२०२४ हे वर्ष जागतिक लोकशाही करिता खूप महत्त्वाचे वर्ष आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही समजली जाणारा भारत आणि सर्वात जुन्या लोकशाहींपैकी एक अमेरिका यांच्यात अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणुका होत आहेत. भारतातील संसदीय लोकशाही व त्याची निवडणूक प्रक्रिया याबाबत आपल्याला बऱ्यापैकी माहित असते. परंतु अमेरिकन अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया ही काहीशी जटील आहे. या लेखमालिकेद्वारा ती प्रक्रिया समजावून घ्यायचा एक प्रयास करूयात- संपादक
सर्वप्रथम मथळ्याविषयी ! NetFlix, Prime Video यांनी आपल्या आयुष्यात व डोक्यात आता महत्त्वाची जागा पटकावली आहे. त्यात अनेक मालिकांमधून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ‘पोटस’ असा उल्लेख आपण ऐकतो. २०२४ साली अमेरिकेच्या नव्या पोटसची म्हणजे ‘President Of The United States’ ची निवड व्हायची आहे. या वर्णनातील प्रत्येक शब्दाची आद्याक्षरं एकत्र मिळवून पाडलेला POTUS हा नवीन शब्द आहे. त्यामुळे ‘The POTUS is on the move’ याचा अर्थ पोट गदागदा हलते आहे असा नसून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची स्वारी निघाली, ‘बा अदब, बा मुलाहिजा, होशियार !’ असा होतो .
या निवडणुकीचे राजकारण हळूहळू तापायला लागले आहे. अजून दहा- एक वर्षे तरी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ही जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असेल असे वाटते. त्यानंतर कदाचित हा मान चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा होईल की काय ते पाहू या. तोपर्यंत या त्यांच्या निवडीकडे साऱ्या जगाचे लक्ष राहणार हे उघड आहे. एक प्रक्रिया म्हणून ही निवड कशी होते, यात कोणते मुद्दे पुढे येतात, हे क्रमशः पाहू या.
अमेरिका हा खंडप्राय देश हे एक संघराज्य आहे. यात ५० राज्ये आहेत. केंद्रशासनाचे तीन घटक आहेत : न्यायपालिका, अध्यक्ष व त्यांचे मंत्रिमंडळ आणि संसद. संसदेची दोन सभागृहे आहेत : ४३५ सदस्यांचे प्रतिनिधिगृह – (House Of Commons) व १०० सदस्यांचे सिनेट ( Senate ).
२०२४ च्या निवडणुकीत प्रतिनिधिगृहाचे सर्व ४३५ सदस्य, ३४/१०० सिनेटच्या जागा व अध्यक्ष अशी ही निवड होणार आहे. अध्यक्षांचा कार्यकाल ४ वर्षांचा असतो. या निवडणुकीची तारीख एका घटनात्मक तरतुदीने ठरते. निवडणूक वर्षात १ नोव्हेंबर नंतर येणारा पहिला मंगळवार हा निवडणुकीचा दिवस असतो. या वेळचा हा मंगळवार ५ नोव्हेंबर २०२४ रोजी येतो. या दिवशी अमेरिकन जनता आपले ५३८ Electors निवडेल व १७ डिसेंबर २०२४ रोजी हे ५३८ लोक अमेरिकेचा ६० वा राष्ट्राध्यक्ष निवडतील. हे Electors म्हणजे काय ते यथावकाश पाहू या. अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या सदस्यांची मुदत २ वर्षांची असते. त्यामुळे प्रत्येक अध्यक्षाच्या कालावधीत एकदा ही प्रतिनिधिगृहाची मध्यावधी निवडणूक येते व अध्यक्षांचा कारभार कसा चालला आहे त्यावर लोक या मध्यावधी निवडणुकीद्वारे मतप्रदर्शन करू शकतात. सिनेटचे प्रतिनिधीही लोकच निवडतात; पण त्यांचा कार्यकाल ६ वर्षांचा असतो; पण सिनेटचे फक्त १/३ सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यामुळे २०२४ साली शंभरपैकी ३४ सिनेटच्या जागा निवडल्या जाणार. एका राज्याला २ सिनेटर असे ठरलेले प्रमाण आहे. राज्याचा विस्तार किंवा लोकसंख्या यांच्याशी त्याचा कसलाच संबंध नाही . प्रतिनिधिगृहात प्रत्येक राज्याची सदस्यसंख्या मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते
अमेरिकेत गेली सुमारे दीडशे वर्षे द्विपक्षीय पद्धत चालू आहे . Grand Old Party किंवा रिपब्लिकन व डेमोक्रॅट असे हे दोन पक्ष . तिसऱ्या पक्षाला बंदी आहे किंवा एखादा अपक्ष निवडणूक लढवूच शकत नाही; असा काहीही कायदा वगैरे नाही. निवडणूक प्रचाराला येणारा प्रचंड खर्च पाहता तसे करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही एवढेच त्याचे कारण आहे. १९९२ व १९९६ साली झालेल्या निवडणुकांत रॉस पेरो (Ross Perot) या टेक्सास मधील धनाढ्य माणसाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. रॉस पेरो नुकतेच निवर्तले .
‘Eagles don’t flock . You have to find them one at a time.’
हे त्यांचे एक प्रसिद्ध अवतरण त्यांच्या स्वभावाची कल्पना यायला पुरेसे आहे . ‘Inventories can be managed but people must be led’ हेही त्यांचेच मत !
आता या दोन प्रमुख पक्षांची चिन्हे काय आहेत त्याविषयी थोडेसे : रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह आहे हत्ती; तर डेमोक्रॅट यांचे गाढव ! या गाढवपणाचे मूळ आहे १८२८ च्या निवडणूक प्रचारात. क्वीनसी ॲडम्स व अँड्रयू जॅक्सन यांच्यात ही चुरशीची लढत झाली . ही लढत अत्यंत हीन व पातळी सोडून झालेल्या प्रचारामुळे गाजली. यात जॅक्सन यांचा उद्धार ‘jackass’ अर्थात गाढव असा करण्यात आला.जॅक्सन हा एक अत्यंत चतुर राजकारणी होता. त्यांनी गाढवाचे सातत्य, चिकाटी, स्वामिनिष्ठा व अविरत कष्ट करण्याची तयारी हे गुण आपल्या प्रचारात अधोरेखित केले. त्याने आपल्या प्रचारसाहित्यावर चक्क गाढवाचे चित्र छापले व बाजी मारली. रिपब्लिकन पक्षाला हत्ती भेटायला मात्र १८६४ साल उजाडावे लागले. थॉमस नास्त (Thomas Nast ) नावाच्या राजकीय व्यंगचित्रकाराने वेळोवेळी रिपब्लिकन मतांचे प्रतीक म्हणून हत्ती वापरला व हळूहळू हा हत्ती पक्षचिन्ह म्हणून स्थिरावला .
Elephants are intelligent asses , aren’t they ?
(क्रमश:)

