पुस्तक परीक्षण : अभिषेकी

  चरित्र लेखन ही एक कला असून यात एका प्रकारे चरित्र लेखकाचा कस लागतो. चरित्र नायकाला सादर करीत असताना सत्यनिष्ठा आणि निष्पक्षपातीपणा किती पाळला गेला आहे त्यावर चरित्र चांगले झाले आहे की नाही ते ठरते. एखाद्या व्यक्तीच्या खासगी व सार्वजनिक आयुष्याचे सादरीकरण करणे ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असते. या प्रक्रियेत अनेक धोके दडलेले असतात.  चरित्र नायकाचे दैवतीकरण करणे,  त्याच्या आयुष्याबद्दलची माहिती चुकीची किंवा अपुरी सादर करणे, अतिशयोक्त सादरीकरण, चरित्रकाराचे काही पूर्वग्रह हे काही ठळक धोके.  एखादी चरित्रनायक व्यक्ती आणि त्याचे कुटुंब यांचे खासगी आयुष्य व परस्परसंबंध हे त्या चरित्राचा एक अविभाज्य भाग असतात व त्या विषयी लिहिणे ही एक प्रकारे तारेवरची कसरतच असते.

 राजहंस प्रकाशनाने शैला मुकुंद यांनी लिहिलेला पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा  

अभिषेकी 

पंडित जितेंद्र अभिषेकी : कला आणि जीवन प्रवास 

या काहीशा  लांबलचक शीर्षकाचा चरित्रग्रंथ नुकताच प्रकाशित केलेला आहे.  हा चरित्रग्रंथ चांगल्या चरित्राचे बहुतेक सर्व निकष पूर्ण करणारा आहे. हे पुस्तक म्हणजे एका अर्थाने पंडितजींनी स्वतः सांगितलेली स्वतःच्या आयुष्याची गोष्ट आहे. पंडितजींनी आपल्या आयुष्याचा प्रवास स्वतः सांगायचा आणि त्यावर आधारित पुस्तक काढायचे असा सुरुवातीचा विचार होता.  १९९८ साली  पंडितजींचे अकाली निधन झाले आणि या पुस्तकाचा विषय जवळपास संपल्यागत झाला. पुढे बऱ्याच वर्षांनी हा विषय पुन्हा एकदा पुढे आला आणि अभिषेकी परिवाराच्या विनंतीला मान देऊन शैला मुकुंद यांनी हे अत्यंत जबाबदारीचे काम स्वीकारले व पूर्णत्वाला नेले.  एक सत्शिष्य,  मैफल गायक, संगीतकार आणि गुरू ही पंडित जितेंद्र अभिषेकी यांची संगीत विश्वातील चार महत्त्वाची  रूपे. त्यामुळे त्या विषयी विस्ताराने लिहिणे हे आलेच;  पण पंडितजींचा जीवनप्रवास गोवा, पुणे, मुंबई, लोणावळा व पुन्हा एकदा मुंबई मार्गे पुणे असा झाला. 

या वाटचालीदरम्यान बुवांचे सांस्कृतिक पर्यावरण बदलत गेले.  त्यामुळे बुवांच्या जीवन प्रवासासोबतच इतर अनेक महत्त्वाचे विषय या प्रवासाला  जोडले गेले.  गोव्यातील पोर्तुगीज राजवट, गोव्यातील देऊळ संस्कृती,  मुंबई महानगर,  आकाशवाणी,  कोकणी व मराठी अनुबंध,  कोकणी भाषेची चळवळ इत्यादी विषय त्यामुळेच  या पुस्तकात आले आहेत.  पृष्ठसंख्येच्या मर्यादेत हे सर्व महत्त्वाचे विषय शैलाताईंनी अतिशय चांगल्या रितीने व तटस्थपणे हाताळले आहेत.  पंडितजींच्या या काहीशा अद्भुतरम्य जीवन प्रवासात त्यांचा अनेक व्यक्तींशी निकटचा संबंध आला.  गुरू गिरिजाबाई केळकर, निवृत्तीबुवा सरनाईक, गुरुवर्य जगन्नाथबुवा पुरोहित,  अजमत हुसेन खाँ बायजी, प्रफुल्ला डहाणूकर,  गोडसे परिवार( सौ. विद्याताई अभिषेकी यांचे माहेर)  या सर्वांबद्दल चरित्राच्या ओघात लिहिले गेले आहे व तेही अत्यंत वाचनीय आहे . पुस्तकात एकंदरीत तेरा प्रकरणे आहेत.  गोव्यातील बालपण,  शहरात येऊन बुवांनी केलेली धडपड,  त्यांचा गुरुयोग आणि आकाशवाणी,  संगीतातील त्यांचे वेगवेगळे प्रयोग,  एक कुटुंबवत्सल गृहस्थ आणि गुरू अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून  आयुष्याचा पट उघडला गेला आहे. बुवांच्या  अलक्षित  नाट्यसंगीत आणि चित्रपट संगीताचा सविस्तर घेतला गेलेला आढावा हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अभिषेकी बुवांचा जन्म ते संगीत मत्स्यगंधा हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा.  या नाटकाने व त्याला दिलेल्या संगीताने बुवांचे नाव प्रसिद्ध झाले.  या टप्प्याबद्दल बुवा स्वतः लेखिकेच्या समक्ष बोललेले आहेत.   मत्स्यगंधा  ते बुवांचा  अकाली मृत्यू हा  नंतरचा टप्पा लेखिकेने त्यांचे कुटुंबीय, मित्र, शिष्य, सहकारी यांच्याशी सविस्तर बोलून व त्याबाबत प्रसिद्ध विविध साहित्य वाचून अत्यंत परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे. 

                 पंडितजींच्या कारकिर्दीचा नेमका आलेख मांडतानाच या पुस्तकाची इतर दोन वैशिष्ट्ये मला भावली :  पंडितजींच्या यशात त्यांच्या पत्नी विद्याताई यांचा फार मोठा वाटा होता .विद्याताईंचे योगदान फारसे लोकांपुढे आले नाही; कारण त्यांची स्वतःचीच तशी फारशी इच्छा नसायची.  त्या स्वतः पदवीधर होत्या.  विदेशात शिक्षण घेऊन ‘सामाजिक व्यवस्थापन’ या काहीशा अनवट विषयात  पदव्युत्तर अर्हता मिळवून त्या आल्या होत्या.  परत आल्यानंतर काही काळ त्यांनी सामाजिक कार्यदेखील केले;  परंतु पंडितजींची कारकिर्द जशी बहरू लागली तसा त्यांनी एका प्रकारे स्वतःच्या या कर्तृत्वाचा  विलय  पंडितजींच्या प्रगतीत केला आणि त्यातच समाधान मानले. त्यांनी ‘लक्ष्मीनारायणाच्या छायेत पुरुषोत्तम’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.  त्यात घरातली माणसे, वाडा, त्या वेळचा समाज, विविध  परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा यांसह त्यांच्या माहेरावर म्हणजेच गोडसे परिवारावर सहज सुंदर भाष्य केले आहे. 

पंडितजींचा  स्वभाव शीघ्रकोपी  होता परंतु  या स्वभावाचा स्वीकार  विद्याताईंनी सहजपणे  केला व बुवांना मनःपूर्वक साथ दिली.  बुवांचे  घर हे एक गुरुकुलही होते. त्यामुळे सतत त्यांचे अनेक शिष्य याच घरात राहून शिकायचे.  या सर्व शिष्यांना आपल्या मुलासमान मानून विद्याताईंनी त्यांच्या प्रगतीवरती  आईच्या मायेने लक्ष ठेवले.  शौनक व मेखला या आपल्या मुलांची प्रगती व्यवस्थित चालू आहे ना यावरही त्यांचे  बारकाईने लक्ष होते.  पुस्तकाच्या निर्मितीदरम्यान लेखिकेने विद्याताईंना बोलते करण्याचा प्रयत्न केला;  परंतु विद्याताईंना  स्वतःविषयी बोलणं जमलंच नाही असा लेखिकेचा अभिप्राय आहे. ‘मी’ला एवढं बाजूला ठेवण्याचा त्यांचा निर्णय फार पूर्वीचा असावा. प्रखर महत्त्वाकांक्षा व कष्ट यांनी डोंगराएवढं यश संपादन केलेल्या बुवांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला विद्याताईंनी आपल्या महत्त्वाकांक्षेला दिलेली तिलांजली हा पाया  आहे हे त्यांचे  भाष्य  फार काही सांगून जाते.  

    पंडितजींना  आपण ओळखतो ते एक ज्येष्ठ गायक व संगीतकार म्हणून; म्हणजे त्यांच्या   सांगीतिक  कर्तृत्वामुळे. त्याहीपलीकडे जाणारे अनेक पैलू पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वात होते ते या चरित्रामुळे आपल्याला समजतात.  त्यांच्यात एक विचक्षण  लेखकदेखील दडलेला  होता.  त्यांनी स्वतः अनेक बंदिशी ‘शामरंग’ या टोपण नावाने लिहिलेल्या आहेत. दीनानाथ दलाल यांच्या ‘दीपावली’ विशेषांकाबरोबरच ‘वसुधा’ या त्या काळातील प्रसिद्ध मासिकाकरिता जितेंद्र अभिषेकी यांनी कथा लिहिलेल्या  आहेत.  त्यांना भटक्या लोकांच्या, महारोग्यांच्या  जीवनावर काही लिहिण्याची इच्छा होती पण ते राहून गेले.  सुप्रसिद्ध संगीतकार मोझार्टवर बुवांना नाटक लिहायचे होते; तसेच तानसेनवरती एक कादंबरी लिहिण्याचेही त्यांच्या मनात घोळत होते.  दुर्दैवाने त्यांचे हे संकल्प सिद्ध झाले नाहीत.  बुवांना वृंदगायन या प्रकारात रुची होती व गोवा कला अकादमीसाठी त्यांनी काही अशा वेगळ्या  वृंदरचना बसवल्या होत्या. त्यांच्यात एक चित्रकला रसिकदेखील दडलेला होता. दीनानाथ दलाल यांच्या संगतीत चित्रांचे रसग्रहण कसे करायचे ते बुवा शिकले होते. असे अनेक मनोरंजक तपशील आपल्याला या पुस्तकात पानोपानी  मिळतात.  

   बुवांच्या जितेंद्र या नावाचे कारणदेखील पुस्तकात दिले आहे.  बुवांचे चुलते महादेव हे राष्ट्रभक्त होते.  त्या वेळी स्वातंत्र्यसैनिक जतींद्रनाथ  दास हे लाहोर  तुरुंगात शिक्षा भोगत होते.  सर्व कैद्यांना समान वर्तणूक मिळावी या मागणीसाठी त्यांनी  आमरण उपोषण केले.  या उपोषणाच्या ६३ व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावावरून स्फूर्ती घेऊन बुवांचे  जितेंद्र हे नाव ठेवण्यात आले.  पंडितजींच्या चौफेर कर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेली आठ परिशिष्टे हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे.  त्यामध्ये पंडितजींना मिळालेले मानसन्मान, त्यांच्या ध्वनिमुद्रिका व ध्वनिफितींची सूची, रेकॉर्ड्स, ध्वनिचित्रफिती यांचा सर्व तपशील दिलेला आहे.  त्यांचे संगीत दिग्दर्शन व देश-विदेशांतले दौरे यांचाही तपशील आहे.  त्याचबरोबर त्यांनी विविध संगीतकारांच्या संगीत दिग्दर्शनात गायलेली गाणीदेखील तपशीलवार दिलेली आहेत.

     कलावंत अभिषेकी व व्यक्ती म्हणून अभिषेकी असे दोन अभिषेकी एका सूत्रात मांडण्याचे आव्हान शैलाताईंनी संयतपणे हाताळले आहे. व्यक्ती अभिषेकींविषयी काही मतमतांतरे आहेत.  त्यांच्या काहीशा  एककल्ली, अंतर्मुख व शीघ्रकोपी स्वभावाचा तो अपरिहार्य परिणाम आहे.  

      जितेंद्र अभिषेकी यांच्याविषयी  बोलताना विजय तेंडुलकर म्हणतात… “ज्ञानाचा तो गुलाम बनतो, पण माणसाचे क्षणिक स्वामित्वही त्याच्या वृत्तीला मानवत नाही.  त्याला चित्रातले चैतन्य हवे  असते, त्याची अपरिहार्य अशी चौकट मात्र कटाक्षाने तो नाकारतो आणि तरीही ती स्वतःला बंधनकारक होऊ लागली तर चैतन्यही नाकारून चालता होतो.  इथे तडजोड त्याला जमत नाही.” 

      अशा एका कलंदर व्यक्तिमत्त्वाला शब्दबद्ध करण्याचे आव्हान शैला मुकुंद यांनी स्वीकारले व  त्यात त्या चांगल्या तऱ्हेने यशस्वी झाल्या आहेत. या पुस्तकातला शेवटचे प्रकरण माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.  अभिषेकी बुवांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. ‘मला आहे असे स्वीकारा,’ हा त्यांचा आग्रह होता.  आजकालच्या व्यावहारिक जगात अशा प्रकारचे आग्रह चालत नाहीत.  तुम्हांला दररोज वेगवेगळ्या तडजोडी करायला लागतात.  त्या न जमल्यामुळे बुवांचे नुकसान झाले असावे. त्यांना अभिजात शास्त्रीय गायक म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती तेवढी  मिळाली नाही. त्यांना संगीतकार म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली;  परंतु ‘या लोकप्रियतेच्या चढ्या आवाजात त्यांच्यातील शास्त्रीय संगीत गायक काहीसा दबला गेला, दाबला गेला,’ हे निरीक्षण बरेच काही सांगून जाते. 

 गिरीश सहस्रबुद्धे यांनी मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी अत्यंत सुसंगत पद्धतीने करून पुस्तक अधिक वाचनीय बनवले आहे.  राजहंस प्रकाशनाची आणखी एक लक्षणीय कामगिरी म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांना पुणे – मुंबई रेल्वे प्रवासात बुवांनी तानसेनबद्दलच्या  त्यांच्या कादंबरीचे संपूर्ण कथानक ऐकवलं होतं. हा लेखन संकल्प प्रत्यक्षात आला नाही; परंतु राजहंस प्रकाशनाने बुवांचा जीवन प्रवास लोकांसमोर आणून एका प्रकारे या चतुरस्र कलावंताला न्याय दिला आहे असे म्हणावे लागेल.   

अभिषेकी 

पंडित जितेंद्र अभिषेकी : कला आणि जीवन प्रवास 

लेखिका :  शैला मुकुंद

राजहंस प्रकाशन, पुणे

पहिली आवृत्ती

किंमत रुपये पाचशे. 

ॲमेझॉन व बुकगंगावरती उपलब्ध. 

Author

One thought on “पुस्तक परीक्षण : अभिषेकी

  1. आमचे गुरू पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या वरील चरित्र ग्रंथ
    “अभिषेकी” या पुस्तकाचे समीक्षण छान लिहिले आहे.

    अनीलजी धन्यवाद.

Leave a Reply