वृत्तांत : अंगाराकडून ज्योतीकडे

  

अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नुकतेच  चार व पाच मार्च रोजी नाशिकजवळील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्सच्या आवारात संपन्न झाले. सुप्रसिद्ध सिनेनट नाना पाटेकर हे या संमेलनाचे उद्घाटक होते आणि अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ साहित्यिक व संपादक  भानू  काळे.नाशिक आणि परिसर हा कोणी एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता.  शेतीच्या अर्थशास्त्राला पहिल्यांदा अर्थ देणारे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या अनेक आंदोलनांचे केंद्रस्थान नाशिक व परिसर होता.  गंगाधर  मुटे  हे या शेतकरी साहित्य संमेलनाच्या संकल्पनेचे सूत्रधार आहेत व गेली अकरा वर्षे हा उपक्रम ते अव्याहतपणे करत आहेत.  यापैकी काही साहित्य संमेलनाला शरद जोशी स्वतः उपस्थित राहिले होते.  उद्घाटनाच्या भाषणात श्री पाटेकर यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर त्यांच्या खासशैलीत आसूड ओढले.  संमेलनाचे स्वागताध्यक्ष सह्याद्री फार्म्सचे  सर्वेसर्वा विलास शिंदे हे होते .  कार्यक्रम स्थळी सर्व आवश्यक व्यवस्था चोखपणे करण्यात आली होती.अध्यक्षस्थानाहून बोलताना भानू काळे यांनी नाना पाटेकर आणि त्यांचे नाम फाउंडेशन हे कलावंतांच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे असे  प्रतिपादन  केले. संमेलनाच्या व्यासपीठावर शरद जोशी यांचे सोबत प्रत्यक्ष काम केलेले सरोजताई काशीकर, रामचंद्रबापू पाटील, वामनराव चटप उपस्थित होते.  त्यांचा काळे  यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. काळे यांनी  त्यांच्या भाषणात प्रामुख्याने चार मुद्दे मांडले . ते खालील प्रमाणे : 

 (१) या संमेलनाचे प्रेरणास्थान नि:संशयपणे शरद जोशी हे होत .  संमेलन स्थळाला”  युगात्मा शरद जोशी विद्यानगरी”असे जे नाव दिले आहे ते अत्यंत सार्थ आहे.  इतर सर्व व्यक्तींनी भानू काळे यांनी लिहिलेल्या ‘अंगारवाटा .. शोध शरद जोशींचा’या शरद जोशी यांच्या चरित्राचा गौरव पूर्ण उल्लेख केला.  हे त्यांचे चरित्र  आपल्याला का काही लिहावेसे वाटले याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले.  या विवेचनातून शरद जोशी यांच्या बुद्धिमत्तेचे नेतृत्वाचे स्वभावाचे त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांचे अनेक कंगोरे   उलगडले  गेले.शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत एका शब्दात सांगायचे झाल्यास ‘ भीक नको हवे घामाचे दाम! ‘या अभूतपूर्व घोषणेचा उल्लेख करावा लागेल. जोशींनी पेटवलेले शेतकरी आंदोलन हा एक चमत्कार होता. नाडलेला, पिचलेला, सगळ्यांकडूनच लाथाडला गेलेला भारतीय शेतकरी इतक्या प्रचंड संख्येने पूर्वी कधीच रस्त्यावर उतरला नव्हता. त्या काळी माझे वास्तव्य मुंबईत होते पण  त्यांच्या आंदोलनाचा थरार मुंबईकरांना फारसा कधी जाणवला नाही. आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नांडिस, बाळ ठाकरे किंवा दत्ता सामंत हे ज्या अर्थाने मुंबईकरांचे ‘आयकॉन’ बनले त्या अर्थाने कधी मुंबईने जोशींची दखल घेतलीच नाही. अंतरनादने स्वयंपूर्ण कार्याचे समाज जीवनातील स्थान या विषयावर काढलेल्या विशेषांकाच्या निमित्ताने 1999 साली  शरद जोशी व मी यांची प्रथम गाठ झाली.या अंकासाठी त्यांनी ‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’या मथळ्याचा एक स्फोटक लेख लिहिला होता.  शरद जोशी यांना आयन रँड ही लेखिका आवडायची.  मानवी कृतीच्या मागे स्वार्थ हीच प्रेरणा असते आणि त्यातून निर्माण होणारा अहंकार हा एक प्रकारची झिंग आणतो हा त्यांचा सिद्धांत जोशींना मान्य होता.त्यावेळीही जाणवले होते ते त्यांचे राजहंसी वेगळेपण आणि कुठल्याही विषयावर मूलगामी विचार करायची प्रवृत्ती. तेव्हापासूनच त्यांच्यावर विशेषांक काढायचा विचार मनात घोळत होता. शरद जोशी  विशेषांक ऑक्टोबर २००९ मध्ये काढला.त्यांनी त्यावेळी  नुकतेच पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले होते. तुडुंब भरलेल्या पुण्याच्या एसेम जोशी सभागृहात २०१६ मध्ये अंक प्रकाशनझाले आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे दीड हजार शेतकऱ्यांच्या केसेस लढवलेले.  दौलतराव घुमरे यांची त्यावेळची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. पंजाबात दहशतवाद चरम सीमेवर असताना शरद जोशी कसली भीती मनात न बाळगता पंजाबात कोठेही फिरू शकत होते याचा काळे यांनी आवर्जून उल्लेख केला. 

 (२ ) शरद जोशी आणि मराठी साहित्य:  शरद जोशी स्वतः साहित्यप्रेमी होते.  पूर्वी त्यांनी प्रसंग अनुरूप थोडेफार लिखाणही केले होते.  मराठी साहित्यात शेतकरी नाही याची त्यांना खंत वाटायची आणि त्याबाबत त्यांनी ग्रामीण साहित्यिकांवर टीकाही केली होती.  परभणी आणि इस्लामपूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनातील त्यांची भाषणे आजही काही महत्त्वाचे देऊन जातात. 

(३) अंगाराकडून ज्योतीकडे :  काळे यांच्या भाषणातील हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.  वेळप्रसंगी व वेळोवेळी झालेली आंदोलने हा अंगार होता.  या अंगारातून जागृती निर्माण झाली.  परंतु अंगार जितका आवश्यक असतो तितकीच शांतपणे तेवणारी ज्योतही महत्त्वाची. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात अशी ज्योत तेवण्यासाठी   शरद जोशी यांनी चतुरंग शेतीची कल्पना मांडली. सीता शेती ऊर्फ प्रयोग शेती, माजघर शेती ऊर्फ प्रक्रिया शेती, व्यापारी शेती आणि निर्यात शेती ही  चतुरंग शेतीची संकल्पना आहे. शेतकरी सॉलव्हन्ट, शिवार ऍग्रो , भामा कन्स्ट्रकशन असे उपक्रम शरद जोशी यांनी राबविण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या काळात त्याला म्हणावे असे यश आले नव्हते.  शरद जोशी याबाबत महात्मा ज्योतिबा फुले यांना आपला आदर्श मानायचे.  समाजसेवा करताना यशस्वी उद्योगही फुले यांनी करून दाखवला होता. सह्याद्री ऍग्रो फार्मसच्या रूपाने विलास शिंदे यांनी शरद जोशी यांच्या मनात जी संकल्पना होती ती एक प्रकारे प्रत्यक्षात आणली आहे असे काळे यांनी सांगितले. 

 (४ ) आजचे साहित्य आणि शेती:  साहित्यामध्ये शेतीला खूप अधिक स्थान मिळायला हवे. निम्म्याहून अधिक भारत आजही शेतीवर अवलंबून आहे. आणि तरीही साहित्यामध्ये शेतीचे प्रतिबिंब उमटत नाही. सर्वच भारतीय भाषांच्या बाबतीत हे खरे आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ कथा-कविता अशा ललित साहित्यातच नव्हे तर वैचारिक साहित्यातही शेतीला फारच कमी स्थान मिळते. हा खरं तर आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असायला हवा. शेतीविषयी खूप अधिक लेखन व्हायला हवे आहे. या बाबतीत सह्याद्री फार्मससारख्या संस्थांनी पुढाकार घेतला तर ती खूप मोठी देशसेवा होईल. साहित्यातील एक मोठी उणीव इथे उपस्थित असलेले लेखक भरून काढतील अशी आशा काळे यांनी व्यक्त केली.अनुदान संस्कृतीला विरोध हा शरद जोशींच्या विचारसरणीचा आत्मा होता. हा स्वाभिमान आपल्या साहित्यातून फुलविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे हे काळे यांनी नमूद केले.  

अनिल जोशी , भानू काळे व विलास शिंदे . 

Author

Leave a Reply