संपादकीय: अमेरिका २

कुंभकला

अमेरिका म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी, नवकल्पना आणि कल्याणकारी भांडवलशाही अशी आपल्या सर्वांचीच एक समजूत होती; मात्र विद्यमान अमेरिकन नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय राजकारणात वेळोवेळी मारलेल्या कोलांटउड्या आणि इराण-युद्ध यांमुळे या प्रतिमेला बरेच तडे गेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे काहीतरी भले व्हावे आणि राष्ट्राराष्ट्रांतील परस्पर संबंध नियंत्रित व्हावेत, या दृष्टीने अनेक आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण झाल्या. दुसऱ्या महायुद्धातील निर्विवाद विजेता म्हणून अमेरिकेने स्वतःहूनच या व्यवस्थांचे नेतृत्व स्वीकारले; त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना, नाटो, संयुक्त राष्ट्रे यांसारख्या अनेक संघटनांचे नेतृत्व अमेरिकेकडे आले. अर्थात या नेतृत्वाची किंमत मोजावी लागते –  तीही रोख डॉलर्समध्ये! जागतिक राजकारणाच्या याच रेट्यात सोव्हिएत रशियाचा ऱ्हास झाला आणि चीनचा उदय झाला. रशियाच्या विघटनानंतर आता जगावर केवळ अमेरिकेचेच वर्चस्व राहील, असे अमेरिकेला व इतर सर्वांनाही वाटत होते; परंतु चीनने अमेरिकन प्रभुत्वापुढे जबरदस्त आव्हान उभे केले. 

चीनच्या बाबतीत अमेरिकेची अवस्था ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी झाली आहे. चीनला पूर्णपणे शह देऊन जगातील क्रमांक एकची निर्विवाद महासत्ता होण्याचे अमेरिकेचे स्वप्न, स्वप्नच राहणार अशी चिन्हे सध्या सार्वत्रिकपणे दिसत आहेत. चीनविरुद्धच्या घोषित लढ्यात युरोप, आशिया व आफ्रिका खंडांतील तथाकथित मित्रदेश पुरेशी साथ देत नाहीत, अशी विद्यमान अमेरिकन नेतृत्वाला खरी-खोटी खंत आहे. त्यामुळे या साऱ्या जागतिक व्यवस्थेचा आपल्याला काही उपयोग होत नसून, उलट याच संघटनांच्या माध्यमातून उर्वरित जग अमेरिकेचा गैरफायदा घेत आहे, अशी काहीशी भूमिका विद्यमान अमेरिकन सरकारने घेतली आहे. याच भूमिकेतून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक संस्थांना दिली जाणारी आर्थिक मदत घटवली आहे.

या इराण-युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरही अनेक अनिष्ट परिणाम झाले आहेत. इंधन दरवाढ आणि तिच्यासोबत येणारी महागाई आपण काही प्रमाणात अनुभवली आहे. या युद्धाबद्दल आणि बदललेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत अमेरिकन जनमानसाला काय वाटते, हे जाणून घेण्याची माझी इच्छा होती. परंतु येथे दाखल झाल्या झाल्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर थेट बोलणे तसे अनुचितच ठरले असते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे होणाऱ्या अनौपचारिक चर्चा-गप्पांतून या विषयीचे काही संकेत मिळतात का, हे पाहायचे मी सध्या ठरवले आहे.

माझा मुलगा मिहीर अमेरिकेत कुंभकला (पॉटरी) शिकतो. या छंदासाठी त्याने येथील एका छंदवर्गात प्रवेश घेतला आहे. अवघे नव्वद वर्षे वयोमान असणाऱ्या श्रीमती अ‍ॅड्रियन हा वर्ग चालवतात. सध्या या वर्गाला उन्हाळी सुट्टी असली, तरी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा ही सर्व विद्यार्थी मंडळी शक्यतो शनिवारी भेटतात.  तेव्हा त्यांची एक अंगतपंगत रंगते. अ‍ॅड्रियनबाईंना वयोपरत्वे हालचालींवर आलेल्या मर्यादांमुळे हा कार्यक्रम बहुधा त्यांच्याच निवासस्थानी होतो. प्रत्येकजण एखादा खाद्यपदार्थ घेऊन येतो आणि त्यांच्या अभ्यासिकेच्या मध्यभागी मांडलेल्या एका गोलमेजावर हे सर्व पदार्थ एकत्र मांडले जातात. मग गप्पा मारत या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. गप्पांना विषयांचे कोणतेही बंधन नसते आणि आवडीप्रमाणे बिअर किंवा वाइनचाही आस्वाद घेतला जातो.

अमेरिकेतील आमच्या उपस्थितीची दखल घेऊन एका शनिवारी विशेष पाहुणे म्हणून आम्हांलाही या अंगतपंगतीला आमंत्रण मिळाले. उपस्थित शिष्यवर्गात कमालीची प्रादेशिक विविधता होती. इटली, ब्राझील, पोलंड आणि अर्थातच भारत या देशांतील लोक तिथे होते. अमेरिकेला ‘मेल्टिंग पॉट’ का म्हणतात, याचे साक्षात प्रात्यक्षिकच जणू आम्ही पाहत होतो. या शिष्यवर्गाचे व्यवसायही विविध होते.  शिक्षक, माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक, परिचारिका, वास्तुरचनाकार आणि अमेरिकेतील सरकारी नोकरदार. मी मराठीतून थोडेफार लिखाण करतो आणि सौ. शुभांगी पाककलेत निपुण आहे, ही माहिती त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचलेली होती. त्यामुळे आमच्याशी बोलताना, माझ्या पुस्तकाचा विषय असलेले ‘इच्छामरण’ आणि भारतीय पाककला यांचा उल्लेख अपरिहार्यपणे होत राहिला. अर्थात इच्छामरणावर खोलवर चर्चा करण्याचे ते स्थान नव्हते. बोलता बोलता मुद्दा अमेरिकेतील महागाईवर येऊन पोहोचला. गेल्या काही वर्षांत आणि विशेषतः गेल्या काही महिन्यांत, ही महागाई सतत वाढते आहे आणि जाचते आहे, यावर उपस्थितांचे साधारण एकमत होते. सुपरमार्केटमध्ये गेल्यावर भाजी, दूध, अंडी, फळफळावळ यांसारख्या नित्याच्या साध्या गोष्टी अगदी गरजेपुरत्या विकत घेतल्या, तरी किमान पन्नास डॉलरची नोट मोडावी लागते, असा चर्चेचा एकंदर सूर होता.चर्चा हळूहळू अमेरिकेत चालणाऱ्या कुंभकलेच्या छंदवर्गाकडे अपरिहार्यपणे वळली. 

कुंभकला ही एक कला म्हणून जोपासायची आणि ती इतरांनाही शिकवायची, हे या वर्गाचे  एक वेगळेपण जाणवले. श्रीमती अ‍ॅड्रियन यांचा यासाठी स्वतंत्र स्टुडिओ आहे.  सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी ही जागा खरेदी केली होती. कुंभकलेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी – अगदी भट्टीसुद्धा – याच स्टुडिओत आहेत. या निमित्ताने भारतीय आणि पाश्चात्त्य कुंभकला यांची थोडी तुलना करू या.

भारतात ही कला धार्मिक परंपरा आणि जात यांच्याशी घट्ट जोडली गेली आहे. आपल्याकडे कुंभार समाज या कलेतील तज्ज्ञ मानला जातो आणि आजही गावगाड्यात त्याचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारतात कोणत्याही मंगलप्रसंगी कलशपूजन केले जाते. कलश किंवा कुंभ हे आपल्याकडे  सर्जनाचे  प्रतीक मानले जाते. आपल्याला संक्रांतीला सुगड लागते, बैलपोळ्याला मातीचे बैल लागतात, तर शिराळशेठ आजही आपल्यावर औटघटकेचे का होई ना! राज्य करतो. आपला सर्वांत मोठा सण दिवाळी; ज्याच्या नावातच ‘दीप’ आहे  – तो मातीच्या पणत्यांशिवाय होऊच शकत नाही. मातीचे घडे आणि कान्ह्याने त्यांवर मारलेले खडे यांनी आपले सांस्कृतिक जीवन किती संपन्न केले आहे! स्वयंपाकघरात गॅसचा वापर आता मोठ्या प्रमाणावर वाढला असला, तरी ग्रामीण जीवनात चूल आणि वैल क्वचित प्रसंगी अजूनही आपले अस्तित्व दाखवतात. आपला उन्हाळा माठातील थंडगार पाणी पिऊनच सुसह्य होतो आणि आपली इहलोकातून रवानगी होतानाही आपल्याला मडकेच लागते! एकंदरीत आपले दैनंदिन जीवन आणि माती-कुंभकला हे एकमेकांशी अगदी अतूटपणे जोडले गेले आहेत. ‘माती असशी, मातीस मिळशी’  हेच जणू भारतीय कुंभकलेचे तत्त्वज्ञान. ‘माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूगी तोहे,’  किंवा ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’  हेच आपले तत्त्वज्ञान आहे. ही झाली कुंभकलेमागची विचारसरणी. ही कला प्रत्यक्षात आणताना वापरले जाणारे तंत्रज्ञानही काहीसे वेगळे आहे. फिरत्या चाकाचा वापर, घरगुती परंपरागत व्यवसायाचे स्वरूप, तुलनेने कमी तापमानात काम करणाऱ्या, एका बाजूने मोकळ्या असणाऱ्या भट्ट्या, आणि मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा वापर  ही भारतीय कुंभकलेची काही ठळक तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत.

पाश्चात्त्य कुंभकला भारतीय कुंभकलेपेक्षा अनेक बाबतींत वेगळी आहे. नित्य वापरासाठी बनवली जाणारी पॉटरी आणि घरातील सजावटीसाठी वापरली जाणारी पॉटरी, अशा दोन स्वरूपांत पाश्चात्त्य कुंभकला दिसते. हस्तकला आणि ललितकला अशा दोन्ही अर्थांनी पॉटरीकडे पाहिले जाते. पाश्चात्त्य संस्कृतीतील पुनरुत्थान (रेनेसान्स) आणि औद्योगिक क्रांती या दोन महत्त्वाच्या घटनांचा पाश्चात्त्य कुंभकलेवर मोठा परिणाम झाला. औद्योगीकरणाचा अपरिहार्य परिणाम म्हणून नेहमी लागणाऱ्या काचसामानाचे आणि मातीसामानाचे उत्पादन कारखान्यांतून मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. पाश्चात्त्य देशांत साध्या मातीपेक्षा पोर्सेलीन आणि स्टोनवेअर क्ले या माध्यमांचा वापर अधिक केला जातो. वैयक्तिक कौशल्यातून यंत्रांद्वारे होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील निर्मितीपर्यंत, असा हा प्रवास झाला. कालांतराने याच औद्योगीकरणाला प्रतिक्रिया म्हणून, स्टुडिओमध्ये वैयक्तिक कलाकौशल्य वापरणारी मातीकला पाश्चात्त्य देशांत पुन्हा एकदा रुजू लागली.

कलेसाठी वापरले जाणारे माध्यम, भाजण्यासाठी वापरले जाणारे तापमान व तंत्रज्ञान आणि या भांड्यांना झिलई आणण्यासाठी वापरली जाणारी वेगवेगळी रसायने  ही या कलेतील विविधता वृद्धिंगत करणारी काही परिमाणे आहेत. यांचा अभ्यास करणे हीच जणू कुंभकलेची आराधना म्हणायला हवी! कुंभकलेत वापरली जाणारी प्रतीके हाही या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग होऊ शकतो. विसाव्या शतकातील काही महत्त्वाच्या पाश्चात्त्य कलावंतांनी जपान आणि आशियातील कुंभकलेपासून प्रेरणा घेऊन, तिच्यातील साधेपणा जपणारी कुंभकला पश्चिमेतही घडवण्यास सुरुवात केली. कुंभकलेचे हे जागतिकीकरण नक्कीच स्वागतार्ह आहे.

https://www.instagram.com/kumbha_kala

लेखातील कुंभकला छायाचित्रे मिहीर जोशी यांच्या कलाकृतींची आहेत.

Author

Leave a Reply