रसिकत्वाची साधना हवी.
‘जयपुर लिटफेस्ट ‘ हा विचार प्रवर्तक लेख आवडला. या संमेलनाचा जरूर अभ्यास व्हायला हवा पण त्यापूर्वी मराठी समाजात अभ्यासू वृत्ती निर्माण व्हायला हवी. मराठी भाषेच्या अभिजात स्वरूपाला मान्यता मिळण्यासाठी हरी नरके यांच्यासारखे साहित्यिक, विचारवंत आयुष्यभर झगडत राहिले. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमाकडे मराठी समाज झुकत चाललेला आहे. माझे इंग्रजी भाषेची अजिबात भांडण नाही. परंतु या माध्यमात शिकलेल्या उच्चशिक्षित तरुणांना इंग्रजी भाषेची गोडी लागली का ?तर हे चित्र फारसं सकारात्मक नाही. त्यामुळे त्यांच्याकडून इंग्रजी साहित्य फारसे वाचले जात नाही. आणि मराठी साहित्य वाचण्याएवढी मराठी भाषेची ‘जाण’ निर्माण होऊ शकत नाही. अर्थात यालाही अपवाद आहेत; परंतु ते अपवादच!
साहित्य काय किंवा कला काय याविषयी बौद्धिक सजगता, आवड निर्माण व्हायला हवी. शांताबाई शेळके म्हणत असत,” कलावंत साधना करतो तशी रसिकत्वाची देखील साधना असते.” कलावंत आणि रसिक समपातळीवर आले तरच उच्च दर्जाची कला निर्मिती होऊ शकेल. माझ्या कामामुळे माझा अनेकांची संबंध येत असतो; त्यावेळी निराशा जनक चित्र समोर येते. टीव्हीवरचे ‘हास्यजत्रा’ सारखे कार्यक्रम सहकुटुंब बघितले जातात.पुरुषांनी साड्या नेसून अंग विक्षेप करणे यात कुठला विनोद आहे?
आपण पैसे मिळवणारे’ रोबो’तयार करतो आहोत असे वाटते. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या आणि पुढे तेथेच स्थायिक झालेल्या किती जणांना पर्ल बक या लेखिकेची ,समाजकार्यकर्तीची माहिती असते?
कलेच्या क्षेत्रातही थोडेफार हेच बघायला मिळते. काही सन्माननीय अपवाद वगळता संगीतातील कलावंतांना इतर क्षेत्रांत काय चालू आहे याची फारशी माहिती नसते. अशी माहिती करून घ्यावी असे वाटतही नाही. संगीत रंगभूमी आपल्याच मर्यादांमध्ये अडकून पडली आहे. प्रायोगिक रंगभूमी अजून पाय रोवून उभी राहिली नाही. चित्र-शिल्पकलेकडे आपण रसिकांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अशी ही नकारात्मक यादी खूप वाढवता येईल.
मुखपृष्ठ उत्तम. सर्व लेख वाचनीय आहेत. हेमंत जोगळेकरांच्या कविता मी पूर्वी वाचल्या आहेत. ‘ मोठी माणसे’ विषय जवळचा वाटला. त्यात ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांचा उल्लेख आहे. ‘आनंद यादव आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ किंवा ‘नयनतारा सहगल’ या घटना दुर्दैवीच म्हणायला हव्यात. अशा घटना घडत असतील; तर ‘जयपुर फेस्टिवल’चा अभ्यास आणि विचार अजून कोसो दूर आहे.
शैला मुकुंद.
