दिनांक ८.११.२०२४
ऑक्टोबर हिट संपली आणि गुलाबी थंडी हलक्या पावलांनी उद्यानात अवतरू लागली. ऑक्टोबरपर्यंत हिरवं असलेलं गवत हळूहळू सुकू लागलं. त्याचा रंग प्रथम पिवळा झाला आणि नंतर ते गडद तपकिरी रंगाकडे झुकू लागलं. वाऱ्याची झुळूक या गवतामधून सळसळत जाऊ लागली. नोव्हेंबर महिना हा रानफुलांचा महिना नसला तरी काही रानफुलं याही महिन्यात फुलतात. कोरांटीची गुलाबी फुलं या सळसळणाऱ्या गवतातून हळूच डोकावून बघताना दिसतात. कोरांटीमध्ये वरच्या बाजूला चार पाकळ्या असतात तर खाली एकच मोठी पाकळी असते. पांढऱ्या रंगाचे दोन पुंकेसर मोठ्या पाकळीवर झुकलेले असतात. खडकाळ मातकट पायवाटेच्या कडेने तपकिरी गवतात उमटलेले कोरांटीचे गुलाबी रंगाचे ठिपके दूरवरून नजरेत भरतात.
कोरांटीच्याच रंगाची असलेली रानघेवड्याच्या वेलीवर आलेली गुलाबी फुलं याच ऋतूत लक्ष वेधून घेतात. या फुलाच्या दोन पाकळ्या खालच्या बाजूला एकमेकांशी जोडलेल्या असतात; तर वरची पाकळी अर्धवक्र होऊन खालच्या पाकळ्यांवर झुकलेली असते. नोव्हेंबरमधील निसर्गाची ही गुलाबी उधळण बारकाईने न्याहाळली तरच दिसते. एकदा याच महिन्यात जंगलातील आडवाटेवर एक पाच-सहा फूट उंचीचं झाड दिसलं. त्यावर लालचुटूक रंगाची छोटी मण्यांसारखी फळं आली होती. मी ओळखलं, ही तर संस्कृतमधील ‘वनसर्पगंधा’ आणि इंग्रजीतील ‘wild snake root.’ आयुर्वेदात या वनस्पतीचा उपयोग वाढता रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातो.
दिनांक १०.११.२०२४ ते २८.११.२४
दुपारी फोन आला. फोनवर मुंबई रेंजचे वनपाल बोडेकर होते. त्यांनी माहिती दिली की एक सोनेरी कोल्हा (golden jackal )अपघातात मेला आहे. त्याचे शवविच्छेदन करायचे आहे. मला थोडी काळजी वाटू लागली. गेल्या काही दिवसांतील सोनेरी कोल्ह्याची ही शव विच्छेदनासाठी आलेली तिसरी केस होती. हे सर्व कोल्हे मुंबईतील चेंबूरच्या BARCच्या जवळपास मृत झाले होते. गेल्या काही वर्षांत मुंबईत कांदळवनाचं क्षेत्र वनखात्याच्या प्रयत्नाने वाढलं आहे; त्यामुळे कांदळवनातील प्राणी-पक्षी यांची संख्याही वाढली आहे. त्यांतील एक महत्त्वाचा प्राणी म्हणजे सोनेरी कोल्हा. कांदळवनात या कोल्ह्याच्या खाण्यासाठी खेकडे, मासे भरपूर प्रमाणात असतात. मी त्याचे शव घेऊन यायला सांगितले. त्याचं शवविच्छेदन केलं. शरीराच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी रक्तस्राव झाल्यासारखा वाटत होता. थोडा मार लागला होता. काही दिवसांतच तशाच प्रकारचा आणखी एक सोनेरी कोल्हा शवविच्छेदनासाठी आला. हा कोल्हा ठाणे वनविभागाला जिवंत मिळाला होता. त्यांनी त्याच्यावर जवळच्या पशुवैद्याकडून उपचार करून घेतले होते; पण त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही असे त्यांनी सांगितले. तोही कोल्हा माझ्याकडेच शवविच्छेदनासाठी आणला होता. या चारही शवविच्छेदनांत प्रथमदर्शनी अपघात झाल्याचे वाटत होते. मला कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते; पण नेमके काय ते कळत नव्हते. अशातच RAWW या सेवाभावी संस्थेच्या पवन शर्मांचा फोन आला. ते म्हणाले, “काल आणखी एक आजारी जिवंत कोल्हा मिळाला आहे. ह्या कोल्ह्याची आणि अगोदर सापडलेल्या कोल्ह्यांची लक्षणं सारखीच आहेत. हा कोल्हाही अगोदरच्या कोल्ह्यांप्रमाणे पिंजऱ्याचे गज चावायचा प्रयत्न करतो.” मी त्यांना कोल्ह्याचा व्हिडिओ पाठवायला सांगितला. मी व्हिडिओ पाहिला. सात ते आठ किलोचा कुत्र्याप्रमाणे दिसणारा सोनेरी कोल्हा पिंजऱ्यात आडवा पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर आक्रमक भाव होते. तो आपला जबडा चावत होता. मध्येच जबडा उघडून पिंजऱ्याचे गज चावायचा प्रयत्न करत होता. मला चट्कन कळलं, ‘अरे, हे तर मेंदूदाह असल्याचे लक्षण आहे!’ पवन पुढे म्हणाला, “चौथ्या कोल्ह्याला पण अशीच लक्षणं होती.” सस्तन प्राण्यांमध्ये रेबीज या रोगामध्ये मुख्यतः मेंदूदाह होतो आणि प्राणी पिसाळतो. मी पवनला इशारा दिला, “हा रेबीज असू शकतो. तुम्ही जपून राहा. त्याच्याजवळ जाऊ नका.” दुसऱ्या दिवशी तो कोल्हा मेला. मी त्याच्या मेंदूची तपासणी प्रयोगशाळेत करायची ठरवली. पशुवैद्यकीय महविद्यालयाच्या डॉ.प्रशांत गाढवेंना मी शवविच्छेदनासाठी बोलावलं. आम्ही दोघांनी मिळून त्या कोल्ह्याचं शवविच्छेदन केलं. बाकीचे अवयव बघून आम्ही मेंदूकडे वळलो. प्रशांत सरांनी मानेच्या वरच्या बाजूला कट घेतला. हातातील हत्यारांनी त्यांनी कोल्ह्याची कवटी तोडली आणि पांढऱ्या रंगाचा मेंदू बाहेर काढला. तो मेंदू थर्माकोल बॉक्समध्ये व्यवस्थित बंद केला. त्यात बर्फाच्या बंद पिशव्या ठेवल्या. तो मेंदू प्रयोगशाळेकडे रवाना झाला. दोन दिवसांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या फरांदे सरांचा फोन आला, “तुमचा अंदाज बरोबर आहे. कोल्ह्याच्या मेंदूत रेबीजचे विषाणू सापडले आहेत.” हा आम्हां सगळ्यांनाच धक्का होता. आजपर्यंत मुंबईत रेबीज केवळ कुत्र्यांमध्येच मर्यादित होता. कुत्र्यांमार्फत माणसांमध्ये रेबीज संक्रमित होऊन काही रेबीजच्या केसेस माणसांमध्ये सापडल्या होत्या; परंतु आज या रोगाने वन्यप्राण्यांपर्यंत आपली कक्षा वाढवली होती. वर्तमानपत्रात सोनेरी कोल्ह्यांमधील रेबीजबाबतच्या बातम्या आल्या. वनखात्याने ताबडतोब या रोगाविरुद्ध उपाययोजना करायला सुरुवात केली. सोनेरी कोल्ह्यांमध्ये आलेला रेबीज ही पर्यावरणासाठी धोक्याची घंटा आहे हे निश्चित.
१९/११/२०२४
या वर्षीचा नोव्हेंबर आमच्यासाठी ऐतिहासिक ठरला. चिंपांझीच्या संशोधक असलेल्या जगप्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ डॉ.जेन गुडाल उद्यानात आल्या होत्या. त्या येणार आहेत असं कळल्यापासून मी अतिशय उत्सुकतेने त्यांची वाट बघत होते. वयाच्या सव्विसाव्या वर्षी आफ्रिकेतील गोंबे राष्ट्रीय उद्यानात चिंपांझींच्या अभ्यासासाठी गेलेल्या जेन गुडाल पंचवीस वर्षं तिथेच राहून चिंपांझींचा अभ्यास करत होत्या. त्यांच्यावर मी काही लेखही लिहिले होते, त्यांची पुस्तकं वाचली होती; पण त्यांना कधी प्रत्यक्ष भेटायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं; परंतु तो दिवस उजाडला. मी सकाळीच तयार होऊन आमच्या बिबट्यांच्या पिंजऱ्यांकडे गेले. त्या साधारण साडेअकरा वाजता तिथे येतील असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. दहा वाजल्यापासून आम्ही वाट बघत होतो. उद्यानात इतरही काही ठिकाणी त्या भेट देणार होत्या; परंतु काही कारणास्तव त्यांना उशीर झाला. बिबट्यांच्या पिंजऱ्यावर त्या दुपारी तीन वाजता आल्या. काळ्या गाडीतून उतरणाऱ्या त्या नव्वद वर्षांच्या, ताठ कण्याच्या सडपातळ वृद्ध स्त्रीकडे पाहत राहिले. त्यांनी आमच्या स्टाफबरोबर हात मिळवले. त्या बिबट्यांच्या पिंजऱ्यांकडे गेल्या. मोठ्या पिंजऱ्यात दोन नर बिबटे फिरत होते. त्या मोठ्या उत्सुकतेने त्यांचं निरीक्षण करत उभ्या राहिल्या. त्यांच्याबरोबर असलेल्या गर्दीचा कोलाहोल मागे सुरू होता; पण त्यांना ते जणू काहीच ऐकू येत नव्हते. पिंजऱ्यात फिरणाऱ्या दोन नर बिबट्यांचं एकमेकांशी असलेलं वागणं त्या एकाग्रतेने पाहत होत्या. एक बिबट्या पूर्ण पिंजऱ्यात फिरून येई; बसलेल्या बिबट्याकडे जाऊन त्याच्यावर उगाचच गुरकावत पुढे जाई. निवांत बसलेल्या बिबट्याला त्याचा राग येई. तो त्याला ढकलून द्यायचा प्रयत्न करी. दोघांच्या या नाटकी भांडणात एकमेकांना दुखापत होणार नाही याची मात्र दोघेही खूप काळजी घेत होते. जेन गुडाल त्या दोघांमधील हे एक विलक्षण नाट्य बघण्यात गुंतून गेल्या होत्या. आम्ही मात्र सारे त्यांना बघत होतो. छायाचित्रकार त्यांचे फोटो काढत होते, कोणी आमच्यातले त्याचं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यावर चित्रीकरण करत होते. या सगळ्याची त्यांना सवय असणार! तेवढ्यात कोणीतरी म्हटलं, “आता आपण पुढे जाऊ या!” मग त्याही निघाल्या. आमच्याकडे असलेल्या बिबट्याच्या पिल्लाच्या – ब्लॅकीच्या – पिंजऱ्यासमोर त्या उभ्या राहिल्या. ब्लॅकी सात-आठ महिन्यांचा आहे. तो आम्हांला चांगलाच ओळखतो; त्यामुळे मी पिंजऱ्याकडे गेले आणि ‘ब्लॅकी’ म्हणून हाक मारली की लगेच धावत येतो; पण त्या दिवशीची ती गर्दी बघून तो बावरला. तो काही पुढे यायला तयार नव्हता. जेन गुडाल त्याच्याशी दुरूनच हळू आवाजात बोलत होत्या. तोही दुरूनच त्यांना निरखत होता. जवळ जवळ पंधरा मिनिटं झाली. बाकीची लोकं आता थोडी कंटाळली आणि दूर गेली. आता पिंजऱ्याजवळ मी जेन गुडाल आणि आमचे वनपाल होते. वनपालही ब्लॅकीशी बोलत होते. तो त्यांच्याकडे यायचा पण जेन गुडालच्या जवळ येत नव्हता. नंतर जेन त्याला पाठमोऱ्या बसल्या; तसा ब्लॅकी हळूच त्यांच्याजवळ आला, त्यांना जवळून निरखू लागला. ब्लॅकीचा विश्वास जणू त्यांनी संपादन केला होता. त्यानंतर त्या तिथून समाधानाने उठल्या. त्यांच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर बसल्या. उद्यानात इंटर्नशिप करणारी तरुण मुलं त्यांना भेटण्यासाठी आली होती. त्यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली. एका मुलीने त्यांना विचारले, “तुम्ही संशोधनासाठी चिंपांझींची का निवड केली?” त्या म्हणाल्या, “मी कोणत्याही प्राण्यावर संशोधन करायला तयार होते. माझ्या गुरूंनी लुइस लिकींनी मला चिंपांझींचा अभ्यास करायला सांगितला म्हणून मी तो केला.”
मी त्यांना विचारलं, “तुम्ही गोंबेला अजून जाता का? तुम्हांला तेथील आताचे चिंपांझी ओळखतात का?”
त्या हसून म्हणाल्या, “हो, मी अजूनही वर्षातून दोनदा तिथे जाते. मी अभ्यास केलेल्या चिंपांझींची पुढची पिढी तिथे आहे, माझे अजूनही त्यांच्याशी भावबंध आहेत.”
सगळेजण मंत्रमुग्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होते. थोड्या वेळाने त्या उठल्या आणि गाडीत जाऊन बसल्या. त्यांनी आमच्याकडे बघून हात हलवला. त्यांची गाडी सुरू झाली. प्राण्यांची आद्य संशोधिका म्हणता येईल अशा नव्वदीच्या जेन गुडाल यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आम्ही बघत राहिलो. वयाच्या नव्वदीतही त्या शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहेत. निसर्गाशी सुसंगत जगलं, त्याला समजून घेण्याचा सतत प्रयत्न करत राहिलं तर आयुष्य किती समृद्ध होऊ शकतं याचं डॉ. जेन गुडाल या आज मूर्तिमंत प्रतीक बनल्या आहेत.
या महिन्याचा मी आढावा घेतला तेव्हा जाणवलं – आयुष्याने या एकाच महिन्यात किती विविध रंगी अनुभव दिले – रानफुलांचा गुलाबी रंग, सोनेरी कोल्ह्यांमधील रेबीजचा उग्र, भीतिदायक रंग आणि जेन गुडाल यांच्या काही तासांच्या सहवासाचा शांत आश्वासक रंग!! मनाच्या पडद्यावर उमटलेला विविध रंगांचा हा कोलाज कायमचा आठवणीत राहील यात शंका नाही.
