कविता – जुनी कपाटं

गोदरेजची जुनी लोखंडी कपाटं… 

मागच्या तीन पिढ्यांनी वापरलेली 

गंजत चाललेली 

तरीही टाकून द्यावीशी न वाटणारी 

रंग मारून पुन्हा नवीन झाल्यासारखी वाटणारी 

तरीही व्हॅलिडिटी संपलेली 

दार उघड बंद करताना 

खडखडणारी 

करकरणारी 

आरशावर तडा गेलेली 

आत तिजोरी असली तरीपण चाव्या हरवलेली 

पोरांनी लहानपणी लावलेल्या

फुलपाखरांच्या पिवळ्या पडलेल्या स्टिकर्समधे 

त्यांचं बालपण जपून ठेवणारी

आजच्या फॅशनशी मेळ न खाणारी 

‘पण हल्ली अशी भक्कम कपाटं मिळतात कुठे’ म्हणत जपून ठेवलेली 

गोदरेजच्या जुन्या लोखंडी कपाटासारखी असतात 

काही माणसं

काही नाती..

संपली तरी जपून ठेवावी अशी…

Author

Leave a Reply