” पुरुषातल्या सगळ्या गाळलेल्या जागा
आई लपवत जाते
बायको भरत जाते
आम्ही यालाच पौरुष मानत जगतो..”
इतकं सटीक आणि खरं लिहिणाऱ्या कवी मकरंद गोडबोले यांचा ” अंतर्मुखी ” हा पहिला वहिला कवितासंग्रह !
व्यवसायाने वास्तुविशारद असलेला मकरंद खूप लहानपणापासूनच लिहितोय आणि ते ही थोडं हटके !एका मोठ्या कंपनीत संस्थापक संचालक असलेला मकरंदचा दिवस,कामाचा फार मोठा बोजा डोक्यावर घेऊनच सुरू होतो आणि संपतो . या सर्व धावपळीत त्याने आपली कविता /लेखन महत्प्रयासाने जपले आहे ,सांभाळले आहे !
संग्रहाच्या नावापासूनच वेगळेपण जपणारा ,हा कवी आपली आगळी वेगळी कविता घेऊन रसिकांसमोर येतो ,तेव्हा तो प्रस्थापित कवींच्या / त्यांच्या कवितेच्या आणि एकंदरीत काव्य या संकल्पनेच्या प्रांतात काहीसा नवखा असल्याने थोडेसे चाचपडतो पण तो हा चक्रव्यूह भेदण्याचा नेटाने कविचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न म्हणजेच हा कवितासंग्रह असं मला वाटते !
या संग्रहाला अतिशय तोलामोलाची प्रस्तावना लाभली आहे ती सुप्रसिद्ध वक्ते ,लेखक मिलिंद जोशी या कवीमनाच्या प्राध्यापकाची ! ते म्हणतात , ” लांबी रुंदी आणि खोली यांच्याशी मकरंद यांचा रोजच संबंध येत असतो ; कारण ते पेशाने वास्तुविशारद आहेत.आपण जगण्याचा विचार जेव्हा करतो तेव्हा लांबी म्हणजे माणसाला लाभलेले आयुष्य,रुंदी म्हणजे त्याच्या जगण्याचा पैस आणि खोली म्हणजे त्याला सापडलेला जीवनाचा अर्थ. गणिती सूत्रात किमती टाकल्या की ती सुटतात,आयुष्याच्या गणिताचे तसे नसते. कोणत्याच सूत्राने आयुष्यातली गणितं सुटत नाहीत.आपली शहाणीव सोबतीला घेऊनच जगण्यातले पेच सोडवावे लागतात.याचे भान असलेली प्रगल्भ कविता मकरंद गोडबोले यांच्या या संग्रहात आहे.” आपल्या प्रस्तावनेत ते पुढे म्हणतात , ” माणसाच्या वाट्याला आलेलं जीवनाचं दान स्वीकारून वाटचाल करताना दैवावर विसंबून जगता येत नाही.आपल्या लढाया आपल्यालाच लढाव्या लागतात. जगण्याच्या कुरुक्षेत्रावर अर्जुनही आपणच आणि कृष्ण ही आपणच या भूमिकेतूनचन लढावे लागते. असा समंजस दृष्टीकोन देणारी गोडबोले यांची कविता आयुष्याची ‘ मिती ‘ आंधळ्या विश्वासाने इतरांच्या हातात द्यायला तयार होत नाही ..”
या कविता संग्रहाची पाठराखण सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मकरंदचे अत्यंत लाडके गुरू डॉ.वा. शं.देशपांडे यांनी केली आहे.ते म्हणतात , “ एकाच वेळी बुद्धिप्रामाण्य आणि भावनाप्रधानता यातला संघर्ष ,तुझ्या कवितांमधून नेमका व्यक्त झाला आहे.त्यावेळी ‘science has replaced beautiful ideas with ugly facts’या वचनाची आठवण येते.”
या संग्रहातल्या कविता वाचताना मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलेला विश्वास दृढ होत जातो ,हे नक्की!
त्यातील काही कवितांचा हा आस्वाद :
* ‘वाट ‘ ही खूप सकारात्मक कविता ! कवी म्हणतो ,
” तिथे नाहीये जमीन , वाटही संपलीये
माहीतीय मला ,पण ऐक माझे ,
‘ एकच पाऊल टाकून बघ ‘
या संपूर्ण स्कारात्मकतेत शेवटी कवी म्हणतो ,
” भिऊ नकोस
पाऊल टाक पहिलं ,मग दुसरं ,तिसरं..
हळूहळू सवय होईल
पायाखाली काहीच नसताना चालायची
नाही तिथे वाट काढायची …”
* ‘ डायरी ‘ ही कविता स्वतःलाच जगणं शिकणारी जगण्याला आव्हान देणारी.. तिची सुरुवातच पहा :
” माझ्या डायरीच्या कोऱ्या पानांना
खूप काही सांगायचंय किंवा कदाचित
ती सांगतच आहेत भरभरून..”
आणि कवितेचा शेवट करतांना कवी म्हणतो :
” मी डायरीला म्हटले
अशी आरशासारखी माझ्यात पाहू नकोस
ती म्हणाली ,
मग उठसूट माझ्यात लपू नकोस
फिरव पाठ माझ्याकडे आणि जा भीड आयुष्याला
मग मी घट्ट मिटून जाईन…शेवटच्या पानापर्यंत..”
* ” द्वैत ” या कवितेत एक वेगळा विचार कवी सहज
मांडून जातो . एखादा शब्द आपण कवितेत लिहून जातो परंतु त्याचा अर्थ कवीच्या मनात आणि वाचणाऱ्याच्या मनात सारखाच असेल असे नाही.
त्याचे कारण सांगताना कवी म्हणतो :
” पण माझे घाव वेगळे ,तुमचे वण वेगळे
माझा पीळ वेगळा , तुमची विण वेगळी..
….आणि एकच शब्द तरी
दोघांना कुठे दिसतो सारखा.. “
* ‘ सावल्या ‘ या आपल्या कवितेत ,आपल्याच सावल्या ( सावलीसारखी बरोबर रहाणारी माणसे असावी कदाचित ) आपल्याला कशा छळत असतात ,मनस्ताप देतात ,हे कवीने गझलसदृश कवितेत नवीन रूपके घेऊन सांगितले आहे ,त्यातील चार ओळी पहा :
” होतीच चिलखते नी ,किल्ले नवे परंतू
आघात सावल्यांनी आतून आत केला ..”
आणि
” व्यूहे रचून झाली दलही तयार होते
शत्रू हुशार त्याने हल्ला मनात केला..”
* ” दोरी ” ही अशीच डोंबाऱ्याची,सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी केलेली तुलना ! त्याचे वेगवेगळे दृष्टांत देऊन जमलेली सुरेख कविता.
” एका दोरीवरून चालत राहायचं आपोआप
नाकासमोर ,तोल सांभाळायचा दोन्ही हातांनी,
आपलेच विचार इकडेतिकडे सांडू नयेत म्हणून
हळूहळू विश्वासानी धैर्यानी एकएक पाऊल
टाकायचं ,नस्ती रिस्क नको म्हणून..
आणि डोंबऱ्याला नावं ठेवायची
काय काय आचरट चाळे करतो म्हणून.. “
* ” संवाद ” ही कविता संवाद साधते तो थेट देवाशी !
कोणतीही तक्रार म्हणून केलेला हा संवाद नाही तर चांगले लोक चांगले वागूनही ,त्यांच्या पदरी येणाऱ्या दु:खा बद्दल केलेला हा संवाद आहे ! कवी म्हणतो :
” पण सुख भोगायला खूप आहेत अवतीभवती
दु:ख वाटायला गेलो तर कुणी जवळ करत नाही”
कवितेच्या शेवटाकडे येतांना कवी म्हणतो :
“तू ज्याला माया म्हणतोस ,ते माझ्यासाठी सत्य आहे
तुझा तो शाश्वत मोक्ष ,माझ्यासाठी मिथ्या आहे
जगू दे मला परत मनस्वी,पाप- पुण्याच्या तराजुशिवाय
स्वर्ग- नरकाच्या चाबकाशिवाय
फक्त एकच असू दे नियम जगण्याला आकंठ
इतकेच आहे मागणे..आणि थोडी तुझी सोबत..”
* ” पांघरूण ” कोणी कशावर आणि कशासाठी पांघरून घालतय किंवा घातलंय हे समजण्यासाठी ही कविता नक्की वाचावी लागणार. कवितेच्या शेवटी कवी म्हणतो :
” मग कळले ,की हसणं माझं शस्त्र नाहीच आहे
आणि ढाल ही नाही ,ते फक्त पांघरूण आहे
तुझ्या वारांवर घातलेले..
जगाला दिसू नये म्हणून…”
*” क्षण ” आयुष्याला अंत आहे पण क्षणांच्या साखळीला नाही..किती वेगवेगळ्या क्षणांना सामोरा जातो ना मानव ? त्या क्षणांच्या साखळीची ही कविता ,मला खूप आवडलेली …
काळ हा कोणाचाच नसतो आणि नसणारही म्हणूनच
कवी म्हणतो :
” पण याचे काळाला काहीच नव्हते घेणे
तो म्हणाला तुम्हीच प्रवासी घडीचे
मी अखंड.. “
* ” नास्तिक ”
कवी म्हणतो ,आम्ही नास्तिक होण्यास ,देवा तूच कारणीभूत आहेस. किती वेगळा विचार मांडलाय या कवितेत ! देवाने माणूस निर्माण केला पण माणसाने स्वतः ला वेगवेगळ्या धर्मात वाटून घेतलं आणि अशांतता निर्माण केली. शेवटी तो म्हणतो :
” नसशीलच तू
कारण आम्ही तुझेही आता तुकडे करून टाकलेत
राम ,रहीम ,योनाह ,जिझस
आणि त्यातला एक तुकडा छातीशी कवटाळून
दुसऱ्याचे शिर उडवण्यास आता आम्ही कचरत नाही
हे तरी कुठं दिसतंय तुला ..
मी नास्तिक आहे याचे कारण मी नाही,
तर तूच आहेस..”
* ” महफिल ” ही गाण्याची नाही ,कवितांची नाही तर वेदनांची महफिल आहे ,असं मला वाटते. वारंवार वार होऊनही तो म्हणतोय ..
” या आज समोरून..एकदातरी
आता पाठीवर घावांसाठी जागा उरली नाही
मलाही बघायचंय..
तुम्हाला तेच वार समोरून करता येतात का
इतकी आहे का ताकद तुमच्या मनगटात ..”
या कवितासंग्रहात कवीच्या काही तीन ओळींच्या तर काही चार ओळींच्या छोट्या छोट्या कविता आहेत ,त्या अतिशय समर्थ आणि समर्पक आशय घेऊन रसिकांसमोर येतात,त्यातील २/३ देण्याचा मोह आवरत नाहीये ..
* ” ही उशीच बेकार आहे
डोकं टेकलं रे टेकलं
की तिच्यात लपलेली स्वप्नं घेरून टाकतात ..”
* ” कसा थांबू
मी एक क्षण
जन्मतः च क्षणभंगुर..”
* ” फुले कुणाला वाहिली
रोज चढणाऱ्या शेंदरी कातडीला
का आतल्या सनातन दगडाला..”
* ” अजून नीटसे कळले नाही
शेंदूर लावून दगडाचा देव होतो,का
देवाचा दगड होतो..”
* ” सगळे मला नास्तिक म्हणाले
तेव्हा गाभाऱ्यात देव नव्हता
हे बघितले त्यांनी
पण मनात अजून गाभारा आहे हे नाही बघितले.”
हा संग्रह शुभानन चिंचकर यांनी आपल्या ‘स्वयं प्रकाशन ‘तर्फे काढला आहे.
मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढलं आहे.
पुणे
अंतर्मुखी : मराठी कवितासंग्रह
मकरंद गोडबोले
स्वयं प्रकाशन
पहिली आवृत्ती : मार्च २०२४
मूल्य रु १७५/-
संपर्क : ९८९०८११५६७
