वैकुंठेश्वराला गेलेली मंडळी पांगली. पैठणकर प्रकाशला घेऊन निघाले; बरोबर आणखी चार जण होते. पावसात सगळे भिजलेले. जिना चढून वर आले.
बाहेरच्या खोलीत सतरंजी घातलेली. सगळे बसले. आतून कोणीतरी चहा आणला.
प्रकाश खचून गेलेला. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीनं तो गांगरून गेलेला. आपलं आता होणार कसं? हा प्रश्न त्याच्या समोर आ वासून उभा राहिला. आई आणि धाकटी भावंडं डोळ्यांसमोर सारखी दिसायला लागली.
पैठणकर म्हणाले, “चला, अंत्यविधी व्यवस्थित पार पडला.”
“हो. खर्च कोणी केला, ते मात्र कळलं नाही.”
“तुझ्या बाबांचे अनेक मित्र. त्यांतल्याच कोणीतरी पुढाकार घेतला असणार. कळेल यथावकाश.”
“हो, पण तो मला परत करायला हवा.”
“निश्चितच.”
“शिवाय पुढचे दिवस आहेत – दहावा, बारावा…”
“तुझा बाबा जुन्या वळणाचा. शास्त्राप्रमाणं होऊ दे सगळं.”
“तो खर्च मोठाच असणार, नाही?”
“तू काळजी करू नकोस. अशा वेळी कोणी तरी उभा राहतोच.”
“मला नोकरी आत्ताच लागलीय. देईन मी परत थोडे थोडे करत.”
“तुझा बाबा अल्पायुषी ठरला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना गेला; नाहीतर भविष्यातील या खर्चाची तरतूद त्यानं निश्चितच करून ठेवली असती. फार धोरणी होता तो.”
प्रकाशच्या डोळ्यांत पाणी आले.
तिसरा दिवस. माती सावडण्याचा कार्यक्रम झाला. त्या दिवशी प्रकाशची आई पैठणकरांजवळ दबक्या आवाजात आपली आर्थिक विवंचना सांगत होती. तेवढ्यात किण्ण असा आवाज झाला. खिडकीत कावळा आलेला. मान वाकडी करून तिरळ्या डोळ्यानं खोलीत डोकावून बघत होता. किण्ण आवाज करून पडलेली वस्तू घरंगळत कपाटाखाली गेली. दिसेनाशी झाली. तसं कावळ्यानं काव काव केलं.
पैठणकर म्हणाले, “त्याला कोणी घास द्या रे.”
प्रकाशच्या हातून पोळी घेऊन कावळा पसार झाला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच.
बरोब्बर बारा वाजता कावळा खिडकीत आला. किण्ण असा आवाज झाला; मग काव काव करून घास घेऊन कावळा उडून गेला.
हे असं चालू राहिलं. किण्ण आवाज कशाचा येतोय हे एकदा बघू या तरी म्हणून आईनं लांब मुठीचा झाडू घेतला. कपाटाखालून फिरवला. तसे चार – पाच तुकडे खणखणत बाहेर आले. ते काय तेच आधी कळलं नाही. सगळे कळकट, मेणचट; मग उमगलं ते सारे चमच्याचे तुकडे होते. एक धड नाही.
एक दिवस आईनं पैठणकरांना तुकडे दाखवले.
पैठणकर हसायला लागले, म्हणाले, “कावळ्याचं वागणं कळत नाही. आमच्या खिडकीत मी पाखरांसाठी चारापाणी ठेवतो. अनेक चिमण्या पाखरं येतात. कावळादेखील येतो. येताना काहीतरी घेऊन येतो अन् पाण्यात टाकतो.”
“अगो बाई!”
“कधी खारवलेला मासा नाही तर हाडूक…”
“कशासाठी?”
“मला वाटतं, भिजवून मऊ करून खाण्यासाठी असणार. थोड्या वेळानं तोच कावळा परत येतो आणि आपली चीजवस्तू घेऊन जातो.”
“कमालच आहे.”
आईच्या मनात काय आलं, उठली. तिनं डब्यात साठवलेले मोडकेतोडके चमचे खाली ओतले. त्यात फक्त तीनच चमचे चांगले दिसले. ते तिनं स्वच्छ करायला घेतले.
कळकट मेणचटपणा नाहीसा होताच ‘ब्रासो’ लावल्यासारखे चमकायला लागले. चांदीच होती ती. लख्ख प्रकाश पडावा तसे सर्वांचे चेहरे उजळून निघाले.
खरंच, प्रकाशची चांदी झाली होती.
**********************************************
विद्याधर म्हैसकर
कोयना वसाहत,
कऱ्हाड.
मो. नं. : ९४०३३४८२२६
२०/८/२०२४
