

मरण स्वस्त होत आहे – लेखक बाबुराव बागुल
इंग्रजी अनुवाद : लुटालूट – अनुवादक मानव कांबळी
प्रकाशक – हॅचेट इंडिया
१७८ पाने
किंमत – रु. ४९९ किंडल – रु. १७७
बाबुराव बागुल यांची पहिली कथा १९५७ साली आचार्य अत्रेंच्या नवयुग या नियतकालिकातून प्रसिद्ध झाली; नंतर १९६३ साली प्रसिद्ध झालेल्या ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या आणि १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या कथासंग्रहांमुळे त्यांचे मराठी साहित्यातले स्थान भक्कम झाले. त्यांनी कविता, कादंबरी आणि वैचारिक असेही विपुल लेखन केले. शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक आणि प्रखर वास्तववादी चित्रण हा त्यांच्या साहित्याचा विशेष होता. त्यांनी रंगवलेल्या पात्रांच्या आयुष्यातल्या वेदना आणि क्रौर्य यांचे चित्रण करताना त्यांच्या विद्रोही लेखणीला वेगळीच धार येत असे. बागुल आणि इतर लेखकांच्या साहित्यातून हे वास्तव मराठी वाचकांच्या अंगावर गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ आदळत आलेले आहे; त्यामुळे कदाचित आज मराठी वाचकाला त्यातल्या काही गोष्टी त्या वेळेइतक्या धक्कादायक वाटणार नाहीत; पण त्यांची प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही.
नुकताच मानव कांबळी यांनी बागुलांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या कथासंग्रहाचा ‘लुटालूट’ या नावाने केलेला इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे; त्यामुळे एका महत्त्वाच्या कथासंग्रहाला अधिक मोठा वाचकवर्ग मिळणार आहे. आपल्या प्रस्तावनेत कांबळी म्हणतात, की हिंदी किंवा बंगाली साहित्याप्रमाणे मराठी साहित्य (भारतातील) मुख्य प्रवाहात आलेले नाही; हे खरेच आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न झाले पाहिजेत. कांबळी यांनी आपला वाटा उचललेला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
या संग्रहात एकूण ११ कथा आहेत. ‘Plunder (लुटालूट)’ या कथेत आपल्या भावावर जिवापाड प्रेम करणारी; पण आपल्या बरबादीमुळे स्त्री-जीवनाचा तिरस्कार करणारी गंगू आहे. भावाला मुलगा झाला या आनंदात आपल्या भाचीच्या देहविक्रयातून मिळणारे पैसे ती त्या लबाड ऐतखाऊ भावावर उधळते. फसवून किंवा जबरदस्तीने धंद्याला लावलेल्या मुलींकडे ती फक्त पैसे मिळवायचे साधन म्हणून बघते. ‘Hard Labour (सक्तमजुरी)’ या कथेत गरीब कामगारांना फसवून जुगार खेळायला लावून त्यांचे पैसे हडप करणारी गँग आहे; पण गँगच्या सदस्यांचीच परिस्थिती इतकी हलाखीची असते, की खिशात पैसे नाहीत, घरात पत्नीला मारहाण, उपाशी मुलेबाळे या परिस्थितीतून सर्वांना जायला लागते.
‘Hunger (भूक)’ या कथेत तापाने फणफणलेल्या आणि दारिद्र्याने गांजलेल्या एका मातेचा दोन भुकेलेल्या मुलांच्या तोंडात काहीतरी घास पडावा यासाठी आटापिटा आहे. ‘Mother (आई)’ या कथेतली आई नवर्याच्या मृत्यूनंतर मुलाला पोसण्यासाठी दुसरा काही मार्ग नाही म्हणून स्वतःला अनेक पुरुषांच्या हवाली करते. शेवटी वाढत्या वयाचा मुलगा तिला शिंदळ ठरवून निघून जातो तेव्हा एका गिर्हाइकाच्या मिठीच्या चिखलात अडकलेल्या तिची सुटका होत नाही. ‘The People in the Field (मैदानातील माणसे)’ या कथेत मुंबईत क्वचितच पडणार्या कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणारी वस्ती कुडकुडत असते. लोकांमधल्या क्षय, महारोग, दारू, गांजा अशाही परिस्थितीत तरण्याताठ्या मुलीच्या ‘भीतरी थंडीने उडवून दिलेला मदनवायू’ किंवा पत्नी समजून कोणी कुत्र्याच्या पिलाला कुरवाळणे, या सगळ्यांपेक्षा अतोनात दारिद्र्याचे प्रभावी वर्णन आहे.
‘Education (शिक्षण)’ ही कथा ध्येयवादाने सुरुवात करणार्या एका तरुणाची आहे. गांधीजयंतीला, ‘हातात झाडू घ्या’ असे सांगणार्या शिक्षकांना तो ठणकावतो, “आम्ही पाच हजार वर्षांपासून मारतोय झाडू. आता तुम्ही मारा. गांधी बनू बघत होते, तुम्ही बनून बघा.” त्याच्या शाळकरी मित्राच्या दुःखाचे कारण म्हणजे ‘त्याच्या बहिणीचे अति देखणेपण, अन्…त्याच्या देखण्या आईचे विधवापण.’ स्वतःच्या बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आणि आईला शिवीगाळ करून अचकट विचकट बोलणार्या मेहुण्याला मारण्याचा तो निर्धार करतो. त्याचा तो प्रवास म्हणजे ही कथा.
‘Death is Becoming Cheap (मरण स्वस्त होत आहे)’ या कथेतला निवेदक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा कविमित्र कविता. आपापल्या संकल्पनांची त्या दोघांमधे देवाणघेवाण होते. गाडी पुढे सरकत नाही म्हणून दोघेही घराबाहेर पडून भटकंती करतात. त्यांना दिसणार्या प्रत्येकच माणसाची स्वतःची अशी शोकात्म कथा असते. त्यांच्या हिंस्र कथा ऐकून आणि पाहून तो कविमित्र म्हणतो, “मी लिहिलेला मजकूर फेकून देतो अन् एकच ओळ ठेवतो – ही मुंबई आहे. इथं माणसाला माणूस खातो अन् मरण स्वस्त होतं…!”
‘Ruffian (मवाली)’ ही एकमेकांच्या जिवावर उठलेल्या गुंडांची कथा आहे. त्यांच्यातला दादा हा “ग्रेट माना जा सकता है;” पण “दादा नहीं माना जा सकता,” अशी इतर गुंडांची भावना आहे; कारण हा दादा इतरांप्रमाणे गँग बनवत नाही आणि इतरांना पैसा आणि बायका पुरवण्याची व्यवस्था करत नाही. ‘Injustice (जुलूम)’ ही कथा निवेदनशैलीच्या दृष्टीने वेगळी आहे. एका निरपराध आणि सज्जन माणसाला खुनाच्या खोट्या आरोपाखाली पोलिसी छळाला सामोरे जावे लागते, त्याची ही कथा आहे.
‘Thirst (तहान)’ या कथेतला चिंध्या हा तरुण, गोर्या पण महारोगी बाईच्या बरोबरीने भीक मागण्याचा धंदा करतो; पण हे इतरांना कळू न देता, आपल्याला चांगली नोकरी आहे आणि मालकाच्या तरुण सुंदर मुलीबरोबर आपले लफडे आहे अशी इतर मित्रांची समजूत करून देतो. ‘The Birth of a Poem (कवितेचा जन्म)’ या कवितेचा नायक जितक्या गलिच्छ, ओंगळ अनुभवांतून जातो तितकी त्याची प्रतिभा रसरशीत शब्दकळा आणि आशयाची कविता जन्माला घालते.
इतक्या सशक्त कथांचा अनुवाद हे एक आव्हान होते आणि ते अनुवादकाने सर्वसाधारणपणे चांगले पेलले आहे. अनुवाद करताना शब्दाला दुसर्या भाषेतले प्रतिशब्द बहुतेक वेळा शोधता येतात; पण काही शब्द या बाबतीत चांगलेच चकवतात. अनुवादक कांबळी प्रस्तावनेत असे म्हणतात की बागुलांनी प्रमाण भाषा नाकारली. या बाबतीत असे दिसते की बागुलांनी प्रमाणभाषा आणि प्रमाण भाषेचे काही संकेत झुगारून कथेतील पात्रांच्या अनुभवातली दाहकता थेट वाचकांपर्यंत पोहचवणारे शब्दप्रयोग, या दोन्हीचा वापर केला आहे.
‘घोर घृणा,’ ‘अधम अत्याचारी,’ ‘अघोरी स्वार्थाने,’ ‘निर्दय लुटारू मागण्यांनी भरलेले पत्र,’ ‘अत्यंत निष्ठुर, निःसंग,’ ‘करुणाजनक धडपड’ अशा प्रमाणभाषेतल्या शब्दप्रयोगांची अनेक उदाहरणे देता येतील. ‘गंगू वंचाळाच्या वस्त्रविहीन शरीराचे वर्णन कोकशास्त्राचे संदर्भ घेऊन अत्यंत बीभत्स भाषेत’ हा तर प्रमाण भाषेचा नमुना म्हणता येईल. जुलूम या कथेच्या नायकाचे वर्णन करताना वापरलेले ‘सात्विक तरुण’, ‘निरपराध फ्रेडी’, ‘श्रमशूर’, ‘सशक्त तरुण’ किंवा त्याला पडलेल्या पोलिसांच्या माराच्या वर्णनासाठी वापरलेला ‘प्रहारांचा पाऊस’ हे शब्द इतर कथांमधल्या पात्रांसाठी वापरलेल्या शब्दांच्यापेक्षा अगदी वेगळे किंवा सोवळे म्हणण्यासारखे आहेत. अशा शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द शोधणे कठीण नसते; पण बोलीभाषेतल्या काही शब्दांमधला जोश किंवा रासवटपणा दाखवणारे इंग्रजी शब्द शोधणे मात्र कठीण जाते. शिळंधार पावसाला aggressive म्हणताना मूळ ‘फ्लेवर’ हरवल्यासारखा वाटतो. त्या मानाने ‘रक्ताचा मुसंडा’ याचा अनुवाद bead of blood exploded ठीक वाटतो. कांबळी यांनी असे अनेक चपखल शब्द वापरले आहेत.
बागुलांच्या कथांमधली पात्रे एक तर अतिशय वाईट परिस्थितीत रोजच्या रोज जीवनाचा संघर्ष झेलणारी आहेत किंवा सभ्यतेचे, न्यायाचे सर्व संकेत झुगारून आणि स्वतःवर झालेला अत्याचार विसरून इतरांवर अत्याचार करणारी आहेत. निवेदनातल्या भाषेच्या तुलनेत संवादांमधली भाषा अर्थातच त्या त्या पात्रांनी वापरलेली नैसर्गिक भाषा आहे. त्यात बोली भाषा, काही ठरावीक समुदायांमध्येच वापरले जाणारे शब्दप्रयोग आणि मुंबईसारख्या शहरात अपरिहार्यपणे होणारे मराठी आणि हिंदीचे मिश्रण या सर्वांमुळे मराठी वाचकासमोर काही ठळक चित्र उभे राहू शकते.
मात्र याच संवादांचा इंग्रजी अनुवाद करताना वाचक भारतीय असेल की परदेशी हा प्रश्न अनुवादकासमोर उभा असतो. काही संदर्भ भारतीय वाचक सहज समजू शकत असल्याने, मूळ संमिश्र भाषेतले संवाद कमीत कमी शब्दांत पण अधिक प्रभावी ठरू शकतात. ‘बाप का राज’ या आपल्या अतिपरिचयाच्या शब्दप्रयोगासाठी, ‘Does your father dictate the law?’ किंवा ‘जवा जीवा इसेस झालं तवा’ साठी ‘When I could not take it anymore’ यातून अर्थ ध्वनित झाला तरी मूळची नैसर्गिक सहजता हरवते. ‘याला तू स्याडी करावं याची ताजुब वाटती. याची दिल काय नाईस हाये.’ या वाक्यांमधून असले काही बोलणारा माणूस आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर यांविषयी वाचक काही अंदाज बांधू शकतो. हे परदेशी वाचकास तर शक्यच नाही; पण भारतीय वाचकालाही हे फक्त इंग्रजी संवाद वाचून समजण्यासारखे नाही. ही अनुवादकाची मर्यादा नसून अनुवादाच्या कामात येणारी अपरिहार्य समस्या आहे.
“सटवीचा लेख आपण खडकावर कितीही धडका घेतल्या तरी पुसत नसतो.” या वाक्याचा “Satavi’s mark never disappears, no matter ….” हा अनुवाद सटवीची संकल्पना माहीत नसलेल्या वाचकाला समजणे शक्य नाही म्हणून अनुवादकाने तळटीप देऊन सटवीविषयी दोन वाक्यांत माहिती दिली आहे. Munja, tumbrels, patlin, paals, kerwa manivali, haatbhatti, pagdi, kali poths, Satpativrata, अशा प्रकारच्या शब्दांसाठी अनुवादकाने दिलेल्या तळटीपा मराठी रूढी आणि परंपरा यांची ओळख नसलेल्या वाचकांसाठी उपयुक्त ठरतील.
कथेतल्या प्रसंगांचे चित्रण करताना बागुल पात्रांच्या मनातले विचार, भास, जाणिवा, विविध दृश्ये, अर्धवट विचार या सर्वांचा वापर करतात. या कथांमधले काही संदर्भ आपल्या सामाजिक चौकटींमधली गुंतागुंत दाखवतात. ‘ब्राह्मणाच्या गरीब पोराची शेंडी, जानवं, गंध ही ऐट’ यात गरीब आणि ऐट हे शब्द एकत्रितपणे येणे हा वदतोव्याघात आहे. ज्या काळात या कथा लिहिल्या त्या काळात त्यात काही तथ्य असू शकेल. (अनुवादात मात्र taking after poor Brahmin children म्हणताना ‘ऐट’ हा शब्द वगळला आहे.) असाच एक विरोधाभास या कथांमधल्या गरीब, गांजलेल्या लोकांच्या आयुष्यात दिसून येतो. गोरा रंग आणि सौंदर्य अनेकांना हव्याहव्याशा वाटणार्या गोष्टी शाप म्हणून काही स्त्री-पुरुषांच्या मानगुटीवर बसलेल्या दिसतात. बलवान लोकांकडून त्या सौंदर्याचा उपभोग घ्यायचा हक्क असल्याचा समज आणि इतरांकडून पराकोटीची असूया यांमुळे ते सौंदर्य भरडले जाते.
या संग्रहात ‘मरण स्वस्त होत आहे’ आणि ‘लुटालूट’ अशा दोन्ही शीर्षकांच्या कथा असताना अनुवादकाने मूळ ‘मरण स्वस्त होत आहे’ या नावाऐवजी अनुवादासाठी ‘लुटालूट’ हे नाव का वापरले हे समजू शकले नाही. अर्थात लुटालूट हे नावही आशयाच्या दृष्टीने योग्य असेच आहे; कारण या कथांमधल्या प्रवृत्तींचे समाजातून अजूनही उच्चाट्न झालेले नाही याचे पुरावे रोजच्या रोज आपल्याला मिळत असतात.
