बेंगलोर डायरी ५

एखादे शहर सांस्कृतिकदृष्ट्या किती सजग आहे हे बघायचे असेल तर त्या शहरात असणारी संग्रहालये, नाट्यगृहे, सभागृहे बघितली पाहिजेत असे कुठेतरी वाचले होते. बेंगलोर शहरात बघायला काय आहे याची यादी देताना जुन्या गोष्टींबरोबरच नव्याने आलेली काही ठिकाणे म्हणजे संग्रहालये; त्यामुळे ही बेंगलोर डायरी फक्त बेंगलोरमधील नानाविध प्रकारच्या संग्रहालयांबद्दल.  

   बेंगलोर शहर तसे जुने आहे आणि तसे जुने नाही – म्हणजे मागील एका लेखात म्हणल्याप्रमाणे या शहराचा इतिहास जरी ९ व्या शतकापर्यंत जात असला; तरीही या शहराची भरभराट झाली ती मागील २-३ शतकांत; त्यातही खास करून ब्रिटिश अधिकाऱ्यांमुळे. बेंगलोर जरी मैसूर राजाच्या अधिपत्याखाली असले तरीही बेंगलोरला ब्रिटिशांचे मोठे ठाणे होते. त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी त्यांनी बेंगलोरमध्ये अनेक गोष्टींची सुरुवात केली – यांत रेल्वे लाइन आणण्यापासून ते पायाभूत सुखसुविधा देण्यापर्यंत अनेक गोष्टी येतात. कबन पार्क, सँके तलाव, मिलर रस्ता, कुक टाउन अशा नावांच्या रूपाने आजही या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आठवणी या शहरात जपल्या जात आहेत. १८६५ मध्ये एडवर्ड बॅलफोर आणि एल. बी. बाऊरिंग यांनी शासकीय संग्रहालय सुरू केले. आज कस्तुरबा  रस्त्यावर दिमाखात उभी असलेली लाल दगडांची इमारत मात्र १९७७ मध्ये बांधली होती आणि त्याचे इंजिनिअर होते रिचर्ड सॅंके. या संग्रहालयात अनेक दुर्मीळ मूर्ती, शिलालेख जपून ठेवलेले आहेत. हे संग्रहालय पुरातत्त्व संग्रहालय म्हणूनच ओळखले जाते. नाममात्र प्रवेश शुल्क असलेल्या या संग्रहालयाच्या आतच वेंकटप्पा आर्ट गॅलरी आहे. 

वेंकटप्पा आर्ट गॅलरी

अबनिंन्द्रनाथ  टागोर यांचे शिष्य असलेल्या के. वेंकटप्पा (१८८६-१९६५) यांच्या नावाने सुरू केलेली आर्ट गॅलरी हे बेंगलोरमधील एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे अनेक नामांकित चित्रकारांची चित्रे बघता येतात. या गॅलरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दोन संग्रहालयांच्या मधोमध आहे. एका बाजूला शासकीय ऐतिहासिक संग्रहालय; तर दुसरीकडे आहे विश्वेश्वरैय्या विज्ञान संग्रहालय. सर एम.  विश्वेश्वरैय्या यांच्या नावाने सुरू केलेले हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाला वाहिलेले संग्रहालय १९६२ साली सुरू केले होते. चार  मजल्यांवर वेगवेगळी दालने असलेले हे संग्रहालय सगळ्या शाळांच्या सहलीसाठीचे आवडीचे ठिकाण आहे. ‘करून बघा,’ प्रकारातील अनेक प्रदर्शने असल्यामुळे मोठ्यांनादेखील इथे मजा येते. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादी अनेक विषयांना वाहिलेली दालने, त्यांतील माहिती वाचून थक्क व्हायला होते. शासकीय संग्रहालय असल्यामुळे येथेदेखील प्रवेश शुल्क अगदी नाममात्र आहे. 

या संग्रहालयाच्या समोरच एक खासगी संग्रहालय दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी (Map ) या नावाने ओळखले जाणारे हे संग्रहालय अभिषेक पोद्दार यांच्या पुढाकाराने सुरू झालेले आहे. या तीन मजली संग्रहालयात उत्तम फोटो आणि चित्रांचे बदलते प्रदर्शन असते. त्याखेरीज इथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून AI ने जुन्या 2d चित्राला 3d परिणाम देणे किंवा मकबुल फिदा हुसेन यांचा अवतार तयार करून त्याला प्रश्न विचारणे अशा अनेक गोष्टीदेखील अनुभवता येतात. संग्रहालये ही केवळ शासकीय न राहता, खासगीदेखील असू शकतात आणि उत्तम पद्धतीने त्यांची मांडणी करता येऊ शकते यांचे हे एक उदाहरण आहे. 

म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी (Map )

बेंगलोरमध्ये अशी अनेक खासगी संग्रहालये आहेत. संगीत रसिकांसाठी पर्वणी असणारे इंडियन म्युझिक एक्सपिरीयन्स म्युझियम हा तर अगदी आगळा वेगळा अनुभव आहे. तीन मजली दालने, एक अत्याधुनिक सभागृह असलेली ही इमारत अतिशय देखणी बांधलेली आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, वाद्ये, चित्रपट संगीत, लोकसंगीत, भारतीय, पॉप, रॉक संगीत अशा अनेक संगीतप्रकारांची माहिती येथील दालनांमध्ये दिली आहे. बहुतांश ठिकाणी तुम्ही संगीत, गाणी प्रत्यक्ष ऐकू शकता; त्यामुळे ही माहिती फक्त वाचायची नसून ऐकायचीदेखील आहे. जुन्या नव्याचा सुंदर मिलाफ असलेले हे ठिकाण एका भेटीत पूर्ण अनुभवताच येत नाही. एका वेगळ्याच दुनियेचा अनुभव हे म्युझियम देते. 

इंडियन म्युझिक एक्सपिरीयन्स म्युझियम

एच. ए. एल. म्हणजेच हिंदुस्थान एअरो नॉटिकल लिमिटेड या संस्थेच्या आवारात एक सुंदर एअरो स्पेस म्युझियम आहे. या ठिकाणी विमाने, हेलिकॉप्टर यांची वेगळी मॉडेल्स तर आहेतच; पण त्याचबरोबर  सिम्युलेशन, एअर ट्राफिक कंट्रोल मॉडेल अशा गोष्टीदेखील आहेत; त्यामुळे हे संग्रहालय खास आहे. हे शासकीय संग्रहालय आहे. संदेश म्युझियम ऑफ कम्युनिकेशन या नावाचे पोस्ट खात्याचे एक सुंदर संग्रहालय म्युझियम रस्त्यावर आहे. हो, बेंगलोरमध्ये म्युझियम रस्ता नावाचा रस्तादेखील आहे. संदेश म्युझियमचे वैशिष्ट्य म्हणजे हे एका जुन्या बंगल्यात आहे; त्यामुळे त्या ब्रिटिशकालीन बंगल्याचा अनुभव  एका वेगळ्याच उंचीवर नेतो.     

याखेरीज इंडियन कार्टून असोसिएशनच्या ऑफिसशेजारच्या हॉलमध्ये एक सुंदरसे कार्टून म्युझियम आहे. हे फार मोठे नसले तरीही वेगवेगळ्या भाषांतील, व्यंगचित्रे इथे मांडलेली आहेत. बाळ ठाकरेंचे व्यंगचित्र अगदी सुरुवातीलाच बघायला मिळते. असेच आणखी एक आगळे वेगळे म्युझियम निम्हन्स (NIMHANS) मधील ब्रेन म्युझियम. मी स्वतः हे अजून बघितले नाही; मात्र लेखाच्या दृष्टीने माहिती मिळवताना हे दिसले आणि क्षणभर वाटले, आपल्या गावातील कित्येक गोष्टी आपल्यालाच माहिती नसतात. या म्युझियममध्ये ६०० मेंदू ठेवलेले आहेत. मेंदू कसे काम करतो याची माहिती तिथे दिली जाते. HMT या कोणे एके काळाच्या प्रसिद्ध घड्याळ कंपनीने देखील एक छोटेसे घड्याळाचे म्युझियम बेंगलोरमध्ये उभारले आहे; त्यात त्यांची जुनी उत्पादनेदेखील बघायला मिळतात. 

शॉर्ट वेव्ह रेडियो म्युझियम या नावातच सगळे काही असणाऱ्या म्युझियममध्ये आहेत वेगवेगळे रेडियो. उदय कलबुर्गी यांनी त्यांच्या रेडियोच्या वेडातून गोळा केलेले रेडियो या ठिकाणी बघायला मिळतात. विमोर म्युझियम ऑफ लिविंग टेक्स्टाइल हे पवित्रा मुद्दय्या यांचे म्युझियम वेगवेगळ्या साड्या, कापड, वेगवेगळ्या राज्यांतील विणकर, त्यांची शैली अशा सगळ्याची माहिती देण्याचे काम करते. लिजेंड मोटर सायकल म्युझियम हे गाड्यांचे प्रदर्शन करणारे, माहिती देणारे म्युझियम एस. के. प्रभू यांनी उभारले आहे. 

या सगळ्याखेरीज इथे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट,  चित्रकला परिषद अशा दोन चित्र, स्थापत्यविषयक जागा आहेत. या दोन्ही ठिकाणी फिरती प्रदर्शने असतात. चित्रकला परिषदच्या प्रांगणातच भारतातील हस्तशिल्पकृतींचे प्रदर्शनदेखील असते. जवाहरलाल नेहरू तारांगण हेदेखील एक महत्त्वाचे आकर्षण आहे. येथील कार्यक्रम स्थानिक कन्नड भाषेबरोबरच इंग्लिशमध्येदेखील असतात. 

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

या लेखांसाठी माहिती गोळा करताना मी या शहराकडे आणखी जास्त आदराने बघायला लागले. केवळ शासकीय पातळीवरच नव्हे; तर खासगी पातळीवरदेखील लोकांना आपला सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवावासा वाटतो ही खरेच अभिमानाची गोष्ट आहे. इतिहास हा निव्वळ सन-सनावळ्यांमध्ये नसतो, इतिहास हा जपून ठेवलेल्या गोष्टी समोर मांडण्यातदेखील असतो. शहर, गाव, यांचा इतिहास जपताना आपण खुणा ठेवून जात असतो पुढच्या पिढ्यांसाठी; दाखवत असतो आपले संचित! या लेखाच्या निमित्ताने मी आणखी सजग होऊन बघायला लागले या शहराकडे. माझ्या नजरेतून काही ठिकाणे सुटलीदेखील असतील; पण तरीही हा एक प्रयत्न होता. बेंगलोर म्हणजे फक्त लालबाग, कबन बाग, बेंगलोर पॅलेस नाही. संग्रहालये  फक्त ऐतिहासिक नसतात. कोणत्याही जतन केलेल्या गोष्टींचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रदर्शन करता येऊ शकते. अशी छोटी संग्रहालये भविष्यात नक्कीच उपयोगाची ठरणार आहेत; मग कधी येताय बेंगलोरची संग्रहालये बघायला?    

 

(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर , माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)

Author

One thought on “बेंगलोर डायरी ५

  1. लेख छान आणि माहिती पूर्ण झालाय .💐🙏

Leave a Reply