महाराष्ट्रातल्या चित्रमय पोथ्यांबाबत पहिल्या भागात आपण जाणून घेतले. नागपूर भागातल्या पोथ्यांचे थोडक्यात रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला. नागपूर भागातल्या या परंपरेतील अत्युच्च शिखर म्हणता येईल असे काम म्हणजे, ज्ञानेश्वरीची ‘नारायण’ या सुलेखनकाराने बनवलेली हस्तलिखित चित्रमय प्रत. ही प्रत बऱ्याच अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रतीचा आकार १४” x १०” असा आहे. पोथ्यांच्या रूढ आकारापेक्षा हा खूप मोठा आकार आहे. ही पोथी सध्या व्हर्जिनिया संग्रहालय, रिचमोंड, अमेरिका इथे संग्रहित आहे. काही वर्षांपूर्वी फ्रॅंकफर्ट, जर्मनी येथे भारतातील सर्वोत्तम हस्तलिखित पोथ्यांचे प्रदर्शन झाले होते. त्यात ज्ञानेश्वरीच्या या पोथीचा समावेश केला गेला होता.
व्हर्जिनिया म्युजियम ऑफ फाइन आर्ट्सतर्फे त्यांच्या संग्रहातील भारतीय कलाकृतींच्या संग्रहावर एक विशेष कॅटलॅाग सन २००१ मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्याच्या मुखपृष्ठावर याच ज्ञानेश्वरीच्या पोथीतील श्रीगणेशाचे चित्र छापण्यात आले आहे. या संग्रहालयासाठी ही कलाकृती किती महत्त्वाची आहे हेच त्यातून दिसून येते. भारतीय कलांचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक बी. एन. गोस्वामी यांनी त्यांच्या ‘कॉनव्हर्सेशन्स’ या लेखसंग्रहात या चित्रमय पोथीबद्दलचा लेख समाविष्ट केला आहे.

चित्र क्रमांक १ (गणपती)
व्हर्जिनिया संग्रहालयाचे भूषण ठरलेल्या या ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितातील कोलोफनही विशेष आहे.
या कोलोफनमध्ये, ही प्रत गोविंदनाथ आणि श्रीलक्ष्मीधरानंद यांचा शिष्य, नारायण याने, श्री गोपीनाथ यांच्या पुत्रासाठी, नागपूर येथे, शके १६६५ (म्हणजेच सन १७८३) मध्ये लिहली, अशी माहिती दिली आहे. माघ वद्य त्रयोदशी, गुरुवार शके १६६५ (सन १७८३) या दिवशी हे कार्य पूर्णत्वाला गेले अशीही नोंद या कोलोफनमध्ये आहे. याशिवाय आणखी एक खूप खास अशी ओळ आहे, ती म्हणजे, ‘ही पोथी मराठी (प्राकृतच्या) भविष्यासाठी लिहली गेली आहे.’
यात उल्लेख झालेल्या श्री गोपीनाथ यांचा काही ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. परंतु अशी उच्च निर्मितिमूल्य असणारी प्रत त्यानी बनवून घेतली म्हणजे ते कुणी सरदार अथवा मोठे व्यापारी असावेत अशी शक्यता वाटते.
या हस्तलिखितांच्या परंपरेमध्ये या पोथ्यांची आच्छादनेसुद्धा खूप महत्त्वाची आहेत. सहसा ही लाकडी असत आणि त्यावरही सुंदर चित्रे काढली जात. ज्ञानेश्वरीच्या या पोथीला लाल रंगाच्या मखमलीचे आच्छादन आहे. त्यावर सोनेरी रंगात भरतकाम केलेले आहे. ही पोथी दोन खंडांमध्ये लिहिली गेली आहे.
कोणत्याही भागातली मराठा शैली असो, पोथ्यांमधली अक्षरे ही कागदावर कोणताही रंग न लावता काढली जात. कागदाच्या फिकट पार्श्वभूमीवर ही अक्षरे उठून दिसतात. या पोथीमध्ये काळ्या, लाल, सोनेरी आणि चंदेरी रंगांत अक्षरं लिहली गेली आहेत.
यातील पानांची रचना अन्य हस्तलिखित पोथ्यांपेक्षा निराळी आहे. काही चित्रे पानभरून आहेत तर काही मजकुराच्या खाली किंवा वर काढली आहेत. पहिली चित्रे अर्थात देवतांची आहेत. ‘ओम नमोश्रीआद्या, वेद प्रतिपाद्या’ या पहिल्या ओळीसोबत प्रलयसागरात तरंगणारा वटपत्रशायी कृष्ण आणि मार्कण्डेय ऋषींची कथा दाखवणारे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्याच पानावर खालच्या बाजूला ‘जयजयस्वसंवेद्या आत्मरूपा’ या ओळींसोबत शेषशायी विष्णूचे चित्र काढले आहे. त्यानंतर गणेशवंदनेसाठी ‘देवा तूचि गणेश’ या ओळींसह एक अत्यंत वैशिष्यपूर्ण आणि सुंदर रिद्धीसिद्धी सोबतचे गणेशचित्र पाहायला मिळते.

चित्र क्रमांक २ (ओम नमोश्री आज्ञा)
यानंतरचे पान हे ‘शब्दब्रह्मा’बद्दलचे. या पानासाठी काही चित्रयोजना केलेली नाही, पण या पानाच्या चौकटीमध्ये मात्र वेदांची, पुराणांची, ऋषींची नावं लिहिली आहेत. ही एकेक नावं लिहिण्यासाठी स्वतंत्र कमानी काढल्या आहेत. या कमानी लाल, हिरव्या रंगांत रंगवल्या आहेत. एखाद्या कथात्मक रचनेवर आधारित चित्रे काढणे तुलनेने सोपे असते, पण ज्ञानेश्वरीसारख्या तत्त्वचिंतनात्मक ग्रंथासाठी चित्रे काढणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे. हे काम साधण्यासाठी या चौकटीतल्या कमानींच्या रचनेचा फार सुरेख उपयोग यात केला गेला आहे.

चित्र क्रमांक ३ (शब्दब्रह्म)
याशिवाय या हस्तलिखितामध्ये बऱ्याच पानांवर छोटी चित्रे, अक्षरांमधून बनवलेल्या काही आकृती – ज्याला आजच्या भाषेत ग्राफिकल म्हणता येईल – अशी रेखाटने आणि आकृतीही आहेत. दासोपंतांच्या पासोडीतली अशा प्रकारची रेखाटने प्रसिद्ध आहेत. गीतेतील ‘उर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्,’ या श्लोकासंबंधीच्या ओव्या, झाडाच्या खालच्या बाजूला फांद्या असलेले रेखाटन केलेल्या पानावर लिहिल्या आहेत. अशा प्रकारची रेखाटने हेही या पोथीचे वैशिष्ट्य आहे. अशा झाडासारख्या किंवा गुलदस्त्यासारख्या रचना कागदावर काढून त्यावर ओव्या लिहल्या गेल्या आहेत. त्या आकृतींनुसार अक्षरेही रचली गेली आहेत. त्यातून चित्तवेधक व समर्पक रचना सिद्ध झाल्या आहेत.


चित्र क्रमांक ४ व ५ (ऊर्ध्वमूल आणि ब्रह्ममाया)
काही ठिकाणी ओळींना वेगळ्या रंगाची पार्श्वभूमी देऊन लक्ष वेधले आहे. गीतेतील ओळी, ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्यामध्येच वेगळ्या चौकटी टाकून लिहल्या आहेत. गीतेतील या संस्कृत श्लोकांसाठी खास पुष्पमंडित चौकटी केल्या गेल्या आहेत. ती अक्षरे काही ठिकाणी सोनेरी केली गेली आहेत.
या पोथीच्या पानांवर काढल्या गेलेल्या चौकटी हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो, इतके वैविध्य यात आहे. अगदी प्रत्येक पानासाठी वेगळ्या नक्षीची चौकट इथे केली गेली आहे आणि असे असूनही दर्जाबाबत कुठेही तडजोड केली गेली नाही. मराठा चित्रांमध्ये नेहमीच आलंकारिक आणि चित्रांना समर्पक अशा वैविध्यपूर्ण चौकटी केल्या गेल्या आहेत.
या ज्ञानेश्वरीमध्ये चौकटीच्या रचना करताना चित्रकाराने बऱ्याच ठिकाणी चतुराई दाखवली आहे. शारदीय चंद्रकळेची ओवी असलेल्या पानावरून याचा प्रत्यय येतो. ती ओवी अशी आहे :
जैसे शारदियेचे चंद्रकळे ।
माजीं अमृतकण कोवळें ।
तें वेंचती मवाळे ।
चकोरतलगें ॥

चित्र क्रमांक ६ (शारदीय चंद्रकळा)
याचा शब्दशः अर्थ असा होतो, शरद ऋतूतल्या चांदण्यामध्ये असलले चंद्राचे कोवळे अमृतकण चकोर पक्ष्याची पिले हळुवारपणे वेचून खातात… ही कल्पना प्रतिमित करण्यासाठी चित्रकाराने चौकटीचा वरचा भाग वापरला आहे. या भागात त्याने चंद्र, चंद्रप्रकाशात विहरणारे चकोर पक्षी, अमृतकण असा रम्य माहोल दाखवला आहे. चौकटीच्या उजव्या-डाव्या बाजूच्या वरच्या भागात पुढे येणाऱ्या ओव्यांमधील प्रतिमा दाखवल्या आहेत आणि नंतर बाकीची चौकटी तोच निळा रंग कायम ठेवत फुलांनी सजवली आहे. ज्ञानेश्वरीमधील ओव्यांची प्रचिती अशी प्रतिमांद्वारे उलगडून पाहताना एक वेगळाच अनुभव मिळतो.
चित्रमय पोथ्या बनवण्यासाठी, लिखाण करणारा आणि चित्रे काढणारा अशा दोन व्यक्ती काम करतात. कधीकधी एकच कलाकार ही दोन्ही कामं करतो. या ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितासाठी या दोघांच्या विशेष समन्वयाची गरज पडली असणार; कारण यातील रचना अतिशय क्लिष्ट असूनही चित्रे, मजकूर आणि चौकटी यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा दिसून येतो. हा चित्रकारही असामान्य म्हणावा असा आहे. वानगीदाखल यातील शिव आणि विष्णूच्या भेटीचे चित्र पाहता येईल. अद्भुत म्हणता येईल असे हे चित्र आहे. यात तपशिलांचा जो आग्रह चित्रकाराने धरला आहे, त्याने या चित्रास वेगळीच उंची दिली आहे. पाहणाऱ्याला खिळवून टाकतील अशी ही चित्रे आहेत. या चित्रावलीतील अनेक चित्रांबद्दल सांगता येण्यासारखे आहे.
चित्र क्रमांक ७ (शिव -विष्णू भेट)

यातील गणेशचित्राच्या पार्श्वभूमीत वापरण्यात आलेला हिरवा रंग हा नेहमी मराठा चित्रात दिसणारा हिरवा रंग आहे. नऊवारीतील स्त्रिया ही आणखी एक प्रांतीय शैलीची खूण यात दिसून येते. नागपुरातील मराठा शैलीतील इतर कामांप्रमाणे यावरही राजस्थानी आणि दख्खनी शैलींचा प्रभाव दिसून येतो.
ज्ञानेश्वरीची ही चित्रावली पाहून एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे बाकीच्या प्रस्थापित चित्रशैलींमध्ये ज्या प्रमाणात हस्तलिखित पोथ्यांचे काम झाले आहे, त्या तुलनेत मराठा शैलीत कमी काम झाले असले तरी दर्जाच्या बाबत कुठेही कमतरता जाणवत नाही. अत्यंत उत्स्फूर्तपणे काढलेली ही चित्रे आपल्याला आनंद आणि उत्साह देणारी आहेत. महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींमध्ये ज्ञानेश्वरीच्या या सचित्र पोथीचा समावेश केला जाऊ शकतो.

खूप सुंदर लेख. अप्रतिम संशोधन, वर्णन व भाष्य. विस्मृतीत गेलेले कलाप्रकार असे पुनर्प्रकाशित करणे, वाचक- रसिकांना त्याची ओळख करून देणे हे मोठेच काम लेखक- प्रकाशक करत आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा