पुनर्भेट नॅशनल पार्कची ११

 भाद्रपदातील आठवणी    

 श्रावण संपला आणि भाद्रपदातील उबदार उन्हं पडू लागली. या उन्हात उद्यानात जिकडे तिकडे फुलपाखरं भिरभिरू लागली. ऑफिससमोरच्या नीलकंठीच्या झुडपावर   पिवळ्या रंगाची फुलपाखरं  येऊ लागली. नीलकंठीचं झुडूप  साधारण तीन  ते चार फुटांचं असतं. नीलकंठीच्या आठ ते दहा  सें.मी. लांबीच्या  दांडीवर साधारण तीन सें.मी. अंतरावर एक ते दोन सें.मी. व्यासाची चिमुकली निळ्या रंगाची फुलं  येतात. या नीलकंठीच्या सभोवताली काळ्या पंखांवर पांढरे ठिपके असलेली  कॉमन क्रो जातीची  नर – मादी फुलपाखरं  बॅले डांस करणाऱ्या नर्तकांप्रमाणे  एकत्रित उडताना दिसू लागतात. करड्या रंगावर पिवळे ठिपके असलेली चिमुकली तीन ते चार सेंटीमीटर लांबीची  ग्रास ज्वेल फुलपाखरं  पोपटी गवतावर एकत्रितरित्या  उडू लागली. उद्यानात अनेक टेकड्या आहेत. तिथे गेल्यावर कधी कधी महाराष्ट्राचं  ‘राज्य फुलपाखरू’ असलेलं ब्लू मॉर्मोन किंवा मराठीत ‘राणी पाकोळी’ आपल्या समोरून सुळकन उडून जातं.  या राणी पाकोळीची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. उडताना गडद निळा रंग नजरेत भरतो.  झाडाच्या सुकलेल्या पानासारखं दिसणारं  ब्ल्यू ऑकलीफ फुलपाखरू एखाद्या झाडाच्या खोडावर शांतपणे बसलेलं असतं. वाळलेलं पान समजून दुर्लक्ष करावं  तर सुळकन उडतं आणि पंखांच्या खालची गर्द निळाई नजरेत  भरते. फुलपाखरं केवळ फुलांवरच उडताना दिसत नाहीत; तर काही काही ठिकाणी शांतपणे क्षारपान करत असतात.  जंगलात एकांतात असलेल्या वडाच्या झाडाच्या  सावलीत ओलसर जमिनीत  फुलपाखरं क्षारपान करत बसलेली असतात. अचानक कोणी माणूस बाजूने गेला तर शेकडो फुलपाखरं  भिरभिरत आजूबाजूला उडून जातात. केवळ वडाच्या झाडाच्या सावलीतच नाही तर ज्या ठिकाणी प्राण्यांचं मलमूत्र पडलेल असतं त्या ठिकाणीही फुलपाखरं क्षारपान  करत बसलेली असतात.  भाद्रपदात रंगीबेरंगी  फुलपाखरांच्या मागे जावं   की रानफुलांच्या रंगांत  हरवून जावं असा प्रश्न कित्येकदा पडतो. रस्त्याच्या बाजूच्या गवतावर पिवळ्या रंगाचा कवळा फुललेला असतो. लालभडक मातीच्या  पायवाटेच्या बाजूने हिरव्या गवतावर कवळ्याचे  पिवळ्या रंगाचे ठिपके  मनोहारी दिसतात. तलम पोताची पिवळ्या रंगाची पाच ते सहा सें.मी. व्यासाची मोतियाची फुलंही  जागोजागी फुललेली असतात. या वर्षीचा उद्यानातील भाद्रपद खास आहे; कारण आठ वर्षांनी फुलणारी  कारवी या वर्षी फुलली आहे. कारवीच्या कळ्या फिकट ते गडद गुलाबी रंगाच्या असतात. फुलं मात्र गडद निळ्या रंगाने डोळ्यांचे पारणे फेडतात. कारवीची फुलं पाच ते सहा सें.मी. व्यासाची असतात. बारकाईने पाहिलं तर मध्यभागी असलेल्या फिकट पांढऱ्या रंगात पिवळसर रंगाचे चिमुकले स्त्रीकेसर व पुंकेसर उठून दिसतात.  काळ्या रंगावर लाल पट्टे असलेले तीन ते चार सें.मी. लांबीचे ब्लीस्टर बीटल जणू कारवीच्या फुलण्याची वाटच बघत असतात. कारवी फुलली रे फुलली की फुलांमध्ये रसपान करताना दिसतात. विविध रंगांच्या फुलपाखरांना  तर कारवीची ही दुर्मीळ  मेजवानीच असते. ती अखंडपणे फुलांवर उडत असतात. भाद्रपद हा काही झाडांचा फुलण्याचा हंगाम तर काहींचा फळण्याचा  हंगाम असतो.    उन्हाळ्यात ज्या काळ्या कुड्याच्या झाडाला बर्फासारखी पांढरीशुभ्र फुलं आली होती त्या झाडावर आता भाद्रपदात दोन ते तीन सेंटीमीटर व्यासाच्या दीड फुटांच्या काळपट  हिरव्या रंगाच्या शेंगा लटकत असतात. या शेंगांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाजूबाजूच्या दोन शेंगा खालच्या टोकाला एकमेकांशी जोडलेल्या असतात. आपण त्यांना वेगळं करायचा प्रयत्न केला तर पांढऱ्या रंगाचा चीक खाली टपकतो. एकमेकांशी जोडलेल्या  दोन शेंगांचा मिळून आकार एखाद्या छोट्या हाराप्रमाणे वाटतो. श्रावणापर्यंत फुलत असलेल्या  उद्यानातील ताम्हणीच्या झाडांवर भाद्रपदात मोठ्या बोराच्या आकाराची हिरवी फळं आलेली आहेत. 

  दि . ११.९.२०२४ 

         फुलण्याच्या आणि फळण्याच्या  या महिन्यात प्राण्यांनाही  आपलं प्रेम व्यक्त करावंसं वाटलं तर नवल नाही. आमच्याकडे एक सिंहाची  जोडी आहे. नराचं नाव मानस तर मादीचं नाव मानसी. ही जोडी दोन वर्षांपूर्वी गुजरातच्या जुनागढ प्राणिसंग्रहालयातून  आमच्याकडे आणली आहे. मानस चांगलाच बळकट, भरदार आयाळ असलेला जवळ जवळ पावणे  दोनशे किलोचा आहे; तर मानसी अगदीच नाजूक चणीची ऐंशी ते नव्वद किलोची आहे. या जोडीच्या परस्पर संबंधांत गेले वर्षभर मी खूप उतार चढाव पाहिले. सुरुवातीला त्यांना  वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये  ठेवले होते. त्यांना जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र करायचा प्रयत्न करायचो तेव्हा मानस मानसीवर डरकाळी फोडून धावत यायचा. ही बिचारी आमची नाजूक मादी या डरकाळीने  घाबरून जायची. त्याच्यापासून दूर पळायची किंवा पाय समोर ठेवून त्यावर डोकं ठेवून अंग आक्रसून बसायची – जणू, “मी आता तुला शरण आले आहे; कृपया मला काही करू नकोस,” असं सांगायची. मग हा मानस आणखीनच चिडायचा. तिला पकडायचा प्रयत्न करायचा. त्यात कधी कधी तिला जखमा व्हायच्या. मला  तिची खूप काळजी वाटायची. आम्ही  जखमेचं ड्रेसिंग करायचो. पुन्हा आम्ही जेव्हा त्यांना  एकत्र सोडायचा प्रयत्न करायचो तेव्हा पुन्हा एकदा असंच काहीसं घडायचं. सिंहांच्या  पिंजऱ्यावर  काम  करणारा प्राणिरक्षक वैभव पाटील खूप हुशार आहे. तो एक दिवस म्हणाला, “मॅडम, आपण एक चूक करतो आहोत. आपण सिंहाला मोकळ्या जागेत अगोदर सोडतो  आणि मग त्याच्याबरोबर मादीला सोडतो. सिंहाला अगोदर सोडल्याने ती जागा त्याच्या हक्काची  होते; मग मादीने  त्यात  प्रवेश केला की तो खूप आक्रमक बनतो आणि ती घाबरून जाते. आपण उलट करू या  – उद्या  मादीला प्रथम  बाहेर सोडू या. थोडा वेळ गेला की मग नराला सोडू या.” मलाही वैभवचं हे पटलं. आम्ही दुसऱ्या दिवशी तसं केलं  आणि काय आश्चर्य! आक्रमकरित्या जवळ येणाऱ्या नराला मादीसुद्धा तसच  प्रत्युत्तर  देऊ लागली. हळूहळू नराला कळलं आपण तिच्या इच्छेविरुद्ध  तिच्याजवळ जाऊ शकत नाही. मग तो तिच्यापासून दूर बसू लागला. कधीतरी त्याने जवळ यायचा प्रयत्न केला तर मादी तिच्या पुढच्या पायाच्या पंज्याने त्याला फटका द्यायची मग तो निमूट दूर व्हायचा. आता दोघं एकत्र तर राहू लागली होती पण त्यांच मिलन काही होत नव्हतं.  या भाद्रपदात गौरी आगमनाच्या दिवशी मी दुपारच्या सुट्टीत घरी जेवायला आले होते. वैभवचा  मला फोन आला, “मॅडम, मानस आणि मानसीचं मिलन  सुरू झालं आहे.” मला अतिशय आनंद झाला.  मानसीने मानसला एकदाचं पसंत केलं  होतं. हे मिलन दोन दिवस सुरू होतं. त्या काळात मानस अतिशय आक्रमक झाला होता. कोणी माणूस जर  पिंजऱ्याच्या जाळीजवळ  गेला तर उसळल्यासारखा अंगावर यायचा. आम्ही त्यांना संपूर्ण एकांत  मिळेल याची काळजी घेतली.  दोन दिवसांनंतर मानसी त्याला जवळ येऊ देई ना. तेव्हा आम्हांला कळलं यांचा मिलनकाळ आता संपला. उद्यानात  याआधी सिंहाची  पिल्लं जन्माला आली  होती त्यानंतर तेरा  वर्षांचा काळ गेला होता. आता त्या दोघांच्या मिलनाचं फलित  नेमक काय होईल याची आम्ही सर्वजण  उत्सुकतेने वाट बघतो आहोत. 

    दि. २३.९.२०२४

         रानफुलं आणि त्यांवरील फुलापाखरं बघताना भाद्रपद मोठ्या आनंदात  सरत होता. त्यात सिंहांच्या  मिलनाने दुधात साखर पडली होती; पण प्राणिसंग्रहालयात आनंद आणि दु:ख एकाच वेळी वावरत असतं.  बदलापूरहून  एक  जखमी अवस्थेतील  माउस डीअर किंवा मराठीत ज्याला  ‘पिसोरी हरीण’ म्हणतात ते आलं. हरणाच्या कुळातील हे पिसोरी हरीण साधारण तीन किलो वजनाचं असतं. या छोट्याशा हरणाला कोणीतरी छऱ्याच्या  बंदुकीतून गोळ्या घातल्या होत्या. त्याच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या. त्याला पाठीमागच्या बाजूने पॅरालिसीस झाला होता. या छोट्याशा  प्राण्याने कोणाचं काय बिघडवलं होत कोणास ठाऊक! उपचाराच्या टेबलावरून तो त्याच्या भोकरासारख्या डोळ्यांनी  केविलवाणा होऊन माझ्याकडे बघत होता. भाद्रपदातील निसर्ग बाहेर फुलून आला होता. सिंहांची जोडी प्रेमाने एकमेकांच्या जवळ बसली होती आणि मी ते सगळं बाजूला ठेवून जखमी पिसोरी हरणाचा उपचार करण्यात गढून गेले होते…

Author

Leave a Reply