ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कुटुंबीय एक विशेष स्मरणिका १० जून रोजी प्रकाशित करत आहेत ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. कारण ज्या मूल्यांकरिता रावसाहेब आयुष्यभर अविश्रांत झटले त्यांचे स्मरण ठेवणे हे आजच्या समाजाला अतिशय आवश्यक आहे.
एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, प्रगतिशील शेतकरी व दूधउत्पादक, ध्येयवादी वकील, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्ष, विचारवंत, वक्ते आणि लेखक अशा विविध रुपांनी रावसाहेब समाजाला परिचित आहेत.
त्यांच्याशी माझा प्रथम परिचय मी संपादित करत असलेल्या अंतर्नाद या मासिकाचे एक रसिक व जाणकार वाचक म्हणून झाला. त्याचे श्रेय सेवानिवृत्त न्यायाधीश शिवगोंडा अण्णा पाटील यांना द्यावे लागेल. ते स्वतः अंतर्नादचे वर्गणीदार होते व मासिकाचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी रावसाहेबांची वर्गणी भरली. ती रावसाहेबांनी पुढे चालूच ठेवली आणि नंतर अंतर्नादच्या प्रसाराला त्यांनी खूप हातभार लावला. वर्गणीसोबत लिहिलेल्या सहपत्रात त्यावेळी न्यायमूर्ती शिवगोंडा अण्णा पाटील यांनी लिहिले होते,
“रावसाहेब उत्तम वाचक आहेत व हे मासिक त्यांना नक्की आवडेल. श्रीरामपूर कोर्टात मी तीन वर्षे न्यायाधीश होतो. त्यावेळी माझा त्यांच्याशी जवळून संबंध आला. वकील म्हणून रावसाहेब निष्णात होतेच, पण एक माणूस म्हणूनही स्वच्छ चारित्र्याचे व निर्मळ मनाचे होते. त्यांच्या कम्युनिस्ट चळवळीतील पार्श्वभूमीमुळे गरिबांविषयी त्यांना खराखुरा कळवळा होता. अगदी कमी पैशात वा कधीकधी विनामूल्यही ते त्यांच्या केसेस लढवत.”
एखाद्या न्यायाधीशाने एखाद्या वकिलाबद्दल असे गौरवोद्गार काढावेत, आणि तेही त्याच्या पाठीमागे, हे विशेषच म्हणायचे.
रावसाहेबांशी झालेला तो प्रथम परिचय पुढे अधिक दृढ झाला याचे कारण म्हणजे पुण्यात असले की खूपदा रावसाहेब त्यांच्या ज्येष्ठ कन्या शुभांगी आणि जावई बद्रीनाथ देवकर यांच्या औंध येथील फ्लॅटमध्ये उतरत. देवकर पतिपत्नीशी माझा चांगला स्नेह होता आणि मी देवकरांच्या जवळच राहत असल्याने रावसाहेब तिथे असले की आमच्या वरचेवर भेटी होत गेल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी अगदी भारावून गेलो. पुढे ‘अजुनी चालतोची वाट..’ हे त्यांचे प्रदीर्घ चरित्र लिहिण्याचे भाग्य मला लाभले व त्यानिमित्ताने त्या परिचयाचे रूपांतर स्नेहात झाले आणि बघता बघता मी त्यांच्या कुटुंबाचाच जणू एक घटक झालो.
आम्ही असंख्य वेळा भेटलो, चर्चा केल्या, एकत्र प्रवास केला आणि त्या सगळ्या कालावधीत त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. रावसाहेबांच्या देहबोलीतील ऋजुता, त्यांचे निरागस खळखळून हसणे, त्यांचा नैतिक मूल्यांचा आग्रह, त्यांची कुटुंबवत्सलता, त्यांच्यातील उपजत स्त्रीसन्मान, त्यांची जातिधर्मनिरपेक्षता, स्वतःचा स्वतंत्र झेंडा न उभारता कुठल्याही चांगल्या प्रकारे चालू असलेल्या कामाला शक्य तितकी मदत करायची त्यांची धडपड असे त्यांचे अनेक स्वभावविशेष काळाच्या ओघात मनावर ठसत गेले.
कार्ल मार्क्सपासून वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी सुरू झालेला रावसाहेबांचा वैचारिक प्रवास उतारवयात महात्मा गांधींपर्यंत येऊन पोहोचला होता. या संपूर्ण प्रवासात त्यांची मूल्यनिष्ठा त्यांना कधीही सोडून गेली नाही. नैतिकता फक्त बोलण्यात नसावी, तर प्रत्यक्ष दैनंदिन जगण्यात असावी, हा त्यांचा कायम आग्रह होता आणि तो त्यांच्या सर्व भाषणांमध्ये व लेखनामध्ये उमटत असे. त्यांच्यातील नैतिक सजगतेची आज समाजाला कधी नव्हे इतकी गरज आहे. कारण आर्थिक समृद्धीच्या जोडीला आपल्याला सांस्कृतिक समृद्धीही आणायची असेल तर त्या सांस्कृतिक समृद्धीचा महत्त्वाचा घटक असलेल्या कृतिशील नैतिकतेवर आपल्याला भर द्यावाच लागेल. तसा भर रावसाहेब आयुष्यभर देत राहिले.
वडील बंधू अण्णासाहेब शिंदे यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. राम-लक्ष्मणाची जोडीच होती ती. अण्णासाहेब सलग पंधरा वर्षे केंद्र सरकारात कृषिमंत्री होते, तरीही रावसाहेबांनी स्वतः राजकारणात जायचा मोह टाळला. न्यायाधीश म्हणून नेमणूक व्हायची चालून आलेली संधीही त्यांनी नाकारली. कुठल्याही पदाबद्दलची आसक्ती त्यांनी मनात निर्माण होऊ दिली नाही.
त्यांच्या कृतिशीलतेचा एक आगळा भाग म्हणजे केवळ स्वतःच्याच पुढाकारातून सुरू होणाऱ्या कामात ते सहभागी होत असत असे नव्हे; दुसरा कोणी एखादे चांगले काम करत असेल, तर त्यालाही ते सर्वतोपरी मदत करत. फक्त कोरडी स्तुती ते करत नसत, तर स्वतःच्या खिशातही हात घालत, चारचौघांकडे शब्द टाकत, त्या कामासाठी स्वतःच्या ओळखी मोकळेपणे वापरत. आपापल्या कामासाठी अनेक जण कष्ट उपसतात; पण दुसऱ्या कोणाच्या उपक्रमातही असा सक्रिय भाग घ्यायचा दिलदारपणा आज अगदी क्वचितच कुठे आढळतो. विचार आणि वर्तन यांच्यातला हा मेळ, ही स्वार्थरहित कृतिशीलता आज अतिशय दुर्मिळ झाली आहे.
ऑक्टोबर २००९ मध्ये अंतर्नाद मासिकाने ‘शरद जोशी विशेषांक’ प्रकाशित केला होता. पुण्याच्या एस. एम. जोशी सभागृहात त्याचे प्रकाशन झाले. त्या समारंभात केलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात रावसाहेबांनी आपले विचार अगदी मोकळेपणे मांडले होते. त्यातील काही वाक्ये इथे उद्धृत करावाश्या वाटतात. ते म्हणाले होते,
“एकेकाळी या देशात कृषिसंस्कृती होती. ती केव्हाच मागे पडली असून आज आपण देशात पगारदार संस्कृती निर्माण केली आहे. कुठल्याही शेतकऱ्याच्या मुलाला आज शेती करण्यात रुची उरलेली नाही. त्याला पंख्याखाली बसायची नोकरी करायची आहे आणि दर महिन्याच्या एक तारखेला पगार घ्यायचा आहे. ती नोकरीही त्याला सरकारी नोकरी हवी आहे, कायमस्वरूपी हवी आहे. त्याला ठाऊक आहे की, वेगवेगळ्या वेतन आयोगांमुळे त्याचा पगार वाढतच जाणार आहे आणि सरकारनेच केलेले कायदे असे आहेत की, त्याला त्या नोकरीतून कोणी काढूही शकणार नाही. त्यातूनच एक सुखासीन आयुष्य जगायची त्याला चटक लागली आहे. समाजासाठी आपण काही करायला हवं हा विचारसुद्धा त्याच्या मनाला कधी शिवत नाही. आपलं काम इमानेइतबारे करावं असंही त्याला वाटत नाही. कारण त्याला कोणाचाच धाक राहिलेला नाही. आपला केससुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही याची त्याला खात्री आहे. आज अवतीभवती दिसणारा चंगळवाद हा या पगारदार संस्कृतीचाच एक भाग आहे.”
रावसाहेबांची आजच्या सामाजिक वातावरणाबद्दल एकूण भूमिका काय होती हे वरील ओळींत अगदी स्पष्ट झाले आहे. म्हणूनच त्या इथे उद्धृत केल्या. सतत फक्त लोकानुनय करत राहणाऱ्या, लोकांना ऐकायला गोड वाटेल तेवढेच फक्त बोलणाऱ्या नेत्यांच्या आजच्या युगात हा स्पष्टवक्तेपणा खूप दुर्मिळ आहे. ज्याला समाजाचे भले व्हावे असे मनापासून आणि कळकळीने वाटते तोच असे बोलू शकेल.
रावसाहेबांचे जीवन हे एक सर्वांगाने बहरून आलेले झाड होते; पण ‘माझ्याचसाठी फुललो नसे मी’ याचे भान या झाडाने सतत ठेवले. त्यांना प्रेमळ साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी शशिकलाताई यांनी व सर्वच आज्ञाधारक कुटुंबीयांनी सतत हीच भावना जपली. म्हणूनच असंख्य पांथस्थांना या झाडाने शीतल सावली दिली.
आचार्य जावडेकर यांनी यतिवर्गाची एक संकल्पना मांडली होती. जी माणसे स्वतः सत्तेत सहभागी न होताही आपल्या उच्च नैतिक आचरणाच्या बळावर सत्तेवर अंकुश ठेवू शकतात, अशांचा समावेश त्यांनी या यतिवर्गात केला होता. उदाहरणार्थ, महात्मा गांधी, गाडगे महाराज, साने गुरूजी किंवा बाबा आमटे अशी माणसे. सहजशक्य असूनही राजकारणात कधी न गेलेल्या रावसाहेबांची गणनाही याच यतिवर्गात करता येईल. आज रावसाहेब आपल्यात नाहीत; पण एका मोठ्या स्थित्यंतरातून चाललेल्या आपल्या समाजाला त्यांचे स्मरण सदैव पथदर्शी व स्फुरणदायी राहील यात शंकाच नाही.
विख्यात अमेरिकन कवी लॉन्गफेलो याच्या पुढील ओळी मला इथे आठवतात —
Lives of great men, all remind us,
That we can make our lives sublime,
And while departing leave behind us,
Footprints on the sands of Time.
लॉन्गफेलो याच्या वरील ओळींत आजही रावसाहेबांसारख्या महान व्यक्तींची आठवण आपण का ठेवायला हवी याचे रहस्य सांगितले आहे. हे जग सोडून जाताना कालसमुद्राच्या वाळूवर त्यांच्याप्रमाणे आपल्याही पावलांचे ठसे उमटलेले असावे याची प्रेरणा हे महापुरुष आपल्याला देतात. अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र प्रणाम.
