अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (९) 

 आकाशवाणीचं हे ….

                                             ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।

                                              वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’

(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)

भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या  जोरदार आक्रमणामुळे  आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते;  परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले.  स्वतःचे ॲप तयार केले.  विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व  विश्वासार्हता टिकवून आहे.  शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत. 

भाग ९

ध्वनी संग्रहालयाची श्रीमंती

२०१८ चा सुमार असावा. पुण्यात आकाशवाणी केंद्रात असाच एकदा नेहमीच्या कामात असताना हिंगण्याच्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे पदाधिकारी भेटायला आले. मला वाटलं, की असेल काही रुटीन काम; पण  त्या मंडळींपैकी एक जण म्हणाले,  ‘आमचं एक वेगळंच काम आह, एक-दोन दिवसांपूर्वी भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे जे भाषणआपण प्रसारित केलेत, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास आम्ही आलो आहोत.’ त्यांच्या या उद्गारांनी मी सुखावलो. हा प्रसंग प्रातिनिधिक आहे; कारण आकाशवाणीकडे जुन्या कार्यक्रमांचा, आवाजांचा जो खजिना ध्वनिसंग्रहालयाच्या रूपाने आहे, त्या संपत्तीला सांस्कृतिक – सामाजिक ऐवजच म्हणावे लागेल. हे ‘संचित’ एवढं दुर्मीळ आणि मूल्यवान आहे, की त्याला तोड नाही.

३७ वर्षं  महाराष्ट्रात विविध आकाशवाणी केंद्रांवर काम करताना मी ‘आर्काईव्हल व्हॅल्यू’ असलेला आशय अनेक श्रोत्यांना किती आवडतो, याचा अनेकदा अनुभव घेतला आहे.श्रोत्यांमध्येही असे विविध स्तर असतात – प्रत्येकाला आपल्या दृष्टिकोनातून याचे मोल असते. कोणी अभ्यासक असतो, कोणी शुद्ध श्रोता असतो ज्याचे जुन्या खजिन्यावर प्रेम असते,कोणाचा प्रबंध ‘संदर्भ’ मागत असतो आणि कधी अपवादात्मक नातेवाईक – संबंधित परिवार सदस्य असतात त्यांना तो आवाज हवा असतो, ऐकायचा असतो. अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानगर येथे असतानाही असे काही अनुभव माझ्या लक्षात राहिले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब भारदे यांची मुलाखत प्रसारित होताच शेवगावहून एक गृहस्थ त्यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण मिळावे म्हणून आले. त्यांना होणारा आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता.

पुढे तेथेच एकदा एक गृहस्थ भेटायला आले. कवी भा. रा. तांबे यांच्या साहित्य आणि जीवनावर नुकताच कार्यक्रम आम्ही केला होता; तो फार आवडल्याचे त्यांनी सांगितले. त्या गृहस्थांचा परिचय विचारला तर ते भा. रा. तांबे यांचे नातू असल्याचे सांगताच आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी मग त्यांची व्यवस्थापनाविषयक पुस्तकेही भेट दिली. पुणे केंद्रावरून अगदी अलीकडे २०१८ मध्ये संगीत-नाटक विषयक कार्यक्रम मालिका ‘मर्मबंधातली ठेव’ प्रसारित झाली. तिचे पुढे पुस्तकही झाले. (ले. यशश्री पुणेकर, अर्चना साने) या पार्श्वभूमीवर छोटा गंधर्व यांच्या कन्या सुलभाताई सौदागर भरत नाट्यमंदिरातील एका कार्यक्रमात भेटल्या. मधुवंतीताई दांडेकर यांनी त्यांची ओळख करून दिली, तेव्हा त्यांनी आकाशवाणीने संगीत नाटकाच्या लोकप्रियतेत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे असे समाधान व्यक्त केले. तेथे उपस्थित संगीत नाटक क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री निर्मलाताई गोगटे यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या.

या सर्व आठवणी सांगण्याचे कारण म्हणजे आकाशवाणीच्या ध्वनिसंग्रहालयाची श्रीमंती. १९२३ पासूनचे हे माध्यम असले तरी ध्वनिमुद्रण सांभाळण्याची सुरुवातीस फारपद्धत नव्हती. टेपची संख्या, जागा यांच्याही मर्यादा होत्या. लाईव्ह म्हणजे प्रत्यक्ष प्रसारणाची ही खूप वर्षे पद्धत होती. हळूहळू प्रत्यक्ष प्रसारणाचे (लाईव्ह ब्रॉडकास्ट) प्रमाण कमी झाले आणि कार्यक्रम अधिकाधिक ध्वनिमुद्रित स्वरूपातच प्रसारित होऊ लागले. लाईव्ह प्रसारणात ‘अमुक तमुक मुर्दाबाद’च्या घोषणा एका केंद्रावरील कार्यक्रमात अनपेक्षितपणे देण्यात आल्या होत्या. लाईव्ह प्रसारणातला हा खोडसाळपणा, धोका ओळखून त्याचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या शंभर वर्षांत सुरुवातीचे अनेक दुर्मीळ आवाज आज आकाशवाणीची ‘धरोहर’ –‘वारसा’ बनले आहेत. सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, शास्त्रीजी, विनोबा, गांधीजींपासून अनेकांचे मूळ आवाज आकाशवाणीकडे आहेत. साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारक त्याही बाबतीत दुर्लक्षित राहिले हे दुर्दैव. बहुमूल्य संग्रहित आवाजांची यादी फार रोचक आहे. अलीकडे जे.आर.डी. टाटा, हरिवंशराय बच्चन, रवींद्रनाथ टागोर यांच्या आवाजांबद्दलही रसिकांनी उत्सुकता दाखवलेली दिसते. विविधभारतीकडे तर खजिनाच आहे.

१९८०-९० मध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय ध्वनिसंग्रहालयासाठी आकाशवाणीने ‘अर्काइव्हल रेकॉर्डिंग’ची शिस्तबद्ध योजना कार्यान्वित केली होती. देशभरातील केंद्राकडून जिवंत मान्यवरांच्या ध्वनिमुद्रणाचे प्रस्ताव मागवण्यात आले. मराठीत यामध्ये भरपूर काम झाले. प्रत्येक मान्यवराचे अडीच ते साडेतीन तासांचे दुर्मीळ रेकॉर्डिंग करण्यात आले. कुसुमाग्रज, बाबासाहेब पुरंदरे, वसंत कानेटकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, राम  शेवाळकर अशा कितीतरी मान्यवरांचे आवाज आज उपलब्ध आहेत. शेकडो स्वातंत्र्यसैनिकांचे त्यांच्याच आवाजांतले अनुभवही आहेत. जसे आवाज सुरक्षित – संग्रहित करण्यात आले तशी शेकडो नाटकं, रूपकं, मुलाखती याही सांभाळण्यात आल्या. जळगाव केंद्राकडे व्यावसायिक रंगभूमीवरील कित्येक गाजलेली नाटके मूळ कलाकारांच्या संचात ध्वनिमुद्रित आहेत. संगीत नाटकंही आहेत. ययाति-देवयानी, मृत्युंजय, थँक्यू मिस्टर ग्लाड, रायगडला जेव्हा जाग येते, तो मी नव्हेच या नाटकांच्या ध्वनिमुद्रित टेप्स १९८४ मध्ये पाहिलेल्या मला आजही आठवतात.प्रभाकर पणशीकर, बाळ धुरी, फैयाज, रमेश भाटकर या मंडळींचे तासन्‌तास स्टुडिओत असणे हा निर्मिती टीमच्या आनंदाचा भाग होता.औरंगाबादकडे लक्ष्मण देशपांडे यांचे ओरिजनल ‘वऱ्हाड  निघाले लंडनला’ ध्वनिमुद्रित आहे.एक परंपरा म्हणून बरेचदा दीपावलीच्या विशेष प्रसारणात ही नाटकं लावली जातात.

सांगली, पुणे, मुंबई, नागपूर केंद्रांनीही याबाबतीत भरपूर योगदान दिले आहे. फक्त खंतएवढीच, की या श्रीमंत खजिन्याची द्वारे फार कमी वेळा उघडली जातात. वाग्धनाची ही श्रीमंती श्रोत्यांवर वारंवार उधळायला हवी. ‘कोरोना’ काळातील दोन वर्षं ध्वनिसंग्रहालयाचा भरपूर वापर आकाशवाणी केंद्रांनी केला. पुनःप्रत्ययाचा आनंद श्रोत्यांनाही हवा असतो. स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, जानकीबाई तेंडुलकर, दादासाहेब शिखरे, वामनराव चोरघडे यांच्या मुलाखती ऐकायला कोणालाही आवडेलच की!

महाराष्ट्राच्या प्रादेशिक लोकसंगीताचे वैभवदेखील ध्वनिसंग्रहालयाचे अद्भुत वैशिष्ट्यच आहे. खानदेशी वही गीते, कोकणातील नमनखेळे, जात्यावरच्या ओव्या, भारुडे, ओवीगीते, सण-वार-जन्म-मृत्यू प्रसंगी गायली जाणारी गाणी, धर्मप्रार्थना असे कितीतरी श्रवणीय यात आहे. यांतली बरीच गाणी मौखिक परंपरेतली असतात. देशपातळीवरील शेकडो तासांचे ध्वनिमुद्रण ‘संस्कार गीते’ रूपात संग्रहित करण्यात आले आहे. श्रोत्यांपर्यंत ही गंगा पोहोचायला हवी. अभ्यासकांनाही संदर्भास्तव ऐकण्याची सोय हवी. या ध्वनिमुद्रणांवर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. जनतेच्या या पैशांची परतफेड शिस्तबद्ध पुनःप्रसारणातूनच होईल.

मला आठवते, की २०१८ च्या सुमारास महाराष्ट्रातील केंद्रांनी आपल्याकडील दुर्मीळ कार्यक्रमांची (अर्काइव्हल व्हॅल्यू प्रोग्रॅम) सूची तयार केली होती. सुमारे ५०० हून अधिक कार्यक्रमांचे विवरण त्यात होते. पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. यशवंतबुवा जोशी, मास्टर कृष्णराव, उस्ताद हफीज अहमद, उस्ताद अल्लारखा साहेब, मन्ना डे आदि दिग्गजगायकांच्या मुलाखती, भाषणे ही केवढी दुर्लभ गोष्ट आकाशवाणीकडे आहे. माणिक वर्मा,बबनराव हळदणकर, शाहीर साबळे, शोभा गुर्टू, पंडित जसराजजी अशी कितीतरी नावे घेता येतील. रत्नाकर मतकरी यांनी दीड तासापेक्षा अधिक वेळ सांगितलेले रंगभूमीचे किस्से आहेत. य. दि. फडके, शाहीर पिराजीराव सरनाईक, जयमला शिलेदार, विठ्ठल शिंदे, लतादीदी, आशाबाई, सुधीर फडके, हिराबाई बडोदेकर अशी कितीतरी नावे घ्यावीत.

अशाच प्रकारे भारतभूमीला अभिमान ठरलेले जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे, नर्तक उदय शंकर, क्रिकेकपटू सौरव गांगुली या सर्वांचे कितीतरी दुर्मीळ आणि उपयुक्त ध्वनिमुद्रण बंगाली तसंच इंग्रजीमध्ये कोलकता केंद्राकडे आहे. मुंबईकडे जे. आर. डी. टाटा, गुलजार आदींच्या जीवनकहाण्या त्यांच्या आवाजांत ध्वनिमुद्रित आहेत. खरेतर या सर्वच ध्वनिमुद्रणांत एक सांस्कृतिक – सामाजिक इतिहास दडलेला आहे.विविध भारतीकडचा खजिना तर अचंबित करणारा आहे. नौशादजी, मीनाकुमारी, मन्ना डे, वैजयंतीमाला, अमिताभ बच्चन आदि कित्येक कलाकारांनी सीमेवरच्या सैनिकांसाठी‘फौजी भाईयों के लिए’ सादर केला आहे. आपल्या आवडीची गाणी सादर करतानाश्रोत्यांच्या मनात देशभक्तीचा जल्लोश भरला आहे. काहींच्या जीवन कहाण्याही मांडल्या गेल्या आहेत. 

मी एकदा दिल्ली आकाशवाणीच्या केंद्र संचालकांना भेटायला गेलो असता त्यांच्या केबिनमध्ये देवानंदजी बसले होते. माझ्या आवडत्या गाईड चित्रपटाच्या नायकाला मी पाहत होतो. औपचारिक ओळख होत असताना रेडिओविषयीचे देवानंद यांचे ममत्व जाणवत होते.या सर्वांचे ध्वनिमुद्रण खरेतर त्या त्या क्षेत्राचा संक्षिप्त इतिहासच आहे. कला आणि संस्कृतिसंबंधी ध्वनिरूपातला हा दस्तऐवज नियमित खुला होत राहावा. असे झाले तरच त्याच्या अस्तित्वाला अर्थ राहील. समाजाला आपल्या श्रीमंत परंपरेची जाणीव राहील; अन्यथा या ध्वनिसंग्रहालयाचे ‘मोठ्या रुग्णालयातील शवागार’ व्हायला वेळ लागणारनाही. आता समाजमाध्यमावर आकाशवाणीचा बराच आशय ‘टाकला’ जाऊ लागलाय.हजारो श्रोते ह्याचा फायदादेखील घेत आहेत. या नवमाध्यम स्पर्शामुळेही आकाशवाणीच्या दीर्घ आयुष्यास हातभार लागणार आहे.

* * * * *

अभिनेता अमिताभ,संगीतकार खैयाम साहेबांनी सादर केलेले जयमाला सारखे कार्यक्रम आजही श्रोत्यांना ऐकावे वाटतात.

केवळ शास्त्रीय संगीत किंवा भावगीतेच न्हवे. तर देशभक्तीपर गीतांची महेफिल सुद्धा आकाशवाणीने सादर केली. श्रोत्यांच्या मनात जल्लोष भरणारी अनेक देशभक्तीची गाणी ध्वनीमुद्रित करून ती जतन केली गेली आहेत.

श्रोत्यांना श्रीमंत श्रवण अनुभव देणारी ध्वनीमुद्रणं. पोवाडे सादर करताना शाहीर विठ्ठल उमप आणि विज्ञान संशोधन समजावून सांगताना डॉ. जयंत नारळीकर

Author

Leave a Reply