शाळेची दप्तरं तितकी भारदस्त नव्हती म्हणून असेल कदाचित – तेव्हाचं शाळेच्या प्रेमात असणं काही औरच असायचं – सगळ्यांचंच! हुशारांचं तर साहजिकच; पण साधारण बुद्ध्यंकाचे विद्यार्थीपण अगदी जीव तोडून शाळेसाठी करायचे सगळं – अगदी खोडसाळ विद्यार्थीपण. शाळेचं मैदान झाडायला अजिबात लाजायचं नाही. कुणी झाडं लावायचे, कुणी रांगोळी काढायचे, सुविचार लिहून फळा रोज रंगवायचे – किती काय काय. शिक्षकांवर अपार श्रद्धा असे. सत्तरच्या दशकातला काळ होता तो. गोष्ट तशी फार जुनीही नाही.
आजही ते चित्र माझ्या डोळ्यांपुढे जसंच्या तसं उभं राहतं. साठ विद्यार्थ्यांच्या वर्गात शिक्षक मन लावून मराठीचा धडा शिकवत आहेत आणि सगळे समजून घ्यायची धडपड करताहेत – काही न काही कारणाने; कुणी गुणांसाठी – हिशेबी मनाने; कुणी मनापासून – श्रद्धापूर्वक; कुणी केवळ भिडेपोटी – समजत नसेल तरी. या साठ मुलांच्या वर्गामध्ये तीही असायची एक. शाळेच्या पटावरची एक साधीसुधी निर्व्याज सोंगटी – विदुला! नावापासून सगळंच विशेष तिचं. एक हात बाकावर कोपरात दुमडून तळहात कानशिलावर ठेवत विदुला अवखळ नजरेने शिक्षकांचं शिकवणं ऐकत असायची ती; तशी स्मरते अजून. एक पाय बाकावर अर्धी मांडी घालून तर दुसरा पाय हलवत एका नादात असायची. मला त्या अवखळपणाची गंमत वाटे. कुणीही पाहिलं तर चेहऱ्यावर भाव खोडकर, मनात प्रचंड मिश्किली भरलेली. कुणीतरी आपल्याकडे पाहावं, आपल्या गमती समजून घ्याव्यात आणि छुपे बालीश खेळ खेळून पाहावेत. खोड्या नुसत्या! पण ती कधी कधी आश्चर्य वाटेल अशी खरोखर तल्लीन व्हायची. त्या तल्लीनतेत ती मास्तरांना एखादी बालसुलभ शंकाही विचारत असे. असा भाषेचा मनमुराद आस्वाद कुणीही घेऊ शकतं; पण विदुलाच्या खोडकर स्वभावामुळे कुणाला ते खरं वाटेल तर शपथ ! त्या तंद्रीत ती चक्क शिक्षकांना प्रश्नही विचारायची. कौतुकाने तेही खूष व्हायचे.
तिच्या खोडसाळपणाला न शोभणारं तिचं रूप होतं. लांबसडक दोन वेण्या पाठीवर मजेत रुळत असायच्या, त्यांना लाल रिबिनी लावून दोन झुबके सोडलेले! डोलताना मोठे लयदार दिसत. उन्हात लाल होणाऱ्या स्वच्छ गोर्यापान रंगावर गुलाबी छटा खुलून दिसे. तिच्या टपोर्या वेधक डोळ्यांमुळे पाहणारा आधीच घायाळ होत असे. नितळ कांती, हसरा मनमिळाऊ चेहरा, बऱ्यापैकी उंची आणि या सर्वांवर कडी म्हणून दोन गालांना पडणाऱ्या मनमोहक खळ्या दिसल्या की शंभर गुण जमा होत असत! या सौंदर्यखुणांनी तिला देवानेच अधोरेखित केलं होतं. मुख्य म्हणजे त्याची तिला पुरेपूर जाणीव होतीही आणि नव्हतीही; म्हणजे माहीत असूनही तिला अजिबात गर्व नव्हता. शाळेचा गणवेश पांढरा शर्ट आणि खाकी स्कर्ट असा साधा असला; तरी त्यातसुद्धा तिचं सौंदर्य खुलून दिसायचं. मला ती आठवते ती चौदा-पंधरा वर्षांचीच. खात्यापित्या घरची सुदृढ लेक होती ती. तिचा चंचल स्वभाव अर्धवट वयाला साजेसा होता; पण त्याचबरोबर त्या वयाशी विसंगत ताईपणाची जात्याच समजपण होती तिच्यात. इतर मुलींना तिचा फार आधार वाटे. जसं काही शाळा म्हणजे एखादं शिबिर आहे आणि तिच्यावर मुलींची जबाबदारी आहे;
पण ती शाळा होती आणि पर्यायाने आजच्या इतका नसला तरी अभ्यास असायचाच आणि अभ्यास एक संकटकथा होती तिच्यासाठी. का लिहायचं इतकं? आणि काय लिहायचं? हे कायम प्रश्नचिन्ह ती मनात मिरवत असे. मान तिरपी करून लिहितानाची ती आजही स्मरते मला. तिरक्या बसक्या गोलगोल अक्षरांत खूप काही लिहिल्याचा भास असे; पण त्यात खोटेपणा अजिबात डोकवायचा नाही. प्रामाणिक मुकाटपणा होता त्या अक्षरात. अभ्यासात मन रमवायचा प्रयत्न ती आटोकाट करीत असे; पण गणित आणि विज्ञानाच्या तासांना मात्र तिचं लक्ष उडायचं; मग खोड्या चालू होत. शेजारच्या मुलीचं अवधान निरागस हसून ती आपल्याकडे वेधून घेत असे. वह्यांचे मागचे कागदच्या कागद मग फुल्लीगोळ्यांनी भरले जात. चौकोनातली घरं मिळवता मिळवता तीच मनात घर करून बसायची विदुला! शिशुवर्गापासून पाहत होते तिला – जवळून.
तेच टपोरे डोळे. गोड हसू. वेधक नजर. बाकी काही छक्केपंजे, आगापिछा राजकारण नसलेलं मन – सहज जोडलं जाईल असं. मैत्री करायला पुरेसं मटेरियल. हातांत हात गुंफून मिरवावं अशी मैत्रीण. शाळेच्या पटांगणात रिकामटेकडं तिच्यासोबत हिंडायचं म्हणजे अगदी बिनधास्त वाटे. तिच्या डोक्यात मात्र सतत काहीतरी चालूच असायचं. शाळेबाहेर सगळ्या दिशांना गुलमोहराची उंचीपुरी झाडं होती. त्यांचा चांगला डेरेदार लाल मंडप असायचा शाळेभवती चारी बाजूंनी. त्या गुलमोहराच्या कळ्या गोळा करायच्या, त्यांचे हत्ती करायचे. ते हत्ती तिच्या शेजारच्या लहान मुलीच्या बाहुलीच्या लग्नासाठी हवे असायचे. रुखवतापासून सगळं ही करायची – आणि सहजपणे. त्या गुलमोहराखाली निष्काम पडलेल्या वाळक्या मोठ्या शेंगा म्हणजे तिच्या फुलदाणीतली सजावट. त्या रंगांमध्ये बुडवून सुकवायच्या आणि त्यांची जुडी शोभेच्या वस्तूंमधे दाखल व्हायची. हस्तकलेच्या तासाला ती आमची लीडर असायची. कार्यानुभव म्हणून एक वर्ग असे. तेव्हा बाई मुलींना पदार्थ करायला शिकवायच्या; ते तेवढं मन लावून ऐकायची ती. अशी सुबक आणि रुचकर बिस्किटं करायची की बाई खूश व्हायच्या. मुख्य म्हणजे तिच्या एकूण सगळ्या कामातच अतिशय कल्पक मांडणी, नेमकं आणि एखाद्या कसबी गृहिणीला साजेसं वर्तन असे. तिच्या समजदार जाणिवांसोबत राहायचं म्हणजे मला तर तिच्याबरोबर अक्षरश: धावावं लागे. माझ्या कल्पनाविश्वाकडे अतीव प्रेमाने पाहत ती म्हणे, “अगं छान आहे हे सगळं; पण दुनिया इतकी आयडियल नाही गं जशी तुला भावते आहे! खूप काही मनाला न पटणारं आहे या जगात. तुझ्या वाट्याला येऊ नये तसं; पण आलं तर मी सांगते तसं ते स्वीकारत जा; नाहीतर झुगारून दे; पण निराश होऊ नकोस.” शालेय गुणांची फारशी फिकीर न करणारी विदुला खांद्यावर हात ठेवून कधीकधी जीवनाचं असं अगाध तत्त्व सांगून जात असे की अभ्यासाचा निकष बदलावा असा मला मोह पडे! जीवनाशी त्या अबोध वयात तिने अशी काही सलगी केली होती की मला तर कधी कधी तिचा हेवा वाटायचा. सांगायचे तिला, ‘बाई मला पण जमू दे गं हे सगळं नावडत्या विश्वातलं काम;’ मग अगदी चांदणं पडल्यासारखी मनमोकळं हसायची – फक्त हसायची – अगदी खळ्यांसकट.
शाळेची श्रमदान शिबिरं भरत असत तेव्हा, दोन-तीन दिवसांची. तशी सगळीच मुलं अर्धवट वयातली; पण काही मुली जाणिवा जाग्या होऊन सावध राहू लागलेल्या. काही अनभिज्ञ. विदुला अशा मुलींना जिवापाड जपायची अशा कॅंप्समध्ये – आई होऊन जायची, कसलाही अभिनिवेष न धरता मदत करायची. जगात लागतो तो सावधपणा तिच्या ठायी ठायी होता. कॅंप्समध्ये फावल्या वेळात काही खेळ खेळायला परवानगी असायची. सागरगोटे खेळताना, पत्ते खेळताना तिचं प्रसंगावधान पाहावं कुणी. तिची हुशारी कुठे कुठे लपली आहे ते पाहताना थक्क व्हायचे मी; मग तेव्हा ते खेळ खेळताना एरवी कायम पुढे असणार्या पहिल्या दुसर्या नंबरातल्या मुलीही वचकून असायच्या; पण कुणाशीही पटकन मिसळून घेण्याचा तिचा स्वभावच होता. ‘त्यात काय गं तुम्ही चांगले नंबर आणून आमची कॉलर टाइट करता तसंच आहे माझं,’ असं म्हणत हसतहसत खेळात जिंकून निघून जायची. प्रत्येक वर्गात एक टारगट मुलांचा पक्ष असतोच. बाकीचे त्यांच्या सहसा वाटेला जात नाहीत. आमच्याही वर्गात होता – अगदी मुलींचाही होता; पण विदुलाला त्यांच्यातही मानाचं स्थान होतं. त्यांना शांत करणं, खोड्या थांबवणं, मारामार्या थोपवणं, समजावणं सगळं ती स्वत:हून करायची. कुणाला वगळणं तिच्या स्वभावातच नव्हतं. अगदी घरातल्या वस्तूंनापण ती जीव लावायची. तिखटामिठाच्या मिसळणीच्या डब्यावरपण! बोटांमध्ये जादू घेऊन आलेली सुगरण ती. परिसासारखा कोणताही पदार्थ सोन्यासारखा करायची. एक दिवस दुपारी अशीच स्टीलचा उभा डबा घेऊन ती दरवाजाबाहेर टकटक करत होती. आई म्हणाली, “बघ गं आत्ता कोण आलंय.”
दरवाजा उघडताच समोर विदुला उभी .
“आई ,विदुला आलीय. काय आणलंस गं आत्ता?”
“हे तुझ्याकरता मटण.”.
“अगं मी सहज म्हणाले असेन, खाऊन बघितलं नाही कधी. तू लगेच आणलंस पण! कमाल आहेस अगदी.”
“ए शाणपणा करू नको आता.” लाडाने म्हणाली, “राणी, तुझ्या एका भांड्यात ओत हे. मला डबा परत दे.” खासगी आवाजात म्हणाली, “मी बनवलंय स्वत:” वय वर्षे सोळा! विदुला मटण अतिशय रुचकर करत होती याचं मला जाम अप्रूप वाटलं. ‘आईला स्लीपडिस्क आहे ना! तिला स्वयंपाक- घरकाम करताना त्रास होतो; मग मीच करते सगळं घरात. मला सगळा स्वैपाक येतो,’ असं सांगत होती. मैतर म्हटलं की अपेक्षा आल्या, रुसवेफुगवे त्या अनुषंगाने आले पाठोपाठ. विदुलावर फार रुसताच यायचं नाही; कारण एक दुर्मीळ अशी स्वयंभू कला तिला अवगत होती. आपण तिच्यावर रुसलो असू नाहीतर रागावलेले असू. तिला दुरूनपण समजायचं सगळं. जोडलेलंच तसं होतं ते. मोठ्या टप्पोर्या डोळ्यांनी आलिंगन द्यायची तिची कला मला फार आवडे. रागाचं वितळलेलं पाणी डोळ्यांनी वाहू लागलं की विदुला धावत यायची जवळ घ्यायला, “अगं राणी नको गं रागवू माझ्यावर. मी असा अडाणी गोळा! तुमच्यावर सगळी भिस्त असते माझी.” मला जाम हसायला यायचं – म्हातारीसारखं ते अडाणी गोळा वगैरे ऐकून. लोभस हसत एक अशी गिरकी घ्यायची की शप्पथ! मराठी सगळ्या नट्या फिक्या पडायच्या. संपला आमचा उरलासुरला राग.
मला आजही आठवते ती लख्ख. शाळेच्या त्या इवल्याशा पटांगणात शालेय क्रीडास्पर्धा घेतल्या जात. डॉजबॉलच्या स्पर्धेत तिचं नाव कोण द्यायचं माहीत नाही. सांगायची पण नाही आम्हांला. थेट पटांगणात रिंगण आखलेलं असायचं तिथे ती दिसायची. आमचा हुरूप वाढायचा. तिला दुरून हाका मारून शुभेच्छा द्यायचो. गोड हसत खळ्यांनी अर्धी स्पर्धा खिशात घालायची. बॉल एका हातात सरळ रेषेत गरगरत ठेवत अचानक समोरच्या टीममधल्या गाफील खेळाडूवर जाऊन नेमका आदळे. आऊट ! आम्ही किंचाळायचो. तिची सहज बॉल हाताळायची लकब खास होती एकदम. लक्षात राहील अशी. तिच्या हातात बॉल बघून विरुद्ध टीममधल्या मुली टरकून असायच्या. कप घेतला की निरागस हसत फोटोत सहजपणे खाली गुडघे दुमडून बसलेली आठवते मला. असं सगळं मनापासून काम होतं ते !
तिची ती पटकन गुडघे दुमडून बसायची सवय फार आठवणीत राहिलीय माझ्या. पावसाळ्यात अशीच आली होती एकदा – बुडलेला अभ्यास लिहून घ्यायला. गणितं समजत नाहीत म्हणून रेंगाळली होती. नुकताच पाऊस थांबला होता. खिडकीत पागोळ्या अजूनही ठिबकत होत्या. छत्री व्हरांड्यात निथळत होती. मी अवघड गणितं एकदम नको म्हणून हलकं तेवढं उचललं आणि तिला समजावू लागले. विदुल हे किती सोपं असतं बघ. ती मांडीवर हात दुमडून माझ्या वहीत एकटक बघत होती. खरोखर गंभीर असल्यासारखी. मला गलबलून आलं. एकदम अलाबला घ्यावीशी वाटली. तिला आपलं कौतुक होणार तेपण नेमकं समजायचं आणि लहान निर्व्याज मूल होऊन हसायची निरभ्र. तिला प्रेमाने केसांवर हात फिरवत म्हणाले, “राणी, यावेळी चांगले मार्क हवेत हं आम्हांला. मी सांगते तेवढंच कर. बस्स.” तिची आता गणितात तंद्री लागली होती. पावसानंतरचा गार वारा खिडकीतून आत झेपावत होता. ती शांत शहाणी मुलगी विदुला इथे काळजात छळ मांडते आजही…
आम्ही सगळेच मोठे होत होतो. तारुण्यात पदार्पणं चाललेली जिकडेतिकडे. बहर नुसता – आमच्यापुरता. आपल्यातच मश्गूल राहायचे, आरशासमोर बडबडायचे, मुरकायचे ते दिवस. त्या मंतरलेल्या दिवसांची साक्ष ठेवून सांगते विदुलाला आपल्याहून जपावंसं वाटायचं. कारणंच तशी होती. तिच्या तारुण्यसुलभ छटा जगाला जाणवू लागल्या होत्या. तिच्या कानावरच्या अवखळ बटांना पत्ताच नसायचा घायाळांची काय दशा होत असे त्याचा. ती एकदम बेधडक असायची अन् बेफिकीरपण. वर्गातली मुलंपण वयात येत होती. त्यांच्यातही कुजबूज चाले; पण ही सगळ्यांशी एकाच मोकळेपणाने वागे. मी तेव्हा अचंबित असायचे तिचं धाडसी वागणं बघून. तिच्या शब्दांत सांगायचं म्हणजे, ‘अगं घरी नसतात का पुरुष? बाबा, भाऊ, काका, मामा; मग हे कोण खास?’ तो मुलांबरोबर वागण्यातला आपपरभाव तिने कधीच डिलीट केला होता. तेव्हाच. तो निष्कपट धीटपणा तसाच तिने कायम राखला.
मुलगी खरोखर गुणी होती. अभ्यास नाही जमत कोणाकोणाला. त्याचं काय एवढं? हा काय जगायचा निकष नाही असू शकत. रस्त्यात कोणी बाई भाजी घेताना भाव समजायला उतरवायला कच्ची पडत असेल तर ही मध्ये पडून भाजीवाल्याशी बोलून कमी करायला लावायची. झाली ओळख! अशी विदुला जगन्मित्र होती. तिच्यासोबत बाहेर पडलं की मला सेलिब्रेटी फील यायचा. याला लांबून हात कर, त्याला हाक मार! इथे डोकाव – तिथे शिर. हात पकडून न्यावं लागायचं तिला. एकदा आईसोबत बाजारात भेटली होती. ती तिच्या आईबरोबर, मी माझ्या. लग्न ठरलंय हे लाजत सांगत होती. केळवणाला घरी बोलवायचं होतं मला; पण वेळच नव्हता तेवढा तिच्याकडे. पुढच्याच आठवड्यात लग्न आहे म्हणाली. आईची फार आवडती विदुल. घर कसं सांभाळावं याची समज किती लहान वयात आहे याचं आईला फार कौतुक वाटायचं. काही वर्षांनी समजलं की ते लग्न तिने मोडलं. ऐनवेळी पळून गेली एका मुसलमान मुलासोबत. का बरं असं केलं असेल तिने? खुशीत तर दिसली होती; प्रेमविवाह होता म्हणे त्यांचा. असो. प्रेमात आणि युद्धात सारं माफ. नंतर तर सुखात होती ना! मी तिथेच थांबले; पण गोष्ट नाही ना संपत तशी.
मध्ये आयुष्याने खूप वेग घेतला – तिच्या नि माझ्याही. कोणी कोणाच्याच संपर्कात नव्हतं. मी तरी नव्हतेच. शक्यच होत नव्हतं. सगळे आपापल्या दिशांना पांगले होते. शाळा सोडून बरीच वर्षं झाली असं मात्र जाणवत होतं. आमची मुलं मोठी होत होती. पुढे मी वेळ काढून एकेक शाळकरी सोबती शोधले. तिला पहिलं शोधायला घेतलं; पण ती सापडेचना. प्रचंड शोधसत्रानंतर ती सापडली. फोन झाले. जिवात जीव आला. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अलीकडे फक्त फोनवर बोलणं व्हायचं. इकडून तिकडे. या हृदयीचं त्या हृदयी देणं झालं, रागरुसवे झाले,नाकदुर्यापण! आमची दिलजमाई डोळ्यांनी व्हायची खरंतर; पण साजरी भेट होत नव्हती आणि त्यासाठी ताणून धरण्याइतका कोणाला वेळही नव्हता.
आम्हां लाडक्या मैत्रिणींचे फोनवरच तासन्तास मनसुबे चालायचे – यंव करू त्यंव करू या. खयाली मनोरथ ते! कधी मधूनच फोनवर म्हणायची, ‘रेट ऑफ चेंज ऑफ’ अशी काही व्याख्या वगैरे होती का गं आपल्याला?’
‘हो होती.’ मला कोडं पडायचं, ‘का गं बाई आज हे चॅनल?’
‘च्यायला तेव्हा नाही आठवलं. आठवलं असतं तर तुझ्यापुढे नसते गेले मी? आता असं काय काय आठवतं मधूनच.. मला ते रेट ऑफ चेंज ऑफचा रिदम आवडला. पुढे काय असेल ते तू बघ. ही ही…’ मग खूप वेळ नुसता झर्यासारखा खळखळाट ऐकू यायचा हसण्याचा. तिला ते का आठवलं आज? इतका प्रश्नपण उमटला नाही माझ्या मनात तेव्हा…
आता विषय बदलले होते गप्पांचे. मोठ्या झालो होतो नं आम्ही. गृहिणी वगैरे… मग पाककृती फिरायच्या एकमेकींकडे. तिच्याकडे लज्जतदार नवीन काहीतरी असायचंच. कुणी पटकन आलं तर करायला काय काय रेसिपीज पुरवत राहायची मला. एकदा असाच तिचा फोन वाजला, “काय करतेयस?”
“आराम करत्ये. तू बोल,” दुपारची सुस्ती घालवायच्या प्रयत्नात बोलले.
ती अगदी भर उत्साहात बोलत होती. खूप दिवसांनी उलगडलेल्या पैठणीसारखा अनुभवी गंध होता तिच्या स्वगताला; वाटलं फक्त ऐकावं… ती सांगत होती, “तुला मालवण बघायचंय ना? मी घेऊन जाईन तुला. माझी एक मावशी आणि काका राहतात. दोघंच असतात. त्यांना पण बरं वाटेल आणि तुलाही राहायला घर मिळेल. मी फिरवेन, दाखवेन तुला सगळं. आमचा रवळनाथ, नवलाई पावणाई आणि भरपूर देवळं. काजू-आंब्यांच्या बागा बघू. लाल माती तुडवू. मलाही बरीच वर्षं झालीत गं जाऊन. लग्नानंतर माहेर अंतरावर गेलं गं; पण मी आनंदात आहे. तसं काहीच कमी नाहीये इथे आणि कितीही मिळालं तरी कमीच असतं नाही का!”
… ती म्हणाली म्हणजे ती असेलच आनंदात. माझापण जीव भांड्यात पडला. असा फोन झाला की दोन-दोन दिवस ठाण मांडून मनात असायची ती. मनाला अलगद सोडून यायचे मी तिच्यासोबत – मालवणात. लाल मातीत पाय रंगेपर्यंत यथेच्छ भटकायचो दोघी. मालवणी मसाल्यात बुडलेली मासळी व्हायचो आम्ही. तिचं वरळीजवळ घर होतं सांगायची. भर मुंबईत एक मुसलमान घर. घरात बरेच प्राणी पाळलेले. बकरे, कोंबडे वगैरे घरीच आणून कापायचे ते लोक. ‘मला सवय झाली गं आता. इतकी वर्षं झाली ना. तुला नाही का झाली? तू काहीच खायची नाहीस. वरणभाताचं वातावरण तुमचं. मीच मटण दिलं होतं पहिलं तुला; पण सवय मोठा उपाय असतोय सगळ्यावर. होते गं सवय. आणि ती केली की होतेच. तेच सोयीचं होतं. आपल्याला आणि सगळ्यांना पण. बेगम म्हणतात मला घरी. माहितेय का? मला सुरुवातीला मुमताज महल बेगम वगैरे वाटायचं शहाजहानची. पोरकटपणा आपला!’ पुढे हसू ऐकू आलं; पण बिनखळखळाटाचं. थोडं इकडचं तिकडचं बोलून ती म्हणाली, ‘एक कासव पण पाळलंय आम्ही. माहितेय का’!
मला आश्चर्यमिश्रित कुतूहल वगैरे.. ‘ बापरे ! काय खातं गं ते ?’
उत्सुकता वाढवत ती म्हणाली, “पिंपात ठेवलंय सध्या. घरभर फिरतं ते एरवी.”
मी प्रयत्न करत होते कासव फिरतंय घरात ते डोळ्यांसमोर आणायचा. मला तर कमालच वाटली तिची… “मुलं पण खेळतात का तुझी त्याच्याशी?” मी सहज बोलून गेले.
“मुलं? अगं, आम्हांला मुलं नाहीत. आम्ही असंच राहायचं ठरवलंय – कायम तरुण,” आणि खिन्न हसली.
“बरं, तुमचा निर्णय आहे. मी काहीच बोलणार नाही.”
“अगं असं काही नाही. बोल की. सगळ्यांचं खूप बोलून झालंय. आता वीस वर्षं झाली ना लग्नाला!”
“आता काय बोलू मी; म्हणून म्हणाले असू दे. आहेस तिथे मजेत राहा. बस्स!”
“खरंच गं. राहूच दे. नको तो विषय. मला मुलं किती प्रिय होती तुला माहीत आहे. तसंच कारण म्हणून निर्णय घेतला आम्ही, ” ती शांतपणे म्हणाली.
क्षणभर बेचैन शांतता पडदा पडल्यासारखी पसरली.
“विदुला…” माझा आवाज शांतता कातरत गेला.
“हमें बच्चे नहीं होंगे! नवरा म्हणाला तेव्हा खूप प्रेमात होते नं मी, त्याच्या एका वाक्यावरून मला समजलं गं हे नकोय आपल्याला. बस्स. तय किया!”
तिच्या सहजपणाची ती परिसीमा होती. तशीच होती विदुला. खरीखुरी. शाळेच्या अभ्यासक्रमात नसलेला धडा शिकायला मिळाला होता तरी धीटपणे वाचत होती. आत्मसात करत होती. तय किया म्हणे ! कसं पचवलं असेल तिने ?
“राणी! तुला भेटावंसं वाटतं खूप.” म्हणत मी खोल रडत होते एकटी आत. तिला पत्ता लागू न देता.
“मला पण गं.” तिचा आवाज घोगरा झाला; पण तरी पुढे म्हणाली, “कधी भेटू या? जरा काही कामं निपटवते इथली मग मी मोकळीच असते तशी. नोकरी करत होते. ती सोडली. आता आराम;” मग नेहमीसारखं फोनवरच आभासी- आभासी शाळेत होतो आम्ही काही काळ. या खिडकीतून त्या खिडकीत डोकवत होतो. कुणाकुणाला टपला मारत होतो – ज्या राहून गेल्या होत्या. जुने खेळ, टाइमपास उजळले. काही जुनी रहस्यं, बिंगं ती उकलून सांगत राहिली. मी नेहमीसारखी अचंबित होऊन ऐकत राहिले.
मध्ये पुन्हा काही काळ उलटला. आभासी गप्पा, फोन होत राहिले जमतील तसे. शाळेला पन्नास वर्षं होताहेत म्हणून मोठा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आखला जात होता. सर्वांना आवाहन होतं काही ना काही कार्यक्रमात भाग – जबाबदारी घेण्यासाठी. विदुला अर्थातच संयोजकांमध्ये एक होती. हा कार्यक्रम चुकवायचा नाही म्हणून खास पुण्याहून मी मित्रांबरोबर सकाळीच थडकले मुंबईत. प्रवेशद्वाराशी मोठा लाल बिल्ला मिरवत विदुला उभी होती स्वागताला. इतक्या वर्षांची साचलेली भरतभेट झाली आमची. रडत-हसत पुन्हा पुन्हा गळामिठी होत होती. दिवसभर ती आसपासच रेंगाळत होती. तिच्या खळ्यांवर मी अजूनही फिदा होत होते. त्या भेटीच्या स्मृती किती काळ मनात आल्हाददायक रेंगाळत राहिल्या.
पुढे पाचसहा महिने माझे फार व्यग्र गेले. अजिबात डोकं वर काढायला सवड होई ना. तशातच दिवाळी झाली. नवं वर्षं उजाडलं. तीन जानेवारीला मात्र तिचा वाढदिवस मला पक्का आठवला. प्रेमळ दहशतच असायची ती शाळेत असताना. “ए, माझा वाढदिवस लक्षात ठेवा गं, जमलं तर भेटी पण आणा,” धमकवायची हसतहसत. पैसे पॉकेटमनी कोणाकडे असायचा एवढा? पण आणायचो जमेल तसं. सगळं आठवत आपल्यालाच आठवलाय असा आनंद होत काहीशा अपराधी मनाने पहाटेच शाळेच्या ग्रुपवर मी तिला शुभेच्छा पोस्ट केल्या. मनात घोकत राहिले आपण फोनपण करू; मग नेहमीप्रमाणे रांग लागली शुभेच्छू मित्रवर्गाची. तिच्या उत्साही स्वभावाला शोभेल अशा प्रत्येकाच्या शुभेच्छा आल्या की लगेच तिचे धन्यवाद यायचे दरवर्षी; पण शेवटच्या माणसाचे रात्री आलेले शुभेच्छा कार्डही तिने पाहिले नाही; भीषण वाईट म्हणजे आम्हां कुणाच्याच ते लक्षात आलं नाही. आश्चर्य म्हणजे प्रत्येकाला वाटलं की ती कामात व्यग्र असेल. रिटर्न आभार व्यक्त करेल दुसर्या दिवशी. कसं असतं ना पण!
दुसरा दिवस उजाडतो तो नवी दिशा नवे विचार घेऊन. मागच्यावर नवी पोस्ट येऊन नवा पत्ता दाबला जातो आणि आधीचा विनाकारण दबलापण जातो. चार-पाच दिवस सरले आणि एका रात्री घाबरल्यासारखा आमच्या तिसर्या मैत्रिणीचा मेसेज आणि पाठोपाठ फोन घणघणू लागले, ‘अगं विदुला गेली गं आपली…’ आयुष्यात मरण हे कोणालाही नकोसंच असतं. सगळे त्यालाच टाळत असतात. जेव्हा आपल्या आवडत्या माणसाची मृत्युवार्ता येते तेव्हा ती आदळतेच म्हणते मी. मरणाची फार चीड येते तेव्हा. इतकी का घाई होती ? आणि कोणालाच काहीच माहीत नव्हतं! काय झालं असेल तिला? पण जीवनाचे पसारे कोणाकोणाचे लवकर आवरून होत असावेत. माणूस रिकामं राहू नये कधी. खरंच!
माझी पंचेंद्रियं क्षणभर सुन्न झाली. पुढे केवळ यांत्रिक हालचाली झाल्या असाव्यात. मेसेज पाहणे. त्रोटक मिळालेली बातमी. कॅंसरचं दुखणं तिच्या मरणाचं प्रयोजन ठरलं. ग्रुपवर सगळे आभासी बोलत होते. रडत होते. RIP VIDULA फुलं हार…काय हे! मी लांब होत गेले क्षणात त्या आभासी जगापासून; वाटलं कुठे आलोय आपण! इतकं आभासी झालोय आता? आणि याच जगाने दुर्लक्ष केलं तिच्याकडे. तिला किती त्रास झाला असेल कल्पनाही करवत नव्हती. अलिप्त असहाय मी मागच्या मागे फेकल्यासारखी गेले कुठेतरी. कुठे होते मी? मी यात कुठेच नव्हते. दूर कोकणात मालवणात होते – तिच्या गावात – दुस्तर घाट ओलांडून – तिच्याबरोबर. सागुती, आंबोळ्या चापत होते. कुठल्या कुठल्या बारवा, कुंडं दाखवत होती ती. केसांत सुरंगी माळली होती तिने. पांढरा चिकनचा कुरता -सलवार तिला कोकणातल्या लाल मातीवर शोभून दिसत होता. तिच्या गोबर्या गालांवर सूर्याचे मऊ रेशमी किरण पडून गाल गोरे तांबूस झळाळीचे दिसत होते आणि गालावरचे ते दोन खड्डे हसर्या विदुलाचं सौंदर्य द्विगुणित करत होते. उष:प्रहरी शीतल वार्यावर तिच्या बटा कानाशी लाडीगोडी लावत खिदळत असाव्यात. त्यांना आजही बघणार्या घायाळांची अजिबात फिकीर नव्हती – ती कधी असायची म्हणा!
तेवढ्यात एक लहान गोंडस मूल कुंडाच्या कोपर्यात बसलेलं तिला दिसलं. घाईने ती त्याच्या जवळ गेली. ‘आलाश का माझ्या मागे मागे? च्चला. आपण मावशीला फिरवून आणू.’ मग हास्याची लकेर एक गहिरा निवांतपणा आकारत आसमंतात निनादली. गंमत म्हणजे ते बाळपण खळखळून हसलं आणि तो दुणा झालेला तिचा आनंद सोनेरी झालर लागलेला फक्त मी पाहिला. फक्त फक्त मी…
