गाण्यांमागची गोष्ट

मानसशास्त्राचा अभ्यास करताना, ‘जोहारी विंडो’ नावाची संकल्पना शिकवतात. जसे खिडकीचे चार भाग असतात तसे चार कप्प्यांमध्ये व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये विभागलेली असतात. पहिला कप्पा आहे अशा क्षमता-कमतरतांचा ज्या व्यक्तीला स्वतःलाही ठाऊक असतात आणि इतरांनाही. म्हणजे रुग्णांचे निदान करून उपचार करण्याची माझी क्षमता किंवा कोणतेही वाहन चालवता न येणे ही कमतरता मला आणि जगाला ज्ञात आहे. काही गुणदोष फक्त माझे मलाच ठाऊक असतात. माझ्या मनातली सव्वा लाखाची झाकली मूठ असते ती.  तिसरा कप्पा आहे, ‘ब्लाइंड स्पॉट’.  मला ठाऊक नाही पण इतरांना कळणारी वैशिष्ट्ये. उदाहरणार्थ मी झोपेत कसा घोरतो हे मला कळत नाही पण इतरांना अगदी तीव्रपणे कळते आणि खिडकीचा चौथा भाग आहे ‘अज्ञाताचा’. माझ्यातल्या काही क्षमता ( किंवा कमतरता ) ना मला कळलेल्या असतात ना इतरांना! … जोसेफ आणि हॅरी ह्या शास्त्रज्ञांनी ही मांडणी केली म्हणून ‘जोहॅरी ‘… त्याचे भारतात झाले ‘जोहारी’. इतके तेल नमनाला घातल्यावरचा मुद्दा असा की, ‘मला गाणी लिहिता येतात’ आणि ‘त्यांना चाली लावता येतात,’ हे माझ्यातले सुप्त गुण ना मला ठाऊक होते ना इतरांना. आयपीएच ( इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ) ह्या संस्थेच्या १९९० पासूनच्या प्रवासात स्वतःची नव्याने ओळख घडण्याचे प्रसंग अनेकदा आले.

गीत-संगीताच्या दुनियेतील प्रवासाला सुरुवात झाली ती आमच्या संस्थेच्या ‘वेध’ ह्या उपक्रमामुळे. व्यवसाय-मार्गदर्शन परिषद म्हणून सुरू झालेला हा वार्षिक उपक्रम आज तीन दशकांनंतर ठाण्यासमवेत महाराष्ट्रातील नऊ शहरांमध्ये आयोजित करण्यात येतो. ह्या निमित्ताने लिहिल्या गेलेल्या आणि संगीतसाज चढवलेल्या गीतांची संख्या पन्नासाच्यावर गेल्याचे लक्षात आले आणि मीच स्वतःला विचारले, ‘यार, कैसे हो गया ये सब?…’ चौथ्या कप्प्यातील सुप्तगुण पहिल्या कप्प्यात आले कसे? आणि एक मजेदार कथानक स्मरणातून कागदावर  उमटू लागले.

१९६२ साली भारत-चीन युद्ध झाले तेव्हा ग.दि. माडगूळकरांचे, ‘जिंकू किंवा मरू’ हे गाणे आमच्याही घरात पोहोचले. समरगीते म्हणजेच स्फूर्तिगीते असा माझा समज झाला. देशभक्तीपर गाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात शिकवली, गायली जायची. मराठी भावगीतांचा प्रवाह त्यावेळी हिंदी ‘बिनाका रेडियो सिलोन’ इतकाच जोरात होता. रात्रीच्या वेळी जागून ‘आपली आवड’ ऐकणारे कितीतरी रेडिओरसिक असायचे. माझ्या वडिलांना अनेक भावगीते यायची. भा.रा. तांबे हे त्यांचे आवडते कवी. ‘गगनी उगवला सायंतारा’ हे गजानन वाटव्यांनी गायलेले गीत ते रंगून म्हणायचे.  त्यांच्यामुळेच साने गुरुजींची आणि राष्ट्र सेवा दल कलापथकाची गाणी आमच्या घरी आली. ‘तुझ्या घामामधून, तुझ्या कामामधून उद्या पिकेल सोन्याचं रान! चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या युगाची आन्।।’ हे माझे आवडते गाणे होते. 

अशा प्रकारे संपूर्ण शालेय जीवनात खूप स्फूर्तिगीतांनी पाठराखण नव्हे कानराखण केली. रेडिओ हाच सूरचालक असल्याने मराठी-हिंदी गाण्यांनी सतत सोबत ठेवली. गाण्याचे कोणतेही शिक्षण न घेता मी गाणी गायला लागलो. ती ऐकणाऱ्यांना आवडत होती. पाचवी इयत्तेमध्ये शाळेतल्या गायनस्पर्धेत मी, ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनी चला, विनविते रखुमाई विठ्ठला।।’ हे गाणे म्हणून पहिले बक्षीस मिळवले; तेव्हा नियमितपणे गाणे शिकणाऱ्या माझ्या स्पर्धक मित्र-मैत्रिणींना वाईटच वाटले होते; पण माझ्या आईवडिलांनी मला गाण्याच्या क्लासला न घालता तबल्याच्या क्लासला घातले. हा बहुदा टेबलासारख्या पृष्ठभागावर तबला वाजवण्याचा परिणाम होता. तबला शिकवणारे ठाण्याचे तेलवणे सर अगदी घोटून घोटून शिकवायचे. त्या तीन वर्षांमध्ये तालाचा हिशोब पक्का झाला. सरावाअभावी हे कौशल्य खुंटले.

अभ्यास, वक्तृत्व, नाटक ह्या साऱ्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन वर्षांमध्ये संगीत मागे पडत गेले. त्याला बहर आला मेडीकल कॉलेजमधल्या आमच्या मराठी कवितांवर आधारित वाद्यवृंदामुळे. सलग पंचवीस वर्षे आमचा गट रंगमंचीय कार्यक्रम करायचा. मराठी काव्यविश्वातील अनेक कवींच्या निवडक कवितांना स्वरसाज ला​वायचा आमचा मित्र  डॉ. मनोज भाटवडेकर आणि आमच्या संचातील डॉक्टर मंडळीच गायक आणि वादक असायची. मी ह्या कार्यक्रमाचा कायमचा निवेदक! … पण संगीताचे संस्कार मात्र होत राहिले तसेच कवितेचेही. बोरकरांपासून मुक्तिबोधांपर्यंत आणि पाडगांवकर, बापटांपासून, ग्रेस, महानोर, ढसाळांपर्यंत कविता वाचल्या गेल्या. 

बा.भ. बोरकर, आरती प्रभू, विंदा, इंदिरा संत, धामणस्कर अशा अनेकांच्या कवितांचा रसास्वाद घेता आला आमच्या प्रत्येक कार्यक्रमात माझा  कविता वाचनाचा प्रयोग असायचा. ‘गडद निळे, गडद निळे जलद भरून आले। शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले।।‘  अशी तालबद्ध गाणी मी सादर करायचो. कधी मर्ढेकर तर कधी नारायण सुर्वे . . . त्यात भर पडली सुरेश भटांच्या प्रत्यक्ष सहवासाची. त्यांच्या काही कवितांचा पहिला श्रोता होण्याचे भाग्यही लाभले. पु. ल. आणि सुनीताबाईंचे काव्यवाचन ऐकले. महानोरांसमोर बसून दोन तास त्यांच्या कविता ऐकल्या. 

हे सारे संस्कार इतके आकर्षक होते की ते रुजले नसते तरच नवल. ते झिरपत आहेत हे कळायचे; पण उद्या कसे उगवणार याचा विचारही मनात नव्हता. 

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ  ह्या संस्थेचा जन्म झाला मार्च १९९० मध्ये. जानेवारीच्या दहा तारखेला माझे वडील अचानक निवर्तले होते आणि दोन महिन्यांतच आम्ही काहीतरी नवीन निर्माण करू पाहत होतो. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ अर्थात Mental Health for All’ हे ध्येयवाक्य असलेल्या ह्या संस्थेने अशा सेवा, उपक्रम, कार्यक्रम आखायला सुरुवात केली, ज्यांची समाजाला तोंडओळखही नव्हती. उदाहरणार्थ : स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार किंवा एपिलेप्सी अर्थात फिट्सचा आजार ह्या समस्यांनी ग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे त्रस्त कुटुंबीय ह्यांच्या जाणीवजागृती परिषदा ! असाच एक उपक्रम होता व्यवसाय मार्गदर्शन चाचण्यांचा अर्थात् Aptitude tests चा. मुलांनी सायन्सला जायचे तर मुलींना आर्ट्सला – अशा विचारधारांचा जमाना होता तो. मुंबईमध्ये मेट्रो सिनेमाच्यासमोर सरकारचे एक केंद्र होते अशा शैक्षणिक चाचण्यांचे. आजच्यासारखे ऑनलाईन-ऑफलाईन तपासण्यांचे पेव नव्हते फुटलेले. 

आमच्या टीममध्ये, अशा चाचण्या घेण्यास पात्र अशा सहकारी होत्या शर्मिला लोंढे आणि पूजा ठक्कर; पण येणार कोण पैसे देऊन ह्या व्यवसाय निवड चाचण्या करण्यासाठी? आपल्या सेवा (Services) लोकप्रिय करायच्या तर आपणच समाजाकडे जायला हवे म्हणून आम्ही व्यवसाय प्रबोधन परिषद सुरू केली — वेध अर्थात्  Vocational Education Direction Harmony . . . VEDH ! १९९१ च्या डिसेंबरमध्ये ठाण्यामध्ये ही परिषद पहिल्यांदा भरली. त्यानंतर नित्यनेमाने दरवर्षी भरत राहिली (अपवाद, डिसेंबर १९९३ चा ज्या वर्षी बाबरी मशीद-अयोध्या प्रकरण घडले)

पुढच्या सहा वर्षांमध्ये ह्या वार्षिक उपक्रमाने बाळसे धरले. १९९६ सालापर्यंत आठशे ते हजार विद्यार्थी ह्या परिषदेला हजेरी लावू लागले होते. १९९७ साली तर आमिर खान, जयंत नारळीकर, विजय तेंडुलकर असे एकाहून एक दिग्गज लागोपाठ ह्या व्यासपीठावर आले आणि विद्यार्थिपालकांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली.

ह्या साऱ्या प्रेक्षकांना दिवसाचे सहा-सात तास शांत आणि तन्मय मन:स्थितीत एकतान बसवायचे कसे असा प्रश्न पडायचा. त्याच सुमारास आमच्या संस्थेचा पहिला स्वयंसेवक आधारित प्रकल्प सुरू झाला ‘जिज्ञासा.’ कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी जीवन शिक्षणप्रकल्प असे स्वरूप असलेल्या ह्या प्रकल्पाची कार्यवाही करायची होती स्वयंस्फूर्तीने आलेल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन. आमच्या आयपीएच  संस्थेबरोबर सहयोगी संस्था होत्या स्त्रीमुक्ती संघटना आणि मुंबई पोलीस ! . . . व्यसनाधीनताविरोधी अभियानाशी हा प्रकल्प जोडण्याची कल्पकता दाखवली होती तत्कालीन डीसीपी हेमंत करकरे ह्यांनी; तर ह्या प्रशिक्षणादरम्यान स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या त्यांची चळवळीची गाणी गायला लागल्या. ‘मैं अच्छी हूँ, घबराऊ नको, ऐसा खत में लिखो’ हे गाणे ज्योती म्हापसेकर आणि शारदा साठे आमच्या स्वयंसेवकांकडून गाऊन घ्यायच्या. मजा यायची. समूहगीतांमुळे स्फूर्ती निर्माण होते हा अनुभव खूप छान होता  म्हणून ‘वेध’च्या कार्यक्रमांमध्ये ही गाणी मी शिकवायला लागलो. सुरुवातीला ज्योतीसुद्धा बरोबर असायची. ‘गीत गा रहे है आज हम, रागिनी को  ढूंढते हुए’ हे गाणे वेधसाठी आलेल्या मुलांना खूप आवडायचे. गाणे तालावर शिकवावे म्हणून मी सोबतीला ढोलकी वाजवायला सुरुवात केली. अशी स्फूर्तीगीते गाताना, शिकवताना, वाजवताना अचानक कल्पना आली की ह्या वेध व्यवसायपरिषदेच्या आशयसूत्राला अनुरूप असे गाणे आपणच का लिहू नये? 

त्यावेळी वेध हा उपक्रम फक्त ठाण्यामध्ये व्हायचा. त्यामुळे वर्षाला एक गाणे तर लिहायचे होते. चळवळीतल्या बहुतेक गाण्यांच्या चाली, लोकप्रिय गाण्यांची धून वापरून केलेल्या असायच्या. चाल सवयीची असली की नवे शब्द त्यात पटकन् बसतात, मुखोद्गत होतात. माझ्याकडून पहिले गाणे लिहून आले ते ‘जोश मस्ती अपने अंदर, हम है वोही कलंदर, मेहनत जिनकी मुठ्ठी में है उनका नाम सिकंदर’ ह्या शब्दांबरोबर आपोआपच एक सोपी चाल तयार झाली. 

वेधच्या गाण्यांचे शब्द साधे हवेत, चाल पटकन् गळ्यावर चढणारी हवी. हार्मोनियमवर सूर लावणेही ठाऊक नसलेल्या माझ्यासारख्याला ती शिकवता यायला हवी. पहिले गाणे विद्यार्थ्यांना आवडले. आत्मविश्वास वाढला. वेध व्यवसाय परिषदेला दरवर्षी एक सूत्र असते. त्या सूत्राभोवती विचार चालू व्हायचा. वक्त्यांची निवड व्हायची. त्यांना प्रश्न कोणते विचारायचे ह्यावर मन काम करायला लागायचे आणि गाणे आपोआप तयार व्हायचे. गाणे उगवायला लागले की मनातला त्या वर्षीचा ‘वेध’ ट्रॅक सुरू झाला असा सिग्नल मिळायचा.

मीच गाणे रचायचे, शिकवायचे, ढोलकी वाजवायची आणि सत्रामध्ये मुलाखत पण घ्यायची हे काम कसरतीचे होते म्हणून गायिका आणि वादक ह्यांचा वापर करावा असे ठरले. सुदैवाने आमच्या टीममध्ये गायनकला कंठात मुरलेल्या डॉ. अनघा वझे, शर्मिला लोंढे आणि मंजुश्री पाटील अशा तीन सहकारी आहेत. आयपीएच् संस्थेच्या कुमारवयीन मुलांच्या उपक्रमांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमधून वादक मिळायला लागले आणि कोरससाठीचे गायकसुद्धा. अशा प्रकारे ठाणे वेधचा समूहगान चमू तयार झाला.

माझा सख्खा मित्र सदाशिव अमरापूरकर आणि त्याचे संपूर्ण कुटुंब ह्यांच्या प्रयत्नांमधून वेध उपक्रमाचे सीमोल्लंघन झाले अहमदनगरमध्ये. तोवर चार गाणी तयार झाली होती. नगर वेधच्या आयोजनात तिथल्या शाळेचा सहभाग असल्याने समूहगान-चमू लागलीच तयार झाला. येणाऱ्या विद्यार्थी-पालकांच्या हातांमध्ये गाण्यांच्या शब्दांची पुस्तिका द्यायची. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला एकेक गाणे घ्यायचे. दिवसभरामध्ये सगळेच जण ती गाणी गुणगुणायला लागायचे.

विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये गाण्यांची छापील पुस्तिका आणि वाचत वाचत गाणी शिकवायच्या पद्धतीमुळे आपोआप शिस्त निर्माण होऊ लागली. नगरच्या पाठोपाठ औरंगाबाद, पुणे, नाशिक, परभणी, लातूर आणि कल्याण या सेंटर्समध्ये हळूहळू गायक आणि वादकांचे वृंद तयार झाले. 

  नाशिकच्या वाद्यवृंदामध्ये गाणे गाणारा मल्हार मला कित्येक वर्षानंतर उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भेटला तेव्हा त्याला ‘वेध’ ची गाणी आठवत होती; म्हणजे सूर आपोआपच रुजत होते. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये ही गाणी गायली, बसवली जाऊ लागली. त्यावर नृत्यरचना केल्या जाऊ लागल्या. औरंगाबादच्या, टेंडर केअर होम अर्थात ‘टीसीएच’ या शाळेने निधी उभारणीसाठी अडीच तासांचा पूर्ण कार्यक्रम तयार केला – फक्त वेधगीतांच्या सादरीकरणाचा. त्याचे निरूपण करताना मला खूपच मजा आली. 

गाणी साठत गेली तशी कल्पना आली की त्याची सीडी तयार करावी. ‘नव्या शतकाचे’ गाणे ही पहिली सीडी बाहेर आली. ‘सॉन्ग ऑफ लाईफ’ ही दुसरी; असे एकूण तीन अल्बम आयपीएच संस्थेतर्फे प्रसिद्ध झाले.  पुढे ‘सीडी’ हा प्रकार इतिहासजमा होऊ लागला. यू-ट्यूब नावाच्या बाळाने बाळसे धरायला सुरुवात केली. दरम्यान संस्थेने स्वतःचा ‘माध्यम विभाग’ सुरू केला. ‘आवाहन आयपीएच’ ह्याच नावाने यू-ट्यूब चॅनेल सुरू झाले.  त्यामध्ये वेधमधल्या मुलाखतींबरोबरच काही गाण्यांच्या चित्रीकरणाची एक प्ले- लिस्ट तयार झाली.  ‘वेध’ ही गाणी आता ‘पाहिली’ जाऊ लागली. 

काही काळापूर्वी ‘कोविड’च्या महासाथीमुळे ‘वेध’ चे वार्षिक कार्यक्रम घडू शकले नाहीत; पण आवाहनतर्फे आम्ही ‘ग्लोबल वेध’ अशी ऑन-लाईन संकल्पना राबवली. सहा देशांमध्ये राहणाऱ्या सहा ‘ऑफ बीट’  ‘व्यक्तींसोबत’ ऑन- लाईन सत्रे शूट करायची असे ठरवले. आमच्या चॅनलवर ‘ग्लोबल वेध ‘ ह्या फाईलमध्ये ह्या साऱ्या मुलाखती आहेत.  प्रश्न आला वेध- गीताचा ! चार ओळी तयार झाल्या…

विश्व होई सैरभैर कोणाचा न ताळमेळ,

सूक्ष्म विषाणूने केला, असा दुःखाचा कल्लोळ,

घरी बंद झाली आशा, गर्द चिंतेच्या सावल्या

चला नवे मैत्र जोडू, लावू ज्ञानाच्या दिवल्या

ह्या शब्दांना चाल दिली पुणे वेधच्या स्वरचमूतील पल्लवी गोडबोलेने. शब्द लिहायचे आणि स्थानिकवृंदाने त्याची चाल लावायची ही पुढची पायरी.  २०२३ सालच्या लातूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, परभणी, वेधसाठी ही पद्धत सुरू झाली आहे. लातूरच्या ‘वेध’चे सूत्र होते, ‘वुई द पीपल’ भारतीय संविधान आपापल्या पद्धतीने जगणाऱ्या पाच  तरुणांच्या मुलाखती !  ‘एकत्रातून समग्रता’ अशी कविता झाली.

नकाशातल्या रेषांमध्ये

जाण आमची बंद नसे

मनाजनांच्या समृद्धीतून

अखंड भारत गात असे 

लातूरच्या ज्ञानविकास शैक्षणिक प्रकल्पाच्या स्वरचमूने इतके दणक्यात म्हटले हे गीत की मनाजनांच्या गळ्यामध्ये कायमचे विसावले .  

गीत लिहिण्याची जबाबदारीसुद्धा आता  स्थानिक कार्यकर्त्यांकडे  सुपूर्द करायची आहे.  लातूर वेध च्या डॉ. मिलिंद पोतदारने तशी सुरुवातही  केली आहे.  पेण वेधची सावनी  गोडबोले आणि डॉ. गोडबोले ह्या जोडीनेही आपली प्रतिभा ह्या उद्दिष्टामागे लावली आहे . 

सर्व शहरांमधल्या गटांना गीतरचना आणि चालबांधणी शिकवायची तर सारी गाणी एकत्र करू या अशी कल्पना      आली.  तिसाहून अधिक गाण्यांच्या ध्वनिफिती आवाहनकडे आहेत;  तर मग गीताचे शब्द छापलेले आणि गायनाचे ध्वनिचित्र, स्कॅन-कोडमध्ये असे पुस्तकच का तयार करू नये…!

आज मराठीमध्ये हेतुपूर्वक लिहिलेल्या  स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे.  ‘मनोविकास ‘ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे.  वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही ह्याचा मला एक फायदा असा झाला की  त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या.  माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच; पण ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार – संगीतनियोजक , मित्रमैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी  जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो…

ह्या साऱ्या प्रवासात माझ्या गुणवैशिष्ट्यांचे चारही कप्पे समृद्ध झालेच; पण हजारो मनांपर्यंत विकासाच्या भावना पोहोचवता आल्या हे माझे भाग्यच.  सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांमध्ये आम्ही ‘ डिझायनींग ‘ चे  शास्त्र वापरत नाही ही माझी खंत आहे.   आयपीएचच्या प्रवासामध्ये असे अनेक आकृतिबंध , रचनामाला आम्ही सजगपणे विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहोत. ‘वेध’ च्या अनुभवाचे एक डिझाईन … एक नक्षीदार रचना… त्यामध्ये गीताचे डिझाईन …. त्यामध्ये शब्द  आणि सूर… त्यांचे प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत पोहोचणे… त्यासाठी डिझाईन केलेला अवकाश… त्या स्पेसमधले रंग, प्रकाश, ध्वनी, माणसे , वस्तू… त्यांच्याद्वारे येणारी भावऊर्जा…विचार आणि आशयाबद्दलची स्पष्टता… आशयाचा ग्राफ , भावनांचा पट आणि मिनिटांचे ठिपके !

…ह्यांतून तयार होणारी   ‘ वेध’ जीवन शिक्षण परिषदेची एक कलात्मक रांगोळी… रंगावली… आणि त्यातून मनामनांमध्ये उतरत जाणारा समर्पक आशावाद !

माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणखी काय हवं असतं ?  

Author

Leave a Reply