संत नामदेव
नामदेवांचा जन्म झाला तो काळ होता कर्मकांडं, व्रतवैकल्ये आणि जातिभेदाचा! शिंपी कुळात जन्म झालेल्या नामदेवांचा जन्म शिंपीतून – शिंपल्यातून झाला अशी एक मजेशीर आख्यायिका ऐकायला मिळते. एखाद्या व्यक्तीच्या मागे वलय निर्माण झालं की त्याच्याभोवती अतर्क्य घटनांची रांगोळी चितारणारा समाज प्रत्येक काळात आढळतो.
‘नामदेवांनी सुलतानासमोर मेलेली गाय जिवंत केली,’ ही अशीच प्रसिद्ध(!) चमत्कार कथा!
प्राक्तनाचे योगें भरलासे ओहटा|
पाडितसे वाटा| चोरासंगे||
या अभंगाचा दाखला देत, नामदेव आधी वाटमारी करत असत, हाही निष्कर्ष काढला जातो!
दरोडेखोराचा संत होण्याची ही कथा समाजमनाने तयार केलेली! नामदेवांनी चोर कशाला म्हटले असेल हे त्यांच्या आध्यात्मिक स्थितीवरून लक्षात घेणं गरजेचं आहे. नामदेवांच्या मनातील आंदोलनं, विठूरायाचं लागलेलं वेड, घरच्यांचा विरोध, गोरा कुंभाराने कच्चं ठरवलेलं मडकं, ज्ञानेश्वरांबरोबर केलेले तीर्थाटन आणि परिपक्व झालेली आध्यात्मिक स्थिती हे टप्पे त्यांच्या अभंगांतून उत्कटतेने मांडलेले दिसतात. नामदेवांची कविता, काव्यसौंदर्य, काव्यविशेष अभ्यासणं म्हणजेच नामदेवांचं आत्मकथन अनुभवणं! त्यांची भावपूर्ण कविता ही मराठी भावकवितेची सुरुवात आहे असं म्हटलं जातं.
चंद्रभागेतीरीं आयकिली गोष्टीं|
वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला|
माझिया चित्तास फार झाले क्लेश|
वृथा म्यां आयुष्य गमाविले||
नामदेव अंतर्मुख झाले. त्यांनी ठरवलं,
शतकोटी तुझे करीन अभंग |
म्हणे पांडुरंग ऐक नाम्या|
हा शतकोटी अभंगांचा पण साधला नाही; तर, ‘संपूर्ण जिव्हा उतरीन तुजपुढे’ असा निश्चय त्यांनी केला.
अभंग म्हणजे काय, ते कसे रचायचे हे नामदेव जाणत नव्हते. मनाला लागलेल्या विलक्षण तळमळीतून काळोखात तेजाची तिरीप पडावी तसा अंतरंगातूनच सर्जनाचा रसरशीत कोंब फुटला.
‘अभंगाची कळा नाही मी नेणत|
त्वरा केली प्रीत केशीराजे||’
अभंग कसा असावा याचं आकलन अंतःस्फूर्तीतूनच झालं.
‘सहा साडेतीन चरण जाणावे|
अक्षरे मोजावी चौक चारी|
पहिल्यापासोन तिसऱ्यापर्यंत
अठरा गणित मोज आले||
चौक चारी आधी बोललो मातृका|
बाविसावी संख्या शेवटील||’
त्यांच्या कवितेचं हे रेखीव असं बाह्यसौंदर्य! एक चरण सहा अक्षरांचा असे तीन चरण म्हणजे अठरा अक्षरे, चौथा चरण चार अक्षरांचा – अशी बाविसावी संख्या शेवटची! नामदेवांचे बहुतांश अभंग या मुशीतून आलेले आहेत.
प्राचार्य निवृत्तिनाथ रेळेकर सांगतात, ‘स्वतः नामदेवांनी आपल्याला स्फुरलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेला, ‘अभंग’ या नावाने संबोधले आणि ‘नामा म्हणे’ ही नाममुद्राही दिली.’
उत्स्फूर्त अभंगरचनेतून नामदेवांची पारमार्थिक वाटचाल एखादं चित्रपटाचं रीळ उलगडावं तशी उलगडत जाते. दृष्टान्त, उपमादी अलंकारांनी विनटलेल्या या अभंगांच्या सौंदर्याचा आस्वाद घेणं हा या लेखाचा उद्देश आहे.
शिंपियाचे कुळीं| जन्म माझा जाला| असं सांगत नामदेव शिव आणि शिव(णे) यावर सुरेख श्लेष करतात.
सुई आणि सातुळी कात्री गज दोरा|
मांडिला पसारा ‘सदाशिवी’||
सदाशिवाच्या उत्कट ओढीने त्यांचे देहभान हरपते. घरच्यांना त्यांचं हे ‘घरघेण्या’ विठ्ठलाविषयीचं प्रेम रुचत नाही.
‘ माता वाट पाहे नामा अजून का न ये|’
‘नेणो कवण्या गुणें भुलविलें यातें’ म्हणत आई – गोणाई शोधत असताना भजनात तल्लीन झालेला नामा तिला दिसतो.
‘नवमासवरी म्यां वाहिलासि उदरीं|
आस केली थोरीं होसी म्हणोनि!’
तुज नेल्यावांचून नव जाय येथून /
‘पंढरी गिळीन विठोबा सहित,’
असं ठणकावणारी गोणाई आपल्याला लख्ख दिसते.
गोणाई, दामाशेटी यांच्यासह नामदेवांची पत्नी राजाईची व्याकूळ मनःस्थितीही नामदेव कुशलतेने चितारतात. माझ्या नवऱ्याला का वेडे केलेस, असा जाब विचारत ती आपली करुण कहाणी सांगते,
‘चवदा मनुष्यें आहेत माझ्या घरीं|
हिंडतां दारोदारीं अन्नासाठीं|
राजाई रुक्मिणीलाही विनवते,
‘शिकवा वो रुक्माई आपुलीया कांता
कां आम्हां अनाथां कष्टवीतो|
असं जिवंत शब्दचित्र हे नामदेवांच्या अभंगांचं मोठं वैशिष्ट्य!
दुडदुडा पळती| मुखीं लावी माती|
शेणात लोळती दोघेजण|
नंदाच्या पुढील ओढीताती ताट|
मिटक्या मटमट वाजविती||
सवंगडी जमवून दुधादह्यावर ताव मारणाऱ्या गोपाळांचं चित्र रेखाटताना नामदेव रंगून जातात.
‘पाटावर पाट रची वनमाळी|
पाडीतसे डुळी मोहोरीनें|’
इथे ‘बडवोनि टिरी’ नाचणारा बोबडकांदा पेंद्या गोपाळांना इशारा देताना दिसतो.
‘उगला ले बेते कलुं नका गलबला|
थांबाला ले गोला लोनियाचा|’
मुतूनिया हातें भूमी सारविती|
पोटासी पुसती दोघेजण|
घेऊनियां काष्ट घाशिताती दांत
वाकुल्या दावीत नंदालागीं||
भिंती धरूनियां उभे राहताती…
छोट्या छोट्या बाळांचा बाल्यभाव असा अचूक टिपत नामदेव वाचकांना एकदम श्रीकृष्णाच्या खऱ्या स्वरूपापर्यंत आणतात.
आधार जगती ज्यांचा असे|’
पाऊसधारांचा कोसळता रस, विजेच्या कडकडाटाचा नाद , नाचणाऱ्या मोरांचं मनोहर रूप, त्यांच्या गळ्याचा श्यामनील वर्ण आणि श्रीकृष्णाच्या संगतीत धुंदावलेल्या गोपी – रस, नाद, रूप रंग रेखाटताना नामदेव म्हणतात,
‘मल्हार महुडें गगनीं दाटलें|
विजु खळें गर्जिन्नले गे माय|
आनंदें मयूरें नाचतील आपैसे|
प्रेमे नीळकंठ जाले कैसें||’
त्यांचे अभंग वेचक अलंकारांनी सजलेले आहेत. शब्दालंकारातील एकाखडी किंवा अंत्याक्षरीची एक झलक नामदेव देतात.
‘वेडावली वाचा वेदाची बोलतां|
देवा पाहू जाता अनिर्वाच्य||
अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली|
जिव्हा हे चिरली भूधराची|
भूधराची जिव्हा झालिसे कुंठित
नामा म्हणे अंत नलगे त्याचा||’
नामदेवांच्या अभंगांचं उपमा दृष्टान्त श्लेष अशा विविध अर्थालंकारांनी सजलेलं वैभव पाहून अर्थाइतकाच भाषेच्याही मोहात वाचक पडतो; रसनिर्मितीमुळे गुंगून जातो.
ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर निवृत्तिनाथांच्या मनाची झालेली उलघाल, व्याकुळता दर्शविताना ते म्हणतात,
‘बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट|
ओघ बारा वाट मुरडताती||
बांधलेल्या पेंढीचा बंध तुटल्यावर गवत रानोमाळ पसरतं, हरिणी निघून गेली की तिची पाडसं दशदिशा शोधत राहतात तशी अवस्था झाली आहे, असं विदारक चित्र ते दृग्गोचर करतात.
कधी, स्वतःला ‘विठ्ठलापुढे मी’ म्हणजे ‘हत्तीच्या चरणावरी बैसे माशी,’ अशी उपमा देतात.
कधी ‘पाटील’ या पदाचं रूपक वापरत म्हणतात,
‘जंबु या द्वीपामाजीं एक पंढरपुर गांव|
धर्माचे नगर विठो पाटील त्याचे नाव||’
स्वतःच्या शरीरास ‘घोंगडे’ संबोधत केलेला रूपकात्मक काव्यप्रयोग ज्ञानेश्वरांप्रमाणेच नामदेवांच्या अभंगांतही येतो. ‘चौऱ्यांशी लक्ष जन्म हिंडतां| घोंगडे अनंता जर्जर जालें|’
शेतीविषयक प्रतिमा हा नामदेवांच्या कवितेचा आणखी एक विशेष.
‘ तुझ्या माझ्या शेता नाहीं पेंडवळा’
भक्तीच्या पिकाला कोणतीही सीमा नाही – कल्पनेची पेंडी पाप कुंदा काढी|
काशा देशधडी लावियेल्या|
कुंदा म्हणजे माजलेलं (पापाचं) तण –
कासा हेही एकप्रकारचे गवत! हे उपटून काढायचं.
त्रिगुण त्रिफणी धरून सूत्रधारी
वेद बैल चारी जुंपियेलें
अनाथाचें शेत, प्रेमाचा ओलावा…
यानं भक्तीचं पीक डोलू लागतं.
ब्रह्मनामबीज बांधोनियां ओटी
पेरी दाटोदाटी नामदेव|
नामाचं बीज या अभंगांच्या रूपातून लोकमानसात पेरलं गेलं.
कधी आशेला नदीचं रूप देऊन, तिच्या पुरात मी वाहून गेलो. तिथे मदनरूपी मगराने धरून ठेवलं. भक्तीची ठेव बुडून गेली असं रूपक योजतात.
परमात्म्याचं स्वरूप बुद्धीला कसं अगम्य आहे हे समजावून सांगताना पृथ्वी, आप, आकाश, वायू, या चार महाभूतांचा चमत्कृतिपूर्ण दृष्टान्त मांडतात;
‘समुद्राचे पाणी मुंगी मुखांतूनी’ काढणे, आकाश अंगुळानं मापणे, ‘भूमीचे वजन पालडेनि’ करणे, ‘वारा वळूं ये कदापि’; मात्र – केशवाचे रूपीं नव्हे बुद्धि! ते बुद्धीने जाणता येणारं नाही! असा निष्कर्ष ठसवतात.
दृष्टान्तांतलं वैविध्य आध्यात्मिक दृष्टिव्यतिरिक्त भाषा, रसनिष्पत्ती या कोनांतूनही चकित करतं, अंतर्मुख करतं.
‘बेडूक चिखलाचा भोक्ता, गोचीड दूध सोडून रक्त पिणारी! कुत्र्याच्या कानांत लेखणी खोवली तरी तो घरोघरी घाणच हुंगतो, डुकराला चंदनाचा लेप लावला तरी त्याची धाव विष्ठेकडेच! बीभत्सतेतून निर्माण होणारी किळस तरी परिवर्तन घडवून आणेल ही त्यांची कळकळ आहे.
लोकोक्ती म्हणजे समाजमानसात, बोलीभाषेत रूढ असलेल्या म्हणींचा,वाक्प्रचारांचा अभंगात सहजतेने केलेला उल्लेख. त्यामुळे आशय सहज ठसवला जातो.
ज्येष्ठाच्या आधीं कनिष्ठाचें जाणें
केले नारायणें उफराटें|
उफराटें फार कळलें माझें मनीं|
वळचणीचें पाणी आढ्या गेलें||
वळचणीचे पाणी आढ्या, कडू वृंदावन (कारले) साखरें घोळिले, कोणी निंदा आणि वंदा अशा लोकोक्तींची नामदेवांच्या रचनांमध्ये पखरण दिसते.
संतांनी विठोबाच्या काळ्या रंगाचं फार गोड वर्णन केलेलं आहे. नामदेव त्याला, ‘काळा गे दादुला, सर्व भक्षितो हा ‘काळू’’ म्हणत ‘काळ’ शब्दातून श्लेषाचा चपखल वापर करतात; तर कधी तत्कालीन समाजाचे दर्शन स्वभावोक्ती अलंकारातून घडवतात.
तुम्हा घरी बोचके लुगडी ।
आम्हा घरी पोरे उघडी ।।
तुम्हा घरी गाई म्हशी ।
आम्हा घरी उंदीर घुशी ।।
तुम्हा घरी सुवर्ण मडकी ।
आम्हा घरी खापरे फुटकी ।।
धार्मिक हटवादीपणामुळे दुभंगलेल्या समाजाला ते सांगतात;
‘हिंदू अंन्हा (अंध) तुरकू काणा( तिरळा)
दुहांते गिआनी सिआणा (ग्यानी-ज्ञानी शहाणा)
हिंदू मुस्लीम देऊळ, मशीद यांत अडकून राहतात; पण यापलीकडे जाऊन ज्ञानी सगळीकडे देव पाहतो!
भक्तिरस हा सर्वच संतांच्या अभंगाचा स्थायीभाव असतो. नामदेवांच्या अभंगांत पादसेवन भक्तीचे नादमधुर वर्णन येते.
दोंदील दोंदील टमकत चाले|
गोजिरीं पाउलें घालोनियां|
कधी ते म्हणतात,
सुकुमार सावळे जैसी रातोत्पळें
दावी ती पाउले कृष्णराया|
तर कधी…
रुणुझुणु पायीं वाजतात वाळे|
दावीं तीं पाऊलें दयानिधी!
वस्त्रहरणप्रसंगी जो धावून आला, शिळेचा उद्धार ज्यानं केला, नक्राने धरले तेव्हा धावलेली पावलं मला ‘दावी दयानिधी’ अशी आळवणी नामदेव करताना दिसतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रातल्या कथा पादसेवन भक्तीतून मांडत त्यांचं एकरूपत्वही दाखवून देतात.
नामदेवांनी विठ्ठलावरचं प्रेम कधी मधुराभक्तीतून; तर कधी मायलेकरू नात्यातूनही फुलवलेलं दिसतं.
‘भिन्न रात्रीं माध्यान्ही वो|
सेजे सुदली नारी|…
देऊनि आलिंगन वोरसलें वो दुरी|
म्हणत विरहिणीची व्यथा ते व्यक्त करतात.
मैं बऊरी (बावरी) मेरा राम भतारु
रचि रचि ताकउ करू सिंगारु
अशा हिंदी रचनांमधूनही मधुरा भक्तीचे रंग मुग्ध करून जातात –
माता बालक यांच्या दृष्टान्तातून नामदेव परोपरीने ईश्वराविषयीचं प्रेम व्यक्त करतात.
विठ्ठल माउली कृपेची कोंवळी|
आठवितां घाली प्रेमपान्हा||
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज
तूं माझी कुरंगिणी मी तुझे पाडस
मी तुझे वच्छ तूं माझी गाउली अशी अनेक रूपके परमात्म्याप्रतीची ओढ स्पष्ट करतात…
प्रेमफासा घालुनियां गळा
जित धरलें गोपाळा
ऐक्य मनाची करून जोडी
विठ्ठल पायी घातली बेडी
हृदय करूनि बंदिखाना
विठ्ठल कोंडुनी ठेवला जाणा
सोऽहं शब्दें मारा केला
विठ्ठल काकुळती आला
असं हिंसक प्रेमही मनाचा ठाव घेतं.
नामदेवांच्या अतींद्रिय अनुभवातून आलेल्या अभंगांची उकल करण्याचा प्रयत्न आपल्या विचारांची कक्षा रुंदावणारा ठरतो.
अकरा लोचन त्याचे पाच मुख
आठ कान देख पुच्छ दोन
दहा पाय चहुं चालत ते जाय
हे वर्णन आहे शंकर पार्वती गणपती नंदी आणि सर्प यांचं!
रकार मकार बांधी कांरे तुळी
तापत्रय होळी होऊन जाय
रकार आणि मकार म्हणजे रा आणि म एकत्र आले की तापत्रय जळून जातात.
स्त्री गरवार पति उदरी
पत्नीच्या पोटात पतीच आहे, हे कसं शक्य आहे? पुरुष आणि प्रकृती हे आदिमिथुन. प्रकृती विश्वाचा पसारा मांडते आणि परमेश्वर नाना रूपे धारण करतो असं गुह्य या रचनेत दडलं आहे.
चरित्रं, प्रवासवर्णन, आख्याने, गौळणी, श्रीराममाहात्म्य, श्रीकृष्णमाहात्म्य, हिंदी पदे असे वैविध्यपूर्ण साहित्य नामदेवांनी काव्यात गुंफून आध्यात्मिक आणि साहित्यसृष्टीला अलौकिक देणगी दिली आहे.
ज्ञानेश्वर नामदेवांच्या काव्याविषयी म्हणतात,
‘भक्त भागवत बहुसाल ऐकिले|
बहु होउनी गेले होती पुढे||
परी नामयाचें बोलणें नव्हे हें कवित्व |
हा रस अद्भुत निरोपमु||
कळावंत, कवित्व कुशळ, पाठक, साधक, वाचक, ग्रंथकार असे संत नामदेव!
समारोपात परिसा भागवतांचे शब्द उसने घेऊन कवित्वाचं वर्णन…
दुधावरील साय तें मी वाणूं काय|
तैसें गाणें गाय नामदेव||

गहन विषय अत्यंत रसाळ व सोपा करून मांडला आहे . पुढच्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे .