
विज्ञान कथा मूलतः माणसांच्याच कथा असतात – सुबोध जावडेकर
मराठीमधील निवडक विज्ञान कथांचे सुबोध जावडेकर यांनी केलेलं संपादन नुकतंच साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकाचा परिचय वाचकांना करून देण्यासाठी महाराष्ट्र सेवा संघ संचालित साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथालयातर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीकांत बोजेवार हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निवडक मराठी विज्ञान कथांचे संपादक सुबोध जावडेकर यांनी या संग्रहासाठी आपण कथा कशा निवडल्या हे सांगताना, त्यांनी या संग्रहातील कथा तीन टप्प्यांवरच्या आहेत असं स्पष्ट केलं.
पहिल्या तीन कथा – दि. बा. मोकाशी, जयंत नारळीकर आणि सुधीर बेडेकर यांच्या कथा – ज्या मराठी विज्ञान कथेच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या आहेत. या कथांनी मराठीत विज्ञान-काल्पनिक या साहित्य प्रकाराची पायाभरणी केली. नंतरच्या ९ कथा या ‘बेबी बूमर्स’ पिढीतल्या विज्ञान लेखकांच्या आहेत; ज्यात निरंजन घाटे, बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, गं. कृ. जोशी, शुभदा गोगटे, माधुरी शानबाग, दीनानाथ मनोहर, अरुण मांडे यांच्या कथांचा समावेश आहे. त्यापुढच्या ९ कथा ‘ जेन एक्स ‘ लेखकांच्या म्हणता येतील. यात मेघश्री दळवी, डी. व्ही. कुलकर्णी, सुनील सुळे, स्मिता पोतनीस, नील आर्ते, पराग देऊसकर, प्रसन्न करंदीकर, सीमंतीनी कर्वे ( आदिती जोशी), आशिष महाबळ यांच्या कथा आहेत.
विविध कारणांमुळे या संग्रहात अरुण साधू, मिलिंद बोकील अशा नामवंतांच्या कथा समाविष्ट करता आल्या नाहीत. कालमर्यादेमुळे क्षितिज देसाईसारख्या ताज्या दमाच्या कथाकाराची कथाही घेता आली नाही; पण तरीही मराठी विज्ञान कथेच्या प्रवाहाचं दर्शन यात नक्की घडेल असंही जावडेकर म्हणाले.
विज्ञान कथा या मुळात माणसांच्याच कथा असतात. फक्त विज्ञानाच्या मदतीने नवीन तंत्रज्ञानाचे भविष्यातील मानवी जगण्यावर काय परिणाम होऊ शकतात याचं चित्र लेखक त्यात रेखाटतो. हे विज्ञान कथेचं मर्म त्यांनी आपल्या बोलण्यात अधोरेखित केलं. या संग्रहात १९५० ते २०१५ या कालमर्यादेतील कथांमधून कथा निवडल्या आहेत. त्यामुळे कथांचे वेगवेगळे फॉर्म्स या संग्रहात एकत्र करता आले; मात्र प्रत्येक कथा विज्ञानाच्या व्याख्येत बसणारीच आहे. दोन वेगवेगळ्या पिढ्यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञानकथा या संग्रहात असल्याने मराठी विज्ञानकथांचा प्रवास यातून वाचकांसमोर उभा राहील असेही सुबोध जावडेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि साहित्य अकादमीचे सभासद म्हणून बोलताना श्रीकांत बोजेवार यांनी अकादमीतर्फे एखादं पुस्तक प्रकाशित होतानाची वाटा वळणं यांवर मिश्कील टिप्पणी केली. तसेच या संग्रहाची जावडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना अतिशय परिपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे, ती वाचल्यावर विज्ञानकथेचे सगळे पैलू उलगडतात अशी प्रशंसा बोजेवार यांनी केली. या कार्यक्रमातील सर्वात रंजक भाग म्हणजे बोजेवार यांनी एक लहानशी विज्ञानकथा सांगितली, ज्यात भविष्यातील माणसांकडून भूतकाळात एक संदेश पाठवला जातो आणि पृथ्वी वाचते… या कथेला उपस्थितांनी दाद दिल्यानंतर बोजेवार यांनी सांगितलं, की ही कथा ए आय ने लिहिलेली आहे आणि नजीकच्या भविष्यातील विज्ञान कथा लेखकांसाठी ए आय हेच मोठं आव्हान असेल.
या कार्यक्रमात विज्ञान लेखक, रोबोटिक्सचे तज्ज्ञ उज्वल राणे यांनी विज्ञानकथेची बलस्थाने या विषयावर एक उत्तम सादरीकरण केलं. कार्यक्रमात दि. वि. कुलकर्णी यांच्या ‘अपहरण’ या कथेचं स्वाती कुलकर्णी यांनी केलेलं अभिवाचन उपस्थित रसिक वाचकांची दाद घेऊन गेलं. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विज्ञान कथालेखिका मेघश्री दळवी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथालयाचे अरुण भंडारे यांनी केलं तर संपूर्ण कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन विज्ञान कथा लेखिका स्मिता पोतनीस यांनी केलं.

डावीकडून : दि. वि. कुलकर्णी, श्रीकांत बोजेवार, सुबोध जावडेकर, मेघश्री दळवी, स्वाती कुलकर्णी, स्मिता पोतनीस.
