बेंगलोर डायरी ८

माझे एक शेजारी त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणून घरी आले; तेव्हा घरी पाहुणे आलेले होते. पत्रिका देताना ते शेजारी, आलेल्या पाहुण्यांकडे बघून म्हणाले, ‘तुम्ही पण नक्की या.’ लग्न होऊन मला काहीच महिने झाले होते; त्यामुळे RSVP देण्याच्या काळात असे घरी आलेल्या पाहुण्यांनादेखील घेऊन या म्हणणारे मला वेगळेच वाटले. हे  तोंडदेखले असेल असेही एकदा मनात आले; पण मग आमच्या लग्नाचे फोटो दाखवताना नवरा, सासू काही अनोळखी चेहरे बघत म्हणाले, “हे बहुदा सोबतच्या माणसांचे पाहुणे असतील!”  तेव्हा ‘पाहुण्यांना घेऊन या’ म्हणतात तेव्हा खरेच घेऊन जायचे असते हा मोलाचा धडा मला लग्नानंतर काही दिवसांतच मिळाला. 

   लग्न, वास्तुशांत यांसारखे कार्यक्रम सगळीकडे सारखेच तर असणार या माझ्या समजाला छेद गेला मी बेंगलोरला आल्यानंतर.  सर्वसामान्यपणे लग्न लागते आणि त्यानंतर रिसेप्शन होते; पण आमच्या बेंगलोरमध्ये मात्र लग्नाच्या आदल्या संध्याकाळी रिसेप्शन असते आणि दुसऱ्या दिवशी बहुतेकदा पहाटे लग्न लागते. मला सुरुवातीला हे खूप खटकायचे; पण नंतर त्यामागचे कारण समजून घ्यायचा प्रयत्न केला. कोणतेही कार्यालय हे २३ तासांसाठी मिळते. संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी ५ वाजेपर्यंत असे ते २३ तास असतात; मग त्यात मुहूर्त भल्या पहाटेचा असला किंवा दुपारचा असला तरीही अनेकदा ऑफिसमुळे, नोकरीमुळे अनेकांना यायला जमत नाही; मग अशा लोकांसाठी सोय म्हणून लग्नाच्या आदल्या रात्री रिसेप्शन ठेवले जाते. तसेही विधी होण्यासाठी काही तासांचा तर प्रश्न असतो; त्यामुळे नवरा मुलगा आणि मुलगी एकत्र उभे राहिले तरी कोणाला फार काही गैर वाटत नाही; अर्थात काहीजण अपवाद म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंत मंगल कार्यालय घेतात आणि मग सकाळी लग्न लावले जाते आणि संध्याकाळी रिसेप्शन ठेवले जाते. 

   रिसेप्शनची आणखी एक गंमत म्हणजे रिसेप्शन हे रात्रीच्या वेळी असल्यामुळे जेवणाचा थाट हा बुफे पद्धतीचा असतो. त्यात चाटपासून वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असतो. सीझन कोणताही असो; पण आइस्क्रीम असतेच! याउलट  थाट असतो लग्नाच्या जेवणाचा. लग्नाचे जेवण हे आजही केळीच्या पानावरच वाढले जाते. कन्नडिगा, तेलगू, तमिळ, मल्याळी – कोणीही असो, कोणत्याही जातीचे असो – लग्नाच्या विधीमध्ये फरक असेल, लग्नाचा पारंपरिक वेश वेगळा असेल, खाण्याचे पदार्थ थोडेफार वेगळे असतील; पण बदलणार नाही ती एक गोष्ट म्हणजे पंगत. अगदी जमिनीवर बसून नाही; तरी टेबलावर केळीची पाने लावून त्यावर पंगती आजही वाढल्या जातात. लग्नात, वास्तुशांतीत किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात अनेकदा आमंत्रण देताना सकाळी नाश्त्यापासूनच या म्हणतात. आता एकाच दिवशी दोन-तीन कार्यक्रमांना जायचे असेल; तर माझ्या ओळखीतले अनेकजण आदल्या दिवशी एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी नाश्ता आणि तिसऱ्या ठिकाणी जेवण असेही करतात. नाश्तासुद्धा मस्तपैकी केळीच्या पानांवरच वाढला जातो. नाश्त्यालासुद्धा एखादा गोड पदार्थ असतोच. शिरा – ज्याला इकडे केसरी भात म्हणतात – तो किंवा गोड पोंगल हे नाश्त्याचे हक्काचे जोडीदार आहेत. इडली-वडा, उप्पीट, सेट डोसा, पोंगल यांतले किमान दोन पदार्थ तरी नाश्त्यामध्ये असतात आणि मग केशरी भात; नाहीतर गोड पोंगल आणि शेवटी चहा किंवा कॉफी. तशी कॉफीच जास्त असते; पण तरीही चहादेखील असतोच. थंडीच्या, पावसाच्या दिवसांत तर ‘कषाय’देखील ठेवतात. कषाय हे खास मलनाड प्रांतातले पेय. खरंतर हा एक प्रकारचा काढाच – पण रुचकर काढा.           

   जेवणाच्या पंगतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील मेनू! हा नेहमीच पारंपरिक मेनू असतो – म्हणजे कन्नड लग्नात  केळीच्या पानावर डाव्या कोपऱ्यात पहिली खीर वाढून मगच वाढायला सुरुवात करणार; त्यानंतर वाढणार ते मीठ उजवीकडच्या कोपऱ्यात, त्याशेजारी चटणी, लोणचे, दोन कोशिंबिरी, दोन भाज्या, (हो इथे कोणतीही गोष्ट सम  क्रमांकात केली जाते म्हणून कोशिंबीरी, भाज्या किमान दोन तरी हव्याच. आता एखाद्या मोठ्या घरच्या कार्यात तर चार भाज्या, चार कोशिंबिरीदेखील असतात.) त्याखालच्या रांगेत मिठाच्या खाली मसालेभातसदृश भाताचा प्रकार (चित्रान्ना, वांगी भात, पुळियोगरे यांपैकी एखादा प्रकार), कोशिंबिरीच्या खाली गोज्जू म्हणजे आपल्या पंचामृतासारखा प्रकार, त्याच्या शेजारी दह्यातले रायते, जर पुरी आणि सागू/ कुर्मा असेल तर तो या गोज्जूशेजारी वाढला जातो आणि मग येतो भात! शास्त्र म्हणून चमचाभर वरण आणि त्यावर तुपाची धार सोडली की सुरुवात होते पंगतीला. वरण-भात संपता-संपता येतं सांबार. भात संपला असेल तर परत भाताची वाढ येते; मग येते सार, क्वचित असते कढी; पण ही कढी असते भाजी घालून केलेली. काकडी, कोहळा, भेंडी अशा भाज्या घालून केलेली कढई आणि गरम भात खाल्ला की मन तृप्त होते. सारभात, कढीभात संपता संपता कधी गरम-गरम पुरी येते; तर कधी गोड पक्वान्नं येतात. या गोड पदार्थांमध्येसुद्धा ऐपतीनुसार, कुटुंबाच्या स्थानानुसार कधी कधी दोन पदार्थ तर कधी तीन पदार्थ असतात. पुरणपोळी – मग त्यात डाळीची, नारळाची, खजुराची, खव्याची असे अनेक वेगळे पदार्थ मिळतात. कधी चिरोटी- मसाला दूध म्हणजे सुत्तरफेणी दूध किंवा बदामपुरी म्हणजे आपल्या पाकातल्या पुरीची बहीण किंवा मैसूर पाक, सुक्या मेव्याची बर्फी, हालबाय (तोंडात विरघळणारी बर्फी), मांडे असे खास स्थानिक पदार्थ असतात; तर कधी फ्यूजन मिठाई असते. सुरुवातीला वाढलेल्या खिरीमध्येसुद्धा असंख्य प्रकार मी इकडे आल्यावरच चाखले – खसखस, खजूर, साबुदाणा, फणस, गव्हल्याची यांतील एखाद्या प्रकारची असते.   त्याच्याबरोबरच  येतात भजी – गरमागरम मिरचीची, बटाट्याची, केळ्याची यांतली एखादी भजी ताटात येतात. कधी याच्याबरोबरच तळणीची मिरची, सांडगेसुद्धा देतात. पोट आता बास म्हणत असते आणि मग अशा वेळी येतो शेवटचा भात आणि दही. क्वचित कालवलेला दहीभातदेखील असतो; पण बऱ्याचदा पातळ ताक आणि भात घेऊन पंगतीची इतिश्री होते. असे जेवण जेवल्यावर विडा तर हवाच! कधी कधी विड्याबरोबर छोटे केळे – ज्याला एलक्की बाळेहण्णू म्हणतात – ते देतात आणि उठायच्या आधी जेवलेल्या प्रत्येकाला नारळ, पान-सुपारी, चिवडा-लाडू एका पिशवीत घालून देतात. याला इकडे तांबूल म्हणतात. ते दिले की मगच केटररचे काम संपते. हे असे जेवण जेवले की शेजारच्या खोलीत जरा आडवे पडण्याचीपण सोय असावी असे मला प्रत्येक वेळी वाटते. 

   वरती सांगितलेला मेनू हा काही फक्त लग्नामध्येच असतो असे नाही; तर कोणतेही शुभकार्य म्हणजे वास्तुशांत, मुंज, बारसे, षष्ट्यब्दीपूर्ती  अशा कोणत्याही कार्यक्रमाचे जेवणाचे टेंप्लेट वर सांगितले तसेच असते. बुफे पद्धतीपेक्षा आजही सगळ्यांचा भर असतो तो पंगती वाढण्यावर. कोणत्याही कार्यक्रमाचे यश अवलंबून असते ते तिथे दिल्या जाणाऱ्या जेवणावर आणि त्यामुळेच की – बसून गप्पा मारत वाढलेल्या जेवणावळी जास्त लक्षात राहतात, त्याचा आनंद जास्त उपभोगता येतो. हे सगळे झाले पोटोबाबद्दल; पण विठोबाबद्दल बोलायचे झाले तर इथे आजही सोहळे धार्मिक पद्धतीने साजरे करण्यावर जोर असतो; म्हणजे अगदी वाढदिवस साजरा करतानादेखील तारखेपेक्षा तिथी, नक्षत्र यांना जास्त महत्त्व दिले जाते. आजही दक्षिण भारतात तिथी, पंचांग रोजच्या आयुष्यातदेखील बघितले जातात. अशीच मला लग्नानंतर कळलेली गोष्ट म्हणजे ‘राहू काल.’ आठवड्याच्या प्रत्येक वाराचा एक ठरलेला वेळ हा राहू काल म्हणून पाळला जातो. उदाहरणार्थ सोमवारी सकाळी साडे सात ते नऊ हा वेळ राहू काल म्हणून ओळखला जातो; तर शुक्रवारी हीच वेळ असते साडेदहा ते बारा; तर या राहू कालात कोणतीही नवीन गोष्ट करायचे आजही टाळले जाते; त्यामुळेच कोणताही मुहूर्त कधीच या काळात नसतो. तसेच काही वारांनादेखील आजही वाळीत टाकले आहे. जसे  शनिवार, मंगळवार या वारांना सामान्यपणे कोणत्याही शुभ गोष्टी आजही केल्या जात नाहीत – अगदी नवीन गोष्टींची खरेदीदेखील या दिवसांना टाळली जाते. आता चूक बरोबर, वैज्ञानिक कारणे या सगळ्यांवर ऊहापोह हा वेगळा विषय आहे; पण आजचा विषय बेंगलोरमधील लग्नसमारंभांचे स्वरूप हा असल्याने त्याबद्दल लिहीत आहे.

   तुमची उपस्थिती हाच अहेर हा ट्रेंड आता इकडेही येत आहे; पण अहेर दिला नाही तरी परतीचा आहेर मात्र दिलाच जातो. खासकरून बायकांची ब्लाऊज पीसने ओटी भरली जातेच. रुसवे-फुगवे, मानापमानाचे अंक इथेही रंगतात; पण त्याशिवाय का मजा असते? मुळात माणसांना एकत्र भेटण्यासाठी एखादे कारण पुरते; त्यातून जर चविष्ट मेजवानी मिळत असेल तर काय शुभेच्छा आपसूकच ओठातून बाहेर पडतात. आधुनिक बदल स्वीकारतानाच आपल्या जुन्या परंपरापण न सोडणारा इथला समाज मला त्यामुळेच आवडतो. प्री वेड शूट तर करतील; पण लग्नात मात्र मुलं मैसूर पेटा बांधतील आणि मुली नऊवार, मडीसार किंवा कांजीवरम, धर्मावरम, ksic साड्या नेसतात. लग्नाच्या विधीत अजूनतरी लेहंगा आलेला नाही याचा आनंद आहे.

   भाषा येत नसली तरी चविष्ट जेवणासाठी म्हणून तरी एखादे कार्य अनुभवायचे असेल  आणि आपले कोणी ओळखीचे नाहीत; मग कसे अनुभवायचे हे जेवण हा प्रश्न पडला तर ‘मदुवे उटा’ (लग्नातले जेवण) या नावाखाली काही हॉटेलमध्ये केळीच्या पानावर स्वतःच्या पैशाने हे असे सगळे जेवण जेवता येऊ शकते. तसेही चविष्ट जेवणाच्या आठवणी या जास्त काळात मनात रेंगाळतात हे काही खोटे नाही!

(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)

Author

One thought on “बेंगलोर डायरी ८

  1. दक्षिण भारतात कमी अधिक फरकाने लग्न किंवा इतर कार्यक्रमातील भोजन याच प्रकारे असते. केरळ मध्ये केळीची पाने टेबलावर अंथरलेल्या कागदी गुंडाळीवर लावतात, जेवणं उरकली की टेबलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व पानं गुंडाळून ते एका मोठ्या खड्डयात टाकतात, कालांतराने एक चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत त्यापासून मिळते. केरळला निसर्गाने भरभरून झुकते माप दिले आहे, केरळी समाज अशा प्रकारे पर्यावरणपूरक काम करून त्याची परतफेड करत असावा. दक्षिणेकडील इतर राज्यातही असाच प्रघात असावा.

Leave a Reply