अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला, की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण सातवे .
– संपादक
पुनरपि जननं
प्रकरण सातवे
अकादमी

गुरुत्वकण प्रयोगशाळेला लागून असलेल्या काईजाच्या घरात अमरने प्रवेश केला आणि हलकेच एक शीळ त्याच्या तोंडून निघाली. आता ते नुसतं एक घर नव्हतं. अमरच्या मते तो एक राजवाडाच होता. काईजाच्या आवतीभोवती झालेला बदल बघून त्याला आश्चर्य वाटलं. मग त्याला आठवलं, की आपण पृथ्वी प्रकल्पाच्या कामात पूर्णपणे गढून गेलो त्यापूर्वी काईजा जसा भिडस्त आणि एकलकोंडा होता तसा तो आता राहिलेला नाही. आता ते एक नावाजलेला शास्त्रज्ञ आहे. अमरने असंही ऐकलं होतं, की आता त्याला बऱ्याच मैत्रिणी होत्या आणि या प्रयोगशाळेच्या आवारात तो एक उत्सवमूर्ती होता. हे सगळं ऐकून अमरला अर्थातच आनंद झाला होता आणि काईजाला चिडवून त्याच्याकडून आणखी माहिती काढून घेण्याचं त्याने ठरवलं होतं. पण त्याला काईजा कुठेच आढळला नाही. इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्याच्या इलेक्ट्रॉनिक दाराने अमरला आत प्रवेश करू दिला होता. त्या अर्थी त्याचा मित्र परत येईपर्यंत त्याला तिथे थांबण्याची परवानगी होती असं अमरने गृहीत धरलं. काही आकडेमोड करत असताना मध्येच उठून काईजा संध्याकाळची एखादी भरारी मारायला गेला असावा असं वाटत होतं. त्याचा कामाचा रुपेरी पडदा निद्रावस्थेत होता आणि त्याचा कॉफीचा रिकामा मग अजूनही गरम होता. त्यामुळे काईजाच्या कॉमवर फोन करण्याऐवजी अमरने त्याची वाट पाहत थांबायचे ठरवले, म्हणजे तो आल्यावर त्याला चकित करता येणार होते.
पंधरा मिनिटांनंतर काईजा जेव्हा आत आला तेव्हा अमरला त्याच्या दिवाणखान्यात बसलेला बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. मित्राला मिठी मारायला अमर उठून आला.
“हे काय अमर! तू असा अचानक कुठून टपकलास? तेही कोणतीही पूर्वसूचना न देता!” अचानक मिळालेल्या या आश्चर्याच्या धक्क्याने झालेली अस्वस्थता लपवत काईजा म्हणाला.
“मला बघून तुला आनंद नाही झाला?”, अमरने त्याच्या समोरच्या खुर्चीत धपकन बसणाऱ्या आपल्या मित्राला विचारले.
“कुठल्यातरी फालतू प्रकल्पात वर्षानुवर्षं डोकं खुपसून बसल्यानंतर जेव्हा लोक अचानक शून्यातून टपकतात तेव्हा काय म्हणावं ते मला समजत नाही.”
“काय हे काईजा! इतका कशाला आळ घेतोस? तू पण आपल्या प्रसिद्धीत व्यग्र होतास. घर बघ तुझं! त्याचा एक रंगमहाल झालाय. दिवाणखान्याच्या मधोमध पोहायचा तलाव, ढगांची पार्श्वभूमी असलेली झोपायची खोली आणि ढगांत तरंगणारा पलंग… तूतर एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्यासारखा राहतो आहेस. किती मैत्रिणी आहेत तुला?”
“आता काय सांगू तुला! त्यांना जेव्हा माझ्या तारांकित अस्तित्वाची चव चाखायची असते, तेव्हा येतात त्या. मी आपला एकटाच बरा आहे.”
हा खरा पूर्वीचा काईजा, स्वतःशीच हसत अमर मनात म्हणाला.
“बरं, मला सांग अमर, त्या म्हाताऱ्याच्या तावडीतून कसा सुटून आलास तू? का त्याला त्याची चूक उमगल्याने त्याने तो प्रकल्प स्थगित केला?”
“चक्… चक्…,” अमर निषेधाने म्हणाला. “पृथ्वी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पुढचा टप्पा सुरू होण्यापूर्वी प्रकल्पाची टीम आठवडाभर सुटीवर आहे. सॉरी काईजा, मला मनातून वाटत होतं तितकं मी तुझ्या संपर्कात राहू शकलो नाही. मी केंद्रीय मंडळाचा सदस्य असल्यामुळे मला बरंच काम असतं आणि आम्ही जे काम करतोय त्यात मला खूप रस आहे. त्यामुळेच माझं काम आणि प्रकल्पातली माझी भूमिका जास्तच वेळखाऊ झाले आहे.” काईजाकडे पाहत अमरने स्पष्टीकरण दिलं. त्याला माहीत होतं, की एक शास्त्रज्ञ या नात्याने काईजाला जरी पृथ्वी प्रकल्प मंजूर नव्हता तरी एक मित्र म्हणून त्याला अमरच्या प्रगतीत रस होता.
“शिवाय, माझ्या आयुष्यात सध्या स्थितिपरिवर्तन चालू आहे. जूनमध्ये जयंत अकादमीत गेला. नताशाबरोबरचा माझा पालक करार संपून आता महिना झाला.”
“इतका काळ लोटला? तुझ्या मुलाला पंधरा वर्षं पूर्ण होऊन तो अकादमीत गेलासुद्धा?” काईजाला खरंच आश्चर्य वाटलं. “मग आता तू एकटाच आहेस, का कोणी जोडीदार आहे बरोबर?” काईजाने हळुवारपणे विचारलं. त्याच्या मित्राला आता स्वतःचं कुटुंब नव्हतं हे पहिल्यांदाच त्याच्या लक्षात आलं.
“सध्या मी एकटाच आहे. इतक्यात तरी जोडीदार शोधण्याचा काही विचार नाही; शिवाय कामात माझा बराच वेळ जातो.”
“आणि नताशा… ती निघून गेली का?”
“जयंत अकादमीत गेल्यावर नताशा सीलो तलावाच्या काठावर वसलेल्या नीबो गावाला राहायला गेली. केंद्रीय कोशागार मंडळावर तिची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. आमच्या आभासी भेटी होत असतात… पण मूल मोठं झालं, की आपलं आयुष्य बदलून जातं, काईजा.”
“सुटीचा काय कार्यक्रम आहे तुझा? माझ्याबरोबर किती दिवस राहता येईल तुला?”
अमर छान हसला. “उद्यापर्यंत राहीन मी. मग अकादमीत जाऊन जयंतला भेटेन म्हणतो. मग परत जाऊन पुन्हा पूर्ण वेगाने काम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस भरपूर झोप काढायचा विचार आहे.”
“ठीक आहे. मग आहेस तिथेच थांब. मी आपल्यासाठी पट्कन गरम कॉफी घेऊन येतो आणि मग मला तुझ्या प्रकल्पाविषयी सविस्तर सांग. मग मी तुला माझी कहाणी सांगेन आणि उद्या आपण टेनिस खेळणार आहोत आणि मी तुला प्रत्येक डावात हरवणार आहे; मग त्यासाठी मला नियम मोडावे लागले आणि तुझे फटकारे टोलवून लावायला मला उडावं लागलं तरी बेहत्तर!”
ते दोघे मित्र झोपायला गेले तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. काईजाने आग्रहाने अमरला त्याच्या ढगांच्या दालनातल्या तरंगणाऱ्या पलंगावर झोपायला लावले आणि तो स्वतः पोहायच्या तलावाशेजारच्या सोफ्यावर झोपला. लांबच्या विमान प्रवासाने दमल्यामुळे अमरला लगेच झोप लागली. काईजाला मात्र स्वप्नांच्या दुनियेत शिरायला बराच वेळ लागला. त्याचा जुना मित्र अनपेक्षितपणे भेटल्यामुळे त्याला फारच आनंद झाला होता…कोणताही आडपडदा न ठेवता बोलता येईल असं कोणीतरी शेवटी एकदाचं त्याला भेटलं होतं… त्याच्या प्रसिद्धीच्या वलयाचा ज्याच्यावर प्रभाव पडणार नव्हता आणि मुळात जे त्या प्रसिद्धीमुळे निर्माण झालेलं नव्हतं, असं नातं होतं त्यांचं. त्याला अगदी पूर्वीसारखं वाटत होतं…अद्ययावत संशोधनांवर चर्चा…स्वतःच्या कल्पना एकमेकांना सांगून त्या तोलून बघणं आणि अर्थातच… टेनिस!
—————————————————————————————————————-
रवि उदयाचं संगीत तिच्या झोपायच्या खोलीत पसरू लागलं तशी फ्रांस्का जागी झाली. हा तिच्या आयुष्यावर असलेला तारीकचा ठसा होता आणि तिने तो मोठ्या प्रेमाने जतन करून ठेवला होता. सगळ्या प्रकारच्या भावनिक अवस्थांना अनुकूल अशा मन शांत करणाऱ्या संगीताचा तारीककडे मोठा साठा होता. त्यांच्या घरात तारीकने अशा रितीने संगीत पेरून ठेवलं होतं, की त्यांच्या मूडप्रमाणे आणि काही संकेतांवरून ते आपोआप वाजू लागे. तारीकची संगीताची निवड फ्रांस्काला नेहमीच अगदी योग्य वाटे. तिला कधीच त्याला गाणं बदलायला किंवा बंद करायला सांगायला लागत नसे. तिला नेहमी असं वाटे, की तारीकला आपोआपच तिच्या भावना समजत आणि तिच्या मनाशी त्याचं हे जे नातं होतं त्याचंच रूपांतर ध्वनिलहरींत होऊन ते त्यांच्या आयुष्याचं पार्श्वसंगीत होत असे; मग त्यांचा प्रणयरंग असो किंवा लायसोसोम ॲंफीथिएटरच्या पलीकडे असलेल्या तळ्याकाठी बसून ते पहाट उगवताना पाहत असोत, पार्श्वभूमीवर नेहमीच हळुवार संगीत चालू असे.
स्टीव्हबरोबरचं आयुष्य वेगळं होतं. त्याने सोबत केल्याबद्दल फ्रांस्का त्याची ऋणी होती आणि त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तिला आदर होता; पण त्यांचं नातं रोमँटिक नसून व्यवहारी होतं. तारीकबरोबर व्हायच्या तशा स्टीव्हबरोबर अर्थातच मूलभूत भौतिक शास्त्रावर चर्चा होत नसत. स्टीव्ह काही भौतिकशास्त्रज्ञ नव्हता. त्याला शिक्षणक्षेत्राची आवड होती आणि शिकवण्याचं सॉफ्टवेअर तयार करायला त्याला आवडायचं. त्यामुळे त्याचं संभाषण कधीच अस्तित्वाच्या गूढ धूसर परिसरात पोचायचं नाही. वास्तवाचे क्वांटम रूप किंवा अवकाशातील ऊर्जेची स्पंदनं यांविषयी ते कधी बोलत नसत. अंधारी शक्ती (dark energy) किंवा विश्वाच्या अनेकत्वाच्या शक्यतांचा ते कधी विचार करत नसत.
कुठे होता तारीक आता? दुसऱ्या एखाद्या विश्वात? त्याच्या आयुष्याची दुसरी एखादी शक्यता जगत होता का तो? कदाचित असं एखादं आयुष्य – जिथे त्याने जगण्याची इच्छा कधीच गमावली नाही, जिथे तो अजूनही पृथ्वी प्रकल्पावर काम करत होता? असं एखादं आयुष्य ज्यात तो अजूनही तिच्या शेजारी झोपलेला होता? दुसऱ्या एखाद्या विश्वात ती स्वतःदेखील असं दुसऱ्या शक्यतांचं आयुष्य जगत होती का? किंवा कदाचित अगणित शक्यतांची अगणित आयुष्यं? अगणित शक्यता…? हे म्हणजे जरा विचित्रच नाही का? त्या अगणित शक्यतांमध्ये अशीही एक शक्यता असेल का ज्यात तिची मूल्यं वेगळी होती, आवडीनिवडी वेगळ्या होत्या, छंद वेगळे होते? मग तिचं खरं रूप कुठलं? मग इतर कुणापेक्षा ती वेगळी कुठे होती? त्या अगणित शक्यतांपैकी एखाद्या शक्यतेत ती इतकी वेगळी होती का, की त्या आयुष्यात ती दुसरीच व्यक्ती होती… उदाहरणार्थ साल्चर? मग विश्वाच्या अनेकत्वाची गरजच कुठे होती? त्या अगणित शक्यता इथेच साकार होऊन तिच्या डोळ्यांसमोर घडत होत्या. स्वर्गावर राहणारे सगळे मनुष्य प्राणी कदाचित एका मूलभूत पातळीवर एकच व्यक्ती होते आणि सगळ्या निरनिराळ्या व्यक्ती या एकाच जीवाच्या आयुष्याच्या अगणित भिन्न शक्यता होत्या…
डोक्यातील विचारचक्र थांबवण्यासाठी फ्रांस्का अंथरुणातून उठली. स्टीव्ह आधीच उठला होता आणि त्याच्या घरासमोरच्या हिरवळीवर आपले जांभळे पंख पसरून उन्ह खात होता. फ्रांस्का लगबगीने सूर्यस्नानाला तयार होण्यासाठी न्हाणीघरात गेली. सकाळी होणाऱ्या बैठका आणि दुपारी करण्याचे प्रयोग यांमुळे दिवसभर ती अतिशय व्यग्र राहणार होती.
________________________________________________________________________________________________
सुलेमान खान आणि अराबा फुकुशो यांनी आपापल्या स्क्रीनवरून एकमेकांना अभिवादन केलं. त्याच वेळी झेरुआ पर्वतावरील बैठकीच्या खोलीत त्यांच्या प्रक्षेपित अवतारांनी (holographic projections) हस्तांदोलन केलं. सुलेमान हा ओमेयोकान प्रदेशातील शिक्षण संस्थेचा सर्वांत वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ होता आणि अराबा हा तियान खोऱ्यातील जीवशास्त्र आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रात रोगनिवारण मानसशास्त्रज्ञ होता. दोघेही दोन वर्षांपासून परासदस्य तज्ज्ञ म्हणून पृथ्वी प्रकल्पासाठी काम करत होते. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीवर जाणाऱ्या तरुण अंतराळवीरांची निवड करणाऱ्या गटाचं नेतृत्व करण्यासाठी साल्चरने स्वतः दोघांचीही निवड केली होती.
ते दोघेही पृथ्वी प्रकल्पाचे मुख्यालय असलेल्या झेरुआ पर्वतावरील प्रयोगशाळेत काम करत नसल्याने, पृथ्वीवर जाणाऱ्या दलाच्या निवडीचे निकष ठरवण्यासाठी ते आभासी स्वरूपात भेटत होते. पृथ्वी प्रकल्पाची सुरुवात होऊन आता दहा वर्षं पूर्ण झाली होती. प्रकल्पाचा पहिला टप्पा पार पडल्याने आता नवीन सदस्यांच्या आगमनाची उत्सुकता होती – अंतराळाचे प्रवासी! प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यावर अंतराळातील प्रवासाचा आराखडा, पृथ्वीचा वेध आणि त्या ग्रहावर उतरण्याची प्रक्रिया, तिथला वर्षभराचा वास आणि तिथे गेलेल्या दलाचा स्वर्गाकडे परतीचा प्रवास या सर्वांची तयारी झाली होती. या आराखड्यांची प्रकल्पावर काम न करणाऱ्या इतर शास्त्रज्ञांनी उलट तपासणी करून त्यांना मंजुरी दिली होती आणि ते आराखडे आता पक्के करण्यात आले होते. आता त्यात कोणताही बदल करण्यात येणार नव्हता.
आकाशगंगा प्रवास केंद्र बांधत असलेलं अवकाशयान जवळजवळ तयार झालेलं होतं. पुढची पाच वर्षं त्या यानाच्या कार्यक्षमतेत प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याच्या सर्व प्रणालींची अनेकदा परीक्षा घेतली जाणार होती. पृथ्वीवर राहण्यासाठी बांधली जाणारी तात्पुरती घरं, पृथ्वीवर फिरण्यासाठी लागणारी वाहनं, प्रयोगाचं सामान आणि सुरक्षा कवचाचे फुगे यांच्या रचनांचे आराखडे पक्के झाले होते. पुढच्या पाच वर्षांत त्या वस्तू तयार केल्या जाणार होत्या.
सुलेमान आणि आराबा आता प्रकल्पाचं सर्वात महत्त्वाचं काम सुरू करणार होते – पृथ्वीवर जाणाऱ्या दलाची निवड. फार नाजूक काम होतं ते. पृथ्वी प्रकल्पात अंतराळवीर म्हणून ज्यांची निवड होईल त्या तरुण मुलामुलींनी नुकताच अकादमीत प्रवेश घेतलेला होता. या मुलामुलींनी प्रकल्पाचं गांभीर्य आणि या प्रकल्पाला कारणीभूत झालेल्या मूलभूत प्रश्नाचं महत्त्व समजून घेणं आवश्यक होतं. या दलाच्या सदस्यांची पाच वर्षांचं कठीण प्रशिक्षण घेण्याची आणि आपल्या तारामंडळाच्या बाहेरच्या एका ग्रहाला भेट देण्यामागील धोका पत्करण्याची तयारी असायला हवी. मानव जातीच्या प्राचीन निवासस्थानावर उरलेल्या अखेरच्या युद्धाच्या खुणा सहन करण्याची शक्ती त्यांच्यापाशी असायला हवी आणि त्या ज्येष्ठ ग्रहाचे रहस्य प्रयत्नपूर्वक उलगडण्याचं कौशल्य देखील त्यांच्यापाशी हवं. ते प्रचारकही नसतील आणि जेतेही नसतील – फक्त पृथ्वी मातेची – या अनंत विश्वातील जीवनाच्या एकमेव स्रोताची – परतलेली लेकरं म्हणून तिथे जातील.
एकमेकांपासून सहा हजार मैल अंतरावर असलेल्या आपापल्या संस्थांमध्ये बसून सुलेमान आणि आराबा त्यांच्या आभासी अवतारांच्या मार्फत निवडप्रक्रियेविषयी चर्चा करत होते. त्यानंतरच्या दोन तासांत त्यांनी पृथ्वी प्रकल्पात सामील होणाऱ्या बुद्धिमान व्यक्तींचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया निश्चित केली. त्या तरुणांच्या शारीरिक क्षमतेविषयी त्यांना फारशी फिकीर नव्हती. स्वर्गावरील बहुतेक सगळेच सुदृढ होते आणि सगळ्याच माणसांची शक्ती जवळजवळ सारखीच होती; शिवाय अंतराळातील प्रवास आणि अपायकारक जीवाणूंनी ओसंडून वाहणाऱ्या ग्रहावरचा वास ही आव्हाने पेलण्यासाठी दलातील प्रत्येक सदस्याची प्रकृती आणखी सुधारण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार होती.
ज्या बौद्धिक आणि स्वभाववैशिष्ट्यांमुळे दलात निवड केलेल्या व्यक्ती हे आव्हान पेलायला समर्थ ठरतील ती वैशिष्ट्ये ठरवण्याची जबाबदारी सुलेमान आणि आराबा यांच्यावर होती. अंतराळातील प्रवास आणि पृथ्वी ग्रहावरचे वास्तव्य हे कष्ट सोसण्याची मानसिक शक्ती त्यांच्याजवळ असायला हवी. त्याचबरोबर त्यांच्या अंतरंगात पेटलेलं एक अग्निकुंड हवं… ज्ञानाची तहान लागलेलं, सर्व गोष्टींविषयी कुतूहल जागृत करणारं आणि कोणत्याही परिस्थितीचा स्वीकार करायला तयार असलेलं मन हवं. अंतराळातील प्रवासाचं शास्त्र, जीवशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आणि मानव जातीचा इतिहास समजण्याइतकी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असायला हवी.
त्यांचं काम सोपं नव्हतं याची सुलेमान आणि आराबा यांना कल्पना होती. पृथ्वीवर जाणाऱ्या दलाच्या योग्यतेवर संपूर्ण प्रकल्पाचं यश अवलंबून होतं. पुढचे काही महिने सुलेमान आणि आराबा यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे गट बारा प्रांतांतल्या बारा अकादमींना भेट देणार होते आणि तिथे नुकत्याच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पृथ्वी प्रकल्पाची माहिती देणार होते. त्या विद्यार्थ्यांना पृथ्वीवर जाणाऱ्या दलाचे सदस्य होण्यासाठी स्वतःचे नाव नोंदवण्याची संधी देण्यात येणार होती. असे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मग सुलेमान आणि आराबा यांनी आखलेल्या परीक्षा द्याव्या लागणार होत्या आणि त्यातून अखेर प्रकल्पाच्या दलाची निवड होणार होती. दलाची संख्या पंधरा निश्चित करण्यात आली होती. आजपासून तीन महिन्यांत सुलेमान आणि आराबा यांना ती पंधरा नावे साल्चरला द्यायची होती. दोघांनाही त्यांच्या या कामाबद्दल उत्सुकता होती. त्यांचा प्रकल्पाला ठाम पाठिंबा तर होताच; शिवाय त्यांना हेदेखील माहीत होते, की या निवडप्रक्रियेत त्यांची पुढच्या पिढीतील काही अत्यंत हुशार मानवांशी ओळख होणार होती. बराच वेळ चर्चा करून त्यांनी शेवटी निवड करण्याची प्रक्रिया निश्चित केली आणि आपापल्या शोधप्रक्रियेचा प्राथमिक निकाल घेऊन एका महिन्याने त्यांनी भेटायचे ठरवले.
————————————————————————————————————–
आईच्या लक्षात आलं की गेले काही दिवस आपली लेक फार शांत शांत आहे. एरव्ही सारखी बडबड करणारी ती छोकरी आता बहुतेक आपल्या अभ्यासाच्या खोलीत विचार करत बसलेली आढळे. करमणुकीच्या सगळ्या गोष्टींतला तिचा रसही कमी होत चालला होता; इतकंच काय, एक दोनदा तिने संध्याकाळी उडत जायला पण नकार दिला. आरुषीच्या आईला काळजी वाटू लागली होती… खूपच काळजी वाटत होती. तिचं दिवसभराचं काम नुकतंच संपलं होतं आणि कामाचा स्क्रीन बंद करून आणि तिच्या कामाच्या खोलीच्या भिंती पारदर्शक काचेच्या केल्यावर तिला बाहेरची सुंदर संध्याकाळ दिसत होती. आरुषीच्या वयाच्या शेजारपाजारच्या मुली मजेत हसत खिदळत उडत होत्या. त्या घोळक्यात आरुषीला पाहून किती दिवस झाले होते बरं? काहीतरी बिनसलं होतं. आरुषीशी बोलायला लागणार होतं आणि तिला कसली काळजी वाटते आहे ते पाहायला हवं होतं. आपल्या लेकीला ती आयुष्याच्या आनंदापासून वंचित राहू देणार नव्हती – विशेषतः तिच्या घरातल्या शेवटच्या वर्षात.
आई उठली आणि आरुषीच्या अभ्यासाच्या खोलीकडे गेली. आरुषी खरंच काहीच न करता एका खुर्चीत मान खाली घालून बसली होती. तिचा चेहरा पडलेला आणि दुःखी होता. आईने तिला हलकेच हाक मारली आणि मग हळूच पुढे होऊन तिने आपल्या लेकीला मिठीत घेतलं. आरुषी अगदी लहान असताना ती तिला जसं जवळ घ्यायची तसं तिने तिला कुरवाळलं.
अजूनही ती किती लहान होती! आईच्या मनात आलं आणि पुढच्या वर्षी अकादमीत जाणार ती!
आरुषी गुपचुप हुंदके देऊन रडते आहे हे लक्षात येऊन आई चपापली. कशाचं एवढं दुःख झालं होतं तिच्या लेकीला? तिच्या मनात धस्स झालं. आरुषीच्या बाबतीत काहीतरी भयंकर घडत होतं का? आणि तिला त्याचा पत्ताच नव्हता? कोणत्यातरी अदृश्य संकटापासून तिच्या लेकीला वाचवण्यात ती असमर्थ ठरली होती का? ही काही तिच्या वयाच्या सगळ्या मुलांना वाटणारी परीक्षेच्या आधीची धास्ती नक्कीच नव्हती. मनातून धास्ती वाटत असली तरी आई वरून शांतच राहिली. आरुषीच्या खांद्यावर थोपटत आणि मायेचे शब्द बोलत राहिली. एक दोन मिनिटांनंतर तिने आपली मिठी सैल केली आणि आरुषीला ती जवळच्या सोफ्याकडे घेऊन गेली. आपल्या लेकीशेजारी बसून तिने तिचे छोटे हात आपल्या हातात घेतले.
“सॉरी आई, मला रडायचं नव्हतं.”
“सॉरी म्हणायची गरज नाही बेटा – मला तरी नाही. कसलं दुःख होतंय तुला, सांग मला. कदाचित तुला वाटतं तितकं ते गंभीर नसेल,”तिला आतून जरी तितका आत्मविश्वास वाटत नसला तरी ती आश्वासकपणे म्हणाली.
“आई, मी पृथ्वीवरच्या अखेरच्या युद्धाबद्दल वाचत होते. लोक तेव्हा इतके क्रूर होते… लहान मुलांचा छळ केला त्यांनी, एकमेकांशी रानटीपणाने वागले ते. औषधांच्या आणि बरं करण्याच्या प्रक्रियांच्या अभावी लोक जखमांनी आणि आजारांनी त्रस्त होते. वर्षानुवर्षं ते भुकेले, दुखणं घेऊन आणि त्रासात जगले. किती यातना झाल्या असतील त्यांना आणि त्यांच्या यातना कमी करण्यासाठी मी काहीच करू शकत नाही. एकमेकांना जखमी करण्यापासून त्यांना थांबवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही. ते जेव्हा जन्मले होते तेव्हा आपल्यासारखीच त्यांची शरीरंपण निरोगी होती; पण ते एकमेकांना छळायचे आणि मरेपर्यंत त्यांना यातना सहन कराव्या लागायच्या.”
“कदाचित काहीतरी करू शकशील तू आरुषी. इतकं हिंसक होण्यापासून त्या लोकांना परावृत्त करण्यासाठी तुला काही परत त्या काळात जाता येणार नाही. कुणालाच येणार नाही. ते लोक आता नाहीत. त्यांनी एकमेकांना किंवा त्यांच्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या असहाय लोकांना जे काही केलं ते आपल्या प्रभावाच्या पलीकडे आहे. त्यांना सहन करावं लागलेलं दुःख आणि वेदनासुद्धा आपण पोचू शकतो त्या परिघाच्या पलीकडे आहेत; पण कदाचित आपण तेच लोक आहोत.
तत्त्वज्ञानाची एक फार प्राचीन शाखा आहे. त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे सगळे जीव जीवन-मरणाच्या चक्रातून जातात. सगळे प्राणी आणि वनस्पती पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि प्रत्येक जन्मात वेगवेगळे अनुभव घेतात. ते जर खरं असेल तर, तर आपण सगळे तेच लोक आहोत… आता एका साक्षात्कारी प्रजातीत जन्मलो आहोत. आपण एकमेकांशी सौजन्याने वागतो आणि आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार आणि या ग्रहावरच्या सगळ्यांचीच काळजी घेतो. आपण जर कधी काळी क्रूर रानटी लोक होतो तर मग आपलं रूपांतर शांतताप्रिय समाजात कसं झालं?
त्याचं कारण आहे आपली प्रश्न विचारण्याची वृत्ती! आपली ज्ञानपिपासा आणि आपला चांगुलपणाविषयी आदर. अखेरच्या युद्धानंतरसुद्धा ही वैशिष्ट्यं टिकून राहिली. साधनसामग्रीच्या तुटवड्याने मोकाट सुटलेल्या पशुवृत्तीनंतरसुद्धा!
साक्षात्कारी मानवाची पुढची पिढी म्हणून तू हे गुण आणखी उदात्त करू शकतेस. तू एखादी मोठी शास्त्रज्ञ किंवा अंतराळवीर किंवा चित्रकार होऊ शकतेस आणि मनुष्याच्या अंतरंगातील दैवत्व आणखी उन्नत करू शकतेस. भूतकाळाविषयी दुःख करत बसण्यापेक्षा तू एक उत्तम भविष्यकाळ घडवू शकतेस.”
आईचा संयत आवाज आणि ठाम विश्वास यांमुळे हळूहळू तिच्या लेकीच्या संवेदनाक्षम मनावर परिणाम झाला. पुढचे काही दिवस माय-लेकींमध्ये असे अनेक संवाद झाले. बहुतेक आईच बोलत होती. सावकाश, पण सातत्याने आणि खूप हळुवारपणे आणि प्रेमाने, तिने तिच्या लेकीच्या कोवळ्या मनातून सगळी भीती काढून टाकली आणि त्या जागी आत्मविश्वास निर्माण केला. आता आपली लेक जगाला तोंड द्यायला सिद्ध आहे याचा तिला विश्वास होता.
खोलवर तिला माहीत होतं, की आरुषीच्या सगळ्या चिंता आपलं कुटुंब विभक्त होणार या भीतीतून उत्पन्न होत होत्या. आरुषीला माहीत होतं, की तिला पंधरा वर्षं पूर्ण होऊन ती अकादमीत गेली, की आता ते राहत असलेल्या घरात तिचे आई पपा राहणार नाहीत. पालक करार संपल्यामुळे ते आपापल्या मार्गाने निघून जातील. तिचं घर अस्तित्वात राहणार नाही. कदाचित अकादमीच्या नव्या वातावरणाचीपण तिला धास्ती वाटत असेल. आईला माहीत होतं, की कितीही बुद्धिमान असली तरी तिची लेक अजूनही भावनिक दृष्ट्या लहानच होती. तिचं मन इतकं निष्पाप होतं, की कोणत्याही भावनेचा इतरांपेक्षा तिच्यावर जास्त परिणाम व्हायचा. तिच्या स्वतःच्या अनुभवांवरून तिला हे माहीत होतं.
अकादमीत जाण्यापूर्वी तिला स्वतःला किती दडपण आलं होतं ते तिला आठवलं.
पण तिची गोष्ट वेगळी होती. तिच्यावर सतत टीका करणाऱ्या तिच्या आईपासून तिला दूर जायचं होतं, स्वतःचं जग निर्माण करायचं होतं. त्या उलट आरुषीचं बालपण आनंदात गेलं होतं. तिच्या आई वडिलांचा तिला खूप लळा होता. घर सोडून अकादमीत जाणं ही तिच्या दृष्टीने जास्त कठीण पायरी होती.
आपल्या बाळाला सुरक्षित वाटावं म्हणून आईचा सारखा प्रयत्न चालू होता.
“आमचा पालक करार संपल्यावर काय होईल याची फार काळजी करू नको. अजून आम्ही पुढचा काही विचार केलेला नाही. कोणास ठाऊक, कदाचित आम्ही इथंच राहू. काही झालं तरी मी तुला रोजच आभासी भेट देईन आणि सुटीत तू मला प्रत्यक्षच येऊन भेटशील आणि मग आपण छान छान ठिकाणी फिरायला जाऊ. तुला आवडेल अकादमी आणि तुला खूप नव्या मित्र-मैत्रिणी मिळतील तिथे.” आईने हे सगळं तिला परोपरीने सांगितलं.
खरं म्हणजे लेक जाणार म्हणून आईलापण खूप अस्वस्थ वाटत होतं. अकादमीतून पदवी घेऊन बाहेर पडल्यापासून एखाद्या मुलाला वाढवणं हाच तिच्या आयुष्याचा मुख्य उद्देश होता. ती एक हुशार विद्यार्थिनी होती आणि सुदैवाने तिला EARTH प्रयोगशाळेत आवडीचं काम मिळालं होतं. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागल्यावर तिचं सगळं लक्ष नैसर्गिक रितीने एका बाळाला जन्म देण्यावर आणि तिचं संगोपन करण्यावरच केंद्रित झालं होतं. आता ते ध्येय पूर्ण झाल्यावर, पुढील आयुष्याच्या दिशेविषयी ती थोडीशी गोंधळलेली होती.
आरुषी अकादमीला जाणार होती त्याच्या आदल्या रात्री आईने प्रेमाने तिला झोपवलं आणि स्वतः रात्रभर तिच्या बांधलेल्या सामानाकडे पहात, तिच्या प्रवासाच्या तपशिलाविषयी काळजी करत आणि अधूनमधून झोपलेल्या लेकीकडे वात्सल्याने पाहत बसली. तिला माहीत होतं, की उद्या अकादमीत लेकीला निरोप दिल्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ संपणार होता. एकटीच अंधारात बसून ती डोळे टिपत राहिली – समाधानाने आणि दुःखानेही. एका समर्थ लेकीची आई असल्याचा तिला अभिमान होता; पण त्याच वेळी मूल जेव्हा कायमचं दूर जाणार असतं तेव्हा केवळ एका आईला होणाऱ्या दुःखाने तिला भरून आलं होतं.
_______________________________________________________________________________________________
आरुषी जागी झाली तेव्हा सगळीकडे तिला एक विचित्र शांतता जाणवली. झोपेचे रेशमी धागे तिच्या मनावरून जेव्हा दूर झाले तेव्हा तिच्या लक्षात आलं, की आपण आपल्या घरी नाही. तिला एकदम हातपाय गळून गेल्यासारखं वाटलं, पोटात गोळा उठला. आईला हाक मारून तिच्या कुशीत शिरावं असं वाटलं आरुषीला. तिच्या डोळ्यांत पाणी आलं… मग, कुठून तरी खोलातून, तिला तिच्या आईचा आवाज आठवू लागला… हळुवार… शांत… आश्वासक. अकादमीतल्या पहिल्या दिवशी आपल्याला हे असं एकटं वाटेल हे आईने कसं आधीच सांगितलं होतं, हे तिला आठवलं. तिला कसं पळून जावंसं वाटेल… मग आईने त्यावर काय सल्ला दिला होता हेही तिला आठवलं.
त्या अनोळखी अंथरुणातून आरुषी उठली आणि सूटकेसच्या स्टँडजवळ गेली. अकादमीच्या सामानाच्या पट्ट्याने काल संध्याकाळी जिथे आणून ठेवली होती तिथेच ती सूटकेस अजूनही होती. आरुषी जवळ पोचली तशी त्या स्टँडची उंची आपोआप तिला सोईस्कर होईल अशी बदलली.
सूटकेस उघडून आरुषीने त्यातून एक लांबट पातळ लिफाफा बाहेर काढला. त्यात एक रेशमी बटवा होता, साक्षात्कारपूर्व लोक वापरायचे त्या कापडाचा. आरुषीने बटव्याच्या दोऱ्या ओढून त्याचं तोंड उघडलं आणि आत हात घालून लाकडी मण्यांची एक माळ बाहेर काढली. ओंजळीत ती माळ धरून ती खिडकीबाहेर शून्यात पाहत राहिली.
आदल्या दिवशी आई आणि पपाने तिच्या सगळ्या बॅगा झिप्परमध्ये चढवल्या होत्या. तिचं तोपर्यंतचं आयुष्य ज्या ज्या वस्तूंनी साकार झालं होतं त्या सगळ्या वस्तू त्या बॅगांत भरल्या होत्या. तिच्या आठवणी ज्यांत एकवटल्या होत्या अशा त्या सगळ्या वस्तू तिला बॅगेत भरताना पाहून पपाने नाक मुरडलं होतं. “अकादमीत तुला यातलं काहीच लागणार नाही,” तो म्हणाला होता. पण आईने तिला तिचे सगळे झगे, तिचा कॉम, तिचं आवडतं संगीत भरलेले इलेक्ट्रॉनिक कागद, पुस्तकं इतकंच नव्हे तर आठवण म्हणून तिची जुनी खेळणी, रिबिनी आणि बूटही तिला बॅगेत भरू दिले होते. त्यात तिच्या लहानपणीच्या अनेक वर्षांच्या आठवणी साठवलेल्या आहेत असं आई म्हणाली होती. अकादमीत तिला नवे कपडे, नवीन कॉम आणि तिची नवी वैयक्तिक लायब्ररी मिळणार होती हे खरं, पण पूर्वीचं सगळं असंच कसं मागे सोडून जाणार… आतापर्यंतच्या दैनंदिन आयुष्यात तिच्या म्हणून असलेल्या सगळ्या वस्तू?
संध्याप्राशन झाल्यानंतर पपा रात्रभर आपल्या कॉंप्युटरवर काम करत बसला होता. आरुषीला माहीत होतं, की ती घर सोडून जाणार म्हणून तो दुःखी आहे आणि दुःख पचवायचा एकच मार्ग त्याला माहीत होता… अबोला आणि काम. आईची गोष्ट वेगळी होती. ती आरुषीच्या खोलीत येऊन तिच्या शेजारी आडवी झाली. आरुषी बाळ असल्यासारखं तिने तिला कुशीत घेतलं आणि मग तिच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली. मग थोडी शांत झाल्यावर तिने आरुषीला अकादमीतले पहिले काही दिवस कसं जुळवून घ्यायचं याविषयी सल्ला दिला. तिला खूप धीटपणे राहण्याविषयी सांगितलं आणि मग तिने आरुषीला तो प्राचीन बटवा दिला होता.
“आरुषी, हे तुझ्याजवळ असू दे. मी आणि माझे आईवडील आमचं मूळ गाव सोडून दुसऱ्या गावाला राहायला गेलो तेव्हा माझ्या आजीने हा मला दिला होता. आजीला सोडून जाताना मी फार दुःखी झाले होते. तेव्हा मग तिने हा बटवा माझ्या हातात दिला आणि म्हणाली, की अनेक पिढ्यांतून परंपरेने हा बटवा तिच्यापर्यंत आला होता… प्रत्येक पिढीतल्या व्यक्तीने तो पुढच्या पिढीतल्या आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीला दिला होता. तिने मला सांगितलं होतं, की या बटव्यातली माळ ओंजळीत धरली की मनाला खूप शक्ती मिळते. आता हा बटवा आणि त्याच्या आत ठेवलेली माळ मी तुला देते आहे बिट्टू. कधी तुला जर आतून पोकळी जाणवली, तर तू ती माळ ओंजळीत धर.” त्यानंतर आरुषी आईच्या कुशीत झोपून गेली होती आणि सकाळी तिच्या खिडकीतून ऊन्ह आत आल्यावरच तिला जाग आली होती.
लांबच्या प्रवासाची तयारी करण्यात सकाळ निघून गेली होती आणि दुपारी आई आणि पपांबरोबर ती त्यांच्या झिप्परमध्ये बसली होती. संध्याकाळपर्यंत ते तिच्या अकादमीत पोचले होते आणि प्रवेश घेण्याचे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यावर तिच्या हॉस्टेलच्या दारात आई-पपांनी तिचा निरोप घेतला होता. आयुष्यात पहिल्यांदाच एकटीने राहण्याच्या विचाराने, अकादमीच्या अनोळखी आणि प्रचंड आवाराने आणि तिच्या वयाच्या अनेक अपरिचित मुलामुलींना आपापल्या आईवडिलांना निरोप देताना पाहून आरुषीच्या मनावर दडपण आलं होतं. शरीराने आणि मनाने ती दमून गेली होती आणि रात्रभर तिला अस्वस्थ झोप लागली होती. आज तिच्या नव्या आयुष्याचा पहिला दिवस होता.
________________________________________________________________________________________________
“निघालास पण?” म्हणाली उल्का
“निघालास तरी कुठे?”
“प्रदक्षिणेला”, म्हणे धूमकेतू
“तारामंडळामध्ये”
“परतणार केव्हा, ” विचारी उल्का
“कधी आपुली भेट?”
“मी तर पाहुणा” वदे धुमकेतू
“पुन्हा कधी गं भेट?”
________________________________________________________________________________________________
आठवडाभरातच आरुषी अकादमीतल्या जीवनात रुळली. तिच्या आवतीभोवती सगळे नवे चेहरे होते. एडन गावातल्या तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणी अर्थातच तिच्याच अकादमीत होत्या. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होईपर्यंत ते सगळे एकत्रच असणार होते. मूल्यमापन झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी आपापली उच्च शिक्षणाची दिशा ठरवणार होता.
आरुषीला नवीन मित्र-मैत्रिणीदेखील मिळाल्या होत्या. सिल्व्हनमधून आलेला काइटो होता आणि रेडिएंटचा मार्टन. आरुषी आणि तिच्या एडनच्या मित्रमैत्रिणींच्या खोल्या ज्या भागात होत्या तिथेच त्यांच्याही खोल्या होत्या. सकाळ-संध्याकाळ तिच्या वयाच्या मुलामुलींबरोबर उन्ह खाताना आरुषीला मजा वाटायची. दर दोन तासांनी आरुषी अत्यंत उत्साहाने अकादमीतल्या घडामोडी आईला कॉमवरून सांगत होती. लवकरच होणाऱ्या मूल्यमापनात आपल्या बुद्धीचा कस लागणार तेव्हा आपण जणू एका धाडसी मोहिमेत भाग घेतला आहे असंच आरुषीला वाटत होतं.
अकादमीत गेल्यावर दुसऱ्या आठवड्यात मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यात कामाच्या पडद्यावर द्यायच्या, प्रयोगशाळेत द्यायच्या आणि कधी कधी उघड्यावर मैदानात द्यायच्या परीक्षा होत्या. मोठ्या माणसांच्या चष्म्यातून स्वतःचं ज्ञान पारखून घ्यायला आरुषी उत्सुक होतीच. तिने सहजपणे सगळ्या परीक्षा पार पाडल्या. मूल्यमापनाच्या सगळ्या परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांना एक दिवस मोकळा होता. काही जणांनी जवळच्या राखीव वनात जाण्याचा बेत केला होता, काही जण करमणुकीच्या परिसरात गेले. आरुषी आणि इतर बऱ्याच मुलांनी आपापल्या आई-वडिलांना भेटायला जायचं ठरवलं. एडनच्या मुलांसाठी तो चार तासांचा झिप्परचा लांब प्रवास असणार होता, पण त्यांच्या उत्साहापुढे त्यांना त्याची फिकीर नव्हती.
सुटीच्या दिवशी आरुषी लवकर उठली आणि झुडुपांवर रेंगाळणारं धुकं रवीच्या पहिल्या किरणांनी विरळ होऊ लागलं तोपर्यंत ती अंघोळ करून बाहेर हिरवळीवर पोचली होती. पूर्वेकडे तिला पाचशे किलोमीटर अंतरावरच्या झेरुआ पर्वतांची रांग दिसत होती. ती गवतावर गुडघे टेकून बसली. थोड्याच वेळात आई-पपांना भेटून अकादमीत आल्यापासूनच्या पहिल्या आठवड्यातील तिच्या छोट्या छोट्या करामती त्यांना सांगता येणार या विचाराने तिचं मन आनंदाने भरून आलं होतं. रवीच्या पौष्टिक किरणांची ऊब तिच्या पंखांमध्ये पसरू लागली तशी तिने डोळे मिटले आणि हृदयाच्या केंद्रस्थानी लक्ष केंद्रित करण्याचा ती प्रयत्न करू लागली.
अर्ध्या तासानंतर जेव्हा ती वसतिगृहातील तिच्या खोलीत परतली तेव्हा तिचा कॉम प्रकाशाची उघडझाप करत असलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. छे; तिला आधी वाटल्याप्रमाणे आई काही तिच्या येण्याच्या वेळेची चौकशी करत नव्हती. हा तर अकादमीच्या मूल्यमापन समितीचा संदेश होता. तिने आपल्या खोलीची एक भिंत अपारदर्शक केली आणि आपल्या भ्रमणयंत्राला एक आदेश देऊन त्या भिंतीचं रुपेरी पडद्यात रूपांतर केलं. तिने मूल्यमापन समितीपुढे साडेअकरा वाजता हजर राहावं असा तो संदेश होता. त्यांनी का बोलावलं असेल? आरुषीच्या मनावर एकदम दडपण आलं. याचा अर्थ ती एडनच्या इतर मुलांबरोबर आपल्या घरी जाऊ शकणार नव्हती.
आरुषीने कॉमवरून आईशी संपर्क साधला. “तुम्हांला येऊन भेटायची माझी किती इच्छा होती. आज सुटी असताना त्यांनी कशासाठी मला बोलावलं?” तिने आईकडे तक्रार केली.
“मला पण आश्चर्यच वाटतं आहे बिट्टू. पण काहीतरी महत्त्वाचंच असणार. आपण काय, तुझ्या पुढच्या सुटीत नक्कीच भेटू; किंवा तुझी इच्छा असेल तर पपा आणि मी तुला अकादमीत येऊन भेटू.”
यांपैकी कोणत्याही पर्यायाने तिचा आता झालेला हिरमोड भरून निघणार नव्हता; पण दिलेल्या वेळेला ती अकादमीत हजर राहील आणि बैठक संपल्या संपल्या त्याबद्दल कळवेल असं तिनं आईला वचन दिलं. ती बाहेर आली तेव्हा एडनची बाकीची मुलं झिप्परपाशी थांबून तिची वाट बघत होती. तिला सोडून त्यांना निघून जाताना तिने जड अंतःकरणाने रडू आवरत आपले पंख पसरले आणि मनाला बरं वाटावं म्हणून अकादमीच्या आवारात छोटीशी फेरी मारण्यासाठी सकाळच्या तेजोमय आकाशात भरारी मारली.
_______________________________________________________________________________________________
अकादमीच्या कचेरी विभागात ती जेव्हा मूल्यमापन करणाऱ्या समितीला भेटायला गेली तेव्हा खोलीत खरीखुरी माणसं बघून तिला गंमत वाटली. तिथे इतरही विद्यार्थी आले होते. सुटीच्या दिवशी कचेरीत बोलावल्यामुळे सगळेच थोडे गोंधळलेले होते आणि प्रवासाचे बेत बदलावे लागल्याने थोडेसे नाराजही होते. खोलीत उपस्थित असलेल्या कोणत्याच विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना आरुषी ओळखत नव्हती. थोड्याच वेळात पपासारखा दिसणारा एक उंच सडसडीत माणूस पुढे आला आणि खोलीत घुटमळणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून बोलू लागला.
“सर्व प्रथम, या सत्रात उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला बोलावल्याबद्दल मी तुम्हां सर्वांची क्षमा मागतो. तुमचे मित्र अकादमीतल्या त्यांच्या पहिल्या सुटीचा आनंद घेत असताना तुम्हांला मात्र इथे यावं लागलं आहे; पण या सत्राचं प्रयोजन जेव्हा मी तुम्हांला सांगेन तेव्हा तुमच्यापैकी बहुतेक जण तुम्हांला इथे बोलावल्याबद्दल आक्षेप घेणार नाहीत. तुमच्या मूल्यमापनाच्या चाचण्यांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केल्याबद्दल मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. मानवाला सध्या अवगत असलेलं सगळं प्राथमिक ज्ञान तर तुम्ही आत्मसात केलंच आहे; शिवाय तुमच्यापैकी प्रत्येकाने त्याही पलीकडे जाऊन ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये कुतूहल दाखवून त्यांचा अभ्यास केला आहे.
अकादमीतील ज्या प्राध्यापकांनी तुमच्या परीक्षेचं मूल्यमापन केलं त्यांचं असं मत आहे, की तुमच्या मनाचा नैसर्गिक कल कोणत्या क्षेत्रात आहे हे पाहण्यासाठी तुमच्या काही आणखी चाचण्या घ्याव्यात. म्हणजे तुम्हांला उच्च शिक्षणासाठी योग्य ते क्षेत्र निवडता येईल. तुम्हांला जर या संधीचा उपयोग करून घ्यायचा असेल तर मी तुम्हांला आज आणखी काही परीक्षा द्यायला नेईन. जर तुम्हांला आणखी परीक्षा द्यायच्या नसतील तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर सुटीचा आनंद घ्यायला जाऊ शकता. मग तुमचं मूल्यमापन या अकादमीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या सर्वसाधारण परीक्षा दिल्या त्यांच्या आधारावर होईल.”
इतरांपेक्षा आपली कामगिरी अधिक चांगली झाली आहे हे ऐकून सगळ्याच विद्यार्थ्यांना आनंद झाला आणि आणखी परीक्षा देण्यासाठी सगळेच तयार दिसले.
“छान. तुम्ही सगळेच जर तयार असाल तर आपण लगेचच परीक्षांना सुरुवात करू या. पहिल्या फेरीत तुमचं तथ्यात्मक ज्ञान तपासलं जाईल. गेल्या आठवड्यात सर्वसाधारण परीक्षेसाठी तुम्ही जिथे आला होता त्या बाजूच्या दालनात सगळ्या विद्यार्थ्यांनी यावं. प्रत्येकाने तिथल्या एकेका कॉंप्युटर स्क्रीनच्या समोर बसावं आणि तुम्हांला सोयीस्कर अशा गतीने कॉंप्युटरवरील प्रश्न सोडवायला सुरुवात करावी.”
हे नवीन आव्हान आरुषीला आकर्षक वाटलं होतं आणि स्क्रीनवरील परीक्षेच्या सूचना वाचायला सुरुवात केल्यावर एडनला जाऊन आई-पपांना भेटू न शकल्यामुळे झालेली सगळी निराशा ती विसरून गेली. तथ्यात्मक ज्ञानाच्या पहिल्या फेरीची परीक्षा तिने पट्कन सोडवली आणि त्यानंतर तिला एका मानसतज्ज्ञाबरोबरच्या मुलाखतीसाठी दुसऱ्या खोलीत नेण्यात आलं. तांब्याच्या रंगाचे केस असलेली आणि प्रेमळ दिसणारी ती बाई आरुषीशी तासभर बोलत होती. अधूनमधून ती प्रश्न विचारी, कधी संभाषणाचा रोख दुसरीकडे वळवी आणि वेगवेगळ्या विषयांवर आरुषीचं मत जाणून घेई. मानसशास्त्राच्या त्या प्राध्यापक बाईंबरोबर झालेलं सत्र जेव्हा संपलं तेव्हा आरुषीला प्रश्न पडला, की या चाचण्या कोणत्या तत्त्वावर आधारित होत्या आणि अकादमी त्यांचं नेमकं कसलं मूल्यमापन करत होती?
पुढच्या सत्रासाठी तिला बागेत नेण्यात आलं आणि एका झाडाखाली थांबण्यासाठी सांगितलं गेलं. तिला सूचना देणाऱ्या व्यक्तीने तिला फक्त पुढील सूचना मिळेपर्यंत तिथून न हलण्याविषयी बजावलं आणि मग अदबीने त्या व्यक्तीने आरुषीचा कॉम तिच्याकडून मागून घेतला. ती व्यक्ती निघून गेल्यावर आता कोणतं काम आपल्याला करायला सांगणार आहेत याचा आरुषी विचार करू लागली. अकादमीचा परिसर शांत आणि रमणीय होता; पण थोड्या वेळाने काहीच न करता झाडाखाली बसून राहण्याचा आरुषीला कंटाळा येऊ लागला. एक भरारी मारण्यासाठी तिचे पंख शिवशिवू लागले. तिला थोडी तहानही लागली; पण तिथे काही पेय उपलब्ध नव्हतं. सूचना देणाऱ्या व्यक्तीने तिला जिथे थांबायला सांगितलं होतं त्या जागेपासून फार दूर न जाता, हळूहळू मोठ्या होत जाणाऱ्या वर्तुळात ती सावकाश चालू लागली. एक तास उलटून गेला. आता तिला चांगलीच तहान लागली होती आणि ताटकळून ती कंटाळली होती. ते लोक तिला विसरून गेले होते का? इमारतीपर्यंत चालत जाऊन आत शिरायला एखादं दार सापडतं का ते बघावं का? सरळ उडत इमारतीच्या पलीकडे जाऊन तिथं आणखी कोणी विद्यार्थी असेच ताटकळत बसले होते का हे पाहावं का? पण तिला मिळालेल्या सूचना स्पष्ट होत्या आणि हे दिव्य म्हणजे मूल्यमापनाच्या दुसऱ्या फेरीचाच भाग असणार याची आरुषीला जाणीव होती. हे लोक कसली परीक्षा घेत आहेत? आरुषी विचारात पडली.
आता मात्र तिला काहीतरी प्यायलाच लागणार होतं. निदान पाण्याचे काही घोट घेतल्याशिवाय तिला आता जास्त वेळ तग धरता येणार नाही, हे तिच्या लक्षात आलं. पण आसपास कुठेही पाणी दिसत नव्हतं. एखादं तळं, एखादा झरा, साधं कारंजंदेखील कुठे दिसत नव्हतं. तेव्हा मग तिला तिच्या मागे एक संत्र्याचं झाड दिसलं. त्याला फळं लगडली होती; पण त्या फळांचा रस कसा काढायचा हा प्रश्न होता. पण आता विचार करायलाही वेळ नव्हता. तहानेने तिचा जीव व्याकूळ झाला होता. कशीबशी तिने वर हवेत उडी मारली, दोन फळं तोडली आणि हलकेच ती जमिनीवर उतरली. तिला थांबायला सांगितलेल्या जागेवर ती पुन्हा येऊन बसली. एकामागून एक तिने ती फळं सोलली, संत्र्याच्या फोडी वेगळ्या केल्या आणि काळजीपूर्वक त्यांचा रस तोंडात पिळला. रस गोड होता आणि त्यामुळे तिच्या सुकलेल्या ओठांना तरतरी आली. रसामुळे हुशारी आल्यावर संत्र्याच्या झाडापाशी जाऊन तिने पुन्हा उडी मारली, आणखी तीन फळं तोडली आणि त्यांच्या गोड रसाने आपली तहान भागवली.
आता आत्मविश्वासाने आणि मोठ्या धीराने वाट बघत बसण्याचे ठरवून तिने इकडेतिकडे पाहिले. तहान भागवून झाल्याने आता ती संत्र्याच्या सालींची विल्हेवाट लावण्याच्या कामाला लागली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तयार केलेला खड्डा तिला कुठे दिसला नाही. ” कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या जमिनीखालच्या प्रणालीत जर तुम्हांला कचरा टाकता आला नाही, तर तो जमिनीत पुरून टाका,” पर्यावरणाच्या प्राथमिक मार्गदर्शक सूचनांच्या यादीत दिलेला सल्ला आरुषीला आठवला. जवळच्या एका झुडुपाची एक सुकलेली काडी तिने तोडली आणि जमिनीत एक आटोपशीर खड्डा खणला. मग फळांच्या सगळ्या साली आणि बिया गोळा करून तिने त्या खड्ड्यात ठेवल्या. खड्ड्यावर माती सारून तिने हात झटकले आणि पश्चिमेकडे कललेल्या रवीच्या दिशेने आपले पंख पसरून ती प्रतीक्षा करण्यासाठी बसली.
पण तिला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. सकाळी अकादमीच्या ऑफिसात दिसलेली एक स्त्री उडत आली आणि तिने आरुषीला आपल्या मागोमाग यायला सांगितलं. पंख फडफडवत अकादमीच्या इमारतीला वळसा घालून, स्वयंप्रकाशी झुडुपाशेजारून त्या उडत गेल्या आणि उंच बुरुंश वृक्षांच्या मधोमध असलेल्या एका मोकळ्या मैदानात उतरल्या. तिथे अकादमीतल्या एका प्रशिक्षकाबरोबर आणखी विद्यार्थी उभे होते. जवळच जंगलात वापरण्याच्या तंबूच्या साहित्यासारख्या दिसणाऱ्या वस्तूंची पाकिटं आणि वळकट्या ठेवलेल्या होत्या.
आधीपासून जमिनीवर असलेल्या प्रशिक्षकाने आरुषीची इतर विद्यार्थ्यांशी ओळख करून दिली. हा सिल्व्हनमधून आलेला ॲग्नॉन, रेडिएंटमधून आलेला एन कियांबी आणि शांती खोऱ्यातून आलेली जोआना.
“आपण अगदी लहान असताना शांती खोऱ्यात गेलेलो आहोत, ” आरुषीच्या मनात आलं. त्या खोऱ्यातून वर येणारं, झाडांच्या मोठ्या पसरट पानांना वेढणारं आणि पर्यटकांच्या कुटीरांना झाकून टाकणारं धुकं तिला आठवलं.
“आपण अकादमीच्या पश्चिमेला आहोत. इथे अजून तासभर संधिप्रकाश राहील. आजचं तुमचं शेवटचं काम म्हणजे इथे पुरवलेलं साहित्य वापरून तुम्हां सर्वांसाठी एक निवाऱ्याचं ठिकाण बांधायचं. तुम्हांला त्यासाठी एकत्र काम करावं लागेल आणि या साहित्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते समजून घ्यावं लागेल. तुम्हांला ज्या ज्या वस्तूंची गरज लागेल त्या सगळ्या इथे पुरवण्यात आल्या आहेत. तुमचं निवाऱ्याचं ठिकाण तयार झालं, की इथे या पिशव्यांमध्ये ठेवलेली शक्तिवर्धक पेयं पिऊन तुम्ही ताजेतवाने व्हा आणि मग दोन तास विश्रांती घ्या. दोन तासांनी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या डावीकडे असलेल्या रानात चालत जा. बुरुंश वृक्षांच्या रानापलीकडे गेल्यावर तुम्ही उडू शकता. त्यानंतर रात्रीचं आकाश आणि तारे यांचा उपयोग करून तुम्ही टेकड्यांच्या रांगेपलीकडे असलेल्या अकादमीच्या अतिथिगृहापर्यंतचा मार्ग शोधून काढायचा. तुमच्यातील प्रत्येकासाठी अतिथिगृहात एकेक खोली तयार ठेवलेली आहे. उरलेली रात्र आणि उद्या दुपारपर्यंतचा वेळ तुम्ही त्या खोलीत घालवू शकता. मग बसमध्ये बसून तुम्ही अकादमीच्या ऑफिसात या. तिथे तुम्हांला या अधिकच्या मूल्यमापनाचा निकाल समजेल. तुम्हां सर्वांना शुभेच्छा!”
त्या दोन शिक्षकांनी चारी विद्यार्थ्यांना निरोप दिला आणि अकादमीच्या दिशेने ते उडत गेले. ते दिसेनासे झाल्यावर, चारी विद्यार्थी एकमेकांकडे पाहत उभे राहिले.
“हे लोक नक्की काय तपासून पाहताहेत? आपल्याला घर बांधायला आणि नक्षत्रांवरून रस्ता शोधायला का सांगताहेत? आपलं काय एखाद्या मागासलेल्या संस्कृतीत रूपांतर होतं आहे का?” जोआना फारच रागावली होती.
“हो ना, यंत्रमानवाचं काम आपल्याला का करायला सांगताहेत?” एन कियांबी म्हणाला.
“हो, मी तहानेने व्याकूळ होईपर्यंत मला त्यांनी बाहेर उघड्यावर उभं केलं. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मला झाडावरची संत्री तोडून त्यांचा रस तोंडात पिळावा लागला, ” आरुषीने आपल्या साथीदारांना सांगितलं.
“या सगळ्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे, याचाच मी विचार करतो आहे. नक्कीच हे लोक आपल्याला बचावाचं काही आदिम तंत्र वापरता येतं का हे पाहत आहेत,” ॲग्नॉन म्हणाला.
“तथ्यात्मक प्रश्न तसे ठीक होते,” एन कियांबी म्हणाला.
“हो, पण त्यातही बरेच पेच सोडवावे लागले. निदान मला दिलेल्या परीक्षेत तरी ते होते.”
“हो, माझ्या पेपरमध्येही होते, ” आरुषीकडे पहात ॲग्नॉन म्हणाला.
“चला, आपण ही परीक्षा स्वीकारली आहे, तेव्हा हा शेवटचा डाव पुरा करू आणि मग थोडी विश्रांती मिळेल आपल्याला,” जोआना म्हणाली.
“हो चला, हेही कोडं सोडवू या, ” साधन-सामग्रीची एक वळकटी सोडत एन कियांबी म्हणाला.
थोड्याच वेळात ते चौघेही विद्यार्थी गुडघ्यांवर बसून सामानाच्या वळकट्या आणि पिशव्या उघडत होते आणि ओरडून एकमेकांना आपल्या कल्पना सुचवत होते. कोणत्या सामग्रीचा काय उपयोग आहे हे शोधून काढण्यात आणि एक टीम म्हणून एकत्र काम करण्यात त्यांना मजा वाटत होती. थोड्याच वेळात त्यांनी चार जणांना झोपता येईल एवढं एक तंबूसारखं खोपटं उभारलं. अजूनही थोडी साधन सामग्री उरली होती पण ते चौघेही आता इतके दमून गेले होते, की त्यांना त्याची फिकीर नव्हती.
त्यांनी चारी स्लीपिंग बॅग्स पसरल्या आणि ॲग्नॉनने शक्तिवर्धक पेयं असलेली पिशवी उघडली. चौघांनीही आकंठ प्राशन केलं. कुणाकडेही त्यांची भ्रमणयंत्रे नव्हती म्हणून त्यांनी पेयाच्या बाटल्या गरम करण्याच्या यंत्रावर दोन तासांनंतरचा गजर लावला आणि त्यांना अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती घेण्यासाठी ते आपापल्या स्लीपिंग बॅगेत शिरून गुरुगुटून झोपून गेले.
दोन तासांनी जेव्हा गजर झाला, तेव्हा त्या चौघांनाही झोपेतून उठून स्वतःच्या पायांवर उभं राहणं फार कठीण गेलं. त्यांना अजूनही खूप झोप येत होती आणि जंगलात उघड्यावर रात्र काढायला अजून कोणीच तयार नव्हतं; पण तरीही त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करायचं त्यांनी ठरवलं; शिवाय त्यांच्या दमलेल्या शरीरांना खऱ्याखुऱ्या बिछान्यात झोपण्याचं आणि दुसऱ्या दिवशी उशिरा उठण्याचं आकर्षण होतंच.
रात्रीचा गारवा सुखद होता आणि चांदणं पडलं होतं. वाऱ्याच्या झुळकीबरोबर रातराणीचा सुगंध दरवळत होता. चौघेही विद्यार्थी अडखळत वनाच्या दिशेने चालू लागले. आरुषीला आकाशात सप्तर्षी आणि मृग नक्षत्र दिसत होते. आईबरोबर दुर्बिणीतून आकाशाकडे बघण्यात तासन्तास घालवल्यामुळे रात्रीचं आकाश तिच्या परिचयाचं होतं. बहुतेक सगळ्या नक्षत्रांची आधुनिक आणि प्राचीन नावं तिला माहीत होती. आई सांगायची की माणसाने खूप पूर्वीच ताऱ्यांच्या पुंजक्यांना नावं द्यायला सुरुवात केली होती, अगदी हजारो वर्षांपूर्वी. आईच्या मांडीवर बसून, अशाच ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर आरुषीने पृथ्वीवर मानवी संस्कृती कशी उदयाला त्याच्या कथा ऐकल्या होत्या. प्राचीन भाषांच्या कथा आणि मनाच्या शक्तीवर विजय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे तप करणाऱ्या ऋषींच्या कहाण्या. ज्ञानसाधना करणाऱ्या त्याच पहिल्या विद्वान लोकांनी नक्षत्रांना नावं दिली होती. याच कहाण्या ऐकून प्राचीन संस्कृतींबद्दल, आता लुप्त झालेल्या प्राचीन भाषांबद्दल आणि साक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करताना विसरून गेलेल्या किंवा सोडून दिलेल्या ज्ञानशाखांबद्दल आरुषीचं कुतूहल जागृत झालं होतं. आता आकाशात दिसणारे तारे बघून आरुषीला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. आई आता इथे असायला हवी होती, आरुषीच्या मनात आलं.
बुरुंश वृक्षांच्या वनातून बाहेर पडण्याचा रस्ता सर्वात पहिल्यांदा आरुषीलाच सापडला. वनातून बाहेर पडल्यानंतर चौघांनीही आपले पंख पसरले आणि रात्रीच्या आकाशात झेप घेतली. टेकड्यांची रांग ओलांडून अकादमीच्या अतिथिगृहापर्यंतचा रस्ता त्यांना सहज सापडला. जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा एका यंत्रमानवाने त्यांना त्यांच्या खोल्या दाखवल्या. ॲग्नॉन, एन कियांबी आणि जोआनाचा निरोप घेऊन आरुषी आपल्या खोलीत गेली आणि यापुढे कोणताही व्यत्यय नसलेली झोप पूर्ण करायला तिने तिथल्या मऊ आरामशीर बिछान्यावर अंग झोकून दिलं.
_______________________________________________________________________________________________
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आरुषीला जाग आली तेव्हा नऊ वाजून गेले होते आणि तिला अजूनही गळून गेल्यासारखं वाटत होतं. अंघोळीचा विचारसुद्धा न करता ती बाहेर गच्चीत आली, आपले पंख पसरले आणि रवीचा प्रकाश यथेच्छ शोषून घेतला. जेव्हा शरीराला पुरेसं उन्ह मिळालं आणि हातापायात शक्ती आल्यासारखं तिला वाटलं तेव्हा ती चालत खोलीत परत आली आणि तीव्र उन्हापासून संरक्षण म्हणून तिने खोलीच्या भिंती पुन्हा अपारदर्शक केल्या.
ती पुन्हा बिछान्यावर आडवी झाली. साधारण तीन तासांनी तिला या विचित्र परीक्षांचा निकाल समजणार होता. नक्की कसली परीक्षा घेत होते ते, शंभराव्यांदा तिच्या मनात आलं. तिचा कॉम तिच्याजवळ नसल्यामुळे ती आपल्या आई-पपांशी किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधू शकत नव्हती. काही का असेना, कालची रात्र लक्षात राहण्यासारखी होती. संपूर्णपणे अनोळखी लोकांच्या मदतीने तिने एक निवारा उभारला होता आणि एका पूर्वी न पाहिलेल्या ठिकाणाचा रस्ता केवळ दूरच्या ताऱ्यांना पाहून शोधून काढला होता. आपण जणू काही एखाद्या करमणुकीच्या खेळातील एक पात्र आहोत असं आरुषीला वाटलं. या सगळ्या साहसाचा वृत्तांत कधी एकदा आईला, मैत्रिणींना आणि पपाला सांगेन असं तिला झालं होतं.
________________________________________________________________________________________________
भाग ७ समाप्त
