आजपर्यंत अनेक साथी आल्या नि गेल्या.
काही मुक्कामी राहून हळूहळू लोकांच्या अंगवळणी पडल्या. कुठलीही नवी साथ अफवांच्या लाटेला सोबत घेऊन येते… वाऱ्याच्या वेगाने पसरणारी – मृत्यूच्या भीतीची साथ…
प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा एपमीडिया!
अफवांना नवनवीन पाय देणारे मोबाईलचे जाळे आणि बोटांचे चाळे! सेकंदाला हजार कि.मी. वेगाच्या अफवा!
सोफ्यावरून हलू न देणारे चॅनल्स…
काल्पनिक कथा,पटकथा, साजेसं संगीत…
‘मृत्यूचे थैमान’…’कोरोनाचा कहर’
टीव्हीच्या पडद्यावर शब्दांचं तांडव…
सब से पहले… सब से तेज
Breaking News…
अतिरंजित बातम्या… जवळजवळ अफवाच!
मृत्यूच्या भीतीसाठी पोषक माहोल…
संसर्गाआधीच सकल समाजमन मरणाच्या कल्पनेनंच गंभीर आजारी!
कानांत घुमणाऱ्या बातम्या, वाढलेलं टेन्शन आणि निद्रानाश…
भीती…एक नैसर्गिक भावना…
एक दिवसाच्या बाळाला पण असते पडण्याची भीती… हळूहळू ती कमी होते.
बालकाचं साॅफ्टवेअर इन्स्टिंक्टवर चालणारं …त्यात भीती, मरण नावाच्या फाइल्सच नसतात. इतरांच्या डोक्यांतल्या व्हायरसमुळे हे साॅफ्टवेअर लवकरच करप्ट होत जातं. चेतन मनाकडून सुप्त मनाकडे जंक फायलींचं काॅपी पेस्ट!
दीड लाखांपेक्षा जास्त नकारात्मक वाक्ये ऐकत तरुण होणारं बालपण…
झुरळ,पाल,उंदीर,अंधार यांच्या रांगेतच डॉक्टर,पोलीस,गुरखा आणि देव…सगळ्यांचा परिचय दहशतीच्या माध्यमातून!
‘ऐकलं नाहीस तर देवबाप्पा तुला शिक्षा करेल!’
‘बरं झालं बाप्पाने शिक्षा दिली!’
दंगा-मस्ती करताना खरचटण्यापासून हाड मोडेपर्यंतच्या शिक्षा देवानेच केलेल्या!
खरंतर देव ही संकल्पना किती सकारात्मक!
‘अणुरेणिया थोकडा,
तुका आकाशाएवढा’
सूक्ष्मातिसूक्ष्म जीवापासून ते अवकाश व्यापणाऱ्या चैतन्यापर्यंतचं अस्तित्व.
ऊन-पाऊस,थंडी- वारा, दिवस-रात्र यांची गणितं सांभाळणं!
पंचमहाभूतांना सोबत घेऊन ज्ञात /अज्ञात ग्रहमालिकेला दावणीला बांधून एकाच परिघात फिरवत ठेवणं.
या घटना दैवी म्हणा किंवा भौतिक! अगणित जीवांच्या कल्याणासाठीच घडतात.
जन्म आणि मृत्यू या दोन तारखांमधील संख्यात्मक श्वास आणि गुणात्मक आयुष्य नियतीनेच ठरवलेलं…
‘शरीर मर्त्य आहे, आत्मा अमर आहे.’
भगवी,पांढरी,हिरवी वस्त्रं पांघरलेल्या गुरूंच्या सत्संगातून कानावर पडलेल्या ऋचा!
तरीही निकटच्या परिघातील प्रत्येक मृत्यू त्याला स्वत:च्या मृत्यूजवळ घेऊन जातो.
भीतीचं मळभ वाढत राहतं. सोबतीला वयानुसार वाढलेलं भीतीचं गाठोडं. झाकलेले साक्षर डोळे आणि वारा नेईल त्या दिशेला धावणारं आंधळं मन!
रोज थोडं थोडं मरत… जगणं विसरलेला प्रवास…
मग सुरू होतो आपल्या भीतीच्या भांडवलावर जागतिक धंदा! वयाच्या तिशीतच कुबेर झालेले मीडियाचे मालक. हातात जाहिरातींचे फलक घेऊन प्रत्येक चॅनलच्या कट्टयावर गंडवायला उभे…
साथीत मेलेल्या प्रत्येक देहाचा वाहिन्यांनी केलेला जाहिराती लिलाव!
मरणाची भीती आणि TRP ची स्थिती
दोन्ही वाढल्या की सेकंदाची किंमत लाखो रुपये…
बातम्या ३० सेकंदांच्या आणि जाहिराती तीन मिनिटांच्या!
गंडेदोरे ताइतापासून ग्रहांकित खड्यांपर्यंत,
जडीबुटी काढ्यापासून महागड्या टाॅनिकपर्यंत…
काॅर्पोरेट हॉस्पिटलपासून ते पंचतारांकित देवालयापर्यंत…
दंतमंजनापासून ते हृदयभंजनाच्या तेलापर्यंत!
राखेने हात धुऊन जगलेल्या पिढीलाही सॅनिटायझरचे थेंब विकणाऱ्या रंभा-उर्वशी आणि १० रुपयांच्या साबणाने सुंदर झालेल्या तारका!
जीवनावश्यक आणि जीवरक्षक वस्तूंचा महासेल…
मृत्यू …जगातील एकमेव अटळ वास्तव!
त्याचं स्टेशन टाळण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी…
यमाच्या यादीत नाव असेल तर…
ठरलेल्या वेळी… ठरलेल्या जागी… येणार म्हणजे येणारच!
कंसमामाला भाच्याकडून आणि परिक्षित राजाला सापाकडून कडेकोट बंदोबस्तातही यमाने गाठलंच!
कोरोनापासून पळणाऱ्या कित्येकांना मोकळ्या हायवेवर तर काहींना रेल्वेच्या रुळावर त्याने गाठलंच!
‘देवीचा महिमा,’ ‘अहं ब्रम्हास्मि,’ ‘अल्ला हो अकबर, ‘ ‘जीझस द सेवियर’च्या पलीकडचा काळाचा महिमा!
वैद्यकीय चमत्काराला तर लाॅजिकच नाही…
नव्वदीचे रुग्ण जीवघेण्या आजारातून घरी जाताना अन् पंचविशीतील आत्मे किरकोळ आजारांनी देह सोडताना पाहिले.
शेवटच्या टप्प्यात गॅरंटी संपलेल्या कॅन्सर रुग्णांना अनेक वर्षं जगताना पाहिलंय.
बाटलीतल्या दारूने
सहा पदरी हायवे ने
हृदयाच्या झटक्याने
बंदुकीच्या खटक्याने
कोरोनापेक्षा दसपट लोकांना मरताना पाहिलंय!
कोरोना तसा कनवाळू… डार्विनचा चेला
Survival of the fittest च्या नियमाने वागणारा…
जेमतेम ५ टक्के बाधितांना घेऊन जाणारा!
कितीतरी वर्षांनी कोकिळेच्या कुहूने जाग आली. बाहेर सोसायटीतील बहावा आणि गुलमोहर
हळदकुंकू उधळत होते.
लाॅकडाऊन!
जबरदस्तीच्या विश्रांतीत अनेकांनी स्वतःला गवसलं…
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुलाचि वाद आपणांसी ।।
तुकोबा… माफ कर…लाज वाटते रे आम्हांला आमच्या अहंकाराची…
तुझ्या ओव्यांचा अर्थ एका विषाणूने समजावला!
धर्मापलीकडचं अध्यात्म,
देवळाबाहेरचे देव
माणुसकीची नागडी रूपं
आणि
क्षणभंगुर आयुष्याचा
डेमोच दाखवला कोरोनाने!
कोरोना… ऑक्सिजनसोबत आपल्या हवेचा भाग झालाय तो आता! त्याला गाळून घ्या, गिळून घ्या किंवा त्याच्याशी जुळवून घ्या!
भूतकाळ पुन्हा येणार नाही. भविष्यकाळ आपला असेल का माहीत नाही. दोन्ही पाय वर्तमानाच्या सात- बारावर घट्ट रोवून, पिकवलेल्या सुखाचा आस्वाद घ्या. आनंदाचा कोटा वापरत राहा! भविष्यात त्याच्यावर व्याज मिळणार नाही!
आज ना उद्या कोरोना जाईल; पण…
कोविड १९ ची अपडेटेड आवृत्ती पुन्हा येईल-
ऐहिक विश्वाला अध्यात्म शिकवायला!
हृदयाचे ठोके आणि श्वासांची ऊब जाणवते तो क्षण आपला!
त्या क्षणासाठी मानत असाल तर घरातील देवाला हात जोडा. नशिबात लिहिलेल्या प्रत्येक श्वासाचा प्राणायाम करा. अनुलोमासोबत जगण्याची लय आत घ्या. विलोमासोबत मृत्यूचं भय बाहेर जाऊ द्या आणि कृतज्ञतेने शांत झोपा.
उद्या सकाळी जिवंत उठलात तर निळ्याशार आकाशाला कवेत घेऊन भयमुक्त मनाने जोरात म्हणा,
‘वेलकम जिंदगी…गले लगा ले’
