लेख पहिला
ज्ञानेश्वर
‘किं कवेस्तस्य काव्येन किं काण्डेन धनुष्मतः|
परस्थ हृदये लग्नं न घूर्णयति यच्छिरः|
‘एखाद्या धनुर्धराने आपल्या बाणाने शत्रूच्या हृदयाचा वेध घेऊन त्याचं मस्तक गरगरायला लावलं नाही; तसंच एखाद्या कवीने आपल्या काव्यातून रसिकाच्या हृदयात शिरून त्याला आपले शिर डोलवायला लावले नाही तर त्या बाणाचा आणि त्या काव्याचा काय उपयोग!’
काव्य, कवी आणि काव्यरसिक यांच्या संबंधांचं हे मजेदार वर्णन!
कवी, काव्य आणि त्यांस समरसून दाद देणारे रसिक असा समसमा संयोग मराठी भाषेच्या उदयापासूनच घडून आला आहे.
मराठी साहित्यातील पाऊलवाटांवरून आपण काव्यशोध घेत येतो तेव्हा भेटतात,
‘ वेदशास्त्रांचा मथितार्थु । मऱ्हाटिया जोडे फलितार्थु ।
तरि चतुरीं परिमार्थु ।कां नेघावा ॥१॥’
लिहिणारे मुकुंदराज!
काव्याचा पुढचा पडाव लागतो तो महानुभावांचा! इथे महदंबेचे धवळे, भास्कर पंडितांच्या
‘जियें कवितेची गोडी|
कोकिलांची तराय मोडी|’
अशा अवीट गोडीच्या रचना थक्क करतात!
या काव्यविषयक लेखमालेत आपण महानुभावांनंतरच्या – संत पंत तंत कवींच्या रचनांचा आस्वाद घेणार आहोत.
संत पंत तंत म्हणजे कोण?
पंत म्हणजे पंडित कवी. तंत म्हणजे तंतुवाद्य वाजवत शाहिरी सादर करणारे शाहीर.
सन्त हा शब्द आदरार्थी बहुवचनासारखा वापरला जातो. सत् म्हणजे जे आहे ते, जे सर्वदा असते ते! या सत् चे बहुवचन सन्त! चिरंतनत्व!
इथे कोणीही जन्माला येत नाही किंवा नष्टही होत नाही. फक्त रूप बदलतं
‘पाणी कल्लोळाचेनि मिसें| आपणपें वेल्हावें जैसें|’
पाणी लाटांचं रूप घेत स्वतःच स्वतःशी खेळत राहतं. लाट विरली की पाणी, पुन्हा लाट – असा खेळ चालूच राहतो.
जीवाचं चिरंतनत्व स्पष्ट करताना ज्ञानेश्वर ‘जलतरंग न्यायाचं’ असं सुंदर उपायोजन करतात.
संतकवींच्या अमृतवाणीविषयी लिहिताना,
‘साहित्य सोनियाचे खाणी।
उघडू दे देशियेचिये क्षोणी।’
असं म्हणणारे ज्ञानेश्वर अर्थातच अग्रस्थानी!
ज्ञानेश्वरांचे मधुर बोल कसे अनुभवावे?
‘आहाच बोलाचि वालीफ फेडिजे|
आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे|
‘ शब्दांच्या रूपाची गवसणी काढून टाका आणि आतल्या अर्थब्रह्माचा वेध घ्या,’ असं ज्ञानेश्वर सांगतात. या लेखात मात्र वालिफेचा – शब्दांच्या आवरणाचाच आनंद आपण घेणार आहोत.
त्यांनी मांडलेले दृष्टान्त, रचना, रस यांचा म्हणजेच ‘शिर डोलवायला लावणाऱ्या’ अक्षरधनाचा आस्वाद आपण घेणार आहोत!
‘ म्हणोनि तूप होऊनि माघौतें|
जेवीं दुधपण न येचि निरुते|’
ज्ञानेश्वर दग्धबीज न्याय सांगतात.
‘दुधाचं तूप झालं की परत तुपाचं दूध होऊ शकत नाही. लोखंडाचं सोनं झाले की पुन्हा लोहत्व येत नाही. एकदा बी भाजले की ते अंकुरत नाही – तसंच स्वरूपी मिळाल्यावर पुनर्जन्म नाही!
अंधारात दोरीला साप समजून माणूस घाबरून जातो पण उजेड पडला की तो साप नाही हे त्याला कळतं. तसंच आत्मज्ञानाचा उजेड पडला की मायेचा भ्रम नाहीसा होतो. गोड भाषेचं मधबोट चाटवत रज्जूसर्प न्यायासारख्या दृष्टान्तांचं – एरवी कडू वाटणारं औषध ज्ञानेश्वर पाजतात ते ‘गुडजिव्हिका’ न्यायाचं उदाहरण!’
‘देखें रोगातें जिणावें |औषध तरी देयावें|
परी ते अतिरुच्य व्हावें| मधुर जैसें|’
कावळ्याच्या एकाच डोळ्यात बुबुळ असतं पण तो इतक्या वेगाने बुबुळ दोन्हीकडे फिरवतो, की दोन्ही डोळ्यांत बुबुळं असल्याचा भास होतो. भिंगरी वेगानं फिरवली की स्थिर आहे असं वाटतं! याचाच आधार घेऊन ते पुढे सांगतात, ‘अशाच वेगाने संसारवृक्ष देखील नाश पावत आहे आणि पुन्हा रचला जात आहे. हे सर्वसामान्यांना न कळल्याने
‘लोकु पिसा’ संसारवृक्षाला ‘अव्यय’ मानतो.
रोजच्या जीवनातील अनेक दृष्टान्त देऊन ज्ञानेश्वर अंतिम सत्य ठसवत राहतात. गंमत म्हणजे एरवी सर्वत्र खरा ठरणारा ‘अति सर्वत्र वर्जयेत्|’ हा नियम मात्र त्यांना लागू पडत नाही. आपण पुन्हा पुन्हा त्यांच्या उपमा, दृष्टान्त वाचत राहतो, पुन्हा पुन्हा त्या मांडणीच्या, भाषेच्या गोडव्यात नाहून निघतो. याचं कारण,
‘वक्तृत्व गोडपणें अमृतातें पारु म्हणें|’
आणि रससौंदर्य?
‘ऐका रसाळपणाचिया लोभा|
कीं श्रवणीच होती जिभा|’
आकंठ रसपान करावं या हेतूने कानांनाच जिभा फुटतात.
वीररस उभा करताना
‘ तैसें ते घनदाट |उठावलें एकवाट|जैसें उसळलें कालकूट| धरी कवण||’
घनदाट, एकवाट कालकूट यांतील ट चा अनुप्रास वीररसाला पोषक ठरतो.
हे वर्णन अर्थातच कुरुक्षेत्रावरचं!
कुंडलिनी जागृत झाली की घडणाऱ्या देहमनाच्या क्षेत्रातील वीररसपूर्ण हालचालींचं वर्णन…
कोंडलेला अपानवायू
‘क्षोभलेपणें माजे|
मणिपूरेंसीं झुंजे!’
‘ धातूंचे समुद्र उलंडी| मेदाचे पर्वत फोडी|
आंतली मज्जा काढी| अस्थिगत||’
कुंडलिनी मांसल ठिकाणांचे लचके तोडते, सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते.
त्याज्य गोष्टींचे वर्णन करताना, बीभत्स रस प्रकटतो. एरवी अमृतमधुर असणारे ज्ञानेश्वरांचे शब्द जुगुप्सा उत्पन्न करतात.
‘तमोगुणरूपी राक्षसीच्या मुखात आशेच्या लाळेत हिंसारूपी जीभ लोळते. तिच्या तोंडातल्या द्वेषाच्या दाढा- ‘खसखसां ज्ञानाचा रगडा’ करत असतात.’
‘मातेचिया उदरकुहरी| पचून विष्ठेचां दाथरी|’ नऊ महिने जीव उकडून घेत असतो.
विषयभोगाने बरबटलेल्या जीवांची
‘पूयपंकींचे किडे काय चिळसी घेत, ‘ अशी संभावना ज्ञानेश्वर करतात.
कधी अभंगातून भयानक रसाचा परिपोष करतात;
‘अंबुला विकुनी पवित्र झाली
पोटींची बाळें कौतुकीं मारली|
आशा तृष्णा नणंदा मारिल्या!’
(अंबुला म्हणजे अहंकाररूपी नवरा, बाळे म्हणजे पोटातील कामक्रोधादिक)
अद्भुत रस प्रवेश करतो अकराव्या अध्यायात.
‘जेथ शांताचिया घरा|
अद्भुत आला आहे पाहुणेरा!’
श्रीकृष्णाने स्वरूपऐश्वर्य प्रकट केलं तेव्हा अर्जुनाला वरचं आकाश दिसेनासं झालं. चारी दिशा, ऊर्ध्व अधर हे लुप्त झाले.
‘नवलावो काइसयासारिखा सांगावा|
कल्पांती एकुचि मेळावा| द्वादशादित्यांचा होय|’
‘ केवढं मोठं आकाश इथे होतं!’
‘तें कवणें नेलें पां केउतें|’
सगळं चराचर, महाभूतं गेली कुठे?’ जाग आल्यावर स्वप्न नाहीसं होतं, तसं सगळं विरूनच गेलं!
त्रिगुणात्मक मायेच्या कचाट्यात जीव सापडतो तेव्हा करुणरस स्रवू लागतो.
मदनाच्या मोहात पडल्याने विषयरूपी मगरी शरीर चघळून टाकतात!
वृद्धापकाळी बुद्धिभ्रंश होतो. क्रोध, शोक यांच्या आवर्तात ते अडकतात.
‘आणि शोकाचां कडां उपडत|
क्रोधाचां आवर्तीं दाटत…’
संकटरूपी गिधाडं त्यांना टोचत राहतात.
‘मग दुःखाचेनि बरबटें बोंबलें’
अशी असहाय अवस्था होते.
अंतःकरणात आनंदरसाचे पाझर फुटतात,
कुंडलिनी जागृत होते त्या सौंदर्य वर्णनाने!
‘मग काश्मीराचे स्वयंभ|
कां रत्नबीजा निघाले कोंभ|
अवयवकांतीची भांब|
तैसी दिसे||
तें आनंदचित्रींचे लेप|
नातरी महासुखाचे रूप|
की संतोष तरूचे रूप|
थांबलें जैसें||’
सुख आणि सुखाचा अनुभव यांतील द्वैतभाव विरून जातो. ही अनुभूती वाचताना आपल्याही मनात सुखाचा परिमळ दाटून येतो. वाचताना हे रस अनुभवले जातात. आनंद, आश्चर्य, दुःख अशा विविध भावना उचंबळून येतात; पण सर्व रसांच्या या खेळामागे असते शांतरसाची पार्श्वभूमी. हे शांतपण कसं?
‘की राती हन गेलिया|
दिवसा हन पातलिया|
काय सूर्यपण सूर्या होआवें लागे||’
रात्र सरली की सूर्याला सूर्य व्हावं लागतं का? सूर्य असतोच! तसा हा रस संपला, आता शांतरस मांडू ही कृत्रिम भूमिका इथे नाहीच. शांतरस पूर्ण साहित्याला कायमचाच व्यापून आहे!
ज्ञानेश्वरांच्या रचनांचा आणखी एक आयाम म्हणजे कानडी, बागलाणी भाषांमधील रचना!
‘मे दुरर्थि कर जोडु|ताऱ्हो सेवा न जाणुं
तन्हा मराठा देश|भन्ही बागलाणी भाष|’
गवळण तिचं दुःख सांगते,‘तुझी सेवा कशी करावी हे मला माहीत नाही. माझी भाषा बागलाणी! मी तुला कशी आळवू? तुझं नाम हीच एक ढाल तलवार मजजवळ आहे.’
एका लहानग्या बोबड्या गवळणीची गमतीदार कथा रंजक आणि उद्बोधक!
‘जात होतें यमुने पाणिया |
वातंत भेतला सांवला|…
तेणें माझी केली तवाली|
मग मी तेथूनी पलाली|
पलता पलता घसलून पलली|
दोईची घागल फुतली||
माझे घुलगे फुतले|
मग मी ललत बथले||
तिकून आले शालंगपानी|
मला पोताशीं धलिलें|
माझें समाधान केलें|
निवृत्तीचे कृपें सुख हे |
ज्ञानदेवा लाधलें||’
परमात्म्यासमोर आपण या लहानग्या गवळणीसारखं बालक व्हावं! आपल्या उपाधी, समाजात असलेलं मोठेपण हे सगळं त्यागून त्याच्यापुढे निरागस बालक होऊन जावं. मग तो आपल्याला पोटाशी कवळून धरतो.
‘म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे|
व्युत्पत्ती आघवी विसरिजे|
जे जगां धाकुटें होईजे|
तैं जवळीक माझी||’
निरागस बाल्य, श्रीकृष्णाचं वत्सलत्व आणि त्याचंच रूपक करून निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाच्या अविरत वर्षावात नाहून निघालेलं ज्ञानेश्वरांचं हे भक्तपण!
ज्ञानेश्वरांच्या अक्षरवाटिकेतील ही दिव्य सुमनांजली-
अक्षराकडून ‘अ क्षरा’पर्यंत नेणारी!

विषय गहन असला तरी काव्यात्मक मधु शैली आवडली! नवीन लेखांची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
डाॅ अनिल आपला अंतर्नाद अंक खुप च सुंदर मी टु हे सदर खुप च छान संत पंत आणि तंत खुप छान छान बोबडी गवळण तर झक्कास च.असंच सुंदर ललित लेखन नक्की च वाचायला मिळेल
संत पंत तंत हा अवघड विषय सहज करून सांगितला आहे
अंक खूप काही देणारा