
नमस्कार!
मी डॉ. ऋजुता उत्पात – गोळवलकर – मनोविकारतज्ज्ञ – आता तुमच्या भेटीला येणार आहे अंतर्नाद या डिजिटल मासिकाद्वारे!
तुम्ही म्हणाल मनोविकारतज्ज्ञ आमच्या भेटीला? कशासाठी?
खरं म्हणजे आता अशा प्रकारच्या प्रतिसादाची आता सवयच होऊन गेली आहे. असो!
मला सांगा तुम्ही Health conscious म्हणजे तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात ना? तुम्ही म्हणाल, “अहो डॉक्टर हा काही प्रश्न झाला का? आम्ही फार particular आहोत आमच्या फिटनेसबद्दल. दरवर्षी आम्ही सगळ्या तपासण्या करतो आणि त्या सगळ्या नॉर्मलच असतात बरं का!”
आता माझा पुढचा प्रश्न, “तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम आहे पण तुमच्या मानसिक आरोग्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?”
“ऑं! मानसिक आरोग्य? आमचं? अहो डॉक्टर आम्ही सुशिक्षित चांगल्या घरातील लोक आहोत; आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे – आम्हांला कशाला होतील तसले त्रास ?”
तर वाचक हो, आम्हां मनोविकार तज्ज्ञ डॉक्टरांना याचाच तर खेद वाटतो, की आपल्या भारतीय समाजामध्ये माणसाचे मन, मानसिक आरोग्य, मानसिक आजार आणि मानसोपचार यांबद्दल मोठ्या प्रमाणात अज्ञान आणि गैरसमज आहेत.
‘डॉक्टर, माझ्या बायकोला कशाला डिप्रेशन येईल; सगळं घर तिच्या ताब्यात आहे, हाताशी पैसा आहे, घरकामाला नोकर आहेत; मग तिला कसला त्रास?
“अवो मॅडम, ह्यो आजार नव्हं लागीर हाय. तुमच्यान न्हाय व्हायचं ह्ये.”
“मॅडम मी स्वतः डॉक्टर/वकील /CA आहे. मला थोडा स्ट्रेस आहे; बस! पण मला उपचारांची गरज नाही.
“माझं BP थोडं वाढलंय पण आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तुमच्याकडं कशाला पाठवलं?”
असे संवाद दिवसातून एक दोनदा तरी आम्हांला ऐकावेच लागतात; म्हणूनच मनाचे आरोग्य आणि मनाला होणारे त्रास याबद्दल तुम्हां सर्वांशी संवाद साधण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यांना असणारा stigma दूर करून शास्त्रोक्त माहिती सहज सोप्या भाषेत देण्यासाठी मी येत आहे – ‘मन वढाय वढाय’ या लेखमालिकेतून.
मानसिक आजारांबद्दलचे समाज गैरसमज, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, ओ. सी. डी., निद्रानाश, व्यसनाधीनता असे विविध आजार; शिवाय मुलांची मानसिक जडणघडण, महिलांचे मानसिक त्रास, ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक त्रास अशा विविध विषयांचा आपण मागोवा घेणार आहोत.
तर मंडळी, भेटू या जानेवारी महिन्यापासून अंतर्नाद डिजिटल मासिकामधील ‘मन वढाय वढाय’ या लेखमालिकेद्वारे !!
धन्यवाद !
