मंडळी,
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.
या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी :
सध्या जग दोन युद्धांच्या गर्तेत सापडले आहे. युक्रेन आणि गाझा येथे जे काही चालले आहे ते आपण हताशपणे पाहण्याशिवाय काही करू शकत नाही. नुकतीच वैशाली करमरकर यांची एक मुलाखत मी ऐकली. त्या एक आंतरसांस्कृतिक विश्लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या विवेचनात युद्धाच्या चार-पाच कोटी सांगितल्या आहेत. इंटरनेट संवादाचा वेध घेऊन तेथे शत्रूचे अस्तित्व गृहीत धरून यांत्रिक पद्धतीने स्वयंचलित क्षेपणास्त्रांचा हल्ला ही त्यांतली सगळ्यात आधुनिक कोटी – यातूनच युक्रेन आणि गाझा येथे हॉस्पिटल किंवा शाळांवर हल्ले झाले असावेत.
WAR : How Conflict shaped us? हे मार्गरेट मॅकमिलन यांनी लिहिलेले पुस्तकदेखील नुकतेच वाचण्यात आले. त्यात लेखिकेने युद्धाच्या अनेक पैलूंचा विचार केला आहे. आपल्या जगाचा इतिहास, वर्तमान व भविष्य हे युद्धांवरच अवलंबून आहे का काय हा प्रश्न हे पुस्तक वाचल्यानंतर मनात येतो.
या वेळेचा प्रश्न आहे,
युद्धपिपासा हा मनुष्य स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे का?
उत्तरासाठी शब्द मर्यादा ३०० शब्द.
अंतर्नादचे मार्गदर्शक व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचे याबाबतचे मत असे :
काम, वात्सल्य, प्रेम यापेक्षाही हिंसा ही मानवाच्या मनातील अधिक प्रबळ अशी भावना आहे आणि या तीनही गोष्टी हस्तगत करण्यासाठी आणि आपल्या हातांत ठेवण्यासाठी हिंसा हेच त्याच्या मनातील प्रमुख साधन असते. ज्याची अधिक हिंसा करावयाची ताकद तोच शेवटी खरा चांगला राजा वगैरे असतो. तेंडुलकरांच्या ३०-३५ नाटकांच्या पैकी पाच नाटके लोकांनी अधिक स्वीकारली याचे कारण त्यांचा गाभा हिंसा हा होता. शांततेचे नोबेल प्राईज नोबेल यांनी टीएनटीचा शोध लावून पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जो पैसा मिळवला त्यातून दिलेले आहे आणि सर्व शांतता प्रेमी आनंदाने ते पैसे घेतात.
आमचे विंदा म्हणतात ‘सर्व वर्ण शेवटी सुवर्णात विलीन होतात.’ हिंसा सुवर्णाकडे नेत असेल तर त्याकडे सोईस्कर कानाडोळा केला जातो.
आपली उत्तरे/प्रतिसाद सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.
आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू शकता.
आणि हो,
या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता.
–संपादक
