कविता : फेब्रुवारी २०२६ 

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे 

गेली काही वर्षे 

हळूहळू पण सारखे सारखे 

असेच वाटत राहते 

की येणाऱ्या प्रत्येक क्षणाक्षणात  पूर्वी 

विविधतांच्या सहअस्तित्वात नटलेला आणि रमलेला 

माझ्या कल्पनेतील शांत भारत 

आज अशांत,अस्वस्थ आणि उदास आहे 

पदोपदी तो मृत्यूच्या उरलेल्या घटका मोजत आहे 

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे 

माझ्या भारतातील धर्मसहिष्णुता 

आज बधिर झाली आहे की हरपली आहे 

ते काळच पुढे ठरवेल 

आज मात्र ती 

झुंडशाहीच्या ताब्यात गहाण पडलेली आहे 

भारताला संवेदनशीलता, मार्दव, बंधुत्व, आर्यता  

आणि सभ्यतेतील आदरभावाचा कोठेतरी

विसर पडला आहे 

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे 

धार्मिक उन्माद आणि वांशिक तिरस्कार 

अशा कह्यात न राहणाऱ्या 

दुष्टचक्रातून गरगरत 

आता  किती महम्मद अखलाक, जुनैद खान आणि एंजेल चकमांच्या 

आहुत्या पुढे या धगधगत्या अग्नीत पडणार आहेत याची कल्पना 

करणेसुद्धा अशक्य आहे 

आता धर्म,वंश आणि जातिभेद 

वर्षानुवर्षे पेरलेल्या विषासारखा पसरला आहे  

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे 

बरेचदा अस्वस्थ मनाला 

एक प्रश्न अनेकदा भेडसावून सोडतो… 

जिथे ढोंगी साधू

आणि गुंड नेते 

अबलांवर बलात्कार करूनही 

स्वागताचे हार घालून मिरवतात 

अशा सडलेल्या समाजात 

पीडित महिलांच्या दैन्यावस्थेला 

कसा आणि कधी मिळेल प्रामाणिक न्याय ?

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे 

आज घोर अन्यायाचे अग्निदिव्य पेलताना 

सतत होरपळत 

जाणाऱ्या बंधुभगिनींना

अगतिक होऊन पाहत बसलेल्या बघ्यांचा आत्मा 

निर्दयतेच्या भोवऱ्यात नक्की  पिचून गेलेला आहे 

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे 

अलीकडे मनःचक्षूंसमोर वारंवार दिसतात 

बहिऱ्या, मुक्या,अर्धमेल्या आणि 

पसरत जाणाऱ्या भीतिग्रस्त  लोकांना 

एका भयाण शांततेच्या अंधारात 

गुदमरून टाकीत 

सहजपणे गिळंकृत करणाऱ्या असह्य लाटा 

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे 

माजी कुलगुरू, अलाहाबाद  विद्यापीठ. 

Author

Leave a Reply