धार्मिकता व आध्यात्मिकता म्हणजे काय

आज आपण डोळसपणे आजूबाजूला बघितले तर असे लक्षात येईल की हल्ली साईबाबा, स्वामीसमर्थ, गजानन महाराज यांच्या मंदिरांची संख्या वाढते आहे. तसेच सिद्धिविनायक, लालबागचा गणपती यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक तिकडे जात आहेत. मठ व मंदिरांना मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत आहेत. 

या निरीक्षणावरून,’भारतीय समाज धार्मिक होतो आहे,’ असे म्हणता येईल का? जर समाजात धार्मिकता वाढत असेल तर समाजातील वाईट मार्गाने पैसे मिळविण्याची प्रवृत्ती, द्वेष, मारामाऱ्या, बलात्कार यांचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे; परंतु असे झाल्याचे तर काही दिसून येत नाही. या दोन परस्परविरोधी गोष्टी समाजात एकाचवेळी का आहेत? यासंबंधात खोलात जाऊन विचार केल्यास असे दिसून येईल की समाजात रुजलेली धार्मिकतेची जी कल्पना आहे तीच मुळात चुकीची आहे. देवळात जाणे, पूजा करणे, पोथ्या वाचणे, पारायणे करणे वगैरे करणारा माणूस ‘धार्मिक’ आहे असे जे आपण समजतो हेच मुळात चुकीचे आहे. 

वरील सर्व गोष्टी माणूस कशाकरिता करतो आहे? त्याचा उद्देश काय आहे? हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. या अंगाने तपासणी केल्यास असे दिसून येईल की माणसे काहीतरी मागण्यासाठी किंवा समस्यांतून सोडवणूक व्हावी म्हणून देवाकडे, संतांकडे जात आहेत. याशिवाय माणसांची अशी एक धारणा/कल्पना असते की देवस्थानांना देणग्या दिल्या, दान केले की आपण केलेल्या पापातून आपली मुक्तता होईल. सर्वसाधारण लोकांना पाप-पुण्याचा हिशोब हा व्यवहारातील ‘क्रेडीट-डेबीट’सारखा हिशोब असतो असे वाटते. यामुळेच पावणारा देव व संत यांच्याच देवळात गर्दी होते असे आपल्याला दिसून येईल. सज्जनगडावर दासनवमी सोडून अलोट गर्दी झाली असे काही दिसत नाही. कारण लोकांना सज्जन होण्यात इंटरेस्ट नसतो. मनाचे श्लोक-ज्यात माणसाने समाजात व वैयक्तिक जीवनात कसे वागावे हे अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे; या श्लोकांचे पारायण करणारा माणूस अगदी अभावानेच आढळतो. या सर्व गोष्टींचा अर्थ एवढाच की ‘मी सुधारणार नाही परंतु दीनदयाळू देवाने/संतांनी मला मात्र संकटातून सोडवावे व मला पाहिजे ते द्यावे!’ असे न झाल्यास माणूस देवाला दोष देण्यास, धर्माला नावे ठेवण्यास कचरत नाही. असो.

वर म्हटल्याप्रमाणे आपली धार्मिकतेची कल्पना किंवा व्याख्याच चुकीची असेल तर खरी धार्मिकता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. 

भगवद्गीतेत धार्मिक माणसात ५१ गुण असले पाहिजेत असे सांगितले आहे. या सर्व गुणांचा आढावा या लेखात घेणे शक्य नाही; पण त्यांतील महत्त्वाच्या गोष्टी पाहू. वरील ५१ गुणांची सात गटांत विभागणी केली आहे; ती पुढीलप्रमाणे-

१) शम : म्हणजे मनोनिग्रह यात अहिंसा, बळ व सत्तेचा दुरुपयोग न करणे, चोरी न करणे (अस्तेय), न फसविणे (शुचि) वगैरे गुण येतात.

२) दम : इंद्रियनिग्रह

३) उपरम : म्हणजे कर्तव्य पालन

४) तितिक्षा : म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल जाऊ न देणे, विचलित न होणे.

५) श्रद्धा : यात ईश्वरश्रद्धा,  कर्मफलश्रद्धा, सगुण उपासना वगैरे गोष्टी येतात.

६) वागणूक वैशिष्ट्य : यात मार्दव, क्षमा, दया, करुणा, दानवृत्ती वगैरे गुण येतात. 

७) समाधान : म्हणजे समाधानी वृत्ती

वरील सर्व गुण आचरणात आणणे याला धर्माचरण म्हणतात. ‘धर्माचरण जो करतो तो धार्मिक,’ ही धार्मिकतेची खरी व्याख्या आहे. परंतु कर्मकांड म्हणजे धर्माचरण नव्हे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खऱ्या धार्मिक माणसांची संख्या समाजात वाढली तर समाज अनेक दृष्टींनी निरोगी होईल व या लेखाच्या सुरुवातीला वर्णन केलेला विरोधाभास नक्कीच कमी होईल. धार्मिक संस्कार म्हणजे माणसाला धर्माचरणाला प्रवृत्त करणे हे होय. स्वत:च्या आचरणातून हे संस्कार पुढील पिढीत पोहोचविले / संक्रमित केले तरच समाज ‘समाज’ म्हणून टिकून राहील. समाजात समाधान व शांतता नांदेल.

धर्माचरण ही माणसाची सहज प्रवृत्ती नसल्यामुळे माणूस देहाच्या सुखासाठी निसर्गाचा नाश करतो आहे. या नाशामुळे इतर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. स्वार्थ व सत्तेची लालसा यांमुळे माणूस निरपराध माणसांना मारण्यास जराही कचरत नाही. तो पशूपेक्षाही हीन पातळी गाठू शकतो. अशावेळी माणसाचे माणूसपण जागे झाले तरच तो धर्माचरणाकडे वळू शकतो.

माणसाने विज्ञानाच्या जोरावर मला सगळे कळू शकते असा कितीही आव आणला तरी, ‘हे जग असे का? माझा व जगाचा काय संबंध आहे? मी मरतो म्हणजे काय होते? व शेवटी मी कोण आहे?’ हे मूलभूत प्रश्न कधी ना कधी त्याला पडतात व तो अंतर्मुख होतो. ही अंतर्मुखता ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. तत्त्वज्ञान येथूनच सुरू होते. म्हणूनच प्लेटो म्हणतो, ‘Philosophy begins in wonder.’ 

त्यामुळे अंतरंगाचा किंवा आत्म्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती म्हणजे आध्यात्मिकता! 

भारतीय तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य असे आहे की ते फक्त सिद्धांत सांगत नाही; तर सिद्धांतात सांगितलेली गोष्ट प्रत्यक्षात अनुभवण्याचा मार्गसुद्धा सांगते. भारतीय तत्त्वज्ञानात आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती व गुरुप्रचिती या तिन्ही प्रचिती  जेव्हा एकाच निष्कर्षाप्रत येतात तेव्हाच तो अनुभव खरा मानला जातो. यावरून भारतीय तत्त्वज्ञान किती वैज्ञानिक आहे ते लक्षात येईल. 

अंतरंगाच्या शोधाचा अंतिम टप्पा म्हणजे आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार. माणूस आयुष्यभर सुख, समाधान, आनंद व शांती मिळविण्यासाठी धडपडत असतो. आत्मज्ञान झाले की या सर्व गोष्टी त्याला कायमस्वरूपी मिळतात.

धार्मिकता व आध्यात्मिकता या परस्परावलंबी गोष्टी आहेत. मी वाटेल तसे आचरण करीन व आत्मज्ञान मिळवेन असे होऊ शकत नाही; कारण अंतरंगातील प्रवास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा प्रवास आहे. त्यामुळे मनोनिग्रह, इंद्रियनिग्रह केल्याशिवाय हा प्रवास होऊ शकत नाही. तुम्ही साधना करू लागलात की तुम्ही स्वत:कडेच तिऱ्हाईत दृष्टीने बघू लागता. त्यामुळे लक्षात येऊ लागते की जे मी माझे एकट्याचे कर्तृत्व म्हणून समजत होतो त्यात अनेक गोष्टींचा सहभाग आहे. त्यामुळे मी कर्ता आहे हा अहंकार कमी होतो. अनेक गोष्टींतील क्षणभंगुरपणा लक्षात यायला लागतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनात येणारे विचार आपण थांबवू शकत नाही हे कळल्यावर हे विचार का व कोठून येतात याचा शोध घेण्याची जिज्ञासा वाटते. या सर्वांचा परिणाम म्हणून राग, लोभ, मोह इत्यादी षड्रिपू कमी होऊ लागतात व तुमची धार्मिकता सहजपणे वाढते. याचाच अर्थ धार्मिकता व आध्यात्मिकता या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी असल्या तरी त्यांचे स्वरूप भिन्न आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, केवळ धर्माचरणाने आत्मज्ञान होऊ शकत नाही. म्हणून संत ज्ञानेश्वर हरिपाठात म्हणतात, 

‘विष्णुवीण जप, व्यर्थ त्याचें ज्ञान। रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें।।‘ 

किंवा

‘तीर्थ, व्रत नेम भावेंविण सिद्धि| वायांचि उपाधी करिसी जना।।‘

आता आत्मज्ञानी व्यक्तीची लक्षणे सांगून लेख संपवितो.

आत्मज्ञानी माणूस : १) पूर्णपणे स्वार्थरहित, २) वासना व इच्छारहित, ३) सदैव आनंदी ४) निर्भय, ५) प्रतिभासंपन्न, ६)सर्वांवरती प्रेम करणारा, ७)प्रपंचात अडकलेल्यांबद्दल कणव असणारा असतो. या कणवेतूनच संतवाङ्मय निर्माण होते.

Author

3 thoughts on “धार्मिकता व आध्यात्मिकता म्हणजे काय”

  1. श्रद्धा याचा अर्थ ज्या गोष्टीला कोणताही पुरावा नाही अशा अविश्वसनीय गोष्टीवर विश्वास ठेवणे. उदाहरणार्थ देव आत्मा पुनर्जन्म कर्म सिद्धांत. हिंदू धर्माच्या गोतावळ्यामध्ये जरी जैन बुद्ध वगैरे देव न मानणारी दर्शने असली तरी ती प्रत्यक्षात तत्त्वज्ञानाच्या स्वरूपातच राहिली. बौद्ध किंवा जैन यांनी एकतर बुद्धाला किंवा तीर्थंकरला देव बनवले किंवा हिंदू देव देवतांची पूजा करणे सुरू केले.
    त्यामुळे धार्मिकता ही समाजाला अत्यंत नुकसानकारकच ठरते. ज्या प्रमाणात निधर्मी आणि नास्तिक माणसांची संख्या वाढेल त्या प्रमाणात समाजाची प्रगती होत राहील.

  2. पुढे आणखी लिहीत रहा.वाचायला आवडेल.

  3. एकदा का धार्मिकतेची संकल्पना मान्य केली की त्याला आवर घालणे हे कोणत्याही समाजाला शक्य नाही. वृथा धर्मभिमानाचे केव्हा धोकादायक धर्मवर्चस्वा मध्ये रुपांतर होऊन जाते ते कळत नाही.
    या उलट आत्मज्ञान केंद्रीत विज्ञानावर आधारित आचरण हेच खरे अध्यात्म आहे असे मला वाटते

Leave a Reply