पुनरपि जननं : प्रकरण तेरावे

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. 

ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :

हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली.  तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल. 

एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल. 

जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’  या नावाने केले आहे. हे भाषांतर   क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण तेरावे  .  

 – संपादक

प्रकरण तेरावे

बारा महिन्यांत पाच वर्षं

प्रकाशाचा एक कण अंधाऱ्या थंड अवकाशाच्या खोलातून सरकत होता. ताऱ्यांच्या मधल्या अब्जावधी मैल पसरलेल्या रिकाम्या शून्यात. प्रकाशाचा तो कण, कोणत्याही अगदी छोट्या ताऱ्यापेक्षा किंवा आकाशगंगांमधील धुळीच्या  देदीप्यमान ढगांपेक्षा कितीतरी पटींनी मंद असूनदेखील कोणत्याही स्फोट झालेल्या ताऱ्याच्या (सुपरनोव्हा) तेजापेक्षाही कितीतरी विशेष होता; कारण त्यात सुषुप्तावस्थेत असलेले सोळा मानव होते… सोळा जिवंत व्यक्ती… स्वतःच्या अस्तित्वाचे भान असलेली सोळा संवेदनशील मनं. तो तेजाचा कण पुढे जात राहिला… एकाच विशिष्ट गतीने… दूरवरच्या त्याच्या लक्ष्याच्या दिशेने… त्यातील मानव एका स्वप्नरहित झोपेत असताना.

———————————————————————————————————————————————————–


अंगातून एक शिरशिरी यावी तशा आकाशात स्पंदन करणाऱ्या एका विचित्र हिरव्या प्रकाशाने आसमंत उजळून निघाला होता. क्षितिजावरून उमटणाऱ्या आणि माथ्यावर विरून जाणाऱ्या, हिंदोळणाऱ्या लाटांसारखा तो प्रकाश हलत होता. कधी त्या लाटा प्रकाशाच्या उभ्या भिंतींसारख्या दिसत, आकाशाच्या तळ नसलेल्या घुमटाकडे आपली बोटं आणखी वर ताणून धरणाऱ्या. कधी त्या लाटा चमकदार पट्ट्यांसारख्या आणि एखाद्या प्रकाशाच्या नदीसारख्या वाहताना दिसत. त्या लखलखत्या ध्रुव प्रकाशाच्या थंड सौंदर्याने सगळं वातावरणच थरारून गेल्यासारखं वाटत होतं. कित्येक मैल खोल बर्फाने आच्छादित असलेल्या त्या स्तब्ध ध्रुव प्रदेशात त्या प्रकाशाने जणू चैतन्याचा संचार केला होता. त्या ध्रुव प्रकाशाने तो वैराण स्तब्ध प्रदेश न्याहाळला, तो थोडा थबकला आणि काही निमिषांतच गायब झाला. 

दुसरीकडे  – खालच्या वृत्तांमध्ये – खजुराच्या झाडांची किनार असलेल्या एका समुद्र किनाऱ्याच्या दिशेने एक प्रचंड वादळ झेपावलं. झाकोळून येत जाणाऱ्या आकाशात मोठाले काळे मेघ गर्जना करू लागले आणि मग आकाशातून वीज कडाडली. तळपत्या प्रकाशाची एक रेखा दहा लाख व्होल्टसच्या शक्तिनिशी जमिनीवर आदळली आणि पुढच्याच क्षणी नष्ट होऊन गेली. कानठळ्या बसवणारा गडगडाट काही काळ रेंगाळला; मग आकाशात पुन्हा वीज अवतरली, ढगांतून आक्रमक नागमोडी वाट काढत, तिच्या तेजस्वी धारेने त्यांना कापत अंधारात विरून गेली. प्रकाशाचा खेळ चालूच राहिला, खालची शांत पृथ्वी उजळत. आकाशात वादळ घुमत राहिले. वर-खाली, खाली आणि आडवी, तेजस्वी वीज मनाच्या वेगाने आकाशात नाचत राहिली. फक्त, ते पाहायला तिथे कोणी मनच नव्हतं…

_____________________________________________________________________________________________________________

आरुषीची आई एका कोपऱ्यात उभी होती. तिचे पंख पाठीमागे नीटपणे दुमडलेले होते आणि हातात तिने अनुक्रमणिका धरली होती. रॉल्फने तिच्याकडे पाहून स्मित केलं आणि तिच्या मनातील धास्ती कमी करण्यासाठी तिच्या खांद्यांभोवती हात ठेवला. या उद्घाटनाच्या समारंभात तो तिच्या बरोबर होता हे तिला किती बरं वाटत होतं. अर्थात, सॅंड्रा तिच्यावर स्तुतीचा वर्षाव करत होती आणि एकूणच तिने लोकांच्यात मिसळावं यासाठी प्रयत्न करत होती; पण ती जरा जास्तच बडबडत होती आणि तिच्या उतू जाणार्‍या उत्साहाला आरुषीच्या आईच्या मनात आजिबात थारा मिळत नव्हता. एका कोपऱ्यात उभं राहून दुरूनच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा अंदाज बांधणं तिला सोईस्कर वाटत होतं. 

ही कल्पना सॅंड्राचीच होती; किंबहुना तिचा आग्रहच होता, की आरुषीच्या आईने तिच्या चित्रांचं प्रदर्शन भरवावं. चित्रकलेच्या दालनाबरोबर चर्चा करून तिनेच सगळी तयारी केली होती आणि चित्रं फ्रेम करून आणली होती. प्रदर्शनासाठी पुरेशी चित्रं नव्हती, म्हणून तिने आरुषीच्या आईकडून एका आठवड्यात दोन चित्रं रंगवून घेतली होती आणि तिच्या अकादमीच्या संग्रहातून तिची दोन जुनी चित्रं मिळवली होती. त्या प्रदर्शनात आरुषीच्या आईने घन स्वरूपातील साधनं वापरून प्राचीन पद्धतीने रंगवलेली – कॅनव्हासवर नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेल्या रंगांनी रंगवलेली चित्रंही होती. 

मित्रमैत्रिणी आणि सहकारी यांच्यात सॅंड्राने प्रदर्शनाची भरपूर जाहिरात केली होती आणि काही लोकांना ती प्रदर्शन बघायला अक्षरशः ओढून घेऊन आली होती. आठवडाभर चाललेल्या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस होता आणि एकदाचं ते दिव्य पार पडलं म्हणून आरुषीच्या आईला बरं वाटत होतं. हीच ती चित्रं काढणारी कलाकार आहे हे जेव्हा लोकांना कळायचं आणि ते तिच्याशी बोलायला यायचे आणि तिच्या चित्रांची प्रशंसा करायचे तेव्हा आरुषीच्या आईला खूप अवघडल्यासारखं वाटायचं. अशा वेळी तिला फार वाटायचं, की आरुषी तिच्याबरोबर असायला हवी होती. मग अभिमानाने तिचा चेहरा उजळून निघाला असता. 

प्रदर्शनाबद्दल रॉल्फला सांगायला तिला फार संकोच वाटला होता. त्यामुळे तो सहज म्हणून नवीन कार्यक्रमांविषयी माहिती मिळवायला कला केंद्रात गेलेला असताना त्याला त्याच्या जोडीदारिणीच्या चित्रांचं प्रदर्शन लागलेलं बघून आश्चर्य वाटलं. त्याने प्रदर्शनातून फेरफटका मारला आणि इतके दिवस आरुषीच्या आईने आपली एवढी प्रतिभा झाकून ठेवलेली पाहून त्याला धक्काच बसला. त्याच्या उपस्थितीत ती कधीच चित्रं काढत नसे. चित्रं काढणं ही तिची एकांतात करण्याची क्रिया होती. आरुषी आणि तिच्या वडिलांच्या उपस्थितीत ती चित्रं काढत असे; कारण आरुषीला तिची चित्रं आवडत असत आणि तिच्या वडिलांना त्यात काही रसच नव्हता.
 

त्यामुळे रॉल्फने जेव्हा तिचं प्रदर्शनाबद्दल अभिनंदन केलं आणि तिच्या चित्रांची प्रशंसा केली तेव्हा त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे तिला समजेना. त्यांनी तो आठवडा एकत्र घालवला होता आणि त्याने केलेली प्रशंसा मनापासून केलेली होती याची तिला खातरी पटली होती. हळूहळू त्याची सोबत तिला आता आवडू लागली होती. त्याचं असणं हे आता केवळ तिच्या मनाला कायम वाटणाऱ्या धास्तीपासून आणि कंटाळ्यापासून एक सुटका नव्हती तर ज्याची वाट पाहावी असा तो एक स्वागतार्ह बदल होता. 

हळूहळू, आणि सुरुवातीला घुटमळत, ती त्याच्याशी आरुषीबद्दल बोलू लागली. एक अलिखित सामाजिक नियमच होता, की वर्तमानातल्या जोडीदारासमोर मागच्या आयुष्याचा विचार करत बसायचं नाही. त्यांच्या सध्याच्या जोडीदाराच्या उपस्थितीत लोक गतायुष्यातील सुखदुःखांबद्दल बोलत नसत. वर्तमानात जगायचं आणि आलेल्या क्षणाचा आनंद घ्यायचा हेच त्यांचं ध्येय असे. ज्या स्त्री-पुरुषांनी पूर्वी पालक करार पूर्ण केलेला असेल ते एकमेकांच्या आणि आपल्या मुलांच्या संपर्कात राहत. पण आपल्या सध्याच्या जोडीदाराशी त्या भेटींबद्दल किंवा संभाषणाबद्दल चर्चा करत नसत. रॉल्फबरोबर आरुषीच्या आईचं तसंच नातं होतं आणि तरीही रॉल्फबरोबर आनंदात घालवलेल्या क्षणांतही आरुषीची आई आपल्या कौटुंबिक आठवणी विसरू शकत नव्हती. गोठलेल्या अवस्थेत सुषुप्तीत असलेल्या आणि प्रत्येक क्षणाला तिच्यापासून दूर जाणाऱ्या आपल्या लेकीचा विचार नेहमीच तिच्या मनात अग्रणी असायचा. अवकाश प्रवास केंद्राने चालवलेल्या पथनियंत्रण प्रणाली मार्फत ती रात्रंदिवस आरुषीच्या अवकाशयानाचा मार्ग जोखत होती आणि जीवन उत्पन्न करणाऱ्या आणि जीवनाला आधार देणाऱ्या त्या अज्ञात शक्तीची ती आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी प्रार्थना करत होती. 

रॉल्फबरोबरचं नातं जोपर्यंत वरवरचं होतं तोपर्यंत ती तिच्या मनातले हे विचार आणि काळजी त्याच्यापासून दूर ठेवू शकत होती. पण आता जेव्हा दोघांनाही एकमेकांची सोबत आवडू लागली होती तेव्हा कायम वर्तमानात राहणं तिला जड जात होतं. रॉल्फला ती अनेकदा विचारात गढून गेलेली आढळे पण तिच्या खासगी जगात तिला तो रमू देत असे. त्यानेच पहिल्यांदा आरुषीचा विषय काढला. तिच्या लेकीने एका नवीन क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका निभावल्याबद्दल त्याला तिचा अभिमान वाटलेला पाहून आरुषीच्या आईला सानंद आश्चर्य वाटलं. रॉल्फने तिला निवड प्रक्रियेबद्दल, आरुषीने घेतलेल्या प्रशिक्षणाबद्दल आणि मोहिमेच्या तांत्रिक पैलूंबद्दल विचारलं. हळूहळू, आरुषीची आई त्याला आपल्या लेकीच्या बालपणाबद्दल, त्यांच्या प्रेमळ नात्याबद्दल आणि लेकीच्या यशामुळे तिला वाटणाऱ्या अभिमानाबद्दल सांगू लागली. आठवणी सांगताना ती अनेकदा खूप भावनावश होत असे… तिच्या गरोदरपणाच्या आठवणी, आरुषी बाळ असतानाच्या आठवणी, तिला उडायला शिकवतानाच्या आठवणी, छोट्या आरुषीबरोबर गच्चीवरच्या दुर्बिणीतून रात्रीचं आकाश बघत घालवलेल्या अनेक तासांच्या आठवणी… आरुषीला सांगितलेल्या प्राचीन पृथ्वीच्या गोष्टी, आरुषीची विलक्षण ग्रहणशक्ती, तिचा दयाळू स्वभाव, प्राचीन संगीतातील तिचं नैपुण्य, अकादमीतले तिचे दिवस. रॉल्फ हे सर्व आत्मीयतेने ऐकताना, तिच्या आनंदात सहभागी होताना पाहायला तिला आवडायचं.

रॉल्फने कधीच कुणाबरोबर पालक करार केला नव्हता. त्याने अनेक अर्थपूर्ण नाती निभावून नेली होती; शिवाय जीवशास्त्रज्ञ  तर तो होताच पण एक उत्कृष्ट खेळाडूदेखील होता. त्याच्याशी जडलेलं नातं किती काळ टिकेल असा विचार कधीकधी आरुषीच्या आईच्या मनात येई. पण त्याची तिला फारशी फिकीर नव्हती. आयुष्यात तिच्यासमोर एक ध्येय होतं – तिच्या लेकीच्या परत येण्याची ती वाट पाहत असताना मिळालेली कोणतीही सोबत तिला आवडणारच होती पण तिला जरी एकटीला राहावं लागलं तरी तिच्या आयुष्याचं एक प्रयोजन होतं – आणि ते फार महत्त्वाचं होतं. 

———————————————————————————————————————————————————————-

शक्य तितकी शक्ति गोळा करून अमरने ती त्याच्या फटकाऱ्यात ओतली आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून आलेला सरळ बॉल क्षणार्धात पुन्हा त्याच्या हद्दीत टोलवला. उलट्या हाताने मारायच्या फटक्याचं तंत्र त्याला फारसं जमत नसे पण आज कसं कोण जाणे शेवटच्या फेरीत त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं आणि खेळ जिंकला. कदाचित त्याचा मुलगा प्रेक्षकांत बसून त्याचा खेळ पाहत होता म्हणून त्याच्या स्नायूंत अधिक बळ संचारलं होतं. दमून त्याने आपली रॅकेट भिरकावून दिली आणि कोर्टाच्या जमिनीवर तो फतकल मारून बसला. त्याच वेळी त्याचा विजय घोषित करणारा पंचांचा यांत्रिक आवाज स्टेडियममध्ये घुमला. स्टँडवरून उठून प्रेक्षक मैदानाकडे धावले आणि त्याचं अभिनंदन करू लागले. ओडांटाने सर्वात आधी धावत येऊन त्याला मिठी मारली. सामने खेळायला तिनेच त्याला प्रोत्साहन दिलं होतं आणि हा तिचाच विजय होता. अमरने तिच्या गालाचा पापा घेतला आणि उठून उभा राहून त्याने प्रेक्षकांत जयंत बसला होता त्या दिशेने नजर फिरवली. जयंत काहीशा बेफिकिरीनेच मैदानाकडे चालत येताना त्याला दिसला. जाणीवपूर्वक दाखवायची ती बेपर्वा वृत्ती अमरला चांगली ठाऊक होती आणि ओडांटाच्या खांद्याभोवती हात टाकून तो शांतपणे जयंतची वाट बघत उभा राहिला. 

“तुम्ही फार छान खेळलात बाबा, अभिनंदन!”

“धन्यवाद जय. ही ओडांटा, माझी जोडीदार.”

जयंतने प्रसन्नपणे तिला अभिवादन केलं. त्याच्या वागण्यावरून किंवा दिसण्यावरून ओडांटाने जयंतला आजमावणं अमरला नको होतं. निदान या भेटीत तरी. तिला काय माहिती होतं त्याच्याबद्दल? फुटबॉलच्या मैदानावर जयंत पडला आणि त्याच्या गुडघ्याला इजा झाली तेव्हा अमरने उचलून त्याला जीवशास्त्राच्या वैद्याकडे नेलं होतं तेव्हा कुठे होती ती? किंवा अकादमीत जाण्यापूर्वीच्या चाचणी परीक्षेपूर्वी जेव्हा तो खूप नर्व्हस झाला होता आणि अमर त्याच्याबरोबर रात्रभर जागत बसला होता तेव्हा? उगीचच तिला जयंतबद्दल आणि त्यांच्या आपसांतील तणावपूर्ण नात्याबद्दल सांगितलं,  असं त्याला वाटलं. पण ते सगळं अनाहूतपणे सांगितलं गेलं होतं. तब्बल दोन वर्षांनी काल संध्याकाळी जेव्हा जयंतचा फोन आला तेव्हा अमर आपला भावनावेग आवरू शकला नव्हता.

“तूच बोलतो आहेस का जय?” संध्याकाळी उशिरा जेव्हा त्याच्या कॉमचा बझर वाजला होता आणि जयंतचा चेहरा भिंतीवर झळकला होता तेव्हा त्याने विचारलं होतं. 

“हो, बाबा. फक्त हे सांगायला सहज फोन केला, की उद्या मी तुम्हांला प्रत्यक्ष भेटायला येतो आहे.”

या अनपेक्षित बातमीने अमरने आनंदाने उडीच मारली होती. जयंतच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला सुचेनाच. 

“हे तर फारच छान होईल, जय. तुला आणायला झिप्पर पाठवू का? कुठून येतो आहेस तू?”

“नको बाबा. मी इथे जवळच राहतो. मी उडतच येईन तुम्हांला टेनिसच्या मॅचमध्ये खेळताना बघायला.”

“हो, खरंच की! उद्या मॅचमध्ये खेळायचं आहे मला. पण तुला ते कसं कळलं?”

“बातमीपत्रात आलं होतं. मॅचनंतर बोलू आपण.”

आणि खरंच, अमर जेव्हा मैदानात उतरला तेव्हा जयंत प्रेक्षकांत बसला होता. त्याने हात हलवून आपण कुठे बसलो आहे तेदेखील दाखवलं होतं.

 

“तू छान दिसतो आहेस, जयंत. काम काय म्हणतंय?” त्याची पाठ थोपटत अमरने विचारलं.

“चांगलं चाललंय. खरंतर मी तुम्हांला हेच सांगायला आलो, की मी उपग्रह ५०४ वर जाणार आहे. तिथे बसवलेल्या एका निर्मितियंत्राची काही दुरुस्ती करायची आहे. तुम्हांला ऐकून बरं वाटेल असं वाटलं.”

“अर्थातच, जय. फारच चांगली बातमी आहे. तुझी पहिली अवकाश यात्रा! तुझ्या आईला माहिती आहे?”

“हो. काल सांगितलं मी तिला. तिला माहिती आहे मी इथे तुम्हांला भेटायला आलो आहे.”

“अमर, तुम्ही इथे मैदानात गप्पा मारत राहा. मी पुढे जाऊन आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी मस्त पेयांची व्यवस्था करते. आपण एकत्र बसून संध्याप्राशन करू. येते, जयंत.”

अमरने होकारार्थी मान हलवली आणि ओडंटा त्यांच्या घराच्या दिशेने उडत गेली. अमर आणि जयंत फिरत फिरत क्रीडा क्षेत्राच्या बागेत गेले आणि एका फुललेल्या आल्डर वृक्षाखाली खुर्च्यांवर बसले. 

“तुमचं कसं चाललय बाबा?” जयंतने थोड्या वेळाने विचारलं.
 

“माझं ठीक चाललंय. पृथ्वी प्रकल्पातील कामाची माझी मुदत संपून आता वर्ष होत आलं, ” अमर थोडं अवघडून म्हणाला. 

“हो, मला वाटलंच होतं. माझी निवड झाली नाही तेव्हा मी तुमच्यावर रागावलो होतो त्याबद्दल मला माफ करा. कदाचित ते माझ्या बऱ्यासाठीच झालं. माझी सध्याची नोकरी आवडते मला आणि माझ्या जोडीदाराबरोबर मस्त आयुष्य चाललं आहे माझं. तो पुरुष आहे.”

म्हणजे त्याचा मुलगा आता समलिंगी झाला होता. नताशाला काय वाटत असेल त्याबद्दल? अर्थात ते काही महत्त्वाचं नव्हतं. मुख्य मुद्दा हा होता, की जयंत आता आनंदी आणि समाधानी होता. 

“मला या अवकाश यात्रेबद्दल सांग. कधी जाणार आहेस तू? एकटाच जाणार आहेस का? उपग्रह ५०४ जवळ जवळ बहात्तर तासांच्या प्रवासाच्या अंतरावर आहे.”

“अगदी बरोबर बाबा. मी दुसऱ्या एका मेकॅनिकल इंजिनियर बरोबर जाणार आहे. आम्हांला तिथे यंत्राची दुरुस्ती करायला साधारण दोन तास लागतील. मग परत येणार आम्ही.”

“मस्तच! केव्हा निघणार आहेस तू?”

“पुढच्या बुधवारी निघणार आम्ही. छोटासाच प्रवास आहे. उपग्रह ५०४ वर कापड तयार करायचा कारखाना आहे.”

“हो, आठवतं मला,” अमर आपल्याच तंद्रीत म्हणाला. पृथ्वी प्रकल्पाबद्दल झालेली निराशा जयंत खरंच विसरला असेल का याचा तो विचार करत होता. जवळच्या कारखाना असलेल्या उपग्रहावर एका नगण्य मोहिमेवर जाताना कसं वाटत असेल त्याला? पृथ्वी मोहिमेवर जाणाऱ्या पथकाचा सदस्य असण्याच्या तुलनेत हे काहीच नव्हतं. कारखाने असलेल्या एखाद्या जवळच्या उपग्रहावर ते कारखाने चालवणाऱ्या यंत्रमानवांना न जमणारी एखादी दुरुस्ती करायला कोणीही जाऊ शकतं. पण मग गेल्या दोन वर्षांत त्यांच्यात फारसं संभाषणही नसताना ही बातमी सांगायला जयंत इतक्या काम एडनला कशाला आला? 

“मला तुमच्याबद्दल सांगा बाबा. प्रकल्पाच्या नंतर तुमचं जीवन कसं चाललंय?”

प्रकल्पाच्या हुद्द्यावरून आधीच राजीनामा न देण्यात काही शहाणपण होतं का नाही, हे विचारायचं आहे का त्याला, अमरच्या मनात विचार आला. पण आपल्या मुलाला सर्व काही मोकळेपणाने सांगायचं अमरने ठरवलं. 

“पृथ्वी प्रकल्प म्हणजे माझा प्राण होता जय, पंधरा वर्षं! तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुखी काळ होता कारण तेव्हा आपण सगळे एकत्र एक कुटुंब म्हणून राहत होतो. पृथ्वी प्रकल्पाच्या आव्हानात्मक दिवसांची जशी मला आठवण येते तशीच आपल्या एकत्र घालवलेल्या दिवसांचीही आठवण येते. पण आयुष्य हे असंच असतं. तू मोठा झालास, आमचा पालक करार संपला आणि त्याचबरोबर प्रकल्पातील माझं कामही संपलं. तिथे आता एक नवी टीम आहे. ते अवकाश यानाच्या प्रवासावर लक्ष ठेवून आहेत. पृथ्वीवर गेलेल्या पथकाला त्यांच्या पृथ्वीवर राहण्याच्या काळात आणि परतीच्या प्रवासात ते मार्गदर्शन करतील. माझं म्हणशील तर प्रकल्पात माझा सगळा वेळ खर्च होत असल्याने ज्या प्रकल्पांवर काम करणं मला थांबवावं लागलं होतं तिकडे मी पुन्हा वळलो आहे. माझा बहुतेक वेळ मी आण्विक प्रयोगशाळेत संशोधन करण्यात घालवतो. 

ओडंटाला वाटतं, की मी मायक्रोस्कोपमधून जीवाणू पाहण्यात फार वेळ घालवतो म्हणून ती मला टेनिस खेळायला लावते. म्हणूनच आज तू मला मॅच खेळताना बघितलंस.” अमर काहीसा अवघडून हसला. गेली दोन वर्षं ज्याला भेटण्यासाठी तो तळमळत होता त्या आपल्या मुलाशी संवाद साधणं कठीण जात होतं त्याला. 

जयंत फक्त शांतपणे ऐकत होता. मात्र तो आता निराश किंवा रागावलेला वाटत नव्हता. कदाचित तो खऱ्या अर्थाने आनंदी असेल, अमरला वाटून गेलं.

“तू आणखी काय करतोस जय? एखादी कला वगैरे?”

“मी यंत्रांचे निरनिराळे प्रकार तयार करतो. निरनिराळी उपकरणं बनवतो. मी ज्यांचा आराखडा तयार केला होता अशा दोन यंत्रांची निर्मिती सुरू झाली आहे.”

“अरे वा! हे तर छानच झालं. तुझा जोडीदार काय करतो?”

“तो व्यायामाचा शिक्षक आहे. त्याची आवडही तीच आहे आणि नोकरीही तीच.”

“आम्ही पालक करार करायचा विचार करतो आहे बाबा. आम्हांला एक मूल वाढवायचं आहे.”

हे अनपेक्षित होतं. जयंत फक्त एकवीस वर्षांचा होता. पालक होण्याइतकी परिपक्वता होती का त्याच्याकडे? 

“एवढी घाई काय आहे बेटा? तुला खातरी आहे का, की तुला हे करायचंय? पालक होणं सोपं नसतं.”

“हो, पण माझा जोडीदार माझ्याहून बराच मोठा आहे. त्रेचाळीस वर्षांचा आहे तो. प्रजोत्पादनाची प्रयोगशाळा आमचा अर्ज मान्य करेल की नाही ते माहिती नाही पण आम्हांला प्रयत्न तर करून बघायचा आहे.”

“पूर्ण विचार कर, जय. निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार कर. पालक करारात अडकून जीवनशैलीवर मर्यादा पडण्यापूर्वी तू आयुष्याचा आणखी अनुभव घ्यावास असं मला वाटतं. आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर – आपल्या व्यवसायिक क्षेत्रातही आणि वैयक्तिक नात्यांमध्येही – मूल वाढवणं जास्त आनंददायक असतं. पालक करार करण्याचा जेव्हा तुझ्या आईने आणि मी निर्णय घेतला तेव्हा आमच्यात सात वर्षांचं नातं होतं.”

“व्यवसायिक क्षेत्रात फार गुंतून पडण्यापूर्वीच मला माझं मूल वाढवायचं आहे. मला त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर अधिक वेळ घालवायचा आहे.”

“मी तुला पुरेसा वेळ नाही दिला का जयंत? तुझं बालपण आनंदात नाही गेलं का?”

“मला तुमच्याबद्दल म्हणायचं नव्हतं बाबा. माझं बालपण नक्कीच आनंदात गेलं. तुम्ही खूप केलंत माझ्यासाठी. पण मी नेहमीच तुमच्या प्रतिभेने दिपून जायचो. तुम्ही एक महान शास्त्रज्ञ होतात, सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत होतात. मी नेहमीच तुमचं अनुकरण करायचा प्रयत्न करायचो. पण मी तुमच्याइतका हुशार कधीच होऊ शकलो नाही. तुमच्या अपेक्षांना मी कधीच पुरा पडलो नाही. मी दोस्ती नाही करू शकलो तुमच्याशी. माझ्या मुलाच्या बाबतीत तसं होऊ नये असं मला वाटतं.”

आपल्या मुलाचं बोलणं ऐकून अमरला आश्चर्य वाटलं. जयंतच्या मनात असा काही न्यूनगंड होता याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. त्याला असं का वाटावं हे अमरला कळे ना आणि त्याचा तो गैरसमज कसा दूर करावा हेदेखील त्याला समजे ना. 

“तुला वाटतं तसं काही नाहीये जयंत. मला नेहमीच तुझा दोस्त व्हायचं होतं आणि माझ्या अपेक्षांना तू पुरा पडत नाहीस असं मला कधीच वाटलं नाही. तुझ्याकडून माझ्या अशा काही अपेक्षा नव्हत्याच. तुला जे काही आवडेल त्यात तू उत्तम प्रगती करावीस एवढंच मला वाटायचं.”

नंतर रात्री जेव्हा जयंतने त्याचा निरोप घेतला तेव्हा अमरने प्रेमाने त्याला मिठी मारली. 

“तुझे वडील असल्याचा मला अभिमान आहे, जयंत. तू एक फार चांगला माणूस आहेस. तू काय काम करतोस किंवा कुणाबरोबर राहतोस हे फारसं महत्त्वाचं नाही. पण एक समाधानी आयुष्य जगणं आणि इतरांना आनंद देणं महत्त्वाचं आहे. ते तुला चांगलं जमतं आहे… आणि इतकी वर्षं मला तुझी खूप आठवण येत होती. तुझ्या या वडिलांना विसरू नको आणि संपर्कात राहा.”

जयंत हसला. त्याने अमरला नेहमी आभासी भेटी देण्याचं कबूल केलं.

जयंत निघून गेल्यावर अमरच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला. इतक्या दिवसांनी मुलाला भेटल्याचा त्याला खूप आनंद झाला होता आणि तरी जयंतने आपलं मन उघड करून जे सांगितलं त्याने तो अस्वस्थ झाला होता. पुन्हा पुन्हा त्याचं मन नताशा आणि जयंतबरोबर घालवलेल्या कौटुंबिक दिवसांची आठवण काढू लागलं. ते आनंदात एकत्र राहिले होते तेव्हा. निदान अमरला तरी तसं वाटलं होतं. मग जयंतच्या मनात असा न्यूनगंड का तयार व्हावा? हे सगळं ओडंटाशी बोलण्यात अर्थ नव्हता. तिने कधीच मूल वाढवलं नव्हतं. कौटुंबिक जीवनाचे बारकावे तिला कसे समजणार? नताशाला फोन करावा का? पण एकदा का त्यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी चर्चा सुरू झाली, की ती काय काय म्हणेल याची त्याला सूक्ष्म काळजीदेखील वाटत होती. त्याच्या आयुष्यातील त्याला सर्वात पवित्र वाटणाऱ्या काळात अधिक खोल जाऊन त्याचे पदर उलगडण्यापेक्षा मैत्री राखून वरचेवर आभासी भेटी देणंच जास्त बरं होतं.

मग दुसऱ्या दिवशी अमर झिप्परमध्ये बसला आणि त्याने तिला गुरुत्वकण प्रयोगशाळेत जाण्याची आज्ञा दिली. मन मोकळं करायला त्याला एका मित्राची गरज होती.

—————————————————————————————————————————————–

आकडे आणि अक्षरांनी भरलेल्या स्क्रीनकडे काईजा एकाग्रपणे पाहत होता. तरीदेखील, आपल्या मित्राच्या आगमनाची चाहूल घेण्यासाठी त्याची दृष्टी मधून मधून  खिडकीकडे वळत होती. त्याला फार वेळ वाट नाही पाहावी लागली. थोड्याच वेळात त्याला अमर चालत येताना दिसला. पण नेहमीपेक्षा त्याचा प्रवेश फारच शांतपणे झाला आणि त्याचा चेहराही काळवंडलेला दिसला. एरव्ही या गोष्टींकडे फारसं लक्ष न देणाऱ्या काईजाच्या नजरेनेदेखील हे ताडलं, की अमर काही त्याच्या नेहमीच्या आनंदी मूडमध्ये नाही. 

“काय रे, अमर! तुझा फोन आल्यापासनं तुझी वाट बघतोय. बरा आहेस ना तू? कसल्यातरी काळजीत असल्यासारखा वाटतो आहेस.”

अमर हसला आणि त्याचं स्वागत करण्यासाठी उठण्याआधी काईजा ज्या खुर्चीत बसला होता तिच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन धपकन बसला. 

“मी ठीक आहे. उगाच भेटायचं होतं तुला.”

“थांब, तुझ्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येतो. आपण पीत पीत गप्पा मारू.”

“तू एक यंत्रमानव का ठेवत नाहीस?”

“माझी पेयं तयार करायला? मग माझंच एखाद्या यंत्रात रूपांतर होईल. छे! मला काहीतरी हालचाल पाहिजे ना!”

पाच मिनिटांत तो कॉफीचे दोन मग घेऊन आला आणि ते दोघे गप्पा मारायला बसले. अमरने त्याला जयंतच्या अनपेक्षित फोनबद्दल, त्याच्या भेटीबद्दल आणि त्यांच्या संभाषणाबद्दल सगळं सांगितलं.
 

“त्याला वाटतं, की त्याला माझ्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. असं का वाटावं त्याला? मी कधीच अपेक्षा लादणारा बाप नव्हतो. नताशा आणि मी नेहमीच त्याला त्याची आवड जोपासायला उत्तेजन द्यायचो आणि तो बुद्धिमान होता. मी त्याचा दोस्त नव्हतो असं का वाटतं त्याला?”

काईजा शांतपणे ऐकत होता. थोड्या वेळाने त्याने हळुवारपणे अमरच्या खांद्यावर हात ठेवला. 

“मी कधीच मूल वाढवलं नाही, अमर. त्यामुळे तुझ्या परिस्थितीवर भाष्य करायचा मला अधिकार नाही. पण मी तुला चांगला ओळखतो आणि मला वाटतं, की तू एक अत्यंत चांगला बाप होतास आणि नताशासाठी एक अत्यंत चांगला जोडीदार होतास. तुझ्या कौटुंबिक आयुष्याबद्दल तुला जे वाटतं ते खरं आहे. जयंतला जे वाटतं तेदेखील त्याच्यासाठी खरं असेल. पण त्यासाठी तू जबाबदार आहेस असं मला वाटत नाही. तुझ्या परीने तू सगळं काही उत्तम केलंस. आपल्या कृत्यांचे परिणाम नेहमीच आपल्या हातात नसतात. जयंतला काय वाटतं याची तू फार काळजी करू नयेस. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. कदाचित प्रत्येकाच्या मेंदूतल्या माहिती कणांच्या विशिष्ट रचनेचा तो परिणाम असेल. त्यातूनच वेगवेगळे स्वभाव तयार होत असावेत. जयंत काही तुझा जैविक मुलगा नाही. त्यामुळे घटनांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोण वेगळा असू शकतो. तुझ्या जनुकांचा वारसा त्याच्याकडे नसल्याने तुमचं बाप – लेकाचं नातं कमकुवत होतं असं मला म्हणायचं नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा, की एकाच परिस्थितीचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होतो. त्याला अधिक परिपक्वता आली, की तो तुला आणखी नीट समजून घेईल.”


मध्यरात्र उलटून गेली तरी त्यांच्या गप्पा चालू राहिल्या… त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, पृथ्वी प्रकल्पाबद्दल आणि कृष्णविवराच्या मोहिमेबद्दल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अमर निघाला तेव्हा त्याला खूप बरं वाटत होतं. सहानुभूती असणाऱ्या मित्रापाशी आपलं मन मोकळं केल्याने त्याच्या दुखऱ्या मनावरचं ओझं कमी झालं होतं. काईजाने नेहमीच त्याला  आधार दिला होता. काईजाच्या मनात असणाऱ्या आपल्या प्रतिमेविषयी काळजी न करता अमर मोकळेपणाने त्याच्याशी बोलू शकत असे. अशा गाढ मैत्रीचं सुख कदाचित थोड्याच लोकांना मिळतं. मानसिक आधाराची गरज असलेल्या कुणालातरी अशीच मदत करण्याचं अमरने ठरवलं. कदाचित, आपल्या मुलालाच.

________________________________________________________________________________________________________________


ताऱ्यांच्या मधील अवाढव्य अंतराळाच्या अंधारातून अवकाशयान दृढ गतीने पुढं चाललं होतं. ताऱ्यांचा प्रकाश ग्रहण करणारे त्याचे अँटिना आता पूर्णपणे उघडले होते, प्रत्यक्ष यानाच्या आकाराच्या दुप्पट त्यांचा आकार पसरला होता. यानाला त्याच्या निर्दिष्ट मार्गावर… जुन्या तारामंडळातील तिसऱ्या ग्रहाच्या दिशेने गतिमान ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा ते सतत पुरवत होते. यानातील सोळा प्रवासी त्याच्या पोटात खोलवर सुप्तावस्थेत होते – एका स्वप्नरहित अवस्थेत गुरगुटून झोपलेले. त्या अवस्थेत त्यांना ऊर्जा आणि प्राणवायू यांची अत्यंत कमी प्रमाणात आवश्यकता होती आणि यानातील उपकरणं नकळत त्यांच्या तब्येतीचं निरीक्षण करत होती आणि त्या संबंधीची माहिती स्वर्गावरील आकाशगंगा केंद्रात असलेल्या मोहिमेच्या मुख्यालयात पाठवत होती. नऊ महिन्यांची सुषुप्ती… नऊ महिने शून्य जाणिवेची पोकळी. त्यांच्या घरच्या ग्रहावर मात्र जीवन चालू असेल. पृथ्वीवर जाणाऱ्या पथकाचे सदस्य झोपलेले असतील तेव्हा त्यांच्या कुटुंबातले लोक आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी आपल्या आयुष्यातील चार वर्षं जगतील. त्या अवधीत अनेक बाळं जन्मतील आणि अनेक लहान मुलांचं बालपण संपून ती अकादमीत प्रवेश करतील. अनेक जण स्नातकोत्तर होऊन काम करू लागतील. अनेक नाती सुरू होतील आणि अनेक संपतील. अनेक जण अखेरच्या विश्रांतीत विलीन होतील. पथकातील सदस्यांना यापैकी काहीच कळणार नाही. त्यांना कळलं असतं तरी त्या घटना भरधाव वेगाने घडत असल्यासारख्या त्यांना भासल्या असत्या; कारण यानाच्या प्रचंड वेगामुळे त्यांचा स्वतःचा काळ संथ झाला होता… प्रकाशाच्या वेगाच्या जवळ पोचणारा त्यांचा वेग आणि त्यामुळे संथ झालेला त्यांचा काळ. त्यांचं यान सतत पुढे जात होतं… त्याच्या पूर्वनियोजित मार्गावरून… पृथ्वीकडे – जीवनाच्या आद्य मातेकडे.

______________________________________________________________________________________________________________

आरुषीच्या वडिलांना फोन करण्याचे फायदे आणि तोटे आरुषीच्या आईने त्या दिवशी शंभराव्यांदा मनात तोलून पाहिले. उच्च अभ्यासाच्या उजळणी शिबिरासाठी झेरुआ पर्वतावरील उच्च शिक्षण अकादमीत रॉल्फ दोन महिन्यांपूर्वी निघून गेल्यापासून ती एकटीच मजेत जगत होती. आता ती एक प्रस्थापित चित्रकार होती आणि आता तिला प्रशंसेची सवय झाली होती. आता प्रत्येक चित्राला ती जास्त वेळ देत होती, मनात कल्पिलेल्या चित्रकलेच्या सर्वोच्च नमुन्याशी त्याचं शक्य तितकं साम्य तयार होईपर्यंत. तिची नोकरीही अर्थात चालू होतीच; शिवाय तिच्या मित्रमैत्रिणींचं वर्तुळही विस्तारलं होतं. पण या मित्रमंडळींशी ज्या एका गोष्टीची विस्तृत चर्चा ती करू शकत नव्हती ती म्हणजे आरुषीचा पृथ्वीच्या दिशेने चालू असलेला प्रवास. 

प्रवासाचा अवधी जसजसा संपुष्टात येऊ लागला तसतसं तिचं मन आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि पृथ्वी मोहिमेवर कोणाशी तरी चर्चा करण्यासाठी अस्वस्थ होऊ लागलं… त्या मोहिमेमुळे मिळणाऱ्या संधी, त्यातील धोके, त्याचं महत्त्व. रॉल्फ आता निघून गेला होता आणि कधीकधी जेव्हा त्यांच्या आभासी भेटी होत तेव्हा त्याच्याशी पृथ्वी मोहिमेविषयी चर्चा करणं तिला योग्य वाटत नसे. मोहिमेच्या प्रवासाबद्दल आणि तिने आपल्या लेकीसाठी कोणते संदेश तयार ठेवले आहेत याविषयी तो अवश्य चौकशी करी पण ते एकत्र असतानाच या गोष्टींची त्यांनी अनेकदा चर्चा केलेली होती.  तेव्हा तो तिच्या भावनांचा आणि त्यांच्या आवेगाचा साक्षी असे आणि आता तो दूर गेल्यानंतर गोष्ट वेगळी होती. आता त्याचं संभाषण अधिक ठरावीक असे. 

पृथ्वी प्रकल्प नियमितपणे प्रकाशित करत असलेले अहवाल ती नेमाने वाचत होती. मोहिमेविषयी तिची काळजी आणि त्यात असलेला तिचा रस यात सहभागी होऊ शकेल अशी एकमेव व्यक्ती म्हणजे आरुषीचे वडील. आता मोहिमेच्या या टप्प्यावर प्रकल्पाविषयी त्याचं काय मत होतं हे तिला नक्की माहीत नव्हतं; पण त्यात नवीन काहीच नव्हतं. ते एकत्र होते त्या संपूर्ण कालावधीत त्यांच्या आयुष्यातील कोणत्याच मुद्द्याविषयी त्याला काय वाटत असे हे तिला कधीच ठामपणे माहीत नसे, किंवा तसं पाहिलं तर इतरही गोष्टींविषयी. काही काळ गेल्यावर आणि त्याच्या वागण्यातून सापडलेल्या धाग्यादोऱ्यांचे विश्लेषण केल्यावर तिला त्याच्या विचारांविषयी काही मत बनवता येई. मोकळेपणाने आपले विचार मांडण्याची त्याला सवयच नव्हती.

मोहिमेविषयीच म्हणायचं झालं तर त्याने त्याची पूर्वीची नापसंती त्यांच्या आभासी भेटींत कधी व्यक्त केली नव्हती. त्याला फोन करून आणि त्याच्याकडून ‘मला या विषयावर चर्चा करण्यात रस नाही’ हे ऐकून घेण्याचा धोका पत्करावा का? का एक डाव टाकून निदान तिचं त्याविषयी बोलणं तरी ऐकून घ्यायला तो तयार आहे का हे पाहावं? शेवटी तिने आपला कॉम हातात घेतला आणि त्याचं नाव उच्चारलं. कॉमचा बझर वाजला आणि मिनिटभरात तिचा भूतपूर्व जोडीदार स्क्रीनवर झळकला. 

“काय, कसं चाललंय?” त्याने नेहमीप्रमाणे विचारलं.

“छान. तुझं कसं चाललंय?”

“चांगलं चाललंय.”

“सध्या कुठे आहेस तू?”

“मी तेजोलयात आहे. तू कुठे असतेस?”

“मी एडनमध्येच आहे. किंबहुना आपण एकत्र कुटुंब म्हणून राहत होतो त्याच घरात मी परत राहायला आले आहे.”

“असंय होय? बरं.”

“तू कुणा जोडीदाराबरोबर राहतो आहेस, का एकटाच आहेस?”

“मला जोडीदार आहे पण आम्ही एकत्र राहत नाही. का विचारतेस?”

“नाही, मी विचार करत होते, की तू प्रत्यक्ष येऊन भेटू शकशील का? बरेच दिवस झाले आणि तुलाही आपल्या जुन्या घराला भेट द्यायला आवडेल.”

“खरं म्हणजे मी सध्या कामात फार व्यग्र आहे. एका फार महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करतो आहे.”

“बरं, ठीक आहे. मला आपलं वाटलं, की तुला भेटायला आवडेल. जाऊ दे. तुझ्या प्रकल्पाला शुभेच्छा.”

“तुझ्या चित्रकलेविषयी मी ऐकलं.”

“अरे वा! इथे चित्रं रंगवायला भरपूर जागा आहे. आरुषी पृथ्वीवर उतरेल तेव्हा माझं एखादं चित्र तिच्यापर्यंत पाठवायचा प्रयत्न करणार आहे मी. तिला खूप आनंद होईल.”

“कधी पोचणार आहे ती?”

“जवळ जवळ तीन महिन्यांनी. आता महिन्याभरात उठेल ती.”

“अस्सं!”

“बरं मग. ठेवते आता.”

आरुषीच्या आईला माहीत होतं, की त्याच्या मनात तिने थोडी का होईना पण उत्सुकता जागृत केली होती. तो येऊन भेटेल अशी तिला आशा होती… आणि आलाच तो – दुसऱ्याच दिवशी. ती संध्याप्राशन करत असताना तो उडत येऊन गच्चीवर उतरला. 

“तू येणार म्हणून सांगायला फोन नाही केलास.”

“येण्याचा काही बेत नव्हता माझा. पण माझं काम लवकर संपलं म्हणून मग विचार केला, की थोडा वेळ भेटून यावं.”

“कसा आलास?”

“मी या शहरात येणारी झिप्पर घेतली. आणि तिने मला जिथे सोडलं तिथून उडत आलो.”

आपले पंख दुमडून घेऊन तिच्या समोरच्या खुर्चीवर त्याला बसताना ती पाहत राहिली, प्राशन करत राहिली.

“तू येणार हे माहीत असतं तर तुझ्यासाठी पेय तयार ठेवलं असतं.”

“मला पाणी पण चालेल. खरंतर मला फार तहान लागली आहे.”

ती उठली आणि पाण्याच्या खोलीतून त्याच्यासाठी ग्लासभर पाणी घेऊन आली; शिवाय एक तांब्या भरून पाणी त्याच्यासमोर टेबलावर ठेवलं. हे तेच टेबल होतं ज्याच्या आजूबाजूला ते सगळे एक कुटुंब म्हणून बसायचे, आरुषीबरोबर, दररोज. त्यांची लेक छोटी होती ते दिवस तिला आठवले. आई-वडिलांबरोबर त्या टेबलाशी बसून प्राशन करायला लावल्यावर किती अस्वस्थ व्हायची ती आणि मग किशोर वयाची झाल्यावर कधीमधी होणारी तिची चिडचिड आणि अकादमीत जाण्यापूर्वीची तिच्या मनाची घालमेल. 

आरुषीच्या आईने ते घर बरंचसं तेव्हा होतं तसंच ठेवलं होतं. मागच्या दोन खोल्यांचं तिने तिच्या स्टुडिओत आणि चित्रशाळेत रूपांतर केलं होतं. तिचं नशीब म्हणजे त्यांनी ते घर सोडल्यानंतर जे लोक तिथे चार वर्षं राहिले त्यांनी त्या घराच्या अंतरंगात फारसा बदल केला नव्हता. सर्जनात्मकतेतून येणारं समाधान आणि स्वतःचं नैसर्गिक मूल जन्माला घालून आपण यशस्वीपणे तिला वाढवू शकलो ही जाणीव घेऊन तिथे आता राहायला तिला आवडत होतं आणि तिला विशेष समाधान याचं होतं, की तिची ती चाणाक्ष आणि प्रेमळ लेक अतिशय हुशार निपजली होती.

फ्रान्स्का खिडकीपाशी बसली होती आणि तिची दृष्टी पोचत होती तिथपर्यंत पसरलेल्या बागेकडे पहात होती. कोणताही अडथळा न येता बागेचं दृश्य दिसावं म्हणून तिने कोपऱ्यावरचं घर निवडलं होतं. तिथे पोचणं पण सोपं होतं, दोन्ही बाजूंनी गच्चीवर उडत येता येत होतं. रवीचा अस्त होण्याच्या बेतात होता आणि आकाशाचा रंग केशरी झाला होता… पूर्वेकडून येणाऱ्या रात्रीत जांभळा होऊन मिसळला होता. तिने एखादा तारा दिसतो आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण अजून एकही तारा उगवलेला नव्हता. दिवसाच्या या वेळी तिला नेहमीच उदास वाटायचं. तारिकची खूप आठवण यायची. ती नुकतीच तिच्या वाढदिवसाच्या पार्टीहून परतली होती आणि अनेक मित्रमैत्रिणींनी आणि प्रियजनांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. प्राशन करत, गाणी म्हणत, नाचत त्यांनी मस्त मजा केली होती. तिलापण छान वाटलं होतं, पण उडत परत येताना, तिच्या शेजारून उडताना तारिकच्या पंखांचा तिच्या पंखांना होणाऱ्या ओझरत्या स्पर्शाच्या आठवणीने ती व्याकूळ झाली होती. तारिक गेल्यापासून तिचे दोन प्रियकर होऊन गेले होते.  ते दोघेही अजून जिवंत होते. कॉमचं एक बटण दाबून किंवा तिच्या स्क्रीनला आज्ञा देऊन ती त्यांना आभासी भेट देऊ शकत होती. झिप्परने किंवा विमानाने प्रवास करून जाऊन त्यांच्या मिठीत सामावू शकत होती, कारण दोघांपैकी कोणीच करारबद्ध नव्हतं. 

पण तारिक मात्र निघून गेला होता. त्याला क्षणभर का होई ना पाहण्याची तिला कितीही इच्छा झाली तरी तिला ते करता येणार नव्हतं. आज तिला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाली होती. तारिकने जाण्याचा निर्णय घेतला तेच हे वय. पण शेवटचा निरोप घेण्याच्या दोन वर्षं आधीपासून त्याला जे वैराग्य आलं होतं त्याचा तिला स्वतःला अजूनही अनुभव आला नव्हता. तिला अजूनही जगण्यात आनंद वाटत होता, कामात रस होता. तिची मुदत संपल्यावर पृथ्वी प्रकल्प सोडल्यापासून तिचा वेळ सैद्धांतिक भौतिक शास्त्र आणि काही शिकवण्याचे तास यात जात असे. तिचं लेखन, मित्रमैत्रिणींच्या भेटी, करमणुकीचे कार्यक्रम, प्राशन… हे सगळं तिला अजूनही हवंहवंसं वाटत होतं. हे सगळं करण्यासाठी अगदी पूर्वीसारखा उत्साह नसला तरी तारिकच्या चेहऱ्यावर पाहिलेला अलिप्तपणा तिला स्वतःला अजून जाणवत नव्हता. 

“तुला काय वाटतं, तुझा आयुष्यातील रस एवढ्या लवकर का संपला असावा?”, त्याने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर तिने एकदा त्याला विचारलं होतं. 

“माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं आहे. आता काहीच उरलेलं नाही.”

त्याचं उत्तर तिला तेव्हा समजलं नव्हतं, आणि आताही समजत नव्हतं. त्याला जे म्हणायचं होतं ते तिथे होतं… क्षितिजाच्या पलीकडे, जिथे ती पोचू शकत नव्हती.

आयुष्य म्हणजे नेमकं काय? फ्रान्स्काच्या मनात विचार आला. अवस्थांची एक साखळी, तुम्हांला हवे असलेले सगळे अनुभव घेऊन होईपर्यंत… बालपण, मोठं होणं, शिक्षण, काम, सर्जन, प्रेम… आणि तिच्यासारख्या काही जणांसाठी पालकत्व. मग आयुष्याच्या चढणीवर एक पठार लागतं. मग तिथून पुढं फक्त मनाचं अखेरचं विघटन थोपविण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून ठेवत घालवलेली एकापाठोपाठ एक वर्षं. त्या पठारावर तारिक केव्हा पोचला होता? ती स्वतः तिच्या आयुष्याच्या पठारावर केव्हा पोचली होती? तिला वाटलं, की ती स्वर्गातील सर्वात भाग्यशाली स्त्री होती. स्वर्गातील रहिवाशांच्या आयुष्यात तसा काही फारसा फरक नव्हता म्हणा! तरीपण ती अशा भाग्यवान लोकांपैकी होती, की तिच्या पूर्वायुष्यातील कोणत्याच गोष्टीविषयी तिला दुःख नव्हतं. तिचं बालपण सुखात गेलं होतं, तिला उत्तम शिक्षण मिळालं होतं, तिने जुळवलेल्या नात्यांमध्ये तिला समाधान मिळालं होतं आणि तारिकसारखे फक्त काही लोक करू शकतात असं अद्भुत प्रेम तिला मिळालं होतं. त्यांच्या पालक कराराची वर्षं अत्यंत आनंदात गेली होती आणि मोठ्या प्रेमळपणे त्यांनी आपल्या मुलाला वाढवलं होतं. तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तर ती आणखी भाग्यवान ठरली होती. तिला केवळ स्वर्गावरच्या सर्वात प्रसिद्ध प्रकल्पात महत्त्वाची भूमिका मिळाली होती; एवढंच नव्हे तर तिला तारिकची सोबत पुन्हा तब्बल सात वर्षं अनुभवायला मिळाली होती. आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी तो इतर कुणाकडे न जाता तिच्याकडे परत आला होता. यापेक्षा आणखी काय मागू शकणार होती ती! तरीपण आत्ता तारिक तिच्याबरोबर असता तर! मग कदाचित आयुष्याचे रंग अधिक गहिरे वाटले असते.

तिने एक उसासा सोडला. मागचं आठवत बसण्यात काही फायदा नव्हता. आतासुद्धा तिचं आयुष्य चांगलं चाललं होतं. ती बाहेर गच्चीत येऊन उभी राहिली आणि तिने आकाशाकडे पाहिलं. हो, एक छोटासा तारा तिथे उगवला होता. अंधारणाऱ्या आकाशात मंद चमकत होता. 

“मी एक तारा होऊन तुझ्यावर लक्ष ठेवेन,”  तारिक म्हणाला होता. जुना वाक्प्रचार होता तो. खरा असायला हवा होता!

प्रकरण तेरावे समाप्त!

दोघांचं प्राशन चालू असताना ती आरुषीच्या वडिलांबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती. प्राशन झाल्यावर, तो सहज उठून स्टुडिओत आणि मग तिच्या चित्रशाळेत गेला. तिची सात चित्रं तिथे होती… काही पूर्ण झालेली, काही ती अजून रंगवत असलेली. तो न बोलता ती चित्रं पाहत राहिला… कोणतीही प्रतिक्रिया न देता. तिला तशी अपेक्षाही नव्हती. तो काही रॉल्फ नव्हता याची तिला पूर्ण कल्पना होती. रॉल्फने प्रत्येक चित्रावर काहीतरी प्रतिक्रिया दिली असती, ते चित्र काढायची स्फूर्ती कुठून मिळाली हे विचारलं असतं. तरीदेखील, रॉल्फचं प्रेम आणि त्याची सोबत तिला आवडत असली तरी, आरुषीच्या वडिलांशी तिचं भावनिक नातं अधिक जवळचं होतं. तिच्या लेकीपर्यंत पोचणारा तो एक दुवा होता आणि त्याचं नातं त्या नाळेशी जोडलेलं होतं. ते नातं प्रेमावर आधारित नव्हतं, स्नेहावर किंवा मैत्रीवर आधारितही नव्हतं. ते प्राचीन काळातील रक्ताच्या नात्यासारखं होतं. त्यातून आनंद मिळेलच याची खातरी नव्हती पण त्यातून सुटकाही नव्हती. एक अपरिहार्य, अनिवार्य असं नातं होतं ते. 

माणसं जेव्हा पृथ्वीवर राहत होती, तेव्हा त्यांना भावंडं असायची… त्यांच्या आई वडिलांची इतर मुलं. ते  त्यांचे भाऊ आणि बहिणी असायचे आणि ती नाती कधीच मिटवून टाकता येत नसत.  जोपर्यंत जिवंत असाल तोपर्यंत ती भावंडं त्यांचे भाऊ आणि बहिणी असत. तुमचं त्यांच्यावर प्रेम असो किंवा नसो, तुमचं त्यांच्याशी रक्ताचं नातं असायचं आणि त्याचे काही नियम आणि निष्ठा असायच्या. आयुष्यभर तुम्ही एक कुटुंब असायचात. आरुषीच्या वडिलांशी तिचं नातं तशा प्रकारचं होतं. तिला त्याची सोबत आवडो अथवा त्याच्या उपस्थितीत तिला चिंता वाटो, त्यांच्या नैसर्गिक अपत्यामुळे ती कायम त्याच्याशी जोडलेली राहणार होती. 

तो परत आला आणि प्राशनाच्या टेबलाशी बसला. ती त्याच्या समोर बसली.
 

“मग तू आरुषीला संदेश पाठवणार आहेस का, ती उठल्यावर तिला वाचायला?” त्याने विचारलं.

“हो. मी मागेच तो मोहिमेच्या मुख्यालयाला यानाकडे प्रक्षेपित करण्यासाठी पाठवून दिला आहे, म्हणजे आरुषी उठली, की तिला तो मिळेल.”

“संदेश तिच्यापर्यंत पोचायला किती वेळ लागेल?”

“दोन वर्षं प्रवास करून तो संदेश पोचला असेल. अवकाशयान आता आपल्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलं आहे. आता आपण त्यांना संदेश पाठवू शकणार नाही. पाठवला तरी तो त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत ते परतीच्या वाटेवर असतील.”

“हं…”

“तू पाठवला होतास का तिला संदेश? तिला आवडलं असतं तुझा निरोप ऐकायला.”

“ती सुप्तावस्थेत जाण्यापूर्वी पाठवला होता मी तिला निरोप.”

“त्याला साडेचार वर्षं झाली!”

“बघू.”

“ते त्या ग्रहावर उतरतील तेव्हा त्यांना तिथे काय दिसेल, कोण जाणे.”

“लोकांच्या मनात आता बराच संशय आहे. बहुतेक करून त्यांना तिथे काहीच मिळणार नाही. फक्त ओसाड जमीन. मला खातरी आहे, की ते लवकर परतण्याची परवानगी मागतील.”

“मला वाटतं त्यांना तिथे अरण्य आणि नद्या दिसतील… स्वर्गावर कधीही पाहायला मिळाल्या नसतील अशा. त्यांना प्राचीन मानवाने बांधलेल्या इमारती आणि रस्ते दिसतील. त्यांना किरणोत्सर्गातून वाचलेले प्राणी भेटतील.”

व्यापक कल्पनाशक्ती असलेल्या एखाद्या लहान मुलाकडे बघून हसावं तसे आरुषीचे वडील हसले. पण तिची आई बोलत राहिली. आपल्या लेकीचा पृथ्वीवरचा काळ खूप आनंदात जाईल, ती अनेक वस्तूंचा शोध लावेल अशी कल्पना करत राहिली… ती त्या प्रचंड ग्रहावर भटकेल, स्वर्गावर कधीही शिकायला मिळणार नाहीत अशा गोष्टी ती शिकेल… आयुष्यभर पुरेल असा अनुभव आपल्या लेकीला तिथे मिळेल आणि त्यामुळे संपूर्ण विश्वाविषयी तिला एक आगळा दृष्टिकोण प्राप्त होईल अशी कल्पना तिने केली. तो विशिष्ट दृष्टिकोण ती आपल्या मुलाला किंवा मुलीला देईल… जर तिने मूल वाढवायचं ठरवलं तर… आणि कोण जाणे… तो दृष्टिकोण आत्मसात करून ते मूल विश्वाच्या शोधयात्रेवर निघेल, आजच्या मानवाच्या क्षमतेच्या किंवा कल्पनेच्याही पलीकडे.

“नवल आहे नाही? भूतकाळाकडे बघून, उन्नयन काळाच्याही मागे जाऊन, इतिहासाचा अभ्यास करून, आपण भविष्यातील विज्ञानाकडे जातो आहोत. भूतकाळाकडून शिकून आपण उद्याची रहस्यं सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत!”

आरुषीच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे थोड्या वेळाने उत्तर दिलं.
 

“मला नाही वाटत या मोहिमेतून आपण काही शिकू. फारतर, पथकातील सदस्य जीवाश्मांचे काही नमुने गोळा करतील पण त्यांना काही ज्ञान मिळण्याची शक्यता नाही. साल्चर एक वेडा शास्त्रज्ञ आहे. जीवनाचं रहस्य जर पृथ्वीवर दडलेलं असतं तर, उन्नयनपूर्व मानवाने ते अनेक शतकांपूर्वीच शोधून काढलं असतं.”

“आपल्याकडे असलेलं ज्ञान नव्हतं त्यांच्याकडे. निदान आण्विक स्तरावरचं ज्ञान तरी नव्हतं. आपण जैविक अभियांत्रिकीत मिळवलेलं यश पाहा. आपण आता, एक ‘पंख असलेली’ आणि ‘प्रकाश संश्लेषणाची क्षमता असलेली’ जात आहोत. आपलं तंत्रज्ञान पाहा. आपल्या सगळ्या औद्योगिक वसाहती जवळच्या उपग्रहांवर आणि उल्कांवर आहेत आणि त्यामुळे आपला ग्रह उत्पादनाच्या घातक वायूंपासून सुरक्षित राहतो. आपली सर्जनात्मकता पहा. आपल्या राहण्याच्या आणि सार्वजनिक जागा कलात्मक आणि सुंदर आहेत, आपली करमणुकीची साधनं आपल्या इंद्रियांना सर्वोच्च आनंद देतील अशी आहेत आणि उच्च कोटीचं समाधान देणारी आहेत. आपण फक्त बुद्धीला चालना देणारी कामं करतो आणि सगळी कंटाळवाणी आणि श्रमाची कामं यंत्रांकडून किंवा यंत्रमानवांकडून करून घेतो. आयुष्याच्या शेवटापर्यंत आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं.”


“ही सगळी प्रगती अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये केलेल्या शास्त्रीय प्रयोगांमुळे शक्य झाली आहे… त्याग केलेल्या ग्रहावर परत जाण्यातून नाही.”

“खरं आहे, पण पृथ्वीवर करण्यासाठी योजलेले काही प्रयोग फार कल्पक आहेत. मुख्य म्हणजे त्या प्रयोगांतून निर्जीव पदार्थांपासून जिवंत पेशी तग धरून वाढू शकतील अशा जिवंत पेशी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जिथे पदार्थाचं निर्जीव अवस्थेतून सजीव अवस्थेत रूपांतर होतं आणि जीवन सुरू होतं ती सीमारेषा अभ्यासण्याचा तो प्रयत्न असेल.”

“पण पृथ्वीवर जाऊन ते अभ्यासण्याची काय गरज आहे हे मला अजूनही समजत नाही.”

“निदान आरुषीला इतिहासाचा अभ्यास करण्याची तरी चांगली संधी मिळावी.”

“हो, त्या अर्थाने तिची चांगली सहल घडेल.” ————————————————————————————————————————————————————————

फ्रान्स्का खिडकीपाशी बसली होती आणि तिची दृष्टी पोचत होती तिथपर्यंत पसरलेल्या बागेकडे पहात होती. कोणताही अडथळा न येता बागेचं दृश्य दिसावं म्हणून तिने कोपऱ्यावरचं घर निवडलं होतं. तिथे पोचणं पण सोपं होतं, दोन्ही बाजूंनी गच्चीवर उडत येता येत होतं. रवीचा अस्त होण्याच्या बेतात होता आणि आकाशाचा रंग केशरी झाला होता… पूर्वेकडून येणाऱ्या रात्रीत जांभळा होऊन मिसळला होता. तिने एखादा तारा दिसतो आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण अजून एकही तारा उगवलेला नव्हता. दिवसाच्या या वेळी तिला नेहमीच उदास वाटायचं. तारिकची खूप आठवण यायची. ती नुकतीच तिच्या वाढदिवसाच्या पार्टीहून परतली होती आणि अनेक मित्रमैत्रिणींनी आणि प्रियजनांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. प्राशन करत, गाणी म्हणत, नाचत त्यांनी मस्त मजा केली होती. तिलापण छान वाटलं होतं, पण उडत परत येताना, तिच्या शेजारून उडताना तारिकच्या पंखांचा तिच्या पंखांना होणाऱ्या ओझरत्या स्पर्शाच्या आठवणीने ती व्याकूळ झाली होती. तारिक गेल्यापासून तिचे दोन प्रियकर होऊन गेले होते.  ते दोघेही अजून जिवंत होते. कॉमचं एक बटण दाबून किंवा तिच्या स्क्रीनला आज्ञा देऊन ती त्यांना आभासी भेट देऊ शकत होती. झिप्परने किंवा विमानाने प्रवास करून जाऊन त्यांच्या मिठीत सामावू शकत होती, कारण दोघांपैकी कोणीच करारबद्ध नव्हतं. 

पण तारिक मात्र निघून गेला होता. त्याला क्षणभर का होई ना पाहण्याची तिला कितीही इच्छा झाली तरी तिला ते करता येणार नव्हतं. आज तिला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाली होती. तारिकने जाण्याचा निर्णय घेतला तेच हे वय. पण शेवटचा निरोप घेण्याच्या दोन वर्षं आधीपासून त्याला जे वैराग्य आलं होतं त्याचा तिला स्वतःला अजूनही अनुभव आला नव्हता. तिला अजूनही जगण्यात आनंद वाटत होता, कामात रस होता. तिची मुदत संपल्यावर पृथ्वी प्रकल्प सोडल्यापासून तिचा वेळ सैद्धांतिक भौतिक शास्त्र आणि काही शिकवण्याचे तास यात जात असे. तिचं लेखन, मित्रमैत्रिणींच्या भेटी, करमणुकीचे कार्यक्रम, प्राशन… हे सगळं तिला अजूनही हवंहवंसं वाटत होतं. हे सगळं करण्यासाठी अगदी पूर्वीसारखा उत्साह नसला तरी तारिकच्या चेहऱ्यावर पाहिलेला अलिप्तपणा तिला स्वतःला अजून जाणवत नव्हता. 

“तुला काय वाटतं, तुझा आयुष्यातील रस एवढ्या लवकर का संपला असावा?”, त्याने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर तिने एकदा त्याला विचारलं होतं. 

“माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं आहे. आता काहीच उरलेलं नाही.”

त्याचं उत्तर तिला तेव्हा समजलं नव्हतं, आणि आताही समजत नव्हतं. त्याला जे म्हणायचं होतं ते तिथे होतं… क्षितिजाच्या पलीकडे, जिथे ती पोचू शकत नव्हती.

आयुष्य म्हणजे नेमकं काय? फ्रान्स्काच्या मनात विचार आला. अवस्थांची एक साखळी, तुम्हांला हवे असलेले सगळे अनुभव घेऊन होईपर्यंत… बालपण, मोठं होणं, शिक्षण, काम, सर्जन, प्रेम… आणि तिच्यासारख्या काही जणांसाठी पालकत्व. मग आयुष्याच्या चढणीवर एक पठार लागतं. मग तिथून पुढं फक्त मनाचं अखेरचं विघटन थोपविण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून ठेवत घालवलेली एकापाठोपाठ एक वर्षं. त्या पठारावर तारिक केव्हा पोचला होता? ती स्वतः तिच्या आयुष्याच्या पठारावर केव्हा पोचली होती? तिला वाटलं, की ती स्वर्गातील सर्वात भाग्यशाली स्त्री होती. स्वर्गातील रहिवाशांच्या आयुष्यात तसा काही फारसा फरक नव्हता म्हणा! तरीपण ती अशा भाग्यवान लोकांपैकी होती, की तिच्या पूर्वायुष्यातील कोणत्याच गोष्टीविषयी तिला दुःख नव्हतं. तिचं बालपण सुखात गेलं होतं, तिला उत्तम शिक्षण मिळालं होतं, तिने जुळवलेल्या नात्यांमध्ये तिला समाधान मिळालं होतं आणि तारिकसारखे फक्त काही लोक करू शकतात असं अद्भुत प्रेम तिला मिळालं होतं. त्यांच्या पालक कराराची वर्षं अत्यंत आनंदात गेली होती आणि मोठ्या प्रेमळपणे त्यांनी आपल्या मुलाला वाढवलं होतं. तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तर ती आणखी भाग्यवान ठरली होती. तिला केवळ स्वर्गावरच्या सर्वात प्रसिद्ध प्रकल्पात महत्त्वाची भूमिका मिळाली होती; एवढंच नव्हे तर तिला तारिकची सोबत पुन्हा तब्बल सात वर्षं अनुभवायला मिळाली होती. आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी तो इतर कुणाकडे न जाता तिच्याकडे परत आला होता. यापेक्षा आणखी काय मागू शकणार होती ती! तरीपण आत्ता तारिक तिच्याबरोबर असता तर! मग कदाचित आयुष्याचे रंग अधिक गहिरे वाटले असते.

तिने एक उसासा सोडला. मागचं आठवत बसण्यात काही फायदा नव्हता. आतासुद्धा तिचं आयुष्य चांगलं चाललं होतं. ती बाहेर गच्चीत येऊन उभी राहिली आणि तिने आकाशाकडे पाहिलं. हो, एक छोटासा तारा तिथे उगवला होता. अंधारणाऱ्या आकाशात मंद चमकत होता. 

“मी एक तारा होऊन तुझ्यावर लक्ष ठेवेन,”  तारिक म्हणाला होता. जुना वाक्प्रचार होता तो. खरा असायला हवा होता!

प्रकरण तेरावे समाप्त!

Author

Leave a Reply