‘फडक्यांच्या शब्दांत फडके’
आत्मनिवेदनात्मक इ. वाङ्मय


पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ
पु. रा. भिडे आणि कंपनी लक्ष्मी रोड पुणे २ हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत आणि संपादन केले आहे आनंद नारायण नारळकर व कृष्णाजी गणेश भागवत यांनी. ही या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आहे . मे १९४० हे प्रसिद्धीचे साल व महिना आणि किंमत आहे बारा आणे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाच्या संमेलनाला सन्माननीय पाहुणे म्हणून प्राध्यापक ना. सी. फडके आले होते. संपादकद्वयांना प्राध्यापक फडके यांचे वाङ्मय वाचत असताना त्यामध्ये ठिकठिकाणी आत्मचरित्राचे पडसाद उमटत आहेत असे वाटत होते. यावरून त्यांच्याच शब्दांत त्यांचे व्यक्तिदर्शन करण्याची कल्पना सुचली. शाळेच्या उपरोल्लेखित कार्यक्रमाला प्राध्यापक फडके आले असताना मुख्याध्यापक नारळकर यांनी या कल्पनेचा पुरस्कार केला व संपादकांना प्रोत्साहित केले. प्राध्यापक फडके यांनाही ही कल्पना नावीन्यपूर्ण वाटली आणि त्यांनी या पुस्तकाला आनंदाने परवानगी दिली.
पुस्तक १९४० सालचे आहे. त्या वेळचे राजकीय वातावरण डोळ्यांसमोर आणले, की पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘सर्व पुस्तक स्वदेशी कागदावर’ असा जो शेरा आहे त्याचा अर्थ लागतो. पुस्तक प्रसिद्ध होतेवेळी श्री.नारायण सीताराम फडके हे राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. पुस्तकात शेवटी त्यांचा तोपर्यंत प्रसिद्ध झालेला लेखनसंभार प्रसिद्ध केला आहे.

हे पुस्तक ना. सी. फडके यांनी ‘प्रिय नू. म. विद्यालयास’ अर्पण केले आहे.
संपादकीय टिपणीत सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच लिखाणाचा आधार घेत एकंदरीत सहा विषय मांडले आहेत :
१ बालपण
२ कॉलेजमध्ये
३ भाषाशैली
४ खेळांची आवड
५ संगीत प्रेम
६ जीवनाकडे बघण्याची दृष्टी
हे ते सहा विषय आहेत.
बॅरिस्टर जयकर यांचे वक्तृत्व हा प्राध्यापक फडके यांच्यापुढचा आदर्श. यांच्यासारखे बोलता आले पाहिजे म्हणून वक्तृत्वाची आराधना करता करता व परिस्थितीची निकड म्हणून त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. प्रतिभा जन्मतः लाभते अशी जरी आपली धारणा असली तरी प्रतिभेचे योग्य ते संस्करण करणे अत्यंत आवश्यक असते असे त्यांचे मत त्यांनी या पुस्तकात व्यक्त केले आहे. ध्येयाचा प्रकाश फार प्रखर नसावा, त्या प्रकाशात वास्तवाचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल आणि त्या वास्तवातल्या निरगाठी सोडविता येतील इतक्या बेताचाच तो असावा हे त्यांचे मत अत्यंत मार्मिक आहे. त्यांनी या पुस्तकात कलेची सोपी व्याख्या सांगितली आहे : “जी दिसते सोपी, पण असते कठीण ती कला,” ही ती व्याख्या. प्रतिभासंपन्न व्यक्तींनाही कलेच्या तंत्राचा रीतसर अभ्यास करणे आवश्यक असते. ललित लेखन हादेखील एक कलाप्रकार आहे आणि याचा आद्य हेतू सौंदर्यनिर्मितीच्या द्वारे लोकांना पुनःप्रत्ययाच्या आनंदाचा अनुभव देणे हा होय. अश्लील वाङ्मयाची उपेक्षा करणे हाच सुज्ञांचा मार्ग असावा. हा मार्ग सगळ्यांनी अवलंबिला तर अश्लीलतेचे खटले कायमचे निकालात निघतील हे त्यांचे मत.
क्रिकेट आणि हॉकी हे प्राध्यापक फडके यांचे आवडते खेळ. ध्यानचंद आणि दुलीपसिंह हे त्यांचे आवडते खेळाडू. या दोघांच्या नजाकतदार शैलीचे अत्यंत प्रत्ययकारी वर्णन त्यांनी ठिकठिकाणी केले आहे; मात्र दुलिपसिंह हे नाव या पुस्तकात धुलीपसिंग असे लिहिण्यात आले आहे : ‘धावा काढावयाच्या वेळी ते सशाच्या वेगाने धावत असत; पण ज्या वेळी टोला लांब गेला असेल व एकच धाव काढावयाची असेल त्या वेळी दिवाणखान्यात चालावे अशा सावकाशीने आणि रमतगमत चालत ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात.’ एक राजपुत्र आपल्या दिवाणखान्यात चहलकदमी करतो आहे असे दृश्य डोळ्यासमोर येते ना? ‘व्हायोलिन वाजवणाऱ्याच्या हातातील गज हलावा तितक्या डौलाने व सफाईने धुलीपसिंगाच्या हातातील बॅट हाले आणि या सफाई प्रमाणेच जेथे उघडी जागा दिसेल तेथेच नेमका टोला देण्याची चतुराई( प्लेसिंग) त्यांच्या अंगी विशेष दिसली. त्यांचा फटका पाहिला म्हणजे तर एखादा पर्शियन तलम गालिचा उलगडत गेल्याचा भास होतो आणि स्लिपमधील फिल्डर्समधून मारलेले त्यांचे लेग-कटचे तडाखे तर आडतालाला वळसे घालून जाणाऱ्या गायकाच्या सुरेल तानेइतके गोड वाटतात.’ दुलीपसिंह यांच्या खेळाचे किती चित्रमय वर्णन!
प्रोफेसर फडके यांनी लिहिलेल्या चरित्रांमध्ये टेरेन्स मॅक्स्विनी हे नाव आहे. जेव्हा भारतात स्वातंत्र्य चळवळ चालू होती त्याच वेळेला आयर्लंडदेखील इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते. ब्रिटिश राजसत्तेला आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी आव्हान देणाऱ्या आयरिश लोकांत टेरेन्स अग्रणी होते. त्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून राजद्रोहाच्या आरोपाखाली ब्रेक्सटन येथील तुरुंगात टाकले होते. तेथे त्यांनी इतर राजकीय कैद्यांच्यासोबत आमरण उपोषण आरंभले. उपोषणाच्या ७४व्या दिवशी त्यांचे निधन झाले.
हंगर स्ट्राईकर्स मेमोरियल ग्लासनेविन स्मशानभूमी डब्लिन

प्रोफेसर फडके यांच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाबाबत एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. सुख हे मानण्यावर आहे असे म्हणतात; फडके आयुष्यात जे सुख उपभोगीत नाहीत त्याची चित्रे ते कल्पना सृष्टीत रंगवितात या शेऱ्याने या प्रकरणाची सुरुवात आहे.
पुस्तक संपते ते फडक्यांनी सांगितलेल्या एका आख्यायिकेने :
एका विख्यात इंग्रज कादंबरीकाराला एकदा एक मैत्रीण म्हणाली,
“तुम्ही एकदा आपलं आत्मचरित्र लिहा.”
यावर तो कादंबरीकार म्हणाला,
“मग आजपर्यंत मी दुसरं काय लिहिले आहे अशी तुमची कल्पना आहे?”
