संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला :भाग ८  वा

वामन पंडित

नटप्रसन्ना कविकामिनी ती| 

रसे भरे उत्तम वर्णकान्ति

टाकी विलासे सुपदावलीला

आकर्षि चित्ता रसिका सलीला

चालीत रीतीत चमत्कृतीत 

रसात, वेषात, मधु-ध्वनीत

सोडी न औचित्य कधीच ती ते

वक्रोक्तिही शोभवी फार तीते||

श्रीशारदास्तवात थोडा बदल करून कै. गणेश मोरेश्वर गोरे यांनी रचलेली  काव्यविशेष  सांगणारी ही रचना.

रसाळ, उत्तम वर्णरचना असलेली, तिचं प्रकटन हाच विलास.  चाल,  रस, ध्वनी, वक्रोक्तीसारख्या अलंकारांनी आभूषित असलेली ही शारदा! 

काळाबरोबर मराठी काव्यरचनेत परिवर्तन होऊ लागलं.  एकनाथांच्या कथाकाव्याने  कवितेचा परीघ मोठा झाला. मुक्तेश्वरांनी पांडित्याची डूब दिली. कवितेचं ओवीच्या परिघात फिरणं कमी झालं.  काव्यदृष्ट्या ती वयात येऊ लागली, मागच्यांचा (अध्यात्माचा) हात  सुटला नव्हता; तरी वयात येणाऱ्या षोडशेप्रमाणे  नाना वृत्ते, अलंकार, रस यांनी ती विनटली जाऊ लागली.  पंडिती काव्यात  आटापिटा, खटाटोप दिसतो अशी टीका सररास होते. ती फारशी योग्य वाटत नाही. लहान मूल एकदम धावायला लागत नाही. त्याचं लडखडत चालणं, तुरुतुरु धावण्याचा प्रयत्न करणं हे जसं  कौतुकाचं असतं तसंच हे पंडिती काव्य! कवितेच्या विश्वातलं हे महत्त्वाचं पाऊल आणि पर्व आहे. 

या काव्यशृंगारात मोलाचं योगदान वामन पंडितांचं.  हा लेख फक्त काव्यसौंदर्य रसग्रहणाचा असल्याने वामन आणि वामन पंडित एक की दोन ही चर्चा  न करता वामन पंडितांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या रचनांचा विचार इथे केला आहे. विद्वान, न्यायतर्क- व्याकरणशास्त्रपारंगत, वेदान्तविद्यानिष्णात आणि सगुणोपासक असं हे विलक्षण व्यक्तिमत्त्व.  श्रोत्यांना, वाचकांना भक्तिमार्ग दाखवावा ही काव्यरचनेमागची तळमळ. 

ओवी छंदासह विविध वृत्तांत वामन पंडितांनी काव्यरचना केली. नामसुधा, निगमसार, चित्सुधा, सीता स्वयंवर, यथार्थदीपिका यांसारखे ग्रंथ  रचले.  त्यांची कविता  नादवती, अर्थवती आणि ध्वनिवती आहे.  नाद निर्माण करणारी, अर्थवती म्हणजे बाह्यार्थ स्पष्ट असलेली आणि  ध्वनिवती म्हणजे आंतरिक आशय वेगळा असलेली.

 ‘टिळक घरी आहेत का?’  या प्रश्नाला पगडी दिसत नाही हे उत्तर  ध्वनिसूचक.

ते श्वान एक तुकड्यास्तव चार नाना

दावी धन्यास जठरार्थ कसे पहाना

दे आळवूनि जरि हस्ति-प बाप भाई

घे तोंच घास गजराज कशी बढाई

कुत्रा पोटासाठी मालकाच्या पुढे पुढे करतो.  हत्तीही पाळलेलाच; पण त्याला मात्र माहूतच चुचकारून जेवायला घालतो. यात न चा अनुप्रास नादानुकारी, बाह्यार्थ सोपा; पण लोकांसमोर गोंडा घोळणारे आणि मानी यांच्यातला अंतस्थ फरक   कुत्रा आणि हत्ती यांच्या दृष्टान्तातून स्पष्ट करत नाद, अर्थ आणि ध्वनित होणारा अंतर्गत अर्थ यांचा सुरेल मेळ साधला गेला आहे. 

वामन पंडितांची  कविता हा   व्यापक विषय आहे. त्यांच्या कवितेचा तीन भागांत  आस्वाद घेऊ या. पहिल्या भागात वामन पंडितांची यमकं,  दुसऱ्या भागात इतर अलंकार आणि तिसऱ्या भागात त्यांनी  विविध वृत्तांत केलेल्या रचना असा हा पट. 

 यमक म्हणजे काय? 

यमौ द्वौ समजातो तत् प्रतिकृति यमकमिति। 

सोप्या भाषेत ‘ट ला ट, री ला री’ याला यमक म्हटलं जातं;  शेवटची दोन्ही अक्षरं सारखी पण भिन्न अर्थांची यायला हवीत  तर ते यमक होतं;  वामन पंडितांनी अशी द्व्यक्षरीच काय पाच अक्षरी यमकंही अगदी सहज गुंफलेली आहेत. या यमकांत संस्कृतप्राचुर्य आणि मराठी भारदस्तपणा दोन्हींचा मेळ दिसतो. याची चुणूक :

 सीता लोपामुद्रेला वनातल्या आठवणी सांगत असते. 

रामासमवेत वनवासात असताना सीतेची अवस्था कशी होती? 

श्वशुर दिन-मणीही होय एणांक भाऊ

न कळत जन ऐसे क्लेश निःशेष भाऊ’

राम सूर्यकुळातील म्हणून सूर्य हा ‘तापट सासरा’  असूनही रामाच्या संगतीमुळे तो एणांक वाटतो… एण म्हणजे हरीण! अंक म्हणजे मांडी. ज्याच्या मांडीवर हरण आहे असा म्हणजे चंद्र… मला सूर्यही चंद्रासारखा म्हणजे मृदू भाऊ – भावासारखा भासतो. पुढे ती म्हणते, लोकांना वनात राहणं हे माझे क्लेश वाटत असतील तर असा भाव( भावू-भाऊ) वाटू दे! 

दुःखात श्रीकृष्णच आधार असतो हे बिंबवताना वामन पंडित म्हणतात, 

चिंता तयाला मग कासयाची

कास आणि कासया हा मेळ  चपखल साधला आहे!

हिरण्यकश्यपू भगवंताचा दुःस्वास लोकांसमोर मांडीवर थाप मारून  ‘मांडतो.’ 

‘दाखवी त्वरित ठोकुनि मांडी, 

द्वेष विष्णु-चरणांप्रति मांडी’ 

वाणी म्हणजे वाचा आणि कमतरता (वाण)  अशी एकाच शब्दातून दुहेरी विणेची घातलेली  गुंफण — 

भविष्यानुरूपें वदे विप्र-वाणी

नसे तर्जनाभर्जनालागी वाणी 

यमकांची अशी अर्थपूर्ण, कधी आल्हाददायक, कधी धक्कादायक अशी सरमिसळ काव्यात आढळते. 

चुळबुळे निसटे करि तांतडी

असुर, तों हरि काढुनि आंतडी

हरीवरचं त्यांचं  विशेष प्रेम यमकांत उमटतं. 

अही तोही पाहे अवसर डसायास हरिला

परंतु श्रीकृष्णें भ्रमण करिता गर्व हरिला|

हरि शब्दाच्या दोन अर्थांचं हे विणकाम. 

एके दिनीं मनिं धरूनि असें हरी तो| 

चाले प्रभात समयीं खळ जो हरीतो||

वर्णनात काही अकल्पित यमकेही  येतात. 

‘ज्या प्रमाणे’ आणि ‘जेवतो’ यांचा  यमकात गुंफला गेलेला संबंध –  वनसुधेतलं हे यमक कवीच्या भाषाप्रभुत्वाचं द्योतक आहे. 

असे कर्णिका अंबुजामाजि जेंवी|

मुलां मध्यभागीं बसे कृष्ण जेवी||

मुखीं ग्रास सप्रेम घालूनि हातीं|

दहीं भात हे देव लीलां पहाती||

समुद्रमंथनाचा प्रसंग  रंगवताना राया ही दोन अक्षरे त्यांनी चपखलपणे चारही पंक्तींत  वेगवेगळ्या पद्धतीने योजिली आहेत  :

शर्व-कंठ-विष गर्वराया

शक्त नामचि तुझें रघु-राया 

सेतु-सागर कपीतराया|

नाम सेतु भव सिंधु तराया

वानरांना लंकेत उतरायला जसा समुद्र धावून आला तसं  भवसमुद्र तरायला नाम धावून येतं. यमकाने अलंकृत करून नामाचं गोड अमृत त्यांनी पाजलं आहे. 

वनी खेळती बाळ ते बल्लवांचे हे अतिशय मधुर काव्य. 

स्व-कौशल्य  ज्या गुंज माळांत नाना

गळां घालिती ते करीती तनाना(आलाप घेतात.) 

स्वभावोक्ती अलंकाराला गेयतेसह यमकाची नादमधुर साथ! अशी ही पंडिती काव्यसुमनं सहज कंठस्थ होतात. 

‘वना धाडिलें जेधवां रामराया|

तुवां हेतु केला स्वभर्ता मराया| 

अशा शब्दांत भरत कैकेयीप्रतिचा संताप व्यक्त करतो. 

 ‘रामानिमित्तें जननीस टाकी|

पाणी न पी राज्य-नदीतटाकीं

तिथलं पाणीही पिणार नाही –  टाकी आणि तटाकी अशा यमकातून भरताचा कठोर निश्चय व्यक्त होतो. 

 कैकेयीच्या दुष्ट भावे जळाला

इच्छी रामाच्या पदाच्या जळाला… 

कैकेयीच्या द्वेषभावामुळे संतप्त झाला… जळालाच,  आता तो रामाच्या पदतीर्थाची – जळाची अपेक्षा करत आहे. जवळ मधला ज आणि जळ मधला ज अशा उच्चारी फरकाच्या यमकामधून भरताच्या मानसिक स्थितीचं ते हुबेहूब वर्णन करतात.

बुडे क्ष्मा तयीं उद्धरी जो क्षमेला

तया क्रोड-रूपें हिरण्याक्ष मेला 

हिरण्याक्षाला वराहरूपात येऊन मारले हे सांगताना क्ष्मा(पृथ्वी) क्षमेला, हिरण्याक्ष मेला अशी यमकयोजना बहार आणते. 

 द्व्यक्षरी, त्र्यक्षरी यमकांवर ते थांबले नाहीत. चतुराक्षरी यमकंही त्यांनी काव्यमालेत ओवली. 

धांवोनि लावी पहिलें करातें|

श्रेष्ठत्व दे त्या अजि लेकरांतें

परोपरी खेळति जी वनांत|

अर्पून चित्तें जगजीवनात||

वनीं देखती मेघनीळास मोर

प्रमोदें करी नृत्यलीला समोर||

तयासारखे नाचती तोक सारे

खुणावूनि अन्योन्य कीं “तो कसा रे?” 

तोक म्हणजे लहान मुलं. तोक हा फारसा न वापरलेला शब्द इथे अगदी चपखल ठरला आणि सुंदर यमकही देऊन गेला. नृसिंहावतार प्रसंगातही तोक शब्दाची निराळी झलक दिसते. 

स्व-चरण-शरणातें  सौम्यही शीघ्र तो कीं

जननि-भय मनीं कां मानिजे व्याघ्र तोकीं
वाघाच्या बछड्यांना आईची भीती वाटत नाही तसंच शरण आलेल्याप्रति श्रीकृष्णाचं सौम्य रूप दिसतं;  हे समजवण्यासाठी वाघाच्या बछड्यांचा हा चपखल दृष्टान्त! 

बल्लवबाळे पक्ष्यांच्या सावलीचा वेध घेत धावत असतात, हंसाचं चालण्याची नक्कल करत असतात असं सांगत

‘जे लाधले हंसगुरूगतीतें| 

अशी सोऽहं हंसः या आध्यात्मिक अनुभवाची झेप घेतात. 

 वनात खेळणाऱ्या या सवंगड्यांचं चित्त श्रीकृष्णाठायी वाहिलेलं होतं हे स्पष्ट करण्यासाठी योजलेलं यमक :

परोपरी खेळति जी वनांत

अर्पून चित्तें जगजीवनांत

संस्कृतप्रचुर मराठीचं सौंदर्य त्यांच्या रचनांमधून दिसत राहतं. श्रीकृष्णाची पुष्पहार धारण केलेली मूर्ती कशी आहे 

आ-पाद माळा प्रभुकृष्णजीची

सुधा पिती षट्-पद कृष्ण जीची

इथे ‘जीची’ हे मराठी प्रमाणलेखनदृष्ट्या चुकीचे आहे; पण काळे भुंगे या अर्थाने उपयोजिलेला षट्पद कृष्ण हा शब्द मोहवणारा आहे. 

लोपामुद्रा आणि सीतेच्या संवादात सीता म्हणते, 

घरिंहुनि मज बाई सोहळे काननाचे

स-जल-जलदसंगें मोर वो का न नाचे

मेघांनी भरून आलेलं आभाळ पाहून मोर का न नाचे? (म्हणजे नाचेलच) असा प्रश्नालंकार लेववत  काननाचे या शब्दाशी  यमक जुळवले आहेच; शिवाय सजल जलदसंगे अशा मालिनी वृत्तातील गणयोजनेत छेकानुप्रासाचेही योजन केले आहे.

धरि मदर्थ असा व्यवसाय कीं

दश-मुखा वधि राघव सायकीं

व्यवसाय आणि धनुष्य या अगदी भिन्न शब्दांची सांगड घालून चतुराक्षरी यमक त्यांनी खुबीने रचले आहे.

रज, अग्रज, नीरज असे शब्द  गुंफून एक यमकमाला त्यांनी  रामप्रेमाला वाहिली आहे. 

घालूनि घे भरत देखुनि त्या रजातें

शत्रुघ्नही अनुसरोनि निजाग्रजातें

चित्तीं स्मरे प्रभुचिया पद-नीरजातें

प्रेम-प्रवाह नयनीं सुख-नीर ज्या तें||

श्रीराम पित्याचं कुशल विचारतात… 

‘पिता सुखी कीं म्हणतांचि रामा|

रडोनि त्या सांगत सूपरामा’

उपरम म्हणजे विराम पावणे. सु+ उपरम = सूपराम  म्हणजे उत्तम मरण येणे.  सूपरामा असा संधि करून रामाशी यमक  जुळवणं हे कवित्व! 

कीं वर्णितां या निगमागमातें

संतोषलों मी वर माग मातें

किंवा

राक्षसी जरि म्हणोनि जन नीची

दे मुकुंद पदवी जननीची

अशा  लालित्यपूर्ण चतुराक्षरी यमकांप्रमाणे पंचाक्षरी यमकाचीही कमाल करतात. 

म्हणे कृष्ण त्या बाळसंतां पहा रे|

अरे या स्थळी सर्व संताप हारे||

यमकाचा आणखी एक प्रकार म्हणजे 

आदियमकचरणात आरंभी दोन सारखी अक्षरे आली की आदियमक अलंकार होतो.

गजगती जगतीप्रति दाविते

वसुमती सुमती सुख भावितें

स्वतनुजा तनु जाणतसे धरा

नवरि ते वरिते मणिकंधरा||

गेयतेच्या, पाठांतराच्या आणि रसाच्याही दृष्टीने आदियमके आनंददायी ठरतात.

उमजला मजला हरि ज्या मुखें

गुरुच तो रुचतो हृदयीं सुखें

शिकवणे कवणें मज त्याविना

निजपणी जपणी जड दाविना

अमर तो मरतो अति लौकरी चपळ तो पळतो धरितां करीं उसळला खळ लाघवि लक्षणी विलपती लपती सुर त्याक्षणीं

विविध शब्दांचाच नव्हे; विविध प्रकारच्या यमकांचा हा चढवलेला साज! 

ओळीच्या मध्यावरचं यमक म्हणजेच मध्ययमक साधण्याचीही किमया ते करतात. 

जे सर्व लक्षण विचक्षण आणि सत्कुलीना|

ऐकोन कोण नवरी न वरील तूतें|

 धरी लक्षी पक्षी कर-तल-युगीं पाद-युगळा|

 येथे सुजाणपण जाण तुझें बुडाले|

धरा माता भ्राता शशिच सविता होय दिवसा|

न कल्पांतीं पावे निधन, धन विद्याभिध असे|

अश्वघाटी यमक हा आणखी एक प्रकार त्यांच्या काव्यात दिसतो. घोड्याच्या टापांसारखी लय असलेले हे यमक. मदिरा छंदातली  रचना

तो दशकंठ अकुंठ विसां भुजि

ते विषकंठ-धनू उचली|

कष्टत कोष्टवरी द्विज ओष्ठहि चावुनि ज्या जरिने खचली||

यमकाचा आणखी एक वेगळा प्रकार दामयमक! दाम म्हणजे दोरी.  पंक्तीच्या  शेवटची काही अक्षरे, पुढच्या पंक्तींच्या सुरुवातीला वेगळ्या अर्थाने योजिली जातात. दोरीने खेचून पुढे आणली जातात.   शिखरिणी वृत्तातील गजेंद्रमोक्षाची रचना दामयमकात आहे. 

नसे ठावा ब्रह्मा, न शिव, अथवा श्रीपति हरी (अर्थ श्रीकृष्ण) 

हरी (घालवी) जो तापातें उचलुनि कृपा-सिंधु-लहरी 

हरी  वाटे काळा(यम) करिस(हत्ती) , वि-पती(गरुड) मृत्यु-भुजगा(साप) 

जगाचा तूं ऐसा धणि कवण तो पाव मज गा|

 सत्यभामेची समजूत काढतानाच्या प्रसंगात ‘शिरा’  या अक्षरांतून वेगवेगळे शब्द साधलेलं दामयमक विलक्षण आहे. 

जयीं श्री-वत्सांकप्रभु करि निजांक स्थित शिरा| (शिरा अर्थ डोके) 

शिरा-नाडी-प्राण प्रगटति न लावूनि उशिरा|

शिराणी शब्दांची पुरवि तरी डोळे न उघडी|

घडी जों मानाची विघडली असे तोंवरि घडी|

उघडी, अवघडी, घडी (वेळ), विघडली, अधरा, धरापृष्ठ, अंबुजधरा( हातांत कमळ धरलेला श्रीकृष्ण), धरावे

असे वेगवेगळे अर्थ सांगणारे वर्ण एकत्रित आणून शाब्दिक चमत्कृती ते करतात. 

न तोडि तें खड्ग रुते न भाला

भा लागते कीं तम हो नभाला

पुष्पयमक हा आणखी वेगळा प्रकार. 

प्रत्येक ओळीत काही अंतरावर यमक साधलं जातं ते पुष्पयमक. 

वंशी नाद-नटी|तिला कटि-तटीं

खोवोनि पोटी-पटीं

कक्षे वाम-पुटीं स्व-शृंग निकटीं

वेताटिही गोमटी

जेवी नीर-तटीं तरू-तळवटीं

श्री-श्याम-देहीं उटी

दाटी व्योमघटी सुरां सुख-लुटी 

घेती जटी धूर्जटी 

किंवा 

घे हातीं कवळां मनांत कवळां त्या सुंदरा गोवळा

चित्तालागिं वळा स्वसत्व निराळा, घ्या सावळा कोवळा;

कीर्तीचा धवळा सुखाब्धिधवळा जो भक्तिचा जांवळा

प्रेमातें ढवळा उठे कळवळा त्या प्रीतिनें आंवळा

भाषांतरित काव्यातही

मज्जत्वम्भसि  यातु मेरुशिखरं शत्रुं जयत्वाहवे

याचा अनुवाद करताना  पुष्पयमकाची योजना करून अर्थाला पदलालित्याची जोड दिली आहे. 

अब्धीमाजिं बुडो प्रयत्न करुनी हेमाद्रिशृंगी चढो

शत्रूतें रगडो रणीक्रयकृषिव्यापारकर्मीं भिडो|

विद्या सर्व पढो कडोविकडिच्या व्योमास लंघो उडो|

जे होणार चुकेचिना विधिबळे कोणी रडो ना रडो||

तृष्णां छिन्धि भज क्षमां जहि मदं पापे रतिं मा कृथा:

 याचा समवृत्त अनुवाद  शार्दूलविक्रीडितात करतानाही ‘टी’कारी

पुष्पयमकाची सुंदर रचना त्यांनी केली आहे.

तृष्णेतें निपटीं क्षमेस जवटी

गर्वादिकातें पिटीं

सत्यातें उमटीं हृदंबुजपुटीं सेवा दया गोमटी|

विद्वत्स्नेह तुटी नको करूं भलें त्यांच्या गुणातें लुटी

वंशी कीर्तिवटी उभारि अरिषड्वर्गास तू आपटी 

स्रगधरेसारखं अवघड वृत्त, पुष्पयमक यांची अतिशय गोड रचना गुणगुणत राहावी अशी.  (चाल – ध्याये नित्यं महेशम्) 

पादांगुष्टींच गंगा त्रिभुवनपतिचें नाम हें अंगअंगां

जे कां व्यापि विहंगासननखशिख ते दाखवी अंतरंगा

गंगा ही पापभंगा परि हरुं न शके वासनेच्या कुसंगा

हस्तीही तत्तरंगीं धुति विषयदिवा इष्टचित्तापतंगा

विद्वज्जड अशा या भाषांतरातून  सर्वसामान्य वाचकाला अर्थबोध होणं शक्य आहे का? याला काव्यदोष म्हणावे का? शारदेचा वरदहस्त असलेल्या वामन पंडितांना शब्द वश होते. शब्दांच्या फुलोऱ्यातून वाचकांना शिकवण देण्याबरोबरच  यमकांनी समजवण्याचा नाद त्यांना होता. या नादात ते थोडे वाहवले जातात.  श्रीकृष्णाच्या वेणूपेक्षा आपला आवाज मोठा नको म्हणून ढग हळूच गर्जना करतात – 

हळुहळू घन गर्जतसे नभीं

मुरलिहूनि चढेल म्हणोन भी||

असं यमक इतर  यमकांच्या तुलनेत ओढूनताणून आणलेलं वाटतं. 

शिरीं बांधिती मोर-पत्रे विचित्रें

शरीरावरी रेखिती दिव्य चित्रें

मोर-पत्रे विचित्रें, दिव्य चित्रें हे  यमक साधण्यासाठी मोर हा मराठी शब्द आणि पत्र हा संस्कृत शब्द असं गुंफून थोडा आटापिटा केला आहे. भुजंगप्रयातातील लघु गुरू गुरूमध्ये मयूर बसत नव्हता आणि पत्रे हा शब्द हवाच होता यमकासाठी; मग मोर – पत्रे – मोराची पत्रे अशी गमतीशीर रचना झाली. 

गोपबाळे जेवायला बसली आहेत. सगळ्यांनाच हरिमुखदर्शन हवं आहे. वामन पंडित  वर्णन करतात;

हरी कर्णिकेच्या स्थळीं मध्यभागी

मुलें भोंवतीं ऱ्हस्वदीर्घें विभागी

ऱ्हस्व दीर्घामध्ये विभागली म्हणजे काय?… उंचीप्रमाणे विभागली. भागीचं यमक साधणे, भुजंगप्रयातात बसवणे या दोन कसोट्या साधण्यासाठी मुलांना ऱ्हस्व आणि दीर्घ करणे ही कसरत केली आहे 

बासरीच्या सुरांची किमया सांगताना 

मोहती व्रजपशू मृग गाई|

असं म्हणत पुढे

आमुचे नवल काय अगाई|

पाचारितो ‘वेणु-रवेंचि गाई|

आश्चर्य तेव्हां करितों अगाई’

असं यमक तयार करतात. 

यमकाचा हा अट्टाहास कधीकधी दुर्बोधता आणतो. संस्कृतप्रचुर भाषा आणि संधि यांनी काव्य लगेच कळते असे नाही. भरताने पादुका मागितल्यावर

‘पादुका जडित आणुनि हातें|

रामचंद्र – चरणांबु-रुहांतें|

लावुनी निज- शिरीं भरतानें|

वंदिल्या रघुवरांघ्रि-रताने|

चरण-पाय, अंबु-पाणी, रुह- कमळ

म्हणजे रामाची पदकमले

मस्तकी लावली… कोणी? रघुवर+अंघ्री+रत = रामाच्या पायाशी रत असलेल्याने म्हणजे भरताने! 

नृसिंहावतराची कथा रंगतदार आहे; पण यात त्यांनी एरवीच्या भारदस्त भाषेशी तडजोड केली आहे. 

याचा वधी जो चुलता सखा रे|

हा त्यास पूजी तुम्हि यास खा रे||

दांतें नखें पर्वत-शस्त्र पातें|

मारा म्हणे स्त्वर निःस्त्रपातें||

 सख्खा ऐवजी सखा हा भिन्न अर्थी शब्द वृत्तासाठी बसवणं, ‘खा रे’ या यमकानंतर पर्वत-शस्त्र-पातें- निस्त्रपाते(त्रपा – संकोची) हे भारदस्त यमक तर गमतीशीर वाटतं.  

दामयमकाच्या मोहात पडून त्यांनी  शब्दांची मजेशीर मोडतोडही केली. वळी हा शब्द कसा उपयोजिला आहे  :

शिळा-चुंबी(लोहचुंबक)  लोह

भ्रमवि तिज येतांचि जवळी

वळी तैशी माझी मतिहि हरि ते त्यास कवळी

वळी पोथ्यांच्या ह्या तुम्हि असुर-रीती शिकवितां

वितां व्यर्थें काव्यें अ-लवण हरीवीण कविता

पहिल्या वळीचा अर्थ वळणे, पुढे ‘ओळी’ऐवजी दामयमकासाठी वळी लिहिणे, शिकविता मधला विता घेऊन विणे(व्यायली) या अर्थी कविता विणे हे क्रियापद करणे, अलवण- मीठ नाही अशी हरिवीण अळणी कविता ही ओढाताण ठरते. 

धराया माझा हा कर कपटि कैंचा जनमला|

मला जो निंदूनी कुसुम तिस देऊन रमला

 शिखरिणी वृत्तात आणि दामयमकात  बसवण्यासाठी जन्मला चा जनमला असा आटापिटा केलेला दिसतो. 

वनसुधेत येओ ऐवजी 

यो मला सुखचि दुःख न यो जी 

वासना जन मनिं असि योजी

अशी शाब्दिक कसरत केली आहे. 

मात्र काव्यहेतूचा संदर्भ ध्यानात घेतला तर ही कसरत वावगी वाटत नाही. 

भर्तृहरीच्या नीतिशतकाचे भाषांतर करताना वामन पंडित म्हणतात, 

जधीं कांहीं कांहीं ‘हरि कवि’ असे शब्द शिकलों 

तधीं मी सर्वज्ञ द्विप-सम मदें याच भरलों

जधीं कांही नेणे म्हणुनि वदले पंडित मला

तदा माझा गर्व-ज्वर सकळही हा उतरला

भाषांतर स्वातंत्र्य घेत वामन पंडित म्हणतात, संस्कृतातले  केवळ हरि, कवि असे शब्द चालवायला शिकल्याने मला गर्व चढला होता; पण काही पंडितांनी याला काहीही येत नाही असं स्पष्ट म्हटल्याने गर्वाचं घर खाली झालं. हा अर्थातच वामन पंडितांचा विनय आहे; मात्र वामन पंडितांच्या साहित्याची व्याप्ती पाहता मला खरोखरच त्यांच्या लेखातील ‘हरि कवि’ चालवण्याइतपतच माहिती आहे असं वाटतं; तरीही मला लाभलेला आनंद, त्यांच्या रचनांतली मौज वाचकांसमोर ठेवायचा हा प्रयत्न. 




Author

Leave a Reply