चूल-मूल, रांधा-वाढा, व्रतवैकल्ये, पाहुणे- रावळे अशा चौकटीत घट्ट बसेल अशी स्त्री म्हणजे आदर्श स्त्री असं मानलं जाणारा काळ! पतिसेवा म्हणजे पत्नीधर्माचा कळसबिंदू!
‘स्व’ ची जाणीव, स्त्रीस्वातंत्र्य पारंपरिक समाजाच्या गळी उतरवणं ही फार दूरची गोष्ट!
याच काळात धर्म, जातपात या शब्दांशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या सुशिक्षित, पुरोगामी घराण्यात जनाक्का शिंदे यांचा जन्म झाला.
महर्षी वि. रा. शिंदे यांच्या त्या भगिनी.
तत्कालीन रिवाजाप्रमाणे तेराव्या वर्षी लग्न झाले; पण शिकली – सवरली बायको पतीच्या मनातल्या ‘पती हेच दैवत,’ या पारंपरिक चौकटीत मावे ना!
आणि माहेरी परत आलेली स्त्री म्हणजे घरच्यांच्या जीवाला घोर! पण महर्षी शिंदे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे जनाक्का बहुश्रुत झाल्या. त्यांच्या दृष्टीने जातिभेदाचा त्याग, शिक्षण, सेवाभाव, आर्थिक पाया, सांस्कृतिक समृद्धी या नुसत्या भाषणाच्या गोष्टी नव्हत्या.
ढोपरभर घाणीतून अस्पृश्यांच्या वस्तीत चालत जाणे, किरकोळ रोगांवरील औषधे समजून घेऊन त्यांच्यावर इलाज करणे, त्यांना स्वतःच्या पायांवर उभे करणे – एकूणच त्यांच्या काळोख्या जीवनाला अर्थ मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय झालं. या मुलांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केलं. देवदासी, बलात्कारितांना शिकवणे, आधार देणे हाही त्यांनी घेतलेल्या व्रताचाच एक भाग.
प्रार्थना समाजात त्या अध्यापनाचे कार्य करत. निराश्रित समाजाच्या कार्यवाह म्हणून काम पाहत. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, वाई ब्राह्मो समाज अशा महत्त्वाच्या संस्थांत त्यांनी कष्ट आणि विचारांचे भरीव योगदान दिले.
प्रवाहाविरुद्ध जात केलेल्या या प्रयत्नांची फारशी दखल काही अपवाद वगळता मराठी साहित्यसृष्टीत घेतली गेलेली दिसत नाही.
माध्यम पब्लिकेशन ठाणे यांनी जनाक्का शिंदे यांनी लिहिलेलं आत्मकथन प्रकाशित केले आहे. यात महर्षी शिंदे आणि जनाक्का यांचा पत्रव्यवहार — त्यातून झालेले विचारमंथनही आपल्याला वाचायला मिळेल.
काळाच्या पडद्याआड गेलेलं हे झळझळीत व्यक्तित्व वाचकांपुढे आणण्याचे मोठे कार्य संपादक रणधीर शिंदे यांनी केले आहे.
सध्याच्या काहीशा आत्मकेंद्रित आधुनिक जगाला तत्त्वनिष्ठेची ओळख करून देणाऱ्या या आत्मकथनाचं स्वागत.
आठवणी व संस्मरणे
जनाक्का शिंदे
संपादक रणधीर शिंदे
माध्यम पब्लिकेशन ठाणे
वितरक : वाल्डेन बुक स्टोर ९७६६९७५१६५
