या वेळचे मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत इचलकरंजी येथील स्वानंद कुलकर्णी. आपल्या छायाचित्राविषयी ते म्हणतात :
सोनटक्का पाहिला की जाणवते त्याच्या पाकळ्यांची नाजूक तलमता, हर्षद गंध, स्नेहल शुभ्रता, पारदर्शी नितळता आणि रेशीमता.
फुले ही सोबत आनंदऋतू घेऊन येतात. दैनंदिन जगण्यातील ताणतणावांनी खडबडलेल्या मनाला नाजूक तलमता देतात. गंधहीन भावनांना हर्षदायी सुगंध देतात. अंतरंगी दाटू पाहणारा तमाचा काळोख दूर सारून तेथे स्नेहल शुभ्रता आणतात. सत्य असत्याच्या हिंदोळ्यावर हेलकावताना पारदर्शी नितळता जपतात आणि मुख्य म्हणजे एकमेकांच्या मनांना रेशमी जिव्हाळा देत नात्यांची वीण घट्ट करतात. सोनटक्क्याचा गंध आपल्या अंतरंगातील संवेदनांचे झरे प्रवाहित करतो. दलदलीत झुडूप होऊन येणारा आणि भरगच्च कणीस होऊन राहणारा, अनेक फुलांच्या समुच्चयाने एकत्र फुलणारा सोनटक्का जणू आनंदी सहजीवनाचा अर्थ आपल्याला सांगतो.
