अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या कादंबरीचे अंतिम प्रकरण.
– संपादक
साक्षात्कार
पृथ्वीवरच्या घड्याळानुसार रात्रीचे दहा वाजून गेले आहेत पण माझ्या कुटीरातला दिवा अजून जळतो आहे. उत्खननाची जागा सोडून अगदी निघायच्या वेळेस सापडलेल्या त्या पेटीमध्ये काय आहे हे पाहिल्याशिवाय मी झोपी जाणं शक्यच नाही. माझी उत्सुकता इतकी शिगेला पोचली आहे, की मला झोपच येणार नाही. अंथरुणावर जाऊन पडले तरी मला सापडलेल्या त्या प्राचीन वस्तूचाच मी विचार करत राहीन.
त्या पेटीपासून काही रासायनिक, जैविक किंवा यांत्रिक धोका नाही ना हे मी तपासून पाहिलं आहे. मी माझ्या परीक्षणांची नोंद यंत्रात घातली आहे आणि त्याने मला सुरक्षिततेची पावती देण्याची वाट पाहते आहे; म्हणजे मला ती पेटी उघडता येईल. शेवटी एकदाचा तो संकेत मिळतो आणि मी पेटीचं कुलूप उघडण्याच्या कामाला लागते. मी ते अर्थातच लेसरच्या सुरीने कापून काढू शकते पण त्या पेटीच्या आत जे काही आहे त्याला मला धक्का लागू द्यायचा नाही; शिवाय त्या कुलुपाच्या रचनेबद्दल मला कुतूहल आहे. कारण काही झालं तरी मी शेवटी एक कॉम्प्युटेशनिस्ट आहे. पाच मिनिटांत मला त्या कुलुपाची रचना समजते. त्याचे वेगवेगळे भाग हालते करायला मला थोडा वेळ लागतो कारण ते कुलूप तीन हजार वर्षं जमिनीत पुरलेल्या अवस्थेत होतं. ते कार्बनच्या धाग्यांपासून बनवलेलं आहे आणि चांगलं मजबूत आहे. शेवटी एकदाचं कुलूप उघडतं आणि मी श्वास रोखून पेटीचं झाकण उघडते.
बाहेरच्या पेटीच्या आत आणखी एक पेटी आहे आणि तिच्या झाकणावर काही अक्षरं कोरलेली आहेत. ती लिपी फारच जुनी आहे आणि त्यामुळे मला त्या अक्षरांचा अर्थ लागत नाही. प्राचीन भाषांचा मी अभ्यास केला आहे पण ही भाषा उन्नयनपूर्व माणसांच्या भाषेचं जुनं रूप आहे. पण माझ्याकडे त्यावर एक उपाय आहे. प्राचीन भाषेसाठी आणि लिपीसाठी मी एक तक्ता तयार केला आहे. आम्ही जेव्हा स्वर्गावरून निघालो तेव्हा मी अनेक प्राचीन भाषांच्या अंकलिपी सोबत घेतल्या होत्या आणि पृथ्वीच्या दिशेने प्रवास करताना जे तीन महिने आम्ही जागे होतो तेव्हा मी त्या अंकलिपींच्या आधारे त्या भाषा वाचता येतील असे तक्ते तयार केले. मग मी ते तक्ते माझ्या कॉमवर अपलोड केले. पृथ्वीवर मला प्राचीन अवशेष सापडले तर उपयोगी पडतील म्हणून! पृथ्वीकडे येण्याच्या प्रवासात मला असं वाटत होतं, की आम्ही पृथ्वीवर उतरल्या उतरल्या मला प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडतील आणि त्यात मिळालेल्या भरपूर लेखी पुराव्यांचं मी भाषांतर करेन आणि मग केवळ त्या पुराव्यांचं विश्लेषण करून त्यांच्यावर अहवाल लिहिण्याचं काम माझ्यासाठी उरेल.
आम्ही या ग्रहावर प्रत्यक्ष उतरल्यानंतरच मला पृथ्वीच्या भव्यतेची कल्पना आली आणि तिथे मानव जातीचा नाश होऊन केवढा प्रचंड काळ उलटून गेला होता हे लक्षात आलं… आणि आता कुठे, या ग्रहावर आम्ही घर केल्याला दहा महिने उलटून गेल्यावर, पहिल्यांदा मला एक लेखी पुरावा सापडला आहे आणि तोसुद्धा दोन आठवडे सतत खणल्यावर. तरीपण आता माझ्या तक्त्यांचा उपयोग होईल ही चांगली गोष्ट आहे. मी माझा कॉम चालू करते आणि ती अस्पष्ट प्राचीन अक्षरं स्कॅन करते आणि त्यानंतर मला जे दिसतं त्याने मला आश्चर्याचा धक्काच बसतो.
“ही एक काळ कुपी आहे,” ती अक्षरं सांगतात. मला एक खजिनाच सापडला आहे. मला काळकुपी सापडली आहे! मी अंथरुणावरून उडीच मारते. अधीर हातांनी मी आतली पेटी उघडते आणि त्यातल्या वस्तूंकडे पाहतच राहते. आत एक ग्राफीनची फरशी आहे. त्या काळात माहीत असलेली ती सर्वात मजबूत वस्तू होती. पेटीच्या झाकणावर होती त्याच प्रकारची आणखी अक्षरं या फरशीवर आहेत. पण हा मजकूर मोठा आहे आणि त्यात दोन परिच्छेद आहेत. त्या फरशीखाली ठेवलेल्या वस्तू म्हणजे जनुकांच्या गोळ्या (capsules) आहेत हे मी ओळखते. द्रवपदार्थ भरलेल्या नळ्यांमध्ये त्या नीटपणे बसवलेल्या आहेत. तिसाव्या शतकात त्यांचा माहिती साठवण्यासाठी उपयोग केला जायचा.
माझा कॉम त्या फरशीवर ठेवून मी त्याच्या पडद्यावर सावकाश उमटणारा मजकूर वाचू लागते.
“प्रिय मित्रांनो, माझं नाव ज्युलियन पै आहे आणि मी एक इतिहासकार आहे. कधीतरी भविष्यकाळात कुणाला तरी ही सापडेल आणि आमचा खरा इतिहास त्या व्यक्तीला कळेल या आशेने मी ही काळकुपी तयार केली आहे. या जनुकांच्या गोळ्यांमध्ये पृथ्वीवरच्या अनेक लोकांनी पाठवलेली सामग्री आहे. काही सामग्री आंतरजालावरूनदेखील घेतलेली आहे. सामान्य आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या या खऱ्याखुऱ्या कहाण्या आहेत. सध्या दिवस वाईट आहेत आणि आणखी किती दिवस आम्ही सामान्य आयुष्य जगू शकू हे काही सांगता येत नाही.
ही काळकुपी ज्या व्यक्तीला सापडेल त्यांना माझी एकच विनंती आहे, की यात साठवलेला मजकूर त्यांनी वाचावा. मी काही माझ्या काळाचा ऐतिहासिक दाखला देत नाहीये, किंवा आमच्या शास्त्रीय यशोगाथेचा तपशीलही देत नाहीये; कारण त्या सगळ्याची सार्वजनिक नोंद होईलच. पण ज्या सुखदुःखांनी सामान्य माणसांची आयुष्यं घडली ती पुढच्या पिढ्यांना माहिती व्हावीत अशी माझी इच्छा आहे; म्हणून, प्रिय वाचक, कूट भाषेत जतन करून ठेवलेल्या या कहाण्यांचा आदर करा आणि या एकविसाव्या शतकात राहणाऱ्या खऱ्या लोकांना समजून घ्या.”
मी मंत्रमुग्ध होऊन गेले आहे. ही व्यक्ती चार हजार वर्षांच्या भूतकाळातून माझ्याशी बोलते आहे! जनुकांच्या गोळ्या आणखी गोष्टी सांगतील, आणखी प्राचीन मानवी आयुष्यं आपली रहस्यं उलगडतील… त्यांचे आनंद, त्यांची दुःखं, त्यांना वाटणारी भीती… मला ते सगळं कधी वाचेन असं झालं आहे… आणि तरीही, थोडी भीतीही वाटते आहे. एकच क्षण मी थबकते पण पुढच्याच क्षणी थरथरत्या हातांनी मी गोळ्यांची एक नळी उचलते. जनुकांच्या गोळ्यांमध्ये साठवलेली माहिती वाचणारं यंत्र माझ्याजवळ आहे. मी ते कायम तयारीत ठेवलं होतं आणि उत्खननाच्या सगळ्या ठिकाणी माझ्याबरोबर नेलं होतं. प्राचीन जगातल्या प्रत्यक्ष नोंदवून ठेवलेल्या माहितीचा अर्थ लावायची संधी शेवटी मला मिळते आहे.
मी काळजीपूर्वक रसायनातून पाहिली गोळी बाहेर काढते आणि ती यंत्रावर ठेवते. त्या गोळीची काय अवस्था आहे याचं विश्लेषण यंत्र करू लागतं. मी शिकत असताना जे काही वाचलं आहे ते जर खरं असेल तर या सपाट प्रदेशातल्या कोरड्या हवेत या गोळ्या चांगल्या स्थितीत राहिल्या असणार. कमीत कमी पाच हजार वर्षं त्या चांगल्या स्थितीत राहतील अशी अपेक्षा असते. आता तो अंदाज तपासून पाहायची वेळ आली आहे. ती गोळी बऱ्यापैकी स्थितीत आहे असं यंत्र दर्शवतं. त्यातली काही माहिती नष्ट व्हायला लागली आहे पण तरीही तिच्यात तीन हजार गिगा बाईट माहिती आहे. माहिती साठवण्यासाठी प्रकाशकणांचा उपयोग सुरू करण्यापूर्वी माणसं मेगा, टेट्रा आणि गिगा बाईट असे मापदंड माहितीसाठी वापरत.
यंत्र सावकाशपणे माहिती उलगडू लागतं आणि पडद्यावर तिचं भाषांतर उमटू लागतं. मी वाढत्या उत्सुकतेने वाचू लागते. कोणत्यातरी माहितीच्या चॅनेलवरच्या बातम्यांची मालिका असावी असं वाटतं आहे. या शतकात राहणाऱ्या प्राचीन मानवांनी नुकतीच एक जागतिक संपर्क प्रणाली विकसित केली होती. त्याला ते इंटरनेट म्हणत. उत्तर प्रदेश नावाच्या एका ठिकाणी झालेल्या राजकीय स्थित्यंतराची बातमी गोळीतून बाहेर पडते. प्राचीन माणसं ठरावीक काळानंतर काही माणसांची निवड करत. निवड केलेली माणसं त्या भागातल्या इतर माणसांवर प्रशासन करत किंवा कधीकधी अधिकार गाजवत… आणखी एक बातमी एका महामार्गावरच्या अपघाताची आहे. त्यात अकरा गाड्या एकमेकींवर आपटल्या… त्या काळात स्वयंचलित झिप्पर नव्हती आणि माणसं त्यांना ‘चालवायची.’ त्या प्राचीन काळच्या ‘गाड्यांचा’ अनेकदा ‘अपघात’ व्हायचा… एका नवीन करमणुकीच्या कार्यक्रमाची बातमी आहे… त्या काळी माणसांना त्यांचं मन आभासी विश्वात मग्न करून करमणूक करून घेता येत नसे… ते फक्त पडद्यावर हलणारी चित्रं बघत आणि त्यांच्यासोबत होणारा आवाज ऐकत. यमुनेतला संपत चाललेला शुद्ध पाण्याचा साठा कोणीतरी लुटून नेला अशी एक बातमी आहे… मी आत्ता राहते आहे त्या भागाच्या उत्तरेला असलेल्या नदीच्या संदर्भात ती बातमी असावी. पेशींच्या स्तरावर रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या एका प्रथिनाचा शोध लागल्याची एक बातमी आहे… जीवशास्त्र तेव्हा प्राथमिक अवस्थेत होतं, जीवअभियांत्रिकीची क्रांति होण्यापूर्वी. शेअर बाजारात किमती वर गेल्याची आणि दुसऱ्याच दिवशी घसरल्याची आणि त्यामुळे अनेक लोकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाल्याची एक बातमी आहे… शुद्ध चंगळवादाचा काळ होता तो. पैसे देऊन लोक मजा करण्याच्या वस्तू विकत घ्यायचे. बाजारपेठ अशा वस्तूंची किंमत ठरवत असे. माणसाला त्या काळात निर्मितीचा आनंद माहिती नव्हता. अगदी प्राथमिक गरजासुद्धा पैशाची देवाण घेवाण करून भागवायला लागत. ज्यांच्याकडे पैसे फार कमी होते त्यांचं जगणं कठीण होतं. एका रात्रीत मला वाचणं शक्य होईल त्यापेक्षा अधिक बातम्या आहेत. माणसांची वस्ती असलेल्या या जगाच्या विविध भागांतल्या हजारो बातम्या. हा प्रचंड भूगोल, जिथे सध्या केवळ सोळा मानव तीन दूरस्थ प्रदेशांत राहत आहेत, त्या काळात नऊ अब्ज लोकांनी गजबजलेला असेल! कोणत्याही क्षणी लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतील. मला त्यांच्याबद्दल सगळं काही, ते जिवंत असताना, त्यांच्याच शब्दांत लिहिलेलं, वाचायची उत्सुकता आहे.
पण मी दुसऱ्या गोळीकडे वळते. त्यात कोणती माहिती साठवलेली आहे याची मला उत्कंठा आहे. या गोळीत वेगवेगळ्या लांबीचे पन्नास भाग आहेत. मी पहिला भाग उघडते आणि त्यात छोट्या काव्यपंक्ती आढळतात. प्रत्येक काव्यानंतर त्या पंक्तींवर काही भाष्य आहे. काही पंक्ती वाचल्यावर मला त्या काहीशा परिचित वाटतात. प्राचीन मानवांच्या श्रद्धांबद्दल वाचल्याचं मला आठवतं. ते त्यांना ‘धर्म’ म्हणायचे आणि वेगवेगळ्या समूहांतले लोक वेगवेगळे ‘धर्म’ मानायचे. त्या काव्याच्या आलेखाच्या सुरुवातीकडे जाऊन मी त्या संग्रहाचं शीर्षक वाचते. त्याचं शीर्षक आहे ‘बायबल.’ मी शंभर-दोनशे शब्द वाचते आणि पुढच्या भागाकडे वळते. या भागाचं शीर्षक उच्चारायला अवघड आहे. त्याच्या अक्षरांवरून ते ‘भगवद्गीता’ असावं असं वाटतं आहे. त्यातही काव्य आणि भाष्य आहे. त्यातल्या काही पंक्ती वाचून मी पुढच्या भागाकडे वळते. हे पण काव्याच्या आणि भाष्याच्या स्वरूपात आहे आणि त्याचं शीर्षक आहे ‘गुरु ग्रंथ साहेब.’ या सगळ्या ग्रंथांत मुख्यतः त्या काळच्या नीतिमत्तेबद्दल विवेचन आहे; पण किती लोक त्याप्रमाणे वागायचे हा प्रश्नच आहे कारण ज्यामुळे या ग्रहावरून मानवजात नष्ट झाली तो विनाश टाळायचा हे ग्रंथ प्रयत्न करत होते.
आई एकदा म्हणाली होती, की पृथ्वीवर माणसं धर्मावरून एकमेकांचा तिरस्कार करायचे. त्यातून जी परिस्थिती टाळायचा हे ग्रंथ प्रयत्न करत होते तीच परिस्थिती उद्भवली. धर्मग्रंथांत असलेल्या इतक्या सर्वसाधारण निर्देशांचा मानवी मनावर इतका घट्ट पगडा का बसावा हे काही मला कळत नाही; कारण आमचादेखील त्याच मानवी मनाचा वारसा आहे; फक्त पन्नासाव्या शतकात झालेल्या उन्नयनामुळे ते मन लखलखीत झालं आहे.
मी यंत्रातून ती गोळी बाहेर काढते आणि हाताला येईल ती दुसरी गोळी त्यात घालते. ‘ही मात्र शेवटची,’मी स्वतःला बजावते. मी केव्हाच झोपायला हवं होतं. माझ्या विमान प्रवासाच्या आदल्या रात्री मी मध्यरात्र उलटून गेल्यावरही जागी आहे हे जर माझ्या पथकाला कळलं तर मला शिस्त कशी पाळावी यावर एक भाषण ऐकावं लागेल; पण मला फक्त हजार एक किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. हा काही एका खंडातून दुसऱ्या भूखंडाकडे होणारा प्रवास नाही… जमेल मला!
प्राचीन भाषा उकलणारं यंत्र आता नुकत्याच आत घातलेल्या गोळीतले संदेश उकलू लागलं आहे आणि अचानक संगीताच्या मात्रा बघून मला आनंद होतो. हे माझ्या माहितीचं आहे. हे समजायला मला भाषांतराची आवश्यकता नाही. मी प्राचीन संगीत शिकले आहे आणि ते लिहायची पद्धत अजूनही फारशी बदललेली नाही. हे माझ्या आवडीचं संगीत आहे. मला एकदम एक कल्पना सुचते. मी काळजीपूर्वक ते लेखी स्वरूपातलं संगीत माझ्या कॉमवर घालते. त्यात एक संगीताचं सॉफ्टवेअर आहे. अकादमीत असताना मी ते संगीत लिहायला वापरत असे. लेखी संगीताचं ते ध्वनीत रूपांतर करतं. हे चार हजार वर्षं जुनं संगीत रूपांतरित करण्यासाठी मी तेच सॉफ्टवेअर वापरते आणि माझ्या कॉमवर ते वाजू देते. माझ्या छोट्याशा कुटीत संगीताचे स्वर पसरतात… फार फार वर्षांपूर्वी कुणीतरी निर्मिलेल्या संगीताचे… एका वेगळ्या जगात निर्मिलेल्या संगीताचे स्वर… अत्यंत वेगळ्या परिस्थितीत निर्मिलेल्या संगीताचे स्वर.
गोळीतल्या दुसऱ्या भागातल्या माहितीकडे मी वळते. इथे काही फोटो आहेत… एका बाळाचे फोटो… एका लहान मुलीचे… पण एक मिनिट! मला आईने दिलेला माझा फोटो या प्राचीन नोंदीत कसा? उकल करणारं यंत्र बहुतेक माझ्या मुख्य संगणकातून माहिती उचलत आहे… पण ते कसं शक्य आहे? माझा मुख्य संगणक तर विमानात आहे आणि तो मी बंद करून ठेवला आहे. यंत्र माझ्या कॉममधून माहिती उचलतं आहे का? नाही… एक मिनिट… हा काही माझा फोटो नाही… क्षणभर… हा वेगळा आहे… पण मग… तो का… तीच पोज… तेच हास्य… तोच चेहरा!! मला नक्कीच झोप येते आहे. मी अंथरूणावरून उठते, खिडकीखालच्या स्टँडपर्यंत जाते आणि अवकाशाच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आईने दिलेली पुठ्ठ्याची फोटोफ्रेम उचलते. मी त्या चिरपरिचित फोटोकडे पाहते… तीन वर्षांच्या मला आईने कडेवर घेतलं आहे. आम्ही दोघी कॅमेऱ्याकडे बघतो आहोत… दोघींचेही चेहरे हसरे आहेत. यंत्राच्या स्क्रीनवरून माझ्याकडे पाहणाऱ्या फोटोकडे मी बघते… त्यातही तेच दोन चेहरे माझ्याकडे पाहत आहेत! हे काही मला समजत नाहीये.
नाही, थोडेफार फरक आहेत. उकल करणाऱ्या यंत्राच्या पडद्यावर असलेल्या फोटोत त्या दोघींच्या त्वचेचा रंग वेगळा आहे आणि त्यांचे कपडे विचित्र आहेत. पण ते चेहरे सारखेच आहेत… डोळे तेच आहेत. थांबा… आणखीही फोटो आहेत. सगळे त्या छोट्या मुलीचे… काही त्याच कपड्यांत, दुसरे तसल्याच विचित्र रंगांच्या नक्षी असलेल्या कपड्यांत… पण… पण… तो चेहरा माझा असू शकतो… मी छोटी असतानाचा! ते साम्य अद्भुत आहे. माझं हृदय धडधडत आहे. मला घाम फुटला आहे आणि माझे हातपाय थरथरत आहेत. मी जे पाहते आहे त्याचा मला अर्थ लावता येत नाही. मी पुन्हा पुन्हा यंत्राचं सेटिंग आणि तारा तपासते… नाही… ते यंत्र माझ्या कोणत्याही इतर साधनांमधून माहिती उचलत नाहीये. इतर कोणत्याही माहितीच्या स्रोताला ते जोडलेलं नाही. ते फक्त त्यात घातलेल्या जनुकाच्या गोळीतील (DNA capsule) माहिती उलगडून दाखवत आहे. सगळ्या परिमाणांच्या आधारे असं वाटतं आहे, की पृथ्वीवरच्या एकविसाव्या शतकात, म्हणजे उन्नयनापूर्वी दोन हजार वर्षं, त्या गोळीत माहिती भरली होती… आजच्या दिवसापूर्वी तीन हजार वर्षं! आणिशिवाय, बिट्टू? मी एखाद्या सावलीसारखी घरात फिरते. मी एक अशी व्यक्ती आहे जिचं अस्तित्वच नाही आणि तरीही, माझं मन दुःखी आहे. मला तुझी फार आठवण येते बिट्टू…”
तरीही, त्यात असलेल्या फोटोंत मला माझा चेहरा दिसतो आहे आणि आईचा. हे सगळं माझ्या कल्पनेत आहे का? त्या फोटोंसोबत एक लेखही आहे. मी वाचू लागते…

“बिट्टू… तुला जाऊन जवळजवळ वर्ष झालं. आयुष्य चालूच राहतं… अविरत… माझा फार मोठा अंश मृत झाला आहे. उरलेल्या जिवाला तुझ्या नसण्याचं दुःख जाणवतं. मी कशी जगू तुझ्याशिवाय, बिट्टू? मी एखाद्या सावलीसारखी घरात फिरते. मी एक अशी व्यक्ती आहे जिचं अस्तित्वच नाही आणि तरीही, माझं मन दुःखी आहे. मला तुझी फार आठवण येते बिट्टू…”
पुढे वाचायची मला भीती वाटते… माझ्या मनात उमटणाऱ्या विचारांत मला रेंगाळायचं नाही. मी चट्कन पुढच्या लेखाकडे वळते.
“माझं मन एखाद्या धुण्याच्या पिळ्यासारखं पिळवटलं जात आहे. तू गेल्याचं दुःख एखाद्या जड दगडासारखं माझ्या हृदयात आहे. तू नसल्याने घर इतकं शांत आहे, बिट्टू… तू गेल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं, की भिंतीवरच्या घड्याळाचा सेकंद काटा फिरताना आवाज होतो. आधी कधीच ते माझ्या लक्षात आलं नव्हतं कारण तुझ्या आनंदी बडबडण्याने घर सारखं भरून गेलेलं असायचं. मी दिवसभर बसून राहते… मूकपणे भिंती बघत! आता त्या माझ्या सोबतिणी आहेत कारण त्यांनी तुला पाहिलं आहे. कुठे आहेस तू बाळा… तुझ्याविना आयुष्य म्हणजे नरक आहे…”
ती आई लिहिते आहे… त्या छोट्या मुलीची आई… माझी आई?
“माझं काय चुकलं? माझी लेक म्हणजे माझं सर्वस्व होती. मी तिची काळजी घेण्यात काही कसर ठेवली नव्हती. मग हे क्रूर भाग्य का माझ्या वाट्याला आलं? मी नाही जगू शकत ही अपराधीपणाची भावना सहन करत… हे दुःख सहन करत… काय अर्थ आहे अशा आयुष्याचा… जन्मभराच्या दुःखाचा…?”
या लेखांवर तारखा आहेत. दोन हजार अकरा सालच्या जानेवारी नावाच्या महिन्यात हे लेखन सुरू झालं असावं, त्या बाळाच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी. या लेखांमध्ये त्या आईने आपल्या मनात ओसंडून जाणारी वेदना व्यक्त केली आणि त्या काळी पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या मर्यादित प्रमाणात जोडलेल्या आंतरजालात ते लेख प्रकाशित केले असं वाटतंय. तिने जी मालिका लिहिली त्याला ‘ब्लॉग’ म्हणत असं दिसतं आहे. एका विचित्र प्रभावाखाली मी पुढे वाचू लागते.
“तुला जाऊन तीन वर्षं झाली, बिट्टू! आमच्याबरोबर तू जितकी वर्षं होतीस तितकाच काळ. मी अजूनही का जिवंत आहे आणि रोजचा दिनक्रम का पाळते आहे… मला माहीत नाही. हे फार भयाण शांततेचं आयुष्य आहे, बिट्टू. आता मला कशातच आनंद वाटत नाही आणि कशामुळेही समाधान वाटत नाही. ज्याची वाट बघावी असं आता काहीच उरलं नाही. सगळे दिवस आता सारखेच असतात… मूक आणि कडवट. आयुष्यातील रंग उडून गेले आहेत; पण मी अजूनही तशीच जगते आहे, तू मला विसरू नयेस म्हणून. हे आयुष्य संपून जावं आणि मग देवाने आपली पुन्हा भेट घालून द्यावी एवढीच माझी इच्छा आहे.”
आई असंच लिहील… शतकांपूर्वीच्या काळातून बोलणारा आवाज मी ओळखते. रात्रीच्या शांततेत माझ्या कॉमवर लावलेलं ते प्राचीन संगीत हळुवार वाजतं आहे आणि मी तीन हजार वर्षांपूर्वी एका दुःखी आईने क्रमवार लिहिलेले लेख वाचते आहे. पण मी जसजशी वाचत जाते तसतसं माझ्या मनात एक मत निश्चित होऊ लागतं. मी प्राचीन तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. मी शिकलेलं संगीत त्यातूनच उत्पन्न झालं होतं. ते सगळं आता मला आठवतं आहे. एका गुंतागुंतीच्या विस्तृत वस्त्राचे वेगवेगळे धागे एकत्र येत आहेत. काळ आणि अवकाश यांच्या पलीकडे जाणारं एक वैश्विक सत्य माझ्या मनात उमलतं आहे.
मी आता केवळ माझ्या कुटीत उरलेली नाही, केवळ प्राचीन यमुना नदीच्या काठावरच्या सपाट प्रदेशातही नाही… केवळ पृथ्वीवरही नाही. मी इथेही आहे आणि स्वर्गावरही… अवकाशात आणि या संगीतातही… माझं अस्तित्व या क्षणी आहे आणि तीन हजार वर्षांपूर्वीही आहे… आणि भविष्यात, पाच वर्षांनी जेव्हा मी माझ्या स्वर्गावरच्या घरी परतेन… मी सर्व ठिकाणी आणि सर्व काळ अस्तित्वात आहे. माझा अंश नाही असं काहीही नाही आणि मला माहीत नाही असंदेखील काही नाही. मला माझ्या शरीराची जाणीव उरली नाही कारण माझं मन विश्वव्यापी झालं आहे.
ती छोटी मुलगी एका लहानशा आजारानंतर मरण पावली असावी, तिच्या आईला नैराश्यात लोटून. तिची आई खोल दुःख आणि आपल्या लेकीचा जीव वाचवता न आल्याची अपराधीपणाची भावना उराशी बाळगून जगली. आपल्या भावना तिने आपल्या लेखनात व्यक्त केल्या. कालांतराने तिचं लेखन कमी होत गेलेलं दिसलं. शेवटचा लेख २०१५ साली लिहिला असावा, तिच्या मुलीच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी. गोळीत आणखी काही माहिती नाही. गोळी तयार केलेल्या व्यक्तीने सुरुवातीच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे, इतर माहितीप्रमाणे हा ब्लॉगदेखील अनियोजित पद्धतीने निवडला गेला असेल. जगातील अनेक लोकांच्या आयुष्याच्या खऱ्या कहाण्यांच्या संकलनाचा भाग म्हणून. त्या दुर्दैवी आईने पाच वर्षांनी लेखन बंद केलं का पुढचे लेख गोळीत समाविष्ट केले नाहीत याबाबत त्यात काहीच माहिती नाही. काही असलं तरी त्या छोट्या मुलीचं माझ्याशी साम्य असावं हा विलक्षण योगायोग आहे.
मनात उत्स्फूर्तपणे एक कल्पना येऊन मी माझा आणि आईचा खरा फोटो माझ्या कॉमवर स्कॅन करते आणि त्याच्या डिजिटल रूपाचे परिमाण बदलून आमच्या त्वचेचा सोनेरी रंग गव्हाळ रंगात बदलते. आमचे पंख पुसून टाकते आणि आमचे कपडे प्राचीन आई आणि तिच्या मुलीने घातलेल्या कपड्यांच्या रंगाचे करते. मग मी दोन्ही फोटोंची तुलना करते… एकाच फोटोच्या त्या दोन प्रती वाटतात… किंवा एका पाठोपाठ घेतलेले दोन फोटो. त्यात फक्त कोन किंचित बदलला आहे, आईची मान किंचित झुकली आहे किंवा आमच्या डोळ्यांतील भाव किंचित वेगळे आहेत… पण ते त्याच दोन व्यक्तींचे फोटो आहेत.
पृथ्वीच्या या भागात राहणारे काही प्राचीन लोक असं मानत, की प्रत्येक सजीव प्राण्याचा एक केंद्रवर्ती ‘स्व’ असतो आणि तो त्याच्या शरीरापेक्षा वेगळा असतो. त्या लोकांचा असा विश्वास होता, की जेव्हा एक सजीव प्राणी मरतो, तेव्हा या ‘स्व’चं – ज्याला ते ‘आत्मा’ म्हणायचे – अस्तित्व कायम राहतं. योग्य वेळ आल्यावर, या आत्म्याचा नवीन शरीरात पुनर्जन्म होतो. हे जन्म-मृत्यूचं चक्र कायम चालू राहतं कारण आत्मा अविनाशी असतो.
असं असेल का, की तीन हजार वर्षांपूर्वी मी पृथ्वीवर राहत होते आणि जन्मल्यावर तीन वर्षांनी मरण पावले? असं असेल का, की माझ्या आईने माझ्या मृत्यूचं दुःख आयुष्यभर भोगलं आणि पुढच्या जन्मी पुन्हा माझी आई होता यावं ही एकच इच्छा तिने उराशी बाळगली? आई आणि मुलगी म्हणून तो आमचा पहिला जन्म होता का? माझ्या आईला पडणारी भीतीची स्वप्नं या तिच्या सुप्त मनातल्या पूर्वजन्मातल्या आठवणी होत्या का? मला मोठं करण्यासाठी ज्या जन्मात तिला कठीण परिस्थितीशी सामना करावा लागला त्या जन्माच्या? मला एक यशस्वी तरुण मुलगी म्हणून मोठं करण्याचं तिचं स्वप्न शेवटी पूर्ण झालं आहे का?
मी माझं बालपण आठवते. माझं लहानपण खूप आनंदी आणि समृद्ध होतं. माझे आई-वडील या जन्मी माझे सर्वात चांगले सोबती आहेत. स्वर्गापासून दूर असण्यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मला आईची खूप आठवण येते. आईच्या बाबतीत मी फार हळवी आहे. मी आता स्वतंत्र प्रौढ व्यक्तीसारखा विचार करायला आणि वागायला पाहिजे हे मला माहीत आहे; पण माझ्या मनात मी नेहमीच स्वतःला आईची छोटी मुलगी मानते. जन्मोजन्मी ती माझी आई असल्यामुळे असं असेल का?
माझी आई सगळ्याच क्षेत्रांत यशस्वी असलेली स्त्री आहे – कर्तृत्ववान, ज्ञानसंपन्न आणि अतिशय सर्जनशील. मग निसर्गाने तिचा सर्वात महत्त्वाच्या सर्जनाचा… एका मानवाच्या निर्मितीचा… आनंद का हिरावून नेला? आता तिने त्यावर प्रभुत्व मिळवलं आहे का? मला कधी त्यावर प्रभुत्व मिळेल का? मला काय हवं आहे हे आता माझ्या लक्षात येतं आहे. मलादेखील माझं स्वतःचं मूल हवं आहे. कदाचित मीदेखील जन्मोजन्मी कुणाची तरी आई असेन… जशी मी जन्मोजन्मी कुणाची तरी मुलगी आहे. माझी तयारी होण्याची वाट पाहत असलेल्या त्या आत्म्याला मलाही भेटायचं आहे. ही निर्मितीची प्रक्रिया… अवकाश आणि काळ यांत सामावलेली… ही आत्म्यांची बांधिलकी… हे निर्व्याज प्रेमाचं नातं…
संगीत केव्हाच वाजायचं थांबलं आहे. माझ्या खिडक्यांच्या बाहेरचं आकाश मोत्यासारखं उजळलं आहे… पहाटेच्या पूर्वीचा काळ! लवकरच सूर्योदय होईल आणि मी माझ्या पंखांत त्याचे किरण शोषून घेईन… मी सशक्त होईन कारण मला लांब लांबवर उडत जायचं आहे. आज मी उड्डाण करून तळ्याच्या काठी माझ्या पथकाकडे जाईन, माझ्या पुनर्जन्माचं रहस्य सोबत घेऊन. आज आम्ही घराकडे परतीच्या प्रवासाची तयारी सुरू करू… आमची मातृभूमी असलेल्या ग्रहाकडे… आज मी माझ्या आईच्या पुनर्भेटीच्या मार्गावर प्रवास सुरू करेन… आमची मोहीम यशस्वी झाली आहे आणि माझ्या आईचीपण. तिच्याशी जोडलेली माझी नाळ शतकानुशतके लांब आहे… अवकाशात अब्जावधी मैल गेलेली आहे… सगळ्या प्रतिकूल परिस्थितींवर मात करून तगून राहिली आहे… मला पोसत… आधार देत… मला घडवत. आता वेळ झाली आहे घरी जाण्याची!

भाग विसावा समाप्त
कादंबरी समाप्त.
