


श्री.ध्रुव भट्ट
यांचा जन्म ८ मे १९४७ रोजी गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील निंगाला येथे झाला. ध्रुव भट्ट हे गुजराती साहित्य विश्वात एक प्रसिद्ध कादंबरीकार, कवी आणि निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साहित्यात निसर्ग, समुद्र आणि मानवी जीवनातील गूढता यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. ध्रुव भट्ट यांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ध्रुव भट्ट यांनी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत, त्यांपैकी काही प्रमुख पुस्तके खालीलप्रमाणे आहेत :
समुद्रांतिके, अकुपार, तत्त्वमसि अतरापि, तिमिरपंथी, कर्णलोक.
*१९९८ मध्ये, त्यांच्या ‘तत्त्वमसि’ कादंबरीस साहित्य अकादमी, दिल्लीकडून पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता.
*याशिवाय, त्यांना गुजरात सरकारच्या साहित्य अकादमीकडूनही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
डाव रंगला… ही ध्रुव भट्टांची सुषमा शाळिग्राम यांनी अनुवादित केली चौथी कादंबरी आहे. या कादंबरीविषयी सांगताना त्या लिहितात,
मूळ गुजराती पुस्तकाचे नाव आहे, ‘आजुखेले.’ आजुखेले म्हणजे ह्या वेळी, आत्ताच्या ह्या डावात. आपल्या लहानपणी, लहान मुले मैदानात एखादा खेळ खेळत असताना, ‘हा डाव’ – ‘आजचा खेळ’ या अर्थी ‘आजुखेले’ हा शब्द वापरत असत; परंतु आता हा शब्द जवळजवळ लुप्तच झाला आहे असे लेखकाने म्हटले आहे.
‘आजुखेले’ ही कादंबरी आहे की जीवनकथा आहे हे सांगणे कठीण आहे. लेखकाने स्वतःच म्हटल्याप्रमाणे, ही ‘स्मरण-कथा’ आहे. जगाच्या रंगमंचावर आपण सारे आयुष्याचा खेळ खेळत असतो. हा ‘डाव रंगला’ असताना, जरासे मागे वळून बघताना, लेखकाच्या हाती काय लागले त्याची ही ‘स्मृति-कथा’ आहे. जीवन जगता जगता नकळत, अनायास केलेल्या जीवनभाष्याचे कथन आहे. छोट्या छोट्या प्रसंगांतून गवसलेल्या शहाणिवेची मनोरम गुंफण आहे. शैशवापासून आत्तापर्यंतच्या अनेक घटनांची, मोठे होत असताना आलेल्या अनुभवसमृद्धतेची कथा आहे. त्या कथेतून घडत जाणारी आणि उलगडत जाणारी आत्मकथा आहे.
व्यक्ती जन्म घेते, परंतु व्यक्तिमत्त्व संस्कारांमुळे घडते. रोजच्या जीवनप्रवाहात वेळोवेळी टिपलेल्या संस्कारक्षणांनी घडत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यासोबतच समाजजीवनाचे दर्शन आपसूकच घडवणारे हे चित्रण आहे.
जगाच्या शाळेत आणि शाळेबाहेरच्या जगात घेतलेले शिक्षण, शालेय पाठ्यपुस्तकांपेक्षा जगाच्या शाळेने शिकवलेले धडे लेखकाला अधिक ग्राह्य का वाटले, याचे ते जाता जाता, सहज स्पष्टीकरण देतात. त्यातूनच, आपल्याला हवे ते, हव्या त्याच प्रकारे व्यक्त करणाऱ्या त्यांच्यातल्या लेखकाचा उगम कसा झाला ते उलगडत जाते.
बालपणीच्या साध्या, सर्वसामान्य घटनांच्या माध्यमातून वाढत जाणारी, भोवतालच्या जगाची आणि जगण्याची होत जाणारी जाणीव आणि त्या जाणिवेतून येणारी जीवनाची जाण यांची लेखकाने अत्यंत सरल शब्दांत मांडणी केली आहे.
मुलांना वाढविण्याची, मुलांवर संस्कार करण्याची त्यांच्या आईची अनाग्रही पद्धत, तिचा मुलांवरचा प्रभाव, त्यामुळे त्यांचे घडलेले व्यक्तिमत्त्व अप्रत्यक्षपणे, नेमके लक्षात येते. जगाच्या मंचावर स्वतःच स्वतःचे अनुभव घेत ‘शहाणे’ होण्याच्या या प्रवासात आई-वडील, आजोबा इत्यादी ‘पालकांनी’ कधी कशाला मनाई केली नाही; कधी कशाची भलावण अथवा सक्तीही केली नाही. त्यातूनच आपला स्वभाव कसा घडत गेला, पुढे जाता, त्यातूनच एक ‘हट के’ लेखक कसा निर्माण झाला त्याचे हे नितांत सुंदर चित्रण आहे. चारचौघांमध्ये राहून, त्यांच्यातलाच एक असूनही स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य कसे फुलत गेले त्याची ही कथा आहे. जीवनमूल्यांची जपणूक करणारे, पण आपण असे काही विशेष करत आहोत याची जाणीव नसलेले निरागस ग्रामीण जीवन ध्रुव भट्टांना नेहमीच भावले आहे. या पुस्तकातही नेमक्या आणि खुमासदार शैलीत त्याचा प्रत्यय येतो. एखादा अनुभव जितका जास्त वैयक्तिक असतो, तितका तो वैश्विक होत जातो. हे अनुभव सगळ्यांच्या मनाला स्पर्शून जातात कारण थोड्याफार फरकाने तुम्ही-आम्हीसुद्धा त्यांतून गेलेले असतो. त्या अनुभवांतून निघणारे सार वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यात लेखकाचे यश सामावले आहे.
कथाविषय, मांडणी आणि शैली या दृष्टीने ध्रुव भट्टांची सर्वच पुस्तके ‘हट के’ म्हणावीत अशी आहेत. त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद करणे हादेखील एक सुखद अनुभव असतो. ‘आजुखेले’ने मात्र मला या वेळी अत्यंत अनोखा, शब्दांत मांडता न येणारा, विशेष आनंद दिला याचा उल्लेख करणे उचितच ठरेल. तो आनंद वाचकांपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे.
