अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(१) 

आकाशवाणीचं हे ….

                                             ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।

                                              वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’

(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)

भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाज माध्यमांच्या  जोरदार आक्रमणामुळे  आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते;  परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले.  स्वतःचे ॲप तयार केले.  विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व  विश्वासार्हता टिकवून आहे.  शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी  हे आपल्याला क्रमशः   उलगडून दाखवत आहेत. 

भाग १

ऐकता ऐकता शतकपूर्ती

‘आकाशवाणीचं हे अमुक-तमुक केंद्र आहे’ ही परिचित उद्घोषणा आपल्या जीवनाचा कधी ना कधी एक अविभाज्य आणि सामान्य भाग झालेली असेल हे नक्की. कधी जुन्या बहारदार गाण्यांसाठी, कधी महत्त्वाच्या बातम्यांसाठी, कधी क्रिकेट कॉमेंट्रीसाठी, कधी कौटुंबिक श्रुतिकेसाठी, कधी सकाळच्या भक्तिगीतांसाठी, कधी शेतीविषयक सल्ला ऐकण्यासाठी तर कधी आपलीच फोन-फर्माईश ऐकण्यासाठी! जवळपास इ. स. २००० पर्यंतच्या गेल्या ७०-८० वर्षांतलं हे सामान्य चित्र असावे. आता आता भरपूर माध्यमं आणि पर्याय आल्याने ‘रेडिओ’ माजघरातून कारमध्ये जास्त जाऊन बसलाय. एखाद्या कामकऱ्याच्या सायकलवर कमी आणि ‘मोबाईल अ‍ॅप’मध्ये जास्त बसलाय असे मानायला जागा आहे. अजूनही भक्तिगीत, भावगीत ऐकत दिवस सुरू करणारे, रात्री बेला के फूल ऐकत निद्राधीन होणारे, दुपारी भूले बिसरे गीतमध्ये रममाण होणारे, हॅलो डॉक्टरमध्ये एखादा फोन करून आरोग्यविषयक सल्ला विचारणारे कित्येक जण माझ्या पाहण्यात आहेत. ‘विविध भारती माझी मोठी बहीण आहे,’ असे उद्गार काढणाऱ्या लतादीदी, ‘पुढचा जन्म मिळाल्यास मला रेडिओवर सादरकर्ता व्हायला आवडेल,’ असं म्हणणारे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, ‘शास्त्रीय संगीताचा खरा प्रसार भारतात आकाशवाणीने घडवला,’ असं म्हणणारे पंडित भीमसेन जोशी हे सर्व संदर्भ ताजे ताजे आहेत – फार जुने नाहीत. ‘रेडिओवाचून करमत नाही,’ असं म्हणणारी ८५ वर्षांची एखादी वृद्धा आणि आपल्या भातशेतीतून दणदणीत यश मिळवणाऱ्या दाक्षिणात्य शेतकी संस्थेत तांदुळाला ‘रेडिओ राईस’ नाव देणे हा काळ काही अगदी जुना नाही. गरज आहे ती या माध्यमांची शक्ती समजून घेत त्यात पुन्हा प्राण फुंकण्याची; सादरीकरणाच्या विविध शैलींचं पुनरुज्जीवन करण्याची.

रेडिओ प्रसारणाला आता बघता बघता – ऐकता ऐकता म्हणू या हवं तर – सुमारे १०० वर्षे होऊन गेली. १९१९ मध्ये अमेरिका, त्याच वर्षी इंग्लंड आणि १९२३मध्ये मुंबईमध्ये – म्हणजेच भारतात – रेडिओ प्रसारणाला चालना मिळाली. त्याच्या काही वर्षांपूर्वीच १९१२ मध्ये जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक जहाजावरून प्रवाशांचे रेडिओ संदेश न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये घेण्याचे काम चालले होते. या संदेश देवाण-घेवाणीतून द्रुतगती दळणवळणाचे प्रभावी साधन म्हणून रेडिओ लहरीचे महत्त्व जगाच्या लक्षात आले होते. १९७६ मध्ये ‘TECS’ म्हणजेच त्या वेळच्या ‘टाटा इकॉनॉमिक कन्सल्टंसी सर्विसेस’ने ‘कम्युनिकेशन-सेकंड इंडिया स्टडीज’ हा अहवाल तयार केला होता. मधू पावसकर आणि आर. आर. कुलकर्णी यांनी मोठ्या कष्टाने हा अभ्यास मांडला त्याला आज पन्नास वर्षे होऊन गेली. विशेष म्हणजे मौज प्रकाशनाने तो पुस्तक रूपाने जतन केला. रेडिओ, दूरदर्शनचे जाळे फार कूर्मगतीने वाढत असल्याचा निष्कर्ष त्यात मांडला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर १९२३ ते आता २०२४ अशी अशी १०० वर्षांच्या रेडिओ प्रसारणाची वळणं आणि चढ-उतार समजून घेणं मोठं रंजक ठरणार आहे. रेडिओची ‘माध्यम’ म्हणून जी सामर्थ्यस्थळं आहेत त्या सामर्थ्यातून ते शंभर वर्षे टिकून आहे. प्रिंटिंग तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगती असो, कृष्णा-धवल टीव्हीचे आगमन आणि नंतर रंगीत पडद्यात पदार्पण असो, १९९३ नंतरच्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे शेकडो वाहिन्यांचे आपल्यावरचे आक्रमण असो या सगळ्या वळणांवर रेडिओ टिकून राहिला आहे; केवळ टिकून राहिला असे नव्हे तर २००० नंतर इंटरनेटचे दमदार आगमन होत असतानाही आकाशवाणीचे जाळे विस्तारले गेले. अगदी १९८० च्या सुरुवातीस केवळ सात रेडिओ केंद्रे असलेल्या महाराष्ट्रात आज मितीला २२ आकाशवाणी केंद्रे आहेत. आज राष्ट्रीय स्तरावर साडेचारशेहून अधिक आकाशवाणी केंद्रे तर आहेतच; पण शंभरच्या आसपास खासगी रेडिओ केंद्रे (मिरची / टोमॅटो / रेडिओ सिटी इत्यादी) कार्यरत आहेत. कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्याही ५०० पर्यंत गेली आहे; ज्यात विद्यापीठे, महाविद्यालये, कृषिविज्ञान केंद्र आणि स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या रेडिओ केंद्राचा समावेश आहे.

४५०हून अधिक केंद्रांचं आकाशवाणीचं जाळं भारतीयत्वाला कसं गच्च बांधून ठेवतं हे समजून घ्यायचं असेल तर केवळ कामकाजाच्या भाषेवर नजर टाकणं पुरेसं आहे.

भारताच्या  प्रमुख २४ भाषांमधून कार्यक्रम निर्मिती तर होतेच; पण एकूण देशात १४६ पेक्षा अधिक बोली भाषांतून प्रसारण चालते. ७०० पेक्षा अधिक भाषा बोलीभाषांमधून १५० पेक्षा अधिक बातमीपत्रे (न्यूज बुलेटीन्स) प्रसारित होतात. अन्य देशांमध्ये आवर्जून ऐकली जाणारी १०० पेक्षा अधिक बातमीपत्रे २४ भाषांमधून आहेत. हा पसारा विलक्षण आहे. देशाच्या सीमाभागात बोलीभाषेतल्या कार्यक्रमांचे प्रसारण हे लोकांना आणि लोकभावनांना सुरक्षित ठेवण्याचे असाधारण काम करते. संथाली (बिहार आणि ओरिसा) किन्नोरी (हिमाचल प्रदेश), डोगरी (जम्मू-काश्मीर) तुलु (कर्नाटक), गोंडी आणि भिलोडी (मध्य प्रदेश), अहिराणी (महाराष्ट्र), गोरखाली (मणिपूर) गारो आणि खासी (मेघालय) सेमा आणि कोन्याक (नागालँड), लेपचा आणि भोरीया (सिक्कीम), निकोबारी (अंदमान), कोक बोरोक (त्रिपुरा) या साधारणपणे आपण कधी न ऐकलेल्या भाषा-बोलीभाषांचा मुद्दाम उल्लेख करतो. या बोलीभाषांमधले प्रसारण टिकवून ठेवणे वाटते तेवढे सोपे नाही; पण आकाशवाणी ती भूमिका वर्षानुवर्षे बजावत आहे. दरथंगा (बिहार)सारख्या ठिकाणी मैथिलीतून बातम्या लोकांना हव्या असतात. 

संख्यात्मक विकासाचा झपाटा आणि गुणात्मक विकासाची धडपड या दोन्ही स्तरांवर भारतीय रेडिओ म्हणजे अर्थात आकाशवाणी समजून घेणे रोचक ठरायला हरकत नाही.

* * * * *

लालबहादूर  शास्त्री  प्रसारण भवनात

Author

6 thoughts on “अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(१) 

  1. अभ्यासपूर्ण लेखन.
    रंजक माहिती.

  2. अवटी साहेबांच्या लेखनशैलीत नि वाचनात एक अद्भुत अनुभूतीची प्रचिती नेहमीच येते. ” अवधान ” खुपच सुंदर…

  3. नेहमीप्रमाणेच अत्यंत दर्जेदार आणि ओघवतं लेखन!

  4. गोपाळ अवटी सर,
    संपूर्ण लेख वाचला आणि ऐकला सुध्दा. खूप छान माहिती मिळाली. तुमचा आवाज खूप खूप वर्षांनंतर ऐकला. अजूनही तसाच आहे. मी प्रतिभा कुलकर्णी, जळगाव आकाशवाणी मधे होते.

  5. Mellow voice म्हणजे काय, हे तुझा आवाज ऐकून कळते. छान लिहिले आहेस. अभिनंदन.

  6. सर्वांना मनापासून धन्यवाद
    -गोपाळ अवटी

Leave a Reply