ये है बॉंबे मेरी जान… भाग २ 

बृहन्मुंबईचा इतिहास (२) 

आपण ज्या भागाच्या इतिहासाचा मागोवा घेणार आहोत तो भाग ऐतिहासिक काळातील उत्तर कोकण या प्रदेशात येतो. या प्रदेशाच्या सीमा कोणत्या? तर दक्षिणेस चौल बंदरापासून (रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग) उत्तरेला दमणगंगा नदीपर्यंत (जी आज गुजराथमध्ये येते) व पूर्वीचा संपूर्ण ठाणे जिल्हा. या प्रदेशाचा सर्वात जुना उल्लेख इसवी सनाच्या पहिल्या  शतकातील टॉलेमीच्या जॉग्रफीत येतो; याशिवाय एका ग्रीक प्रवाशाने इ.स. साठच्या आसपास लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी (तांबडा समुद्र) या  प्रवासवर्णनातही येतो. या दोन्ही कागदपत्रांत चौल, सोपारा शूर्पारक, संजाण व कल्याण या बंदरांचा उल्लेख येतो. या बंदरांतून श्रीलंका, आफ्रिका, अरबस्तान व इराण येथे व्यापारी वाहतूक होत असल्यानेच हा उल्लेख आलेला आहे. इ.स ६३८ मध्ये अरबांनी पर्शियावर आक्रमण करून पर्शियन सम्राट ‘याझदेगर्ड’ याचा पराभव केल्यावर झोरेस्ट्रिअन पारशी भारतातच का आले याचे उत्तर वरील व्यापारी संबंधात आहे. त्या वेळी भारतात आलेले पारशी मुळात व्यापारी वर्गातून आणि दस्तूर वर्गातून म्हणजे त्यांच्यातील ब्राह्मण किंवा बुद्धिजीवी या वर्गातील असल्याने त्यांनी भारतात येऊन व्यापार केला किंवा डॉक्टर, वकील, सॉलिसिटर असा बुद्धीशी संबंधित व्यवसाय केला. त्यानंतर आलेले पारशी ज्यांना आपण सध्या इराणी म्हणतो ते शेतकरी असल्याने त्यांनी बिलीमोरा ते डहाणू, पालघर या भागांत जमिनी घेऊन चिकूच्या वाड्या केल्या. मायग्रेशन किंवा स्थलांतरामागील कारणांचा शोध घेणे हा एक इंटरेस्टिंग विषय असून तो एका लेखाचा स्वतंत्र विषय असू शकतो; त्यामुळे थोडे विषयांतर झाले.

आपल्याला उत्तर कोकणाच्या इतिहासाचा खोलात जाऊन विचार करायचा नाही; फक्त या प्रदेशावर कोणी कोणी राज्य केले ते थोडक्यात बघू या.

इ.स.पू. ३०० ते  इ.स.२५० – मौर्य (सम्राट अशोक व  त्याचे वंशज)

इ.स. २५० ते इ.स. ४००         सातवाहन, क्षत्रप, त्रिकूट व कलचुरी 

इ.स. ४०० ते इ.स. ६५० कोकणातील मौर्य

इ.स. ६५० ते इ.स.७५० बदामीचे चालुक्य 

इ.स. ७५० ते इ.स. ८०० राष्ट्रकूट

इ.स ८०० ते इ.स. १२५०         शिलाहार

उत्तर कोकण हा प्रदेश खऱ्या अर्थाने वैभवसंपन्न झाला तो शिलाहारांच्या राजवटीत.   शिलाहारांच्या  ४५० वर्षांच्या राजवटीपैकी पहिली ३५० वर्षे त्यांनी उत्तम  कारभार केला. राज्याच्या विकासासाठी जमीन महसुलाव्यतिरिक्त अनेक कर निर्माण केले. त्या काळात महसूल कराला भूमिदेणक म्हणत. हाउस टॅक्सचे नाव होते गृहदेणक, याशिवाय राजपुत्रांच्या पालनपोषण व शिक्षणासाठी ‘कुमार गद्याण’ असा कर होता. असा कर भारतातल्या कोणत्याच राजाने लावलेला आढळत नाही. बंदरातील मालाची ने-आण व वनसंपत्ती यावरतीसुद्धा कर होता. बाजारात विकण्यासाठी आणलेल्या प्रत्येक गोष्टीवर कर द्यावा लागत असे. हल्ली APMC मार्केटमध्ये दिला जातो तसा मंदिरातील दिव्यांसाठी तेलघाण्यांना ठरावीक माप तेल  कर म्हणून द्यावे लागत असे. घाऊक बाजारात काय विकले जात होते याची यादी बघितली तर संपन्न शेतीचा अंदाज येतो. उदा. सुपाऱ्या, विड्याची पाने, कापड, तेल, तूप, अठरा प्रकारची धान्ये, आले, हळद, लसूण, जिरे, मोहरी, सुकी फळे, मीठ व फुले. आजसुद्धा या सगळ्या गोष्टींचे उत्पादन वसई, पालघर, पेण, पनवेल या भागांत होत आहे. ज्या अर्थी शिलाहारांचे छोटे राज्य ३५० वर्षे टिकले आणि प्रजा एवढे कर देत होती त्यावरून प्रजा संपन्न व सुखी होती असा निष्कर्ष काढता येतो. शिलाहारांनी त्यांच्या छोट्या राज्यात उत्तम राजकीय, महसुली व सामाजिक व्यवस्था रुजवली होती. ह्या काळात अनेक अरबी, इराणी, हबशी प्रवासी व व्यापारी उत्तर कोकणाच्या किनारपट्टीवर उतरले. अरबांनी ‘हँजमान (अंजुमन)’ या व्यापारी पेठा संजाण व चिंचणीसहित अनेक ठिकाणी वसवल्या होत्या. चिंचणी येथे सापडलेल्या ताम्रपटात अनेक अरबी व्यापाऱ्यांची नावे कोरली आहेत. पूर्वीच्या अबिसीनिया  म्हणजे हल्लीच्या इथिओपियातून जी निग्रो वंशाची पण मुस्लीम धर्मीय मंडळी भारतात आली त्यांना ऐतिहासिक काळात सिद्दी किंवा हबशी म्हटले जात असे. शिवाजी महाराजांवर चालून आलेला सिद्दी जोहर किंवा मुरुड जंजिऱ्याचा सिद्दी हे हबशी होते. असो! शिलाहारांच्या वैभवाचे एक कारण म्हणजे परदेशाशी असलेला व्यापार व दुसरे कारण म्हणजे राजकीय व सामाजिक सुव्यवस्था.  आजही देशाच्या उन्नतीसाठी ही दोन्ही कारणे तेवढीच खरी आहेत. मोहेंजोदडो व हडप्पा या काळातसुद्धा भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात असल्याने भारत संपन्न होता.

शिलाहार राजे वृत्तीने परोपकारी, दानशूर व धार्मिक असल्याने विविध यज्ञयाग, अनुष्ठाने, अन्नछत्रे यांना उदार हस्ते दानधर्म करीत; त्यामुळे या काळातील दानांचे अनेक ताम्रपट सापडतात. या ताम्रपटांची दोन वैशिष्ट्ये आहेत :

 १) हे ताम्रपट संस्कृत व मराठी अशा मिश्र भाषेतील (संस्कृतप्रचुर मराठी) आहेत. १२व्या शतकात मराठी ही बोलीभाषा व शासनाची भाषा म्हणून मान्यता पावली होती.

 २) या ताम्रपटांत दान देणाऱ्या राजाचे नाव, त्याची राजवंशावळ, ज्याला दान दिले त्याचे नाव, या समारंभास उपस्थित असलेले अमात्य, अधिकारी यांची नावे व दानपत्र कार्यान्वित झाले  त्या दिवसाची तिथी व नक्षत्रे दिलेली असत. पौर्णिमा, अमावास्या, संक्रांत असे काही दिनविशेष असल्यास त्याचा उल्लेख असे. जमिनीचे दान असल्यास जमिनीचे क्षेत्र, चतुःसीमा, आजूबाजूच्या भागांतील झाडे, ओढे, नाले, सीमेचे दगड, राजमार्ग,  पायवाटा असे सविस्तर वर्णन आढळून येते; त्यामुळे ऐतिहासिक पुरावा म्हणून हे ताम्रपट खूप उपयोगी पडतातच शिवाय या ताम्रपटांतून शिलाहार राजांची काम करण्याची पद्धतही दिसून येते.

शिलाहार राजे शैवपंथीय होते. साहित्य, कला, स्थापत्याचे चाहते होते. त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली : अंबरनाथचे प्रसिद्ध शिवमंदिर हे भूमिज शैलीतील महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे. साधारणपणे मंदिराच्या शिखराच्या बांधणीवरून मंदिर कोणत्या शैलीतील आहे ठरविले जाते. भूमिज शैलीत शिखराच्या चार दिशांना प्रचंड कोरीव काम केलेल्या पट्ट्या असतात –  त्यांना लता म्हणतात. दोन लतांच्या मधल्या भागात मूळ शिखराच्या छोट्या प्रतिकृतींचे पाच किंवा सात थर असतात. त्यांना अनुक्रमे पंचभूमा, सप्तभूमा असे म्हणतात. हे मंदिर बांधण्याची सुरुवात शिलाहार नरेश छित्रराज याने केली; परंतु ते मंदिर इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा मुम्मुणी याच्या कारकिर्दीत  पूर्ण झाले. शिलाहार राजा झंझ याने शंकराची १२ मंदिरे बांधली. त्यांतील एक भिवंडी तालुक्यातील दहसगाव येथे आहे. बाकीची मंदिरे : लोनाड, मुरूड (अलिबाग), अंबरनाथ(ठाणे जिल्हा), राधानगरी व प्रॉपर ठाणे येथील उत्तरेश्वर. शिलाहार यांची राजवट ठाणे व रायगड जिल्ह्यांत होती. याशिवाय इतर शिलाहार राजांनी बालुकेश्वर (वाळकेश्वर), पेल्हार, कांदिवली, सातिवली, आटगाव येथेही मंदिरे बांधली. शिलाहार राजांनी वाडे तालुक्यातील गुंजकटाई गावातील जैन मंदिरालासुद्धा मदत केल्याचे दिसून येते. आज या जैन मंदिराचे भग्नावशेष शिल्लक आहेत. पोर्तुगीज काळात यांतील बरीच मंदिरे नष्ट केली  असावीत. आज फक्त अंबरनाथ, लोनाड व वाळकेश्वर येथील मंदिरे बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. येथे मला एक विशेष गोष्ट नमूद करावयाची आहे ती म्हणजे उत्तर कोकणात सातवाहन, चालुक्य, शिलाहार अशा अनेक राजवटी झाल्या; परंतु त्यांनी बौद्ध व जैन धर्माला नेहमीच मदत केल्याचे दिसून येते. ८ व्या शतकात संजाण येथे पारशी व चौलच्या आसपास ज्यू लोक मुस्लीम अत्याचाराला कंटाळून  आले आणि आजपर्यंत सुखाने राहत आहेत; तेव्हा धार्मिक सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे हे समजून घेतले पाहिजे. हल्लीच्या भाषेतील सेक्युलॅरिझमचे धडे भारतीयांना शिकविण्याची मुळीच जरुरी नाही. पूर्वी राजे मंदिरे बांधत असत किंवा मंदिर बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करीत असत; त्यामागे १) समाजात धार्मिकता रुजावी २) स्वतःच्या राजवटीचे नाव व्हावे हे उद्देश होतेच; परंतु याशिवाय रोजगार निर्मिती हा देखील उद्देश असावा असे मला वाटते. 

साधारणतः इ.स.९७३ ते ११३८ पर्यंतच्या १३५ वर्षांत उत्तर कोकणात कल्याणी चालुक्य, शिलाहार व गोव्यातील कदंब यांची आपापसांत भरपूर युद्धे झाल्याने हा प्रदेश अगदी उजाड झाला होता. व्यापार-उदीम होत नव्हता. वस्त्या उठून गेल्या होत्या. अशा वेळी अहिनलवाडपाटणच्या सोळंकी ऊर्फ चालुक्य राजाचे मांडलीक – चंपानेर संस्थानचा राजा गोवर्धनबिंब याचा भाऊ प्रतापबिंब याने इ.स. ११३८ च्या सुमारास उत्तर कोकणावरती स्वारी करण्याचे ठरविले. प्रसिद्ध ‘लगान’ चित्रपटाची कथा या चंपानेर संस्थानातच घडते. चंपानेरचे हे बिंब घराणे मूळचे मराठी होते. त्यांचे पैठण येथील राजा विक्रमभौम याच्याशी नातेसंबंध होते; त्यामुळे प्रतापबिंब चंपानेरहून लाट देशातून न जाता सातपुडा अजंठामार्गे पैठणला गेला. ऐतिहासिक काळात नवसारी ते दमणगंगा नदी म्हणजे हल्लीच्या वापीपर्यंतच्या भागाला लाट प्रदेश म्हणत असत; पण इ.स. ११४० मध्ये प्रतापबिंब पैठणहून डांगच्या जंगलातून चिखली-दमण- तारापूर- या मार्गे केळव्याजवळील महिकावती ऊर्फ माहीम येथे पोहचला व त्याने केळवे-माहीम हे राजधानीचे ठिकाण केले. दमण ते केळवे  माहीम या प्रदेशातील पावरी, घोडेल, कोळी या स्थानिक अंमलदारांचा पराभव केला. प्रतापबिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यास वसई खाडीच्या पलीकडील मुलुख घेण्यास पाठविले. त्याप्रमाणे बाळकृष्णराव सोमवंशी मढ – जुहू बहिनळे (वांदरे) या किनारी मार्गाने बाळकेश्वर येथे आला. सध्या जेथे राजभवन आहे तेथील उघड्या माळावरती बाणगंगेच्या काठी बाळकृष्णरावाने आपला तळ ठोकला व प्रतापबिंबाला केळवे-माहीम येथून वाळकेश्वरला    बोलावून घेतले. आता    प्रतापबिंबाच्या अधिपत्याखाली दमण ते वाळकेश्वर एवढा प्रदेश आला. या प्रदेशाचा उत्तम कारभार करण्यासाठी चंपानेर व पैठण येथून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व इतर कुळांना या भागात बोलवून घेतले. प्रतापबिंबाचा मुलगा महीबिंब या कुळांना घेऊन या भागात आला. या कुळांची साधारण यादी पुढील प्रमाणे २७ सोमवंशी क्षत्रिय कुळे, १२ सूर्यवंशीय क्षत्रिय कुळे, ९ शेषवंशीय क्षत्रिय कुळे, ५  दैवज्ञ कुळे, ५ पांचाळ कुळे, ६ गुर्जर वैश्य कुळे, पैठणहून यजुर्वेदी माध्यंदिन शाखेची ब्राह्मण कुळे. आजसुद्धा ही सर्व कुळे आपल्या भागात अस्तित्वात आहेत. या कुळांना राज्यात ठिकठिकाणी वसवले. गुर्जर वैश्यांना व्यापार वाढविण्यासाठी दुकानांवरील उदीम कर व जकात तीन वर्षांसाठी माफ केली. हल्लीच्या भाषेत लोककल्याणकारी राज्य स्थापन केले; परंतु नंतरच्या काळात शिलाहार राजा अपरादित्य याने वसई खाडीच्या उत्तरेकडील भाग जिंकला; त्यामुळे बिंबराजांची केळवे माहीम येथील पहिली  राजधानी त्यांच्या हातून गेली; त्यामुळे त्यांनी वांद्रेच्या दक्षिणेस माहीम नावाचीच नवीन राजधानी वसवली. केळवे- माहीम येथे शितळादेवीचे स्थान आहे त्याची आठवण म्हणून मुंबईच्या माहीमला शितळादेवीची स्थापना केली. गंमत  अशी की केळवे माहीम येथील शितळादेवीच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे. तसेच मुंबई माहीमच्या शितळादेवीच्या बाजूलाही आहे. प्रतापबिंबाची कुळदेवता प्रभावतीदेवी. तिच्याच नावाचे रूपांतर प्रभादेवीत झाले. प्रतापबिंबाने आपल्या प्रभावतीदेवी या कुलदेवतेचे मंदिर माहीम येथील कोटवाडी येथे बांधले; परंतु मुस्लीम व पोर्तुगीज राजवटीत ते नष्ट केले गेले. (साधारण इ.स. १५१० च्या आसपास) या मंदिरातील मूर्ती २०० वर्षे विहिरीत दडवून ठेवली  होती. इ.स. १७१५ साली पाठारे प्रभू समाजाने या देवीची स्थापना आजच्या स्थानी केली. वरील सर्व इतिहासावरून चंपानेरहून आलेला प्रतापबिंब हा मुंबईचा पहिला राजा ठरतो.

इ.स. १२९४ मध्ये देवगिरीचा राजा रामदेवराव यादव (ज्याचा अलाउद्दीन खिलजीने पराभव केला.)  याचा एक मुलगा बिंबदेव किंवा भीमदेव यादव हा उत्तर कोकणात आला व त्याने मुंबईवर काही वर्षे राज्य केले. त्याच्याबरोबर  पैठणहून पाठारे प्रभू समाज मुंबईत आला. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाज व पाठारे प्रभू समाज हे पूर्णतः वेगळे समाज आहेत. सोमवंशी क्षत्रिय पाठारे हे इ.स. ११४० मध्ये प्रतापबिंब याच्याबरोबर मुंबईत आले; तर पाठारे प्रभू हे बिंबदेव यादवाबरोबर इ.स. १२९४ मध्ये मुंबईला आले.

इ.स. १३०० ते इ.स. १५०० या दोनशे वर्षांत उत्तर कोकणावरती – चौल (रायगड जिल्हा) येथील हिंदू राजा नागरशा, गुजराथचे सुलतान, बहामनी सुलतान, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही यांनी राज्य केले; परंतु त्या इतिहासात जाण्याची जरुरी नाही. या काळात अंधेरीच्या ‘रानात’ , मुंबई, माहीम, भायखळा, ठाण्याजवळचे कळवा येथे अगदी तुंबळ युद्धे झाली. हा सर्व इतिहास फंद‌फितुरीने भरलेला आहे. या काळातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे इ.स. १३९४ ते इ.स. १४१० या दरम्यान मुंबईतील माहीम येथे शेख अली पारू ऊर्फ मकदूम फकीर अली या अरबी मुसलमान सुफी संताचा उद‌य झाला – त्याची समाधी म्हणजे हल्लीचा ‘माहीमचा दर्गा’ होय.

वरील इतिहासात आजच्या बृहन्मुंबईच्या इतिहास सांगणाऱ्या महिकावतीच्या बखरीत आलेल्या काही गावांची नावे – म्हाळजापूर (मालाड), वरोळी (वरळी), कानझुरे (कांजूर), गोरखगाव (गोरेगाव), कांधवळी (कांदिवली), बोरवळी (बोरीवली), दहीसापूर (दहिसर), धारदिनी (धारावी) वगैरे. प्रतापबिंब (इ.स.११४०) ह्याच्याबरोबर जी सोमवंशी, सूर्यवंशी व शेषवंशी ‌कुळे आली त्या कुळांतील काही आडनावे देऊन हा लेख संपवितो – १)म्हात्रे २)वर्तक ३)देसाई ४)चौगुले ५)देसले  ६)चौधरी ७)चुरी ८) कडू ९)  राणे १०)कवळी.  

पोर्तुगीज सेनापती डॉम जी आवड मोनॉय याने इ.स. १५१६ मध्ये माहीम व वांद्रे जिंकले व तेव्हापासून मुंबईवरती पोर्तुगीजांचा अंमल चालू झाला. पोर्तुगीजांच्या इतिहासाची माहिती पुढील लेखात घेऊ.

Author

One thought on “ये है बॉंबे मेरी जान… भाग २ 

  1. फारच वाचनीय आणि माहितीपूर्ण लेख आहे. सरोदे साहेबांची मराठी ओघवती आणि शब्दसमृद्ध आहे. पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वास्तव्य असणाऱ्या माझ्यासारख्याला हा लेख विशेष आवडेल.

Leave a Reply