संपादकीय : शितावरून भाताची परीक्षा

ब्रिटनच्या मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा झाली त्या वेळी योगायोगाने आम्ही लंडनमध्ये होतो.  कसलीही लिखित घटना नसताना चालणाऱ्या या आगळ्यावेगळ्या लोकशाहीबद्दल मनात कुतूहल होतेच. मजूर पक्षाचे नेते व आताचे पंतप्रधान सर किर  स्टारमर यांनी या निवडणुकीसाठी मजूर पक्षाच्या प्रचार मोहिमेचा आरंभ केला.  ती सभा  बीबीसीवरून पाहता आली.  वक्तृत्व फारसे प्रभावी नसले तरी अत्यंत शांतपणे, संयतपणे ते बोलत होते. बोलण्यामागे काहीतरी विचार आहे आणि आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाण आहे हे जाणवत होते. गुन्हेगारी स्वरूपाच्या न्यायव्यवस्थेसाठी केलेल्या योगदानासाठी विद्यमान पंतप्रधानांना ‘सर’ हा किताब देण्यात आलेला आहे.  

      आम्ही पंधरा दिवस ग्रेट ब्रिटनमध्ये होतो.  पंधरा दिवसांत एखाद्या देशाच्या जनतेच्या मनात काय चालले आहे त्याचा अंदाज येणे तसे अवघड आहे;  तरीही हुजूर पक्षाविषयीची नाराजी इतकी टोकाची होती, की या वेळी मजूर पक्ष नक्कीच जिंकणार असे सर्व जणच सांगत होते.  अर्थव्यवस्था व आरोग्य व्यवस्था ही या निवडणुकीत केंद्रस्थानी राहतील अशी चिन्हे होती.  सुदैवाने ग्रेट ब्रिटनमधली आरोग्य व्यवस्था कशी चालते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागला नाही;  परंतु अर्थव्यवस्थेच्या काही छटा अनुभवास आल्या.  लंडनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महाग आहे.  लंडनच्या एखाद्या लांबवर असलेल्या उपनगरातून नोकरीनिमित्त  रोज लंडनवारी करायची असेल तर एका आठवड्यासाठी येणाऱ्या खर्चात  महिनाभराचा किराणा येऊ शकतो.  युरोपीय देशांत व विशेषतः अमेरिकेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या स्वस्त आहेत असे चित्र असते; त्याला छेद देणारे हे चित्र होते. आम्ही सहा जण गटाने प्रवास करत होतो;  त्यामुळे रेल्वे, बस किंवा  सबवेने प्रवास करणे हा एक पर्याय होता; तर प्रवासासाठी टॅक्सी वापरणे हा दुसरा पर्याय होता.  किंचित महाग असला तरी सोयीचा असल्याने आम्ही बऱ्याच वेळा दुसऱ्या पर्यायाचा वापर केला;  तरी देखील टॅक्सी मिळवणे हे खूप अवघड होते असाच अनुभव आला.  काही वेळा १५ ते २० मिनिटे रस्त्यावर हातवारे करत टॅक्सीची आराधना करावी लागली.  रेल्वे स्टेशनवर तिकीट कार्यालयात चार ते पाच तिकीट खिडक्या होत्या; परंतु त्यांपैकी एक किंवा दोनच खिडक्या चालू असायच्या.  त्यामुळे छोटीशी का होई ना – रांग असायची.  या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अश्वेत  कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय होते. हिथ्रो  एअरपोर्टवर उतरल्यानंतर इमिग्रेशनसाठी लांबच लांब रांग होती.  दक्षिण आशिया आणि युरोप यांच्यासाठी वेगवेगळ्या रांगा होत्या.  दक्षिण आशियाई रांगेत अर्थातच अधिक गर्दी होती. रांग वाढली म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असे काहीही झाले नाही.  तेथील वास्तव्यात इंग्लंड हा बऱ्यापैकी तंत्रस्नेही देश आहे याची प्रचिती आली; परंतु इमिग्रेशनसारख्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून रांगेतला वेळ कमी करण्यासाठी कसलेही प्रयत्न होत नाहीत हे जाणवले.  हॉटेलला जाण्यासाठी आम्ही हॉटेलची बस वापरली.  त्याचा बस चालक चक्क भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रीयन निघाला. चालकाचे धागेदोरे  कोकणातील वेळास व माणगाव या गावांपर्यंत पोहोचत होते. त्याला लंडनमध्ये येऊन एक वर्ष झाले होते.  तो बऱ्यापैकी स्थिरावला आहे असे त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते.  त्याच्या कुटुंबालाही नंतर इंग्लंडमध्ये आणण्यात त्याला यश आले होते. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी सोडल्यावर त्याने आवर्जून आम्हांला ‘जय महाराष्ट्र’ केला. आमचे मुक्कामाचे ठिकाण मध्यवस्तीतील एक भव्य अपार्टमेंट होते.  लंडनमध्ये तात्पुरत्या निवासाला आलेल्या लोकांना भाड्याने देण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेची १०० च्या आसपास  युनिट्स असलेले ते एक निवासी संकुल होते.  इतक्या मोठ्या अपार्टमेंटचे संचालन स्वागत कक्षातील फक्त दोन किंवा तीन व्यक्ती करत होत्या.  तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य आहे.  या अपार्टमेंटची स्वच्छता आठवड्यातून एकदाच केली जाते.  एकंदरीत धुळीचे प्रमाण कमी असल्यामुळे ते चालत असावे.  सामान खोलीपर्यंत पोहोचवणे किंवा खोलीतून मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचवणे यासाठी  कसलीही  सेवा उपलब्ध नव्हती. काही नामवंत उपाहारगृहांमध्ये जाण्याचा योग आला.  काही वेळा दिलेली ऑर्डर पूर्ण करण्यासाठी खूप  वेळ लागत होता असे निदर्शनास आले. 

                  इंग्लंडची अर्थव्यवस्था कशावर चालते याबद्दल थोडासा विचार केला; तर बँकिंग क्षेत्र,  व्यवस्थापन तंत्रज्ञान  व पर्यटन हे या अर्थव्यवस्थेतील काही महत्त्वाचे घटक आहेत असे लक्षात आले. सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या  मोठ-मोठ्या रांगा, टॅक्सी मिळण्यासाठी लागणारा उशीर,  उपाहारगृहांमध्ये  सेवा मिळण्यास लागणारा उशीर,  आठवड्यातून एकदाच स्वच्छता या सर्व बाबींनी मागणी आहे परंतु पुरेसा पुरवठा नाही हे लक्षात येत होते.  स्थलांतरित लोकांवर सार्वजनिक सेवा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अवलंबून असाव्यात असे पंधरा दिवसांच्या अनुभवावरून निश्चितपणे वाटले.  त्यामुळे स्थलांतरित लोकांच्याबद्दल देशाचे धोरण काय असावे हा कळीचा मुद्दा आहे.  युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय अगदी चुरशीने झालेल्या सार्वमताद्वारे अत्यंत निसटत्या बहुमताने घेतला गेला. या निवडणुकीत मतदान करताना मतदारांच्या  मनात स्थलांतरितांचे काय करायचे हा प्रश्न नक्की असणार याचा अंदाज आला.  युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर फायदा होत आहे की तोटा याबद्दलही उलट सुलट प्रवाह आहेत.  त्याचेही पडसाद  निवडणूक निर्णयात उठले असणार.  इंग्लंडमध्ये २०१० साली ऑलिंपिकचे आयोजन झाले.  हे आयोजन करताना खूप मोठा खर्च झाला.  त्या मानाने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही;  त्यामुळे मोठा तोटा आला.  हा तोटा भरून काढण्यासाठी आता इंग्लंडमधील पर्यटकांना पाहाव्याशा वाटणाऱ्या अशा सर्व वास्तू व संस्थांमध्ये तिकीट लावून प्रवेश आहे.   तिकिटाचा दरही महाग म्हणावा असाच आहे. अर्थात काही निवडक राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमध्ये आजही प्रवेशमूल्य नाही हेदेखील नमूद करावे लागेल.  

                  इंग्लंडमधल्या आरोग्य सेवेबद्दल तेथील काही  नागरिकांशी  सविस्तर चर्चा झाली. सार्वजनिक आरोग्य सेवा हे सामाजिक न्यायाचे एक प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाला एका विशिष्ट दर्जाची सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्यावी हा या योजनेचा हेतू.  हा हेतू अत्यंत स्तुत्य  आहे यात काही शंकाच नाही. कोविड महासाथीने सर्व जगातील  सर्व प्रकारच्या आरोग्य व्यवस्थांची  वाट लावली हे आपण पाहिलेच.  इंग्लंडमध्येही तेच झाले.  कोविड पूर्वकाळात या सेवा बऱ्यापैकी चालत होत्या.  कोविडनंतर आता तुम्हांला चांगल्या दर्जाच्या एनएसएस सेवा फक्त आयसीयू मध्येच मिळू शकतात.  इतर सेवांसाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागते असे आत्ताचे चित्र आहे. तोकडी अंदाजपत्रकीय तरतूद,  डॉक्टरांची व अवैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी संख्या,  या नेहमीच्याच अडचणी एन. एच. एस.समोरदेखील आहेत. आम्ही तिथे असताना निवडणूक प्रचार चालू झाला होता; परंतु तो आपल्यासारखा रस्त्यांवर झिरपला नव्हता.  कुठेही दैनंदिन कामकाज,जनजीवन  निवडणुकीमुळे अडले आहे असे चित्र दिसले नाही.  सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीबाबत कसलीही चर्चा होताना ऐकू आली नाही. स्टिफ अप्पर लिप (Stiff Upper Lip) हे  ब्रिटिशत्वाचे  एक सन्माननीय लक्षण का मानले जाते त्याचा आम्हांला आलेला हा प्रत्यय असावा. 

Through childhood, through manhood,

Through life to the end,

Struggle bravely and stand

By your colors, my friend.

Only yield when you must;

Never “give up the ship,”

But fight on to the last

“With a stiff upper lip.”

Phoebe Cary (1824-1871) 

        हे झाले आमच्या भेटीच्या दरम्यान आम्हांला आढळलेले अतिशय मर्यादित असे ब्रिटिश जनमानसाचे दर्शन.  आता याबाबत तिथल्या आणि इथल्या तज्ज्ञांना या निकालाबद्दल काय वाटते त्याची थोडी चर्चा झाली पाहिजे.  ऋषी सुनक हे पहिले अश्वेत  पंतप्रधान.  २०१५ सालच्या आसपास त्यांनी ब्रिटिश राजकारणाच्या वरच्या फळीत प्रवेश केला.  बोरीस जॉन्सन यांचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले.  हुजूर  पक्षाच्या नेतृत्वावरून त्या पक्षात गेल्या पाच वर्षांत खूप  उलथापालथ झाली.  अशा काहीशा अस्थिर परिस्थितीत सुनक  यांना पंतप्रधानपद मिळाले.  बोरीस जॉन्सन यांच्या विदूषकी  वागण्याने पंतप्रधान पदाला असलेली प्रतिष्ठा  व  विश्वासार्हता पार लयाला गेली होती. फक्त १९  महिन्यांत  सुनक  यांनी ती प्रतिष्ठा बऱ्यापैकी  परत मिळवली असे  तज्ज्ञांचे मत आहे.  त्याचबरोबर ते सत्तेवर आले त्या वेळेला इन्फ्लेशनचा दर ११% च्या आसपास होता तो त्यांनी २ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश मिळवले. कोविड महासाथीमुळे त्यांच्यापुढची आव्हाने अधिक गडद झाली व त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला बऱ्याच मर्यादा आल्या. 

      हुजूर पक्षाची मतांची टक्केवारी कमी झाली. विधिमंडळातील जागा  त्यापेक्षा अधिक प्रमाणात कमी झाल्या हे खरेच आहे. मजूर पक्षाची टक्केवारी फार मोठ्या प्रमाणात वाढली असे नाही.  त्यांच्या जागा मात्र खूप वाढून त्या खरोखर ४०० पार गेल्या.  त्याचे  महत्त्वाचे कारण निवडणुकी वेळी कुठल्या मतदारसंघात अधिक लक्ष द्यायचे त्याचे स्टारमर व सहकाऱ्यांनी केलेले अचूक नियोजन हे आहे; शिवाय  रिफॉर्मिस्ट आणि लिबरल डेमोक्रॅट या दोन पक्षांनी हुजूर पक्षाच्या खूप जागा या वेळी  खाल्ल्या  आहेत. एकंदरीत कीर  स्टारमर यांचे कामदेखील सोपे नाही.भारतासोबतचा केली अनेक वर्षे अनिर्णित  असलेला मुक्त व्यापार करार ते कशा हाताळतात त्याकडे आपले सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.   

Author

One thought on “संपादकीय : शितावरून भाताची परीक्षा

  1. लेखन ग्रेट ब्रिटनच्या सामाजिक-राजकीय घडामोडींबद्दल महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करते.

Leave a Reply