
गेल्या महिन्यात आमचे मित्र व जयहिंद प्रकाशनाचे हेमंत रायकर यांचा फोन आला. ते म्हणाले, “गोव्याचे श्री.परेश प्रभू हे रंगसम्राट मुळगांवकर यांचे चरित्र लिहीत आहेत. गेली चार वर्षे ते त्याच्यावर काम करीत आहेत. आपण मुळगांवकरांचे एक भक्त व व्यासंगी असल्यामुळे मी आपला नंबर त्यांना दिला आहे.”
त्यापाठोपाठ दहा मिनिटांतच श्री.प्रभूंचा मला फोन आला. सध्या मी अशा प्रकारे कोणाला माहिती वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाही; पण एकतर हेमंतचा फोन, दुसरे म्हणजे मुळगांवकर हा माझा काळजात जपलेला विषय. त्यामुळे त्यांचे चरित्र म्हणजे मला एक आनंदाची पर्वणीच होती आणि प्रभूंशी बोलणे चालू असतानाच मला जाणवले, की किती आत्मीयतेने ते या विषयावर लिहीत आहेत!
मुळगांवकर हे नाव कदाचित आजच्या पिढीला तेवढे जाणवणार नाही, पण विसावे शतक गाजवणारे एक कलानिपुण चित्रकार म्हणून त्यांचे नाव भारतातील कला-इतिहासात घ्यावेच लागेल. तो काळ म्हणजे सर्वच बाबतींत असलेला सुवर्णकाळ मानला जावा – मग ते साहित्य असो, काव्य असो, नाट्य, चित्रकला, गायन, शिल्पकला, पत्रकारिता – या सर्वच बाबतींत वैभवाची एकेक शिखरे आपण पाहत होतो. चित्रकलेत दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगांवकर, एस.एम. पंडित असे अष्टपैलू कलावंत येथे रसिकांचे मनोरंजन करीत असत. पुस्तके, मासिके, त्यांचे दिवाळी अंक यांची मुखपृष्ठे व आतील बोधचित्रे मुळगांवकर-दलाल यांच्या कुंचल्याने नटत असत. त्यातही मुलांना लहानपणीच चित्रकलेकडे प्रवृत्त करण्याचे काम मुळगांवकरांची चित्रेच करीत असत.
मुळगांवकरांना प्रकाशकदेखील लाभले ते मोठ्या नावाचे. ज्यांच्याकडे नावाजलेल्या लेखकांची पुस्तके छपाईसाठी येत असत, त्यांमध्ये प्रामुख्याने जयहिंद प्रकाशनाचे ग.का.रायकर, ग.पां. परचुरे व कालनिर्णयचे जयंतराव साळगावकर – ज्यांच्याशी त्यांची अखेरपर्यंत जिवाभावाची मैत्री होती. रायकरांच्या ‘श्री दीपलक्ष्मी’ या दिवाळी अंकात मुळगांवकरांची चित्रमालिका प्रसिद्ध होत असे. श्रीकृष्ण पोवळे यांच्या ‘अलका’मध्येही त्यांची सप्तरंगी चित्रे येत असत. नंतर त्यांची भावजय व गायिका नलिनी मुळगांवकर यांनी ‘रत्नदीप’ नावाचा दिवाळी अंक सुरू केला, त्यात मुळगांवकरांच्या चित्रमालिकेची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली. ही चित्रे बहुधा नागपूरच्या धोटे यांच्या ‘शिवराज फाईन आर्ट’मध्ये छापली जात व त्यांना ग्राइंडिंग केले जाई. त्यामुळे चित्रावर एक प्रकारचा पोत निर्माण होत असे. नंतर ती चित्रे वार्निश केली जात असत. पुढे मुळगांवकरांनी आपले स्वतःचे ‘रत्नप्रभा’ हे वार्षिक सुरू केले. मग रत्नप्रभातील चित्रांनी त्यात जागा घेतली आणि त्यांनी कॅलेंडर्स तर अगणित चित्रित केली – तीही सौंदर्यपूर्ण अशी.
बाबूराव अर्नाळकरांनी जेव्हा आपल्या ‘धनंजय-छोटू, झुंजार-विजया, काळा पहाड, चारुहास’ अशा कथानायकांच्या दरमहिन्याला सहा मालिका सुरू केल्या तेव्हा त्यांनी त्यांची रंगीत मुखपृष्ठे – तीही त्यांतील नायकांचे सातत्य राखत तयार केली. कित्येकदा बाबूराव आपल्या पुस्तकात शेवटी मुळगांवकरांचे अल्पचरित्र देत असत. त्यावरून या दैवी चित्रकाराची माहिती थोड्याफार प्रमाणात आम्हांला मिळे. पुढे मी मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ अॅप्लाइड आर्ट्समध्ये शिकण्यास गेलो, तेथे थोर चित्रकार वि. सी. गुर्जर आम्हांला शिकवायला येत असत. त्यांनी आम्हांला मुळगांवकरांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. मुळगांवकर हे कोठेही चित्रकला विशेषकरून शिकले नाहीत. ते स्वयंभू होते. त्यांना जर कोणी, ‘दलाल हे केतकरांकडे शिकले असे म्हटले, की ते म्हणत, ‘मला परमेश्वराने शिकवले आहे.’ पण मुंबईला आल्यावर त्यांना पंडितांची रंगलेपनाची पद्धत पाहायची असल्याने, त्यांनी काही दिवस त्यांच्याकडे उमेदवारी केली; पण पंडितांकडे ते शिकले म्हणणे बरोबर होणार नाही.
यांसारख्या अशा अनेक कलाकारांना गोमंतकाच्या मातीने जन्म दिला; मग ते चित्रकार असोत, गायक असोत, नाटककार असोत वा नट असोत, ते गोमंतकाचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे भूषण ठरले आणि अशा कलाकारांच्या कलेने प्रेरित होऊन गोमंतकाचे एक रसिक लेखक-पत्रकार श्री.परेश प्रभू यांना मुळगांवकरांच्या चरित्र लेखनाने मोहित केले. लहानपणी जाता येता त्यांना सन १९०० साली बांधलेली ‘मुळगांवकर सदन’ ही इमारत तेथे दिसत होती. हळूहळू मनात आठवणी साचू लागल्या. मिळतील तेथून संदर्भ जमवू लागले. जो जो म्हणून मुळगांवकर या विषयाची माहिती देईल, तेथून ती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. जुने दस्तावेज मिळवू लागले. त्या काळातील वृत्तपत्रांतील बातम्या मिळवू लागले. एकूण श्री. प्रभू हे या काळात संपूर्ण मुळगांवकरमय झाले होते. अथक परिश्रम सुरू होते. जुन्या काळात घरोघरी मुळगांवकरांची देवदेवतांची चित्रे फ्रेम करून देवघरात व भिंतीवर दिसत असत. राजा रविवर्मानंतर मुळगांवकरांनी त्यांचा वारसा पुढे चालवला होता. मुळगांवकरांनी देवदेवतांना चेहरे दिले.
मुळगांवकरांचे चरित्र लिहिणे सोपे नव्हते. आज एखाद्या भूतकाळातील राजकारण्यांचे, लेखकाचे संदर्भ सहज मिळू शकतात; पण एखाद्या उपयोजित कलाकाराची माहिती मिळणे दुरापास्त असते. एक काळ अवघा महाराष्ट्र गाजवणाऱ्या मुळगांवकरांची चित्रे आजमितीस कोणासही कदाचित आठवत नसतील. मग त्यांची माहिती कोठून असणार? पण हे शिवधनुष्य परेश प्रभूंनी लीलया पेलले. मुळगांवकरांना ओळखणारी बहुतांश माणसे आज हयात नाहीत, तरीही जे कोणी असतील, त्यांच्या पुढच्या पिढीतील असतील अशांच्या गाठीभेटी घेऊन प्रभू त्यांच्या रंगभान चरित्राचा एकेक ठिपका जोडत गेले. झालेल्या आकारात रंग भरत गेले आणि अखेर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठिपक्यांची एक सुबक रांगोळी तयार झाली आणि एका सुबक अशा देखण्या पुस्तकाने जन्म घेतला :
‘रंगसम्राट – कै. रघुवीर मुळगांवकर यांचे चरित्र.’
हे नुसते चरित्र नाही. केवळ शब्दांना यात गुंफलेले नाही; तर यामध्ये आढळून येतो तो मुळगांवकरांच्या सौंदर्यपूर्ण अशा अनेक कलाकृतींचा खजिना.मुळगांवकरांची चित्रे म्हणजे खच्चून भरलेले सौंदर्य. देखण्या नायिका, देवादिकांचे अनेक अवतार, त्यांतील भावाविष्कार, रंगांची रेलचेल, मनाला भुरळ पाडेल असा, जिवंत वाटणारा पाठीमागील निसर्ग, त्यात बागडणारी फुलपाखरे, निरनिराळे रंगीबेरंगी पक्षी, हंस, बदके, कबुतरे आणि अल्लडपणे धावणारे व बागडणारे प्राणी अशी चित्रे कोणालाही आपल्या संग्रहात असावीशी नक्कीच वाटतील. या चरित्रात जशी त्यांच्या पूर्वजांपासूनची माहिती मिळते, तशाच त्यांच्या कन्येने आपल्या पित्याविषयी लिहिलेल्या आठवणी सापडतात. तसेच अनेकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखविले आहेत. जोडीला मौल्यवान असा त्यांचा पत्रव्यवहार आपणांस पाहायला मिळतो. ती पत्रे प्रकाशकांना, प्रोसेसवाल्यांना सूचना देणारी आहेत. आपल्या चित्राची पहिली रंगीत मुद्रण प्रत आली, की गरज असेल तर ते त्यामध्ये सुधारणा करून ते देत असत. मुळगांवकरांच्या चित्रातील स्त्रिया या देखण्या असत आणि प्रत्येकाला आपली पत्नी अशी असावी असे वाटत असे. तर मातांना आपले बालक हे मुळगांवकरांच्या चित्रातील बालकाप्रमाणे गुटगुटीत आणि देखणे असावे असे वाटे. त्यांनी प्रत्येक चित्रात स्त्रियांच्या अंगावर दाखवलेले अलंकार व दागिने हे दरवेळी वेगळे असत व कित्येक ज्युवेलर्स त्या डिझाईनवरून दागिने घडवत असत.
प्रभूंनी या चरित्रात मुळगांवकरांचा चौफेर परामर्श घेतला आहे : यामध्ये जसे गोमंतकातील बालवयातला लहानगा रघुवीर दिसतो, तसेच त्यांचे मुंबईत आगमन, त्यांनी मुंबईवर, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रावर घातलेली आपल्या कलेची मोहिनी, त्यांची देवादिकांची चित्रे, ‘रंगसम्राट’ मुळगांवकरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा पत्रव्यवहार, त्यांचे विदेश दौरे आणि गोमंतकात शांतिनिकेतनाप्रमाणे स्थापित करण्याचे कला विश्वविद्यालयाचे त्यांच्या अकाली निधनामुळे अर्धवट राहिलेले स्वप्न अशा विविध गोष्टी रसिकांच्या डोळ्यांसमोर उलगडत जातात.
मुळगांवकरांची चित्रे विविध अंगांनी युक्त असत. विषयाचे वावडे त्यांना कधीच नव्हते; वा जाहिरातीसाठी चित्रनिर्मिती करण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नव्हता. म्हणूनच त्यांनी उत्पादनासाठी कॅलेंडर, पोस्टर बनवली, तशीच सिनेमासाठीही बनवली. व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’साठी त्यांनी सिनेमा पोस्टर्स बनवली. तशीच रायकरांच्या जयहिंद प्रकाशनाच्या लहान लहान धार्मिक पुस्तकांसाठी त्यांनी कित्येक देवांची चित्रे काढली आहेत. त्यांनी चित्रकला या विषयाला सर्वस्वी वाहून घेतले होते. ते दिवसभर त्यात रमून जात. म्हणूनच त्यांनी दिवसाला पाच-पाच कॅलेंडर डिझाईनच्या कामाचा विक्रम केला आहे. काम करताना पाहण्यास किंवा त्यांच्या स्टुडिओत शिरण्यास कोणासही परवानगी नसे. त्यांची शिस्त तशी कडक होती.
दुसरे एक महत्त्वाचे म्हणजे त्यांची रसिकांकडून दुर्लक्षित राहिलेली अक्षरे अथवा चित्रांना केलेली अक्षररचना. त्यांची अक्षरे अत्यंत देखणी आणि चित्रांसोबत जाणारी असत. निरनिराळ्या प्रकारच्या टाईपमध्ये ते आपली अक्षररचना करीत असत. तो एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय व्हावा. ती कधी चौरस आकारात गुंफलेली असत, तर कधी गोलाकारात आणि कित्येकदा त्यांना दिलेले आलंकारिक कोंदण. हे सर्व मुळगांवकरी कलाकुसरीचा खास साजशृंगार समजावा लागेल. त्यांच्या नायिकांचे कपडे, त्यावर लटकणारे रंगीत असे गोंडे, अंगावर निरनिराळ्या संकल्पनांचे विशिष्ट असे दागिने आणि त्यासोबत चेहऱ्यावरील भावाविष्कार यांचा सुरेखा संगम असे आणि विशेषकरून त्यांनी केलेली कृष्णधवल सिलाउट्स – त्यांत केवळ सौंदर्य आणि सौंदर्यच दिसत असे.
अशा या सर्जनशील आणि दैवी चित्रकाराला जगद्गुरू शंकराचार्य यांनी ‘चित्रसार्वभौम’ही पदवी दिली होती. हा कलाकार वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी कला साधना सोडून निघून गेला हे आपल्या महाराष्ट्र-गोमंतकाचे दुर्दैव नाहीतर काय?
एकूणच मुळगांवकरांच्या इतक्या विचारपूर्वक, सांगोपांग, अभ्यासू पद्धतीने लिहिलेल्या चरित्रासाठी परेश प्रभू यांची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे. परेश प्रभू यांनी लिहिलेले हे मुळगांवकरांचे चरित्र ‘जयहिंद प्रकाशन’चे हेमंत रायकर यांनी प्रकाशित केले असून त्याची किंमत ७५०.०० रुपये आहे. प्रत्येक कलाप्रेमी, कलाकार, कलारसिक यांनी संग्रही ठेवावे असे हे चरित्र आहे.
संपर्क : श्री. परेश वासुदेव प्रभू
भ्रमणध्वनी : ९८५०९९१८७७.
प्रकाशक : श्री. हेमंत रायकर
जयहिंद प्रकाशन.
भ्रमणध्वनी : ९८६७१२६१९६, ९१५२७५७३६८.
————————————————————

‘रंगसम्राट’ चे सुप्रसिद्ध चित्रकार श्री. अरुण दाभोलकर यांच्या हस्ते गोवा कला अकादमीत प्रकाशन झाले तेव्हा डावीकडून जाई काजळचे श्री. राजेश गाडगीळ, लेखक श्री. परेश प्रभू, डॉ. प्रसाद नेवरेकर, श्री. अरुण दाभोलकर, कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या श्रीमती ज्योती बांदेकर, पोरवाल नेत्रांजनचे श्री. विश्वास मोकाशी, प्रकाशक श्री. हेमंत रायकर, श्री. विवेक मेहेत्रे व डॉ. प्रवीण गावकर
रंगसम्राटांच्या कुंचल्यातून साकारलेल्या काही अजरामर चित्रकृती




