कवी विठ्ठल भाग ३ —अलंकार सौंदर्य
आताच्या काळात कोणी वाचत नाही, लेखनास्वाद घेत नाही ही तक्रार नेहमी ऐकायला मिळते. आश्चर्य म्हणजे सोळाव्या शतकातला विठ्ठल कवीही ही तक्रार करतो. १२९/१२ (शावि)
वाग्देवी! उदरानिमित्त सदरा म्यां पाहिल्या सुंदरा
पैं नोहे जठराग्निशांति विधुरा आला कलौ पाहरा
गर्भांधा बधिरापुढें श्रम पुरा तूं पावलीसी गिरा!
हा माते! अपराध तो कविवरा सर्व क्षमावा बरा.
छंदशास्त्र, सारस्वत व्याकरण जाणणारा असा कवीचा लौकिक. तोच कवी जठराग्निशांतिसाठी भटकत असतो हा दैवदुर्विलास आहे. या कलियुगात केवळ पोटाला चार घास मिळावेत यासाठी काव्याची जाण नसलेले गर्भांध आणि बहिरे यांच्यासमोर शारदेचं कलात्मक सौंदर्य उलगडावं लागतं याचं शल्य विठ्ठलाला बोचत आहे.
विठ्ठलावर सरस्वतीचा वरदहस्त आहे.
१३०/१४ (शा. विक्रीडित)
माझी स्फूर्ती सरस्वती मज म्हणे|
बाळा कवी विठ्ठला!…
भक्ताचे पुरवी मनोरथ हरी संदेह नाहीं दुजा
असं म्हणत स्फूर्तिदेवता त्याला आश्वासित करते. अंतर्मनातून वेगाने येणारे शब्द जिव्हेमधून रसिकांपर्यंत पोचतात म्हणून या जिभेला शब्द नटवण्याची विनंती विठ्ठल करतो.
जिव्हे तूं नटवी तुझे अनुभवी श्रीमंत सन्मानवी
यातली ‘वाणीला नटवी’ ही विनंती महत्त्वाची. वाणीला विविध अलंकारांनी नटवून विठ्ठल कवितासुंदरीला श्रीमंती साज चढवतो. ‘सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी’ रसिकांपुढे सादर करणं हा विठ्ठलाचा ध्यास आहे आणि त्याच्या अतिरेकानं झालेला हव्यासही आहे.
या भागात सालंकृत कवितेचं रूप न्याहाळू या. अलंकार तेच असतात पण प्रत्येक कवीची ते गुंफण्याची पद्धत अनोखी असते.
काही विशेष अलंकार
१)सूक्ष्म अलंकार
काही गोष्टी सूचकपणे सांगितल्या जातात. त्या सगळ्यांना चट्कन कळतातच असं नाही. सूक्ष्म बुद्धी असलेल्यांनाच अशा बोलण्यातली मेख बरोबर समजते म्हणून याला सूक्ष्म अलंकार म्हणतात.
( रसमंजरी – २३७/१२)
हेमजंबीर पैं कांत हातीं धरी
खेळवी त्यासि देखोनियां सुंदरी
सूर्य रेखाटला चित्र भिंतीवरी
चंद्रबिंबाननाबिंदु दे त्या वरी
वाचकहो, यातून एका गुप्त संदेशाची देवाणघेवाण झाली. येतंय लक्षात?
नायकाने सूर्य रेखाटला आणि सूर्यास्ताला भेटू असा संकेत दिला. नायिकेनं त्यावरती छोटा बिंदू देऊन सूर्यास्तानंतर चंद्रोदय झाला की भेटू असा संकेत दिला.
प्रेमाची ही सूक्ष्मतम परिभाषा!
रसमंजरी हे विविध नायिकांचं वर्णन असलेलं काव्य.
वाटसरू उन्हाने दमला आहे. विश्रांतिस्थल शोधत आहे. एका सुंदरीला विचारल्यावर वाणीचातुर्य असलेली वाग्विदग्धा काय सुचवते… २२५/२१
तमालतरु दाटती, बहुत मालती फूलती
सुवाससुख भोगिती भ्रमरपुंजही गुंजती
निकुंज तटिनीतटीं असति, पांथ!
जा त्यांप्रती,
निदाघतपनातपें श्रमति ते तयां सेविती||
यात ‘सुवास’ फुलांचा आहेच शिवाय ‘सु वास’ म्हणजे सुंदर वसतिस्थानही आहे. ‘पांथस्था, तिथे जा, आपल्याला ‘सु वाससुख’ उपभोगता येईल,’ हा सांकेतिक अर्थ. उन्हाळा या शब्दासाठी पृथ्वी वृत्तात बसेल असा, त्यातही अनुप्रास साधेल असा ‘निदाघतपनातपें’ असा जड शब्द योजणं हे भाषाप्रभुत्व थोडं हव्यासाकडेही झुकतं.
२)असंगती अलंकार
घटनेचे कारण एका ठिकाणी आणि त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी दिसतो असं आलंकारिक भाषेत सांगितलं जातं तिथे असंगती अलंकार होतो.
२२३/११ रसमंजरीतली अधीरा मध्या नायिका लाडिक तक्रार करते.
रात्रीं जागर जाहला तुज असे नेत्रीं मला शोणिमा
तूं प्यालास मधूस तें करितसे माझ्या मनीं विभ्रमा
तू रात्र जागवलीस आणि डोळे मात्र माझे तांबारले, तू मद्य प्यायलास आणि माझी मती जडावली. परस्परसंबंध नसूनही संगती असलेल्या प्रेमी जीवांचा असंगती अलंकार.
३)विशेषोक्ती
पाण्यात राहून मासा तहानलेला… सगळी अनुकूलता असूनही हवं ते साध्य होत नाही त्याला म्हणतात विशेषोक्ती. (रसमंजरी२३१/२५) परकीय उत्कंठिता म्हणते,
जालें स्नान घनोदकें वसति पैं केली महाकाननीं
शीतश्चंदन चर्चिला स्मर सदा आराधिला आसनीं
केलें जागरणव्रतासि रजनी लज्जा दिली दक्षिणा
ऐसें म्यां तप साधिलें फळ नव्हे हे प्रोक्त मध्यक्षणा||
खडतर व्रते केली, मदनाचे(स्मराचे) सर्वांग शीतलचंदनाने चर्चिलं. एवढं करूनही डोळ्यांचे समाधान करणाऱ्या प्रियतमाचे दर्शन घडले नाही! ही खट्टू करणारी विशेषोक्ती.
या खास अलंकारांसारखंच शब्दालंकारांचं सौंदर्यही आगळं.
रसाला ‘अनु’कूल ‘प्र’कर्षाने चमत्कृती निर्माण करणारा आस(रचना) म्हणजे अनुप्रास
समान वर्णांची किंवा शब्दांची आवृत्ती होते तेव्हा अनुप्रास अलंकार घडतो.
छेकानुप्रास
शब्दांची आवृत्ती एकदाच होते त्याला छेकानुप्रास म्हणतात. छेक म्हणजे चतुर. आपलं रचनाचातुर्य दाखवायला कवी अशा रचना करतात. ठळक अक्षरे आवृत्तिदर्शक आहेत.
संजोगिला रथ मनोरथपूर्णकर्ता
जो शत्रुसाधन यशोधन सर्वहर्ता
रथ मनोरथ, साधन यशोधन अशी ही आवृत्ती.
(रुक्मिणी स्वयंवर ८०/२८)
परुषावृत्ती अनुप्रास
परुषावृत्तीत जोडाक्षरे, क्र, ग्र अशी र ची जोडाक्षरं, ट, श, ष असे वर्ण प्रामुख्याने येतात त्यामुळे ओजगुणाचा प्रकर्ष होतो.
२६१/१
इष्ट भजक संकष्टसमयिं काष्टांत स्पष्ट तनु धरी
ष आणि ट ची वारंवार होणारी आवृत्ती ओजगुणाची कारक ठरते.
स्वतःलाच मोठं आव्हान द्यायचं आणि ते पेलून दाखवायचं – खेळे आपणाशी आपण – विठ्ठल असा यमकानुप्रासादी अलंकारांत रंगून जातो.
युद्धवर्णनासाठी परुषावृत्ती अनुप्रास; तर शांतादुर्गेची स्तुती करताना प्रसाद गुणाचा कारक य, र,ल ,व , स अशा वर्णांची आवृत्ती असलेला कोमला वृत्ती अनुप्रास रसनिर्मिती करतो. २५४/१३
लसत्कुंकुमविशालभाल मणिजालमालिनी हिमकरवदनी…
भुवनभार खरखलदल निवटुनी भक्त सुरनिकर बसवी विमानीं
विठ्ठलनुत मणिनूपुरयुतपदपद्मभृंग जनकलिमलहरिणी
(विठ्ठलनुत =विठ्ठल कवीने जिची स्तुती केली आहे ती)
१४७/१
मधुरा वृत्ती अनुप्रास अनुस्वारांमुळे खुलतो.
कानीं कांचन कुंडलें कर कटीं कंठी सुमुक्तावळी
भालीं चंदन पीत चीर जघनीं काया खुजी सांवळी
संस्कृत पदात परुषावृत्तीचा ओज आणि मधुरा वृत्तीचा गोडवा साधण्यासाठी ड आणि अनुस्वारांचा प्रयोगही त्याने केला आहे.
२९४
भज भज गजतुंडम् मतिदं मंडितगंडम्
लीलाचालितशुंडादंडम् करधृतरदखंडम्…
द्विषदिदधानमैक्षवदंडम्|विद्यानलकुंडम्|
२०६/२०७
युद्धप्रसंगी उपरती होऊन ‘मोह नियमाला संशय गेला, बोध लाभला’ अशी मनाला परिपक्वता आल्यावर अर्जुनाची स्थिती वर्णन करताना विठ्ठल कटिबंध आणि अनुप्रास यांची जोमदार मांडणी करतो.
तंव तो आला, आवेशाला, ताव मिशाला, देउनि शाला, जगदीशाला, वदे वशाला, या अश्वाला,….
घडवि यशाला, अन्यपिशाला, गणशाशाला, धुंडवि दिशाला
शाला या अक्षरांचा अनुप्रास खरोखर आवेशाला जन्म देतो.
लाटानुप्रास हा आणखी वेगळा प्रकार वामन पंडितांच्या रचनेत आपण वाचला आहे. आधीच्या शब्दाला जोडशब्द लागला की त्याचा अर्थ बदलतो असा लाटानुप्रास. रजनी म्हणजे रात्र. तिला कर लागला की रजनीकर म्हणजे चंद्र, हरिणी हरिणीनयना, कमळा कमळाक्ष अशी मौज दिसते.
१७०/२६ ठळक अक्षरे लाटानुप्रास दर्शवतात.
रजनी रजनीकर हारमणी
रमणी रमणी जैशा हरिणी
हरिणीनयना तितक्या कमळा
कमळाक्ष निरंतर त्या जवळा
अनुप्रासाच्या मांदियाळीतल्या अंत्यानुप्रासात शेवटची अक्षरे सारखी असतात.
२५२/७
ये ये ये ये ये ये दीनबंधो कृपासिंधो आज
मी बहुत श्रमतसें धांव, तुझी जाताहे लाज
मज नयनीं पाहसी दीन; किती मी देऊं वाज
पशुच बरा द्विज दराज विन उन करुनि घे काज
गणिकादिक किति निवडूं दुष्कृति जंतुसमाज
६/५१ विठ्ठलाचा अनुप्रासाचा सोस कधी कधी हसू आणतो.
बटू वामन बळीला म्हणतो, एकदा दिलेला शब्द फिरवू नको…
अनृत वदावें तरि मज संकट तें काय? आज वद गुरुजी!
वाग्दत्त जाहल्यावरि मजवरती व्यर्थ करिसि गुरगुर जी.
अनृत, वाग्दत्तसारखे भारदस्त शब्दांच्या योजनेनंतर ‘गुरुजी’ला ‘गुरगुरजी’ असा अंत्यानुप्रास जोडलेला वाचून पुलंच्या प्राचीला गच्चीची आठवण होते.
यमक
दोन किंवा अधिक सारखी अक्षरे काव्याच्या शेवटी किंवा एक किंवा अधिक अक्षरे यतीवर आली की यमक हा मनोवेधक गेय अलंकार होतो.
२४६/३
यवन कबिर या नामें मोमिन हरिभक्त मान्य विश्वासी
काशीवास करुन तो श्रीहरिगुरुभक्तिमाजि विश्वासी
विश्वाला आणि विश्वास ठेवणे यांचं छानदार यमक विठ्ठलाने योजलं आहे.
यतीवर येणाऱ्या पुष्पयमकांची पुष्पमालाच विठ्ठलाने साहित्याला अर्पण केली आहे. यांतली बरीचशी रचना स्रग्धरा या २१अक्षरी वृत्तातील आहे. ( चाल : ध्याये नित्यं महेशम्)
१५४/२
सर्वात्मा जो अनादी सुत उपनिषदी गाइला सामवेदीं
खेळे लीला विनोदीं जडजन सपदीं उद्धरी, दुःख नेदी
ज्याचे पादारविंदीं जनित सुरनदी, तीर्थ भूतेश वंदी
नेणो पादारविंदीं भ्रमरिणि कुमुदी स्रग्धरा हे निवेदी
षा या अक्षराचं आव्हान पेलत विठ्ठल रचतो (९१)
वक्त्रीं पूर्णेंदु तोषास्तव धरि धनुषाकार सुभ्रू विशेषा
हेमांगी रत्नभूषान्वित चपलझषा साम्य दृग्बाणलेशा
‘ढ’ चं पुष्पकयमक रचण्यातही आपण वरचढ आहोत हेही सिद्ध करतो
१०३/५१
प्रौढा मुग्धा नवोढा कुवलयनयना नूतना दिव्य सोढा
या गोष्टी ज्ञानगूढा सकळ परिशिल्या भूतळामाजि रूढा
हे कमीच म्हणून की काय एक आव्हान ‘क्षा’चं
१०३/५२
आतां इंदीवराक्षा!त्यजिं रुकमिणीची आस सायास कांक्षा
चोरा लावीन शिक्षा बहु दिन करितों संगराची अपेक्षा
राजे गेले उपेक्षा करुनि म्हणउनी तूझी घेतो परीक्षा…
१०५/८ अशीच ‘डी’ने डिवचून दिलेली तगडी सलामी
बाणी दंडीन लंडी म्हणउनि तवकें
तूणिरातें उलंडी
गर्जे ठोकोनि मांडी धनुष धरुनियां विक्रमें ठाण मांडी…
१०५/९
सक्रोधें राजसूनू दृढ धरुनि धनू
बाण लावी उधानू
यात नूचं यमक साधताना उधानू म्हणजे ३ हा नंद भाषेतला शब्द योजला आहे.
१३५/२९
गेले जन्म वृथा धरा व्रतकथा बैसोनि विष्णूरथा
जा सेवा प्रमथाधिपा प्रिय मथा गीतार्थ शब्दोल्लथा
असा थला थारा देणारा अनुप्रास.
१५६/६ मालिनी( चाल : वदनि कवळ घेता)
फुलित निबिड जाई ये स्थलीं आजि बाई
जवळि चरती गाई भोवती दाट छाई…
असं ई चं यमकही वाचायला मिळतं.
२०२
जिवलग मित्रा स्पर्शुनि गात्रा विकसित नेत्रा
धरि करि तोत्रा ज्ञानदमुद्रा दावुनि भद्रा
असा त्रा/द्राचा अनुप्रास असलेला कटिबंध तर कधी
णी अक्षराचा पुष्पक अनुप्रास .
२४/२६ (शा. वि.)
श्रीसूर्यग्रहणीं समेत तरणी साधावया पर्वणी
गेला वैतरणीस गौतममुनी स्नानास संतर्पणी
मोक्षांती गृहिणीस पाककरणीं धाडी पुढे तेक्षणीं
होता तो तरुणीस इंद्र टपणी तो पातला अंगणीं
अशा आव्हानात्मक रचना वाचणं, क्लृप्त्यांना दाद देत चालीवर गुणगुणत आस्वाद घेणं हे आनंददायी ठरतं.
दोन अक्षरांच्या यमकांपासून सप्ताक्षरी यमकापर्यंतचं त्याचं शब्दकौशल्य वादातीत आहे.
द्व्यक्षरी आणि त्र्यक्षरी यमक
२८७/१००
श्रीहरिलीला|करी सुंदर धरि मुरलीला
स्मरणें ज्याच्या आजि भलीला
किती सुरनर जीभलीला
(जीभलीला म्हणजे स्तुती)
चार अक्षरी यमक
१५८/२३( पूत-पवित्र)
जो अंगसंगें करि पूत नारी
तो कां न ये गे सखि! पूतनारी
चार अक्षरी
६/४९
बटुसा तुज गमतो परि तंतुचि हा विश्वमायिकपटाचा
विबुधहितास्तव धरिला वेष, तुला वंचनार्थ कपटाचा
पाच अक्षरी
बटूला बळीराजा सांगत आहे… ५/४१
पैसा (वित्त) किंवा सोनं, घोडे, गावे मागावे
जें जें वांछिसी चित्तीं तें तें निःशंक
वित्त मागावे
कांचन रथ गज वाजी किंवा घे
ब्रह्मवित्तमा गांवें
सहा अक्षरी यमक
४/३२
नयनीं फुटल्या रसना त्यांतें गमला सुधासुरसभेला
तो ब्रह्मवर्चसें बटु रुचला राया
बुधा! सुरसभेला
(सु) धा सुरस भेला-मधुर रसाळ गुळाची ढेप
(बु) धा सुरसभेला- बुद्धिमान देवसभा
सात अक्षरी यमक५/३९
बटुचरण प्रक्षालुनि घे माथां भूप
दुरितहर जळ तें
जेणें शशिधर खरगर निववी
स्वशरीरपुरितहर जळतें
समुद्र यमक
१६५/३४
पहिला आणि तिसरा पाद सारखा, दुसरा आणि चौथा सारखा पण अर्थ वेगळा असलेलं समुद्रक यमक विद्वज्जीवनमध्ये बुद्ध्या गुंफले आहे. हे वाचणारे सर्व विद्वान असल्याने अशा काव्याचा आनंद ते लुटतील अशी विठ्ठलाची अपेक्षा असेल.
वनीं गोवळी लाल सारंगपाणी,
हरी मोहरी लालसा रंगपाणी
वनीं गोवळी लाल सारंगपाणी
हरी मोहरी लाल सारंगपाणी
कविकल्पना आणि रुचिवैचित्र्य यांचा सुघड संगम म्हणजे अर्थालंकार. विठ्ठलाने योजलेले अर्थालंकारही बोलके आहेत.
ज्याची उपमा द्यायची ते आणि ज्याला द्यायची ते एकरूपच आहेत असं सांगणारं रूपक १४९/१४
वनकुंजात वसंत बहरला आहे.
वसंत ऋतू हा नवरा, सगळ्या वल्ली या वधू आहेत त्या खुलून गेल्या आहेत असं मनोहर रूपक! (शा. वि.)
श्रोते हो! वनकुंज त्यांतिल महा तेथें ऋतू नोवरा
आलासे मलयानिल द्विपिंहुनी बैसोनि त्या सैंवरा
वल्ली मात्र कलत्र वृक्ष तितुके पौरस्त साधू वनी…
मंगलाष्टकांचे कुहू कुहू शब्द ऐकू येत आहेत. हे लग्न लागतंय विरहाग्नीच्या साक्षीने. एका वर्षाचा हा वसंत ऋतूचा विरह. अतिशय सुंदर रूपक आणि वधूसाठी योजलेला कलत्र हा शब्द – ‘मात्र कलत्र’ असा अनुप्रास साधतोच शिवाय शार्दूलविक्रीडित या खास मंगलाष्टकांसाठी गायल्या जाणाऱ्या वृत्तात चपखल बसतो.
९७/१५
रुक्मिणी स्वयंवर प्रसंगी सज्ज असलेल्या सेनेसाठी धैर्याचा पोशाख, हृदयात सत्त्व, हातांत शौर्यकंकण असे यथातथ्य रूपक योजले आहे.
धैर्याचें परिधान वस्त्र जघनीं
सत्त्वोपमा कंचुकी
ल्याली विक्रमकंकणें मणगटीं
शोभे चमूकामुकी —
दोन तुलनात्मक विषयांमधील सारखेपणा दाखवणारा दृष्टांत अलंकार –
द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी सिंहीण आणि कोल्हा, बेडूक आणि साप, गाढवाच्या गळ्यात रत्नहार, डुकराला कस्तुरी अशी दृष्टान्तांची विलक्षण योजना विठ्ठल करतो.
१९०/१३२
सिंहसुंदरी काय जंबुका? भेक इच्छिती व्यालनायिका|
रत्नमालिका काय रे खरा|काय कस्तुरी ग्रामसूकरा?
१६८/१०
श्रीकृष्णाभोवती सगळे नाचत होते, मुरलीच्या मधुर रवाने मुग्ध झाले होते. परस्परांमधील हेवेदावे गळून गेले होते.
निर्वैरता प्रगटली सखि! सर्वभूतीं
एकीं स्थळीं नकुळव्याळ सुखें असेती.
अहिनकुलाचं एकत्र येणं या अशक्य घटनेचा दृष्टान्त विठ्ठल देतो.
उपमा ३०६/२४
द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी
‘नृपाज्ञेनें दुःशासन वसननीवी श्लथ करी’
निरी सैल करतो; तर आत आणखी एक वस्त्र दिसते. एक एक पदर खेचता नवे वस्त्र दिसते. विठ्ठल अगदी समर्पक उपमा देतो.
जसे रंभास्तंभा पदर निघती वेष्टित पुटें
तसीं कृष्णा वस्त्रे प्रसवति विचित्रें अनुसुटें
रंभास्तंभ म्हणजे केळीचा खांब. त्याचा एक पदर काढला की आत आत अनेक पदर दिसायला लागतात. ही निसर्गउपमा या प्रसंगी चपखल बसते.
केळीची उपमा आणखी एका प्रसंगी दिसते. बिल्हण चरित्रात(२१२/४०) त्यांच्या शृंगाराची चोरी उघडकीस येते तेव्हा शशिलेखा ही राजकन्या कापू लागते. विठ्ठल म्हणतो,
“हें आयकोन उगली नरनाथबाळी
कांपे शरीर पवनें जशि बाळकेळी”
रुक्मिणी सुदेवाची आणि श्रीकृष्णाची आतुरतेने वाट पाहत असते,
‘उद्या लग्न केली उपेक्षा मुकुंदें|
जळें स्रावती नूतनें नेत्रकुंदें
अशा अवस्थेत ती पुन्हा पुन्हा दाराकडे येरझार करत असते. तिच्या अवस्थेला गाईची उपमा विठ्ठल देतो. ८३/१८
वत्सालागोनि गाये हुमरत जसि ये, रुक्मिणी तेंवि होये’
यातही त्याने स्रग्धरा वृत्त, उपमालंकार आणि ‘ये’ अक्षराचे मध्ययमक असा साज कवितेला चढवला आहे.
स्वभावोक्ती अलंकार
बिल्हण आणि शशिलेखा यांची प्रीती
उघडकीस आल्यावर ‘शूलाग्ररोहण’ ही शिक्षा बिल्हणला द्यायची ठरते. ती शिक्षा बघण्याचं औत्सुक्य प्रत्येकाच्या मनात असतं. स्वभावोक्ती अलंकारातून तिथे जमलेल्या प्रेक्षकांच्या हालचाली आणि भावना विठ्ठल रंगवतो.
२१३/५३ (वसंततिलका)
कोणी कटीं वसन खोवुनि एक हातें
कोणी करें धरुनि मुक्तहि कंचुकीतें
वेण्यार्ध गुंफित नितंबिनि एक आली… एक जण
तांबूल घेउन उभी करिं राजपंथीं
गुंफीत हार करिं सूत्र विमुक्तग्रंथी
गाठ सोडवत होती.
कोणी उभ्या धरुनि कंठ परस्परें ही
कोणी गवाक्षविवरांतुनि देखते ही
विविध न्यायांचेही समर्पक उपयोजन विठ्ठलाच्या रचनेत दिसते.
३६/६
प्रचंड धनुष्य सभेत दाखल झालं. जनक उठला आणि म्हणाला, ‘ जो यातून बाण सोडेल त्यास ‘शाली – मैथिली माळ घाली’
हे ऐकल्यावर
‘अजासर्पन्यायें नृप धनुष देखोनि विटले
स्फुरद्रोमा अंगीं पुलकित गलद्बिंदु सुटले’
अजा म्हणजे शेळी. सापाला बघून शेळी जशी भयभीत होते तसे सर्व राजे भयभीत झाले.
१७८/१८
कृतक् प्रेमाने दुर्योधन धर्मराजाला राजसभेत निमंत्रण देतो तेव्हा धर्माच्या मनात शंका येते. पण त्याला भेटावे असेही वाटते. बुद्धी आणि कुबुद्धी यांतला भेद मांडताना
‘क्षीरनीर नीवडीति राजहंस ज्यापरी’ अशी न्यायोपमा उपयोजितो.
यथा कर्म तथा चक्र हा न्याय ४२/४५
स्पर्शें सिताच्या बळहीन केलें
कोदंड तोली तंव धैर्य गेले
सिता म्हणजे दोरी. रावणाने धनुष्याच्या दोरीला स्पर्श करताच त्याची भीतीने गाळण उडाली. गोळा केलेलं धन चोरांनी पळवून नेलं तसाच न्याय रावणाच्या बाबतीत झाला. यात सिता सीता यातला श्लेषही महत्त्वाचा आहे.
नाट्यालंकार हा अतिशय महत्त्वाचा अलंकार विठ्ठलाच्या काव्यात उठून दिसतो.
कथाकाव्य याचा अर्थ काव्यातून कथा फुलवत नेणे. कथेचा महत्त्वाचा भाग म्हणजे नाट्य. विविध भावनांच्या प्रदर्शनातून नाट्य आकाराला येतं आणि त्यातूनच रसनिर्मिती होते. रामायण-महाभारतांतील स्वभावदर्शन, विचारदर्शन, शत्रुत्व, प्रेम अशा भावभावनांनी रंगलेलं नाट्य विठ्ठलाला मोहवत होतं. प्रेक्षकांनाही उपदेशापेक्षा असं रसांनी रसरसलेलं नाट्य वाचायला आणि डोळ्यांसमोर कल्पनेनं रेखायला आवडत होतं. नाट्याची पार्श्वभूमी, पात्रांचे स्वभावगुण, प्रसंगोपात प्रतिक्रिया यांचा गोफ गुंफत सघन कलाकृती वाचकांसमोर जिवंत उभी करणं हे कथाकाव्यकाराचं महत्त्वाचं काम. विठ्ठल थोडक्या शब्दांत पात्राचं व्यक्तिमत्त्व चितारतो, इतर पात्रांच्या प्रतिक्रिया दाखवतो, संताप, आनंद, भीती असे भावभावनांचे परस्परविरोधी खेळ दाखवतो. प्रसंगांत रंगभरणी करतो. उत्कंठा ताणून धरणारं नाट्य घडावं यासाठी तो वाग्देवतेला साकडं घालतो. ३५/४९
वाग्देवते! हरिकथे नटि होइं साचे
तू मूर्तिमंत रसनेवरि सज्जनांचे
संघर्ष, फसवणूक अशा जंजाळातून नायिकेचे अडकणे, फरपट होणे हे एका बिंदूपर्यंत ताणून हलकेच नायकाचा दमदार प्रवेश दाखवून भय, चिंता, व्याकुळता यांच्या सावटातून वाचकाला बाहेर काढणे याचा तोल विठ्ठल सुरेख सांभाळतो.
नायक आणि खलनायक यांचा अंतिम संघर्ष रंगवण्यासाठी नायकाचा सुशांत स्वभाव आणि विरोधाभासी खलनायक हे दाखवणे तेव्हा महत्त्वाचे होतेच; नाट्य सुरुवातीच्या पायरीवर असल्याने त्यात खलनायकाचा स्वभाव भडक बटबटीत आणि नायक सद्गुणांचा पुतळा अशाच धर्तीवर रंगत असे. विठ्ठल स्वतः सूत्रधाराच्या भूमिकेत शिरतो. त्याच्या कथनातून प्रसंग समोर साकार होत जातो. रंगमंचावरचं सादरीकरण ही प्रेक्षकाच्या दृष्टीने परकी कलाकृती असते – म्हणजे कलाकारांच्या अभिनयातून रस निर्माण होतो तो वाचकांच्या मनाला जाणवतो, भिडतो. कथाकाव्यातही नाट्य असतंच; पण ते वाचकानं वाचताना अनुभवत जायचं असतं. वाचक शब्दांच्या माध्यमातून स्वतःच कल्पनासृष्टी उभारतो आणि ती दुनिया अनुभवत जातो.
३६/२
सीता स्वयंवराला सुरुवात होते
‘सदसिं धनुष आणा’
सभेत धनुष्य कसं आणणार? धनुष्याचा अवजडपणा किती… इथे नाट्यातील विठ्ठल सूत्रधार सांगतो – चौदाशे मत बैल, रानखुळगे सोळाशते जुंपिती… १४०० माजलेले बैल ते धनुष्य ओढून आणायला जुंपले आहेत.
मनप्रतलावर बैलांची प्रतिमा कोरली जाते.
जेठी लोटिति सा सहस्र धनुषा सायासिं तें आणिलें
सहा हजार बलाढ्य माणसांनी धनुष्य आणून ठेवलेलं दिसतं. धनुष्याची पूजा होते आणि
जनक येऊन सभेत सांगतो
भृगुपति गुण चापा ज्या चढे त्यालाच
सीता माळ घालेल!
स्वयंवराचा पण असा भयंकर. विठ्ठलाच्या काव्यमंचावरही मरणप्राय शांतता पसरते. ३६/६
मृतच्छाया आली अचुक भय पोटांत भरलें
शरीरें प्रेतांचीं धरुनि म्हणती आयु सरलें
हे वाचताना दृश्य मनात साकारणं हा झाला कथेला चढवलेला नाट्यालंकार…
‘दाहा तोंडें कराळें’ असा खलनायक!
काव्यमंचावर प्रवेशतो. दुसरीकडे
विठ्ठलरूपी सूत्रधार सीता आणि तिच्या सख्यांची धावपळही विठ्ठल दाखवतो. विविध देशांच्या राजांच्या वर्णनातून वातावरण निर्मिती करतो. सज्जातून डोकावणाऱ्या सीतेची दृष्टी श्रीरामावर पडते. त्याला पाहिल्यावर सीतेचं मन त्याच्यावर जडतं. धनुष्य उचलायला तयार झालेला रावण दिसताच ती भयभीत होते. ती परकरी पोर हात जोडून मही मातेची – विनवणी करू लागते. ही विनवणीही तिच्या वयाला साजेशा शब्दांमधली! ४१/३७
देवद्रोहक हा छळीं क्षितितळीं पाडी उताणा वरी|’
त्याच्या उरावर ते धनुष्य पडेल असं कर. ती परशुरामाची आळवणी करते
‘विसभुजिं उचलीतां मी न वांचेन पाहें…
जर या रावणानं धनुष्य पेललं तर मी जिवंत राहणार नाही.
कथा आपल्याला माहीत असूनही कवीने वापरलेली वृत्तं, सीतेचं करुणा भाकणं यांमुळे उत्सुकता ताणली जाते, प्रकर्ष साधला जातो. शब्द जिवंत होऊन अभिनय – अर्थाकडे घेऊन जात असतात. अहंमन्य रावणाचा रंगमंचीय अवकाशातल्या मुख्य ठिकाणी प्रवेश होतो. नाट्य समोर घडत असल्याप्रमाणे त्याच्या बारीक सारीक हालचालींच्या तपशिलातून तो जिवंत होतो.
जानू टेंकुनि भूमिसी भुजबळें तोलूनि पाहातसे…
पोटीं धाक न माय कंप सुटला गुल्फावरी आणिलें
पायाच्या खोट्यावर धनुष्य ठेवावं लागलं. ते पेललं नाही…
त्याच्या झोकें उताणा क्षितिवरी पडला नाद धात्रीं विझाला!
हे सगळं जीव मुठीत धरून बघणारी सीता…तिचं मन आनंदतांडव करू लागलं
सीतामानस फार तांडवनटें नाचे महा हर्षला…
नंतर रघुवीर धनुष्य उचलायला येत आहे हे सीता बघते. इथे विठ्ठलाने तिची आतुरता, अस्वस्थता, बेचैनी सुंदर रेखाटली आहे. आता ती परत पृथ्वीची प्रार्थना करते… तू रामाला साह्य कर,
अरे धनुष्या तू हलका हो,
शेषा तू बाण ओढायला मदत कर… परकऱ्या पोरीची निरागस प्रार्थना या नाट्याला कोवळा वळसा देते.
रस, शब्दचित्र आणि वाचकाची कल्पनासृष्टी यांतून खुलत जाणारा हा नाट्यानुभव!
जग ही रंगभूमी आहे आणि मानव कलाकार आहेत; पण सारी नियतीच्या हातांतली बाहुलीच आहेत असं विठ्ठल समजावतो.
१०१/४१
स्तंभसूत्र करणार लाघवी
बाहुल्या असु नसोनि नाचवी
जैत्य हार अवघी नटाकरीं
युक्तिनें मुरडि, कोप आवरीं
असं अंतिम सत्य विठ्ठल सांगून जातो.
(असु – प्राण)
२१० बिल्हण चरित्रात विठ्ठल बिल्हणाचं कौतुक करताना म्हणतो,
‘प्रज्ञा प्रगल्भ, कवितारसवृत्ति मोठी
संतोषले नृप सभासद धूर्त पोटीं
छंद प्रबंध यमकें पदबंधदीक्षा
वेदोक्त संस्कृत गिरा प्रभु दे परीक्षा’
हे वर्णन विठ्ठलाचंच असावं असं वाटतं.
तो मात्र स्वतःकडे न्यूनत्व घेऊन म्हणतो,
‘ये ग्रंथीं कविधर्म बाधती चुका चित्तीं कदा नाणिजे…
श्लोकार्थीं पदबंध दोष न निघे ऐसें घडेना कधी
रूपे कोकिल कोळसा परि सखे! तो वंद्य केला बुधी
अलंकाराचा अतिरेक हा जरी विठ्ठलाचा दोष असला तरी त्याची कल्पकता, नाट्यपूर्ण रचना हे वाचकाला खचितच गुंगवून ठेवतं. पुढच्या भागात विठ्ठलाची कलाकुसर बघू या विविध बंधांमधून.
संदर्भ
अलंकार चंद्रिका (गणेश मोरेश्वर गोरे)
विठ्ठलाचे समग्र साहित्य
(वा. दा. ओक)
