ईश्वरभक्ती, अध्यात्म वगैरे 

भारतीय समाजात पूर्वापारपासून धार्मिकता कमी-अधिक प्रमाणात बहुसंख्य लोकांमध्ये असल्याचे दिसून येते. धार्मिकतेचा प्रभाव हिंदू समाजामध्ये मर्यादित प्रमाणात तर मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजात कितीतरी जास्त असल्याचे अनुभवायला येते. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पंचाहत्तर वर्षांच्या काळात साक्षरतेचे प्रमाण खूपच वाढले, विज्ञानाची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली; तरी त्यामुळे अधार्मिक, विवेकवादी प्रवृत्ती असणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याचे खातरीपूर्वक सांगता येत नाही. धार्मिकतेचा आविष्कार वेगवेगळ्या स्वरूपांत दृष्टीस पडतो : जप-जाप्य, व्रते-वैकल्ये यांचे आचरण, श्लोक, स्तोत्रे, धार्मिक ग्रंथांचे पठण, नियमितपणे धार्मिक स्थळांना भेटी अशा विविध प्रकारे ईश्वरभक्तीचा प्रत्यय नजरेस येतो. अर्थात काळाच्या ओघात आणि वाढत्या शहरीकरणाचा परिणाम म्हणून सोवळे-ओवळे, कर्मठपणा यांचे प्रमाण कमी झाले आहे.

पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट केलेली बरी – ईश्वर, धर्म, आध्यात्मिकता इत्यादी विषयांवरती हे विद्वत्तापूर्वक विवेचन नाही. यातील एखादा पक्ष घेऊन त्याचा हिरिरीने पुरस्कार करणे व प्रतिपक्षाचे सर्व संभाव्य युक्तिवाद खोडून काढणे हा या लेखाचा उद्देश नाही. सर्वसाधारणपणे धार्मिकता जरी मोठ्या प्रमाणावर असली; तरी या संबंधात मूलभूत वा खोलवर विचार करणारे फार थोडे असतात. मी स्वतः धार्मिक प्रवृत्तीचा नसलो; तरी त्या बाबतीत माझी मते वा विचार कडवे नाहीत. हिंदू असण्याचा एक मोठा फायदा म्हणजे अशा विषयांची चर्चा, उलट सुलट मते मांडणे (अजूनपर्यंत तरी) शक्य आहे. मुस्लीम वा ख्रिश्चन धर्मीयांसाठी ते खूपच कठीण आहे.

अध्यात्माकडे  तुलनेने कमी लोक वळतात. व्यावसायिक चित्रपट पाहणारे खूप जण असतात; कलात्मक चित्रपट पाहणारे मात्र तुलनेने अगदी थोडे; तसेच काहीसे आध्यात्मिक मार्गाच्या लोकांबद्दल म्हणता येईल. निव्वळ देवासमोर हात जोडणे किंवा उपवास, सत्यनारायण पूजा यांसारख्या धार्मिक आचरणाच्या तुलनेत अध्यात्माचा मार्ग अनुसरणारे हे अधिक खोलात जाऊन तत्त्वज्ञानस्वरूप  विचार करताना दिसतात. मनुष्यप्राण्याच्या आयुष्याचे – जीवनाचे प्रयोजन काय, ईश्वर ही नेमकी काय संकल्पना आहे, कर्माचा सिद्धान्त, पुनर्जन्म, मोक्षप्राप्ती, ध्यान-प्रार्थना-चिंतन अशा विविध पैलूंना ते स्पर्श करतात. अध्यात्म हे धर्मसापेक्ष – म्हणजे हिंदू धर्मसंकल्पनांशी वा ख्रिश्चन विचारसरणीशी जोडलेले बहुशः दिसत असले; तरी निव्वळ तत्त्वज्ञान पातळीवर विचार केल्यास ते धर्मनिरपेक्षदेखील असू शकते. स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान वरकरणी जरी हिंदू धर्मासंबंधात असले; तरी प्रत्यक्षात त्यातील विचार सर्व धर्मांना कमी-अधिक प्रमाणात लागू होण्यासारखे आहेत.

धर्माचा मध्यवर्ती विचार वा केंद्रबिंदू ईश्वर  असतो. देव, ईश, परमेश्वर, भगवंत अशा  अनेक नावांनी तो संबोधिला जातो. ख्रिश्चन, इस्लाम, जुडाइझम हे एकेश्वरी धर्म आहेत. हिंदू धर्मात मात्र ईश्वराची अनेक रूपे आहेत – विष्णू, शंकर, गणेश, महालक्ष्मी, दुर्गा ही काही प्रमुख उदाहरणे. तसे पाहिले तर अगदी प्राचीन काळात निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांनाच ईश्वर मानले जाई – सूर्य, अग्नी, वायू वगैरे. सध्याच्या काळात पूजिल्या जाणार्‍या ईश्वराच्या रूपांचा उगम तुलनेने अगदी अलीकडचा म्हणावा लागेल. हिंदू धर्मातील एक विचार म्हणजे ईश्वर चराचरांत, सर्वत्र आहे – अगदी प्रत्येक प्राणिमात्रातदेखील! मात्र बहुतांश जणांना भक्तीसाठी काही तरी ठोस – मूर्त स्वरूप लागते. त्यातूनच विविध देवांची निर्मिती झाली असण्याची शक्यता आहे. ईश्वराने माणसाला, सर्व प्राणिमात्रांना जन्माला घातले असे समजले जात असले; तरी ‘माणसानेच ईश्वराला जन्माला घातले,’ असे अनेकदा केले जाणारे विधानच सत्याच्या अधिक जवळ जाणारे असू शकते.

सर्व धर्मांच्या ग्रंथांमध्ये (त्या त्या धर्माच्या) ईश्वराने पृथ्वीवरील सजीव सृष्टी निर्माण केली या संबंधातल्या कथा वर्णिल्या आहेत. ख्रिश्चन धर्मात ॲडम  आणि ईवची गोष्ट आहे. आपल्याकडे मनू हा आद्यपुरुष मानला जातो; मात्र डार्विनच्या उत्क्रांतिवादानुसार पृथ्वीतलावर सजीव अगदी सूक्ष्म स्वरूपात करोडो वर्षांपूर्वी अस्तित्वात आला व अनेक टप्प्यांत उत्क्रांत होत ३ लाख वर्षांपूर्वी आजचा मानव ज्या स्वरूपात आहे त्याचे आगमन झाले. विश्वाची उत्पत्ती कशी झाली यासंबंधी अजूनही निर्णायक काही सांगता येत नसले; तरी त्या दृष्टीने विज्ञानाचा शोध गेली १००-१५० वर्षे सतत चालू आहे व निदान काही ठोकताळे, अंदाज बहुतांशी मान्य झाले आहेत. ही विज्ञानाधारित अनुमाने आणि विविध धर्मांतील वेगवेगळे – एकमेकांशी न जुळणारे सिद्धान्त  यांतील काय निवडायचे हे अनेकदा बुद्धीपेक्षा भावनेने, श्रद्धेने ठरताना दिसते.

ईश्वराची संकल्पना नक्की काय आहे याबद्दल विचार करायला हवा. एकतर प्रत्येक धर्म आपला स्वतःचा ईश्वर मानतो आणि तोच सर्व विश्वाचे नियमन करतो असे समजतो. आता एकाहून अधिक वेगवेगळे ईश्वर एकाच वेळी या जगाचा कारभार कसा काय हाकत असतील? की हिंदूंचा ईश्वर हिंदूंचे, मुस्लिमांचा त्यांच्या धर्माचे अशी वाटणी – विभागणी आहे ? हे काहीसे उपरोधात्मक निवेदन वाटले; तरी त्यात निश्चितच तथ्य आहे.

मुळात ईश्वराची भूमिका, इतिकर्तव्य काय हे स्पष्ट व्हायला हवे. जगात जे काही घडते ते त्याच्यामुळे, त्याच्या इच्छेनुसार असे सर्वसाधारणपणे समजले जाते; तर मग त्यामध्ये एखादे विशिष्ट सूत्र, दिशा, नियम, हेतू आपण पाहू शकतो का? सर्व धर्मांमध्ये पाप-पुण्यांच्या संकल्पना आहेत. पापाचरणासाठी शिक्षा आणि पुण्याचरणामुळे सद्गती असे समजले जाते; मात्र रोजच्या व्यवहारात याचा प्रत्यय आपणांस येतो का? लबाडी, चोरी, खोटे बोलणे अशा गोष्टी अव्याहतपणे चालू राहतात व त्या आचरणार्‍यांपैकी फार थोड्यांनाच शिक्षेचा ‘प्रसाद’ मिळतो. भांडण-तंटे, दंगे, युद्धे, रोगांच्या साथी, अवर्षणे, महापूर, भूकंप अशा अनेक संकटांना मानव जातीला तोंड द्यावे लागते. हे सगळे घडत असताना ईश्वराची नेमकी भूमिका काय असते? तो केवळ मूक प्रेक्षक, साक्षीदार असतो का? पुण्यकृत्य-पापाचरण यांचे बरे-वाईट परिणाम केवळ मृत्युपश्चातच प्रत्ययास येतात का? तसे घडते यावर विश्वास कोणत्या आधारावर ठेवायचा? या अशा गैरसोयीच्या प्रश्नांना सश्रद्ध लोकांकडे नक्कीच उत्तरे असतात; मात्र मला तरी ती पटणारी नसतात.

माझ्या बाबतीत सांगायचे तर माझे आजी-आजोबा बर्‍यापैकी सश्रद्ध व धार्मिक वृत्तीचे होते. आजोबांची रोजची दीड-दोन तास देवपूजा चाले. आजीदेखील वेगवेगळे उपास करीत असे. नवरात्रात तिच्या ‘अंगात’ येत असे. माझे काका-काकू, आत्या वगैरे सगळे साधारण त्याच मुशीतले. माझे आई-वडीलच याला काही प्रमाणात अपवाद. ते नास्तिक होते असे म्हणता येणार नाही; मात्र त्यांनी कोणते कर्मकांड केलेले फारसे आठवणीत नाही – अगदी सत्यनारायणाची पूजादेखील आमच्याकडे क्वचितच झाली असेल. लहानपणी आजोबांनी अथर्वशीर्ष, रामरक्षा, मनाचे श्लोक वगैरे माझ्याकडून पाठ करून घेतले होते. यांतील काही गोष्टी संध्याकाळच्या वेळी पाढ्यांच्यासोबत घरी म्हणून घेतल्या जात; मात्र त्यात धार्मिकता फारशी नव्हती. आषाढी एकादशीचाच काय तो उपवास – तोही एका प्रथेचे पालन म्हणून केला जाई. आई-वडील दोघांनीही त्यांच्या मृत्युपूर्वी, ‘मरणोत्तर कोणतेही धार्मिक विधी करू नयेत,’ असं लिहून ठेवलं होतं.

काही प्रमाणात आई-वडिलांच्या संस्कारातून आणि काही प्रमाणात माझ्या स्वतःच्या विकसत गेलेल्या मनाच्या बैठकीमुळे पारंपरिक स्वरूपातील ईश्वरभक्ती, धर्माचरण यांपासून मी दूर राहिलो; मात्र हेच समान घटक असताना माझे दोघे धाकटे भाऊ माझ्या तुलनेत अधिक सश्रद्ध, धार्मिक विचारांचे आहेत हेही तितकेच खरे. एवढेच कशाला, माझी पत्नीदेखील बर्‍यापैकी धार्मिक आहे. स्नानानंतर ती रोज न चुकता अथर्वशीर्ष, हनुमान चालिसा म्हणते. रात्री तिच्या आग्रहामुळे मी तिच्याबरोबर  रामरक्षा म्हणतो. तसे केल्याने तिला बरे वाटते व तसेही या पठणात गैर काहीच नाही. आम्ही पर्यटनाला जातो तेव्हा त्यांत मंदिरांना भेटी असतातच. मीदेखील त्या मंदिरांत जातो, देवासमोर हात जोडतो; मात्र त्याच वेळी मी आतून संपूर्णपणे ‘कोरडा’ असतो – भक्तीचा माझ्यात लवलेश नसतो. माझे साडू कै. सु.ल. गद्रे हेदेखील फारसे धार्मिक नव्हते; मात्र, पंढरपूरला विठ्ठलासमोर माथा टेकवल्यावर त्यांना काही तरी दिव्य अनुभूती  आली असे ते सांगत. हाच अनुभव इतर जणांनाही आल्याचे ऐकले आहे; मात्र माझ्या बाबतीत तसे घडले नाही.

‘धर्माचरण’ यामध्ये दोन गोष्टींचा अंतर्भाव होतो अशी माझी समजूत आहे. त्यांतील पहिली आणि माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिक आचरण. खरे बोलणे, आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे, प्रामाणिकपणे वागणे, पैशाचे व सर्वच व्यवहार निःस्वार्थीपणे करणे – एकंदरीत ज्याला सदाचरण म्हणता येईल असे वागणे. आता या कसोटीला, आदर्श वर्तणुकीच्या निकषाला अगदी १००% जरी उतरता आले नाही; तरी निदान त्याच्या जवळपास जाणारी वागणूक ही माझ्या दृष्टीने धर्माचरणासाठी अत्यावश्यक समजली पाहिजे; किंबहुना माझ्यासारखे लोक यालाच ‘धर्माचरण’ म्हणतात; मात्र पारंपरिक विचारांनुसार नैतिक आचरण ही ‘आवश्यक’ अट असली तरी ती ‘पुरेशी’ नाही. ईश्वराची भक्ती, त्याच्या पायी लीन होणे हे त्यांच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे असते. या संदर्भात पूर्वी होऊन गेलेल्या वा अलीकडच्या काळातील संतांनी वा अधिकारी व्यक्तींनी दिलेले दाखले याची पुष्टी करण्याकरता दिले जातात. जर या सगळ्या परम आदरणीय व्यक्तींनी भक्तीचा महिमा वर्णिला असेल; तर त्यांना आपण खोटे पाडणार का, असा सवाल ‘अभक्तांना’ केला जातो. मी अशा वेळी वादविवाद करण्याचे टाळतो कारण त्यातून काही निष्पन्न होणारे नसते.

तसे पाहिले तर माझ्या ग्रंथसंग्रहात इतर विविध विषयांच्या पुस्तकांच्या जोडीने किमान डझनभर तरी धार्मिक-आध्यात्मिक पुस्तके आहेत. माझ्या ४० व्या वाढदिवशी माझ्या आत्याने स्वामी विवेकानंदांची ‘कर्मयोग’, ‘भक्तियोग’ व ‘ज्ञानयोग’ही पुस्तके मला भेट दिली होती. आयुष्याचा हा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यावर तरी मी ‘सन्मार्गाला’ लागावे अशीच तिची इच्छा असणार! भगवद्गीतेवरील दोन पुस्तके, स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी’ चे दोन खंड, शंकर अभ्यंकरांचे ‘पसायदान’, चिं. वि. वैद्यांनी लिहिलेले ‘श्रीकृष्णचरित्र’, ‘सार्थ श्रीदासबोध’, ‘कर्माचा सिद्धान्त’ अशी विविध पुस्तके माझ्या संग्रही आहेत; शिवाय वाचनालयातून जे. कृष्णमूर्ती, स्वामी चिन्मयानंद, डॉ. राधाकृष्णन अशा थोरा-मोठ्यांची पुस्तके मी वाचायला आणली होती; मात्र माझा दर वेळेचा अनुभव असा होता की यांपैकी कोणतेच पुस्तक पहिली काही पाने वाचून झाल्यानंतर पुढे वाचत राहावे असे मला वाटले नाही. त्यातून, ‘कर्माचा सिद्धान्त’सारखे एखादे पुस्तक आकाराने लहान असल्यामुळे संपूर्ण वाचून झाले असले तरी त्याचा माझ्यावरील परिणाम शून्य होता. खरेतर मी भरपूर वाचन करतो आणि माझे वाचन मराठी आणि इंग्रजीमध्ये विविध प्रकारचे आहे – त्यात ललित आणि ललितेतर, हलकी फुलकी तसेच गंभीर विषयांवरील पुस्तकांचा समावेश होतो. काही अपवाद वगळता यांतील सर्व पुस्तके मी आवडीने वाचली. माझे गाडे अडते ते नेमके धार्मिक-आध्यात्मिक पुस्तकांच्या बाबतीत.

असे का व्हावे यावर मी थोडाफार विचार केला. धार्मिक पुस्तकांमध्ये त्यांतील चमत्कार, असंभाव्य गोष्टी, विसंगती, त्यांमधील सर्व लिखाणाचा विनाअट स्वीकार करण्याची आवश्यकता या गोष्टींना माझे मन तयार होत नाही. ‘धार्मिक श्रद्धे’चा माझ्यात अभाव असल्यामुळे माझे मन अशा साहित्यात रमत नाही. विज्ञानाला सर्व काही अवगत आहे असे जरी मी मानत नसलो; तरी त्यामध्ये तर्काधिष्ठित अनुमाने, विचार अनुभवायला मिळतात. तसे पाहता, साहित्यातदेखील काल्पनिक गोष्टी, फॅंटसीज असतात; मात्र तेथे त्या तशा आहेत हे मान्यच असते. तशा प्रकारच्या गोष्टी खरोखर घडल्या असे सांगितले जाते तेव्हा माझी नकारार्थी, अविश्वासदर्शक प्रतिक्रिया उमटते. आध्यात्मिक पुस्तकांची गोष्ट काहीशी वेगळी आहे. त्यांमध्ये चमत्कार, असंभाव्य गोष्टी कदाचित नसतील; पण बर्‍याचदा त्यांमध्ये त्याच त्याच गोष्टी भाराभर उदाहरणे देऊन फिरवून फिरवून सांगितल्या जात आहेत, असे पहिली काही पाने वाचल्यावर मला वाटू लागते व मग आणखी पुढे जावेसे वाटत नाही.

या सगळ्यामध्ये मी बरोबर का चूक, ती पुस्तके चांगली का वाईट या वादात मी पडू इच्छित नाही; किंबहुना वर उल्लेखिलेल्या पुस्तकांच्या बाबतीतली माझी मते अन्यायकारक असू शकतात – तसे असले तरी ती प्रामाणिक आहेत हे निःसंशय वास्तव आहे. या संबंधातला माझा निष्कर्ष असा आहे की प्रत्येकाच्या मनाची एक बैठक असते व काही गोष्टी त्यात खोलवर रुजलेल्या ( Hard wired) असतात. हे कशामुळे होते,   मूळची बैठक आणि गृहीतके कालांतराने बदलू शकतात की नाही हे मला ठाऊक नाही त्यामुळे, ‘सौन्दर्य हे बघणार्‍याच्या दृष्टीनुसार असते,’ त्याचप्रमाणे ‘ईश्वरावरील श्रद्धा’ ही व्यक्तिसापेक्ष असते असे मला वाटते.

यालाच जोडून आणखी एक विचार मांडतो. अनेक जण असे मानतात की तुम्ही जर एखादी गोष्ट मनापासून इच्छिली, तिचा सतत ध्यास धरला; तर तुम्हांला तसा अनुभव येण्याची शक्यता असते.  ऱ्होंडा बायर्न( Rhonda Byrne) यांच्या अतिशय गाजलेल्या ‘द सीक्रेट’ पुस्तकात (व त्यावर आधारलेल्या चित्रपटात) ‘आकर्षणाचा सिद्धान्त’ मांडला आहे; त्यानुसार ठरावीक प्रकारे केलेले सकारात्मक विचार त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्या दिशेने बदल घडवून आणू शकतात. वैज्ञानिकांनी या पुस्तकातले दावे अमान्य केले असले; तरी त्यांवर विश्वास बाळगणार्‍यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि लेखिकेच्या सिद्धांताला  बायबलमधल्या एका वचनाचा आधार आहे : ज्यानुसार ‘तुम्ही श्रद्धापूर्वक ज्या सर्व गोष्टी प्रार्थनेतून इच्छिता, त्या तुम्हांला प्राप्त होतील.’ हिंदू धर्मग्रंथांमध्येदेखील अशा अर्थाचे वचन असण्याची दाट शक्यता आहे.

मला वाटते ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असणारे, त्याची मनोभावे भक्ती करणारे यांच्या बाबतीत काहीसे असेच घडत असावे. एखाद्या गोष्टीचा तुम्ही ‘विनाअट स्वीकार’ (unconditional acceptance) केलात की त्यानंतर तुमच्या विचारांना, श्रद्धेला अनुकूल गोष्टींनी ती श्रद्धा अधिक बळकट होते. त्याविपरीत घडणार्‍या गोष्टी दुर्लक्षिल्या जातात वा त्यांसाठी काहीतरी सोईस्कर स्पष्टीकरण, खुलासा उपलब्ध असतो. मुळात सश्रद्ध व्यक्ती इतका चिकित्सक विचार बर्‍याचदा करत नाहीत – तसे करणे हे ‘पाखंडीपणाचे’ लक्षण समजले जाऊ शकते.

समारोप करताना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या लेखातील विचार ‘एक अधिकारी व्यक्ती’ म्हणून मांडले नसून मला प्रामाणिकपणे काय वाटते याचे ते प्रतिबिंब आहेत. काही गोष्टींची उपपत्ती लावण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे – तो अचूक आहे असा माझा आग्रह नाही. कोणालाही खोटे ठरविण्याचा वा कुणाची थट्टा, उपहास करण्याचा तर अजिबात हेतू नाही. 

Author

Leave a Reply