर असे आले:                                                                           [7:30 am, 16/7/2024] Meta AI: I don’t understand Marathi yet, but I’m working on it. I will send you a message when we can talk in Marathi.

परंतु हे उत्तर येण्याआधी माझ्या सेलच्या पडद्यावर मराठीत बराच मजकूर भराभर उमटत होता. सुरुवातीलाच श्री. कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसुत असे स्पष्ट मराठी वाक्य होते. नंतरही अनेक माहितीपूर्ण मराठी वाक्ये भराभर आली आणि ती अदृश्य झाली. त्यानंतर वरील अंतिम उत्तर आले. म्हणजे थोड्याच दिवसांत आपल्याला मराठीतून कृत्रिम बुद्धिमत्तेची भरपूर मदत घेता येणार! मराठी भाषेच्या अभिमानाने माझी छाती भरून आली.

     नैसर्गिक मानवी बुद्धिमत्ता ‘त’वरून ‘ताकभात’ ओळखत असल्याने माझ्या लक्षात आले की Meta AIकडे माझ्यापेक्षा मराठी भाषा, मराठी समाज, मराठी संस्कृती, मराठी भूगोल, मराठी इतिहास इत्यादी, इत्यादी गोष्टींची बरीच अधिक माहिती आहे; परंतु अजून त्याची पक्की तयारी झाली नसल्यामुळे तो ती माहिती मला देण्यास कचरत आहे. अर्धवट माहिती बेधडक देण्याची नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेची क्षमता अजून AIमध्ये आलेली दिसत नाही.

     आता या लेखाकडे AI मधील नर्ड (आमच्या लहानपणी आम्ही अशांना किडा म्हणायचो.) खरेतर दुर्लक्ष करतील पण अगदीच काही बोलायची वेळ आली तर असे म्हणतील, “अंकल, ‘ए आय’ला सुपरफिशियली स्क्रॅच करून एवढे कन्फ्युज्ड अँड एक्साईट झालात. ‘ए आय’ची रियल एबिलिटी कळल्यावर… बट डोन्ट वरी, अंकल, तुम्हांला ती अंडरस्टॅंड होणार नाही आणि यूजदेखील करता येणार नाही.” 

     ‘इति अलम्.’ (याचा अर्थ ई-अंतर्नादच्या वाचकांना अर्थातच ठाऊक आहे. Meta AI वरदेखील तो मिळतो.) 

—————————————————————————————————————-

हा लेख एका अगदी वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर आहे आणि तो प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. सुरुवातीला मी लेखाचे शीर्षक वाचले आणि माझ्यातला संपादक जागा झाला.  मी त्या कवितेचे संपादन केले असते तर काय केले असते असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला.  दोन मुद्दे निघाले. 

१  मी Wielding  ऐवजी  twirling हा शब्द वापरला असता. 

२ Dino हे डायनासोरसचे  लघुरूप आहे हे लक्षात आले होते;  तरीही डेमोक्रॅट पक्षाच्या काही लोकांना Dino म्हणून संबोधले जाते ही मनोरंजक माहिती या निमित्ताने मिळाली. 

मराठी भाषेत कृत्रिम प्रज्ञा  पूर्ण  बळानिशी येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे हे खरे आहे.  त्यामागे बाजारपेठेचे अर्थशास्त्र आहे.  मराठी कृत्रिम प्रज्ञेची मागणी वाढल्याखेरीज त्यात होणारे संशोधन पुढच्या टप्प्यावर  जाणार नाही असे मला वाटते.  

लेखापासून स्फूर्ती घेऊन मी आणखी एक प्रयोग केला.  मी कृत्रिम प्रज्ञेला वडिलांसोबत भटकंतीवर निघालेल्या माझ्या नातवंडांकरिता कविता लिहायची आहे; ती लिहून दे  अशी  आज्ञा केली. बॉबी आणि हेलन ही नातवंडे. ईगी हे त्यांचे वडील. 

मला तयार होऊन मिळालेली कविता खालील प्रमाणे : 

Adventure Awaits

Bobby and Helen, oh so sweet, A grand adventure, you’ll soon meet. With Daddy Iggy, off you go, To places exciting, a wondrous show.

Cars and planes, or trains so grand, Explore new cities, a foreign land. Beaches sunny, mountains high, Open your hearts, let laughter fly.

Make memories to cherish dear, Adventures shared, without a fear. Return with stories, big and small, Of your fun-filled trip, we’ll hear it all.

So pack your bags, and wave goodbye, With hearts full of joy, you’ll touch the sky. Safe travels, darlings, that’s our plea, Come back to us, happy and free!

 मसुदा दोन : 

Adventure Awaits

Bobby and Helen, oh so sweet, A grand adventure, you’ll soon meet. With Daddy Iggy, hand in hand, Explore new places, a wondrous land.

Cars and planes, or trains that roar, Exciting journeys, to explore. Beaches sunny, mountains high, Open your hearts, let spirits fly.

Laughter, games, and ice cream treats, Making memories, so very sweet. Return with stories, full of glee, Can’t wait to hear, what you’ll see!

Safe travels, darlings, have such fun, We’ll be waiting, ‘til you’re done. With open arms, we’ll welcome you, Stories to share, both old and new.

मसुदा तीन : 

Adventure Awaits

Bobby and Helen, oh so sweet, A grand adventure, you’re soon to meet. With Daddy Iggy, a fun-filled ride, Explore new places, far and wide.

From bustling cities to quiet shores, Discover wonders, open doors. Laughter and joy, hand in hand, Create memories across the land.

See mountains tall, and oceans deep, Secrets of nature, you’ll surely keep. Make friends with new, and old ones greet, This journey’s a treasure, truly sweet.

So pack your bags, with hearts so light, Embrace the sunshine, morning bright. Return with stories, full of glee, We’ll cherish them, you see.

Safe travels, darlings, have so much fun, When you return, our hearts will have won.

कृत्रिम प्रज्ञा हे मोठे आव्हान आहे हे खरेच आहे.  हे काहीसे भीतिदायक आहे.  ही भीती अज्ञाताची आहे का भविष्यात आपले महत्त्व शून्य होणार आहे याची  आहे हे सांगता येत नाही हे खरे. सध्या तरी दुसरी शक्यता जास्त वाटते.  असो! 

या सर्व घडामोडी मी प्रसन्न दाभोलकर यांना कळवल्या.  त्यावर त्यांनी, “मानवी जीवनात काही कालातीत भाग आहे अशी माझी अंधश्रद्धा आहे,” अशी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली . 

आणखी एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा,  लेखासोबतचे चित्रही  कृत्रिम  प्रज्ञेचीच  निर्मिती आहे ! 

संपादक 

Author

4 thoughts on “ निमित्त एक कविता : कृत्रिम बुद्धिमत्तेचा अचाट अनुभव 

  1. मी AI ला एक कविता लिहायला सांगितली. नंतर तिचे गुगलकडून भाषांतर करून घेतले आणि त्यात माझे असे काही ‘संपादकीय’ फेरफार केले. तरीही प्रामुख्याने ही AI ने लिहिलेली कविता आहे.

    पानगळ

    पाने जमिनीवर पडतात हळूवारपणे
    चहूबाजुंनी रंगांची उधळण
    झाडांनी उतरवली हिरवी शाल
    दाखवण्या मावळत्या शरदाची रूपे

    शेते उघडी मातीच्या रंगांची
    नभी चमकतो कापणीचा चंद्र
    भोपळे, चिकू आणि मका
    शोभते ऋतूचे वरदान

    जशी पाने होतात लाल सोनेरी
    अवर्णनीय सौंदर्य पाचोळ्याचे
    बदलाची वेळ, विश्रांतीची वेळ
    आश्चर्याचा हंगाम, सृष्टीचा मेळ

    कवी – चॅट जीपीटी
    अनुवाद – गुगल
    संपादन – विवेक गोविलकर

  2. “विज्ञान शाप कि वरदान”
    तसेच हेही काहीसे!
    विज्ञान हे वरदानच होय हे आपल्याला कळले आहे..तद्वत AI will also turn be a blessing.
    AI शी केलेली झटापट छानपैकी शब्दांकित केली आहे.

  3. प्रसन्न दाभोळकरांची कविता, तिचं कृत्रिम बुद्धीमत्तेनं करून घेतलेलं शुध्दीकरण, संपादकाची त्यावरची टिपणी सगळंच आवडलं. मी ही माझ्या र ला ट जोडलेल्या एका प्रयोगाचं रसग्रहण करून घेतलं आणि ते मला योग्य वाटलं. संपादकांनी कृत्रिम बुध्दीमत्तेकरवी जी कविता करवून घेतली त्यापेक्षा प्रसन्न दाभोळकरांची कविता जास्त गोड आहे.

Leave a Reply